गो गो गोवा..

अनुभवलेली भुते !!

ghost is a psycological state of mind. but regardless, they are scary.


शहाळी आणि कडवी या दोन नद्यांनी कवेत घेतलेले हिरवंकंच गाव म्हणजे मलकापूर.महादेव टेकडीची नैसर्गिक उशी करुन तिच्याच मांडी वर निवांत झोपलेल्या  बालकासारखं दिसतं.चारी बाजूना पसरलेल्या सह्यगिरीच्या निळ्यासावळ्या डोंगरदऱ्यांमुळे एकप्रकारचा गूढपणा या गावाला आपोआपच लाभला आहे. जवळ-जवळ सहा महिने वर्षाराणी इथे मुक्कामच करते. कोकणात जाता जाता मलकापूरला भिजवत भिजवत हिरवाईने नटवत वळणा-वळणाने पुढे जाते. म्हणूनच इथे पाऊस आणि थंडी असे दोनच मुख्य ऋतू. उन्हाळा आंबे आणि कोकणमेवा देण्यापुरता काय तो चोरपावलांनी येतो आणि हळूच पळून जातो. कायम झाडांच्या पानांची सळसळ आणि वाऱ्याचा सूं…. सूं… आवाज दरी-खोऱ्यात घुमत असतो. पशू-पक्षी मुक्त कंठाने गातात आणि निर्भयपणे विहार करीत असतात. लोकसंख्या जास्त नसल्यामुळे रस्ते पण तसे कायम मोकळे असतात.सगळे रस्ते 30 ते 45 अंश चढत जाणारे किंवा उतरत जाणारे,जणू काही हिल स्टेशन.त्यात तूफान पावसाच्या तडाख्यामुळे डांबर वाहून जाते मग हे रस्ते कायमच ते तांबडेलाल तोंड घेउन खडबडीत आयुष्य जगतात. असले हे मूर्तीमंत गूढ वातवरण, साहजिकच आमच्या बालजीवनाशी अनेक भूता-खेतांचा जवळचा संबंध होता. ही भुते आम्हाला भर दिवसा, दुपारी बाराला, तिन्हीसांजेला आणि  रात्री सिनेमा सुटल्यावर अगदी तिन्ही त्रिकाळ दर्शन द्यायची. फक्त त्या अनुभूतीसाठी आपलं मन भोळेभाबडे, निष्पाप हवे.😉


चौथीपर्यंत ही भुते फारशी आमच्या नादी लागली नाहीत.(किंवा लागलेली अम्हाला उमजले नाही)पण पाचवीत गेलो आणि लपाछपी खेळताना सहज शाळेच्या प्रयोगशाळेत वाकून पाहीले, शो-केस मध्ये मानवी सांगाडा उभा होता. खदाखदा हसणारी ती कवटी, पांढरेखड मोट्ठे मोट्ठे दात, पांढरे लांब-लांब हात पाय, बोटे बघून आमची दातखिळच बसली.💀 भूत… भूत … करत आम्ही वर्गात पळालो आणि सगळ्यांचा भुतावर विश्वास बसू लागला. सगळ्यांना ते भूत दाखवण्याचं काम आम्ही केलं. माझी एक सखी खूपच भित्री निघाली आणि त्या रात्रीच तापाने फणफणली, भूत भूत करत ओरडत उठायला लागली. तिच्या आईला सगळा भूत प्रताप समजला, मग तिच्या आईने आम्हा न तापलेल्या मुलींना चांगलीच तंबी दिली.😖 ‘परत कधीही तिला भुतं दाखवणार नाही’ असं कबूलच करून घेतलं. तिचा ताप गेला आणि मग आमच्यावरचं  तिला भुतं दाखवून आजारी पाडल्याचं बालंटही गेलं. जेव्हा आम्हाला त्या प्लास्टिकच्या सापळ्याचा खरा उपयोग काळाला, तेव्हा त्या सखीला खरंच चिडवून हैराण केलं. 😂 मग ताप आला नाही तिला.

school girls got scared because of plastic skeleton in science room


महादेव टेकडीच्या नाकासमोर मलकापूरची बाजारपेठ  वसली आहे आणि ती संपते नगारखान्याच्या उंच काळ्या दगडी कमानीने. पूर्वी इथे संस्थानाचे नगारे वाजत असत. मागच्या बाजूला उंचच उंच जिना आणि कमानीच्या वर खिडक्या असलेला एक मोठा दिवाणखाना.मलकापूरचं वैभवच होतं ते. कमानीतून आत गेल्यावर राजवाड्याची वास्तू होती. वाड्याची बरीच पडझड सुरू झालेली, त्यामुळे तो परिसर तसा निर्मनुष्य, वेडीआवाकडी झाडं-झुडपं वाढलेला, नीरव शांत असलेला असाच आहे अजूनही. कोर्टाची पुरातन इमारत पुर्वीच्या वैभवाची साक्ष देत अजून उभी आहे. या नगारखान्याजवळ रात्री मशाली घेऊन भुते नाचतात आणि त्यांच्या राजाची पालखी काढतात अशी एक आख्यायिका होती. तिथे त्या काळात पिवळसर-धूसर मंद प्रकाश देणारे दिवे असायचे खांबावर, त्या दिव्या भोवती कीटक फेर धरुन नाचायचे. अंधार पडला की निरव शांततेत  रातकिडे, बेडूक, पाकोळ्या हे सगळे एका सुरात पार्श्वसंगीत सुरु करायचे.


आमची शाळा या जुन्या  वाड्यात भरायची. असले जुने वाडे म्हणजे तर भुतांचे आगरच. शाळेजवळ आसपास २५ तरी घरे होती. पण तिथेही काही मुलींना पांढऱ्या साडीतली केस मोकळे सोडून फिरणारी बाई भर दुपारी दिसायची म्हणे...आणि बाकीच्या मुलींना दिसण्याआधीच गायब व्हायची! शाळेजवळच्या पडक्या ओसरीजवळ चिंचा, बिट्टी, बोरे अशी आम्हाला आवडणारी झाडे  होती. आम्ही तिथे चिंचा, बिट्टया आणायला जायचो. बिट्टीचे झाड तसे बुटके, त्याला सोनसळी पिवळी धमक गोड वासाची फुले आली की  बिट्टी कधी लागते यावर आमची नजर असे. एक पाय पसरून बिट्ट्यानी खेळताना तहान भूक हरपायची. दुपारी तिथे गेलो की फड…. फड… आवाज करत वटवागळे उडत, पाला पाचोळा भिरभिर करत अंगावर पडला तरी आम्ही घाबरून एकमेकांचे हात घट्ट पकडायचो. तिकडे जायला दिवसाही आम्ही घाबरायचो मग रात्री तर विचारच न केलेला बरा ! त्या वाड्यात अजूनही देवीचं मंदिर आहे, आजूबाजूला हाकेच्या अंतरावर माणसे राहतात पण भुते सुखाने राज्य करतात, रोज दिसतात अशा अनेक कथा मुली पुराव्यानिशी  शप्पथ घेउन सांगत. कधी कधी अमावस्येला मुलीना ही भुते झपाटायची, कोंबडी, तीन भाकरी, भात अशा चमचमीत जेवणाचा उतारा सुद्धा मागायची. लिंबू मिरच्या असले उतारे तर रोज दिसायचे कोपऱ्यावर. असले सगळे भयाकारी वातावरण असायचे सारखे.


याच नगारखान्याला लागून एक प्रचंड मोठं गुलमोहराचं झाड होतं. अगदी भांग पाडल्यासाखी सुरेख पाने आणि नितळ सालीचे खोड होते त्याचे. उन्हाळ्यात फुललेले केशरी-लाल डेरेडार, विस्तीर्ण झाड,इतके सुंदर दिसायचे की टक लाऊन बघत बसावे वाटे. आमचा फार लाडका होता हा गुलमोहर, मे महिन्याच्या सुट्टीत अक्ख्खी दुपार आम्ही त्याचे आंबट गोड चवीचे कोंबडे खात बसायचो.पण  अंधार पड्ला की ते झाड हात पाय पसरलेल्या काळ्या  वेताळासारखे भासायचे, त्यामुळे त्याच्याकडे कोणीही फिरकत  नसे,नव्हे जातच नसे. तिथेच पडक्या भिंतीच्या आड मुक्कामाला असलेली भुते शुक.. शुक..भूतsssभूत ssss करून आम्हाला धडकी भरायला लावत असत. कधी कधी किंचाळत तर कधी त्यांचे घोडे घेऊन फिरत आणि आम्हाला घोड्याच्या टापांचा आवाज येई. तिथे म्हणे पूर्वी घोड्यांची पागा होती. त्यातले घोडे, घोडेस्वार असे असे सगळे भुते झाले आहेत, म्हणूनच असे भयानक आवाज आम्हाला यायचे.


नंतर एकेका भूतांचा उलगडा होत गेला. शाळेच्या चिंचेच्या झाडाजवळ कोण तरी शुक शुकs शूsक करुन दचकवायचे,भूत, भ..भ..भूतsss करुन,ती खरी भुते नव्हतीच.. पडक्या भिंती मागे मुले.. मुली भेटत होती.. त्यांचा प्रीती संगम पॉईंट होता तो!.. चिंचा.. बोरं.. बिट्टया... शोधायला आलेल्या आम्हा वेडपट मुलीना पळवण्याचा एक मार्ग होता तो. प्रेमवीरा ना कसली भुतांची भीती… ते तर आधीच झपाटलेले असतात. म्हणून घोड्याच्या  टापांचे आवाज पण  हेच काढायचे.. हे कळायला उगीच आम्हाला मोठे व्हावे लागले!😏


त्या काळी आलेल्या सगळ्या भूतांच्या सिनेमात एक तर सांगाडा नाचायचा, कवटी उडताना दिसायची आणि कर्कश्श संगीत वाजे. पांढर्या साडी मधली केस सोडलेली, टिळा लावलेली बाई हा तर भूतांचा राष्ट्रीय पोशाख होता. हातात मेणबत्ती, पायातील चाळ वाजवत, बांगड्यांचे आवाज काढत ….  एखादे गाणे गात ती फिरायला लागली  की सगळ्यांचा काटा किर्र होई. पोरेबाळे डोळे गच्च मिटून घेत,राम राम करायला लागत .या सिनेमाने भूताना सुंदर मकअप करून ग्लैमर दिले, माणसात आणले. पण भूतांचे कपडे कोण धूते? कायम कसे शुभ्र हा प्रश्न कुणाला ही पडत नसे.. भोळे भाबडे होते ना सगळे! नखे वाढलेली, भयकारी भुते हा प्रकार नंतर रूढ झाला. जुन्या काळात भुते सुंदर स्त्रीचे रूप घेऊन दर्शन देत..उलटे पाय मात्र एकाही भूताने दाखवले नाहीत.


दुतर्फा दाट झाडी आणि शेतवड़ असलेल्या नदीला लागून पिंपळाच्या  छायेत भीमाशंकराचे देऊळ आहे. सुरेख दगडी बांधकाम त्यामुळे आत गेलं की थंडगार वाटे. एकदा दुपारी खेळायला तिथे गेलो. ऊन मी म्हणत होते तरी पिंपळाच्या पानाच्या जाळ्या शोधत भटकत होतो, वडाच्या पारंबीला झोके घेणे, उंबराची फळे खाणे असले उद्योग भर उन्हात सुरु होते. सगळीकडे शांतता पसरली होती, असल्या उन्हात आमच्या शिवाय कोण फिरतो? पिंपळपाने सळसळ आवाज करत होती, पाया खाली वाळलेली पाने चुर्र..चुर्र आवाज करत होती. मग गारवा मिळावा म्हणून शंकराच्या देवळात गेलो मात्र.. गाभारयात समोर एक पांढ़री साडी नेसलेले भूत उभे! हातात तबक त्यात पेटलेलं निरांजन, कपाळाला लाल टिळा, सोडलेले केस,आणि नजर आमच्यावर!...आम्ही सगळ्या भ..भ.. भूत...भूत करत पळालो…..भूत मात्र आम्हाला ‘ए पोरींनो s s s थांबा...इकडे या s s s या s s .थांबा.. ‘ असं बोलवायला लागलं! मागे न बघता जीव खाऊन जे सुसाट सुटलो… ते सखीचा कट्टा गाठला! हात पाय लटपटत होते, घामाघूम झालो, श्वास घेता येईना की तोंडातून शब्द फुटेना! घटा घटा पाणी प्यालो..तोंडे बघून सखीच्या आईने काय झाले विचारणा केली… पण एकमेकीला खाणाखुणा करुन गप्प बसलो. आमच्या प्रेमळ माताना सांगून ‘प्रसाद’ कोण खाणार?..'भर दुपारी नदीकडे का गेलात' या प्रश्नाला उत्तर नव्हतेच. सशाच्या काळजाची सखी घाबरुन रडकुंडीला आलेली, ‘मला सोडून जाऊ नका गं s s sभीती वाटते s s s मला ताप येईल..’ असे ताप न येताच बडबड़ू लागली. मग काय संध्याकाळ पर्यंत आमचा मुक्काम तिथेच. दुपारभर भूताच्या गोष्टी कुचू कुचू सुरुच…. भूत बाईचे पाय कुणीच पाहिले नव्हते..बाकीचे वर्णनं सगळ्यानाच दिसले होते...पाय उलट का सुलट उंबरठ्या मुळे दिसले नव्हते...कसं गं बाई..काय गं बाई..सुरुच.

Ghost in a white saree is very much indian thing. They are generally there just to scare you.


संध्याकाळी घरी गेले तर शेजारच्या पाटलीण बाई आईला सोळा सोमवार व्रताचे उद्यापन कसे करायचे ते विचारायला आलेल्या. मला पहाताच म्हणाल्या, 'काय गं दुपारी एवढी बोलवत होते..तर का पळालात ? प्रसाद देत होते तर तुम्ही मागे बघायला पण तयार नाही..’ माझ्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला ! दुपारी या होत्या होय देवळात ?...पांढरी साडी नेसून! तरी आम्ही दुपारभर विचारच करतोय..देवळात भूत गेलंच कसं ? मग आज्ज्जीच्या गोष्टी लक्षात आल्या..शंकराला भूतनाथ म्हणतात, तो स्मशानात रहातो, कधी कवट्यांची माळ  घालतो..त्यामुळे जात असतील भुते देवळात त्याच्या. आम्ही आज्जीच्या  पुराणावर बसलो आणि असा पर्दाफाश झाला! मी टूणकन उडी मारली..दुपार पासून टांगणीला लागलेला जीव धपकनं  भांड्यात पडला. पळत पळत सखीकडे गेले आणि तिचा भोळा जीव पण  भांड्यात टाकला… हो उगीच तिला ताप चढायला नको. मग फिदी फिदी हसत बसलो..😆 बाराच्या कडक उन्हातूंन एकदम  सावलीत गेलो तर समोरचे काही दिसत नाही..मग त्या अंधारलेलया गाभारयात भूत दिसणार नाही तर काय देव दर्शन देणार आहे आम्हा वेड्या मुलीना?


    तरी बरे सगळ्या भूताना राम नामाचा रामबाण उतारा आहे..कितीही वाईट भूत, खवीस, हडळ, वेताळ असो तो रामाला घाबरणार म्हणजे घाबरणार! अगदी अढळ श्रद्धा होती आमची. तो राम नामाचा जप लहानपणी आम्ही इतक्या वेळा केला की त्या पुण्याई वर अजूनही आमची नौका या भवसागरात तरून आहे… अशा या सगळ्या भुतानी आमचे बालपण गूढ पण संस्कारी केल्या बद्धल त्याना  धन्यवाद्च द्यायला हवेत!

Ghosts are there or not is a never ending debate. But having fun with that genre is always writers favorite hobby.


                                                                                                                    
                                                                                                                       © विजयश्री तारे-जोशी


टिप्पण्या

  1. कुंदा पाटील, बदलापूर
    श्री अग काय छान वर्णन केलस भुताच, मी पण जरा लहानपण फिरून आले, अग मी पाचवी, सहावीत ज्या शाळेत होते तिथे पण जवळच स्मशान भूमी होती . आम्ही पण असंच घाबरायचो, आणि तरी बालमनाला एक उत्सुकता असायची, कवटी फुटली की म्हणे आवाज येतो, नंतर एकटं गेलं की भूत आपल्याला धरून नेत, अस बरंच काही, आणि मी आजोळी जेव्हा सुट्टीत जायची तेंव्हा पण अशीच बालमनाला उत्सुकता, घराच्या गच्चीवर ( गावाकडे याला चक्क धाब्यावर म्हणतात) गेलं की नदीच्या बाजूला खडकावर च स्मशानभूमी होती ती स्पष्ट दिसायची मग मी आजी आजोबा च्या नकळत भीत भीत ते दृश्य बघायची रात्री मग स्वप्न, ती भीती, अस बरच काही...
    तुझा लेख वाचून मी अगदी Flash back मध्ये गेले. खूपच छान लिहिलंस असंच लिहीत रहा " All the best"
    कुंदा पाटील, बदलापूर

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thanks dear..माझे मला जरा पोरकट वाट्ला हा लेख..पण डोक्यात आले..लिहीत गेले...

      हटवा
  2. अतिशय जिवंत चित्रण कि जे आमच्या सारख्यानि शालेय जीवनात अनुभवलेलं आणि ऐकलेलं समोर उभे राहिले
    - नारायण लोटलीकर

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान, माझ्या बालपणी अशा भुतांच्या गोष्टी खूप ऐकायचो,आमचे शेजारी एकदा संध्याकाळी नदीकडून भूत,भूत करत पळत आले होते, या सर्व आठवणी ,मलकापूर गाव नजरेसमोर उभा राहिले, keep it up -एस पी चौगले

    उत्तर द्याहटवा
  4. श्री खुपच छान वर्णन केले आहेस तू!!! मी एस वाय ला असताना अशीच एक भुताची गोष्ट, त्या वेळी जळगाव आकाशवाणी केंद्रावर प्रसारीत केली होती, तिची मला आज आठवण झाली!!! असेच सगळे मनाचे खेल!!! पण खरच खूपच सुंदर लिहिलं आहेस तू👌 All the best👍

    उत्तर द्याहटवा
  5. रात्रीस खेळ चालू असल्याचा अनुभव आला. फारच थरारक अनुभव. शिरीष वाडेकर, पुणे

    उत्तर द्याहटवा
  6. लेख चांगला जमला. पण प्रत्येक गूढ गोष्टींची उकल फारच लवकर केल्यामुळे लेखातील गूढता फारशी रंगत नाही.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खरे आहे.. पण मग लेख अजून लांबला असता किंवा दुसरा पार्ट करावा लागला असता.. म्हणून आवरले.. thanks for good suggestions!

      हटवा
  7. jgd. सुंदर निसर्गरम्य मलकापुराच्या वनश्रीचे वर्णन करता भूतसृष्टीत कधी घेवून गेलीस ,ते कळलच नाही.ओघवती ललित भाषा तुला लुब्ध आहे.रम्य बालपणात थरार आणणारी भूत,हडळ,मूंजा ही कल्पित सृष्टी तू जिवंत उभा करतेस तेव्हा जूनाट पण कधी झपाटलेला वाटणारा राजवाडा व त्याभोवती रुंजी घालणार्‍या रौद्र भूताकटीच्या कथा बालमनावर कशा न संपणारे भय नाचवीत असतात.हळव्या पोरींची होणारी भयग्रस्त मने!त्यामागचे रोमियोंचे इंगित उघडलेस. भीमाशंगर मंदिराचा एकाकी भयाणभूक परिसर व अकारण माजलेला भयकल्लोळ व त्याचे रहस्य कळताच लक्षात आलेला भाबडेपणा!बालमनाचा वेध घेत अनूभवाचे रहस्य उघडले की होणारी आपलीच फजिती! भय, गूढरम्यता व तितकाच बाल्यातला खट्याळपणा! आठवलाकी कांही इप्सित हरवल्या सारखे वाटते. आता त्या आठवणी मनात कशा पिंगा घालत असतात,गावाकडचा जुना अंधश्रद्धेने झपाटलेला काळ शब्दांच्या कुंचल्याने साजिवंत झाला आहे. विषय कसे सुचतात ?कसे मनात फेर धरतात .पिंगा खेळता खेळता झपूर्झा रंगतो, किमया विषयशोधाची व रंगतदार ढंगात पेश करण्याची तुझी कला अफलातूनच!एवढेच विस्मयाने म्हणावे" व्वा! विजयश्री,व्वा!क्या बात है!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सर तुम्हाला सगळं जग सुंदर भासते..तुम्ही गुरू म्हणून माझी लेखणी तोकडी वाटते मलाच..अजून खूप शिकायचं आहे..

      हटवा
  8. सुंदर वर्णन.. वेगळा विषय..साराच छान..असेच लिखाण चालू राहूदे.. मिलिंद कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  9. When I was in second standard we we were staying at Kolhapur Sugar Mill and our Bungalow was at extreme end therefore an ideal place to instil haunting ghost stories on me by elders .

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you for review Sir.. Elders get some fun by scaring kids with ghosts, I think. Hoping similar thing has happened with you too. Would love to check out this ghost in sugar mill though. I have heard so many stories about that. :P

      हटवा
  10. अतिशय सुंदर वर्णन मग ते भूतांचे असो वा मलकापूर मधील वेगवेगळ्या जागांचे.तुमची निरीक्षण शक्ती जबरदस्त.. आणि लिखाण मध्ये छोट्या छोट्या गोष्टींचे प्रसंग चांगल्या प्रकारे मांडणी केलेले. लिहीत रहा.. आताशा ते सुंदर फुलत चालले आहे..👍👍👍

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

      हटवा
    2. थोडा वेगळा प्रयत्न..तुमच्या कोकणा इतकी छान नसतात घाटी भुते..तुमचे अनुभव या पेक्षा भयानक असतील..सांगा आम्हाला.

      हटवा
  11. जयू, छान जमले आहे. मलकापूर चे वर्णन खूप छान झाले. बघावेसे वाटते. आमच्या लहानपणी आमचे घरा जवळच जेल ची भिंत होती व बाबांनी फाशी सेल कुठे आहे दाखवले होते. एखादी फाशी झाली असेल तर पुढे कितीतरी दिवस त्या बाजूला पहायची पण भीती वाटायची.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नाव टाक..कोणी लिहिले समजत नाही
      ..जेल् च्या पलीकडे दिसली असती भुते...मलकापूर अजून तसेच आहे..अस्सल घाटी आणि कोक्णीच्या वरताण

      हटवा
  12. छान लेख, खेडोपाडी असणाऱ्या माळा संबंधी अश्या भूतकथा प्रसिद्ध असत. मी लहानपणी शाहूवाडी मध्ये राहत असताना दिवेलागणी नंतर घरच्या अंगणात जायलाही घाबरत असे..

    उत्तर द्याहटवा
  13. सदर लेखाचा विषय उत्कंठावर्धक..
    एका दमात वाचून काढला.
    हेडलाईन् वाचताच हसू आले..

    नेहमीप्रमाणे उस्फुर्त आणि प्रवाही लेखन.
    आपले लेखन आम्हांस आनंद देतंय..

    #अनिरुध्द गायकवाड

    उत्तर द्याहटवा
  14. Madam.
    As usual Ur write up is wonderful n witty.
    Kolhapuri "s"prasang Chan umatleya.Police incidents creates anxiety n later it's peaceful n jokular character is attractive .Very Good experience nicely displayed. All the best.Thank u..Tophkhane

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -