गो गो गोवा..

हात पाहावा मोडून !

हात पाहावा मोडून ! 

डिसेंबरचा शेवटचा आठवडा मस्त काढायचा असं ठरवलं, तशाही खूप रजा शिल्लक होत्या. मैत्रिणींसोबत पिकनिक ठरली, फक्त टवाळक्या करायला एक दिवस राखून ठेवला, वर्षाअखेरीच्या मस्त जेवणापर्यंत सगळं कसं छान ठरवून झालं आणि दृष्टच लागली जणू काही माझ्या स्वप्नाला.. एकोणीस डिसेंबरलाच ऑफिस मधून येताना मावळत्या सूर्याला नमस्कार घालत माझा डावा हात जायबंदी झाला. डॉक्टरांना दाखवले आणि hair-line fracture तासाभरात हात झोळीत जावून बसला की हो!

hair line fracture to my hand changed me as person

ही पडली तर दुखापत खांद्याला कशी? Frozen shoulder फक्त अनिल कुंबळे, सचिन वगैरे मातब्बर क्रिकेटर्स ना होतो मग हिला कसा झाला? कुठंही न खरचटता, एक थेंबही रक्त न येता फक्त खांदा कसा मोडला? हे प्रॅक्टिकल उजव्या हातानी करून आणि साष्टांग नमस्काराची ही कथा सांगून सांगून जिभेचं हाड मोडायची वेळ आली. ( पण मोडलं नाही.)

हां हां म्हणता बातमी वाऱ्यासारखी पसरली. ऑफिस मधील सहकारी, शेजारीपाजारी, नातेवाईक, मैत्रिणी पाहायला रीघ लागली. मी माहेरची ‘तारे’ असल्याने माझी नजर चालताना आकाशातच असते, बऱ्याच वेळा ओळखीचे लोक येऊन धडक देईपर्यंत मी तारेतच असते, लक्षच नसतं  समोर, वेंधळी कुठली..अशा साऱ्या प्रतिक्रिया आणि खाली,समोर बघून नीट चालण्याचे सल्ले मिळू लागले. 

प्रत्येक जण वेगवेगळी औषधे सुचवू लागला. डॉक्टरनी हात गळ्यात अडकवून “ बरं व्हायचं असेल तर हे स्लिंग काढायचं नाही, झोपतानाही तसंच ठेवायचं ” असा सज्जड दम दिला होता, तरीही  येणारी माणसं सांगत होती “ हात हलवा नाहीतर शिरा आखडतील, डॉक्टर काहीही सांगतात पैसे काढायला. ” काहींनी मला भरभर  चालायचा सल्ला दिला. हाताचा आणि पायाचा काही संबंध तरी होता का? एका सडपातळ मैत्रिणीने तर माझ्या वजनदार देहाकडे बघून सांगितलं की आता कमी खा, वजन वाढेल. नवऱ्याने तिची री ओढत जेवूच नको,फार तर नाचण्याची भाकरी खा, असा कटू सल्ला द्यायलाही कसूर केली नाही. मग मलाही जेवताना guilty feeling  येऊ लागली. काळजीत पडलेल्या माझ्या आईला नवऱ्याने “ तुमची लेक महिन्याभरात सोफ्यावर मावणार नाही, मोठं सिंहासन पाठवून द्या ” असं सांगून टाकलं. मैत्रिणी, शेजारी बघायला येऊन गप्पांचे फड रंगू लागले आणि रिकामटेकडी मी पण हळूहळू या  सक्तीच्या विश्रांतीत रुळू लागले. 

‘हात वर करणे’ शक्य नसल्याने माझी सेवा माझ्या बायका आपुलकीने करू लागल्या. पोळ्यांच्या मावशींनी पोटाची सगळी काळजी मिटवली, बाकीच्यांनी वेणीफणी सारख्या गोष्टी मध्ये खूपच मदत केली, जणुकाही मी महाराणी होते.

माहेरातून ‘इकडे ये’ असे निरोप आले. पण मला जाणे शक्य नसल्याने आईने खूप सारा पौष्टिक खाऊ आणि भावाने आयुर्वेदिक काढा पाठवला. झोपेतून उठताच मी तो काढा घ्यायचे आणि त्याची चव विसरायला पुन्हा एक डुलकी काढायचे. शेवटी नवऱ्याच्या ‘उठा आता, चहा झालाय’ या आरोळी नंतर उठावंच लागायचं आणि सगळ्यांच्या घाई-गडबडीत माझ्या दिवसाची शांत-निवांत सुरुवात व्हायची.

तरी या सगळ्यात मी स्वतःला नशीबवान समजत होते की हात डावा मोडलाय ते एक बरं  झालं, प्लास्टर नाही आहे त्यामुळे सगळं स्वतःचं स्वतःला करता येतं, खाता-पिता येतं आणि भरपूर बडबडपण करता येते त्यामुळे मी गोष्टीतल्या आनंदी कावळ्याचा आदर्श ठेऊन सगळ्यात आनंद शोधू लागले. येणारे काही लोक इतके भयानक अनुभव सांगत होते की दात, मनगट, गुढघ्याच्या वाट्या हे सगळं शाबूत आहे यासाठी मी देवाचे आभार मानत होते. एकाने तर डोक्यावर पडला असतात तर कोमातच कशा गेला असतात हे फिल्मी वर्णन सांगून माझं टेंशन वाढवलं. एकूण काय तर माझी हजेरी धडपडणाऱ्यांच्या यादीतून पडणाऱ्यांच्या यादीत गेली. 

एकदा पडलं की अवयव आंधळे होतात व माणूस परत परत पडतो हे ऐकून मी दूर आणि भरभर चालायचा मनोदय पुढे ढकलला. चालता चालता पडले तर घराच्या दारातच पडूदे या दूरदर्शी विचाराने अंगणातच चालत होते. असं हे हसरं दुःख, सहनही होत नव्हतं आणि सांगताही येत नव्हतं.

     मस्तपैकी गाणी ऐकावीत, लिहावं, वाचन करावं, टीव्ही पाहावा आणि वेळ सत्कारणी लावावा असं वाटत होता पण ते सगळं वेळापत्रकानुसार झालंच असं मात्र नाही. खूप वेळ हाताशी असल्याने आणि निद्रादेवी सदैव प्रसन्न असल्याने विश्रांती मात्र छान झाली. राहून राहून सारखं हे मात्र वाटत होता की अचानक हात बरा व्हावा, तो हवा तसा न दुखता वरखाली करून मी ‘उद्या ऑफिसला येतीये’ असा निरोप पाठवावा आणि कामावर तुटून पडावं. घरातल्या सगळ्यांना कामं कशी परफेक्टली करतात हे प्रॅक्टिकलसह दाखवून द्यावं. मग दुपारी एखादी मैत्रीण छानसा डबा घेऊन यायची आणि मी तो संपवत आणि बऱ्याच वर्षं राहिलेल्या निवांत गप्पा मारत माझ्या सक्तीच्या रजेचा आनंद घ्यायचे. एक मस्त विचार मनात असायचा की या माझ्या आवडत्या गोष्टी करायला मी hairline fracture ची वाट कशाला पाहिली ? 

माणसाला ब्रेक हवाच हा विचार करून नव्या दमाने पुढील कामाला लागायला आणि घ्या या covid-१९ ने परत एक ब्रेक दिला आणि मी लिहिण्याची आवड जोपासू लागले. आनंदी कावळा होऊन या लॉकडाऊन मध्ये कल्पनेला पंख लावायचे आणि मस्त आकाशात भरारी घ्यायची. मनात सारखे म्हणत राहायचे ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे!’

positive attitude in difficult times is crucial.

                                                                                                                                                                                                                                                                    - विजयश्री



टिप्पण्या

  1. छान जायु . सुरेख लिहितेस. तुझा मुळे मला माझा बालपणीच खूप आठवण झाली.माझा ही टाच सायकल मधे अडकून तुटली होती. तेंव्हा माझी काळजी घरचं एखद्या रानी सारखी घायाचे. असेच लिहित रहा.

    उत्तर द्याहटवा
  2. jgd. हाताची ही कथा व व्यथा प्रथमच वाचतोय, संकटाला दोन हात करणार्‍या जिद्दी मुलीला हे आव्हान पेलणार नाही कसं।"आंमंदी कावळा!गोष्टीतला उपयोगी आला,"हासत दुःखाचा केला मी स्वीकार। ओपिले चांदणे पिवूनन अंधार! पुनवेचे गीत अवसेच्या ओठी। आनंदयात्री मी आनंदयात्री' मंगेशपाडगावकरांचा बाणा असला की कोरोनाचा लाॅकडाउमही फुरसुतीमुळे संधी देवून जातो, तुझ्या जिद्दीला सलाम! (शेटे सर)

    उत्तर द्याहटवा
  3. लेख वाचला. आवडला. सिंहासनाचा टाँट मस्तच.

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच छान लिखाण. आता पुढील भाग वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे
    मंजू

    उत्तर द्याहटवा
  5. छानच..
    कोरोना वातावरणात माझ्या चेहऱ्यावर हसू फुटले..
    असेच लिहीत रहा.....

    उत्तर द्याहटवा
  6. कोरोना ची देणगी, एक लेखिका जन्माला येतेय.खूप अभिनंदन. स्वतःला व्यक्त करण्याची उत्तम पद्धत!!!

    उत्तर द्याहटवा
  7. खूप छान लिहिलंय तुम्ही मॅडम...खरच तर गप्पा मारल्यासारखे वाटते....असंच लिहित जा...

    उत्तर द्याहटवा
  8. Hello Kaku,

    Your writings showcase a great flavour of motivational attitude towards life in expressive and simple manner. Please continue to pen your thoughts.

    Also appreciate for cultivating this art of blogging and sharing your experiences and emotions with us.

    Take care! Stay safe! :)
    Ninad Kamat

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Hello Ninad,

      Thank you so much for reading my blog and writing such a beautiful and detailed review. These words of appreciation are definitely giving me motivation to write more.

      Hope you will continue visiting this blog for more posts.

      Stay home, Stay safe! :)

      हटवा
  9. फारच छान आठवण, आणि आता परत असे हाताचे 'तारे' तोडू नका,तुम्हाला ऑफिसला जायचे आहे, लिहायचे आहे,आपली लेखणी बहरत जावो ही शुभेच्छा ।।।।।

    उत्तर द्याहटवा
  10. Madam apli lekhani talwarisarkhi ashich talpat raho. Pudhil vatchalis hardik shubechha.

    उत्तर द्याहटवा
  11. खरचं तुमचा स्वभाव किती विनोद करण्याचा आहे हे लेखामध्ये ठायी ठायी जाणवते ,जसे की"हात मोडल्याची कथा सांगून जीभेचे हाड(नसलेले😃)मोडायची वेळ आली,माहेरची तारे असल्याने.....वेंधळी कुठली !"अशी वाक्यांनी मस्त मजा वाटली.लिहायची पद्धत खूप च छान ओघवती व विनोदी त्यामुळे प्रसंग साधेच पण कुठेच रटाळ होत नाही .मजा वाटली .👍🏻👌🏻
    मनिषा कुळकर्णी..दुबई

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -