गो गो गोवा..

वैभवशाली राजस्थान


' मूछे हो तो नत्थुलाल जैसी, वर्ना ना हो ! ' हा फिल्मी संवाद राजस्थान मध्ये पदोपदी आठवतो. जो तो आपापल्या गिर्रेबाज मिशांना ताव देताना दिसतो. कुणाच्या मिशा म्हणे चाळीस फूट लांब आहेत तर कुणाच्या कल्ल्याकडे धावणाऱ्या भारदस्त. कुणाच्या गालावर महिरप साधणाऱ्या तर कुणाच्या दाढीत विलीन होणाऱ्या. कुणाच्या मिशीची टोके भूमीकडे वळलेली तर कुणाची गर्वाने आकाशाकडे पहाणारी! इथे बिनमिशीचा पुरुष दिसणे दुरापास्त. जो तो आपापल्या मिशीचा रास्त अभिमान बाळगून असतो. राजस्थानी दणकट मर्दानी पुरुषांना त्या भरघोस मिशा शोभतात देखील! आपल्याकडच्या उगीच चाळीस किलोच्या देहाला त्यांचा भार सोसणार नाहीच वरून लोक 'झुरळाला देखील मिशा असतात राव!' असा टोमणा देखील मारून घेतील.  तेथील राज महालात सगळे राजे जवळपास सारखेच दिसतात फक्त मिशांच्या दिशा,आकार आणि कर्तृत्व वेगवेगळे इतकेच. राजांच्या झुपकेदार मिशांचे प्रजेला कोण कौतुक ! त्या भरघोस मिशा चहात बुडून चिकट होऊ नयेत म्हणून कलाकारांनी स्पेशल चांदीच्या बशा देखील बनवल्या ! बशीला वरून झाकण केले आहे त्या मुळे मिशा अलगद त्या झाकणावर टेकाव्यात आणि मधल्या पन्हाळीतून गरमा गरम चहा राजाच्या मुखात अलगद जावा ही इच्छा. तिथे जाऊन कधी नव्हे ते मिशांचे छान निरीक्षण झाले आणि सामान्य ज्ञान वाढले. 


अनेक राजांनी मेवाड मारवाड मध्ये सुखाने राज्य केले. राणा प्रताप सारख्या महान राजांचे आयुष्य फक्त रणांगणावर  सरले त्यांनी काही उपभोगले नाही. राजा सांगा आपल्या अंगावर युद्धातील ऐंशी जखमांचे वैभव अभिमानाने मिरवत होते इतकेच नाही त्यांचा एक डोळा ही युद्धात निकामी झाला. राणा प्रताप बावीस वर्षे युद्ध करीत होते. संपूर्ण कारकिर्दीत चित्तोडगड जिंकता आला नाही म्हणून हा महत्वाकांक्षी राजन मंचकावर झोपला नाही. रानावनात राहून झाडाच्या पानावर जेवला! राजसुखाचा त्याग करून अशा अनेक राजांनी मुघल अत्याचारांपासून जनतेचे रक्षण केले.  राजपुताना बटालियन पाहताना त्या निधड्या छातीच्या शूर वीरांची आठवण होतेच. या वीरांकडे नुसते पाहिले तरी शत्रूच्या काळजात धडकी भरली पाहिजे. गडांवरच्या सहा सातशे वर्षापूर्वीच्या त्या राज वैभवाची साक्ष आजही अचंबित करते. चौदाव्या शतकापासून अनेक लढाया मेवाड मध्ये लढल्या गेल्या. नंतरच्या काही नशीबवान पिढ्यांनी मात्र कुठेही एक थेंब रक्त न सांडता फक्त राज वैभव उपभोगले. ज्याचे त्याचे नशीब दुसरे काय? 


राजस्थान म्हणजे राजे लोकांचे स्थान. राजवैभव कसे असते ते तिथे जाऊनच पहावे. आजही तिथले अनेक गड उत्तम स्थितीत दिमाखात उभे आहेत. गडांचा राजा देखणा कुंभलगड  कुंभाराजाने पंधराव्या शतकात बांधला. प्रवेश द्वाराला अत्यंत सुबक असे दोन भले मोठ्ठे काळेभोर दगडी कुंभ उभे आहेत. चारशे वर्षापूर्वी कोणतीही वाहतुकीची साधने उपलब्ध नसताना, या गडाभोवती छत्तीस किमी लांबीची चिरेबंदी संरक्षक भिंत बांधली आहे.  चीनच्या भिंती नंतर जगातली ही दोन नंबरची लांब भिंत आहे. अरवली पर्वतराजीतली ही वळणा वळणाची भिंत इतक्या उंचीवर कशी बांधली असेल हा प्रश्न पडतो. कुंभलगड इतका उंच आहे की रिक्त हस्ते चढताना देखील घाम फुटतो. याच राजा कुंभाने चित्तोडगडचा प्रसिद्ध विजयस्तंभ आणि अनेक मंदिरे बांधली. त्यांची कारकीर्द मेवाडचा सुवर्णकाळ म्हणून ओळखली जाते. राजे जयसिंग यांनी गुलाबी जयपूर मध्ये अनेक सुंदर वास्तू उभ्या केल्या. प्रत्येक राजाने वैशिष्ट्यपूर्ण बांधकामे करून प्रदेशाच्या सौंदर्यात भर घातली. इथले अनेक राजे संस्कृत, संगीत, काव्य, शिल्पकला, वैदिक गणित आणि खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. उत्कृष्ठ स्थापत्यकला आणि नाजूक नजाकतीच्या नक्षीकामाचा सुंदर आविष्कार म्हणजे राजस्थान. अनेक वर्षे अभ्यास करून राजे सवाई जयसिंग यांनी उभे केलेले भव्य जंतर मंतर आजही आपल्याला अचूक वेळ दाखवून चकित करते कोणतेही गुगल नसताना हा अभ्यास त्यांनी चारशे वर्षांपूर्वी कसा केला असेल याचे कुतूहल वाटते. त्या काळी घड्याळे नव्हती. सूर्याच्या कले प्रमाणे सावली स्थान बदलत जाते आणि अचूक वेळ समजते.  बारा चंद्र राशी, सूर्य राशी दाखवून त्यांचा २७ नक्षत्रांशी असलेला संबंध राजाने यातून दाखवून दिला. राजाचे हे ज्ञान आपल्याला स्तिमित करून सोडते.  बहुतांश राजे कलाप्रेमी आणि शूरवीर होते. प्रदेश जिंकले की तिथल्या राजकुमारीशी यांचे विवाह संपन्न होत असत. त्या जिंकलेल्या राण्यांचा स्त्रीहट्ट पुरवण्यासाठी अनेक सुंदर महाल,बागा निर्माण कराव्या लागल्या.


तिथल्या राजां- राण्यांच्या अनेक सुरस कथा ऐकताना आणि पहाताना अगदी तो काळ डोळ्यासमोर येतो. एका राणीचे नखरे आणि स्त्री हट्ट पुरवताना जेरीला आलेल्या आमच्या ग्रुप मधील पुरुष मंडळीना त्या कथा ऐकून उगीचच सामान्य माणूस म्हणून जन्माला आलो असे वाटून गेले. त्या राण्यांचे कंगवे, आरसे, शृंगार करण्याचे साहित्य, मुलायम सिल्कची अस्सल सोन्याच्या कलाबुतीची वस्त्रप्रावणे पाहून डोळे दिपले. मोती,रुबी,पुष्कराज, निळ,पाचूचे हिरेजडीत घसघशीत दागिने पाहताना तर त्या राण्यांचा हेवाच वाटला. किती ऐश्वर्य भोगत असतील त्या? असा विचार मनी डोकावला. परंतु एका राजाच्या दोन पासून छत्तिस पर्यंत राण्यांची संख्या ऐकली…. तेंव्हा मात्र आपल्या राजाची आपण एकच पट्टराणी आहोत आणि त्यातच सर्वात मोठ्ठे सुख सामावले आहे ही जाणीव झाली. जयपूरच्या राजाच्या बारा राण्या होत्या, त्यांचे बारा महाल तळमजल्यावर आजही डौलाने उभे आहेत. राण्यांच्या दासिंची शंभरभर निवास स्थाने मागील बाजूस बांधली आहेत. राजाचा महाल वरच्या मजल्यावर असून त्यातून प्रत्येक राणीच्या दालनात जाण्याची एक चोरवाट आहे! राजाने रोज त्याला धाडलेल्या तांबुला मधील गंधा वरून आज कोणत्या राणीकडे जायचे आहे ते ठरवायचे! या राण्या सतत एकमेकिंवर कुरघोडी करत असत म्हणे. जी लवकर राजास वारस देईल ती जास्त लाडकी पट्टराणी व्हायची आणि तिचाच पुत्र पुढचा राजा व्हायचा. आपल्याच मुलाला राजपद मिळावे म्हणून लवकर वारस देण्यासाठी राण्यांची अंतर्गत चुरस असायची. सगळ्याजणी अत्यंत सावध राहून मातृत्वाची बातमी पूर्णपणे गुप्त राखत …कारण असुयेने कोणी कारस्थान करून गर्भपात घडवून आणू नये. राजवंशाच्या सुरक्षेसाठी या राण्या मातृत्वाची चाहूल लागताच रातोरात माहेरी पळ काढत. राजाला इतर अकरा राण्या असल्यामुळे एक राणी माहेरी गेलेली कधी समजे देव जाणे! त्या भन्नाट कथा  ऐकून आम्ही आधुनिक राण्या खूप हसलो. त्या गत राण्यांचे आत्मे आपापल्या राजाकडे पर्स,टोपी,पाण्याची बाटली सांभाळायला देऊन डौलात चालणाऱ्या आम्हा एकविसाव्या शतकातील पट्टराण्यांकडे पाहून नक्कीच उसासे टाकत असतील! 


या राण्यांसाठी त्या राजांनी अनेक सुख सोयी केल्या. राजवाड्यात चंदन-वाळा- केशर -गुलाबजलाचे फवारे सोडणारी हस्तिदंत  वापरून शोभायमान केलेली दालने आहेत.  कुठे त्यांच्या वन विहारासाठी सुंदर बागा तयार केल्या तर कुठे मनात आले की जल वर्षावात भिजण्यासाठी बादल महाल बांधले. या वाळवंटात पाऊस फार कमी म्हणून यांना पावसाचे भारी कौतुक. बिचाऱ्यानी अवाढव्य निळसर बादल महालात चक्क ढगांची गडद निळी बाळबोध नक्षी चितारली आहे. संगीत वाजते आणि कळ दाबली की राजा राणीवर सुगंधी जलवर्षाव सुरू होतो. अंगाची लाही लाही करणाऱ्या वाळवंटी प्रदेशात असा जलवर्षाव त्यांना किती बरं सुखवित असेल. राजा राणीसाठी अशा अनेक मनोरंजक सुखसोयी केल्या आहेत. राण्यांच्या शृंगारासाठी आरसे महाल तर जवळ जवळ सगळ्या पॅलेस मध्ये बांधलेला दिसतो. बिकानेरला एका राजाने तर प्रचंड मोठा कोरीव संगमरवरी स्विमिंग पूल बांधला आहे. त्याचे तीन टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावरील पायऱ्या वरून पाणी  धबधब्या सारखे वाहते अशी ही सुंदर रचना आहे. हा पूल अजूनही अत्यंत सुस्थितीत आहे. यात राजा राणीचा जलविहार चाले. सभोवती हिरवी गर्द झाडी,सुंदर फुले पाने, वरती निळे आकाश आणि खाली हिरवाईवर पसरलेला हा शुभ्र आरस्पानी स्विमिंग टँक राज वैभवाची खरी साक्ष देतो. अव्याहतपणे वाहणाऱ्या स्फटिकधारात पडलेली वनराईची छाया आणि आकाशाचे निळसर प्रतिबिंब फार विलोभनीय दिसते. अगदी 'यमुनाजळी  खेळू खेळ …कन्हैया का लाजता?' हे गाणे गुणगणत आपापल्या  राजसाला त्यात ओढून मस्त डुंबावे असे आम्हालाही वाटून गेले. पण हाय ..हा विचार अमलात आणायला आम्ही राण्या थोडीच होतो ?


राजांची उंची शैय्यागृहे सुंदरशा नाजूक फुल वेली,मोर,हत्ती, हरीण यांच्या अप्रतिम चित्रांनी सजवली आहेत. कोरीव काम केलेले उंची शिसवी पलंग,सिंहासना सारख्या आराम खुर्च्या सगळे राजवैभव आपल्याला नजरेने टिपता येत नाही इतके देखणे. एका खुर्चीवर बसायचा मोह आवरला नाही..आणि चक्क परवानगी होती म्हणून बसून सुखाने डोळे मिटून घेतले इतकी मखमली मुलायम होती.  रंगीत काचांच्या तावदानातून रंगीबेरंगी प्रकाशाची आभा महालात पसरते आणि राजमहाल स्वप्ननगरी भासू लागतो. त्या प्रकाशाच्या शलाका मुखावर पडताच कुठलीही सामान्य स्त्री रंभा-मेनका- उर्वशी भासू लागते…मग  राजघराण्यातल्या लावण्यवती ललना त्या राजपोशाखात किती बरं सुंदर दिसत असतील? त्यांची सुंदर चित्रे त्याची साक्ष देतात. राणी पद्मिनीच्या सौंदर्याचे प्रतिबिंब पाण्यात पाहून तो अल्लाउद्दीन खिलजी मूर्च्छित झाला म्हणे! प्रत्यक्ष पाहिले असते तर लगेच वरती नसता का गेला?आपण फक्त त्यांच्या सौंदर्याची कल्पना करायची इतकेच. रंगीत लोलकांची झुंबरे, हंड्या, उंची मखमली गालिचे, पडदे, लामण दिवे, अनेक आकारातल्या मोठ मोठ्या समया, सिंहासने आणि सोनेरी वर्खाने रंगवलेल्या भिंती आणि छत आपल्याला गत राजवैभवाची कहाणी सांगतात. दहा दहा किलो सोन्याचा वर्ख वापरून साकारलेले राजमहाल पाहून डोळे दिपून जातात.बऱ्याच ठिकाणी हे वैभव अजूनही तसेच अनुभवायला मिळते. ' जब प्यार किया तो डरना क्या ' म्हणत गिरक्या घेणारी सौंदर्यवती अनारकली, फुलपाखरा सारखा  फिरणारा तिचा सुंदर घागरा आणि वरती छतावर दिसणाऱ्या त्या कोमलांगीच्या हजारो प्रतिमा हे दृश्य इथल्या आरसे महालाच्या कल्पनेवर बेतले आहे. जयपूर मधील हा आरसे महाल आजही डोळ्यांचे पारणे फेडतो. खाली एक दिवा लावला तर त्याच्या हजारो प्रतिमा भिंतीत..छतावर सगळीकडे दिसतात. नभीच्या तारका धरेवर उतरल्यात की काय असा भास होतो. लावण्यमयी मुखकमल अशा हजारो प्रतिमे मधून पहाणाऱ्या राजाची रसिकता उच्च कोटीची असावी. येणारे सगळेच पर्यटक तिथे आपली किंवा आपल्या प्रियेची प्रतिमा पाहून खुष होताना दिसतात कारण त्यात ती स्वर्गसुंदरी भासतेच. 



चित्तोडगड येथे राणी पद्मिनीच्या महाला मागे रुसलेल्या राण्यांसाठी स्पेशल महाल आहे. लाडकी राणी रुसली राणी तिथे जाऊन बसली की मग राजा तिची खास समजूत काढायचां म्हणे! बायकांचे एकमेकींशी पटत नाही हा हजारो वर्षांचा इतिहास असताना इतक्या राण्या गुण्या गोविंदाने कशा बरं राहतील? एवढा श्रीकृष्णाने स्वर्गातून पारिजात आणला, सत्यभामेला दिला…तरी सत्यभामा फुले रुक्मिणीच्या दारात का पडतात म्हणून भांडलीच ना? मग या राण्या शांत कशा बसतील? बरं दागिने, उंची वस्त्रे यांचे ढीग असले तरी राजाने आपल्याकडेच आकृष्ट व्हावे म्हणून सगळ्या तळमळत असणारच. गेला राजा एकीच्या दालनात की रुसल्या बाकीच्या राण्या…झाली भांडणे सुरू. बिचारा राजा धावतोय समजूत काढायला. जयपूरच्या सिटी पॅलेस मध्ये  'दिवाण ए खास ' हा राण्यांचे कलह सोडवण्यासाठी खास बांधला गेला आहे! डझन भर राण्यांचे भांडण सोडवणाऱ्या त्या राजाची मनोमनी करुणा आली. घरातली माता आणि एकमेव राणी यांची भांडणे सोडवून मेटाकुटीला आलेल्या आमच्या ग्रुपमधल्या अनेक पुरुष लोकांना राजाचे हे कलहसुख ऐकून मात्र पोटात गोळा आला असावा. इतकी भांडणे सोडवणाऱ्या या राजापेक्षा आपण बरेच सुखी आहोत.. असे म्हणून त्या बिचाऱ्यानी  'ठेविले अनंते तैसेचि रहावे' असा सुस्कारा टाकला.


ग्रीष्म ऋतू वाळवंटात अंगांग पोळून टाकतो म्हणून जयपूरमध्ये जलमहाल बांधण्यात आला तो आजही सुंदर दिसतो. त्याचा एक मजला पूर्ण पाण्यात बुडलेला आहे त्यामुळे थंडावा रहातो. राजा समस्त राण्या आणि  दासदासिंचा लवाजमा घेऊन अख्खा ग्रीष्म ऋतू तेथे निवास करून शीतल रहात असे.  हवामहल तर फक्त राण्यांचे नख सुद्धा कुणाला दिसू नये पण त्यांना आतून बाहेरच्या मिरवणुका, हत्तींची झुंज,नृत्य,गायन वैगेरे कार्यक्रम यथासांग पाहता यावेत म्हणून मुख्य रस्त्यावर बांधला आहे. हवा महलला ३६० कोरीव खिडक्या आणि नक्षीची जाळीदार गवाक्षे आहेत. त्यातून थंडगार हवेची झुळूक राजा राणीच्या मुखकमलावर पडावी म्हणून कारागिरांनी बरेच कष्ट घेतले आहेत. कुठे फुलमहाल उभा करून राणीचे मन रिझवायचे प्रयत्न केलेत. कुठे महालाच्या प्रवेशद्वारावर सुंदर मयूर, हत्ती,देवांच्या प्रतिमा कोरून ठेवल्या आहेत. जागोजागी सूक्ष्म चित्रकारी( miniature painting) असलेली वैशिष्ट्य पूर्ण चित्रे दिसतात. दुरून फार काही विशेष वाटत नाही पण चित्रे झूम करून पाहिली की त्यात रेखलेले बारकावे पाहून आश्चर्य वाटते. शेकडो वर्षांपूर्वी इतकी सूक्ष्म चित्रं कशी रेखाटली असावीत समजत नाही. राजघराण्याच्या वापरातील अनेक सोन्या चांदीच्या वस्तूंची घडणावळ उत्कृष्ठ आहे. हे राजस्थानी कारागीर लाकूड, हस्तिदंत, संगमरवर, वस्त्रे, दागिने, सोन्या चांदीच्या हिरेजडीत वस्तू या सगळ्या कारागिरीत जगप्रसिद्ध आहेत. त्यांनी चिकाटीने या अजरामर कलाकृती निर्माण केल्या आहेत. राजाराण्यानी विवाह समयी वापरलेल्या वस्त्रांची अप्रतिम नाजूक नक्षी, पोत, रंगसंगती पाहून नेत्रसुख मिळते. भारतातला राजा किती असामान्य असतो याचे अनेक दाखले आहेत एक भला मोठ्ठा आठ फूट उंची आणि तेवढाच व्यास असलेला चांदीचा हंडा भरून पिण्याचे पाणी घेऊन एक राजन परदेश वारीला गेले होते म्हणे! खास करागिरानी  राजप्रेमाने हा हंडा अगदी थोड्या कालावधीत घडवला इतकी राजाची काळजी.  राजघराण्यातील लोकांचेच काय तेथील हत्ती,घोडे, उंट यांचे सोन्याचांदीचे दागिने देखील पहात रहावे इतके सुंदर आहेत. पायातले तोडे, नुपूर, गळ्यातील नानाविध प्रकारचे दागिने यांची बारीक कलाकुसर पाहून राजघराण्यातील घोडा व्हायला सुद्धा फार मोठे नशीब लागते हे पटते. 


राजस्थानातले रंगीले शूर राजे त्यांच्या रूपवती राण्या आणि अगणित किस्से ऐकत सहल संपते. रामायण ऐकून शेवटी रामाची सीता कोण हे समजू नये तशी अनुभूती येते. कुठे काय पाहिले आणि काय जास्त आवडले समजतच नाही. पाहिलेल्या सुंदर इमारती, कलाकृती, हस्तकला,लोककला सारे सारे नजरेसमोर फेर धरते. जत्रेत हरवलेल्या मुलासारखी अवस्था होते. मन परत परत तिथे जाऊन हरवते. हे संमोहन अनुभवायला एकुलत्या एक राणीला सोबत घेऊन राजस्थानात जा आणि त्या राण्यांचे सारे स्वप्नातीत वैभव नक्की दाखवाच. 




धन्यवाद…


विजयश्री तारे जोशी

कोल्हापूर





टिप्पण्या

  1. वैभवशाली राजस्थान चे तू केलेले वर्णन आश्चर्य कारक आहे! अफलातून!! खूप आवडले. राजस्थान ट्रीप करावी असं खूप वाटायला लागलंय. मस्त. यू आर ग्रेट!!!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद सखी..आता निवांत पणे राजस्थान ट्रीप कर. खूप काही पाहण्यासाठी आहे. विजयश्री

      हटवा
  2. अती सुंदर वर्णन...परत परत वाचावे लागेल तुमचे शब्द अप्रतिम आहेत...भाषा अलंकारिक आहे त्यामुळे आमचे मराठी सुधारेल

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मना पासून धन्यवाद ..पण कॉमेंट लिहिल्यावर तुमचे नाव जरूर लिहा कारण ती अनामित म्हणून प्रसिद्ध होते. माझी भाषा अवघड वाटते का? अवश्य सांगा पण मराठी भाषेतले वेगळे आणि आशयघन शब्द आपण वापरले पाहिजेत असे मला मना पासून वाटते. त्या निमित्ताने भाषेची थोरवी समजते. धन्यवाद...विजयश्री जोशी

      हटवा
  3. Madam Rajasthanatil varnan Apratim kele ahe.Purushanchya Mishiche varnantar pharach chhan.Rana Pratapancha Pratap chhanch.Rajvadyache varnan,tethil Ranyanche varnan tar pharach surekh kele ahe.Abhinandan Madam.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मना पासून धन्यवाद..कॉमेंट लिहिल्यावर नाव जरूर लिहा. तुमच्या प्रेरणा दायक शब्दांनी मला लिहायची स्फूर्ती येते. अजून पुढचे ब्लॉग वाचा.
      विजयश्री तारे जोशी

      हटवा
  4. Mami : very clearly and beautifully explained. Everything single thing you mentioned here is very true and unique. Keep it up 👍👍👍🙏🏻🙏🏻

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद...पण मला पाच भाच्चे आहेत...कुणी इतकी छान कॉमेंट केली ते समजलेच नाही. पण खूप छान वाटले की माझी भाचरे वेळ काढून मराठी वाचन करतात!!!
      व्वा छान...
      तुमची मामी...विजयश्री

      हटवा
  5. विजयश्री ,अग तू सुंदर काव्य काव्य करणारी प्रतिभावंत कवियत्री तर आहेसच पण तू हे सहल वर्णन इतकं अप्रतिम (हा शब्दं सुद्धा मला तोकडाच वाटतोय)केले आहेस की आपणच राजस्थान प्रत्यक्ष पहात असल्याची अनुभूती येते ,काय गं तुझी बारकावे टिपण्याची व ते जसेच्या तसे ,त्याला परत विनोदाची झालर लावून ,मांडण्याची एखाद्या मुरब्बी लेखकासारखी लेखनकला !
    अगदी मिशांपासून सुसाट सुटलेली तुझी वर्णनाची डगाडी आख्खं राजस्थान ,त्यातल्या राजे ,राण्या,कोरीवकाम,तिथले डोळ्याचे पारणे फेडणारे वैभव,राण्यांचे स्वभाव,त्यांचे दागिने,नटणे,व राजांचे पराक्रम व ऐष आरामी जीवन,सगळ्याचे तुझे निरीक्षण व ते लक्षात ठेऊन जसेच्या तसे मांडणे हे पाहून अक्षरशः मन थक्क होते ,खरच उत्तम लेखिकेचे सर्व गुण नक्कीच तुझ्यात आहेत ,तुझ्या मध्ये मध्ये विनोदी शब्दांच्या तुषारानीही वाचक अगदी ताजेतवाने होतात बघ,ही पण तुझी कला दाद देण्यासारखीच आहे गं !मीही राजस्थानची ट्रिप केली ,पण असं तुझ्यासारखं नाही बाई लिहायला सुचले !ग्रेट आहेस तू !प्रणाम तुझ्या या लेखाला !🙏🏻🙏🏻👌👌👌👍🏻👍🏻👍🏻

    उत्तर द्याहटवा
  6. विजयश्री ,अग तू सुंदर काव्य काव्य करणारी प्रतिभावंत कवियत्री तर आहेसच पण तू हे सहल वर्णन इतकं अप्रतिम (हा शब्दं सुद्धा मला तोकडाच वाटतोय)केले आहेस की आपणच राजस्थान प्रत्यक्ष पहात असल्याची अनुभूती येते ,काय गं तुझी बारकावे टिपण्याची व ते जसेच्या तसे ,त्याला परत विनोदाची झालर लावून ,मांडण्याची एखाद्या मुरब्बी लेखकासारखी लेखनकला !
    अगदी मिशांपासून सुसाट सुटलेली तुझी वर्णनाची डगाडी आख्खं राजस्थान ,त्यातल्या राजे ,राण्या,कोरीवकाम,तिथले डोळ्याचे पारणे फेडणारे वैभव,राण्यांचे स्वभाव,त्यांचे दागिने,नटणे,व राजांचे पराक्रम व ऐष आरामी जीवन,सगळ्याचे तुझे निरीक्षण व ते लक्षात ठेऊन जसेच्या तसे मांडणे हे पाहून अक्षरशः मन थक्क होते ,खरच उत्तम लेखिकेचे सर्व गुण नक्कीच तुझ्यात आहेत ,तुझ्या मध्ये मध्ये विनोदी शब्दांच्या तुषारानीही वाचक अगदी ताजेतवाने होतात बघ,ही पण तुझी कला दाद देण्यासारखीच आहे गं !मीही राजस्थानची ट्रिप केली ,पण असं तुझ्यासारखं नाही बाई लिहायला सुचले !ग्रेट आहेस तू !प्रणाम तुझ्या या लेखाला !🙏🏻🙏🏻👌👌👌👍🏻👍🏻👍🏻
    मनिषा कुलकर्णी, दुबई

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मनीषा..तुझ्या सारखे रसिक वाचक असतात म्हणून तर शब्द आपोआप झरत जातात.आता मी लेखिका वैगेरे आहे की नाही याचा सध्या मी विचारच करत नाही. मनात येईल ते घेऊन सुसाट सुटते तू म्हणालीस तसे.😄😄😄 अशीच रसिक दाद दे आणि हो चुका सुद्धा सांग सखी. तुला पूर्ण हक्क आहे बरे....विजयश्री

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -