गो गो गोवा..

आमचे नाटक : 'एकच प्याला' - भाग एक



Ekach pyala. marathi drama written by R. G. Gadkari in 1917.


१९१७  साली  राम गणेश गडकरींनी 'एकच प्याला'  नाटक लिहिले. शंभरवर्षा पूर्वी पहिला प्रयोग झाला. दारुच्या  व्यसनापायी सुधाकर या विद्वान वकिलाच्या सुखी संसाराची कशी  धुळधाण झाली, सिंधूचे किती हाल झाले.. हे अतिशय प्रभावीपणे मनावर बिंबविले आहे. नाटक बघून तरी लोकानी या व्यसनापासून दूर रहावे म्हणून कळकळीचा संदेश दिला आहे.. हे नाटक बालगंधर्वांच्या अभिनयाने नटले..लोकानी डोक्यावर घेतले,अनेक वर्षे  गाजत राहिले ..पाहताना बायका अक्षरशः ओक्साबोक्षी रडत… असे हे अजरामर नाटक 'एकच प्याला'.चाळीस वर्षापूर्वी आम्ही शाळेत असताना याचा एक प्रवेश सादर करायचे केवढे मोट्ठे धाडस केले होते...याची ही अगदी मज्जेशीर कहाणी... 


पहिला भाग -


मलकापूर तसं कलासक्त गाव, मेळा असो, तमाशा असो, सिनेमा असो वा नाटक असो, सगळ्याला भरभरून दाद देणारंच!  रसीकपणे मनसोक्त आनंद घेणार आणि आला दिवस मजेतच घालवणार. हिरवाईनं वेढलेलं असल्यामुळे हिरवटपणा गावाच्या अगदी अंगा-अंगात मुरला आहे. वेगवेगळ्या स्पर्धा, प्रदर्शनं आणि कार्यक्रम कायम सुरूच असतात. रांगोळी, पाककला, गायन, नाटक सगळ्याचे परीक्षक मात्र कायमचे ठरलेले असतात. त्यांना ओ का ठो न का कळेना पण प्रतिष्ठितांची हजेरी आवर्जून असतेच. बालवाडीच्या बक्षीस समारंभापासून ते बारावीच्या बक्षीस समारंभापर्यंत हजेरी लावणार. महिलांच्या फुगडी,उखाणा स्पर्धा असली तरीही हे सन्माननीय पाहुणे निमंत्रीत असणारच. अशी ही  ४० वर्षांपासूनची परंपरा अजूनही  सुरु  आहे.


मलकापूरमध्ये रयत शिक्षण संस्थेची मुलांची आणि मुलींची शाळा वेगळी आहे. पण सगळ्या स्पर्धा, स्नेह संमेलन असे कार्यक्रम एकत्र पटांगणावर साजरे होतात. या कार्यक्रमांना सगळं गाव मनोरंजनासाठी झाडून हजेरी लावतं. आम्ही दहावीत गेलो तेंव्हा दरवर्षी तेच तेच कार्यक्रम नाच गाणी बसवून कंटाळलेल्या आमच्या शिक्षकांनी स्नेहसंमेलनासाठी मुलींचे मस्त नाटक बसवण्याचा निर्णय घेतला. नाटके चाळून चाळून ‘एकच प्याला’ या गडकरींच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृतीचा प्रवेश बसवायचे असे  नक्की केले. एका शुभ सकाळी आमच्या वर्गात येऊन पात्रांची निवडपण करून टाकली. खणखणीत आवाजाच्या, कायमच ठसक्यात बोलणार्या ढालगज सखीला (रंजना सणगर-गोंजारी) गीताची भूमिका दिली, एका सोशिक, सोज्वळ दिसणार्या शांत सखीला (सुनिता कुलकर्णी) सिंधू केले आणि उंच, बुलंद आवाजाची मी म्हणून मला सुधाकर करून टाकले! ( मी कुठल्या कोनातून सुधाकर दिसले ते देवच जाणे !) गुरुआज्ञाच ती, आम्ही लगेच आमचे शिरकमल गुरूंच्या पायावर झुकवले. इथे आम्हाला अभिनय कशाशी खातात माहीत नाही, प्रेक्षकांसमोर तोंड उघडून बोलता येईल का माहीत नाही आणि निघालो शिव धनुष्य उचलायला !


दहावीचे महत्वाचे वर्ष आहे, अभ्यास केला पाहिजे, वेळ असा वाया घालवून चालणार नाही, मार्क्स कमी पडतील असे शुल्लक विचार आमच्या बालमनाला मुळीच शिवले नाहीत. मला तर पुरुष पात्र करायला मिळणार म्हणून कोण आनंद झालेला, घरी नाचत जाऊन मी बातमी सांगितली. आमचे पालक दिव्य होते. मुलांचे काय उद्योग चाललेत यात फार लक्ष घालत नसत आणि काही आगाऊपणा केला तर नाठाळ मुलाना गुरुजन काहिही करुन सरळ करून घेतील ही खात्रीच होती त्यांना. त्यामुळे आदरणीय गुरूंनी मुलांना पटांगणावर  धाडावे की रणांगणावर हे सर्वस्वी गुरुजन ठरवत. पालक अवाक्षर न काढता मूक संमती देत. बोर्डाच्या परीक्षेचे ओझे गुरुजनांच्या शिरावर टाकून, पालक अंग झटकून केंव्हाच मोकळे झालेले होते. त्यामुळे तालीम करताना अभ्यास बुडेल असा क्षूद्रातीक्षूद्र फालतू विचार करण्याचे  कष्ट आमच्या आदर्श पालकांनी  मुळीच केले नाहीत.  


पात्र निवड पार पडल्यावर नाटकाचा एक अंक शाळेत आम्हाला तिघींना वाचायला दिला. आमची रवानगी अभिनय शिकण्यासाठी मार्तंड मिरजकर सर या आमच्या शाळेच्या निवृत्त शिक्षकांकडे केली. मिरजकर सरांची नेमणूक दिग्दर्शक म्हणून झाली आणि त्यांनी आवडीने  नेपथ्यकार, संगीतकार अशा सगळ्या जबाबदाऱ्याही आपणहून स्वखुशीने  अंगावर  घेतल्या. सरांनी आम्हाला पूर्ण नाटक नीट वाचायला लावले. मलातर सिंधूवरचा अन्याय बघून भडभडून आलं आणि तो दारूडा, बायकोचा त्रास देऊन तिचा अंत बघणारा नवरा मी साकारायचा आहे??? याचा विचार करून करून पायाखालची जमीनच सरकली. हळूच ‘नाटक बद्लूया का, सर’ असेही विचारले. त्यावर.."पुढच्या शंभर वर्षात होणार नाही असे हे नाटक आहे..अकलेचे तारे तोडू नकोस", सर सानुनासीक स्वरात ओरडले....काय बोलणार पुढे? सरानी आमची तोंडेच बंद करून टाकली. मग काय करायचं दारुड्याचे तर दारुड्याचे करायचे नाटक, पदरी पडले आणि पवित्र झाले, असेल चांगले नाटक, अशी मनाची समजूत काढली. गारुड्याने हळूहळू पहिल्यांदा विंचू, मग  दात काढलेले बिनविषारी साप आणि शेवटी अस्सल फडीचा नाग बाहेर काढावा तसं सर पण रोज एक एक नवीन टास्क आम्हाला देत होते ‘हे झालंच पाहिजे, ते असायलाच पाहीजे, हे आणा, ते आणा’ म्हणून पोतडीतून भूमिकेसाठी  गरजेच्या   नवनवीन वस्तूंची यादी  बाहेर काढू  लागले. 


Ekach pyala is about how alcohol addiction ended up in destroying life of a family.

सगळ्यात आधी सुरुवात एका झकास नांदीने करायची ठरली. आमच्या ‘सत्य वदे वचनाला नाथा’ साठी सरांकडे पेटी नव्हती. गावात एकुलती एक पेटी काटे मास्तरांची, ती आणायला आम्हाला तिघींना पिटाळण्यात आले. काटे मास्तर पेटी द्यायला तयार झाले पण ‘खोक्यासकट न्या’ म्हणाले. धरायला काहीच नाही मग न्यायची कशी? शेवटी आम्हीच तोडगा काढला आणि ठरवले की प्रत्येकीने थोडे-थोडे अंतर ती अनमोल पेटी डोक्यावर घ्यायची आणि तिला मिरजकर सरांकडे न्यायची. तिन्हीसांजेची वेळ, रस्त्यावर लागलेले पिवळे मंद दिवे, मागे येणारी भुंकणारी कुत्री आणि आमचे उद्योग बघून दारात बसलेली हसणारी माणसे असा हलता देखावा सुरू झाला. पेटीला जिवापाड सांभाळत, आम्ही एकीच्या डोक्यावर ती पेटी आणि तिच्या दोन्ही बाजूला भालदार-चोपदारासारख्या उरलेल्या दोघी असे करत निघालो. पेटी डोक्यावर घेतलेली तर हसूच शकत नव्हती, उरलेल्या दोघी मात्र खदाखदा हसत तिच्या बरोबर चाललेल्या… पेटीचे ओझे घेतलेली बिचारी कशीबशी ओरडायची ‘हसू नका गsssमाला ही हसू येतंयsss पेटी पडेल गं sss,’. मलकापूरच्या लोकांना चौकशा फार लागतात….त्यामुळे जागोजागी आम्हाला हटकून 'कुठे चाललात गं पोरीनो'….ला उत्तरे देत अनेक वेळा थांबून काय चाललंय हे सांगत, आमची पेटी-यात्रा साग्रसंगीत चाललेली. शेवटी एकदाचे सरांचे घर गाठले, पेटी खाली ठेवली, मनसोक्त हसून घेतले आणि आमच्या पदाची सुरुवात झाली. सत्यवदे sss वचनाला sss नाथा sss. 


मिरजकर सर असे काही पट्टीचे, मुरलेले, व्यावसायिक अभिनेते नव्हते पण त्यांचे संवादफेक आणि अभिनय कौशल्य बघून आम्ही अवाकच झालो! किंचीत सानुनासिक पण स्पष्ट स्वर, पांढर्या शुभ्र भुवया उडवून झरझर बदलणारे त्यांच्या चेहर्यावरचे हावभाव आजही नजरेसमोरून हलत नाहीत. कुणी कुठे थांबायचे, किती पावले चालायचे पासून स्वर कसा लागला पाहिजे हे अगदी घोटवून घेतले. ‘जेवली नाहीस का आज? येऊ दे की जरा आवाज!’ अशा सूचना वर सूचना. सिंधूचे गोड सौम्य बोलणे, गीताचे खड्या आवाजात सिंधूला सुनावणे आणि सुधाकरचे कधी जीभ लडखडत तर कधी करूण स्वरात सिंधूची गयवया करणे, सगळ्या छटा सरानी इतक्या सुंदर दाखवल्या की कसलेल्या अभिनेत्याने पायच धरावेत. आम्हीही त्याना शरण गेलो. नंतर आम्ही न लाजता चांगल्या खणखणीत आवाजात तालीम करू लागलो. शाळा सुटल्यावर सहा ते आठ आमची तालीम असायची सरांच्या घरी. सर इतके उत्साही की आम्हाला तालीम बास करावी असे एकदाही वाटले नाही. अभिनयाच्या सम्राटाला लाजवतील इतका सुंदर अभिनय पहायचे, ते क्षण अनुभवले हे आमचे भाग्यच. सिंधूचा मवाळपणा आणि गीताचा जहालपणा त्यांनी स्वराच्या चढ-उतारातून शिकवला. आमच्या इतक्या तालमी झाल्या की मी झोपेतपण ‘सिंधू, आजपासून मी दारू सोडलीsssसोडलीsss’ असे बरळू लागले. सरांचा अभिनय डोळ्यासमोर येऊन उठून बसू लागले. आता हळूहळू मनावर त्या दारुड्या भूमिकेचे गारूड बसले.. कसे जमणार... दडपण येऊ लागले. भावंडांनी माझे वेडे चाळे बघून  हसायला, चिडवाचिडवी करायला सुरु केली.


नाटकाचा दिवस जवळ येऊ लागला, धडधड वाढू लागली. सिंधू आणि गीता झालेल्या मुली साड्या नेसायला मिळणार, मेकअप मुळे आपण अगदी सुंदर दिसणार म्हणून खुष होत्या. मी छान वकिली शर्ट-पॅन्ट-काळा कोट घालायला मिळेल म्हणून आनंदे नाचत होते. मग सरांनी आम्हाला आमची वेशभूषा कशी हवी ते सांगीतले. सुधाकरला धोतर, सदरा,टोपी आणि काळा ढगळा कोट, गीताला घरकामवाली म्हणून जुनी पुराणी साडी आणि अठराविश्वे दारिद्र्याने होरपळलेल्या सिंधूला तर ठिगळे लावलेली जुनाट साडी! सरांनी आमची हवाच काढली...आमचे चेहेरे खाड्कन उतरले. हे असलं घालून स्टेजवर जायचं? अगोsssबाई काय म्हणतील सगळे? नाटकात काम करणार आणि काहीच ग्लॅमर नाही? आम्ही रडकुंडीला आलो. “सर पँट-शर्ट घालू का, हल्ली घालतात सगळे वकील, कुठं कोण  धोतर नेसतो?” “ सर जरा बरी साडी नेसून करू का?”.....यावर “अगंss त्या बालगंधर्वांना भरजरी शालू नाही… जुनी वल्कलं नेसायला लावेन असा विडा उचलला होता गडकरींनी, हे नाटक वाचून गंधर्व म्हणाले या सिंधूच्या भूमिकेसाठी मी गोणपाट नेसायला पण  तयार आहे... माहिती आहे का तुम्हाला? आता मी सांगतो ते कपडे घालायचे चुपचाप.” सर आमच्या वर  जोरात कडाडले.. “मुळीच घालायचे नाहीत चांगले कपडे. ” या गुरुआज्ञेवर आम्ही गुमान फाटक्या लुगड्यांच्या आणि धोतराचं पान, कोट टोपीच्या जुळणीला लागलो. रोज सराना कपडे नेऊन दाखवू लागलो. त्या जुनाट कपड्यांमध्येही सरांची व्यवस्थित छाननी सुरूच. घरचे, मैत्रिणी आणि शेजारचे पाजारचे आम्हाला कुठून कुठून  कपडे आणून  देत होते आणि शेवटी ते काही सरांच्या पसंतीला येत नव्हते. अथक प्रयत्नानी कसे बसे सरानी कपडे पसंत केले. ती सुंदर वस्त्रे लेऊन आम्ही पेटीसह, खड्या आवाजात रंगीत तालीम सादर केली. शाळेतले शिक्षक आले होते. सरांनी पंधरा-वीस दिवसांत आम्हाला सगळ्याना अचंबीत  करणारा अभिनय शिकवला होता… आणि आम्ही अग्नीपरीक्षा देण्यासाठी सिद्ध झालो…  दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागलो….. आणि तो दिवस उजाडला…….




…आमचा जगावेगळा भन्नाट अनुभव

नक्की वाचा पुढच्या भागात….



©विजयश्री  तारे-जोशी

3.6.2020


टिप्पण्या

  1. खूप छान, नाटकाची सर्व तालीम जशीच्या तशी नजरेसमोर उभा राहिला.रम्य ते दिवस, रम्य त्या आठवणी,मलकापूरची शाळा म्हणजे एक व्यक्तिमत्त्व घडवणारे विद्यापीठाच म्हणावे लागेल. Keep it up-एस पी चौगले

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान👌👌👌.
    पुढचा भाग(नाटक) वाचायला आम्ही उत्सुक आहोत👍

    उत्तर द्याहटवा
  3. छान धमाल असणार, पुढील भागाची उत्कंठा ..

    उत्तर द्याहटवा
  4. वा एकदम सुंदर सादरीकरण.
    साक्षात मिरज कर्सर डोळ्यासमोर उभे राहिले.

    उत्तर द्याहटवा
  5. 1985 मध्ये केशवराव भोसले नाट्यगृहात पाहिलेले नाटक जशास तसे उभे राहिले

    उत्तर द्याहटवा
  6. वा! एकदम सुरेख लेखन आणि उत्कंठा वर्धक शेवट. असा की कधी एकदा पुढचे वर्णन वाचतो असे झालेय मला. आता बाकी तुम्ही बर्यापैकी लेखिका शोभून दिसायला लागलायत हं !

    उत्तर द्याहटवा
  7. Mirajkar sir ani aapla to harmonium dokya varun gheun janyacha prasang dolya samor ....ubha raahila..
    Sudhakar,Sindhu, Geeta yanchya acting la malkapur vasiyani dileli daad aathavun khup aanand zala..

    उत्तर द्याहटवा
  8. Tu za sudhakar ani maze Geetacha role ani apli salas sunita sindhu sarv athoun khup anand zala

    उत्तर द्याहटवा
  9. jgd. अंगी असाव्या नाना कळा(कला)हे समर्थ वटन माहित आहे.पण ही नाटकी कळा तुझ्या अंगी संचारते व मुरलेली आहे,हे आज आकळले, त्या "एकच प्याल्याचे" तुझ्या प्रयोगाला मी नव्हतो. नाही तर अंगात संचारलेला (नाटकी)सुधाकर जयश्रीला कसा झोकांड्या खायला लावतोय ते याचि डोळा
    पाहिले असते. असो! एक अभिनय मेजवानी हुकली.ती ज्यू.काॅलेजात दिसली नाही. बिनधास्त पण एक सरळ हुषार मुलगी मला दिसली.शाळेतही व शेजारी वावरताना! तुझा सुधाकर कसा होता ,ही कल्पना करावी लागतेय. मर्दानी पण नशाधूंद आवेशात 'जयश्री' कशी अवतरली असेल,हे कल्यनेतच गरगर फिरवणारे आहे. "अकलेचे तारे तोडू नकोस" असे "तारेला"(जयश्री) मिरजकर सर म्हणाले हे नवलच! बाकी मलकापूर रसिक व कलासक्त हे माहित आहे."कलाकुंज" नाटक मंडळी मलकापूरी होती, मगदूम सर, भाई
    गांगण या सोबत मी या नाट्य शोकिनाशी नागडीत होतो, कोकणचे नाट्यवेड आंबा घाटाचे अलीकडे मलकापूर शीवे पातुर आहेच. शेवटी तू ही
    "एकच प्याला" (कल्पित)घेतलास. मराठीत शेक्सपियरच्या तोडीचे नाटक नाही
    असे म्हणणार्‍या एका समीक्षकास अत्रे खवचटपणे म्हणाले की त्याचे हाती
    "एकच प्याला" नसावा! अजरामर नाटक पाहूनही अजून "एकच प्याला" मर्‍हाटी जनतेते खाली ठेवला नाही. अत्रेच्या मते ."othello"या नाटकातील "वन मोअर ग्लास" या संवादाचा पडसाद गडकर्‍याच्या "एकच प्यालाचे" टायटलवर आहे. ड्रेपरी च्या शोध मोहिमा, बाजाच्या पेटीची गाव मिरवणूक , तालमीची रंगत सारे बोलके आहे. तुझ्याही
    अंगात ललित लेखनाइतकी रंगदेवता रंगलेली दिसते,हा एक वेगळा रंग दिसला. आता पडदा पडल्यावर पुढे काय?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Rangadevata kahi parat nahi disali mala, pan ek sundar anubhav mhanun yachyakade nakki baghte mi. Anek dhanyawaad Sir. Asech ashirvaad rahudet pathishi.

      हटवा
  10. Ekach Pyalaa.My all time favorite Play. Very egar to read next part of your article. All the best. Regards. Shirish Wadekar

    उत्तर द्याहटवा
  11. छानच लिहिले आहेस नेहमीप्रमाणे, सर्व व्यवस्थित , तपशीलवार,विनोदी ढंगाने जाणारे. पुढील भाग याहून छान असेल.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -