गो गो गोवा..

भातुकली

Old kitchen toys for children are made up of brass or clay.

परवा जुना पसारा आवरायला काढला, त्यात लेकीची भातुकली सापडली. तिने अजूनही एका बॉक्समध्ये छान जपून ठेवली आहे. तिचा संसार खूप पॉश होता. साध्या बाहुल्या, निळ्या डोळ्यांची नेटक्या पोशाखातली अगदी पाश्च्यात्य सुंदरी बार्बी, फरची कुत्री, माकड, मांजर ते टेडी असली आम्ही सात जन्मात  कधीही न पाहिलेली खेळणी. गॅसची शेगडी, मिक्सर, कुकर, बादल्या, कळशा, परात, फ्रिज आणि वॉशिंग मशीन असला सगळा कसा टिपटाप संसार. मामा, आत्या आणि आम्ही दोघं, सगळ्यांनीच तिच्यासाठी  चिटुकली खेळणी वेगवेगळ्या ठिकाणांवरून उत्साहाने आणून संसारात भर घातली होती.  तिनेही तो संसार अगदी प्रेमाने जपला होता, कसलीही मोडतोड न करता.😊

modern kid's kitchen includes Fridge, Mixer, sofa, crockery set etc

माझी लेक आणि तिच्या चार-पाच मैत्रिणी आमच्या बाल्कनी मध्ये छान दोन वेगवेगळे संसार थाटायच्या. सुरुवातीला सगळी भांडी हॉल मधे ओतायची त्यांच्या वाटण्या करायच्या मग वाटण्या पसंत पडल्या तर पुढचे संसार सुरु व्हायचे. कधी कधी वाटण्या मनाला यायच्या नाहीत, मग संसार सुरु होण्याआधीच, धुसफुसत, तुला का ते मला हवे.. आज माझा नवरा हा… अशा जोड्या फुटायची नौबत यायची. मग आम्ही लवादाचे काम करून भांड्यांच्या वाटण्या करून द्यायच्या आणि यांचे संसार रुळावर आणायचे. मग आई झालेली कन्या अंगावर आपल्या आईची ओढणी घेई,पदर म्हणून आणि भातुकलीचा 'दोन घडीचा डाव' सुरु होई. उगीच आगाऊपणे बोलतो फिदी फिदी हसतो म्हणून एका मित्राला टोचून टोचून खेळात घ्यायच्या नाहीत आणि उरलेल्या एकुलत्या एका शांत, सोशिक बालमित्राला सतत भाजी, वाणसामान आणायला पिशवी देऊन पाठवून देत आणि या स्वयंपाकात आपापली पाककला दाखवायला सुरु करत. एकमेकीला वहिनी..वहिनी करत संसारातल्या अडचणी सांगत बसत."आज यांनी दूध आणले नाही..बाळाला बरे नाही"...ईत्यादी..  कधी मिरच्या, कोथिंबीर असली उधारीही करत. मी तिच्या नकळत त्यांच्या संसारावर लक्ष ठेऊन असायचे, भांड्याला भांडी लागायला लागली तर समेट करायला बरं नाहीतर प्रकरण कुठ्ल्याही क्षणी हातघाईवर येणारच. 😖 मग शेंगदाणे, चणे, चिरमुरे, बिस्किटे, फरसाण यातून छप्पन्न पदार्थ तयार व्हायचे. शेजार धर्म पाळून वहिनींना पोचवायचे. छान झाले हो.. करत वहिनीनी मटकावून टाकायचे. ओढणी पांघरलेली  कन्या आई असे आणि न पांघरलेली बाबा. बाबा लोकांना फार काम नसे आणि महत्वही नसे. तो एकुलता एक मित्र कायम यांचा किंवा त्यांचा मुलगा! (वास्तविक तो यांच्या एवढ़ाच होता.) घरात आईचा वट असे आई झालेली कन्या बाकीच्यांना चापात ठेवे सारखी ‘मी आई आहे माझं ऐकायचं’ असलं टुमणे लावायची. जेवण खाण होई, मग तीच ओढणी पांघरून कुटुंब झोपी जायचे. ३ मिनटात उठून पुढची सकाळ सुरु. असे एक दोन तास संसार गुण्यागोविंदाने चालत. मग मात्र कोणी तरी आईचे ऐकायचे नाही आणि वादाची ठिणगी पडे. बोलता बोलता  हळू हळू आवाजाची पट्टी वाढायला लागायची. थोड्या वेळात भांड्यांची आदळ-आपट सूरू झाली की प्रकरण हाता बाहेर जाण्यापुर्वीच मध्यस्ती करून आम्हीच …" मुलांनो आता उद्या खेळा बरं का..." छान काहीतरी खाऊ हातावर टेकवून, "घरी पळा बरं आपापल्या"....म्हणून त्यांच्या संसाराची बोळवण करत असू. कधी खाऊ,कधी आईस्क्रीम मिळाले की सगळे खूष होउन आपल्या मालकीचा संसार पिशवीत भरून पसार होत. दुसऱ्या दिवशी 'नया घर नयी बिवी'..असला भारी चॉइस असे त्यांना !

पावसाळा सुरू असला की बाल्कनीत संसार मांडता यायचा नाही, मग तीन छत्र्या उघडून हॉल मधे जोडायच्या आणि तंबूमधला संसार सुरू व्हायचा. वेगळं काहीतरी म्हणून खेळ अगदी रंगात यायचा. समुद्रकाठी असल्यासारखं  छत्री खाली अंग दुमडून बसायच्या सगळ्या. आम्ही मात्र यांच्या घराकडे मुळीच वाकून पहायचे नाही अशी सक्त ताकीद असे. (आणि ते खरे ही आहे..मुलांच्या संसारात शहाण्याने नाक खुपसू नये ! )

                           Old school kitchen set for kids, made up of wood.

तिचा पॉश संसार बघून मला आमच्या बालपणीची भातुकली आठवली. आमच्या खेळण्यात एकही सुबक वस्तू नव्हती. अनेक वर्ष एक ठोकळ्यासारखी लाकडी बाहुली तिला 'ठकी' हे एकच अधिकृत नाव, जी पिढ्यांन पिढ्या पुढे दिली जाई. लाकडात कोरलेली त्या मुळे हातपाय  कायम  शरीराला चिकटलेले.फक्त साडी गुंडाळणे ही एकच ड्रेपरी असे बिचारीला.चेहरा अगदी मख्ख आणि निर्विकार.. परमार्थाच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या योगिनीसारखा!  तिच्या तोंडाकडे फार न बघता आमचे बालसंसार चालत. चक्क पत्र्याचा पोळपाट, लाटणे, तवा, उलथणे, मातीची छोटी चूल, पातेली अशी भांडी, वेताची सुपली आणि विविध वस्तू यातच आमचा संसार टुकीने चालायचा. संक्रांतीची मातीची बोळकी बायकां कडून कधी एकदा आमच्या हातात पडतील असे व्हायचे. भातुकली साठी कधी कधी शेंगदाणे, गूळ, चिरमुरे असे पदार्थ मिळायचे,ते ही माता खुष असल्या तर. आमच्यासारखी चार चार विद्रकल्याणी  पोरे संभाळून आया कावलेल्या असल्या  तर  काsssही मिळायचे नाही. मग आवळे, चिंचा, बोरं, कैर्या, उंबरे, जांभळे, पेरू, भोपळ्याच्या बिया असे निसर्गात उपलब्ध असेल ते काय वाट्टेल ते घेउन घेउन आम्ही त्याची पोळी भाजी करून खायचो.😂 एका मैत्रिणीकडे सावंतवाडीचा बोळकी, जाते, फळे असा छान गुलाबी रंगात रंगवलेला लाकडी संसार होता. पण तिच्या प्रेमळ मातेने  तो 'खराब होईल' म्हणून कधीच आम्हाला खेळायला दिला नाही. आमचा रविवार तिच्या खडूस आईला 'आम्ही नीट वापरतो, खराब करत नाही, द्या की हो काकू' करून पटवण्यात अनेकदा वाया जाई. नंतर त्यांनी ते सगळं चैत्रागौरीच्या आरासेत मांडायला सुरु केलं आणि आम्ही अगदीच आशा सोडली. अजूनही एक हुरहूर मनात दाटतेच की काय झालं असेल त्या गुळगुळीत सुरेख गुलाबी खेळण्यांचं ? 😟

Wooden dolls from old times.


आमच्या लहानपणी प्लॅस्टिकच्या  फिक्कट गुलाबी बाहुल्या नवीनच निघाल्या होत्या. त्या इतक्या तकलादू होत्या की त्यांचे हातपाय तरी तुटत किंवा इकडे तिकडे टाकून टाकून नाक तरी चेपे किंवा गालफडे तरी बसत. मग त्या घाणेरड्या बाहुलीला बघून सगळी मुले ईsss  ईsss करत हसत असत. आमच्या बाहुलीला कुणी नावे ठेवलेली मुळीच खपत नसे, कितीही चेपटलेली असली तरी आमची बाहुली आम्हाला प्रिय असे. असल्या चिडवणारया वेडपट लहान भावाना, मुलांना एकतर आम्ही खेळात घेत नसू आणि घेतलं तर बाहेरची कामेच सांगून बाहेर पिटाळत असू. चुलीचा आणि सगळ्या मुदपाकखान्यात जमा असलेल्या खाऊचा संपूर्ण ताबा आम्हा मुलींकडे असे. नंतर नंतर  मुलांना आमचा डाव कळाला  कारण खाऊ फार वाटणीला येईना. मग त्यांनीच आमच्यात खेळायचं बंद केलं, सुंठी वाचून खोकला गेला. नाहीतरी ती मुले रडून, भेकून आयांना 'खेळायला घेत नाहीत' अशा चहाड्या सांगायची म्हणून नाईलाजाने  त्याना आमच्या खेळात घेतलेले.


मग काय, आमच्यातले चिमणे संसार त्यांच्याविना  सुरु झाले. आमच्या कन्येप्रमाणेच रोज भांड्यांच्या नवीन वाटण्या, रोज कोणीतरी नवरा आणि कोणीतरी बायको अशी रोज बदलती भूमिका. दर दिवशी बदलणाऱ्या जोड्या असत आणि त्यात काही चुकीचं वाटतही नसे, हे एक बरे होते. तास - दोन तास खेळ रंगे, मग धुसफूस, भांडण, रुसवे आणि शेवटी आपापली भांडी काबीज करून पाय आपटत सगळे स्वगृही परत. आईकडचे खरे जेवण खाल्ल्याशिवाय तसेही पोट भरत नसे. रोज नवा गडी नवे राज्य. बऱ्याच सुट्टीच्या दुपारी असे भावी संसाराचे धडे गिरवण्यात सत्कारणी लागत. 

Married couple in kids life.

आमच्या काळातला प्रत्येक सुट्टीतला एक रंगतदार कार्यकम म्हणजे, बाहुलीचं लग्न. मोठ्या तायांना या आमच्या खेळात खूप रस असायचा. मग काय बाहुला  मुलगा कुणाचा, मुलगी कुणाची ठरवायचे आणि गोरज मुहूर्त पण  काढायचा. लग्न कुणाच्या आंगणात करायचे हे  ठरले की लग्न होणारच. देणी-घेणी, सोने -नाणे काहीच विषय नसल्याने लगिन मोडायचा प्रश्नच नव्ह्ता! ताई आमच्या वेड्याविदाऱ्या बाहुल्याना नवरा नवरीचे छान कपडे शिवायच्या ते ही अगदी जरीकाठी. मग फुलांचे कागदी छोटे हार, मोत्यांच्या मुंडावळ्या सगळी साग्रसंगीत तयारी आठवडा भर चाले. आम्ही अगदी आनंदात त्या दिवसाची वाट बघत असू. मग तो दिवस उगवे, घरात कसे बसे गिळून आम्ही लग्न घरात पळायचो. सगळीच मुलंमुली जय्यत तयारी करण्यात गुंतलेली असायची. कार्य उत्तम पार पडावे म्हणुन  झटायचे. सगळ्या ताई..आम्ही छान छान  कपडे घालून आपापली बाहुली घेउन लग्नाला जायचं. अंतर पाट धरून मुंडावळ्या बांधून, हार घालून लग्न सुरु होई. अगदी छोटा भटजी मंगलाक्षता म्हणे आणि बाहुलीचे लग्न टाळ्या वाजवून  अक्षता टाकून जोरदारपणे पार पडे. वर्गणी काढून आणलेले चणे, चिरमुरे इत्यादी खाऊ यांच्या जेवणावळी उठत. अशा रितीने कार्य संपन्न होई. दोन्ही विहिणी आपापल्या बाहुल्यांचा ताबा पटकन घेत आणि  नवरा-नवरी चुपचाप आपापल्या घरीच रवाना होत. ‘लग्ना दिवशीच त्यांचा घटस्फ़ोट झालाsss’ असे कुणालाही वाटत नसे! पुढच्या वर्षी दुसऱ्या बाहुलीशी लग्न करायला मोकळे ! 😆


माझीही पन्नाशीची जुनी  भातुकली माहेरी शोधायला हवी असं वाटून गेलं. मुलीला ‘आता तुझी भातुकली कुणाला तरी देऊन टाकूया का गं ?’ असं विचारताच त्या प्रॅक्टिकल, उच्चशिक्षित पोरीने खसकन माझ्या हातातून तो बॉक्स ओढून घेतला. सगळ्या गोष्टी छान धुवून पुसून  लॉफ्टवर अगदी कोपऱ्यात बॉक्स नीट ठेऊन दिला. ‘बाकीचं भंगार काढा आधी, माझी भातुकली, माझं बालपण द्यायचं नाही’ असा सज्जड दम पण भरला. फक्त मीच ‘येडी’ नाही याची खात्री पटून मी आम्ही सगळेच हसायला लागलो. आजकाल मुली खेळतात की नाही असं पण वाटून गेलं. पण लगेच सगळ्यांना whatsApp वर ही शंका विचारून २० लहान मुलींचे आणि त्यांच्या भातुकलीचे फोटो आल्यावरच बरे वाटले जिवाला. 🙌


अलिकडच्या काळातली प्लास्टिकच्या भातुकलीकडे बघून तर मला कसंसंच झालं. कालौघात वेताची, पितळी, पत्र्याची, मातीची, लाकडी, स्टील अशी सगळी भातुकली मागे पडली आणि प्लास्टिकची रंगीबेरंगी भातुकली आली. असो,कालाय तस्म्ये नम:! पण आताच्या बाहुल्या किती सुरेख असतात. उभ्या केल्या की डोळे मिचकाऊन हसतात काय, आडवे केले की डोळे काय मिटतात! कुणी तोंडात pacifier ठेवले की गप्प... काढले की ट्यँहा ट्यँहा करुन रडतात...  एकदम मस्त जिवंत चालती बोलती खेळणी. ते काहीही असो खेळणी कसली ही असोत  दगडाची किंवा मातीची पण मुलानी हा संसाराची ट्रायल म्हणून भातुकली ही खेळली पाहिजे. हा सांस्कृतिक ठेवा जपलाच पाहिजे, कारण हा पुढच्या सुखी संसाराचा पाया असतो. भातुकली मुलींची पुढच्या संसाराची मानसिक तयारी करून घेते.. हे नक्की फक्त बदलत्या काळानुसार आता मुलग्यांना पाककला सादर करायची संधी मात्र मुद्दाम द्यावी. ती मुले एकदा स्वयंपाक करु लागली की भातुकली मधल्या आधुनिक आई लिपस्टिक लावुन मेकअप करून लैपटॉप घेउन हाय बाय करत ऑफ़िसला जातील 💃….मुले आज काय ऑर्डर करूया बर्मीज की थाय फूड असे कॉल करुन विचारतील, आणिक मोकळी होतील! 

Modern toys are made up of plastic mainly but they are equally beautiful

बघता बघता हातातून सोनेरी वाळू निसटून खाली पडावी तासा काळ पुढे गेलाय. बाल्कनीतून रूणझूण करत पळणारी ती पावले आता मोठी झालीत,आपल्या खऱ्या संसारात रममाण झालीत. आईच्या हाताला बसलेले चटके आता कुठे किंचीत जाणवू  लागलेत.. तरीही मन अजूनही तो काल्पनिक म्हणून अती सोप्पा संसार आठवून सुखावतं… आता तो काळ परतून येणार नाही, तरीही भातुकली  मात्र खोक्यात...कोपऱ्यात बसून तिच्या मालकीण बाईंची वाट बघणारच….. अगदी जगाच्या अंता पर्यंत…💓


     ©विजयश्री तारे-जोशी

        30.5.2020



या ब्लॉगपोस्टसाठी छायाचित्रे पुरवल्याबद्दल माझ्या मैत्रिणी चित्रा देशपांडे आणि वर्षा जाधव यांचे अनेक अनेक आभार. 💘







टिप्पण्या

  1. छान मस्त👌 कस ग आठवत तुला एव्हढ सगळं? आणि तुझं वाचलं की आम्हाला वाटत, की अरे आपणही हेच तर करत होतो! मस्त!!!👍

    उत्तर द्याहटवा
  2. कुंदा पाटील, बदलापूर
    श्री किती छान लिहिलंस ग, वाचताना आपला हा संसार विसरून त्या लहानपणच्या भातुकली च्या संसारात फिरून आले, त्या काळी मला आजोबांनी सप्तश्रृंगी गडावरून चक्क पितळेची भांडी (भातुकली साठी) आणली होती. श्री काहीही असो तो जो निष्पाप, निखळ संसार होता ना तो काही औरच, त्याची सर कदाचित पुन्हा कधीच येत नाही अर्थात आपण मुली, बायका अशा असतो ना खोट खोटं असो अगर खरं खरं असो जे करतो ते मनापासून प्रेमळ पणाने करतो. खूपच छान मला तुझं लिखाण आणि भाषा शैली खूप आवडते असंच लिहीत रहा. पुढील लेखासाठी " शुभेच्छा"👍
    कुंदा पाटील, बदलापूर

    उत्तर द्याहटवा
  3. आपले लेखन आम्हाला खूपच आनंद देतंय,
    खरोखर तुमचं मनापासून कौतुक वाटतंय..👍👍

    असेच लिहिते रहा आणि सर्वांना आनंदित करा..😊😊

    May God Bless You, Madam !!💐💐

    # अनिरुद्ध गायकवाड

    उत्तर द्याहटवा
  4. jgd.(पुनःप्रक्षेपण)मुलीचा भातुकलीचा संच पाहता पाहता नव्या जुन्या भातुकलीविषयी लिहिताना तुझं हळव स्त्रीमन कसं भारावून गेलय असं वाटतय! काळाबरोबर खेळणी नवी पण खेळ तोच! बालपणात लूटुपुटीचा खेळ संसाराचा खरा खेळ सुरु झाला तरी मनातून जात नसावा! परत मुलामुली बरोबर आई खेळात रमते, हा nostalgia आहे, वास्तवाच रखरखीत वाळवंट अनुभवताना मन बालपणच्या ओयॅसिस मधे परत परत पिंगा घालते, माॅडर्न भातुकली बदलली तरी खेळणी जपण्याची सवय तीच जूनी! बालपणातला तो कृतक आभासी संसार खरे रुप घेतो अन कल्यनारम्य माधुर्य ओसरते, ही romsntic वृृृृत्ती तर कल्पनारम्य! एकतर मन भूतकाळात किवा भविष्पाच्या स्वप्न नगरीत विहरत असतं, वर्तमानात ठरत नाही खट्याळ मुलासारखं ते भटकत असत.अजून मलकापूरात खेळणी
    अढगळीत असतील का अस मन शोधत आहे आणि मुलगी ही खेळण्यांच स्क्रॅप करायला तयार नाही.जीव गुंतलेला असतो जुन्या आठवणीत. रम्य बालपण जिथे व ज्यात रमल ते ते भावमधूर बमते. कधी ही भातुकली मंगेश पाडगावकरांच्या कवितेत उतरते ते व्हा "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी "आठवते व कुणाच्या तरी अर्ध्यावरती मोडलेल्या अधूर्‍या कहाणीचे आर्त मनाला स्पर्शून जाते. पाठ्यपुस्तकातली बहूधा शांता शेळकेंची कविता आठवते, " अहा!ते सुंदर दिन हरपले।मधुभावाचे वेड जयानी जिवाला लावले।" अन" बाल्य संपता आज जगाचे रुप सर्व बदलले।" बालपणचे रुप गेले व रंगही गेले तसेच जगाचे आदिम बालपणही
    सरले .आता यांत्रिकीकरण व अस्वस्थपण आले आहे. मृगजळामागे धाव व हजारो कांचनमृृगांचा पाठलाग! रामाचे बरे!एक कांचनमृग रामायण घडवतो तर अनेक कांचनमृगा पाठोपाठ धावणारे मिडास येथे आहेत.ते बाल्य त्यातले निर्व्याज खेळ संपले.मग आठवणींची मृगया किती व का करावी?आहे याचं उत्तर?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सर आई बापाना मुलाचे सगळे चांगले वाटते..तसे तुम्ही गुरु असल्यामूळे शिश्येचे सगळे आवडते तुम्हाला..तुमचे समर्थ आशिर्वाद असलेला माणूस कुठेच कमी पाडणार नाही ...

      हटवा
  5. खूपच सुंदर...बालपणीच्या आठवणींची जत्राच डोळ्यासमोर अवतरली...मुलगी आणि भातुकली हे समीकरण वेगळे न करता येण्यासारखे. झोपडीत राहणारी असो वा महालात...भावना एकच असते भातुकली मांडताना. तुटकी फुटकी भांडी जरी खेळायला असली तरी त्यातून तिला मिळणारा आनंद हा चोख सोन्यासारखाच...आणि अगदी फाईव्ह स्टार भातुकली मिळाली मिक्सर, गॅस ,डायनिंग टेबल सकट तरी तीच निर्मळ भावना मनी असते. मला आठवतंय छान छान भातुकली चे सेट्स असून सुद्धा ग्लास म्हणून टूथपेस्ट च्या झाकणांची केलेली जमवाजमव वा सरबतसाठी छोट्या छोट्या काचेच्या बाटल्या आणि बरेच काही...खररेच आताच्या पॉश किचन मध्ये ती मज्जा हरवली ती आज हा लेख वाचताना गवसली...धन्यवाद वर्षाताई जाधव तू तुझ्या मैत्रिणीची ही पोस्ट शेअर केलीस😊पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा😃

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. किती सुरेख लिहिलेस तू....तुझ्यातली लेखिका जागी झाली...मस्त..आणि तुमच्या प्रेमासाठी नक्कीच लिहीन..

      हटवा
  6. सुंदरच लिहिताय.. इतक्या बारीक गोष्टी लिहिताना त्या काळात शिरल्याशिवाय जिवंतपणा येत नाही..तो मात्र येतोय कारण त्या आठवणींमध्ये तुम्ही रमताय !!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. लोक डाऊन मुळे आपल्या मनात...अगदी आत जायला वेळ मिळाला..तो सत्कारणी लागला😃

      हटवा
  7. ब्लॉग वाचुन बालपण डोळ्यापुढे आले.
    बालपणीच्या मित्रिंनची आठवण आली.
    छान.. लिहित रहा.
    Vaiju

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. त्या निमित्ताने आपण किती लहान झालो...नक्कीच लिहायचा प्रयत्न करणार ह्न्ं..😧

      हटवा
  8. खूप छान जयू. वाचताना मी पण माझ्या बालपणात डोकावून आले.
    मंजू

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुझे वाचन खूप आहे..अजून चांगले लिहायचा प्रयत्न करीन...लाडकी बाहुली होती माझी एक...कवीता आठवली असेल तुलाही😃

      हटवा
  9. वर्णन नेमीप्रमाणे सफाईदार..विषय पण जर वेगळा.. एकूण छानच. मिलिंद कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  10. माझी मुलगी अमेरिकेत आहे,आठ्वण झाली आने लेख वाचून रडले.. आवडले सगळे वर्णन

    उत्तर द्याहटवा
  11. आमची नात पाच वर्षाची आहे..तुमची खेळणी हवी आहेत म्हणून रोज रड्त असते..रोज फोटो दखव्य्तो तिला..बाहुल्या कुठे घेतल्यात सांगाल का प्लेज..
    रेखा पाटील

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. काही बाहुल्या माझ्या नाही आहेत यातल्या. त्यामुळे सांगणं कठीण आहे. या बाहुल्यांची खेळणाऱ्या सगळ्या मुली आता पंचविशीच्या पुढे गेल्या आहेत त्यामुळे मिळतील की नाही माहिती नाही.😀 पण दादर, तुळशीबाग या ठिकाणी काहीही मिळतं त्यामुळे नक्की शोधून पहा. इतके गोड बालहट्ट पुरवलेच पाहिजेत 😊

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -