- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
एकदाची वार्षिक परीक्षा संपली रे संपली की आम्ही टराटरा वह्या फाडायला सुरुवात करायचो! निकालाची वाटही न बघता जुन्या वह्या रद्दीत जायच्या आणि कोऱ्या पानांची कच्ची वही केली की अर्धे काम झाले. पुढच्या वर्षीची पुस्तकं आली आहेत का बघायला दुकानात फेऱ्या सुरु. दुकानदार कंटाळून हाकले पर्यंत फेऱ्या व्हायच्या. पुढच्या वर्षीची पुस्तके एकदा हातात पडली की ती छान कव्हर घालून सजवायची आणि फक्त तो कोरा वास घ्यायचा अगदी डोळे मिटून.. मनसोक्त वास घेत घेत चित्रे बघायची.. फार फार तर मराठी पुस्तक चाळायचे.. बाकी अभ्यासाचा नाद करायचा नाही.
अख्खी सुट्टी लिमये वाडा किंवा घरामागच्या गल्लीतच जायची.त्यामुळे सुट्टी पडली की त्या वाड्याचे अंगण सारवणे, खड्डे मुजवणे अशी कामे आपणहून सुरू करुन वाडा छान ठेवायला खारीची मदत करायचो. मस्त गुलाबाची बाग होती तिथे आणि मे फ्लॉवरही लागायची,ही लाल चुटुक फुले मे मधेच कशी लागतात म्हणून केवढे कौतूक. मुलींचे बिट्ट्या,जिबली,पत्ते असे बैठे तसेच लपाछपी, लंगडी असलेही विविध खेळ तिथे तासनतास रंगायचे. नाच,गाणी,नकला, स्पर्धा आणि सगळे सांस्कृतिक कार्यक्रमही तिथेच चालायचे.
कधी आम्ही नगर पालिकेच्या कुंपणाची मेंदी शिपायाचा डोळा चुकवून ओरबाडून आणून तासन तास सखीच्या कट्ट्यावर दगडाने कुटत बसायचो. कुणाच्यातरी घरातला चिमूटभर कात टाकला की कुटतानाच आमचे हात लाल भडक रंगायचे, मग काय तो गोळा कुणाच्या तरी आईला देऊन टाकायचा. बायका खूष होउन हातावर बटबटीत गोळे गोळे नक्षी काढायच्या, नाजूक नक्षीकाम करायला कोन नव्हते आणि वेळ ही नव्हता कुणाला.
भातुकलीचे संसार तर रोज वेगवेगळ्या ठिकाणी मांडले जायचे, आणि कंटाळा आला की मोडायचे. कधी मोठ्या ताई ‘फिस्ट’ ठरवायच्या आणि आम्हाला नवीन नवीन खाऊ मिळायचा. अंगणात रात्री ‘चांदणी भोजन’ चे बेत पण आखले जायचे. आयांच्या मागे भुणभुण करून छान पदार्थ करून घेतले जायचे आणि कुणाच्यातरी अंगणात एकत्र बसून खाल्ले जायचे. तर कधी आम्हाला चांदणी भोजनाची हुक्की नेमकी अमावास्येच्या मुहूर्तावर यायची आणि मग 'कंदील लाईट डिनर' पण व्हायचे.
त्या काळी मलकापूरला कायम पाण्याचे दुर्भिक्ष, विहीर आटायची त्यामुळे आया-बाया रात्रीही विहिरीतून पाणी शेन्दायला जायच्या. आम्ही मुलं-मुली छोट्या कळश्या घेऊन उगीच त्यांच्या मागून पळायचो. सगळ्या भूतकथा आठवायच्या नको त्या वेळी. इथं वेताळ आहे, तिथं पांढरी साडी नेसलेली बाई खदाखदा हसत उभी असते, त्या झाडावर खविस उलटा लटकतोय आणि विहीरीत तर भुतांची कुटुंबेच्या कुटुंबे रहातात.अशा सत्य कथा कुठून कुठून ऐकलेल्या असायच्या, त्यामुळे किर्र अंधाऱ्या रात्री राम-राम करतच पळायचे. गर्द काळ्या पाण्याने भरलेली ती गूढ विहीर, निरव शांतता, त्यातून घागरींचा बुडबुड..चुबुक-चुबुक नाद, रहाटाचा कुई..कुई..आवाज, बेडकांचं डरांव-डरांव असं कर्कश्श पार्श्वसंगीत, झाडांच्या पानांची सळसळ, रातकिड्यांची किरकिर आणि या भयावह वातावरणात स्वत:लाच ऐकू येणारी छातीतली धडधड... विहीर खोल आणि घरे उंचावर, मग घागर भरुन वर चढून जाताना लोक हाश्श.. हूश...करीत क्षणभर थांबायचे, तो ही आवाज भुताचाच वाटायचा! वळणावर एक चाफ्याचे झाड होते त्यावर फक्त काळेभोर खोड आणि पांढरी शुभ्र फुले!...त्यावर एकाच वेळी लुकलुकणारे हजारो काजवे.. आख्खं झाडंच वेताळ वाटे!... भिती वाटायचीच पण तो लोभस काजवा महोत्सव अंतर्मंनाला अनुभवावासा वाटायचा. काजवे काही वेळा हातावर येउन बसायचे अगदी जवळचे मित्र असल्यासारखे. हळुवार हातानी ओंजळीत पकडून त्याना आपल्या आंगणात आणून सोडायचे. टयूब लाईट इतके पांढरे, शुक्राच्या चांदणी सारखे तांबूस, पिवळसर, पोपटी असे जीव वेडावणारे त्यांचे रंग बघून जीव हरकून जायचा. ईवलासा लुक लुक् करणारा जीव; पण धरणी, आसमंत कसा तेजाळून टाकतो ते बघायला आमचं मन ओढायचं. रामाच्या भरवशावर,आईच्या पावलावर पाऊल टाकत जीव मुठीत घेउन आमची ही मर्दुमकी सुरुच रहायची,अगदी पाऊस सुरू होईपर्यंत.
गल्लीतल्या बायका आमच्या सुट्टीची वाट बघायच्या. कुणाचे पापड लाटून दे, सांडगे घाल. मैत्रीणींच्या, शेजीबाईंच्या घरी अशी कामे आम्ही दोन पापडाच्या लाट्यांच्या बदल्यात आनंदाने करायचो. या सगळ्या चौसष्ट जीवनोपयोगी कला लहानपणीच शिकल्यामुळे आम्हाला गल्लीत मान. कुणाच्या घरी लग्न-कार्य असलं की अजून मजा येई. आम्ही अगदी तांदूळ निवडण्यापासून ते रंगीत कुरडया, पापड, नवरीचा रूखवत, नकुल्या, नवरा नवरीच्या नावाच्या करंज्या, करंजीवर मंगळसूत्रचा रंगीत ठसा…. नाना प्रकार हौसेने करायचो. मग लग्नाला ट्रकाच्या बंबात बसून जायचं, तिथे शिजवून तट्ट्यावर टाकलेला भात, शाक नावाचा पातळढोण रस्सा (जो माणसे वाढली की घागरीने वाढवला जातो!), बटाट्याची भाजी आणि मूठभर बुंदी असा एवढाच पण पोटभर बेत असायचा.अशी खूप लग्ने मनापासून enjoy केली...त्या शाक भाताची मस्त चव अजून जिभेवर रेंगाळते आहे youTube वर मिळेल का रेसिपी?
पाटावरच्या शेवया हा एक अपूर्व सोहळा असे..ज्या कुणा ललनेला शेवया वळायला येतात तिला फार मान असतो,फार नैपुण्याचे, सुगरणीचं नाजूक काम. शेवयाचा पाट म्हणजे सुरेख नक्षीदार फळी….तिला एका बाजूला 40 ते 45 अंशात कलता ठेवून खाली आधार दिलेला असतो. घोड्यावर बसल्या सारखे बसायचे आणि मागे टेकायला परत एक फळी.आधी पाटाची साग्रसंगीत पूजा, मग गणपती आणि इतर देवाना शेवया करायला या… तुटू देऊ नका… असे ओवी तून साकडे..
"यावे देवा गणराया...
आज रांधीन शेवया...
दृष्ट नको लागायला..
माझ्या बाई शेवईला.."
मग या मानकरी बाई त्या पाटावर बसून ओंजळ पालथी करून मधे भिजवलेले पीठ घेणार..आणि खुर्रर ...खुस्स्स,खुर्रर..खुस्स असा बांगड्याचा,पाटावर आवाज करत त्या तालात दोन्ही करंगळी खालून शेवया सोडणार अगदी नाजूक, एकसारख्या. संगीताच्या तालावर सगळे काम..देव पावायचा आणि मग दोन्ही बाजूला दिसायची स्पायडर मैन च्या तंतू सारखी न तुटणारी तारेइतकी नाजूक शेवई! मग अलगद बोटात पकडून आम्ही ताटात तिची वेटोळी विणकाम केल्यासारखी घालायची भराभर.ताट भरले की छोट्या मुली बाहेर उन्हात कॉट वर वाळायला ठेवायच्या. वाळल्या की ताटातून आपोआप निघायच्या, ते मस्त जाळीदार गोल खूप सुरेख दिसायचे. त्या शेवया, ते पाट नामशेष होणार हे माहीत नव्हते तेव्हा… आता यंत्रे शेवया बका बक पाडतात… कुठाय ती नजाकत आणि त्या ओव्या..? फक्त यंत्रांची घरघर.. माझ्या मनात शेवयांचे ते चित्र अजूनही तसंच अमर आहे.
शेवया, पापड असल्या कामांमधे दुपार कलायची, मग सायकली भाड्याने आणून दामटायच्या..सगळे उतारा चे रस्ते, ब्रेक लागायचे नाहीत,आणि त्यात आमच्या जुन्या दिव्य सायकली. अशा मोक्याच्या वेळी कोणी माणसें,कुत्री आडवी येवून आमची सत्वपरीक्षा घेणार म्हणजे घेणार. मग काय कुत्री घाबरुन पळून जायची पण सायकल किंवा आम्ही आडवेच! ढोपर कोपर फोडून घेउन, वर मोट्ठया लोकांची बोलणी खायची! कधी सगळ्या जणी आणि भावंडे मिळून पिशवी घेऊन आजूबाजूच्या डोंगरांवर जांभळं-करवंदं-कैरी शोधत पायपीट करायला जायचो. कोणीतरी झाडावर चढून जांभळाचे घोस खाली टाकायचे, ते अलगद झेलायचे. करवंदाच्या जाळ्या अडचणीत असतात,करवंदे काढताना सगळ्या अंगाला काट्यांचे ओरखडे उठायचे आणि हात, पाय, कपडे लाल मातीने लालेलून जायचे. घरी आल्यावर आईने दोन फटके देऊन त्या ओरखड्यांवर लावलेली हळद आजही हुळहुळत आहे! धोपेश्वर, येळवण जुगाई, गावठणची यात्रा.. सगळं काही डोकं लाल मातीने रंगवूनच साजरे व्हायचे. आमच्या समस्त माता हे सगळं सोसत सुट्टी संपायची वाट बघायच्या. मुली काय करतायत, कुठे आहेत याचा काही पत्ता नसायचा त्यांना.महादेव टेकडीवर पळत चढत जाऊन रत्नागिरी रोडवर उतरत येणे हा त्यातलाच एक उद्योग. चढत जाताना कितीही दमछाक झाली, तरी उतरताना मस्त गार गार वारा लागायचा,पंख फुटलेत असं वाटायचं. टेकडीवरून कोकणात जाणारा काळ्या नागिणीसारखा रस्ता वरुन खूप मस्त दिसायचा, अजूनही दिसतोच.
उन्हाळ्याची सुट्टी वळवाच्या, गारांच्या पावसाशिवाय कधी संपलीच नाही. त्या गारांचा मारा खात खात त्यांना गोळा करणे, त्या खाणे हा आनंदाचा परमोच्च बिंदू. आधी दुपारभर मरणाचा उकाडा..अंगाची लाही लाही..मग हळू हळू आकाश काळवंडायला सुरु होई...आणि सोसाट्याच्या वाऱ्यासोबत टप्पोरे जल बिंदू आकाशातून बरसू लागत, मातीच्या मस्त गंधाने परीसर भारला जायचा.. ती खमंग,गंधीत माती मूठभर खावी असे वाटायला लागायचे..आम्ही वर डोळे लाऊन बघायचो, माती डोळ्यात जायची आणि….थाड थाड थाड.. गारांचा वर्षाव सुरू होई.. मेघांचा गडगडाट, विजांच्या कडकडाट आणि पत्र्यावर ताड ताड आवाज घुमवत पडणाऱ्या त्या गारा! निसर्गाचे अद्भूत संगीत! अवघ्या चराचराच्या कानात वारे शिरायचे. मुले,मुली,वासरे, सगळी नाचायलाच लागायची. नखशिकांत भिजत,भिजत,कुडकुडत गारा वेचून खायच्या.. रस्त्यावर, मातीत पडलेल्या... विरघळण्या पूर्वी पटकन तोंडात टाकायच्या! आम्हाला त्या परमानंदातून भान येण्यापूर्वीच सगळ्यांच्या प्रेमळ मातांचे टिपेच्या आवाजातले हाकारे सुरु व्हायचे.. आणि त्यांचा गोड प्रसाद खायला लागायला नको म्हणून पळत पळत घरी पोबारा करायचा.
गादी करणारे आले की त्यांच्या धनुकलीने टर्र..टर्र आवाज काढायचे..लोक त्याना बोलवायचे, मग घासाघीस करत सौदा ठरायचा, त्या नंतर तो जुन्या गादी मधला जुना कापूस टर्र..टर्र करत पिंजून नव्या कपड्यात घालून नवी गादी कशी बनावतो हे निरिक्षण करण्यात आमची एखादी दुपार सत्कारणी लागे आणि जुनी गादी नव्या नवरी सारखी देखणी दिसू लागे.
दुपारी मदारी येई आणि त्यांची शर्ट चद्ड़ी परिधान केलेली मर्कट पिल्ले तो सांगेल ते बरोबर करून दाखवायची,अस्वलवाले खेळ करीत, दोरीवरून लिलया चालणाऱ्या चपळ,काटक मुलांचे खेळ असे अनेक मनोरंजनाचे रतीब असायचे. पोलीस ऑफीसरचे सोंग वांड लहान मुलाना पकडायला यायचे. तर कधी साक्षात शंकर सर्पमाला लेऊन, निळेभोर रूप घेउन दर्शन देत. ते गावातून जाईपर्यंत आम्ही त्यांची पाठ सोडत नव्हतो.
या सगळ्यावर कळस चढवायला येई तो गारेगार!!! आम्ही घरातून पाच दहा पैसे घेऊन त्याच्या भोवती लगेच कोंडाळे -कल्ला करत जमा! त्याचे ते बारदानात बांधलेले बर्फाचे तुकडे काढून खुसू खुसू खिसणे, मग तन्मयतेनं मान तिरकी करत खिसाचा गोळा वळणे, हळूच त्यात काडी खोचणे, परत गोळा घट्ट करून वर लाल, केशरी,हिरवा रंग टाकणे…. सगळं बघून मन मोहून जायचं. तोंडाला पाणी सुटायच्ं मग आपला गोळा हातात आला की सूर्रर्रर्र सूर्रर्रर्र करत खायचा, खाताना इकडे का तिकडे बघायचं नाही. मग खाऊन झाल्यावर एकमेकांना जीभांचे रंग दाखवत हसायचं. त्या गारेगारवाल्याचे हात, अती निर्मळ कपडे, बर्फाची लादी ठेवलेलं ते घाणेरडं बारदान, लाल मातीमय मशीन कशा-कशाकडं म्हणून लक्ष जायचं नाही. मन स्वच्छ तर जग स्वच्छ! म्हणूनच कधीही बाधला नाही तो गारेगार आम्हाला!
फुलपाखरां इतकं स्वच्छंदी आयुष्य होतं..आत्ता या फुलावर तर क्षणात त्या… करीअर डेवलपमेंट..समर क्यँप..छंद वर्ग..असे कुठेही घातले नाही पालकानी आम्हाला…. पैसे कोण खर्च करतो? निसर्गात मुक्त सोडून द्यायची मुले. प्रत्येक गल्लीतली मुले,सगळी गल्लीच संभाळत असे. कुणाच्याही पालकांना कोणत्याही चुकलेल्या मुलांचे कान उपटण्याची फुल परवानगी होती. मुली म्हणून कधीही आम्ही मागे राहिलो नाही, घाबरलो नाही की कुणी वाकड्या नजरेने आमच्या कडे कधी पाहिले नाही. सगळं जग इतकं निर्मळ होतं.
सगळी उन्हाळीसुट्टी इतकी मजेत जायची की कधी संपूच नये अशी वाटायची, पण ती संपायची… आणि जलधारांच्या अभिषेकाने आनंदात पुढचे वर्ष सुरू व्हायचे….
© विजयश्री तारे-जोशी
18.5.2020
स्थान:
Kolhapur, Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या









मस्त, वर्णन मलकापूरचे असले तरी लहानपण चे आजोळ बेळगाव, balekundri, सुतगत्ती आणि उन्हाळ्याची सुट्टी डोळ्यासमोर उभी राहिली. शेतात केलेली काम आणि आजोबाच्या बरोबर केलेली रात्रीची भटकंती आठवली.
उत्तर द्याहटवाअरे वा! खरंतर लांब आहे बेळगाव मलकापूरपासून, पण तरीही बालपणीच्या आठवणी तशाच आहेत! त्या सुट्टीबद्दल आणखी जाणून घ्यायला नक्की आवडेल.
हटवाझकास, ते दिवस डोळ्यासमोर उभे राहिले.
उत्तर द्याहटवाDhanyawaad!!!
हटवाjgd.निसर्गरम्य वनराईच्या कुशीतलं मलकापूर व हरवलेलं बालपण आठवणीच्या कुंचल्याने रंगवताना तू हरवलीस वाटते भूतकालात जो ककधी परतणार नाही! तुझ्यातली लेखिका कवयत्री बनून भावगीत गाताहेस ,असे वाटते अक्षरांच्या लताकुंजातून विहार करताना! शाळकरी दिवसातली सुट्टी कशी वसंतबहार वाटते वाचताना, मेंदीच्या रगाने रंगलेले दिवस, उन्हाळ्यातले खेळ ,कामातली मजा औरच!रात काजव्यांचे वेड व सोबतचे चित्र गर्द घनदाट रातीच्या जगातत नेते.भूतावेतांळांच्या गोष्टी खरे मानणारे बालमन,गारांचा वादळी पाऊस झेलत ओंजळीतले निसर्गधन! लग्नातल्या मेजवान्या.वह्या पुस्तकांचे कौतुक!पोरांविषयी सुट्टीवेळी धास्तावलेली पालकांची मने,शाळेच्या सुरुवातीबरोबर वर्षागमन व मलकापूरचा रानदांडगा पाऊस! मी ही कांही काळ अनुभवलाय पण आता ते दिवस झुरत आठवणी काढायचे!"कालाय तस्मै नमः" nostalgic past days शब्दातून सुंदरपणे उतरले आहेत. झर्यासारखी खट्याळ व खेळकर भाषा विसरायला लावते आजचा रुक्ष रटाळ वर्तमानकाळ!अभिनंदन!लिहित रहा, उलगडीत मनाचे कंगोरे व गहरे मोरपंखी रंग!
उत्तर द्याहटवाशेटे सर, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं.. या लहानपणातून बाहेर पडावे असे वाटतच नाही… मुठभर खेड्यात, मुठभर पैशात अगदी स्वर्ग सूख मिळाले...या क्षणी मला देवाने विचारले तर..घड्याळ उलटे फिरव आणि मला तिथे सोड असे म्हणेन मी..फक्त माझी माणसे मात्र असावीत… 🙏🏻
हटवाThe memories of childhood are never fading.
उत्तर द्याहटवाVery true!!
हटवाApratim suttitil varnan,sandge papad,lagnatil jevan,agdi hubehub.Madam pudhil vatchalis punhha hardik shubhechha.
उत्तर द्याहटवाAnek dhanyawaad J.P. ashach pratikriya kalawat raha!
हटवाअप्रतिम लिखाण. मुख्य म्हणजे जबरदस्त निरीक्षण शक्ती आणि त्यातील बारीक सारीक गोष्टी लेखणीतून उतरवण्याची कला अत्युत्कृष्ट.. शुभेच्छा!!!
उत्तर द्याहटवाया सुंदर प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार मि.उपाध्ये!
हटवाहुबेहूब वर्णन.. त्या वेळचा काळ डोळ्यासमोर उभा राहतो.. सुंदरच.. मिलिंद कुलकर्णी कोल्हापूर.
उत्तर द्याहटवाDhanyawaad!
हटवाखूपच सुंदर लेखन आपल्या सारख्या समवयस्क सर्वांनी अनुभवलेल्या बालपणाची खडानखडा आपण आठवण करून दिली मला तर हे सर्व मी अनुभवलेले आपण लहीले आहे असेच वाटले. असेच लहीत रहा.बालपणीच्या आठवणी जाग्या करून दिल्या बद्दल धन्यवाद.
उत्तर द्याहटवागेले ते दोन गेले
Khara ahe. Gele te din gele.
हटवाDhanyawaad Milind Kulkarni!!
श्री खूपच सुंदर👌👌👌
उत्तर द्याहटवामला तर सगळं माझं बालपणच आठवले. तू एव्हढं हुबेहूब शब्दबद्ध केलंय की त्याला तोडच नाही. शिवाय वर्तमानाच भानही ठेवलंय. छानच👏👏👏
अनेक आभार मंदा!! असेच अभिप्राय देत राहा!!
हटवारम्य ते बालपण. खूप सुंदर व चपखल शब्दांत वर्णन!
उत्तर द्याहटवामंजू
Thank you so much, Manju!!
हटवाकुंदा पाटील, बदलापूर
उत्तर द्याहटवाअप्रतिम, खूपच सुंदर लिहिलंस, अगदी थोडावेळ का होईना बालपण फिरून आले, खरंच सुवर्ण काळ आणि सुवर्ण क्षण होते ते, आपली पिढी तो काळ आणि तो क्षण जगली. असच सुंदर आणि छान लिहीत रहा. - कुंदा पाटील, बदलापूर
अगदी खरं आहे कुंदा! तो काळ खरंच सुवर्णकाळ होता आयुष्याचा. नक्की असेच लिहायचा प्रयत्न करत राहीन. अभिप्राय देत राहा!!
हटवामस्त वर्णन. मलापण मी लहानपणी माझ्या आजोळी, दड्डी गावात, घालवलेली मे महिन्याची सुट्टी आठवली.
उत्तर द्याहटवाAre wah!! I am liking that this post is giving nostalgia to everyone, even to people from outside of Malkapur.
हटवाThanks for the review.
Farach sunder. Balpanachya athvanit man ramun gele. Mahununch mahantat 'Lahan Pan Dega Deva'..
उत्तर द्याहटवाShirish Wadekar Pune
Kharach ahe. Pan he lahanpani kunalahi kalat nahi ki kiti sukhat ahet te. Dhanyawaad Sir.
हटवाआपण वर्णन केलेले कोकणातील सहज सुंदर बालपण सुदैवाने मलासुद्धा माझ्या बेळगांवात अनुभवायला मिळाले आहे.
उत्तर द्याहटवात्यामुळेही असेल कदाचित,
आणि भरीला आपलं सहज सुंदर लेखन..
खूपच भावलं आणि जवळचं वाटलं.
खरोखर वाचताना मज्जा येतेय..
बाकी आपली लेखणी चांगलीच सरावलीय आणि नाही म्हटलं तरी या कोरोनाग्रस्त दडपणयुक्त कालखंडात आपल्या लेखनातून अनोखा आनंद देत आहात त्याबद्दल मनापासून आभार ..
पुढच्या लेखाची वाट पहातोय..
आपणास पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा..
# अनिरुद्ध गायकवाड
अरे वा! खरंतर लांब आहे बेळगाव मलकापूरपासून, पण तरीही बालपणीच्या आठवणी तशाच आहेत हे ऐकून खूप छान वाटलं.. या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार!!
हटवाBalpanat help
उत्तर द्याहटवाखुपच छान 👌👌*उन्हाळी ची सुट्टी* पुढील लेख साठी खुप खुप शुभेच्छा 🌷🙏
उत्तर द्याहटवा