- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चौथीपर्यंत जमिनीवर बसून, धांगड-धिंगा करत ‘शिक्षण’ की काय ते पार पाडले आणि मग रयत शिक्षणसंस्थेच्या ‘मुलींच्या हायस्कूल’ मध्ये नदीचे पाणी सागराला मिळते तशा वहात वहात आपोआप पोहोचलो. खडबडीत जमिनीवरून आयुष्यात प्रथमच बाकावर उच्च आसनावर बसण्याचे योग आले. संस्थानिक कै.आप्पासाहेब पंतप्रतिनिधींच्या राजवाड्यात शाळा भरत असे, त्यांनी दिलदारपणे सगळा वाडा शाळेला वापरायला दिला होता. चारी बाजूला वाड्याची चिरेबंदी, जुनी भक्कम दुमजली इमारत आणि मधे भवानीचे मंदिर असा वेगळाच थाट होता. आप्पासाहेब म्हणजे स्वत:चे म्युझियम असलेल्या औंध संस्थानाच्या भवानराव पंतप्रतिनिधींचे भाऊबंद. विशाळगड संस्थानचा कारभार आप्पासाहेबांकडे होता, त्याची राजधानी म्हणजे मलकापूर. संस्थानाच्या मालकीची बरीच शेतीवाडी आहे आणि त्यावर असंख्य कुटुंबे आजवर पोसली जात आहेत. एकूण काय तर संस्थानी थाटात आमचं उच्च शिक्षण सुरू झालं.
भिडेबाईंनी टाकीचे घाव घालून पुढचे पैलू पाडायला अलगदपणे आम्हाला त्यांच्यापेक्षा काकणभर जास्त कडक, शिस्तप्रिय अशा निर्मला जोशी बाईंकडे धाडले. आमचे पालकही त्या कुशाग्र बुध्दीच्या विदुषीकडे आम्हाला सोपवून निर्धास्त झाले. जोशी बाईंनी अनेक वर्षे मुख्याध्यापिका हे पद भूषवून त्या वेड्या-भोळ्या खेड्याला एकदम पन्नास वर्षे फॉरवर्ड करून टाकले. जोशी बाई आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब अतिशय आधुनिक विचारांचे होते. डॉक्टर पती असलेल्या या बाईंनी मलकापूर सारख्या खेड्यातल्या फक्त स्त्रियांवर लादलेल्या अनेक परंपरांना सरळ छेद दिला. बाईंनी कधीही सामान्य सवाष्णीसारखे कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या असले कुठलेच लेणे वापरले नाही. आज पन्नास वर्षे लोटली तरीही आम्ही बायका या मुक्तीचे धाडस दाखवू शकत नाही. अशा काळाच्या पुढे असलेल्या बाईंनी आम्हाला स्त्रीच्या कर्तृत्वाची प्रचिती दिली. स्त्रीचं असणं तिच्या दिसण्यापेक्षा महत्वाचे असते हे आमच्या कोवळ्या मनावर छान बिंबवले. त्यानी बहिणा बाईंची 'लपे कुंकवाच्या खाली माझ्या करमाची रेखा' ही ओवी स्वत: जगून दाखवली, म्हणजेच कर्म उत्तम ठेवले कुंकवा खाली झाकले नाही.😊 कुणीही आम्हाला कुंकू आणि बांगड्या का नाहीत असं विचारलं की आमचं उत्तर तयार असायचं ‘बाई कुठे कुंकू लावतात, त्या बघा किती विद्वान आहेत.’ मग कंटाळून लोकांनी आम्हाला सुधारण्याचा नादच सोडला. काही मुलींना आवडायचं सगळं आणि त्या छान नटून शाळेला यायच्या. किशोर वयात कुठलीही गोष्ट ‘लादली गेली आहे’ असं वाटलं की बंड करून ती प्रथा मोडावी असे तीव्रतेने वाटे हेच खरं.
![]() |
| मुख्याध्यापिका निर्मला जोशी |
अत्यंत देखणं रूप, करारी नजर, व्यवस्थित मागे बांधलेले केस, हातात फक्त एक घड्याळ, खांद्याला पर्स, सुरेख साडी अशा बाई आम्हाला एखाद्या आधुनिक तपस्विनी सारख्या वाटायच्या. त्या कायम गाणी गुणगुणत असायच्या, माणिक वर्माची गाणी फार गोड गायच्या. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कर्म अगदी पोलिस खात्याला योग्य ठरावे असे कणखर होते, समोर बाई असो की पुरूष, नजरेची धार बघून गारद व्हायचा. आम्हाला त्या आकाशाइतक्या ग्रेट वाटायच्या, मग आम्ही त्यांचे अनुकरण करून तोंडे आरशात न पाहता, विद्वत्तेचे नसलेले तेज मिरवत शाळेला जात असू. बाईंचे सगळेच विचार जगावेगळे आधुनिक, आम्हाला त्यांच्या तेज:पुंज चेहर्याकडे, डोळ्यांकडे पहाताच येत नसे...अगदी तेजस्वी ज्ञानसूर्य देवताच! डोळे दिपूनच जायचे.
हायकूल प्रवेशाचा स्वर्गीय आनंद म्हणजे बाकावर बसणे. सुरुवातीला खूप मजा वाटायची. लक्ष नसताना एकमेकींना ढकलून, कडेलोट करून पाडणे आणि हसत बसणे असे असुरी प्रकारही चालायचे. शिस्त तर लागायला तयार नव्हतीच त्यामुळे वर्गात नुसता दंगा आणि वटवट चालायची. त्यात नवे इंग्रजाळणे सुरू झाले. ‘एच्च्चाय जेके एल्ला-मँन्नो-पी’ करत वर्ग डोक्यावर घेणे चालू झाले. हजेरीचे ‘येस्सर’ 'म्याय कमिन' सुरु झाल्यावर सगळ्यांना आपण मड्डम झाल्यासारखं वाटायला लागलं. 😂 'आय एम - वी आर', 'हाय्याव, हूइय्याव’ ही घोकंपट्टी तारस्वरात केकाटत तालात चाले. म्हणूनच पाचवी- सहावीचा वेडा वर्ग खालच्या मजल्यावर मंदिराजवळ बसवलेला होता, वाळीत टाकल्यासारखा. सीता, गोपाळ आणि यास्मिन या पात्रानी सहावी पर्यंत पाठ सोडली नाही सगळ्या धड्यांमध्ये हीच पात्र! घरात पण माझं उच्च कोटीचं फाडफाड वाजणारं इंग्रजी पाहून छोटा भाऊराया पण ‘what is your surname is Mulik !’ असे अकलेचे ‘तारे’ तोडू लागला. त्याच्या सरांचे नाव मुळीक होते! 😆 थोड्याच दिवसांनी जोशीबाईंनी आमचे अगाध इंग्लिश हातात घेऊन पाया घालायला सुरु केला म्हणून बरे, नाहीतर इंग्रजी भाषा बिघडवण्याऱ्या मुली शोधायला इंग्रज चौकशी करत इथवर आले असते! बाईंनी ग्रामर इतके बारीक घोटून आमच्या मेंदूत ओतले की, चुका झोपेतही होत नाहीत. इंग्रजी हा भयाकारी विषय आणि समोर कडक बाई... पूर्ण वर्गात स्मशान शांतता पसरे. ती भाषा आहे सुंदर सोपी पण मराठीची मज्जा नाही. आमच्या फक्त रफारानी आम्ही तिला नामोहरम करू. उच्चार शास्त्राच्या भितीनेच तर अनेकानी इंग्रजीचा नाद सोडला असावा. Future चा उच्चार स्पेलिंग प्रमाणे फटूरे आणि Nature चा नटुरे का नाही? यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. काळाचे ही पूर्ण आणि अर्धवट प्रकार, कश्शाला लागतात याना? … या भाषेच्या दहशतीने हायस्कूल मधे उगीच आलो असे वाटावे अशी परिस्थिती होती. पण हेच अतिशय सोप्या पद्धतीनी बाईंनी इतके सुरेख शिकवले की भिती कमी होत गेली. पायाच इतका भक्कम रचला की इमारत आपसूकच सुंदर डौलदार बनली. या पायावर पुढे मी M.A. English केले आणि याचं पूर्ण श्रेय शाळेलाच जातं. 😊
हिंदीतर आम्हाला मराठीची बहीणच वाटायची त्यामुळे अगदी बेमालूमपणे यातले शब्द त्यात घुसडायचो, शेवटी ‘दंड’ आला म्हणजे झालं. अजूनही हिंदी तेवढंच दिव्य आहे. अगदी परवाच 'खोब्रा बारीक खवणके उस्मे गूळ डालके मोदकका सारण बनाते है' ही कृती एकीला सांगितली.😂 हिंदी अभ्यासक्रमातले तर फक्त ‘मीना का सपना’ आणि ‘शेखचिल्ली’ लक्षात आहे, बाकी काही आठवतही नाही पण हिंदीतून बोलायची हौसमात्र टिकून आहे. शेखचिल्ली अगदी माझ्यासारखं मनात बोलत बसायचा, धडपडत पडायचा आणि मीना कायम माझ्यासारखीच स्वप्ननगरीत वावरायची.😝 भूमितीच्या बाकोबा, बाबाबा, कोबाको गृहितकानी आमचा जीव खाल्ला त्या पायथागोरसने तर विनाकारण आठवी पासून पाठच धरली. एकसामयिक समीकरणानी प्राण कंठाशी आणला. त्यातलं कोणीही आमच्या आयुष्यात परत वाटेला गेलं नाही. इथे साधी भिंत बांधताना फुटात सहा इंचाचा फरक पडतो, इंजीनियरचा कर्ण पकडायची पाळी येते...वास्तवात कोण बघतो तो पायथागोरसचा कर्ण ? कितीही फेडले तरी मारुतीच्या शेपटी सारखे कधीही न संपणारे कर्ज आणि पोष्टाचे जमा-व्याज हे एक गणित सोडले तर कुठे लागले आपल्याला बीजगणित? आयुष्याची साधी-साधी वाटणारी गणिते सुटता सुटेनात मग समीकरणं कोण सोडवणार? आणि आपण बरेच अनावश्यक विषय शिकून डोक्याचा पार भुगा केला हे आत्ता कुठे समजले. तसेही शालेय जीवन ‘परिक्षार्थी’ म्हणूनच जगलो आम्ही, बाकी सगळ्या चौसष्ट कलांमध्ये मात्र ‘ज्ञानार्थी’ होतो.
आम्हाला लाभलेले शिक्षक एकदम खानदानी ,सुसंस्कृत होते. पुलंच्या मास्तरांप्रमाणे धोतराला नाक पुसत नसत. सरुडकर सर म्हणजे हुबेहूब कर्मवीर भाऊराव पाटलांचे तरूण रूप, तसाच लालबूंद करारी चेहेरा, सरळ नाक, मजबूत शरीरयष्टी आणि छातीपर्यंत रुळणारी काळीभोर दाढी! सर नेहमी भट्टीची पांढरीशुभ्र विजार आणि नेहरूशर्टमधे असायचे. त्यांना शिकवायला कुठल्याही विषयाचे वावडे नव्हते, मराठी, इतिहास ते पी.टी. सगळे शिकवायचे, सुंदर ढोल वाजवायचे आणि उत्तम गाणीही म्हणायचे. हे सर तसे सनातनी होते, उद्या पासून कुंकू लावून या असे म्हणायचे तिकडे आमच्या जोशी बाई अगदी आधुनिक कुंकू-परंपरा ही अंधश्रद्धा मानणाऱ्या. कुंकू लावू की नको 'to be or not to be' या गूढ प्रश्नाला त्या वयात सामोरे गेलो आम्ही. आत्ताच्या पक्ष कार्यकर्त्यांना जसे 'विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती' कळत नाही... अगदी तीच अवस्था झाली. मग प्रत्येकीने आपापला झेंडा घेऊन शाळा पार पाडली.(तेंव्हा पक्ष रोज बदलायची फ्याशन नव्हती.) मी मात्र आजही घरात जोशी बाई आणि बाहेर सरुडकर सरांचा झेंडा घट्ट धरून ठेवलाय. जोशीबाईंचे परखड विचार अंगीकारायला अजून एक जन्म घ्यावा लागेल बहुधा. 😅
लेले नावाच्या एक घाऱ्या डोळ्यांच्या, प्रेमळ बाईही होत्या. त्यांच्या रुमालाला कायम मोगऱ्याचे अत्तर असायचं त्यामुळे त्यांच्याबरोबर मोगऱ्याचा सुवासही वर्गात दरवळे. त्या आम्हाला भूगोल आणि भूमिती शिकवत, आता या दोन विषयात ‘भू’ सोडून काय साधर्म्य होते हे देव जाणे! बहुतेक तेंव्हा ‘सगळे विषय शिकवता आले पाहिजेत’ या बोलीवरच रयत मध्ये ऑल-राऊंडर शिक्षक नेमत असावेत, कारण त्या ‘कार्यानुभव’ पण शिकवायच्या. 😅 बाईंना आम्ही खूप दंगा करून त्रास द्यायचो, मुळीच घाबरायचो नाही. बाई खूपच शांत, साध्याभोळ्या, कोमल मनाच्या होत्या. कधी कधी त्यानी रागावून एखादी चापट मारली तरी त्यांनाच वाईट वाटे आणि आम्ही मात्र वेड्या सारख्या हसायचो! जनाची नाही तर मनाची वाटावी म्हणजे काय तेच कळत नव्हते. बाईंनी पृथ्वीचा गोल आम्हाला शालेय आयुष्यात एकदाच जवळून दाखवला, इतर सगळे दिवस तो गोल प्लास्टिकच्या पिशवीत तोंड लपवून कायमचा कपाटावर बसलेला असायचा. पृथ्वीगोलाच्या खाली असलेले लोक पडत कसे नाहीत? हा प्रश्न पडे पण लेले बाईंची नाजूक चापट नको, म्हणून विचारला नाही. भूगोलातले खारे वारे-मतलई वारे ..मतलबी वाटायला लागले. मग Tundra प्रदेशातल्या एस्किमो सारखे इग्लू मधे रहायला जावे आणि पाय मोकळे करायला हिरव्याकंच प्रेअरी प्रदेशात जावे असे वाटायला लागले…. इतकाच काय ते भूगोल आवडला व कळाला. तीच परिस्थिती प्रयोगशाळेची, तिथे फक्त निळा आणि लाल लिटमस आणि कांद्याच्या पापुद्र्यांचे आणि बटाट्याच्या बारीक कापाचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण झाले की एरवी प्रयोगशाळेला कुलूप! बोर्डाला मार्क होते म्हणून काय ते दहावीच्या मुलींना तिचे अंतरंग दिसे, बाकीच्या मुलींनी दूरून तिला पाहायचं आणि फक्त चित्र-विचित्र वासावर समाधान मानायचं. मी कौतुकाने मुलांना सायन्सची आवड निर्माण होऊ दे म्हणून 'young scientist' नावाचा एक खेळ आणला होता. भिंग, लिटमस, टेस्ट ट्यूब्स असं बरंच काय काय होतं त्यात. मला वाटलं आता वर्षभर छान ‘प्रयोग’ होतील घरी, कुठलं काय, तासाभरात त्यातले सगळे ‘प्रयोग’ संपवून, भिंगाने कागद जाळत बसलेली रत्ने पाहून अगदी धोपटावं असं वाटलं होतं त्यांना! 😆मुलांचे पाय हे असे पाळण्यात दिसले.
‘Smiling face is more important than beautiful clothes.’ असे सुविचार वर्गात लिहिलेले असायचे. शाळेला युनिफॉर्म असल्याने घरी घालायला २ फ्रॉक पुरायचे, फार तर एखादा ठेवणीतला फ्रॉक.. संपलं! कपाटाच्या एका कप्यात वह्या-पुस्तके, कंपास आणि कपडे, सगळंच छान बसायचं! आता पोरांची दप्तरे उचलून आई बाप वाकलेत.. आणि कपड्यांची कपाटं ओसंडून वहाताहेत. त्यात आता ऑनलाइन शिक्षणासाठी नवे मोबाइल घेऊन माता-बालक प्रशिक्षण वर्ग सूरू झाले आहेत, केवढी ही उत्क्रांती ! ओल्या जमीनीवर बसून शिक्षणाचे वाघीणीचे दूध काढणारया आम्हाला, पालकांनी मोबाइल दिला असता का? असा विचार मनात येताच...कुणी तरी माझी जोरात कानपिळी केल्याचा भास झाला !!!
शाळेतल्या मुलींनी आता वेगळे अत्रंगी रंग भरायला सुरवात केली. सहावीत असताना आमच्या वर्गातल्या एका मुलीला लागिर्ं झालं, म्हणजे भूतानं झपाटलं… रोज दुपारी बारा वाजता बाकावर घुमायला लागायची..आमची भितीने गाळण उडायची, घुमत असताना ती भयानक दिसायची, डोळे लालबुंद करून गरागरा फिरवायची, थोड्या वेळाने शांत व्हायची. वर्गात जीव मुठीत घेऊन बसायला लागलो, मग दोन दिवसांनी ती घुमायला लागली तशी आम्ही बातमी ऑफ़िस मध्ये दिली. सगळे शिक्षक जमा झाले, बाईंनी तिला हाक मारली… हिचे आपले हूँ..हूँ..सुरुच,मग सरळ पाठीत एक धपका दिला.. आमचे डोळे विस्फारले...वाटले भूत आता सगळ्या शिक्षक लोकांवर धाऊन जाणार, हल्ला करणार.. पण भूत गप्प… अजून एक धपका बसला.. ते भूत आमच्या बाईंना, सरांना घाबरले... आणि ती मुलगी क्षणात घुमायची बंद झाली. घाबरून भूताने त्या मुलीचे झाड सोडले म्हणे! हा प्रयोग समक्ष बघून आमचा भूतावरचा विश्वास कायमचा उडाला. शाळेने आमचे अंधश्रद्धेचे मळभ आपोआप दूर केले.
नवरात्रीचे नऊ दिवस वाड्यात देवीचा उत्सव चालायचा. रोज नवनवीन पदार्थ मोठ्या पातेल्यात शिजायचे, श्रीखंड-पुऱ्या, वडे- लापशी अशा खमंग पदार्थांचा सुगंध वाडाभर दरवळायचा. पंतप्रतिनिधींची मुले, नातवंडे आवर्जून मलकापूरला यायची. कुमारसाहेबांच्या सुंदर, सुविद्य पत्नी, दिलदार मनाचे आप्पासाहेब, राजस सुहास्य वदनी वाहिनीसाहेब आणि राजघराण्यातली इतर तेजस्वी मंडळी शाळेत दिसायची. राजा रवी वर्माची सगळी चित्रे जिवंत होउन शाळेत अवतरलीत असे वाटे. कुमार साहेबांच्या गोंडस मुली रेशमी परकर-पोलकी घालून पैंजण वाजवत इकडे तिकडे हसत खिदळत पळायच्या. जेवणाच्या पंगती उठायच्या, हळदी-कुंकू, भजन, आरती कार्यक्रमांची रेलचेल असायची. नैवेद्य, धूप, उदबत्ती, केवडा, मोगरा,चंदन आणि सुवासिक फुले असे सगळा मिळून एक वेगळाच मिश्रगंध शाळाभर पसरे. डोळे आपोआप मिटून हात जोडले जायचे आणि त्या मनमोहक वातावरणात आमचं रुक्ष शिक्षणही चालायचं.😑 किती लक्ष लागत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. 😂 आता वाडा पूर्ण पडून गेला आहे, फक्त मंदिराचे अवशेष आणि जुन्या मूर्ती अजूनही आहेत. आजही मनाने मी दर नवरात्रात माझ्या बालपणातल्या त्या गंध भारल्या वाड्यात डोकाऊन येते. शाळा म्हंटले तरी मनात ते सगळे आवाज आणि सुवास पिंगा घालू लागतात.
तेंव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांचे मानसपुत्र बॅरिस्टर पी.जी. पाटील आणि त्यांच्या पत्नी सुमती बाई दरवर्षी आमच्या पारितोषिक वितरण समारंभाला यायचे. आम्हाला अनेक बक्षिसे त्यांच्याकडून मिळाली पण फोटो नसल्याने ते क्षण चिरंजीव नाहीत झाले. दहावीचा पारितोषिक वितरण समारंभही त्यांच्याच हस्ते झाला पण फोटोच्या स्मृती नाहीत याचं खूप वाईट वाटतं. त्यांची अमृतवाणी, प्रभावी भाषण आणि ते अजरामर क्षण मी मनाच्या कुपीत अगदी जपून ठेवले आहेत. पाटील सर आणि सुमती बाईंनी आपले रहाते घर सुद्धा संस्थेला दान करून, कर्मवीरांची परंपरा अबाधीत राखली. दोन-पाच हजार वस्तीचे ते गाव आणि त्यातली ती साधीशी पडायला आलेली शाळा, आमचा सगळा बौद्धिक विकास याच शाळेने केला. कुठलीही साधने नाहीत की सुखसोयी नाहीत. सगळे शिक्षक जीव ओतून शिकवणे हेच काय ते भांडवल. तरीही कधीही क्लास नाही लागले, ना कुणी कुठल्या परीक्षेत मागे पडलो किंवा ना कुणी जीवनाच्या लढाईत मागे पडलो! सगळे शिक्षक शिस्तप्रिय आणि तितकेच प्रेमळ. सगळ्यांवर करडी नजर ठेवणाऱ्या कणखर जोशी बाई. फक्त दहावीच्या निरोपसमारंभदिवशी त्यांचा आवाज सद्गदित झालेला ऐकला आणि आम्ही सगळ्या त्यांच्या समोरच ढसढसा रडलो. अगदी मुलींची पाठवणी करताना होते तशी सगळ्या शिक्षकांची अवस्था झाली. (लिहिताना सुद्धा डोळे आपोआप भरुन आलेत!) शाळेने आम्हाला कधी दुबळं वागू दिलं नाही. आमच्या मुली कुठेही टाकल्या तरी उभ्या राहिल्या पाहिजेत. स्त्री ही शोभेची बाहुली नाही हे लक्षात ठेवा. ठामपणे निर्भयतेने सगळ्याला झुंज द्या, जग तुमचंच आहे असा संदेश सगळ्या शिक्षकांनी कायम दिला. पाठ्यपुस्तकं शिकवणे तसं सोपं आहे पण जगायची कला शिकवणं खूप कठीण. आता असे रक्ताचं पाणी करून शिकवणारे आणि स्वाभिमानाने जगण्याचे पाठ देणारे शिक्षक सापडणे कठीणच. आमची आत्मविश्वासाची, कष्टाने यश खेचून आणण्याची अस्मिता शाळेने जागृत केली म्हणूनच मलकापूरची एकही सुकन्या लेचीपेची, मुखदुर्बळ शोधूनही सापडणार नाही. माझ्या इवल्याशा शाळेने मुलींना बळ दिलं, समर्थ केलं! या शिदोरीवर आमची जीवन नौका डौलाने पुढे जात आहे.
![]() |
| सन्माननीय आप्पासाहेब पंतप्रतिनिधी, त्यांच्या पत्नी वहिनीसाहेब पंतप्रतिनिधी आणि आमच्या मुख्याध्यापिका निर्मला जोशी |
अशी ही माझी शाळा आणि वंदनीय गुरुवर्य, सगळेच मनाने खूप श्रीमंत आणि आठवणीत चिरंतन! कर्मवीरांच्या त्या कर्मभूमीला वंदन करून तिथे शिकायला मिळालं याबद्दल मी स्वतःला फार नशीबवान समजते.
गुरुपौर्णिमेला आमचे सगळे शिक्षक,बाई नजरे समोर उभे आहेत. आयुष्याच्या सगळ्या चांगल्या वाईट जाणीवा या गुरुंनीच जागृत केल्या. 'प्राप्त काल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा' केशवसूतांची ही स्फूर्ती देऊन आम्हाला वेळीच योग्य मार्ग दाखवला. आयुष्यात असे गुरु ज्याना बालपणीच लाभले, त्यांच्या आयुष्याचे सोने झाले… 😊
©विजयश्री तारे-जोशी
कोल्हापुर-4.7.2020
या गुरुपौर्णिमा स्पेशल ब्लॉगपोस्ट साठी जोशी बाईंची काही छायाचित्रे अगदी तत्परतेने उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे सुपुत्र श्री. राहुल जोशी यांचे मनापासून आभार! 😊
ते स्वतःही सुंदर लिहितात, त्यांचा ब्लॉग - https://rahulhere.com/
स्थान:
Kolhapur, Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या






एकदम छान.मलाही गावची शाळा व आटपाडी चे हायस्कूल आठवले. औंध पंतांनी मदत देवुन चालु केले ल आठवले. देवा देशपांडे सर व कलाल सर डोळ्यापुढे चमकु लागले.... पण तुम्ही छान लिहिले आहे. एवढी छान बुद्धी स्मरणशक्ती
उत्तर द्याहटवादेवा देणगी आहे...... शिवाजी साठे
Are wah, masta!!
हटवाHo devachi krupa ahe manate mi smaranshaktihi!!
Anek Abhaar Mr. Shivaji Sathe.
Hubehub varnan punha to rajwada manat lya manat firun ale sarudar saranchi athavan ali joshi baichi photo baghunch tyanchi shistichi athvan zali kharach vachtana dole bharun ale
उत्तर द्याहटवाKiti chhan Ranjana! Tya saglya athawani majhya balmaitrininshivay purnach nahit hou shakat! Dhanyawaad!!
हटवाश्री, खर तर प्रथम तुझ्या स्मरण शक्तीला प्रामाणिक पणे वंदन. आणि त्यानंतर तुझ्या लेखणीला!! प्रत्येक वाचकाला त्याच स्वतः च चित्र तुलनेसाठी उभे राहतेच!!! हीच तुझ्या लेखनाची जादू आहे!
उत्तर द्याहटवालेखन नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर👌
गुरुपौर्णिमेच औचित्य साधून गुरूंना केलेलं वंदन खरोखरच वंदयनीय!!! माझ्याही ज्ञात - अज्ञान गुरूंना मी नम्रपणे वंदन करते😊 आणि तुझ्या पुढील लेखाची वाट पाहते!!!
अनेक आभार मंदा. स्मरणशक्तीसाठी खरंच देवाची कृपा आहे.
हटवाअशाच प्रतिक्रिया देत राहा, त्याच मला सगळ्यातून वेळ काढून छान लिहायला प्रवृत्त करतात.😊
सुरेख स्मृती आणि लेखन! मलकापूरच्या चांगल्या आठवणी आहेत तुला व त्याचं चांगलं वर्णन करतेस तू
उत्तर द्याहटवाDhanyawaad Vishrabdha!!! 😃
हटवामॅडम, खरंच सुंदर लेख ओघवती भाषा ,सुंदर मांडणी , तुमच्यातली लेखिका इतकी वर्षे कुठे दडून बसली होती.
उत्तर द्याहटवामलाही शालेय जीवनात गेल्याचा आनंद घेता आला. सर्व शिक्षकांची आठवण झाली. असेच लिहीत राहा लवकरच कथासंग्रह प्रसिद्ध होईलच. खूप खूप सदिच्छा.
Anek abhaar Mr. Bhosale.
हटवाLekhika ithech hoti, ata fakta digital platform varti aliye itkach! 😃
जयश्री अभिनंदन.
उत्तर द्याहटवातुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. काय सुंदर लेखनशैली आहे तुझी. मला तर जोशी बाई अणि वहिनीसाहेब पंत प्रतिनिधी दोघी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. दोन्हीही सुरेख व्यक्तिमत्व एक पुर्ण पुस्तक त्यांच्यावर लिहुन होईल. असेच सुंदर ब्लॉग लिहीण्यासाठी अनेक शुभेच्छा
Ho kharach Mr. Sunil Ambike, donhi vyaktimatva agadi kadambarya lihinyasarkhi prabhavi ahet.
हटवाPratikriyebaddal anek dhabyawaad!!
मी नाव लिहायला विसरलो
उत्तर द्याहटवासुनील अंबिके
वा!!अत्यंत सुरेख शब्दचित्रच जणू. शाळा, परिसर, सर्व शिक्षक व सहाध्यायी याना वाचकांच्या डोळ्यासमोर अक्षरशः उभे केलय तुम्ही!
उत्तर द्याहटवाबाकी तुम्ही एवढ्या धाडसी कशा याचे पडलेलं कोडं मात्र आज अचानकपणे सुटले.😄😄😄
हाहाहा..धाडसी व्हावं लागलं, बाईंच्या धाकामुळेच. 😃
हटवाअनेक आभार वसंत जोशी!
प्रा एस पी चौगले, वाकरे।
उत्तर द्याहटवाYou are simply great because you have given minute details of your school, your head master, teachers and afterall Pantpratinidhi family in this article. Hats off to the writer like you Jayashree.Must prepare a book on all these memories. I will compel you for that.There is some kind of spell in your writing. Keep it up.....
Thank you so much Mr. S. P. Chougale.
हटवाBook writing is quite difficult though. Hence I am very happy with digital platform. Here I get audience and their unfiltered reactions in little to no time and that is keeping me motivated to write more.
कुंदा पाटील, बदलापूर
उत्तर द्याहटवाश्री अग प्रथम तुझ्या स्मरण शक्तीच कौतुक आणि नंतर तुझ्या सुंदर लेखनशैलीच. अतिशय सुंदर 👌श्री अग तुझ्या लेखनात जादू आहे तू आम्हाला छान छान भूतकाळात नेतेस खूप आवडला लेख. असच लिहीत रहा पुन्हा तुला पुढील लेखासाठी ' All the best' 👍
कुंदा पाटील, बदलापूर
स्मरणशक्तीसाठी खरंच देवाची कृपा आहे. 👏👏 काही विशेष करत नाही मी त्यासाठी.आणि लेखनशैलीही त्याचीच कृपा लागेल खरंतर.
हटवाअनेक आभार कुंदा. अशाच प्रतिक्रिया देत राहा. 😃
Dear Madam .
उत्तर द्याहटवाI could read Ur one more milestone of Ur childhood .U r really great .My hats off to Ur "Aprateem"memory n ability to picturised it in words n bring before Ur readers on paper .Some people have rightly reacted on Ur blog n appreciated Ur memory n Ur style of presenting it on paper. Very good attempt .
Guru as is refered in our context is definitely weighs more than the word teacher .There is big difference which I understand .Trust u will agree with me .Thank u for posting to me . I look forward many more to read n enjoy my childhood .thank u..
TOPHKHANE..BELGAWI
Thank you Mr. Tophkhane!! 😃
हटवाविजयश्री आत्ता तुमचा लेख वाचला!खरोखरच किती सुंदर लिहीले आहेत .अगदी भाषेवर एखाद्या पट्टीच्या लेखिकेप्रमाणे छान पकड आहे अगदी शब्दांतून जसेच्या तसे प्रसंग, घटना वाचकांच्या डोळ्यासमोरच प्रसंग घडतो आहे अशी छान हातोटी आहे .आमचेही शालेय जीवन आठवू लागले. अगदी सहज ओघवती भाषा ,मध्ये मध्ये इंग्रजी भाषा नवीन शिकताना उच्चारातील विनोद, बाकावरून पाडण्याचा विनोद अगदी प्रासंगिक आणि सहजसुंदर आहेत .कडक शिस्तीच्या जोशी बाईंचे वर्णन तर फारच अफलातून आदर निर्माण करणारे !
उत्तर द्याहटवाएकूण पूर्ण लेखच सुंदर जमला आहे सराईत लेखिकेप्रमाणे !
मनिषा कुलकर्णी...दुबई
Thank you Manisha Kulkarni!!! 😃
हटवामाझी शाळा, छान वर्णन, मलकापुर, वाडा व शिक्षक बाईंची आठवण एकदम वाचनिय !
उत्तर द्याहटवाDhanyawaad!
हटवामॅडम आपल्या स्मरणशक्ती ला व लेखन शैलीला सलाम. आज आपण मला देखील माझ्या शालेय जीवनातील आठवणी ताज्या करून दिल्या.त्या काळातील पालक,शिक्षक,
उत्तर द्याहटवाविद्यार्थी याचे निखळ नाते आता दिसणे नाही.
हॅलो विजयश्री मी malkapurachi पुष्पा सातपुते आमची १९६६ची बॅच त्यानंतर कधीतरीच मलकापूर ला जाणे व्हायचे आमच्या वेळी वाड्यात मुलांची शाळा होती मुलींची फक्त कन्या शाळा तुमची कोणती बॅच मी शांताराम तारे म्हणून आमच्या वर्गात होता त्याला तुझ्याबद्दल विचारले पण त्याला पण काही कळले नाही आता आमच्या बॅचच्या बहुतेक सगळ्यांनी सत्तरी ओलांडली तरी पण आम्ही कधी कधी भेटतो मलकापूर बद्दल बरच काही लिहायला आहे पण त्या साठी वेळ काढावा लागेल ओके तू छान छान लिहीत जा आम्ही त्याला दाद देऊ
हटवाThank you Milind Kulkarni!!
हटवाHi Pushpa Madam. माझी बॅच १९७९ ची त्यामुळे नसेल आठवलं तुम्हाला.
हटवाहो, मलकापूरबद्दल भरपूरच आहे लिहिण्यासारखं, मी नोकरी सांभाळून आणि या सगळ्या नवीन technical गोष्टी शिकत होईल तसं लिखाण करती आहे. कोल्हापूरमध्ये भेट ठरवली तर नक्की सांगा, मलाही आवडेल तुम्हाला सगळ्यांना भेटायला. Keep in touch!
या माहेरच्या कौतुकाबद्दल अनेक आभार !! 😃
हॅलो vijayshri तुम्ही malkapurla कुठे राहत होतात आम्ही हर्षे गल्लीत राहत होतो आता तिथे भुरांडे म्हणजे बापट बाईंची मुलगी राहते मी १९६६ ला एसएससी झाल्यावर मुंबईला आले ती मुंबईची झाले जोशी बई आम्हाला पण इंग्लीश शिकवायला होत्या अनघा त्यांची मुलगी अमाची चांगली मैत्रीण होती आमचा एसएससी group don tin वर्षात तरी भेटतो आत्ताच फेब्रुवारी endla माझ्या लोणावळ्याच्या घरी दोन तीन दिवस होतो तुला अनाच्या वर्गातले माहीत असणारे म्हणजे प्रकाश bhingarde आणि गजानन माजले सद्ध्या ते दोघेही मलकापूर का राहतात
उत्तर द्याहटवापुष्पा ताई...किती मस्त वाटतं गं ..शब्दाने लोक जोड्ले गेले हे खूप आहे माझ्या साठी..मी आता कोल्हापुर येथे नोकरी करते.पद्मा राजे शाळे जवळ रहाते...तुम्हा सगळ्यास भेटावं वाट्तय...Please email me your phone no.
हटवाहॅलो unknown nahi Pushpa satpute
उत्तर द्याहटवालेख फार छान लीहलाय ! शाळेतील आठवणी मला पण राजवाड्यात घेऊन गेल्या. माझे आठवी नववी शिक्षण रीजवीड्यात झाले तर दहावी अकरावी हर्षेवाड्याच्या मुख्य ईमीरतीत झाले.
उत्तर द्याहटवाश्रीकांत सातपुते 1973 बँच.
सध्या वास्तव्य वडाळा मुंबई.
Khup chan
हटवाश्रीकांत दादा...खूप मस्त वाटले..तुम्ही मोट्ठे लोक अजून इतके मलकापूर ला जोड्ले गेले आहात. कोल्हापूरला आलात की नककीच भेटू.. Please email me your phone no.
हटवा🌹 हॅलो ,विजयश्री जोशीतारे , अग मी मलकापूरची शरयू साठ्ये दीक्षित. (नंदू दीक्षितची बहीण ) मलकापूर हायस्कूल, मलकापूरच्या १९६६ बॅचची. तुझे गुरुपौर्णिमेचे लिखाण मला खूप आवडले. कन्या हायस्कूलच्या ब अगदी सुरुवातीला अडीच शिक्षकापैकी अर्धा शिक्षक म्हणून मला घरी बोलावून जोशी बाईनी काम दिले. तुझ्या लेखामुळे जुन्या आठवणी चाळवल्या गेल्या. मी मिरजला सासरी ५० वर्षे उर्मिला लेले म्हणून राहून ४० वर्षे BSNL मध्ये काम केले. योगायोगाने बाईन्चे माहेर मिरजेचे आडनाव घोलकर. असो. लेखाबद्दल पुनश्च तुझे अभिनंदन. आपल्या भेटीचा योग लवकर येवो ही ईच्छा. माझा मोब. 9422320735
उत्तर द्याहटवाताई...खूप खूप धन्यवाद...तुम्हाला लेख आवडला..मी खूप लहान आहे हो..तुमचे आशिर्वाद द्या फक्त...लेखा ने लोक जोड्ले गेले..हे मी खूप कमावले...तुम्हाला भेटायची आस लागली आहे...तुमचा नंबर मिळाला खूप बरे वाटले...नमस्कार...
हटवाjgd
उत्तर द्याहटवाउशीरात "गुरु पौर्णिमेचे चांदणे मनावर उतरते आहे. जुन्या आठवणीना उजाळा देत मनात साकारलेले ही पौर्णिमा शाळकरी दिवसातले आनंदाचे चांदणे उधळीत येत आहे मनाच्या भूमीवर! रजवाड्यातील राजेशाही सण व आनंददायी शिक्षण लेखात अवतरले आहे. मराठी शाळेतून हायस्कूलला आल्यावरचे नव्याचे ननोत्साही दिवस भारावून टाकणारे, किशोर अवस्थेतले मलकापूरच्या कन्याशाळेतले क्षण अचूक टिपले आहे. जोशी बाईंची करारी शिस्त व अंतरीचा जिव्हाळा तसेच आधूनिकतेचे नाते शब्दात बांधले आहे, सरुडकरसरांंचे आठवणी सोबत इतरवाषय शिक्षका शिक्षिकांच्या विषयाशी जोडलेल्या आठवणी सुरेख आहेत.हे टिकणारे शालेय ससंस्कार ही जीवनाची शिदोरी असते. शिक्षण क्षेत्रात आलेल्या नव विचारप्रवाहाने क्रांती केली तरी गुरु शिष्यांना आपूलकीच्या बंधात गूंफणारी तत्कालीन शिक्षण व्यवस्था अधिक भावस्पर्शी
वाटते.ते दिवसच तसे होते, आता ते येणे नाही ही खंत! कृतज्ञतेची ही पौर्णिमा नित आनंद कौमुदी वाढवणारी आहे.
हो ते दिवस परत येणार नाहीत ही खंत आहेच पण त्याच दिवसांत खरी घडले.
हटवासर्व गुरुजनांना आणि तुम्हालाही गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा शुभेच्छा.. तुम्ही सगळे गुरु कायमच वंदनीय आहात, गुरुपौर्णिमेचे फक्त निमित्त..
आणि वेळात वेळ काढून ब्लॉगपोस्ट वाचून अभिप्राय दिल्याबद्दल अनेक आभार.
Farch Sundar**mala hi *Mirajetil **Shaletil divas aathavale --Vidyamandir yetil
उत्तर द्याहटवाAre wah!!!
हटवाAplya pidhicha he chhan ahe.. Gava wegwegli asali tari anubhav sadharan sarakhech.
Vinayak Navare V.bag --Sangli
उत्तर द्याहटवाThank you Mr.Navare!!
हटवाजोशी बाई नी आपल्याला कसे तयार केले...हे आत्ता आपण सांगू शकतो..त्या वेळी फार कडक वाटायच्या
उत्तर द्याहटवाराजश्री
Hahaha.. ho.. agadi adaryukt bhiti wataychi tyanchi.
हटवामी हा ब्लाॅग वाचला आहे. आमचा मलकापूर चर्या classmates चा एक WhatsApp group आहे. Somebody had forwarded it on the group. जोशी बाईंचा फोटो कित्येक वर्षांनी पाहिला. शाळेच्या सगळ्या आठवणी छान जागल्या झाल्या. सगळ्या मैत्रिणी आणि शिक्षकांचे चेहरे डोळ्यासमोर आले. 👌👌👍
उत्तर द्याहटवानिलिमा परांजपे डोंगरे
अनेक आभार निलिमा. 😃
हटवाSurekh lekhan,Madam tyavelche sir,madam tumhi sangitle tasech hote,tumhi Guru baddal Abiman vatava asach ullekh kela ahe,H M madamni dhadsi honeche prtchan dile tehi namud kele,tasech Barister P G Patil sarani rahate gharhi shalela dan dile,kiti mothe man ,salam,pg sarana,Madam tumche punha Abhinandan karan tumche lekhan he vastav ahe.Asech lihit raha madam amhi sarvjan vachat jato
उत्तर द्याहटवाThank you so much J.P.Sangrulkar. Such reviews are very motivating!!
हटवाNostalgia...I miss my school days...thanks a lot..I also remembered my teacher..
उत्तर द्याहटवाR.S.Patil..Pune
Thank you Mr. R.S.Patil!!
हटवा