- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मी नशीबवान म्हणून त्या वेळी छान सोलापुर ट्रेन सुरू झाली सकाळी पावणे नऊला. खूप गडबड होई घरातलं सगळं आवरून पळायला. हळू हळू सवय होऊ लागली आणि थोड्याच दिवसात घडी बसू लागली. वर्षानुवर्षे रोज पुणे-मुंबई अप-डाउन करणाऱ्या रणरागिणींना आठवून नाईलाजाने कंबर कसली. त्या आदर्श, चटपटीत बायकांसारखं कितीही फटाफट आवरलं तरी त्रेधा तिरपीट करत कशीबशी रेल्वे गाठता येऊ लागली, ते ही अगदी शेवटच्या बॉलवर सिक्सर मारून मैच जिंकल्या सारखी! आता एखादी ओव्हर राखून सेफली मैच जिंकावी ना, पण नाहीच शेवटच्या बॉल वर जिंकण्याची मज्जा काही औरच! अस्ताव्यस्त केस, हातात पिना, टिकल्या, पावडर, पुस्तके, मोबाइल, चार्जर, रुमाल, सौंदर्य प्रसाधने अशा हजारो वस्तूनी भरलेली अवजड पर्स, डबे बाटलीची वेगळी पिशवी सांभाळत, झाशीच्या राणी सारखा गाडीत प्रवेश व्हायचा. त्या मुंबापुरीच्या बायकाना मनोमन सलाम! किती स्मार्ट, टापटीप असतात सगळ्या!😍 भल्या पहाटेही ६:३५, ७:१३ असल्या लोकल न चुकता पकडणारच ! उत्साह तर भरभरून दिलाय मुंबईला, संसार करतात, ऑफिस करतात पण सायंकाळ झाली तरी चेहरा सकाळ इतकाच टवटवीत. कंटाळवाणी, वैतागलेली एकही बाई औषधाला दिसत नाही तिथे. यांच्या उर्जेचे गुपीत समजतच नाही. माझी मात्र सकाळी 8.45 ची गाडी पकडताना भारी दैना उडे, कधी संपणार हा वनवास असे वाटायला लागले..😐
आधी मी कोणत्याही डब्यात बसत असे. फारशा ओळखी नाहीत मग कानात हेडफोन अडकवून गप्प फक्त श्रवण भक्ती करायची, आला दिवस ढकलणे सुरू होते. लेडीज डब्बा फुल असायचा कायम म्हणून त्याच्या नादी लागत नव्हते. एक दिवस मात्र सहज लेडीज डबा थोडा मोकळा सापडला, शिरले आणि त्या डब्याने चक्क कवेतच घेतले मला! इतकं मस्त वाटलं,अगदी मोकळं ढाकळं.. जनरल डब्यात नाही म्हटले तरी अंग चोरुन, चोरा सारखे बसावे लागते. रोखलेल्या नजरा नको वाटतात, त्यामुळे दिलखुलास बोलायला, हसायला मिळत नाही. इथे मात्र हक्काची जागा मिळाली आणि त्या अखंड कलकल करणाऱ्या बायकांमध्ये मी पण सामील झाले, जणूकाही दुधात साखर! ट्रेनची खर्र..खट… बायकांची वट..वट या तालात रोजचा सव्वा तास कापरा सारखा उडू लागला.
बऱ्याच बायका आवतारात गडबडीत,पळत पळत कशा बशा गाडी गाठायच्या. घरी वेळ मिळायचा नाही सौंदर्य साधनेला, मग त्या लेडीज डब्यातच वेणी-फणी, मेकअप आवरून, सौंदर्यवती होऊन बाहेर पडत! कोणी मैत्रीणीची सैरंध्री होवून केशभूषा आवडीने करून देत. सगळ्यांचेच छोटे मोठे ग्रुप होते. त्यात नोकरदार,शिक्षिका, वकील, डॉक्टर्स, प्राध्यापक असे सगळेच असत त्यामुळे डॉक्टरी, डाएट, सौंदर्य वर्धनाचे सल्ले विनामुल्य मिळत. नवऱ्याला मुठीत ठेऊन सासूला धडा कसा शिकवावा ते नव्या सुनेला कसे वठणीवर आणावे इथंपर्यंत कुठल्याही विषयावर विचारमंथन तसेच अमृतवाणी प्रवचन चाले. या ग्रुप्सना वय, शिक्षण, आर्थिक स्थिती, क्षेत्र असं कशाचंही बंधन नसे. कुणीही बाई मग ती कितीही शिष्ट असो किंवा उच्च पदस्थ असो की विद्यार्थीनी असो..एकदा का या लेडीज डब्ब्यात आली की तिथे दिवस भराचा मुखवटा गळणार, ती नीट बाईसारखी विरघळणार आणि मनाच्या गाठी मोकळ्या करून सल्ले मागणार किंवा देणार हे ठरलेलंच.
अशा या डब्यात मी चांगलीच रुळून गेले कारण कॉलेज नंतर खूप काळाने रोज अशी सर्वांग सुंदर चर्चासत्रे, दंगामस्ती, गाणी असा टाईमपास मनसोक्त करायला मिळत होता. मिरजेच्या ऑफिसमध्ये नवीन असं काही काम नव्हतं मला. जणुकाही जीवनाचे सार समजावे, मी अनुभव संपन्न व्हावे यासाठीच पाठवले मला मिरजेच्या छोट्या वाळवंटात. कोल्हापूर संस्थानाची श्रीमंत घरातली लाडकी मुलगी त्या ऑफ़िस मधे, अगदी नाइलाजाने आली आहे असे तिथल्या लोकाना वाटे. त्या मुळे त्यानी कायम मला 'बडे घर की बेटी' असेच वागवले! माझे माहेरपण त्यांनी मिरजेच्या मसालेभात, भरली वांगी, भोपळा भरीत या उत्तम अस्सल शाकाहारी पदार्थानी केलं. ब्राह्मणपुरी मधल्या त्या सुखाच्या अनुभूतीची सर जगात कुठेच येणार नाही. मसालेभात या नावाखाली आपण काय खाल्ले जन्मभर ते तिथे जेवले तरच कळते. मसाले भातातल्या मसाल्याचा तो मंद हवाहवासा गंध, मऊपणा आणि चव याचे फक्कड गणित फक्त मिरजेच्या लोकानाच जमले आहे.
अप-डाऊन मुळे बरेच मजेशीर आणि हळुवार प्रसंग जवळून अनुभवता आले, त्यांनी मला जगाकडे बघण्याचा एक वेगळाच समृद्ध दृष्टीकोन दिला. सगळ्याच सया या डब्यात खूप हलकं व्हायला येत होत्या असं वाटायचं. आत येताना अगदी दुर्मुखलेली बाई सुद्धा मन मोकळं झालं की बाहेर पडताना हसरं कमळ दिसायची. त्या डब्यात चुकूनही कुणी पुरुष चढला तर आम्ही सगळ्या त्याच्यावर मधमाशांप्रमाणे हल्ला चढवून एकीचे बळ दाखवत असू. एखादा पुरुष ‘मेरे दो दो बच्चे, अकेली औरत कैसे संभालेगी, इसलिये बैठ्या ’ असं म्हणाला तर त्याला ‘पोरं आम्ही सांभाळू, तू पुढच्या डब्यात निघ’ असं ठणकावलं जाई तेही अगदी मिरजा हिन्दी मधे..' इधर काय कू चढ्या? तूम आगले डिब्बेमे बैठ, हम देखती तेरी औरत कू' आणि त्याची बायकोही तिच्या आदमीला ‘जानेकू’ बोलून आम्हाला छान साथ देई, कारण तिलाही मनातून आमच्या सोबत हसता हसता मोकळे व्हावे असे वाटे!
एकदा गाडीत एक नवविवाहिता चढली, हिरवाकंच चुडा, कोरी साडी, नवीन मंगळसूत्र पाहून अलिकडेच लग्न झाले असावे हे लगेच समजले. अगदी गवतावर नुकत्याच पडलेल्या दव बिंदू इतकी सुरेख दिसत होती की आम्ही बघतच बसलो तिच्या कडे. नव्या नवरदेवाना तिला सोडवत नव्हते, पण आम्ही ‘लेडीज डबा लेडीज डबा’ करत उतरवला त्याला. पुढच्याच डब्यात बसला तो. पण आमच्याकडे अमानत म्हणून ठेवलेल्या त्या सुंदर नावोढेला प्रत्येक स्टेशनवर उतरून बघून परत त्याच्या डब्यात जाउन बसत होता बिचारा, जिवाची नुसती घालमेल चाललेली. उतरताना आमची खट्याळ गॉगलधारी मैत्रीण म्हणाली ‘तो पिवळा शर्टवाला खुळाच आहे ना… याची बायको काय पळवतोय का आम्ही?’ हे वाक्य दुर्दैवानं मागेच उभी असलेल्या त्याच्या बायकोनं ऐकलं मात्र….आणि तिने तिच्या तोंडाचा अस्खलित पट्टा सुरु केला. मग काय पुढे पळणारी ती गॉगलधारी मैत्रीण, तिच्यामागे पळणाऱ्या आम्ही तिघी आणि आमच्या मागे तोंडाचा दांडपट्टा चालवत आमचा पाठलाग करत वेगाने येणारी ती नवविवाहिता आणि तिच्या मागे तिचा नवरा अशी वरात थेट गेटपर्यंत पोहोचली! मस्टर गाठायचे होते त्यामुळे मागे न बघता हसू आवरत रिक्षातून सुसाट सुटलो सगळ्या. तिच्या पती प्रेमापुढे आम्ही नामोहरम! त्या पतिव्रता नारीच्या नव-पतीप्रेमामुळे खाल्लेल्या शिव्या आठवून आठवडाभर खो खो हसत होतो आम्ही.😂
डब्यात हळदीकुंकू, वाढदिवस, पार्ट्या सुरुच असत. एकेकीने एक एक पदार्थ आणून चक्क मिसळ-पावाचा बेत ही आखला एकदा. एका मैत्रिणीच्या वाढदिवसाला तर गाणी म्हणून इतका बेसुरा गोंधळ घातला की गार्ड काय झालं हे पाहायला आले. नवीन लग्न झालेल्या मुली सासरच्या धाकाने स्वत:ची आबाळ करून घरातली कामं करून, खूप वेळा उपाशीच यायच्या. मग बाकीच्या मैत्रिणी आपले डबे तिला शेअर करायच्या, तिला नीट खात जा म्हणून बजावायच्या. गाडीत कधी कुणाचे डोहाळे पुरवले जायचे. तिला आवडलेला पदार्थ मुद्दाम करुन आणायचा. रोज तिची खुशाली विचारून तिला हसत खेळत ठेवायची जबाबदारी मोठ्या सख्या आनंदाने पार पाडायच्या. अगदी बाळंत होई पर्यंत सगळ्या तिची काळजी घेणारच. तिला काय होते काय नाही, काय खावेसे वाटते, अशक्त वाटते काय सगळीकडे डॉक्टर मैत्रीणींची बारीक नजर असायची. एकदा बाळ-बाळंतीण सुखरूप इथ पर्यंत बातमी आली की जीव भांड्यांत पडे.
रोज डब्यात पिना, कानातले, कपडे अशा अनेक विक्रेत्या बायका ओळखीच्या झाल्या होत्या. एक वयस्कर मावशी उत्तम खमंग पदार्थ करून विक्रीला आणायच्या. त्यानी सगळ्या चाकरमानी बायकांची रसना तृप्त केली. सगळ्यांशी छान गट्टी जमली होती त्यांची. खरेदी तर रोज असायचीच, त्यामुळे त्यांचीही रोज हजेरी असायची.
गाडी वेळेत सुटायची पण बायकांचा उशीर ठरलेलाच. काही वेळा गार्ड सुटायला लागलेली गाडी थांबवायचे, बायका जीव धोक्यात घालून डब्यात चढल्या की त्यांना भारी ओरडायचो आम्ही. त्यांनाही पटायचं, कळायचं पण वळायचं नाही हेच खरं. एकदा तर एका कॉलेज कन्येचा दारात ऊभी राहून बोलत असताना हातातून मोबाइल पडला..एकदम किंचाळली.. पळत आम्ही दारात गेलो, तर ही उडी मारायला लागलेली.. कशीबशी पकडली आणि ओढून आत आणून बसवली… आमच्या काळजाचा ठोका चुकवला..मग समजूत घातली की बाई गं, मोबाइल पेक्षा तुझ्या जिवाची किंमत खूपच जास्त आहे. एकदा एक वेडा डब्यात येउन बिभत्स चाळे करु लागला, मुली घाबरल्या.. मी चक्क त्याला दरडावत चाकू दाखवला.. घाबरुन तो खाली उतरला..तो फळे कापायचा चाकू होता, मग मात्र सगळ्या हसायला लागल्या.
सोलापूर पॅसेंजरला आषाढ-कार्तिकात खूप गर्दी होई. पंढरीच्या वारकरी लोक आमच्या डब्यावर पूर्ण आक्रमण करीत. सगळे वारकरी एकदम येत आणि पूर्ण डबा व्यापून टाकत. कुठलं लेडीज नी कुठलं काय! गाडीत शिरकाव झाला की त्यांची भजनाची मैफल, न्याहारी हे सगळं सुरु होई. एकदा त्यातल्याच एका बाईने तिचा लाल रंगाचा परकर वाळवण्यासाठी थेट खिडकीच्या गजाला बांधला आणि बाहेर सोडला! ही खतरा निशाणी बघून गाडी थांबली आणि गार्ड धावत आला. खरं काय हे कळल्यावर त्याचा चेहेरा पाहण्यासारखा झाला. त्याने तो फडकणारा लाल परकर आत घ्यायला लावला, मगच विठूरायच्या गजरात गाडी सुरु झाली! भक्तिभावाने वारकरी विठूरायाची भजने इतकी सुरेल गात की सगळा डबा त्या टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तीरसात बुडून जाई. भक्तीत रंगलेले, अबीर गुलालाचा टिळा लावलेले, तुळशी माळ गळ्यात घातलेले त्यांचे सात्विक चेहेरे पाहून, साक्षात विठूमाऊली हीच असे वाटू लागे. चित्त प्रसन्न होई, नकळत हात जोडले जात. आयुष्य खूप साधं सोपं सरळ आहे हे पटे, एक वेळची शिदोरी घेउन निघालेले हे वारकरी लोक आणि उद्याची सगळी चिंता त्या सावळ्या विठू माऊली वर!
एकदा अशीच एक अगदी तरूण बाई यात्रेसाठी गाडीत चढली, बरोबर तिचा २-३ वर्षाचा मुलगा होता. बाहेर निरोप द्यायला त्याचा बाबाही आला होता. गाडी सुटायची होती आणि एकाएकी त्याच्याकडे बघून हा बाबा-बाबा करत टाहो फोडायला लागला. इतका रडायला लागला, लोळायला लागला की आम्हालाही त्याचं पितृप्रेम पाहून भरून आलं. आमच्या मुलांनी कधी असं प्रेम दाखवलं नव्हतं. त्याच्यात आम्हाला उद्याचा श्रावण बाळ दिसू लागला. गाडी सुटायची वेळ झाली तरी हा काही रडायचा थांबेना, शिट्टी वाजली आणि याचा बाबा खिडकीजवळ आला, एक १० रुपयाची नोट त्याने मुलाच्या हातात ठेवली, झटक्यात ते पोर रडायचं थांबलं!... आम्ही हास्याच्या गदारोळात बुडून गेलो. ‘जन्मापासन्ं सारी माणसं, या पैशाची गुलाम रे…. दाम करी काम वेड्या दाम करी काम’ हे गाणं आम्ही मूर्तिमंत अनुभवलं!
पाककृती आणि वजन या विषयांवर या डब्यात रोज चर्चासत्र चालायची. आम्ही एकमेकींना आपल्या स्पेशॅलिटीज खाऊ घालायचो. काही वेळा इतर प्रवासी बायकाही या जेवणावळीत सामील होत,आम्हाला आपले पदार्थ खाऊ घालत. दुधातलं पिठलं, सांबार वडी, चम्पाकळी असे सारे पदार्थ मी या डब्यात पहिल्यांदा खाल्ले. वेगळा पदार्थ आणला की डायरीत नोंद करायचीच. एकदा आम्ही बाटलीतून पन्हे आंणि डाळीची कोशिंबीर नेऊन चैत्र हळदी कुंकू केले. लेडीज डबा नानाविध पदार्थांच्या घमघमाटानी भरुन जायचा. वजन कमी कसे करावे या टिप्स रोज कोणी तरी कोणाला तरी सांगत असायचेच. पण इतक्या आनंदी वातावरणात परीणाम व्हायचा नाही. उद्या पासून स्ट्रिक्ट डाएट करू, अशी एकमेकीची समजूत काढून आणलेल्या पाककलाना न्याय द्यायचा. अस्सा हा बायकांचा डबा म्हणजे जिवंत, अखंड सळसळत्या उत्साहाने भरलेला वाटे. हा डबा शेवटी किंवा पुढे जोडतात, त्यामुळे कधी कधी गडबडीत जनरल डब्यात बसावं लागलं तर आमचा अगदी हिरमोड होई. सगळे पुरुष आंबट तोंड करून, जांभया देत, नोकरी म्हणजे शिक्षा असे भाव तोंडावर घेऊन प्रवास करतात असे वाटे. एखादा ग्रुप पत्ते खेळताना दिसे पण बडबड, कलकल, गोंधळ, सातमजली हास्याचे कारंजे असं काहीच नसे तिथे. भांडणं तर अगदीच पांचट, एक दोन शिव्यात संपणारी. शक्यतो सगळे शांततेत आणि पेंगत प्रवास करणारे, त्यामुळे गप्पागोष्टी, मेजवान्या, सल्लामसलत वगैरे प्रकारच नाही. बरेच लोक आमच्या डब्याजवळ येऊन हा ‘लेडीज बायकांचा डब्बा’ ना? असे विचारत कारण गप्पांचा आवाज हास्य कल्लोळ दूरपर्यंत पोहोचतोच. आमचा डबा कसा हसता, खेळाता, प्रफुल्लित!! अगदी भांडणं झाली तरी उद्या एकत्र परत हसणार याची खात्री.
एकदा या डब्यात एक तृतीयपंथी चढला. दिसायला साधारण एखाद्या उंच सुंदर पण दणकट बाईसारखा. छान चापून-चोपून नेसलेली साडी, केसांचा मोठ्ठा अंबाडा,हातात खूपशा बांगड्या आणि माळलेला सुरेख गजरा. डब्यात थोडी घाबराहट आणि कुतूहल याची लहर पसरली, सगळ्या चूप झाल्या एकदम काहीवेळ. पण त्याला त्याचं काहीच नव्हतं, तो पूर्णवेळ दारात उभा होता, त्याने आत ढुंकून सुद्धा पाहिले नाही. कोल्हापूर आल्यावर उतरून निघून गेला. मग हे रोजचंच सुरु झालं. एकदा धुवाधार पाऊस कोसळत होता. डबा अगदीच मोकळा होता त्यामुळे तो एका बाकड्यावर टेकला, आमच्याशी थोड्या गप्पाही मारल्या. बोलता बोलता त्याने सांगितलं की पुरुष त्याला खूप त्रास देतात, त्यामुळे तो बायकांच्या डब्यातून प्रवास करतो. चांगला सुशिक्षीत पदवीधर आहे तो. या देशात बाई सुरक्षित नाही याची जाणीव होतीच, पण यालाही सुरक्षित वाटू नये याचं वैषम्य वाटलं. आपण पूर्ण स्त्री किंवा पुरूष आहोत यात आपले कर्तृत्व ते काय? आणि तो तसा झाला यात त्याचा दोष तो काय? सगळी निसर्गाची खेळी आणि जन्मठेप मात्र या जिवाना. आपण कुत्री मांजरे आपली आपली करत प्रेमाने वाढवतो, कौतूक करतो पण माणूस म्हणून जन्म घेतलेल्या यांच्याकडे निकोप नजरेने पाहून, ते आहेत तसे त्यांना का स्वीकारू शकत नाही...हा कळीचा मुद्दा आहे. त्यानंतर तो थोडा ओळखीचा झाला, गप्पा नाही झाल्या फार तरी दिसला की तो मौसी मौसी करत मनमोकळं हसायचा. अत्यंत सभ्य सुसंस्कृत वागणं होतं त्याचं. नंतर त्याचं डब्यात असणं कुणालाच खटकेना झालं. तो ही कायम दारातच उभा राहून प्रवास करायचा, आमच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर असल्यासारखा! कुठल्याही पुरुषाला आत म्हणून चढू द्यायचा नाही. काही दिवस तो दिसला नाही..आणि एक दिवस त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला असं कळलं. मनाला चटका बसला. समाज म्हणून आपण किती चुकतो याची मनाला टोचणी लागली. मग तो यायचाच बंद झाला. त्यानंतर खूप दिवसांनी तो परत गेटवर भेटला, छान निर्मळ हसला. त्याची नीट विचारपूस करून त्याला असा अविचार परत नको करू असं सांगितलं. आयुष्य एकदाच मिळतं,जे मिळालय त्यातून काहीतरी करून दाखव,इतका शिकला आहेस देवाने हात पाय तरी धड दिलेत ना तुला.. असा धीर दिला. त्याला किती पटलं देवास ठाऊक पण या वर्गाला समाजाने काही कारण नसताना,त्यांचा दोष नसताना वाईट वागवले आहे हे राहून राहून वाटत राहिले…. पाच एक वर्ष लोटली आणि अचानक एकदा मागून 'मौसी' अशी हाक ऐकू आली,मी गर्रकन वळले, पहाते तर काय, समोर तो उभा! तो चक्क मुंबई मधे नोकरीला लागला होता तीन वर्षा पूर्वी...हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणीच आले! काही का असेना त्या मायानगरीने त्याला सन्मानाचे जीवन बहाल केले...आणि खूप वर्षानी माझ्या जिवाला खूप बरे वाटले. अशा लोकाना सन्मानाने रोजगार देणाऱ्या मुंबईला मी मनोमन सलाम केला.
या लेडीज बायकांच्या डब्याने मला त्या साडेतीन वर्षांत खूप काही दिलं.अगदी शब्दांच्या पलीकडचे. त्यातील काही मोजकेच लिहिलेत तुमच्यासाठी. पुढचे भराभर गेले सगळे दिवस, परत आले बदली होऊन,पण मन अजूनही रमलंय त्या लेडीज बायकांच्या डब्ब्यात !
गार्डने हिरवा झेंडा फडकावला की गाडी सुरु आणि लाल झेंडा फडकावला की गाडी थांबली, अगदी जीवनासारखी. कुठल्या स्टेशनपर्यंत आपली गाडी जाणार हे वरतीच ठरलेलंच असतं. सहप्रवासी कोण मिळणार आणि त्याची साथ कुठल्या स्टेशन पर्यंत हे ही त्यानेच ठरवायचे.. मधला प्रवासातला काळ कसा घालवायचा हे फक्त आणि फक्त आपल्या हातात असतं, नाही का?
© विजयश्री तारे-जोशी
२२.५.२०२०
स्थान:
Kolhapur, Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या





Chan
उत्तर द्याहटवाThanks!
हटवाKhup chan .
उत्तर द्याहटवाThank you!
हटवाKhop mast madam.......
उत्तर द्याहटवाThank you!
हटवावाचून माझ्या मनात सुध्दा जयसिंग पूर च्या रेल्वे प्रवासातील आठवणी जाग्या झाल्या. खूप छान.
उत्तर द्याहटवामंजू
Wah!! Thank you Manju!
हटवाKhup chan.
उत्तर द्याहटवाEkdum mast mam,khup athavani tajya kelya tumi
उत्तर द्याहटवामस्तच
उत्तर द्याहटवाThank you!
हटवासुंदर, 78 ते 82 मिरज ते कोल्हापूर प्रवास आठवला. तेंव्हा इंजिन नीट चालले तर ठीक , कधी हातकणंगले, रुकडी, गांधिंनगर बंद पडायचे मग मिळेल त्या ट्रकने कोल्हापूर गाठायचे. ते लेट मार्क वगैरे. असो, लॉकडाऊन चा अशी फायदा.
उत्तर द्याहटवाBapre!! Tari bara ata engines barech neet chatlat ! Late marks dokyala taap ahet :P
हटवालेख छान च लिहिलाय तुम्ही. संपवल्यावरच मोबाईलखाली ठेवला. अशाच लिहित रहा.
उत्तर द्याहटवाAnek abhaar. Asech reviews ani motivation det raha!!
हटवाअत्यंत सुरेख शब्दांकन प्राप्त प्राप्त परिसथितीनुरूप आनंद कसा घ्यावा व आपला वेळ मजेत कसा घालवावा याचे आदर्श उदाहरणं. असेच लिहित रहा
उत्तर द्याहटवाVery good.. Memories with age match perfectly
हटवाDhanyawaad Milind Kulkarni !
हटवाखूपच छान लिहिलंय श्री!!!! मुळात शीर्षक वाचूनच हसू येत, पण लोक असच म्हणतात लेडीज बायका😊
उत्तर द्याहटवाबदली झाल्यानंतर आलेलं टेंशन आणि नंतर आपल्याला ह्या सगळ्यातून मार्ग कसा निघतो? आपण हळू हळू त्या ही दिनचर्येला कस अंगवळणी पडतो? त्यातूनही कसा pisitive angle ठेवतो? स्वतः च्या विवंचने तुन दुसऱ्याच्या दुःखा चा कसा सहानुभूती ने विचार करतो? खर तर हा स्त्री चा खूप मोठा गन आहे, ती जेवढी धीराची आहे, तेवढीच प्रेमळ सुध्दा आहे. छान रेखाटले आहेस तू चित्र!!! खरच लेडीज बायकांचा तो डबा डोळ्यासमोर उभा केलास.
Ho g, 'ladies bayka' khup majeshir watta pan agadi sarras wapartat. Anek abhaar Manda, reviews kharach anakhi lihayla inspire kartat.
हटवाकुंदा पाटील, बदलापूर
उत्तर द्याहटवाश्री अग खूपच छान वर्णन केलंस तू लेडीज डब्याच,मी 1984 पासून रोजच लोकल ने प्रवास करते,पण खरंच हे मुंबई च up-down जीवनात खूप काही शिकवून जात, घड्याळ ला सेकंद काटा असतो हे मुंबईकरांना च माहीत आहे अस वाटतं, तुझा लेख वाचतांना मी पण 1984 पासून सगळ भूतकाळात फिरून आले, आमचे पण सगळे सणवार असेच साजरे झाले अगदी तू लिहिलंस तेच मीपण 1984 पासून जगत आहे, सुखद अनुभव घेतले आहेत, सुवर्ण क्षण आहेत ग ते माझे . असच छान छान लिहीत रहा "All the best"👍 - कुंदा पाटील, बदलापूर
Ho g Kunda, Mumbaichya bayakancha koutuk karawa tewdha kami ahe ya babtit. Ewdhaa anubhaw ahe tuzyakade, nakkich lihun kadh. Khup chhan watta wachayla.
हटवाखूपच सुंदर लिहिलंय .अगदी बारीक सारीक प्रसंगाला सुध्दा तुम्ही जिवंत रेखाटलं आहे.लाल परकर आणि गाडीचा गार्ड डब्यापर्यंत येणे...प्रसंग मस्तच.. शुभेच्छा👍👍👍
उत्तर द्याहटवाHahaha. To prasanga athavun ajahi haste mi. Dhanyawaad Mr. Upadhye. Asech vachun reviews det raha!
हटवाApratim madam,khup khup chhan hubehub varnan kelele ahe.pudhil lekhanas hardik shubhechha
उत्तर द्याहटवाjgd. उशीरा चाळताना हा खुमासदार लेख वाटल,वेळ झाला. लेडिज बायकांचे डब्यातल "जग" उलगडलस तू! नव्या जगाच्या सहलीला गेल्यासारखं वाटतय. एरव्ही "पडदेके पीछे" डोकावायचे कारणच काय? मिरजेची बदली आणि अनुभवाचा मसाला हास्यरस व शेवटी कारुण्याची झालर ! मिरजेच्या अनैच्छित बदलीने उघडलेले आनंदाचे दालन समृृद्ध आहे. खिळवून ठेवणारी व कोकर उड्यासारखी खेळकर भाषा हास्य रसायन आहे. हास्याचे कारंजे व दिलखुलास वर्णन सांगून जाते तुझ्या जीवनातील खिलाडी वृत्ती! उपेक्षित व अवमानित जगणारा तथाकथित पहारेकरी व त्याची व्यथा व सुखद शेवट! स्त्रियांचे बहुरुपी दर्शन! ही जीवनाची दुसरी अर्धी बाजू व तिचे वास्तव "लेडिज डब्यात" भेटते. चित्रमयी बोलकी व आशावादी भाषाशैली मन मोहून टाकणारी आहे. पुढची डब्यातली शिदोरी चटकदार असणार याची नांदी! अभिनंदन हास्यरस मेजवानीबद्दल!
उत्तर द्याहटवाDhanyawaad Sir!! Kharach ajjibat iccha nastana Mirajela gele pan khup nave lok bhetale, khup mitra-maitrini zalya ani anek anubhav milale. Ata tya athawani chhanach watatat! Pudhcha daba lihaychi iccha ahe khari pan kasa jamtay baghu.
हटवाAnek abhaar!!!
स्व अनुभवातून लिहिलेला लेख खूपच सुंदर..असेच लिहीत राहा ..मिलिंद कुलकर्णी
उत्तर द्याहटवाDhanyawaad Milind Kulkarni!
हटवाDhanyawaad
उत्तर द्याहटवापरगावची Office duty सांभाळत
उत्तर द्याहटवाअनुभवलेले किस्से छानपणे शब्दबध्द
केले अाहेत.एक प्रवासवर्णनच! त्यातून इतर अशा अनेक लाेकांना उर्जा व उमेद मिळेल.यापुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा...
Thanks sirjee..surely I will try better..
हटवामाझ्या नशिबात *लेडीज बायकांच्या* डब्यातून प्रवास करणेचा योग कधीच आला नाही आणि कदापीही येणे नाही
उत्तर द्याहटवा(कारण अर्थातच मी पुरूष आहे ).....
अन् यामुळेच सदर लेखाचा विषय माझ्यासाठी नाविन्यपूर्ण.....😀
रोजच्या छोट्याशा प्रवासातसुध्दा आपणांस आलेले वेगवेगळे अनुभव छानच शब्दबध्द केले आहेत.
पुढील लेखाची वाट पहातोय..👍
आला असता आमच्या डब्यात तर नककीच उतरवलं असतं...😀😀 thanks for appreciation..
हटवाआज वाचले...किती कौतुक करताय मुंबईच्या बायकां चे...बरे वाटले...अगदी सुंदर लिहिले आहे
उत्तर द्याहटवास्वाती पाटील ..
Kharach koutuk karanyasarkhya ahaat tumhi sagalya!!
हटवाAnek Abhaar Swati Patil..
बापरे तुम्ही तृतीय पंथी बद्धल किते चांगल लिहिलाय..तुमचे विचार फार वेगळे आहेत
उत्तर द्याहटवामी भक्त झालोय तुमचा
विवेक देशमुख
अनेक आभार विवेक देशमुख. 😃
हटवाOmg,brilliantly written..liked it
उत्तर द्याहटवाThank you!!
हटवातुझा लेख म्हणजे बक्कळ लै भारी अनुभवांची मनाचे पोट भरणारी मेजवानीच असती .एकतर वाचताना आपण त्या वातावरणाची मनानेच मस्त सफर करतो.कारण वातावरणनिर्मितीची आणि ओघवत्या भाषेची उत्तम कला तुला साधलेली आहे किंवा मिळालेली देणगी आहे .सर्व गंमतशीर अनुभव आणि त्यात मध्ये मध्ये विनोदाची चुरचुरीत फोडणी तसेच जीवनातील तत्वज्ञान अगदी जडजंबाळ भाषेत न सांगता सहज सोप्या भाषेत सांगायची तुझी हातोटी भन्नाटच !त्यामुळे लेख लांब पसरलेला असूनही😃आपण एखादी छान कथा वाचतोय असेच वाटते आणि कुठेही रटाळपणाचा लवलेशही जाणवत नाही .असेच अनुभव लिही आणि आम्हाला सम्रुद्ध कर !👌👍💐
उत्तर द्याहटवामनिषा कुलकर्णी..दुबई
अनेक आभार मनीषा !!😊
हटवाखरंतर तुमच्या सगळ्यांचे comments वाचून उत्साह टिकून राहिला आहे बरेच दिवस! नाहीतर लिहीत राहणं अवघड होतं.
अशाच प्रतिक्रिया देऊन मला motivation देत राहा.😀
Very interesting write up...I liked it very much..publish in English too
उत्तर द्याहटवाR.k.Patil
Thank you so much R.K. Patil.
हटवाWill definitely try to publish in English. 😊