गो गो गोवा..

... ते सुंदर दिन हरपले - Throwback to my childhood and primary school life in my village Malkapur, Maharashtra.

... ते सुंदर दिन हरपले


टण-टण-टण शाळेची घंटा वाजली की हातातला घास ताटात टाकून, बेंगरूळ स्कर्ट वर ओढत, दप्तराची पिशवी उचलून आम्ही शाळेकडे धूम ठोकत असू. केस विस्कटू नयेत म्हणून घट्ट आवळलेल्या दोन शिंगांसारख्या वेण्या, त्या दुमडून वर रिबिनीचं केलेलं फूल म्हणजे केशकलेचा परमोच्च बिंदूच जणू.👧 त्या काळी ५० पैशाला खाकी व २० पैशाला रोझ पावडरचा पुडा  मिळे, पण तो आणायलाही पालक कटकट करीत, ‘कशाला हवेत नाही ते नखरे?’ असा खडा सवाल असायचा. मग कोण आरशात पाहातो? कुणाच्याही घरी मोठा आरसा नसे, पारा उडालेले वीतभर आरसे, त्यात कसे बसे बायकांचे कुंकू लावून होई, आम्ही त्या आरशात बघण्याचा प्रश्नच नव्हता. आईने वेणी आवळली की पळा शाळेत. आत्ताच्या पालकांप्रमाणे आमचं कौतुक करायला वेळ कुठं होता त्या आयांना? बिचाऱ्या चुलीवर स्वयंपाक करून आणि सगळ्यांना खाऊ घालूनच दमून जायच्या. 

वास्तविक आपण मराठी माणसं पण आमच्या शाळेने कायम ‘स्कर्ट’ हा प्रकार का आमच्या माथी मारला हे त्या इंग्रजांना आणि शाळेलाच माहीत. तो स्कर्ट शिवायला एकाही टेलरचे ज्ञान पुरे पडत नसे. कधी चुण्या खाली-वर व्हायच्या, हुक तुटायचे, पोटाला तट्ट बसायचे, उंची कुठे कमी तर कुठे जास्ती. (परवा माझ्या मुलीने अगदी याच वर्णनाचा स्कर्ट ‘asmmetric skirt’ च्या नावाखाली भरमसाठ पैसे मोजून आणून माझ्या डोळ्याचे पारणे फेडले आहे.😣 जग गोल आहे शेवटी!😅 ) हा असला डिझायनर स्कर्ट शिवायला टेलर ३-४ महिने लावायचा. हेलपाटे मारून मारुन उंची वाढेल असं घरच्यांचं मत असायचं, म्हणून तो स्कर्ट कायम वाढत्या मापाचा असायचा. स्वातंत्र्य दिनाला त्याला कापड दिलं की तो युनिफॉर्म  प्रजासत्ताक दिनालाच आमच्या हाती पडे, तरीही आम्ही आनंदाने नाचायला लागायचो. आत्ताच्या मुलींचे छान सुटसुटीत युनिफॉर्म पहिले की आमचं ते ध्यान आठवून हसूच येतं.
माझे केस लांबलचक होते त्यामुळे आईलाच वेणी घालावी लागे. कामातून वेळ काढून ती ते आवडीने करत असे, पण तिची वेणी मला पसंत पडायची नाही. मी ती वेणी सोडून तिला परत घाल म्हणायचे. हे एक-दोनदा झालं की ती पाठीत धपाटा घालून ‘घाल तुझी वेणी तूच’ म्हणून ती कामाला निघून जाई. मग काय रडत रडत स्वतःची वेणी कशीबशी गुंडाळून मी शाळेत पळायचे. असं रडकं, न आवरलेलं आमचं ध्यान बाईंच्या नजरेला पडलं की ‘बावळट, जा घरी, तोंड धुवून ये’ अशी गुरु आज्ञा व्हायची. मी परत घरी येवून आवरून शाळा गाठायचे.शाळा अगदीच घराशेजारी होती म्हणूनच जमायचा हा वेडेपणा.
चौथीपर्यंत आम्हाला विद्या भिडे या अत्यंत तेजस्वी बाईंनी घडवले. गोरापान रंग, उंच बांधा, विद्वत्तेची साक्ष देणारे भव्य कपाळ, चष्म्याच्या आड लपलेले किंचित घारे भेदक डोळे, खणखणीत आवाज आणि करारी चेहेरा.त्यांची भेदक पण मिश्किल अशी नजर आठवली की अजूनही काहीतरी शिक्षा होणार अशी भीती वाटते. या बाईंनी आमची पिढी घडवली. त्या आमचा स्कॉलरशिपचा क्लास घेत, अगदी विनामूल्य. सकाळी सातच्या ठोक्याला क्लास सुरु होई. सगळे शिष्य त्यांच्या आयांनी ओरडून-आरडून उठवल्यावर कसेबसे तोंड धुवून वेळेत पोहोचायचे. मलकापूरच्या त्या थंडीत कसल्या अंघोळी आणि कसलं काय 🙊. बाई मात्र त्यापूर्वी उठून पूजा-अर्चा करून, छान तयार होऊन एखाद्या सरस्वतीप्रमाणे आम्हाला शिकवायला सुरुवात करीत. त्यांनी शिकवलं की डोक्यात कोरूनच जायचं; वाचन,अभ्यास काही नाही नंतर करायला लागायचा, इतका त्यांचा हातखंडा. एवढ्याश्या त्या खेड्यातून त्यांनी दरवर्षी ४-५ मुली ,अशा अनेक मुलींना स्कॉलरशिप मिळवून दिली. आजकालच्या गल्लेभरू क्लासेस मध्ये शिक्षणाविषयी तेवढी तळमळ आणि आत्मीयता शोधुनही सापडणार नाही.
Marathi blog about girl's education in rural India, Malkapur, Shahuwadi, Kolhapur, Maharashtra. Conditions were not exactly favourable and poverty was all over. Still I managed to take interest in school and became a working and earning woman eventually.
This little girl is me, accepting scholarship certificate from then education minister - Madhukarrao Choudhari and Padmashri Ratnappa Kumbhar. 
त्या काळात सगळ्यांचे वडील संसाराचा गाडा ओढून वैतागलेले असत आणि आयांचा दिवस रांधा-वाढा-उष्टी काढा मध्येच संपे, त्यामुळे या इतक्या गुणी शिक्षकांचे कौतुक करायला कुठल्याही पालकांना जमले नाही. पोरांचं कौतुक हा तर अगदी दूरचा प्रश्न, कारण कौतुक केले की पोरं शेफारतात असे गैरसमज सगळ्यांच्या डोक्यात! 😅 त्यामुळे गुरु आणि शिष्या दुर्लक्षितच राहिल्या.
Girl education in rural India. A village in state of Maharashtra, Malakapur malkapur. Finding a silver lining in those clouds of childhood.
My Primary School - Kanya Vidya Mandir, Malakapur. 
 शाळेची इमारत समोरुन बरी दिसते, पण आमचा वर्ग म्हणजे मागची बाजू होती, ती बरीचशी दुर्लक्षित. आमचा वर्ग म्हणजे पूर्वीचा जनावरांचा कोंडवाडा होता. वरती खापऱ्यांचे छप्पर खाली सारवलेली खडबडीत जमीन आणि एकुलती एक खिडकी. पावसाळ्यात वरून पाण्याचा अभिषेक सुरु व्हायचा.१५ बाय ४० च्या त्या हॉल मध्ये आम्ही चौथीपर्यंत शिकलो. घरी तक्रार करावी तर पालक ‘गप्प शिका, नाटक नको’ म्हणायचे. ‘पाणी डोक्यावर गळत असतं’ असं सांगितलं तरी ‘गळू दे, मोड येतात का? दिवसभर भिजतच असता की’ असं बोलून दाखवायचे. हे मात्र खरं की आमच्याकडे छत्री नसल्याने आमचं पावसात सारखं नाचकाम सुरूच असायचं. चुकूनही कोणी पालक काहीही विचारायला शाळेत येत नसत, PTO चा तर प्रश्नच नाही. आताच्या नाजूक मुलांना अशा शाळेत घातलं असतं का आपण? आमचे पालक मुलं कोंडवाड्यात कोंडली तरी शांतच होते, कारण आपली मुलं मास्तरांनी धोपटायच्याच लायकीचीच आहेत गोड बोलून काही उपयोग नाही असा त्यांचं पक्कं मत होतं 😋. आम्हाला मात्र बाईंनी कधीच मारले नाही. नजरेची जरब इतकी की छडी हाती घ्यावीच लागली नाही त्यांना!
शाळेतल्या मुली म्हणजे तर एकाहून एक नमुने. उगीच रस्त्यावर घासून पाटीवरच्या पेन्सिलींना टोक करत बसणे आणि रस्ते पांढरे करून ठेवणे हा उद्योग दिवसभर प्रत्येक सुट्टीत चाले. चिंचोके नाकात घालणे, पट्टी घशात घालणे आणि अगदी डॉक्टरांकडे पळवण्याएवढी वेळ आणणे अशा नाना तऱ्हा.
त्या काळी लांब केसांचं फार कौतुक. त्यामुळे केस लांब व्हावेत म्हणून मुली विविध उपाय करायच्या. त्यातला एक म्हणजे रस्त्यावर डोळे मिटून रवंथ करणाऱ्या गोमातेला नमस्कार करून तिचे शेपूट डोक्यावरून फिरवणे. काहीवेळा ती गोमाता शांत असे पण काही वेळा त्या मुलींना लत्ता-प्रहाराचा प्रसादही देई. तिच्या कृपेने किती मुलींचे केस लांब झाले हे ती गोमाताच जाणे! 😆
आमच्या वर्गात एक श्रीमंत उच्चभ्रू डॉक्टरची सुंदर मुलगी होती. खूपच लाडाकोडात वाढलेली राजकन्याच जणू! पण भित्री एवढी की बाईंनी छडी आपटली आणि ही लागली रडायला. तिला शाळेचे न्हाणीघर आवडत नसावे त्यामुळे दुपारी बऱ्याचदा तिचे कपडे ओले होत. तिच्या मागे बसणाऱ्या मुली तिच्यावर नजर ठेऊन असत त्यामुळे ती बातमी त्वरेने बाईंना दिली जाई. बाई तिला काही रागवत नसत फक्त आमच्यातील दोघी-तिघीना तिचं ऍल्युमिनिअमची पेटीसारखं दप्तर  घेऊन तिला घरी पोहोचवायला सांगायच्या. पुढे इंग्लंडच्या राणीसारखा स्कर्ट चिमटीत धरून चालणारी ती आणि मागे तिची पेटी घेऊन मागे-मागे चालणारा आमचा लवाजमा असे खिदळत खिदळत तिला घरी पोहोचवायचो 😂. आमची कापडी पिशव्यांची दप्तरं असल्याने तिची ती पेटी घेऊन ऐटीत चालण्यात आम्हाला आनंदच असायचा. आमच्या प्रेमळ मातांनी  आम्हाला सरळ फोडूनच काढलं असतं, पण इथे जाहिरातीतली मॉडर्न गोड मम्मी दिसायची जी तिला प्रेमाने घरात घ्यायची आणि आम्हाला तिला नीट घरी सोडल्याबद्दल लिमलेटच्या गोळ्या द्यायची. हा कार्यक्रम खंडाखंडाने तिसरीपर्यंत सुरु होता. मग ती राजकन्या सुधारली आणि आम्ही त्या वरातीला मुकलो 😐. 
अशा या मलकापूरी शाळेत आम्ही आयुष्याचे सगळे धडे गिरवले, छड्या खाल्ल्या आणि बक्षिसं पण मिळवली. अजूनही आम्हाला बाईंविषयी जाज्वल्य अभिमान आहे. त्यांना माझी नोकरी सुरु झाल्यावर तरी समक्ष भेटून, न घाबरता त्यांचं श्रेय द्यावं असा विचार सुरु होता पण कृतीत येण्यापूर्वीच त्या अचानक अनंतात विलीन झाल्या. राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या भिडेबाईंनी आयुष्यभर फक्त आणि फक्त निष्काम कर्म केले,आम्हाला घडविण्याचे, ते ही कसली अपेक्षा न करता! सरस्वतीच्या त्या रुपाला माझे शतशः वंदन. 👏👏
आता हे सगळं आठवताना आम्ही आमच्या गबाळ्या स्कर्टमध्ये सुखीच होतो.धपाटे देणाऱ्या आईबरोबरही आनंदी होतो हेच आठवते. आमच्या आईची कधीच मम्मी झाली नाही आणि मलकापूरच्या शाळकरी मुलींचा स्कर्टही अजूनही तस्साच दिसतो. गळके छप्पर, ओल्या भिंती असलेल्या त्या ज्ञानमंदिरातले दिवस आठवून अजूनही मनात मी हेच म्हणते की - आहा….  ते सुंदर दिन हरपले! ❤ Rural India, girl education, primary school, poverty, malkapur, shahuwadi, kolhapur, maharashtra, beti bachao beti padhao, village life, villege girl

                                                                                                                                             - विजयश्री

टिप्पण्या

  1. सुंदर प्रयत्न आहे, प्रयत्न असाच चालू ठेवा. 👍

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. jgd.शब्दांच्या मोरपिसी रंगाने रंगवलेले हरवलेले बालपण व हळव्या शाळकरी आठवणी मनाला स्पर्शून जाणार्‍या! छान आहे उपक्रम! पुनंप्रत्ययाचा आनंद! क्षणभर वर्तमानातून भूतकालीन स्वप्नाॅच्या दुनियेत भरारी. भिडे बाईंती ह्रद्य स्मृती. व खट्राळ प्रसंग! सारे कसे भावणारे!

      हटवा
  3. Madam..... Khup Chhan.... Lahanpaniche photo japun thevle aahet ki kay? Khup Khup SHUBHECHHA.... Keep it up.

    उत्तर द्याहटवा
  4. छानच, परवा शेअर केलेल्या माहेर हया कवितेला आपला स्वर होता काय?

    उत्तर द्याहटवा
  5. अप्रतिम लिहिलंय.. असंच लिहीत राहा👍👍👍

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान लिहिले आहेस जयू. तंतोतंत डोळ्यासमोर उभे रहाते.असेच लिहीत रहा.तुझ्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  7. व्वा.. खूप छान लिहिलंय..
    आपणांस मनापासून शुभेच्छा..

    उत्तर द्याहटवा
  8. आता जाणवतय ही पोरगी किती द्वाड झालीया.

    उत्तर द्याहटवा
  9. सुंदर वर्णन...लहानपणीच्या शाळेतल्या गमती जमती मस्तच. ...

    उत्तर द्याहटवा
  10. सुंदर शब्दात अचूक व अप्रतिम वर्णन केलत. लेख प्रवाही झालाय. मस्त. असेच लिहीत रहा.

    उत्तर द्याहटवा
  11. खरच खुप छान लेख, शाळेतील लहानपणी आठवणी या लेखातून जागृत झाल्या. तुम्हाला खुप खुप धन्यवाद आजकाल अशा प्रकारचे वास्तववादी लेख वाचायलाही मिळत नाहीत. दिवसांचे शालेय खुप अप्रतिम वर्णन तुम्ही या लेखातून केले आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  12. Is remind myself .my school days at Indapur, disregard. Pune. Very lucid language and excellent narration. Belated Happy Birthday to you and waiting for your next Blog. All the Best!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you so much!! I am glad people who are not from Malkapur are also finding it relatable. Keep on reading and do not forget to write reviews. :)

      हटवा
  13. S P chougale
    जयश्री,इतके वास्तववादी लिखाण की ती शाळा,ती मुले आणि त्या भिडे मॅडम नजरेसमोर उभा राहतात,अंतःकरणाला भिडणारे लेखन,keep it up।।।

    उत्तर द्याहटवा
  14. मॅडम आपले लिखाण अत्यंत सुरेख सर्वांना त्या काळातील शालेय जीवनाची आठवण करून देणारे आहे. त्याच बरोबर आपल्या निरीक्षण व स्मरण शक्ती व विनोद बुद्धी यास दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. असेच लिहित रहा .

    उत्तर द्याहटवा
  15. Phar chhan madam,shaletil lahanpanachi goshta hubehub varnan kele ahat.asech ithunpudhe lihit raha,mazyakadun pudhil vatchalis hardik shubhechha.

    उत्तर द्याहटवा
  16. तू फार श्रीमंत आहेस..इतके चंगली लोक तुलाच कसे भेटले,मला मलकापूर्ला जावे अस् वाटायला लागले आहे
    R.S.patil

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -