- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा - https://vijayshreejoshi.blogspot.com/2020/06/blog-post.html
दुसरा भाग -
आणि अखेर कार्यक्रमाचा दिवस उजाडला. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत सगळा गाव गरमा गरम कपडे घालून पूर्ण तयारीनिशी कार्यक्रमाला लोटला होता. मलकापूर हायस्कूलचे पटांगण प्रेक्षकांनी खचाखच भरले. आमचे नाटक व्यसन मुक्तीचा चांगला संदेश देईल म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी ठेवले होते. एका वर्गाची ड्रेसिंगरूम करून आमच्या मेक-अप साठी तयार होती. सर आमच्याकडे बारीक लक्ष ठेउन होते. मेकअपवाले आले, तिघींचाही चेहरा मेकअपने छान चमकवून टाकला. माझे लांबसडक केस आकडे, पिनां, जाळ्या कशाकशानी त्या काळ्या टोपीत कसेबसे चापून चोपून बसवले. चांगल्या आकडी मिशा रेखल्या गेल्या, पांढरे दुटांगी धोतर वर सदरा त्यावर कोट आणि टोपी.. असला अवतार आरशात माझा मलाच ओळखू येईना.. हसायलाच येऊ लागलं. गीताबाईना मस्त गुलाबी मेकअप, साधी जुनी पण बरी नऊवारी साडी, भला मोठ्ठा आंबाडा, डोळ्याच्या कोपऱ्यावर दोन्हीकडे हिरवे गोंदवलेले कोन, हातभर बांगड्या, मंगळसूत्र आणि कपाळावर मोट्ठा टिळा! नाटकाची नायिका सालस सिंधूला मात्र साधासा पण दीनवाणा, करूण भासेल असा मेकअप, बांगड्या, साधे काळे मणी असलेले मंगळसूत्र, आंबाडा, अगदीच साधारण जुनीशी नऊवारी ओच्याची साडी नेसवलेली. तरीही दोघी छानच दिसत होत्या. एकमेकींचे रुपडे बघून खो खो हसत सुटलो…. सरही "झक्कास दिसताय...बरोब्बर पात्रे रंगवलीत, मुलींनो अजिबात घाबरायचं नाही नाटक वाजलं पाहिजे "...असे म्हणाले.
असले ड्रेपरीचे सगळे सोपस्कार पार पडले. केसांच्या ओढाताणीने डोके, केस दुखायला लागले पण नाटकाची हुरहुर लागल्याने ते काही फार जाणवलं नाही. तेवढ्यात सर आले, एक हिरवी सोड्याची बाटली माझ्या हातात देऊन, म्हणाले "तुझा प्रवेश हातात बाटली घेऊन झोकांड्या खातच झाला पाहिजे म्हणजे भूमिका जिवंत वाटेल!" आता मात्र मला रडायलाच येऊ लागले. (this was last straw on camel's back) 'अय्या sss बाटली?? मिशा?? फाटक्या साड्या?? ई sss कसला अवतार काढलाय आपला?' तिघीही एका सुरात ओरडलो… आणि एकमेकींकडे बघून रडता रडता हसू लागलो. दारुड्या सुधाकरने खरंच रडवायचं ठरवलेलं आम्हाला. वरून टेन्शन, छातीत धडधड सुरु होतीच की सगळे पाठ केलेले संवाद आता या अवतारात हजारो लोकांसमोर आठवतील का ? 'कसं होइल.. काय होइल गं '.. तिघी एकच बोलत होतो... सर अधून मधून येऊन धीर देत होते. मी वेड्यासारखी विंगेत हातात बाटली घेऊन ऊभी होते. त्या बाटलीचं एक वेगळंच टेन्शन, अगदी कुठून या फंदात पडलो असं काहीसं वाटायला लागलेलं!
राम गणेश गडकरींच्या आभाळाएवढया कर्तृत्वाला, त्या दिव्य लेखणीला सलाम करून आमच्या नाटकाची नांदी सुरु झाली. आमच्या काळजात धडधड.. धडधड सुरूच होती. तिसऱ्या घंटेला सिंधू कोपऱ्यात उभी राहिली, तिच्याशी गीताचा संवाद सुरू झाला, फटकळ गीता सगळे नवरे कसे जगायला नालायक.. खोटं बोलणारे असतात, त्यांच्यावर कधीही विश्वास ठेऊ नये. अशी बरीच काही कटूसत्ये हाडाच्या गरीब सिंधूला सांगत असते आणि तेवढ्यात सुधाकरचा बाटली घेऊन झोकांड्या खात खात प्रवेश होतो…. हा प्रवेश होताच प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्यानी पटांगण अक्षरशः दणाणून सोडले. त्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा मला क्षणार्धात घाम फुटला !… पण या दोघी तिथेच असल्याने धीर आला. कुठून तरी डोक्यात वीज चमकली चार हत्तींचे बळ आले, रंग देवतेने अंगात संचार केला, सरांचा चेहरा आठवला आणि चक्क खणखणीत प्रवेश सादर करु लागलो. मेहनत, तालीम खूप चांगली झाली होती. तीन माइकची छान व्यवस्था होती त्यामुळे बाकी सगळेच सुरळीत सुरु झाले. गीता आणि सिंधू नाटक कंपनीत कसलेल्या अभिनेत्री असल्यासारख्या अफलातून काम करत होत्या. सुधाकरने गरीब गाय सिंधूची कळवळून माफी मागीतली. गीता मधे मधे टकळी वाजवून अविश्वास दाखवू पाहात होती. पण पती परायण भोळ्या भाबड्या सिंधूचा पतीच्या शपथेवर तो आता सुधारेल असा विश्वास बसू लागला होता. नाटक रंगात आलं होतं…. आणि मला स्टेजवर जाणवलं की माझ्या केसांची एक बट शिरावरून सुट्का करून घेऊन, टोपीतून हळूच खाली येऊन मानेवरून कोटाच्या कॉलर वर लोंबत आहे….. आता तिला आत ढकलणेही शक्य नव्हतं…. क्षणभर बावरले, कुठूनसे प्रसंगावधान आले माहीत नाही...... मग सुधाकरची पाठ काही प्रेक्षकांना दिसली नाही! सगळे डायलॉग समोर बघून पार पाडले. स्वतःचा तोल न जाऊ देता, पाठ न दाखवता, जमेल तेवढ़या झोकांड्या घेत घेत शेवटचा "सिंधू, आजपासून मी दारू सोडलीss" हा सुधाकरचा डायलॉग पार पडला, सुधाकरने भरलेली बाटली सिंधू समोर आपटली….. आणि प्रेक्षकांनी आख्खं पटांगणच डोक्यावर घेतलं!!! फक्त टाळ्या… शिट्ट्या.. वन्स मोअर… एवढ़याच आवाजानी पटांगण दुमदुमले...
आमचा प्रवेश संपला... रसीक मायबाप प्रेक्षकांना अभिवादन करून आम्ही विंगे मध्ये आलो आणि लोकांच्या आरोळ्या ऐकू आल्या "सुधाकरsssबाटली विसरली sssसुधाकरssss." मला सरांनी दिलेली सोड्याची बाटली स्टेजवरच राहिल्याचं पटकन आठवलं आणि मी लगेचच परत रंगमंचाकडे पळत जाऊन ती बाटली घेउन परत विंगेत परतले. माझी ही उस्फूर्तता लोकांना फारच आवडली… अजून टाळ्या.. शिट्ट्या.. नाटक झकास झालं, आम्हाला खूप बक्षिसे पण मिळाली. आमच्या साठी अपार कष्ट घेणार्या सरांचा कृतकृत्य समाधानाने फुललेला चेहरा पाहून मनाला खूप बरे वाटले. प्रयोग संपल्यावर खूप वेळाने सर पाणावलेल्या डोळ्यानी खुर्चीत बसले. अगदी लाडक्या लेकिची नुकतीच पाठवणी करून मांडवात बसलेल्या बापासारखे!!! आमच्या सगळ्या शिक्षकांनी रोखून धरलेला श्वास सोडला. आई, वडील आणि गुरु यांचे आनंदाश्रू दिसायला फार मोठे भाग्य लागतं हेच खरे… खूप दिवसांनी माझ्या मनावरचं बाटलीचं ओझं उतरलं… आणि शांत झोपले रात्री….
दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे महान कलाकार हवेतच! लोकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला, बक्षिसे दिलेली आणि कधी नव्हे ते गुरुजनांनाही आमचा अभिमान की काय तो वाटलेला. तोंडावर आमचा वधारलेला भाव फ़ुलवत, जयमाला शिलेदार असल्यासारखी दिमाखात शाळेला निघाले. सख्यांबरोबर नेहमी सारखी खिदळत चार पावले गेले तोच.. रस्त्यात ‘सुधाकर sssए..‘सुधाकर sss’ अशा हाका येऊ लागल्या. शाळा-कॉलेजची टारगट मुलंच ती, टिंगल-टवाळी मध्ये एक नंबर! माझे कान मात्र रागाने लाल झाले, छातीत धडधडायला लागलं. कानकोंड्या सारखं मनातल्या मनात धुमसत धुमसत शाळेची वाट धरली. कोण कोण टोमणे मारतंय हे पाहायचं धाडस पण झालं नाही. सख्या खुसू खुसू हसत होत्या. कशी बशी पोहोचले शाळेत. मैत्रिणींचे, गुरुवरांचे कौतुकाचे शब्द येत होते कानावर पण डोक्यात मात्र शिरत नव्हते. दिवसभर डोक्यात एकच म्युझीक सुरु होतं ‘सुधाकर sss‘सुधाकर’. संध्याकाळी शाळा सुटल्यावर नेहमीसारखी इकडे तिकडे टंगळ-मंगळ न करता तडक घरी आले. आता घरात काय कोण मला चिडवणार नव्ह्तं आणि भावंडानी चिडवलच तर झापायला माझी प्रेमळ माता होतीच. आई 'काय गं सर काय म्हणाले..बाई काय म्हणाल्या ?' विचारू लागली...मी आपली कधी नव्हे ती गप्प…'आता नाटक बाssssस' करून उगीच मोठ्ठ्या आवाजात ओरडले… थोडा वेळ इकडम तिकडम झाले. रात्र झाली, जेवणे झाली सगळीकडे थंडगार शांतता पसरू लागली. एकाएकी आमच्या घराला लागून असलेल्या गल्लीतून ‘सुधाकर sss ए सुधाकरsss, असं करू नको ss, एकदम सोडू नकोsss’ असे आवाज आणि मुलांचं खिदळणं ऐकू येऊ लागलं. मग मात्र मी रडायलाच सुरु केलं. सकाळ पासून सोसलेल्या त्रासाचा ज्वालामुखी फुटला… घरात बरीच चिडचिड केली. नाटकाचा हा असा परिणाम होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. माझ्या रडण्याला भावंडे, शेजारी इतकेच काय माझे जन्मदाते पालकपण हसू लागले. सगळ्यांचाच भयानक राग येऊ लागला मला. पण काहीही उपयोग नव्हता खरं, बाण तर हातातून केंव्हाच सुटलेला होता. माझी नाटकाची नशा (दारूची नव्हे) खाड्कन उतरली. मग कुणीही मागून येऊन मला ‘हळूहळू सोड sss, एकदम नकोsss’ असले सल्ले देऊ लागलं. हा प्रकार चांगली बोर्डाची परिक्षा तोंडावर आली तरी सुरुच होता. आईने त्या टारगट मुलाना चांगला धडा शिकवावा, दम द्यावा असे मनातून फार वाटत होते. पण ती माऊली तरी कुणा कुणाला जाब विचारणार? सगळे जगच मला हसायला टपलंय असे वाटायला लागले.
आयुष्यात प्रथमच घरी जास्तच बसू लागले सगळ्या उचापती बंद झाल्या. आता घरातच आहोत तर अभ्यास तरी करावा असा विचार करून बोर्डाच्या अभ्यासाला लागले. गालातल्या गालात हसणार्या भावंडांना कांगावा करून, दमदाटी केली आणि गप्प केले. बाहेरच्यांकडे दुर्लक्ष करायचे असे ठरवले. घरचे चोरून हसतच होते खरं माझ्या बावळटपणाला! हौसेनं 'आ बैल मुझे मार' म्हणजे काय याचा अनुभव मी अगदी पोरवयातच घेतला. चांगला परिणाम एकच झाला त्या दारुड्या सुधाकराने मला घरी बसवले आणि त्याच्या कृपेने बोर्डाला उत्तम मार्क पडले.
आज चाळीस वर्षांनी मागे वळून बघताना त्या प्रसंगाची त्रयस्थपणे मजा घेत घेत हा ब्लॉग लिहिला. राम गणेश गडकरींच्या या प्रयोगाला शंभरी उलटली पण परिस्थिती आजही तिच आहे. आज लॉकडाऊन मध्ये किती ‘सुधाकरांना’ सुधारण्याची संधी होती असे वाटून गेले आणि हा प्रसंग आठवला.
तसेही आयुष्य हा फिरता रंगमंच आहे.. नेपथ्य त्याच्या हातात आहे. कुठल्या पात्राने काय बोलायचे हे तोच ठरवणार.... कुठल्या पात्राचे आयुष्य घडणार तर कुणाचे बिघडणार. कोणाचा प्रवेश होणार आणि कुणाची, कधी एक्झीट …….सारं काही तोच ठरवणार.
आजही कधीकधी 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे टाक उडी' म्हणून आपल्यातले गुण हेरून उडी मारायला लावणारे गुरू भेटतात,आणि गुरूच्या शब्दावर निमिषार्धात कुठेही उडी मारणारे शिष्यही भेटतात. आज चाळीस वर्षानी माझ्या नटसम्राट कै. मिरजकर सरांना विनम्र अभिवादन ! (सर वरून नेहमीसारखेच शुभ्र भुवया उडवून हसता हसता मिष्कील पणे म्हणाले असतील …'झक्कास.. आठवण तरी आली'...) आमच्या अस्तित्वात नसलेल्या अभिनयावर गाढ विश्वास ठेवत मार उडी म्हणणाऱ्या वंदनीय मुख्याध्यापिका कै. निर्मला जोशी बाईनाही लक्ष लक्ष प्रणाम… (कडक शिस्तीच्या बाई वरून त्यांच्या उजव्या गालाला खळी पाडून हसता हसता अत्यानंदाने डोळे पुसत असतील.) दारात पळापळी खेळणारया मुलीना ऑलिम्पिकला पाठवायचं धाडस केलं होतं या सगळ्यांनी. धन्य ते गुरुजन ज्यांना हा प्रयोग शाळकरी मुलींनी करण्यासारखा वाटला. धन्य ते मिरजकर सर ज्यांनी प्रसंगांचे गांभीर्य १४-१५ वर्षांच्या मुलींकडून अभिनयातून उतरवून घेतले, धन्य ते मलकापुरी प्रेक्षक जे सुधाकरला आजही विसरू नाही शकले. आणि धन्य ते वाचक की ज्यांचे सोमरसा शिवाय गडकरींचे 'एकच प्याला' वाचताना देहभान हरपले !!!

©विजयश्री तारे-जोशी
6.6.2020
स्थान:
Kolhapur, Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या


जबरदस्त👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवायाशिवाय मी अजून काय म्हणू शकते श्री? खरच तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे!! एव्हढी गुणी मुलगी माझी मैत्रीण आहे, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे.
खूप खूप छान लिहीतेस तू, खूप ताकद आहे तुझ्या लेखनात. असच लिहीत राहा👍 All the best 👍
हटवाअनेक आभार मंदा. अशाच प्रतिक्रिया देऊन मला प्रोत्साहन देत राहा. Thanks a ton!!
चांगलं लिहितोयस सुधाकरा!! लिही. नाटक नको करू आता
उत्तर द्याहटवाहाहाहा..नक्कीच...बाटली सुटली आणि लेखनाचं व्यसन लागलं बघ!
हटवाVery interesting. You have reminded me of my first venture on stage when I was in 5 th std and acted as young Rajaram maharaj in "Raygadala jenvha jaag yete " in Ugar Sugar Works ganpati utsav. It was really a wonderful experience .
उत्तर द्याहटवाNice!! I would like to know more about that experience. Please write it when you get time.
हटवाThank you so much Sunil Lonkar!
कुंदा पाटील, बदलापूर
उत्तर द्याहटवाश्री अग खूपच छान ,तुझ्या लेखणीत जादूच आहे बघ, वाचतानाच वाटत होत की नाटक च बघत आहोत, लेखनात जिवंत पणा म्हणतात तो हाच,खरं तर तू पहिला भाग लिहिलास तेंव्हाच मी प्रतिक्रिया देणार होते, पण म्हटलं दुसरा भाग येतो तोपर्यंत आपनही श्वास रोखून धरावा आणि दुसऱ्या भागाची वाट पहात बसले, खूपच छान लिहिलंस, अप्रतिम लिहिलंस अजून काय .....👌👌असच छान छान लिहीत रहा प्रत्येका जवळ वेगवेगळ्या अनुभवाची शिदोरी असते पण लेखणीत उतरायला विशिष्ट वेळ यावी लागते हेच खरं तुला " All the best"👍👍
अनेक अनेक आभार कुंदा. मला वाटलेलं भाग टाकले की दुसऱ्या भागासाठी वाचकांचा उत्साह राहत नाही. पण असे वाट बघून, वेळ काढून वाचणारे वाचक आणि स्फूर्तीपूर्ण अभिप्राय देणाऱ्या तुझ्यासारख्या मित्रपरिवारा मिळाल्यामुळे मी देवाचे अनेक आभार मानते.
हटवाअसेच माझ्या लिखाणावर प्रेम राहू दे!!
Even Sunil Lonkar is touched by your originality. Keep it up. Later compile and publis it. It's worth of publication.
उत्तर द्याहटवाHaha.. will think about print media.. right now, online blogging looks so easy, less time consuming and achievable so will continue here only!
हटवाThank you so much!
khoop chhan lekhan kelay jase natakach baghat aahot. asech lihit raha, abhinandan.
उत्तर द्याहटवाThank you so much!
हटवाखूपच छान, सुंदर, मस्त
उत्तर द्याहटवारंगमंचावर प्रवेश केला होता तसाच तो आता लिखाण करत राहुन नवनवीन प्रकारची साहित्यिक मेजवानी मिळत आहे.
शेवटी एक, सुधाकर, सोडू नकोस
हाहाहा.. धन्यवाद!! सुधाकर लेखणी नाही सोडणार आता.
हटवावा! सुरेख लेखन. अशाच लिहित रहा.
उत्तर द्याहटवाNakki prayatna karen! Anek abhaar!
हटवाjgd. आणि अखेर पडदा वर गेला ,"एकच प्याला" स्टेजवर सुरु झाला.पण तत्पूर्वी "विंगेतल्या "गमती जमती अफाट!ड्रेपरीचे दशावतार !मिशीवाली मर्दानी वेषातली जयश्री सुधाकर झाली,तो भन्नाट अनुभव! हिरवी बाटली हाती घेवून झोकांड्या खातच सुधाकर अवतरला तेव्हा समोरच्या प्रेक्षका कडून टाळ्या व शिट्ट्यांचा कडकडाट कलाकारांना दाद देत गेला.दमदार एन्ट्री झाली अन रंगदेवता संचारली व नाटक रंगत गेले. पारणे फिटले,प्रेक्षक,पालक व गुरुजनांकडून होणारा प्रतिसादाच वर्षाव सुखावत असतानाच आंबट शौकिनांच्या काॅमेंट झेलताना मनाची होणारी घुसमट "वद सांगु कुणाला?" अशी दशा!अंगी कला असताना तू का नाट्यसंन्यास घेतलास ?याचे कारण बीज सापडले.शोकान्तिका असणार हे नाटक सिंधूच्या दिव्य त्यागाने मनाची पकड घेते. अखेरची सिंधूने केलेली तरफदारी पाहून एक प्रेक्षक ओरडला होता,"what a divne lie!"पण यशस्वी प्रयोगानंतरही तू नाट्य सृष्टीला अखेरचा रामराम केलास आणि एक कलाकार रंभूमीच्या उपासनेला मुकला!आंबट शौकिनामुळे झालेली अबोल मूक तडफड कोणाला कळणार? या अंतर्मुखतेने ज्ञानसाधनेचे दरवाजे उघडले. ही नशाही काय कमी असते?जीवनाच्या नाटकात कसे परफाॅर्म करावे ,याचे ट्रेनिंग असते नाटक!भुमिका समरसतेने वठवताना आतून एक अलिप्तपण कसे जपावे ? हे नाटकानेच समजते,सार्या भावभावनाशी खेळत असताना वेगळेपण जपणे ,ही तर जीवनकला आहे.साक्षीपणाने कसे जगावे,हे नाटकानेच कळते.समरसून स्त्री भूमिका वठवणारा बाल गंधर्व आपले मर्दपण जाणूनच भुमिका करीत असे. सुखदुःखाच्या या पसार्यात पार्यासारखे रहायला नाट्यभूमिकाच शिकवते.सत्ता,संपत्ती सौंदर्य यांची नशा एकच प्याल्यापेक्षा कमी असते काय?ज्ञानलालसा ही नवी नशा "एकच प्याला" संपल्यावर चालून आलीच ना? भुमिका तर देवानेच दिलीय .वठवायला हवीच. All world is a stage, we are merely players" असे शेक्सपियरने उगीच म्हटलय का?"जग एक रंगभूमी ।वाटे सदैव नवीन। आयुष्य नाटकाचे।असती प्रवेश तीन।"या सार्या भावभावनांच्या रंगात रंगून जात असताना आपला वेगळा रंग जपणे व सार्या गुंत्यात गुंतुनही पाय मोकळा असणे,ही तर नटवर कृष्णाची लीलाच आहे.अजूनही मिरजकर सरांविषयी ,जोशी बाईसंबंधी व सर्व गुरुजनाबद्दल कृतज्ञ भाव तुझ्या मनात जागा आहे,हे जाणवते.सुधाकरची भुमिका वठवतानाही त्याचे वर्तनाविषयी चीड मनात आहे ,तरी रोल प्ले करावा लागतो.ही अरिहार्यता आहे जीवनाची!एकच प्याला सुटला वा सोडला तरी नव्या रुपात तो हाती येतोच पण कसा किती प्राशन करुन तोल सांभाळायचा ही तर "तारे" वरची कसरत आहे."आमचा प्याला दुःखाचा ।डोळे मिटूनी प्यायाचा। पिता तळाशी
उत्तर द्याहटवागाळ बसे।अनुभव त्या नांव
असे।" असे गडकर्यानी
म्हटले ते खर आहे.आता अनुभव मालिकांचे रंग भरलेला हा ब्लाॅगचा प्याला तू हाती घेतला आहेस.यात कोणता रस भरणार ते तुला ठावे! पण हा हास्यमधुर रसाचा प्याला कधी गंभीर आत्म चिंंतनाचे शां रसानेही उसळेल.बघूृ पुढचा रंग कोणता येतोय. वर्णन मन खिळवणारे असल्याने या रंगोत्सवाचा आनंद अवीट आहे.👌👌💐💐💐
या विस्तृत प्रतिक्रियेसाठी अनेक आभार शेटे सर. खरंतर रंगभूमीने खूप काही अनुभव दिले पण रंगदेवतेने पुन्हा व्यासपीठावर नाही बोलावले हेच खरे. तसेही नाटक करणे हौस म्हणून चालले होते माझे, त्यामुळे रंगभूमी कलाकाराला मुकली असे नाही वाटत मला. बऱ्याच नव्या-नव्या गोष्टी मलकापूरमुळे करून पाहता आल्या आणि एका खेड्यात जन्म घेऊन पण कितीही टिंगल-टवाळी करणारी असली, तरी एक support system कायम पाठीशी राहिली आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढत राहिला.
हटवागुरुजनांच्या बाबतीत मी खरंच कायम नशीबवान राहिली आहे मग ते मिरजकर सर, भिडे बाई असोत किंवा तुम्ही. गुरूंचा इतका सक्रिय पाठिंबा असणे, इतक्या छान प्रतिक्रिया लागलीच मिळणे हे माझे भाग्य समजते.
Thank you so much sir. Please keep on reading this blog and give me such honest reviews.
Mast ahe writting
उत्तर द्याहटवाKhup sundar ani halka fulka ahe ha blog!! Loving it!! Aajach wachalya sagalya post.
उत्तर द्याहटवाAll the best for future.
Thank yo so much.
हटवाNext time please comment khali naav liha! :)
खूपच वेगळा विषय हाताळला ..चाळीस वर्षांपूर्वीचा प्रसंग छान डोळ्यासमोर उभा केला..धुंदर..मिलिंद कुलकर्णी कोल्हापूर..
उत्तर द्याहटवाDhanyawaad Milind Kulkarni, Kolhapur.
हटवाआज एकच प्याला चे दोन्ही भाग वाचले. दुसरा भाग वाचतांना समोर रंगमंच आहे व आपण एकच प्याला पाहत आहोत असे वाटून गेले.ही खरच आपण आपल्या लेखनातून मूर्तिमंत एकच प्याला साक्षात वाचकांसमोर उभा केला हीच आपल्या लेखणीची कमाल आहे. काही आंबटशौकीन मुळे महारष्ट्र एका अभिनेत्रीला मुकला असे वाटते. आज आपल्या अष्टपैलू व्यक्तिम्त्वातील अभिनय या एक पैलू ची माहिती झाली.
उत्तर द्याहटवामिलिंद कुलकर्णी नाशिक
Hahaha.. Nahi nahi, asa kahi nahi. Abhinay ha anek chhandanmadhil ek hota, tyamule kadhi na kadhitari mage padalach asta.
हटवाThank you for the review Milind Kulkarni, Nashik!
आम्ही हस्लोय तूम्हाला..मान्य करतो..पण नाव नाही सांगत...
उत्तर द्याहटवाAgaupana ahe ha..!! 😂
हटवाभारी ..काय काय करतेस बई...आदर्श आहे बाई
उत्तर द्याहटवास्वाती