- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
"आमच्या वेळी नव्हतं हो असं..कशाला लागती ती प्रायव्हसी?" असा खडा प्रश्न एखाद्या नवदांपत्यास करणाऱ्या शंभरीतल्या आजे सासूबाई अजूनही सापडतील तिथे.."आम्हाला नाहीत का झाली मुले बाळे? मस्त डझनभर वेळा हलवलाय हो ss पाळणा...ही असली काही थेरं नाहीत केली आम्हीss.." अशीही पुस्ती सडतोड पणे ऐकवीत त्त्यांना. मग ते नवे जोडपे असल्या उघड्या सार्वजनिक संसाराची सुरुवात अगदी अवघलेल्या परिस्थितीत करत असे. काही दिवसात जोडी हळू हळू या खुल्लम खुल्ला संसारात रूळू लागे. वर्षभरात कुटुंब वाढले की आपोआप प्रायव्हसी हा शब्द स्वत:ला फॉरवर्ड समजणाऱ्या या लोकांच्या डिक्शनरी मधून नकळत गायब होई. मग घरातली जुनी खोडं.. आता काय ही गाडी रूळ सोडून जाणार नाही म्हणून नि:श्वास टाकून निवांतपणे जप-माळ ओढायला बसत. ( एक डोळा नात सुनेवर ठेवून ! 😉)
असलं खाजगी आयुष्य सगळ्यांच्या आयुष्यातून हद्दपार केलेलं एक गाव म्हणजे मलकापूर. एक मुख्य कायम गजबजलेला बाजारपेठेचा रस्ता आणि त्याला फुटलेले छोटे छोटे बोळ असे रूपडे लाभलेले हे छोटेखानी गाव. डोंगराच्या कुशीत दडलेलं आणि नदीच्या प्रवाहाने वेढलेलं हे नितांतसुंदर गाव कुणालाही मोहात पाडतं. पावसाचा तडाखा आणि थंडीचा कडाका सोसत लोक आपला आब राखून आहेत.एकमेकांकडे तोंड करून बसलेली कौलारू बैठी घरं, घराला एक सोपा, माजघर, स्वयंपाकघर, मागे गोठा किंवा अंगण आणि काही श्रीमंत लोकांच्या चढवलेल्या माड्या हे साधारण सगळ्या घरांचं वर्णन. माडी चढवणे म्हणजे वास्तू विशारदाचे कौशल्य पणाला लावणारे काम असे. शेजारी माडीची खिडकी आली... तर परत तिथूनही 'प्रायव्हसी' लाजून पलायन करे. घरं रेल्वेच्या डब्यासारखी, या खोलीतून त्या खोलीत जायचं. उगीच वळणं नाहीत की कसला आडोसा नाही सरळ सोट. कुणीही प्रवेश करतांच हाका मारत थेट स्वयंपाकघरात घुसावे!😃 कुठेही मज्जाव नाही. एकदा तर एक श्वान महाराज थेट आमच्या स्वयंपाकघरात आले…. आमच्या मातेने केलेलया गरम पोळ्या घेऊन पळून गेले! तिथे कुत्रे सुद्धा तुमच्या प्रायव्हसीला भिक घालत नाही…😅
या घरांनी ‘प्रायव्हसी’ हा शब्दच कधी ऐकला नाही आणि कुणीही ती नाही म्हणून कंठशोष केलेला ऐकिवात नाही. नवरा-बायकोचं भांडणही इथे प्रायव्हेट समजले जात नाही. शेजारी, पादचारी कुणीही अगदी खुशाल ऐकावं आणि हे नेहमीचेच आहे असे म्हणत पुढे जावे. 😀😀अस्सल भांडकुदळ घरातून जर शांतता नांदू लागली तर वेळ, दिवस सत्कारणी लागला असे शेजाऱ्यांना वाटत नाही. अगदी चुकल्या चुकल्या सारखं वाटायला लागतं. शेजारी कधी शेंडीत राख घालून वात्रट पोराला बदडणार्या बापाकडून पोराची सुटका करायला धावतात, तर कधी रडणाऱ्या बाळराजाला बोलवून खाऊ-पिऊ घालून गप्प करतात. रात्रीची जेवणं आवरून सगळ्यांनी दारात बसून निद्रादेवी प्रसन्न होईपर्यंत जांभया देत देत तोंड थके पर्यंत गप्पा माराव्यात. कुणीही नवर्याचे, सासूचे, नणंदेचे कारनामे पु लं म्हणतात तसे फर्लांगभर ऐकू जातील इतक्या नाजूक आवाजात कुणालाही सांगाव्यात आणि आपलं भरलेलं मन मोकळं करून घ्यावं. ऐकणारीने अशावेळी फक्त मान डोलवत रहावे, मध्ये बोलणे तोडू नये, नाहीतर क्यासेट रिवाइंड़ होते आणि संपता संपत नाही.😂 आमच्या घरा मागे तिकटी आहे तिथे माझ्या सखीच्या घरासमोर एक सुंदर गोल कट्टा बांधला आहे. तिथून जाणारा प्रत्येक वाटसरू त्या कट्ट्यावर टेकल्या शिवाय कधीही पुढे जात नाही. सकाळी सात ते रात्री दहा कट्टा भरलेलाच असतो सतत सुख संवाद सुरू असतो, फक्त पात्रे बदलतात. सगळे जण आपले मन ओतून मोकळं करत बसतात. तिथे सकाळी कोवळं उन खात खात, पाय शेकत गप्पा रंगतात तर संध्याकाळी शिळोप्याच्या कथा सुरू असतात. सासू -सून, जावा-जावा असे मातब्बर खेळाडू एकमेकींना खो देत आपापली कला सादर करून जातात. कट्टा अनेक कडू गोड कथांचा मूक साक्षीदार आहे. मने मोकळी झाली की आपला प्रश्न जनरल होतो, अनेक जण अनुभव सांगून मार्ग सुचवतात.. तो प्रश्नच निकालात निघतो. असा हा विसावा कट्टा बायकांचा फार लाड्का आहे.. गावचं चालतं बोलतं वर्तमान पत्रच जणू…. सारख्या घडामोडी, कुरघोड्या सुरू असल्याने त्याला संसदेइतकी लोकप्रियता लाभली आहे.
कुणाच्या घरी आज रस्सा शिजला आहे, मासा तळला आहे की अंबाडीच्या/मेथीच्या भाजीला लसणीच्या फोडणीचा चुरका बसला आहे की रवा/ बेसन खमंग भाजलंय हे दारातूनच समजतं. तिथे स्वयंपाकघरात काही चोरून शिजतंच नाही. पाक-कलेची गंधवार्ता दारातच समजते आणि नाहीच कळली तर संध्याकाळी शेंगा मोडत किंवा मेथी निवडत गप्पा मारणारी सून पाहिली की यांच्यात उद्या काय बेत आहे याचा अंदाज येतो. शेजीबाईच्या मुलाला आवडणाऱ्या भाज्यांच्या वाट्यांची अदलाबदल होते. डोहाळे लागलेल्या सुनेला खावेसे वाटलेले पदार्थ देऊन तिचे डोहाळे अनेक शेजीबाई हिरिरीने पुरवतातच. स्वयंपाकघराला ‘प्रायव्हसीची’ गरजच काय? आपल्यात काय शिजतय हे शेजार्यांना ओळखता नाही आलं तर त्या सुगरणीच्या खमंग फोडणीला काय हो अर्थ ? भूक sssभूकsss करायला लावणारया या वासाने 'आज त्यांच्यात काय बेत असावा?' हा प्रश्न शेजार्याला पडला नाही तर ती अन्नपूर्णा पाक-कलेत अजून कच्ची आहे असे खुशाल समजावे. (टीप शेजारून आलेल्या पदार्थांची अती स्तुती वर्ज्य असते अन्यथा घरात उपवास घडतो. 😂) फोडणीतल्या मिरचीचा खाट सुटून घरातल्या, रस्त्यावरच्या वयस्कर लोकाना ठसका लागला की नवख्या सूनबाईच्या ठसकेबाजपणाची ओळख पटते.
इथे सगळ्या भांडणाचे मुख्य विषय गावाला माहीत असतात. भांडणाला प्रायव्हसी लागत नसल्याने जितके प्रेक्षक/ श्रोते जास्त तितकी रंगत जास्त. एखाद्या घरचा कर्ता तळीराम वारुणी थोडी जास्त होऊन गारद झाला असेल तर शेजारधर्माला जागून शेजारी त्याला स्वतःच्या घरी झोपवून, सकाळी चहा पाजून सन्मानाने त्याची स्वगृही रवानगी करतात. मोठा बाका प्रसंग टळतो. या गावाला जेवताना, कचकचून भांडताना, मुलाला यथेच्छ बदडताना, वामकुक्षी घेताना कधीही प्रायव्हसी हवी असे वाटत नाही. फक्त रात्री झोपताना आणि गावाला गेल्यावर दरवाजे बंद. बाकी सकाळी बायका सडा-रांगोळी करायला जे दार उघडतात ते रात्री झोपेपर्यंत गडाच्या दिंडी दरवाजासारखे पूर्ण उघडेच असायला हवे. उघडी दारे म्हणजे आतली माणसे नॉर्मल असल्याचे लक्षण समजले जाते.उगीच दारे दडपणे गावाच्या संस्कृतीत बसत नाही. ‘डोअर बेल’ हा प्रकारही तेथे अस्तित्वात नाही आणि असला तरी कोणी ती दाबत बसणार नाही. दारात उभं राहायचं आणि जोरदार हाळी द्यायची असं साधं सोपं गणित!
माहेरवाशीण म्हणून मी जाते तेंव्हा सगळ्या गावाची माहेरवाशीण असते. सगळे प्रेमाने चौकशी करतात. आकाराने आता दुप्पट झाले आहे तरी ‘वाळलीस गं’ असं म्हणतात. कोण नाष्टा करायला बोलावतं, तर कोणी जेवणाचा आग्रह करतं. उगीच तोंडदेखलं नाही बरंका! अगदी हाताला धरून, घरी नेऊन, पाटावर बसायला लावतात. दारात भाजी विकणाऱ्या बायका, ज्यांच्या पूर्ण कुटुंबकबिल्याची आम्हाला माहिती आहे, ‘ताईंना भाजी’ ‘ताईंना भाजी’ करत छान ताजी भाजी आणून देतात, कुठलाही ‘होम डिलिव्हरी’ चा बडेजाव न करता! तिथली स्वस्ताई बघता कोल्हापूर मुलखाचे महाग आहे आणि पुणे-मुंबईबद्दल तर न बोललेलंच बरं असं वाटायला लागतं. हा सारा जिव्हाळा बघितला की माझा शहरी मुखवटा गळून पडतो. मी पण दारातल्या पायरीवर बसून गावभरच्या चौकशा करायला सुरु करते, येणाऱ्या-जाणार्यांशी गप्पा छाटायला सुरु करते. पोटभर चकाट्या पिटून झाल्या की मन मोरपिसा सारखं हलकं व्हायला लागतं. ‘देवा ! सुधारणेचं वारं कसंही वाहूदे, पण माझं माहेर तसंच राहू दे, घर कौलारू दारात प्रशस्त पायरी तशीच असुदे, तिथलं काही काही बदलायला नको!’ असं म्हणत मी फ्लॅट संस्कृतीत परतते. शहरी संस्कृती ‘माणूसघाणी ’ वाटायला लागते.इथे पायरीवर बसून मनमुराद गप्पा छाटायची मज्जा नाहीच...
काही वर्षापूर्वी मी कोल्हापुरी फ्लॅट संस्कृतीत प्रवेश केला. सुरवातीला मी माझ्या फ्लॅटचा दरवाजा लावायचाच विसरत असे. दिवसा सुद्धा घराचे दार का लावायचं हे कळायचंच नाही मला. सगळ्यानी घराला लोखंडी ग्रिल केले होते, त्यातून त्या मालकिणी बोलायला लागल्या की, स्वखुशीने पिंजऱ्यात बसलेल्या मैने सारख्या वाटायच्या सगळ्या. मला काय ती फटीतली प्रायव्ह्सी पटेना. माझे दार सताड उघडेच, त्या पिंजऱ्यातल्या बाया... सगळे शेजारी हसायचे मला पण थोड्याच दिवसात मी शेजारणीना चांगल्या पैकी बिघडवले. गप्पा मारता मारता जोशी, उपाध्ये, नानिवडेकर, रानडे, कुलकर्णी फॅमिलीचे चांदणी भोजन टेरेस करण्यापर्यंत मजल गेली आमची! मनात आले की टेरेसवर गप्पा सुरू व्हायच्या. बंगल्यात आल्यावर मात्र तोही दुवा निसटला आणि मारून मुटकून माझं बेगडी, शहरी बाईमध्ये रुपांतर झालं. कोल्हापुरी लोक अजून तशी कमी प्रायव्ह्सी मागतात, सगळे एकमेकांशी गोड बोलून गुण्या गोविंदाने रहातात. अगदी उच्चभ्रूपणा अजून तरी आला नाही… आम्ही हुश्शार, शहाणे, आम्हाला कुणाची काय गरज असले काही भ्रम इथे नाहीत. सगळे सण, रस्सा पार्ट्या मिळून मिसळून एकत्र साजरे होतात. कुणाला प्रायव्हसीचे काही पडलेले नाही.
काही शहरांत अनेक वर्षाचा शेजारी मेला तरीही आमचा काय संबंध, आमची ओळख नाही. असे सांगतात. काही महाभाग आम्ही प्रायव्हसी कशी जपतो, उगीच कारणा शिवाय कोणाकडे जात नाही अशी फुशारकी मारतात. मोठ्या शहरात प्रायव्हसी चे जरा जास्त कौतूक आहे. काही मुद्दे बरोबर आहेत, माणसाला शांत पणे विचार करायला स्पेस हवी. प्रायव्हसी आणि स्पेस हे दोन वेगळे शब्द आहेत. छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या माणसाला घरात जागा हवी ती त्याला मिळावीच,अन्यथा संसार टिकणे कठीण. पण मनातली स्पेस (शांती) आपली आपण शोधावी लागेल.., जी संत ज्ञानेश्वरांना एका कुटीत लाभली ,ती आपल्याला राजमहालात एकटं बसलो तरी लाभेलच असे नाही. मनातली स्पेस, कमळ दलाची अलिप्तता आपल्या मधेच वसली आहे, ती आपली आपण शोधायची आणि टिकवायची असते.
तिथे खेड्यात घरात, मनातल्या मनात कलहाचे आवाज चढले की शेजारी हस्तक्षेप करतात आणि गोष्टी हाता बाहेर जाऊ देत नाहीत, इथे तुमच्या बंद दारा मागे काय चालले आहे ते लोकाना कसे बरे कळावे? मग गोष्टी पूर्ण हाताबाहेर गेल्या की समजतातच ना लोकाना? मग सांगण्यात कसली लाज /कमीपणा ?असली ही बेगडी प्रायव्हसी काय कामाची? खेड्यात सगळे प्रश्न चर्चेने सुटतात, त्यामूळे कोणी फ़्रस्ट्रेशन मधे गेलाय, आत्महत्या करतंय असे कमी दिसते. संवाद असला तरच प्रश्न सुटतील. प्रायव्हसी च्या नावाखाली घराचे दरवाजे बंद करून मनाचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यासाठी बोलून मन मोकळं करायला पाहिजे. संवाद तुटला की मन तुटत जातं. मला अजून एक प्रसंग सांगावा असं वाटतंय.. मी माहेरी होते. माझी लेक जेमतेम महिन्याभराची होती. एके दिवशी अचानक वडिलांची तब्येत बिघडली.. दरदरून घाम फुटला.. Heart Attack ची लक्षणे बघून लगेच आई आणि ते कोल्हापूरला रवाना झाले. सुदैवाने ते बरे झाले पण दोघांनाही उपचारासाठी महिनाभर कोल्हापुरला रहावे लागले. मी आणि छोटी लेक माहेरी मलकापूरातच होतो. या कठीण समयी आमच्या शेजारी सक्रे वहिनी देवा सारख्या धावून आल्या. माझी लेक जन्मा पासून नाकाने कांदे सोलते..😖 ती आंघोळीला बाईचा खरखरीत हात लागला की मोठ्ठ भोकाड पसरे, त्यामुळे माझी आईच तिला हळूवार हातानी अंघोळ घालायची. मला तर ते जमतंच नसे, मग आईच्या अनुपस्थितीत सक्रे आज्जीनी रोज तिला छान चोळून मोळून अंघोळ घातली. इतकेच नाही तर बाळंतीण म्हणून रोज मला पौष्टिक नाष्टा ही दिला. त्यांच्या हातच्या सुग्रास पदार्थांची, लवंगा घालून केलेल्या हरभऱ्याच्या काढ्याची चव अजून जिभेवर रेंगाळते. माझी लेक चार-पाच महिने त्या घरी त्यांच्या मुलानी खेळवून मोठी झाली हेच खरे. तिथे प्रायव्हसी शब्द अस्तित्वात नाही म्हणून हा प्रसंग निभावला गेला. अजूनही मला दिनानाथ सक्रे दादा आणि वहिनी माझी माणसं प्रिय आहेत.
म्हणूनच मोकळं-ढाकळं मलकापूर मला आदर्श गाव वाटते. घटस्फोटासारखा कटू प्रसंग असो की नापास मुलाचे काय करावे हा विषय असो पाचा मुखी परमेश्वर समजून प्रेमाच्या लोकाना बोलवले जाते. कुठलाही प्रश्न 'वैयक्तिक/कौटुंबिक’ नसतोच, सारेच प्रश्न ‘सामाजिक’, त्यामुळे चार चौघात चर्चा होते आणि निर्णय घेतला जातो. समस्या आपलीच समजून मार्ग काढला जातो. म्हणूनच खेड्यात कोणी उगीच गंभीर प्रश्न लपवून ठेवत नाहीत. हल्ली लोक समस्या लपवण्यासाठी जास्त शक्ती खर्च करतात असे वाटते.
संवादाने कठीण परिस्थितीतूनही मार्ग निघतो हे लक्षात घेतलं पाहिजे. मित्रानो आता पावशा पक्ष्याचा संदेश आपण 'बोलते व्हाsssबोलते व्हा'sssअसा ऐकूया. खेड्यात खट्याळ सासूला सिनिअर आज्जेसासूबाई अक्कल शिकवतात तर नाठाळ सुनेलाही शेजारणी बोलून बोलून सरळ करतात. नणंदा- भावजया, शेजारी, जावा-जावा यांची धुसफूसपण गावाच्या साक्षीने विझते. मुलीची पाठवणी, मुलाचे लग्न आणि सुनेचे डोहाळेजेवण सगळे काही सार्वजनिक स्वरूपात होते. सगळ्या गोष्टींसाठी सगळं गाव हजेरी लावतं. इथं माणसं ‘समाजशास्त्र’ शिकत नाहीत, तर जगतात! म्हणूनच ‘प्रायव्हसी’ चं बेगडी अवडंबर नाही.
शेवटी असं वाटतं आपण सगळे एका विधिलिखिता मुळे भेटलो..आता आपण एकमेकांना प्रेम देऊन याचे रुपांतर एका अक्षय बंधनात करू. आता आपला हा गोड बंध निर्माण झाला आहे म्हणूनच माझे खळाळत्या पाण्यासारखे कुठेही धावणारे विचार वाचलेत ना?
दीडशे कोटी मधले असे किती लोक आहेत आपले? आनंद सिनेमात राजेश खन्ना प्रत्येकाला बोलावतो.. प्रेमाने 'मुरारीलाल' म्हणून संबोधतो आणि कडकडून भेटतो, आज आपला आहे.. उद्या कोणी पाहिलाय ? तसेच आपण आपल्या सहवासात योगायोगाने आलेले सगळे ऋणानुबंध स्विकारून त्यांना वेळ देऊ, त्यांना कान देऊ, त्यांना कठीण समयी मदत करू... आणि ते सुद्धा त्यांची प्रायव्ह्सी राखून!!!😊
©विजयश्री तारे-जोशी
27.6.2020
स्थान:
Kolhapur, Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या





Madam you never stop to amaze me! You are so pure and frank in your narrative, it has never been so in all my readings. You are a natural born writer. Again I request you to print and publish your works.
उत्तर द्याहटवाThank you so much!! Print rahude, he masta ahe.. Patkan lok wachun, kasa watla sangtat.. te pan fuktat.. hehe..
हटवाChan hote
हटवाThank you.
हटवाSoulful
उत्तर द्याहटवाThank you.
हटवाकिती मस्त मलकापूर गावाचा साधपणा शब्दबद्ध केला आहे, खरंच गावची घरं अशी मोकळी धाकळी,कुणीही यावं आणि चुलीजवळ जावं, आवो जावो घर तुम्हारा अस वातावरण, कुठं आलीय तिथं प्रायव्हसी. हे सर्व माझ्यासारख्या गावात राहिलेल्या माणसाला भावणार आहे.आता गावं बदलली आहेत.मात्र मलकापूरच जुन ते सोन मस्त मांडल आहे.गावात डोकावून आल्याची भावना निर्माण झाली. मस्त जयश्री उर्फ विजयश्री---------प्रा. एस.पी.चौगले, वाकरे
उत्तर द्याहटवाThanks Sada Chougule! Privacy pahijech, pan limit madhe. Alikada atirek zala ahe asa watta privacy cha.
हटवाजया अगदी बरोबर लिहिले आहे.श्रीधर
उत्तर द्याहटवाबरोबर तुमच्या घरी कायम येणं जाणं असायच.श्रीधर आमच्या घरी अभ्यासाला
व झोपायला यायचा.त्या काळातील डोळ्यासमोर उभ्या राहिल्या...
फार फार छान लिहिले आहेस....
Anek abhaar..
हटवाYa comment mule anek sundar goshti athawalya bhutakalatalya, ani madhe itake diwas sarun gelyamule tya anandadayi watalya. Thanks a ton for that.
मस्त वर्णन!
उत्तर द्याहटवाThanks Pawar mam. :)
हटवानेहमी प्रमाणे छान, प्रायव्हसी चे स्तोम शहरी भागात खूपच असते. माणूस हा social प्राणी आहे त्यामुळे समाजात मिळून मिसळून राहणेच योग्य.
उत्तर द्याहटवाHo khara ahe agadi!!
हटवाThank you..
श्री मलकापूर अगदी हुबेहूब डोळ्यासमोर उभं केलंस तू!
उत्तर द्याहटवाआज उठसुठ आत्महत्या करणाऱ्यांसाठी ही गोष्ट लाखमोलाची आहे. आपण व्यक्त च झालो नाही कुणाजवळ, स्वतः लाच सर्वज्ञ समजत राहिलो तर मार्ग कसा निघेल. बऱ्याच वेळा कुणी आपल्या प्रश्नावर उपाय सांगितला नाही, काही सल्ला दिला नाही, तरी आपली जी डिप्रेशन मध्ये जाण्याची महत्त्वाची वेळ असते ती टळून जाते. कदाचित म्हणूनच पूर्वी एव्हढे संकट येऊनही लोक आत्महत्या करत नव्हते की त्यांना काही मनोविकार होत नव्हता, म्हणजे प्रमाण तरी कमी होते. परंतु आज शहरी भागात privacy privacy करत लोक कुणाला आपलं दुःख सांगतच नाहीत आणि मग...
म्हणूनच बोलत राहा, व्यक्त होत राहा आणि श्री तू अशीच लिहीत राहा आणि आम्ही वाचत राहू👍
अनेक आभार मंदा. अगदी खरं आहे की काही वेळा कुणाला सांगून तुम्हाला काही चांगला सल्ला मिळतो असं नाही पण तो कसोटीचा नाजूक क्षण निघून जातो, धीर मिळतो आणि पुन्हा शून्यातून सुरु करायचे बळ मिळते. पूर्वीचे लोक कदाचित depression आणि anxiety सारख्या मनोविकारांकडे खरंच दुर्लक्ष करत असतीलही पण त्यांची अशा आजारांवर मात करून पुढे जाण्याची इच्छाशक्तीही अफाट होती आणि ती समाजामुळे होती हे नक्की. सगळेच सगळ्यावर बोलत असल्याने आपल्यासारख्या संकटात सापडून पुढे गेलेले अनेक अनुभवी लोक त्यांना भेटत असतील आणि मग ‘एकमेका सहाय्य करू…’
हटवापण आजकाल फायदा घेणारेही जास्त असतात आणि मग ही तरुण पिढी एकटीच लढत राहते याचं वाईट वाटतं. Social media च्या जगात माणूस एकटा पडू नये हीच एक अपेक्षा.
आपण बोलून मोकळं होणारे लोक आहोत, तसेच राहू. Depressed आणि दुःखी पेक्षा फटकळ आणि बडबडी असणं कधीही चांगलं, नाही का ? 😝
Thank you.
उत्तर द्याहटवाअगदी खरं आणि बरोबर👍
उत्तर द्याहटवालेख चांगला आहे. पण का कोण जाणे सुरवातीला थोड एकाच ठिकाणी गोल गोल फिरल्यासारख वाटत होतं. पण नंतर मात्र गाडी नेहमीप्रमाणे सुसाट धावलीय.
उत्तर द्याहटवाThank you Mr. Vasant Joshi. Pudhache lihitana suggestion lakshat thewen nakki.
हटवाकुंदा पाटील, बदलापूर
उत्तर द्याहटवाश्री अग किती छान विषय निवडलास तू यावेळी प्रत्येकाने हा लेख वाचून चिंतन करण्यासारखा आहे. हल्ली तर public/सार्वजनिक हा शब्द गायबच होत चालला आहे आणि प्रायव्हसीच्या नावाखाली संवाद कमी होत आहे. अग काही महारथी तर असे म्हणतात की आमचा कोणाबरोबर वाद होत नाही मी सर्वांबरोबर चांगला आहे अरे पण जिथे तुझा कोणाबरोबर संवादच नाही तर वाद कसा होणार? तर असो हा पण प्रत्येकाचा private विषय आहे.लहानपणी मी जेव्हा सुट्टीत मामाच्या गावाला जायचे तेंव्हा गावची एक विहीर होती तिथे तर कपड्याचा साबण सुद्धा सहज मागितला जायचा म्हणजे तो सुद्धा सार्वजनिक असायचा असच म्हणायचं.त्यावेळी शिष्टाचार हा शब्द माहितच नव्हता ग. मन मोकळे पणाने सगळ्यांबरोबर बोलणे म्हणजे आपला प्रश्न जनरल आणि मग इतरांच्या अनुभवातून मार्ग निघतो. मला पण बंद दरवाजा आवडत नाही तू गडाचा दिंडी दरवाजा म्हणते तर मी शनी शिंगणापूर म्हणते हाच काय तो फरक. कधी कधी एखाद्या 'पॉश' घरातील सुंदर गालिच्यावर अवघडल्यासारख होत तर याउलट साध्या मातीच्या घरात मऊ गालिच्यावर बसल्यासारख वाटतं. श्री असच छान छान लिहीत रहा, आणि बोलत रहा. छान विषय निवडलास 👌खूप खूप आवडला 👍 पुन्हा तुला पुढील लेखासाठी ' शुभेच्छा' 👍
कुंदा पाटील, बदलापूर
धन्यवाद कुंदा! विषय वेगळा आहेच पण खूप गरजेचा वाटला आणि सुचत गेल्या काही गोष्टी. संवाद नाही तर वाद कुठून होणार हे अगदी पटलं बघ मला. गरज आहे तिथे privacy पाहिजेच पण बाकी पुढच्यास ठेच, मागचा शहाणा असा दृष्टिकोन ठेऊन दुसऱ्यांच्या अनुभवांनी गोष्टींवर मार्ग काढणं महत्वाचं आहे. आपल्या साध्या वातावरणात कितीही भांडण आणि वाद असूदेत पण जास्ती ओलावाहीअसतो, मन जोडलेली असतात आणि मनुष्य social प्राणी आहे तसाही.
हटवाअनेक आभार कुंदा. अशाच प्रतिक्रिया कळवत राहा, बोलत राहा. 😊
सुंदर. माझ्या आजोबांच्या बरोबर बाळेकुन्द्री व सांबरे गावातील चकरा आठवल्या. आजोबा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असल्याने गावातील कोणताही प्रश्न त्याच्यापर्यंत यायचा व तो सोडवणे हे त्यांचं काम, अक्षर चांगलं असल्यानं लेखनिक म्हणून माझी वर्णी त्यांच्या बरोबर. फक्त चार ते सहा गल्याची ती गाव त्यामुळे कोठे काय चाललंय ते आम्हा पोरांना माहिती. भारतातली बहुतेक खेडी तुमच्या वर्णनात चपखल बसतात. आनंद मिळाला...P.K Joshi
उत्तर द्याहटवाMadam ...
उत्तर द्याहटवाVery impressive language as usual ...begin n close r equally impressive..
"Privacy"old timer n modern one n openness in fly n in society social way r clearly made up their case .What I feel n experienced in my ages in old time n now also requally same in every small place in those old times which u have made Ur case very clear n proper n accurate .Totally really outstanding write-up .Pl continue with Ur efforts n l wish u all the best n still best out of u should flow.
RB Tophakhane Belagavi.
Thank you so much Mr. Tophkhane.
हटवाI'll definitely continue writing and publishing it here.
तुमची प्रायव्हसी झकास! पावशा पक्षी ' बोलते व्हा! As n म्हणता ' लिहिते व्हा ' म्हणतोय अलीकडे.
उत्तर द्याहटवाआमच्या लहानपणी हाच पक्षी शेतकऱ्यांसाठी ' पेरते व्हा ' ! असा संदेश देत असे, असे ऐकिवात होते.
एकूण खडेगावचे वर्णन हुबेहूब!!!
Rekha Upadhye ..Pune
Haha, Ho, Pawashya 'Perate vha' ch mhanto pan ata navin arth lavane garajeche ahe asa watla!
हटवाThank you so much Mrs.Upadhye!! 😊
खुप छान. या लेखनाव्द्वारे तुम्ही छोट्या गावातील मोकळेपणा, आपुलकी सहजीवन यांचे छान वर्णन केले आहे. Hope it stays like that for many more years to come. I am a bit concerned with the blind imitation and adoption of the so called of modernity by small towns.
उत्तर द्याहटवाSanjay charati..
Thank you Mr. Sanjay Charati..
हटवाjgd. अलीकडं व्याप वाढवल्याने की तेवढ झेपत नसल्यानं लेख उशीरा डोळ्यांखाली आला, मलकापूरी प्रायव्हसीचा खुमासदार किस्साच नव्हे किस्से कसे छान उलगडलेत. लघुनिबंधासारखं लेखन वाटायला लागतं ,शहरातल्या तथाकथित प्रायव्हसीचे बेगडीपण दाखवत एका सहज सुंदर निर्व्याज गावाकडल्या मोकळेपणाचं दर्शन घडत आहे. मनमुराद संवाद व सहभावना मलकापुरच्या मातीत कशी रुजली आहे ,हे अनुभवातून उलगडत गेलय, लिहिता लिहिता एक तत्वचिंतक "जया" घडत आहे असे लेख वाचताना वाटत राहतं. ताणतणावमुक्त असं गावाकडलं सहज जगण आज शसरीकरणात हरवत चाललय. ते परत कसं येईल ,हा प्नश्नच आहे. या समस्येच अंतरंग या लेखात छानपैकी मांडत गेलीस! मनाला भिडणारा लेख! या मलकापूरातील जीवनाचा साक्षी असल्याने मनाला लगेचच लेख भिडतो. अभिनंदन!!
उत्तर द्याहटवाAnek abhaar Shete Sir.
हटवाTumchya pratikriyechi waat pahat hote pan busy asal asa watla. 😊
ताई तुमचे विचार चांगले आहेत..पण शहरात कोण कुणाला विचारणार नाही.खूप आवडले लेखन
उत्तर द्याहटवास्वाती पाटील
Anek abhaar Swati Patil!!
हटवाकिती वेगळा विष्य..कधीच वाचले नव्हते..सगळ्यात जास्त पटला..अणि आवडला हो..धन्यवाद विनोद आवडले पुरुष नाही भांडत चांगले..मान्य आहे
उत्तर द्याहटवाR.S Patil Solapur
Hahahaha..
हटवाAnek abhaar..😀