- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
माधुरीचा 'बकेट लिस्ट' पाहिला आणि वाटलं आपलीही असतेच की! फक्त आपली ऐकून कोण सिनेमा काढणार नाही इतकेच. तात्पर्य काय की मनात असेल आणि शक्य असेल ते करून टाकायचे. वर जाताना उगीच हे राहिले ते राहिले नको... असलं काहीतरी डोक्यात ठेऊन वर जायचं नाही… कावळा कस्सा झटकन अलगद शिवला पाहीजे! म्हणूनच वय वाढल तसं हे करू का ते करू असं मन भिरभिरलं पाहिजे.. असंच एकदा माझं लक्ष छानशा नारीकडे गेले, दुचाकीवर मागे दोन गोजिरवाणी मुले, पुढे पायात भाज्यांच्या पिशव्या, स्कार्फने झाकलेला चेहेरा त्यावर छान गॉगल, मान वाकडी करून एका हातानं कानाला लावलेला मोबाइल आणि एका हातानं दुचाकी सावरलेली! झोकात समोरून झोकात झपकन निघून गेली. तिला दोनच हात, तरीही एकाच वेळी इतक्या गोष्टी लिलया करत होती ! काय बाईचं स्किल.. अष्टावधानी.. वा वा hats off.. तोंडही न बघता सुद्धा मला आवडूनच गेली ती…. लगेच मी गाडी शिकायचीच असे ठरवले.
आमच्या तरुणपणी दुचाकी फारच टुकार होत्या. सुरूवातीला ‘लूना’ निघाली.. सायकलचंच पुढचं रूप होती, त्रिकोणी सायकल सीट, चालताना टुर्र ...आवाज करे. मग एम 80 आली, तिला दूध वाटप करणार्यानी प्रेमाने जवळ केले. या गाड्या चढतीवर ढकलत न्याव्या लागायच्या. सारख्या बंद पडायच्या, लोक तिला पळवत पळवत टुणकन उडी मारून आरूढ होत, जणू काही पळत्या घोड्यावरच मांड ठोकणारे बाजीरावच !... त्यामुळे दुचाकी चालवून पाहावी असं चुकूनही वाटलं नाही. लोकानी मोहात पडावं असं रूप एकीलाही लाभलं नव्हतं… मग 'हमारा बजाज' ने दुचाकीचा उद्धार केला. दुचाकीत ग्लैमर आणले खास लेडीजसाठी रंगीबेरंगी सनी, स्कूटी पेप अशा छोट्या गाड्यानी. मी त्यांच्या प्रेमात पडायला लागून, शिकण्याचा मोह व्हायच्या आतच दोन्ही मुलं भरारा गाड्या उडवू लागली. माझी दुचाकी शिकायची गरजच उरली नाही. अधे-मधे मन टोचणी देऊन जायचं, 'जन्माला येवून दुचाकी चालवली नाहीस.. थू तुझ्या जिंदगानीवर.. अडाणी बायका गाड्या उडवतात… तुम्ही बस्सा विचार करत..' शिकलेल्या माणसालाच कायद्याची भिती, अडाणीपणात खरे सुख असते, कारण परिणाम माहितीच नसतात. मग मुलांच्या मागे लागून दोन-चारदा मैदानावर गेले.. आधी 'वल्हव रे नाखवा' करत, विमानाने चाके बाहेर काढावीत तसे पाय बाहेर काढून पाय टेकत टेकत सुरुवात झाली.. आठवड्यात विमानाची चाके आत घेऊन चालवायला आली दुचाकी.. अत्यानंद जाहला. आधी मोडलेला हात परत दुखू लागला आणि गाडी चालवण्यापेक्षा पडण्याची भिती जास्त वाटायला लागली… घरातले सगळेच आपापल्या परीने पाय ओढायला लागले. पण मला मात्र आत्मनिर्भर, स्मार्ट ललना बनायचं होतं सगळ्यांच्या नाकावर टिच्चून!
शेवटी पहिलं पाऊल टाकत ड्राइव्हिंग स्कुल गाठलं. पडण्याचा इतिहास आणि मोडतोडीची भीतीच नको म्हणून कार शिकायचं ठरवत प्रशिक्षणाचा श्रीगणेशा केला. पहिल्यांदा क्लच हळूहळू सोडत गाडी हळूच काही इंच पुढेही नेली, तेंव्हा मला अगदी विमान उडवल्या इतकं भारी वाटलं. इंच-इंच लढण्याची ही लढाई आठवडाभर सुरु होती. क्ब्रेक-क्लच-गियर-स्पीड... करत डावा पाय -उजवा पाय असले घोकत प्रशिक्षण सुरू होते. मी झोपेतही पाय दाबू लागले (मी झोपेत जास्त शिकते की काय ते देवच जाणे!). इथे ही मला कडक गुरू मिळाले. गाडीचं चाक सारखं डावीकडे रस्ता सोडून उतरायचं, उजवीकडून सगळे आपल्याच अंगावर चाल करून येतायत असे वाटे. फार वर्षानी गुरूंकडून... ‘लक्ष कुठाय, ब्रेक लावा, क्लच, गियर टाका.. उजवीकडे बघा, समोर बघा, आरसा बघा’ असं पहिलीतल्या पोरीसारखं ओरडून घेतलं. तरी बरे त्यांच्या पायात ब्रेक होते.. नाहीतर प्रशिक्षणातच रवानगी तुरुंगात झाली असती. गुरुनी बराच कंठशोष करून, शेवटी जजमेंट का काय म्हणतात ते यायला लागलं. हळूहळू गाडी रस्त्यावर गर्दीत नेणे सुरु झाले. छातीत धडधड सुरु झाली… सगळे आपल्याकडंच पाहतात असं वाटायचं. काही लोक ‘ही कशाला शिकती? हे बायकांचे काम नाही ’ असे तोंड करायचे आणि लहान मुलं ‘ही बाई कुठं गाडी घालती बघू हे’ बघायला टपलेली असायची. घरातले पण ‘आम्हाला येतात ना गाड्या, गप मागे बसावं निवांत, ते नाही, ही बया गप काय बसेना’ असा मूकअभिनय दाखवत मजा पाहू लागले. सगळ्यांनाच माझा तेरड्याचा रंग तीन दिवसच टिकेल याची खात्री होती. मी मात्र जगाकडं दुर्लक्ष करून शिकायचा चंग बांधला.
कोल्हापूरमध्ये लोक आणि म्हशी रस्त्यावर कशा, कुठे आडव्या येतील हे ब्रह्मदेव पण सांगू शकत नाही. रस्त्याच्या मधून चालणे, इकडे तिकडे न बघता टोक्यासारखे रस्ते क्रॉस करणे, रस्त्याच्या मधोमध गप्पा मारणे इथे मना नाही. हे सगळे मला गाडी चालवताना पहिल्यांदाच समजले आणि मी पण हे सगळं अगदी अस्सच करते याचा साक्षात्कारही झाला! चालकाला ‘डोळे फुटले का रे तुझे?’, ‘हॉर्न वाजव की कचकून’, ‘कोण पण गाड्या का शिकतंय हल्ली’ अशा ओव्या नेहमीच ऐकायला मिळत. पण आता मी नवोदित चालक असल्याने गप्प ऐकूनच घेतले.
एकदा रंकाळ्याकडे गाडी घेतली… तोच समोरून तीन-चार म्हशी आडव्या आल्या, मला घाम फुटला. आता गाडी कशी काढू कळेनास्ं झालं. आमच्याकडे म्हशी फारच लाडक्या असतात, त्या मुळे तिला 'सरक' म्हणलेल्ं कोणीही सहन करत नाही. मी गरीबासारखी ब्रेक दाबून गप्प गार बसले… सर मला 'हॉर्न द्या हॉर्न द्या' सांगू लागले… मी जोरात हॉर्न देताच तीन म्हशी बाजूला पळाल्या. एक महिषी-सुंदरी मात्र कृतकोपाने माझ्या गाडीकडे, जवळ येऊन बघू लागली. सुरेख काळाभोर वर्ण, गळ्यात मस्त घुंगूरमाळ, कोचेरी लाल चुटूक लांब लांब शिंगे आणि चक्क शुभ्र बुब्बुळ असलेले काळे डोळे! मी या आणीबाणीच्या प्रसंगी काय करावे कळेना.. सर गालातल्या गालात हसत बसलेले.. आणि मी मात्र AC गाडीत घामाघूम! बापडी क्लच-ब्रेकवर घट्ट पाय रोवून उभी, गाडी एक इंच हलली नव्हती. पण हॉर्नने म्हशीपेक्षा म्हशीच्या मालकीणबाईचा घोर अपमान झाला आणि ‘तुझ्या हार्नला माजी म्हस भ्याली ’ म्हणून मला कोल्हापुरी ‘विशेषणांची’ लाखोली वाहायला सुरु केली. ‘येत न्हाई तर कशाला उडवतीस गं गाड्या?’ पर्यंत सगळं बोलून झालं. खरंतर त्या म्हशीच्या शिंगालाच काय नखालाही धक्का लागला नव्हता माझा पण बाई ऐकतील तर खऱ्या! शेवटी सरांनी मधे पडून तिच्या मालकिणीची गोड बोलून पाठवणी केली. तो पर्यंत त्या महिषी-सुंदरीने आमच्याकडे साफ दुर्लक्ष करून कधीच तिच्या घरचा रस्ता धरला होता, घुंगूर माळ वाजवत, शेपूट उडवत, तालात चालत होती… मी सुस्कारा सोडला. सर हसत टीप देऊ लागले, असली वेळ आली तर काय करायचे... तर घाबरलो असे दाखवायचे नाही, हॉर्न फक्त एकदा हळूवारपणे वाजवायचा… कोल्हापुरात कुणाचा नाद करायचा नाही… आपली बाजू कितीही खरी असली तरीही…. मी हा पहिला अचाट धडा गपगुमान गिरवला.
एके दिवशी कळंबा रोडवर एक ‘तळीराम’ रस्त्याच्या मधोमध हातवारे करत उभा, त्याच्या डावीकडून जावं तर पुरेशी जागा नाही आणि उजवीकडून जावं तर हा वळला तर काय करणार ? प्रशिक्षक सर म्हणाले अशावेळी आपण गप्प बसायचं… तो हलल्या शिवाय काहीच करायचं नाही. मी डोक्यावर हात मारून घेतला. मागे लोक ठणाणा हॉर्न वाजवू लागले, माझी गाडी उभीच. मग रस्त्यातल्या कुणीतरी त्याला बाजूला ओढला आणि एकदाची गाडी काढली. असले अनेक सनसनाटी अनूभव घेऊन ट्रेनिंग पार पडले.
R T O मधे आठचा आकडा काढा.. इंडिकेटर असताना हात बाहेर काढून गोलाकार हलवून बोटाने दिशा दाखवा, असल्या हास्यास्पद कालबाह्य परिक्षा देऊन एकदाचे लायसेन्स मिळाले. बोर्डात नंबर काढल्या सारखा चेहरा फुलून आला! खरी सत्वपरिक्षा इथून पुढे सुरु झाली.. कारण आता बाजू घेण्यासाठी सर येणार नव्हते.
दुचाकीवाले तर भुतासारखे कुठूनही कसेही अंगावर येतात. कसंही करून डावीकडून उजवीकडून गाडी पुढे दामटायचीच, एक सेकंद थांबतील तर शपथ! त्यातून गप्पा मारत, मान इकडे तिकडे करून थुंकणार, कशीही गाडी वळवणार, काही विचारू नका. अशीच एकदा दुपारी भर बाराला गाडी काढून निघाले, बरोबर पुत्ररत्न होते. नीट सावकाश गाडी चालवत डावीकडे वळले आणि.. धडाम करून कोणी तरी उजवी बाजू ठोकली… मी कचकन ब्रेक दाबला, डोळे मिटले... समोर बघते तर काय, एक महाशय दुचाकी उचलत होते.. शेजारी एक मुलगा पडलेला.. असेल एक पंधरा वर्षाचा. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला, घाबरत आम्ही खाली उतरलो, त्याला आधी लागलय का पाहिले. तो उठून पळत त्याच्या बाबा कडे गेला... रस्त्यावरचं सगळं पब्लिक गोळा झालं, थांबलं. कस्सं झालं, काय झालं चौकशा सुरू झाल्या. मुलाचे बाबा संतापले, मुलाला पाडले, नुकसान भरपाई द्यावी म्हणून जोरजोरात ओरडायला लागले. मला काही सुचेना.. पब्लिक पण त्यांची बाजू घेऊन ओरडू लागले. द्या पैसे, गाड्या उडवून पोराला पाडता, श्रीमंती थेरं, काढा पैसे.. लोकानी काही बोलायचे ठेवले नाही. खरं तर माझीच नंबर प्लेट फुटलेली, बंपर चेपलेले, पण अशा वेळी ज्याची गाडी मोठी तोच दोषी. लोकांच्या रेट्याने मी चुकले असे मलाच वाटलं, मी पर्स गाडीतून काढणार तोच… तिथे एक पोलिस गाडी आली, पोलिसानी काहीच न बोलता त्या मुलास ओढत नेऊन त्यांच्या गाडीत बसवले.. आणि त्याच्या बाबाना आणि आम्हाला पोलिस स्टेशनला मागून या असं फर्मावलं. मी पुरती घाबरले… मला उद्याच्या पेपर मधला मथळा डोळ्यांसमोर आला.. 'विमा अधिकारी बाईने बालकास उडवले!' फुकट डोक्याला ताप झाला होता. तरी बरे मुलगा जखमी नव्हता, नाहीतर डायरेक्ट रवानगी तुरुंगात झाली असती… असा विचार मनास चाटून गेला. विचार करत गाडी चालवताना पोलीस स्टेशन कधी आले समजलेच नाही. मनातल्या मनात देवाला नमस्कार केला आणि आयुष्यात प्रथमच पोलिस स्टेशनची पायरी धाकधूक करत चढले. समोर इन्स्पेक्टर साहेब आणि तो मुलगा बसलेला होता. त्याचे बाबाही धापा टाकत आले. ते येताच इन्स्पेक्टर साहेबांनी एकदम त्या मुलाला सणसणीत थोबाडीत दिली!... मी थक्कच झाले.. मग त्यानी त्याच्या बाबांना झाप झाप झापलं.. तो लाडोबा, पंधरा वर्षीय दिवटा गाडी चालवत होता म्हणे! पोलिस गाडीला ओव्हरटेक करून ते रत्न माझ्या गाडीस धडकले होते... हे ऐकताच आमच्या जिवात जीव आला.. वा माझी चूक नव्हती होय?.... मग मला चेव चढला, मीही आवाज चढवून लाडक्या पोराला आणि त्या आदर्श पित्यास मनसोक्त झाडून घेतले, चालक नियमही सांगितले. पोलिसाना सगळं खरं सांगितलं. पोलिसानी मैडम घाबरू नका अशी माझीच समजूत काढली. त्या आदर्श पित्यास आत टाकू का विचारले, मग दंड ठोठावला. MOTOR VEHICLE ACT चा प्रत्यक्ष वापर बघून मी मनोमन भारतीय पोलिसांना सलाम ठोकला. माझी वेळ चांगली म्हणून मी वाचले.
मी भांडले खरी पण आत्मविश्वासावर परिणाम झालाच. सारख्या Third party liability च्या केस आठवू लागल्या. ‘माझ्या हातून कुणाला लागलं तर? कोर्ट केस झाली तर?' असे विचार सारखे डोक्यात घुमू लागले. घरी काही सांगावं तर ते ‘तुला कुणी सांगितलंय सुखाचा जीव दुःखात टाकायला? सोडतोय ना ऑफ़िसला, कशाला गाडी चालवायची हौस?’ असंच विचारणार. ऑफिसमध्ये एका वर्षानुवर्षे गाडी चालवणाऱ्या सद्गृहस्थांशी बोलले. त्यांनी सल्ला दिला की ‘काही झालं तरी मोठा आवाज काढून भांडतो तो बरोबर असतो असं लोकमत असते त्यामुळे जोरात भांडा, पोलिसाची भीती तुम्हीच समोरच्याला दाखवा. तरंच भारतात कुठेही गाडी चालवणे शक्य आहे.’ हा सल्ला तंतोतंत पाळायचे ठरवले.
नवीन गाडी घेताच मुलं बिनधास्त गावभर दामटू लागली आणि माझा परत अर्जुन झाला आहे. पुढच्या पिढीचा नया अंदाज छान आहे तरीही मी मागे बसून सारख्या सूचना देतच असते. अधे-मधे मी कृष्ण होऊन सारथ्यही करतेच. आईला गाडी येते हे त्यांना विसरू देत नाही. घरातून ‘सपोर्ट’ की काय म्हणतात तो मिळवला मी अखेरीस! बाईला तो अस्सा मिळवावा लागतो, सहजासहजी मिळत नाही. अडाणी, तर कधी पिउन असलेल्या ड्रायव्हरच्या हातात लाख मोलाचा जीव देता आणि गृहलक्ष्मी वर अविश्वास दाखवता? म्हणून लेकीला सुद्धा 'गाडी चालवत ऑफिसला जा' असे फर्मावलं.
पण अजूनही बकेट मधे एक स्वप्न आहे की…. दुचाकी आणि मोटार यांच्या मधली, फक्त दोन सीटची चिमुकली फुल ऑटोमेटिक अल्ट्रा मॉडर्न कार बाजारात यावी, हवं तर बुलेट-कार म्हणा .. तिला छान भाजी ठेवण्याची छोटीशी डिक्की ही असावी.. चार्जिंग महिना भर टिकावे… अशा या अगदी टीप-टॉप ए सी गाडीत मी एकटीने ऐटीत बसावे, समोर सुनसान, रम्य काळाभोर गुळगुळीत डांबरी रस्ता असावा…. सगळे दुचाकीवाले गायब असावेत, प्राणी आणि पादचारी आपापल्या कुटुंबात निवांत बसलेले असावेत… आणि मी सुसाट वेगाने ड्रायव्हिंग करत रहावे. बघू हे स्वप्न कधी पूर्ण होतंय!!! टाटा सर मनावर घेतात की इलॉन भाऊ ते…. 😛
- विजयश्री तारे-जोशी
20.6.2020
स्थान:
Kolhapur, Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या




भाषा योग्य, समर्पक किस्से अन चटकदार वर्णन
उत्तर द्याहटवाप्रताप पाटील
Dhanyawaad!!
हटवाप्रा एस पी चौगले, वाकरे। मलकापूरकर विजयश्री, गाडी चालवण्याचा तुमचा नादच खुळा आणि वर्णन एक नंबर
उत्तर द्याहटवाAnek abhaar 😁
हटवाजयू खूप छान. तुझा ब्लॉग वाचताना मला मी गाडी चालवायला शिकले ते आठवले. माझीही अनुभव वेगळा नाही पण तुझ्यासारखा शब्द संग्रह नाही. खूप छान अशीच लिहीत जा. तुझी मैत्रीण सुचेता.
उत्तर द्याहटवाAnek abhaar Sucheta!! 😊
हटवाTuze anubhav lihile astes tar anakhi chhan watla asta..
Nakki lihit rahin, pratikriyahi det raha. Lihayla utsaha yeto mag. 😊
Chanch
उत्तर द्याहटवाThank you!
हटवासुरेख लेखन.
उत्तर द्याहटवावैजू
Thank yo Vaiju!! 😊
हटवामस्तच मॅडम खूप छान वाटले...
उत्तर द्याहटवाThank you so much!
हटवाSo true and innocently put, heart warming. Mam you have the talent to compile ur stories as in Malgudi Day's
उत्तर द्याहटवाHahaha.. This reaction made my day!! Thank you so much! 😊
हटवाड्रायव्हिंग शिकताना आपणास आलेले अस्सल कोल्हापूरी अनुभव आणि त्याबरोबरचे हलके फुलके किस्से वाचताना छान करमणूक झाली..
उत्तर द्याहटवालेखन सहज सुंदर असल्याने, लेख कधी वाचून झाला हे कळलेच नाही.....
👍👍😀
# अनिरुद्ध गायकवाड
Anek abhaar!! 😊
हटवाAsech wachat raha ani pratikriyahi kalawat raha! :)
श्री तुझा प्रत्येक लेख अतिशय सुंदर, शब्दांनी नटलेला असतो हे निर्विवाद सत्य आहे!! तुझ्या शब्दामध्ये एव्हढी ताकद आहे, की प्रत्येक प्रसंग तू आंमच्या मनपटलावर जसाच्या तसा उभा करतेस!!! तुझी स्मरण शक्ती तर अफाट आहेच, त्याच बरोबर तुझ्या सहज सोप्या भाषेने तू आम्हाला वेड लावलं आहेस!!!
उत्तर द्याहटवामी ही नंदुरबार ला असतांना four wheeler साठी driving class लावला होता. आमचे सर म्हणजे आमच्या वयाच्या निम्मे वयाचा मुलगा!!! ते right म्हणाले की मला वाटायचे ते मला बरोबर म्हणून शाबासकी देत आहेत!! तर ते मला त्या वेळी right म्हणजे उजव्या side ला घ्या म्हणायचे😊
माझा मुलगा मला म्हणायचा की मम्मी, ' त्या सरांकडे जरा लक्ष असू दे' मी म्हटले का रे बाबा? तर म्हणला अशी विद्यार्थ्यांनी मिळाली म्हणून ते आत्महत्या वगैरे करून घेतील!!! तरी तू लक्ष असू दे त्यांच्यावर!!😊 असा राग यायचा मला मग त्याचा!!! आणि मग एकदाची मी थोडी फार गाडी चालवू लागले, पण नमनाला घडा भर तेल!! तस माझं गाडी चालविण्यापूर्वी च हंडाभर घाम बाहेर पडू लागला! स्टेअरिंग तर एव्हढे घट्ट पकडू लागले मी की, हे म्हणायचे एके दिवशी तू मला ते स्टेअरिंग माझ्या हातात देशील आणि म्हणशील हे घ्या तुमचे स्टेअरिंग!!! शेवटी मी एकटीच गाडी घेऊन आसपास जाऊ लागले, कारण गाडीत कोणाला बसविले तर, ते म्हणायचे तुझी policy आहे , पण आमची नाही ना!! शेवटी एव्हढा घाम गाळून काहीच output निघाले नाही, आता जवळजवळ 3 वर्षांपासून मी four wheeler च्या driving seat वर बसलेले नाही!! आता पर्यंत लोकांचा माझ्यावर विश्वास नव्हता, आता माझाच माझ्या driving वर नाही!!!
किती सुंदर प्रतिक्रिया मंदा!! अनुभव वाचायला आणि आपलं आणि हिचं किती सारखं चाललंय हे बघायला खूप मजा येते. अशीच वाचत राहा आणि तुझे अनुभवही सांगत राहा. 😊
हटवास्टेरिंग मी पण सुरवातीला घट्ट पकडून ठेवायचे ते पळून चाललेलं असल्यासारखं..😂
पण शिकूनही तू आता चालवत नाहीस हे काही बरोबर नाही. माझा विश्वास आहे बघ तुझ्या ड्रायव्हिंग वर. आता भेटलो की छान लॉन्ग ड्राईव वर जाऊ, कुठल्यातरी छान आणि मोकळ्या रस्त्यावर.. घरच्यांच्या नाकावर टिच्चून!! 😆
Car draving che anubhavache varnan farach chan. Apratim lekh.Abhinandan.
उत्तर द्याहटवाDhanyawaad.. Pratikriyemadhye naav nakki liha.. 😊
हटवाकुंदा पाटील, बदलापूर
उत्तर द्याहटवाअग श्री driving शिकण्याचे किती मस्त अनुभव लिहिले आहेस तू वाचतांना मी पुन्हा एकदा फ्लॅश बॅक मध्ये फिरून आले आणि वाटलं अरे सगळ्यांनाच असेच अनुभव येत असतील का खरं तर मी पण दुचाकी वयाच्या चाळीशी नंतर शिकले पण तोपर्यंत मला नेहमीच ऐकावं लागलं की तुला दुचाकी ,चारचाकी कधीच चालवता येणार नाही ( सायकल मात्र खूप छान चालवायचे अग त्या वेळी कॉलेज ला असताना सायकल चा जमाना होता पण आता यांना ते कौतुक नव्हते आता दुचाकी येत नाही हे महत्वाचे ) मग काय एकदा मनावर घेतलंच आणि दुचाकी शिकलेच मला यांनी शिकण्यासाठी चांगली सहा महिन्यांची मुदत दिली पण आपण बायका म्हणजे एकदा मनावर घेतलं कि झालं सोळा दिवसात दुचाकी शिकून रोज 28 ते 30 किलोमीटर driving करून बँकेत जाऊ लागले लोकल ने up-down न करता तब्बल सहा वर्ष मी दुचाकीने गेले दरम्यान मी चारचाकी क्लास लाऊन शिकले पण फक्त चारचाकी लायसन मिळवण्यासाठी 😊 बदली झाल्या नंतर पुन्हा लोकल ने up-down सुरू झालं.पण श्री एक सांगते अग तस म्हटलं तर आपण बायका जो संसाराचा गाडा 😜 चालवतो तो म्हणजे संसाराची गाडीच असते ग जस ड्रायव्हर एकाचवेळी क्लच, ब्रेक, अक्सिलेटर, दोन्ही आरसे, पुढचा रस्ता, मधे मधे गप्पा (आता त्यात मोबाईल ची भर पडली) हे सर्व करत असतो तस आपणही संसारात एकाचवेळी बऱ्याच गोष्टी हँडल करत असतो आणि संसाराचा एक चांगला सारथी बनण्यासाठी प्रयत्न करतो हो ना दोन्ही ठिकाणी शिक्षणाची गरज असतेच असं नाही ' शिकलेली व्यक्ती उत्कृष्ट driver असू शकते पण उत्कृष्ट driver हा शिकलेला असेलच असं नाही ' अग श्री एक नक्की प्रत्येकाने driving शिकण्याचा प्रयत्न जरूर करावा असं मला वाटतं कारण त्यातून बरंच इतरही शिकता येत हे नक्की तुझं सुंदर लिखाण मला खूप खूप आवडतं असच लिहीत रहा लिहिण्याची ही कला खरंच कौतुकास्पद आहे 👌👌👌अनुभव प्रत्येकालाच येत असतात पण लिहिणं सगळ्यानाच जमेल अस नाही तुला पुढील लेखासाठी "All The Best"👍
कुंदा पाटील, बदलापूर
अगदी खरी आणि छान प्रतिक्रिया आहे कुंदा. तुला इतकी छान दुचाकी येते याचा तुझ्याहून जास्त अभिमान मला आहे आता.😊 मिळेल त्या गोष्टी आणि मिळेल त्या संधी घेऊन नेटाने पुढे जात राहिली आपली पिढी आणि पुढच्या पिढीला आपल्याहून सगळं सहजपणे मिळालं किंवा आपणच दिलं. त्यामुळे त्यांच्याकडून कौतुकाच्या अपेक्षा ठेवणं व्यर्थ आहे. 😪
हटवाबाकी संसाराचा गाडा आणि कार यांचं गणित अगदी सुंदर मांडले आहेस. पुस्तकी शिक्षण असलं की खूप जास्ती विचार करतो सगळ्याचा असं वाटतं मला. मग risk factor कमी होतो जीवनातला आणि रस्त्यावरचाही. तू किंवा मी कधीही ६-८ तासाच्या वर सलग कार ड्रायविंग नाही करणार पण नुकतंच commercial licence मिळालेल्या एका मुलाला १६-१८ तासाची शिफ्ट म्हणजे मजा वाटते. आपल्याबरोबर दुसऱ्याचा जीवही धोक्यात टाकतो आहे याची जाणीवही नसते. भीमसेन जोशींचा एक जुना interview वाचला कधीतरी. ते कायम स्वतः गाडी चालवत, कारण लाखमोलाचा जीव त्यांना या लोकांच्या हातात देणे पटत नसे. अर्थातच याला या ड्रायव्हर्स ना असलेली पैशांची गरज ही एक बाजू आहेच.
ड्रायव्हिंग जीवनाबद्दल खूप काही शिकवून जाते हे अगदी पटलं मला !!😊
अशाच अनुभवसंपन्न प्रतिक्रिया देत राहा! 😊😊
श्री अग तू लिहितेस खूपच छान, त्यानंतर प्रत्येकाच्या अभिप्रायला पण खूप छान प्रतिसाद देते यालाच म्हणतात लेखक आणि वाचकाचा सुंदर संवाद, जस कोणत्याही स्टेजवर वक्ता असो अथवा नट/कलाकार असो श्रोता दाद देणारा असेल तर अजून प्रोत्साहन मिळत तसाच तुझ्यात आणि आमच्यात सुंदर संवाद साधला जातो आहे आणि हो मी जे म्हणाले न की प्रत्येकाने driving शिकावं ते याच साठी की आपलं जीवन पण एका रस्त्यावरून जात असत, कधी खडबडीत रस्ता, कधी डांबरी, कधी काँक्रीट प्रत्येक रस्त्याची आपणास सवय होते.किंबहुना जीवनात ती सवय करून घ्यावी लागते. ड्रायव्हिंग करताना मी विचार करायची की आपण कितीही नियमात, आणि बेस्ट ड्रायव्हिंग केलं तरी समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे अपघात होऊ शकतो. असे अपघात जीवनात होतातच की जिथे आपली काही चूक नसते.ड्रायव्हिंग मुळे गाडीचा speed कुठे किती ठेवावा हे शिकतो पण त्याच बरोबर जीवनात पण speed कुठे किती कमी -जास्त ठेवावा हे पण शिकायला मिळाले अस बरंच काही असतं तुझ्या इतकं सुंदर मला नाही लिहिता येणार पण तुझ्या Thanks/धन्यवाद ला पण दाद द्यावी असं वाटलं 👍असंच लिहीत रहा पुन्हा एकदा ' All the best ' कुंदा पाटील, बदलापूर
हटवाKharach agadi chhan reviews lihites tu Kunda!! They are very motivational for me!!
हटवाThank you so much!! 😀😀
Madam.
उत्तर द्याहटवाAs usual Ur write up is wonderful n witty.
Kolhapuri "s"prasang Chan umatleya.Police incidents creates anxiety n later it's peaceful n jokular character is attractive .Very Good experience nicely displayed. All the best.Thank u
R.B Tophkhane..Belgawi
Thank you Mr. Tophkhane!! 😀
हटवामी गाडी शिकताना, एका हातगाडी वाल्याला धडकलो होतो, एक गाडीतर पूर्ण मित्रमंडळीनीच वापरली, दुसऱ्या गाडी पासून जमायला लागले,आता 25 वर्षांनी प्राविण्य मिळाले पण गाडी जास्ति करून मुलग चालवतो, आणि बाबा गप्प बस सल्ले देऊ नकोस म्हणतो!😜😜😜
उत्तर द्याहटवाMilind Gurjar
Hahaha.. Gharoghari matichya chuli!! 😀😀
हटवाThank you Mr. Gurjar..
Same experience to me..
उत्तर द्याहटवाhahaha..
हटवामला ही गाडी चालवता येत आहे..पण हातात येत नाही..तुमचे वाचून टेच आठवतं..
उत्तर द्याहटवाआरती पाठक
आपलं असंच होतं. पण अधून मधून हक्काने घ्यायचीच काढून!
हटवा
उत्तर द्याहटवामस्त !! लिहत राहा madam!!
मानावेच लागते तुमच्या लेखनाला...मला म्हैस अगदी पटली हो..रोज आडव्या येणारच..कोल्हापूरचे नामी लोक...
उत्तर द्याहटवाR.S.Patil