- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अगदी सकाळी सकाळी उत्साहाने तिचा फोन आला… ‘कधी भेटूया? तुझ्याशी खूप बोलायचंय'... माझा क्षणभर विश्वासच बसेना.. ही माझी सखी माहेरी आली असणार.. आणि खूप दिवसांनी भेट होणार म्हणून इतकी खुश झाले की तिला कधी आलीस विचारलेही नाही.. कारण जेमतेम ३-४ वर्षांपूर्वी नियतीने तिच्यावर केलेले क्रूर आघात आणि आज तिचा अमाप ओसंडणारा उत्साह…. काय बरं असेल, असा विचार करत मी रविवारची भेट ठरवली आणि माझं मन नकळत मागे गेलं….
दुर्गा माझी जिवलग सखी. सुंदर व्यक्तिमत्व, पिंगट टपोरे डोळे, गालाला मस्त खळ्या आणि कपाळावर कुरळ्या बटांची मस्त महिरप. अभिनेत्री म्हणून सहज खपली असती. लहानपणापासून कॉलेज पर्यंत कायम उत्तम खेळाडू, त्या मुळे लाभलेला उंच, दणकट बांधा. जसे दिसणे तसेच वागणे अगदी बिनधास्त. खेळ, नाटक, गाणी, डान्स ते भाषण कशात म्हणून मागे नाही. परफेक्ट कॉलेज क्वीन! हुशार तर इतकी की फक्त वाचलं तरी डोक्यात फिक्स. ही बया आली की घर दणाणून सोडायची. माझ्या आईची लाडकी होती, फार कौतूक करत काय काय खाऊ घालायची तिला. हिच्या घरी फक्त आई-बाबा, आज्जी, आजोबा आणि ही एकुलती एक लाडकी लेक. घरी सगळी सारखं लेक्चर देतात म्हणून आमच्या घरीच रमणारी. कॉलेज संपेपर्यंत हेच रूटीन सुरुच होते. परिक्षा झाली की निवांत मुक्कामाला येणार आणि स्पर्धेच्या गमती- जमती कथेसारख्या सगळ्याना सांगणार. बडबड करत माझ्या आईला मदत करून पटवायची, मग आमची जोडगोळी स्कूटी वरून भटकंती करायला मोकळी.
दुर्गा अशी स्मार्ट, हुशार,धाडसी आणि मी मात्र हुशार तरी बावळट व भित्री. आई सारखी सांगायची जरा पुढे हो, धाडस कर तर मी भित्र्या सशासारखी हिच्या मागेच लपायचे! तिला छान इंजीनियरिंगला प्रवेश मिळाला. कॉलेजमध्ये तिला जणू पंख फुटले होते. नाटक,गाणे अभ्यास सगळीकडे हिचे नाव दुमदुमत होते. स्पोर्ट्स कोट्या मधून अगदी सहज सरकारी अधिकारी झाली. ह्या बाईला सगळं उत्तम आणि विनासायास मिळे..आणि मला सारखे झगडावे लागे अशी गंमत. माझं लग्न लवकर झालं, त्या नंतर तीन वर्षानंतर हिच्या स्वप्नाचा राजकुमार आला. एका खेळाडू मित्राच्या प्रेमात पडली होती. हिच्या आईचा जीवही भांड्यात पडला, पटकन मुहूर्त काढला आणि अतिशय थाटामाटात लग्न लावून दिलं. तिला साजेल असा उंच, अत्यंत देखणा, गर्भश्रीमंत जोडीदार मिळाला तिला. उच्च विद्याविभूषित आणि एका विदेशी नामांकित कंपनीत नोकरी करत होता. स्वभावाने आर्जवी, नम्र मिठ्ठास बोलणारा तो कुणालाही आवडावा असाच होता. दुर्गेने नशीबच काढले. लग्नाचा थाट मेहंदी सगळे साग्र संगीत पाच दिवस चालले होते. मी मुलाला घेउन पंधरा दिवस माहेरी.. आणि तिच्याकडे तळ ठोकला होता. फार फार धमाल केली सगळा ग्रुप जमला होता. मग सगळ्या नाईलाजाने परतलो. तिलाही 'तोंड आवर.. फार बोलू नको.. पटले नाही तर गप्प बस'.. असल्या अनुभवाच्या संसारी सूचना दिल्या. हिच्या सासरची मोठ्ठी फैमिली बघून ही फटकळ बाई कसं काय निभावणार अशी काळजी वाटायला लागली.
तिकडे पुण्याला बदली करुन घेतली आणि सासरी मस्त रुळल्या बाईसाहेब, अगदी आदर्श सूनबाई झाली. सुरेख संसार करू लागली आणि माहेरी येणं थोडं कमी झालं. सासूबाई छान आयता डबा करून हातात देत; नवरा- सागर, सासरेबुवा हिने नुसते शब्द काढले की गोष्टी समोर आणून देत. हिला कायम छान, कौतूक करणारी माणसं कशी भेटतात याचं आम्हाला नवल वाटायचं. पाच एक वर्षात दोन गोंडस मुलांची आई झाली. आमची मुलेही एकमेकांची दोस्त झाली. दोघी माहेरी आलो की किती बोलू आणि किती नको असं होई. ते सुखाचे दिवस फार भरभर पळत असतात.
एक दिवस तिचा फोन आला.. सागर दोन वर्षासाठी अमेरिकेला जाणार, कंपनीने त्याला खूप मोठी संधी दिली आहे. खूप शिकायला मिळणार म्हणून तो एका पायावर तयार झाला. ती ही नंतर जाण्याचा विचार करायला लागली. मुले लहान म्हणून घरचे कोणीही दोघाना जाऊ द्यायला तयार नव्हते. विचारांती मग आधी त्याने जावे असे ठरले आणि तो शिकागोला रवाना झाला. घरचे मुलांची उत्तम काळजी घेत होते, जावेची दोन आणि हिची दोन अशी सगळी मुले मस्त एकत्र खेळायची. घरात गोकुळच नांदत होते जणू. दोन वर्षे हा हा म्हणता जातील आणि सागर लगेच परतेल असेच वाटले सगळ्यांना.
सागर दोनच वर्षासाठी परदेशी गेला पण तिकडे कामात असा काही गुंतला की हळूहळू फोन येणे कमी होत गेले. आपण होउन संपर्क करेनासा झाला. कालांतराने समजले की तिथे ऑफ़िस मधे काम करताना नव्याने कुणा विदेशी मुलीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. हळू हळू कुटुंब, बायको आणि मुलांचे नावच टाकले त्याने. घरच्यांनी खूप समजूत काढली, पण 'जी माझी प्रॉपर्टी आहे ती सगळी दुर्गाला आणि मुलाना द्या, आम्ही इथे घर घेतले आहे मी इथेच रहाणार काही झाले तरी परत येणार नाही' असे सांगूनच मोकळा झाला! ही चांगली उच्चपदस्थ शासकीय अधिकारी, दोन हुशार गोंडस मुले असा छान सुखी संसार, अगदी दृष्ट लागण्यासारखंच होतं सगळं आणि खरंच ग्रहण लागलं. काय कमी होते हिच्यात आणि काय जास्ती होते तिच्यात हे प्रश्नच अनुत्तरीत राहिले. दुर्गा खूप दुखावली गेली… तिने काहीच जाब न विचारता सरळ कायदेशीर नोटिस देऊन बंध मुक्त केले त्याला! मुळमुळू रडणे तिला कधीच मान्य नव्हते. आम्हाला मुळीच पटले नाही.. पण नेहमीप्रमाणे हिची वाट वेगळीच. सासूबाईनी खूप आधार दिला स्वत:च्या मुलाला प्रॉपर्टी मधून बेदखल केले आणि हिला मुलीसारखे जपले. धन्य होती ती सासरची माणसे.. हिचं नशीब थोर होतं म्हणायचं. मग हिने शेजारी नवीन फ्लैट घेतला आणि मुलांसाठी झाशीच्या राणी सारखी एकटीच परिस्थितीशी झुंज देऊ लागली.
एखादी बाई नवऱ्याला धारेवर धरून, गल्ली गोळा करून त्याच्या वागण्याला तिखट विरोध तरी करू शकते, पण ही नवऱ्याला सुसंस्कृतपणाच्या सीमांमुळे कधी जहाल बोलूही शकली नव्हती. अशा परिस्थितीत बायकांना फक्त तोंड दाबून बुक्क्यांचा मार. घरच्या किंवा बाहेरच्या अनुभवी माणसांना सांगावे तर हिचेच काहीतरी चुकले असेल, आमचा मुलगा असा नव्हताच, पैशाचा मोह जास्ती झाला की असं होतं, कशाला अमेरिकेला पाठवायचं नवऱ्याला हे ऐकायला मिळतं. नोकरी करणारी बाई म्हणजे फक्त पैशाचा विचार, संसाराचे तीन-तेरा, मुलांची आबाळ आणि नवऱ्याकडे कायम दुर्लक्ष अशी गृहितके लोकांनी मांडून ठेवलेलीच असतात, हिचं आयतं उदाहरण मिळाल्यासारख्या प्रतिक्रिया यायला लागल्या. स्त्री कितीही सक्षमपणे संसार करत असेल तरी वाईट गोष्टींचं खापर तिच्यावरच फुटणार ही जन-रीतच आहे. सगळं तिने सगळ्यांचे टोचून बोलणे निमूटपणे सोसलं. सासरचे सगळे ठामपणे हिच्या पाठीशी उभे राहिले. सासूबाई तर आमच्या मुलाने घोडचूक केली आता तो आमचा कोणी नाही, हीच माझी लेक आहे असे सांगू लागल्या. हे ऐकून हिची आई बाबांना वाईट वाटायचं. मैत्रीण म्हणून आपण काही करू शकत नव्हते याचं फार वैषम्य वाटायचे. त्यातून ती पुण्यात त्यामुळे मनात आलं की भेटता यायचं नाही. आला दिवस मावळत होता, काळ पुढे सरकत होता.
नियती खंबीर लोकांची अगदी कडक सत्वपरिक्षा घेते. म्हणूनच की काय दुर्दैवाने तिच्यावर दुसरा आघात केला. धाकटा मुलगा आजारी पडला. साधे पोटातले दुखणे बरे होईल वाटत असतानाच कॅन्सर झाल्याचे निदान झाले. सगळ्यांच्या डोक्यावर अचानक वीज कोसळली. तिच्या काळजीने मलाही घास गोड लागेना. दहावीतला कोवळा जीव वेदनांनी दवाखान्यात तडफडत होता. एकाच वेळी दवाखान्यांमध्ये ती पळापळ करून घर, नोकरी सगळं सांभाळत होती. पाण्यासारखा पैसा ओतला, सगळीकडे धाव धाव धावली. माहेरचे, सासरचे सगेसोयरे तिच्या पाठीशी होते पण दैव नव्हतं. सगळे प्रयत्न फोल ठरले बाबा बाबा करत मुलाने हे जग सोडले. जिवंतपणी मेलेल्या सागरला तिने काही कळवले नाही. त्यानेही अनेक वर्षे कोणताच संपर्क ठेवला नव्हता. पोटच्या निष्पाप पोराना सोडणाऱ्या नवऱ्याला परत बोलावण्याइतकी दुबळी ती कधीच नव्हती. तिच्या दुःखाला पारावर राहिला नाही. पण धाय मोकलून रडू सुद्धा शकली नाही, कारण मोठा मुलगा हा तिचा एकमेव आधार पण तोही कोलमडेल ही भीती तिला भावना व्यक्त करू देत नव्हती. ती दुर्गा होती म्हणूनच हे आघात मूकपणे पचवू शकली. दुसरी बाई उन्मळून पडली असती. काही दिवस मी जाऊन राहिले तिथे.. पण नोकरी, घर सोडून फार नाही काही करता आलं. ती मात्र निश्चल महामेरू सारखी ताठ उभी होती. हीच का आपली खट्याळ, दंगेखोर मैत्रीण.. मला प्रश्नच पडे. एकदम इतकी वेगळी वाटली की मी तिच्या त्या खंबीर रूपा पुढे अगदी नतमस्तक झाले.आता ती मला खरंच दुर्गा माते सारखी वाटू लागली...
अशीच ३-४ वर्ष निघून गेली. दुःख आणि वेदनांचा पैलतीर तिने गाठला होता. तिच्यासाठी खूप करावंसं वाटायचं पण काय करावं हे कळायचं नाही. कालांतराने संवादही गोठून गेले होते. फोन करुन तरी काय बोलायचं..सागरने दिलेला धोका की छोट्याचं जाणं? त्यामुळे खूप दिवस भेट झाली नाही. तिनेही नोकरीत झोकून दिले असणार.. स्वत:ला सावरले असणार अशी मनाची समजूत घालत होते. पण आज खूप दिवसांनी तिच्या आवाजात तोच हरवलेला उत्साह परत डोकावला. आतुरतेने तिला रविवारी भेटले. गळाभेट होताच तिला विचारलं ‘काय विशेष?’, उत्साहात ती म्हणाली, मी माझ्या हरपलेल्या छकुल्याच्या वयाचा मुलगा दत्तक घेतला आहे. अनाथआश्रमात गेलेले गं, लेकाच्या स्मृती दिनाला.. तिथल्या ताईनी 'याला थोडे दिवस अभ्यासाला तुमच्या घरी जागा देता का विचारले, बारावीला आहे हो... फार हुशार आहे, इथे नाही त्याचा चांगला अभ्यास होत' असे विचारले… मी त्याच्याकडे पाहिले … याचे डोळे अगदी माझ्या लेकासारखे गूढ, शांत डोहासारखे.. पहाता क्षणी आवडला गं मला.. लगेच त्याला घरी घेउन आले. तो ही खूप हुशार आहे. CET उत्तम मार्क पडले, यंदा इंजिनीरिंगला प्रवेश घेतोय. तो दिसला आणि वाटले की देवाने माझा लेक परत धाडलाय, सरळ दत्तक घेतला बघ’ … ऐकून मला खूपच आनंद झाला. नियतीने तिच्याकडून जे हिरावून घेतलं तेच परतही दिलं असं वाटून गेलं. ती बोलतच होती ‘हे माझं पिल्लू नाही पण कावळ्याच्या घरट्यात कोकिळेचं पिल्लू वाढतंच ना? हेही वाढेल आणि सांगेल सगळ्यांना की याच आईने मला अनाथ आश्रमातून घरी आणले आणि सुंदर घर दिले. मला भरारी मारण्याचे बळ दिले. माझ्या मोठ्या मुलाने पण हा निर्णय आनंदाने स्वीकारला आहे. गेले सहा महीने दोघं अगदी गुण्या-गोविंदाने राहतात. त्यालाही छोटा भाऊ परत आला असेच वाटत आहे. सगळं नीट झालं की तुला धक्का द्यायचे ठरवले होते. हे ऐकून मला इतका आनंद झाला की मी तिला मिठीच मारली… दोघींच्याही डोळ्यातून आनंदाश्रू झरू लागले. किती वेळ दोघी फक्त हातात हात घेऊन गप्पा मारत बसलो...
तिला भेटून घरी येताना मी आयुष्यातला सर्वात सुंदर धक्का पचवून खूष होते. माझ्या लाडक्या सखीने अग्नी परिक्षा देताना सुद्धा वेगळीच वाट निवडली होती, अगदी तिच्या स्वभावाला धरून. ऊर अभिमानाने भरून आला, कधी एकदा आईकडे जाते आणि सगळ्यांना ही आनंदाची बातमी देते असे झाले. तिच्या घरट्यात जाऊन त्या नवीन पिल्लाच्या स्वागताचेही बेत ठरवले. त्या कल्पनेपलिकडच्या मातृप्रेमासमोर नतमस्तक झाले. तिच्यातील दुर्गामातेने विधात्याला कोड्यात टाकून एक वेगळीच वाट निवडली आहे. ती जगा वेगळी वाट तिच्याच आत्म-तेजाने उजळून निघाली आहे आणि दीपस्तंभाप्रमाणे अनेकांना अंधारातून वाट दाखवत आहे….
(ही एक सत्यकथा असून पात्रांची नावे बदललेली आहेत. दुर्गाला तसाही लोकप्रियतेचा विशेष मोह
नाही पण तिचे कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवून जीवनात सकारात्मकता वाढवण्याचा हा एक प्रयत्न.)
©विजयश्री तारे-जोशी
११ जुलै २०२०
स्थान:
Kolhapur, Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या




दुर्गा आवडली! किती छान कथा लिहिली आहेस, ही सत्यकथा आहे, हे वाचून आश्चर्य वाटले! एक स्त्री इतकी धाडशी असू शकते!
उत्तर द्याहटवाखरंच आहे, म्हणूनच परमेश्वराने तिला धाडसी, सहनशील आणि प्रेमळ केले आहे.
Ho kharach dhadasi ahe ti..!!
हटवाThank you Dr. Potdar!😊
Madam Durga awadli,Apratim katha ahe,Durgacha sarvat motha nirnay Anathashramatil mulga ghene,salam tya dhadasala,chham lihile ahe,kontihi mistake nahi.pudhil kathes shubhechha
उत्तर द्याहटवाThank you Mr. Sangrulkar!
हटवाखूप छान मॅडम मस्त वाटले वाचून
उत्तर द्याहटवाखूप छान कथा आणि मैत्रीण पण!!! आभाळाएव्हढं दुःख वाटेला आलं म्हणून रडत नाही बसली ती.
उत्तर द्याहटवाजगावेगळा आदर्श ठेवला दुर्गेने!!!
Thank you Manda!! Ho adarsh ahech ti!
हटवाSurekh..
उत्तर द्याहटवाVaiju
Thank you Vaiju!!😊
हटवादैव, दुसरं काय!
उत्तर द्याहटवाHo g.. Kharach!!
हटवाThe bird 'Phoenix'
उत्तर द्याहटवा100% khara!!
हटवाThanks Mr.Patil
एकदम छान. छान शब्दाची मैत्री जमली आहे. दुर्गा ही खरी दुर्गा च आहे. भगवान सर्व प्राण्यांमध्ये आहे तो असं
उत्तर द्याहटवारुप घेतो बघणाराना शिकवण देतो. ..असंच छान लिहा... शिवाजी साठे..
Ho kharach Durga ahe..
हटवाThank you Mr. Sathe!
Great ahe
उत्तर द्याहटवाThank you!
हटवाChanch hoti
उत्तर द्याहटवाThank you!!
हटवाछान लेखन , लिहीत राहा, आपले अनुभव शब्दबद्ध करत रहा..
उत्तर द्याहटवाThank you Mr. Watve !
हटवासुंदर , कोणत्याही वेदनेच अति कौतुक न करता, ती वाचका पर्यत योग्य त्या समर्थपणे पोचवलेली आहे. स्त्रीच्या कणखर पणाचे योग्य दर्शन.
उत्तर द्याहटवाप्रदीप। जोशी
Tila awadlach nasta te! tyamule tichi khambir baju highlight karanyacha prayatn kela..
हटवाThanks Mr. Joshi!!
वेगळी वाट वाचनीय झाली आहे.
उत्तर द्याहटवाअसेच लिहीत रहा.
#अनिरुध्द गायकवाड
Thank you Mr. Gayakwad!
हटवाकुंदा पाटील, बदलापूर
उत्तर द्याहटवाश्री अग तू लिहिलेली ' सत्य कथा-वेगळी वाट' ' ही ' दुर्गेची कहाणी ' वाचली. खूप छान लिहिलंस अर्थात मैत्रीण पण तशीच आहे धाडसी आणि खंबीर. तिच्या जीवन कहाणी पासून खूप खूप शिकण्यासारखं आहे.श्री पण एक असत प्रत्येक व्यक्ती च्या जीवनात संकट येतात पण परमेश्वर पण त्या संकटातून बाहेर निघण्याच बळ देतो. अशा दुर्गाचे कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवून जीवनात सकारात्मकता वाढवण्याचा तू खूपच छान प्रयत्न केला आहेस तुझी स्मरणशक्ती आणि लेखनशैली खरंच खूप कौतुकास्पद आहे 👌अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या दुर्गाला सासरच्या माणसांकडून खूप छान सपोर्ट मिळाला तिने खंबीरपणे उभे राहण्यामागे त्यांचा पण मोलाचा वाटा आहे. ह्या दुर्गा नावाच्या देवीला माझ्या कडून त्रिवार वंदन 🙏आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या तिच्या सासूबाईंना पण वंदन🙏पुन्हा तुझ्या ह्या सत्य कहाणी लेखनाचं कौतुक असच छान छान लिहीत रहा पुढील लेखासाठी तुला 'All the best '👍शुभेच्छा..👍
कुंदा पाटील, बदलापूर
Anek abhaar Kunda!!!!
हटवाSo happy to have appreciating readers like you. Keep reading and reviewing. 🙏 🙏
ही एक सत्यकथा असल्यामुळे त्याबद्दल काही.बोलणे मला योग्य वाटत नाही. पण या कथेची तुमची लेखन शैली "सुमती क्षेत्र माडें " सारखी वाटते.
उत्तर द्याहटवाखरं तर असे एखादे आयुष्य शब्दात बसवता येत नाही.सुमती बाईं चे लिखाण मी लहानपणी वाचले होते..त्या फार ग्रेट होत्या..मी एक अनुभव थोड्कयात मांडायचा प्रयत्न केला.धन्यवाद..विजयश्री
हटवाफारच सुंदर लिखाण. अगदी काळजाला भिडली कथा.. जरी सत्य कथा असली तरी वाचकांपर्यंत पोचवण्याची कला तुम्ही आत्मसात केली आहे.खूप शुभेच्छा👍👍👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद ..ही तिची कथा कशी लिहावी समजत नव्हते...खूप दिवस डोक्यात होती..थोड्कयात लिहिली.इतके सोपे नसते दुर्गेचे आयुष्य..पण सहानुभुती नको वाटते तिला..कसे ही क्षण आले तरी प्रत्येकजण आपल्या परीने जगतो.ती डगमगली नाही हे खूप वेगळे वाटले
हटवाjgd.नाव बदलेलं असो जी कोणी तू दुर्गा म्हणून तिची सत्यकथा सांगितली आहेस ,त्या मूळ दूर्गेच्या जिद्दीला सलाम! अशा दूर्गा या अबलांसाठी आदर्श आहेत. "अबला जीवन हाय तुम्हारी कहानी। आॅंचलमे दुध आॅंखोमे पानी।" म्हणत मुळमूळ रडणार्या नाहीत, नावाप्रमाणे दुर्गाच आहेत!"भयचकित नमावे तुज रमणी" या मालिकतली ही दुर्गा रणरागिणीच! लढाईत हार न खाता "बचेंगे तो औरभी लढेंगे।" हा बाणा जपणार्या स्त्रियांमूळे हा समाज स्थिर आहे. आदिमातेचे रुपच जणू! ज्याला सर्वस्व समर्पित केलं तोच पारखा व परका झाला कीतरी न कोसळणार्या अबला विरळाच! पुत्र विरह झाला तरी एकासाठीच केवळ न धडपडता अनाथीची ही माता होणं ,सोपं नाही. "ज्यासी अपंगिता ।त्याशी धरी जो ह्रदयी,तो तर भगवंताची/भगवतीची मूर्तीच! अशा दूर्गांचे वर्णन कोणत्या शब्दांत करावे? "भय चकित नमावे।तुज रमणी" एवढेच हाती. शब्दांकन अप्रतिम!
उत्तर द्याहटवाAnek abhar Shete sir..
हटवाkharach Durga ahe ti!!
कोण आहे ही दुर्गा...मला भेटव तिला..इतका आवडली कथा..तिला ननस्कार् करते..
उत्तर द्याहटवारेखा
हो नक्की भेटवेन! 😊
हटवा