गो गो गोवा..

भांडा सौख्यभरे !!!

Fighting is and art. Men prefer boxing over arguments and women prefer smart arguments and loud voices over boxing.

मागे एकदा एक मस्त जहाल भांडण ऐकायचा योग आला. एस. टी. मध्ये कंडक्टरवर एका बाईने जिभेचा असा दांड-पट्टा चालवला की तिची चूक असूनही कंडक्टरने सपशेल माघार घेतली. 'काय बाईचं तोंड आहे का तोफखाना?' असे म्हणून मूग गिळून गप्प बसला. समोरच्याला फक्त बोलून सपशेल गारद करणाऱ्या अनेक मर्दानी बाया मी पाहिल्या आहेत आणि अभ्यासांती असं निदर्शनास आले की ‘बाई’ मग ती  कमी शिकलेली असो की उच्च शिक्षित, अगदी काडी पहिलवान असली तरीही, तोंड उघडलं की दहा बापयांना सहज पुरून उरणार! 💪 निसर्गाने जणू वरदानच  दिलं आहे तिला  की- ‘जा बाई लढ, भांडणात कायम तुझाच जय होईल .. तथास्तु!’ खूप कौशल्याचा तसेच रंजक अभ्यासाचा विषय म्हणून अनेक निरीक्षणे  करुन खूप प्रयत्नांती खालील उपप्रकार शोधून काढलेत. हे संशोधन अंतिम नाही, तुम्ही त्या मजकुरात ऐतिहासिक, तात्कालिन दाखले देऊन बदल करु शकता.


समस्त भारतीयांनी भांडण या विषयावरचे निर्वीवाद वर्चस्व पुणे या सुविद्य शहरास एकमुखी बहाल केले असल्याने येथे प्रांतवाद अपेक्षित नाही…. त्यावरून भांडण नसावे, करायचे असल्यास तडक पुण्यनगरीस रवाना होउन, त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे.😅


पारंपरिक कला

सार्वजनिक नळ/पाणवठा हे या कलेचे उगम स्थान आहे आणि इथे जो शिकला तो दुनियेत टिकला. आम्हाला नळ-भांडण या प्रकाराची तोंड ओळख चालायला सुरुवात करण्यापूर्वीच झाली. सर्वांच्या भांडणाचं बारीक निरीक्षण करून बालगटात त्याची सांगोपांग चर्चा घडे. त्यामुळेच आमचे शब्दभांडार अनेक म्हणी,वाक्प्रचार आणि त्यांचा यथार्थ वापर असे समृद्ध होत गेले. प्रसंगी झिंज्या ओढणाऱ्या, एकमेकींच्या गत पिढ्यांचा, शेळपट नवऱ्यांचा उद्धार करणाऱ्या कजाग शेजारणी आठवड्याभराच्या अबोल्यानंतर परत एकमेकींशी मेतकूट जमवून आश्चर्याचा धक्का देत असतात. 😆 (हे धक्का तंत्र हल्ली राजकारणी जास्त वापरतात! रात्रीत शत्रूपक्षात सामील होतात!) मोठ्यांची भांडणे झाली की लहान मुलांना एकमेकांशी बोलता येत नसे. आया त्या निष्पाप बालकाना शत्रुपक्षातील मुलांशी खेळू देत नसत. तशी त्यांच्या चोरुन भेटी होत, मग कालांतराने  या मोठ्यांचा समेट झाला की हुर्योss करून मुलं जास्त आनंदाने नाचत राजरोसपणे परत एकमेकांशी खेळायला सुरु करत. 

या पारंपरिक प्रकारात सर्व सार्वजनिक ठिकाणी होणारी भांडणे, एस.टी,बस, रेल्वेत जागा पकडताना होणारी भांडणे मोडतात. इथे शत्रुपक्ष थोड्या वेळाने एकमेकाला आपल्या घासातला घास काढून देताना आढळला तरी फार आश्चर्य वाटून घेऊ नये. बायका असल्या की सासर-माहेर हे परवलीचे विषय रंगतात. कितीही मोठ्ठा  प्रवास  त्या तालावर अगदी चुटकीसरशी संपतो. ही भांडणे गंभीर स्वरुपाची नसून तेरड्याच्या रंगाप्रमाणे फारतर तीन दिवस रंग टिकणारी असतात, म्हणून ही होताच इतरानी डोके तापवून, फोडून घेऊ नये. काणाडोळा करून आपल्या उद्योगाला लागावे.😃


पुरुषप्रधान भांडणे

पुरुष एरवी कितीही मर्दुमकी गाजवत असले तरी देवाने जिभेत काही बाई इतकी अफाट ताकद दिलेली नाही, त्यामुळे ही भांडणे फुरफुरत क्षणार्धात हातघाईवर येतात. लगेच शर्टाच्या बाह्या मागे सारून, कॉलर उडवत  ‘ये तुला बघतो’, ‘दम असेल तर पुढे ये तुला कुटतो, हाडं सैल करतो’ वगैरे धमक्या आणि शिव्यांची खैरात झाली की रिंगणातले हे गडी एकमेकांना भिडण्याची परिस्थिती निर्माण होते. असे मर्द भिडले की अशा वेळी मध्यस्थांनी आपल्या ताकदीचा अंदाज घेऊन  स्वतःचा जीव सांभाळत  मधे पडावे नाहीतर वड्याचे तेल वांग्यावर निघून दोन्ही बाजूंनी फटके बसतात. मध्यस्थाने तटस्थ राष्ट्राची  भूमिका घ्यावी, अखंड सावधान असावे, काही वेळा हे भांडखोर, दांडगट मर्द परत एकत्र येऊन गळ्यात गळे घालतात, एका ताटात खाऊ,एका ग्लासात पिऊ लागतात... भांडणाचं  सगळं खापर मात्र  मध्यस्थावर फुटतं !😂


ही भांडणे मुळीच रंगत नाहीत हवा गेलेल्या फुग्या सारखे कोणी तरी अवसानघातकीपणा करून गप्प होते, परिणामी भांडणे अल्पायू ठरतात. तसेच ती झटक्यात मुद्यावरून गुद्द्यांवर जातात त्यामुळे बघणारे विशेष मजा घेऊ शकत नाहीत, भितीने हळूच काढता पाय घेतात. क्वचितच काही पुरुष मुद्देसूद भांडतात. मुद्द्याचे शेपूट अजिबात सोडत नाहीत आणि त्यामुळे दुसऱ्याचे काहीही ऐकूनही घेत नाहीत. (यानी राजकीय पक्षाचे/चॅनेलवरचे खास भांडण प्रशिक्षण शिबीर मनोभावे पूर्ण केलेले असते.)😆 दुसऱ्या बाजूला कच्चा भिडू असेल तर तो विषयांतर करत राहतो. त्याला  भांडण का सुरु आहे याची सतत आठवण करून दिली जाते आणि कंटाळून आपल्या वकुबाची खात्री पटली की मार खाण्यापेक्षा तो माघारच घेणे पसंत करतो, भांडण मिटते… एकूण काय  तर हे पुळचट प्रकारचे सुमार भांडण म्हणावे. पुरुष उत्तम प्रतीची बिनतोड सर्वीस करुच  शकत नाहीत. 😑

भांडण या कलेची फार आराधना करावी लागते, चिकाटी व उत्स्फूर्तता लागते ती पुरुष जमातीच्या ठायी वास्तव्यास नसते. नुसता दांडगावा, टिपेचा आरडा ओरडा आणि विषयांतर करत लाथा बुक्क्यावर येणे म्हणजे काही खानदानी कला नाही, भांडणात नजाकत म्हणून कसली ती नाही. ती नजाकत, तो नखरा आणि अभिनय  फक्त स्त्रीप्रधान भांडणांतच अनुभवावा. 💁


Women fight with more grace. There are silent treatments and politics involved too.


स्त्रीप्रधान भांडण -

हा भांडण प्रकार अत्यंत लोकप्रिय, श्रवणीय आणि प्रेक्षणीय असतो. यात इतका उस्फूर्तपणा इतका ठासून भरलेला असतो की प्रेक्षकांचे कान तृप्त झाले पाहिजेत. त्यामुळे लगेच प्रेक्षकांची दाटी होते.. हाऊस फुल्ल्ल!👯


साधीसुधी गरीब गोगल गाईसारखी दिसणारी बाई क्षणार्धात चंडिकेचे रूप धारण करते, पूर्वतयारी म्हणून पदर खोचते, बांगड्या मागे सरकवत, झिंज्या सावरत अंबाडा घट्ट आवळते, पोरा-टोरांना पायातून मागे ओढते, प्रसंगी नवऱ्यालाही मागे रेटते आणि तारसप्तकात प्रयोग रंगवायला सुरु करते.👩 मुलांच्या भांडणातून ‘आपला तो बाब्या….’ या मुद्यावरून तो वाद सुरु होतो आणि ‘तुझ्या नवऱ्याच्या तोंडावरची माशी कशी हालत नाही’, ‘तू कशी नाजूक नार तिला चपलांचा मार आहेस’, ‘तू स्वतःला ऐश्वर्या समजतेस का, तोंड बघ आरशात’ अशी अनेक वळणे कलागती काढत सुरु रहातो. ‘तुझा नवरा इकडे बघूनच का थुंकतो’ पासून ‘तुझी सासू मारक्या म्हशीवाणी बघती’ इथपर्यंत उखाळ्या- पाकाळ्या निघतात.😂ही सर्व भांडणे अस्सल गावरान भाषेत आणि अभिनयसंपन्न असतात त्यामुळे प्रेक्षकही गुंततो आणि शक्य तितक्या जवळून सुहास्य मुद्रेने आस्वाद घेतो. दोन्ही  बाजू तुल्यबळ असल्यामूळे प्रेक्षकांना रंगलेला अटीतटीचा कुस्तीचा सामना पाहिल्याचं समाधान मिळतं.😇 पुरुषांच्या भांडणासारखे टोले बसण्याची शक्यता नसल्याने  प्रेक्षक खुशीने भरभरुन दादही देतो.😂 शेवटी बरेच दिवस दोन्ही भिडू एकमेकींशी बोलणे टाकतात…. काही दिवसात तोंडावरची माशी न उठणाऱ्या माणसाच्या मुलीचं लग्न ठरतं आणि स्वतःला ऐश्वर्या समजणाऱ्या शेजारणीचा वरचा मजला महिनाभर जानवस घर म्हणून वापरायला घेतला जातो. वादावर लग्नाने पडदा पडतो, मनातलं मळभ दूर होतं…. केळवणं, लग्नाचा चुडा भरणे सगळं एकमेकींच्या हातात हात गुंफून होतं, हळदीमध्ये शेजीबाई मिळून  गळ्यात गळा घालून नृत्यही करतात! यांची ‘भांडणं लावून देणारे’ छोटे लंगोटीयार केंव्हाच चिमणीचा घास भरवून एक झालेले असतात!💕


या कलेचे जावा-जावा, नणंद- भावजय असे अनेक नामांकीत उपप्रकार आहेत आणि सगळे तितकेच महत्वाचे आहेत. बाई हसली आणि महाभारत झालं, बाई रडली आणि रामायण झालं त्यामुळे एका अध्यायात हा प्रकार संपवणे म्हणजे समस्त स्त्रीवर्गाचा घोर अपमान आहे. यात आपले मौलीक मत आवश्य मांडा. 💬


सासू - सुनेची भांडणकला -

भांडणकलेचा शिरपेच म्हणजे सासू-सुनांचे भांडण.😃 अगं-कागं करत हे भांडण भांड्यांच्या आदळ-आपटीच्या पार्श्वसंगीतावर चालतं. सुनेच्या माहेरचा उद्धार झाल्याशिवाय हे भांडण पूर्ण होऊच शकत नाही. सतत एकमेकींवर कुरघोड्या म्हणून अधिकाधिक रंगतदार! युगानू युगे चालत आलेला हा विषय, जगातली कुठलीही सून सासूला नावाजत नाही की सासू सुनेचे कौतुक करत नाही.😉 अखंड शत्रुपक्षात असणाऱ्या या दोन पात्रांमुळे टिव्ही सीरियलवाल्यांची, सिनेनिर्मात्यांची आणि कलाकारांची पोटे भरली आहेत. आता इतका पुरातन सुवर्ण इतिहास असलेल्या या पात्रांना अपवाद कुठला असणार?😅 इंग्लंडच्या राणी पासून-आपल्या घरादारा पर्यंत, मोठ्ठ्या  शहरापासून- ग्रामापर्यंत.. सगळीकडे मातीच्याच चुली!


Mother in law and daughter in law fights are mainly caused by interference of MIL in her son's marriage.

    लग्नापासूनच या नाटकाची नांदी सुरू होते. वरमाईच्या मनात  सारख काही-बाही बाssरीक सलत असते.😰 पहिला  महिनाभर कशीबशी शांतता नांदते मग आक्रमणाची पहिली संधी मिळाली.. की एकमेकींच्या डोक्यावर जिरे-मिरे वाटणे सुरु होते. हल्लीच्या सासवा ‘आमच्याकडे अस्सं काही नाही, आमचं सगळं मॉडर्न’ असं म्हणतात खऱ्या पण मुलाच्या संसारावर बारकाईने लक्ष ठेऊन असतात.😉'मला काय करायचंय' या पालुपदावर सासूबाई सगळं करून नामानिराळ्या रहातात.😛 सूनबाई काणाडोळा करत असल्यासारखे भासवून मुद्दे पक्के लक्षात ठेवून परतफेड करतात.😂 तिथे कोण कुणावर बाजी मारतंय ते घरच्यांनाही समजत नाही, तर बाहेरच्या पामरांना कशा बरे या कळा कळाव्यात ? या भांडणांमध्ये त्रयस्थांनी अगदी परिस्थिती हाताबाहेर गेली तरंच डोकावावे नाहीतर खेकट्यास मेकटे बरे म्हणून मौन राग आळवावा. अधून-मधून त्यांच्याकडच्या मोलकरणीकडून आतल्या गोटातल्या गुप्त बातम्या मात्र काढून ठेवाव्यात. (बरं असतं ते 😜!)


    घरातल्या पुरुष नवरे मंडळींची या भांडणांमध्ये चांगलीच पंचाईत होते. इकडे आड तिकडे विहीर म्हणजे काय ते त्यांना  बरोब्बर कळते. त्यामुळे बऱ्याचदा ते मधल्या फळीत खेळून परिस्थिती बिघडेल असे वाटू लागताच बाहेरचे रस्ते सुधारतात आणि रणकंदन संपल्यावर परत येतात! घरच्या रणरागिणीसमोर नांगी टाकणारे हे वीर स्वतःला ‘बिचारे’ संबोधून घेतात आणि सहानुभूती मिळवतात.😂

    यात काहीवेळा आजेसासूबाई नावाचे पात्र फार महत्वाची भूमिका बजावते. हे म्हणजे इकडे भारत-पाक सामना अगदी उत्कंठावर्धक स्थितीत असतो.. कोण मॅच जिंकेल सांगू शकत  नाही.. अशा वेळी या आजेसासूबाई बाऊन्सर टाकल्या सारखा आविर्भाव आणत नातसुनेस छान टप्पा देतात आणि उत्तुंग  सिक्सर मारायची सुवर्ण संधी देतात. नवी नातसून खुष आणि तिच्या सासूचा पोपट!😂 दोन्ही पक्षी एका दगडात मारून आजेसासूबाई शांतपणे वाती वळू लागतात (हल्ली टीव्ही बघतात)… 'मला मेलीला काय कळतंय'...असे म्हणत! अशा रितीने सामना तिरंगी असेल तर अधिकच रोमहर्षक होतो.😆 आताच्या टेक्नोसेवी सासूबाई सगळ्या बित्त्ंबातम्या आपल्या मुलीला धावते समालोचन करत सांगतात. ती सुद्धा सगळे अतिउत्साहाने ऐकून आपल्या आईस प्रोत्साहनपर टिप्स देऊन खेळात रंग भरते.😄


    हा भांडण प्रकार गूढ, रंजक, चित्तथरारक पण तेवढाच  सखोल अभ्यासाचा आहे. हे सिरीयल वाले हे नाते सुधारण्याचा विडा उचलतील  का??? सासू-सून हे नाते निखळ प्रेमाचे आणि  गोsssड  मैत्रीचे होऊ शकेल का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न…. पुढच्या पिढ्याना उत्तरे शोधण्यासाठी वारसा हक्काने दिलेले बरे…..😂 ते लॉजीकली छान सोडवतील अशी चांगली अपेक्षा करून पुढे जाऊ…. दुसरं आहेच काय आपल्या हातात ??? 😀


नवरा- बायको मधील भांडण

'मी म्हणून या माणसाशी संसार केला'..😅 या तालावर अनेक भारतीय संसार वर्षानुवर्ष नीट सुरु आहेत, कुणीही फुटकळ कारणावरुन काडीमोड घेत नाही. 'देवाक काळजी' दुसरे काय? आमच्या दारासमोर एक खूप वयस्कर मावशी रहात असत.. दिवसभर नवरा-बायको हमरी-तूमरी वर येउन भांडत.. आणि संध्याकाळी मावशी पतीदेवाना हाताला धरुन फिरायला तसेच मदिरा प्यायला नेत! काही वस्ताद पतीव्रता  बायका पिउन पडलेल्या पतीदेवाना हुडकून काढून घरी नेऊन झोपवून टाकत! हे असले प्रकार पाहता या नात्याविषयी कोणी कसले अंदाज बांधूच नयेत. 💏


Fights between husband and wife are fun and solvable as long as no third person is involved in them.

नवरा-बायकोच्या भांडणाला हा असा पौराणिक, सुरस पण चमत्कारीक वारसा आहे. कुठल्या क्षणी कुठे ठिणगी पडेल आणि युद्धाचा भडका उडेल याचा नेम साक्षात ब्रह्मदेवालाही यांच्या गाठी मारताना उमगत नसावा. या भांडणाचा प्रवास  मौन.. धुसफुस.. ते शेवटची खडाजंगी असा होतो.😅 या अत्यंत खाजगी प्रकारात शक्यतो कुणी  हस्तक्षेप करु नये. ज्याने गाठी बांधल्या तो बघेल म्हणून काही काळ बाहेरून परिस्थिती चिघळत नाही ना याकडे बारीक लक्ष ठेवावे. कधी कधी हीच जोडी दुसऱ्या दिवशी सकाळी काहीच घडले नाही असे 'made for each other couple' बनून एकमेकाला 'टाटा.. बाय बाय.. मिस्स यू डार्लींग'.. करताना दिसतात. 😂 काल यांचे आवाज टिपला का गेले होते असे तर्क काढत, घरातली जुनी खोडे उसासे टाकत, 'आमच्या वेळी असं नव्हतं..' असं बडबडत बसतात.😆 यातली काही भांडणे रात्रीत विझतात तर काही वणव्या सारखी पेटतात. या युद्धाचे मूळ कारण पुरूष की स्त्री हे समजणे कोंबडे आधी की अंडे आधी या प्रश्ना इतके अवघड आहे.😃 एक मात्र खरे… 'Two is company and three is crowd' हे तत्व अंगीकारून दोघाना एकटे सोडावे. दोघांच्याही घरच्यांनी तिथे प्रवेश निषिध्द समजावा. एकच मुलगी/मुलगा असलेल्या त्यांच्या मातांना या भांडण प्रकारात कोणत्याही साधनाद्वारे ढवळा-ढवळ करण्याची संधी उपलब्ध करून देऊ नये. फक्त दोघांना या संसाररूपी भव-सागरात अलगद सोडावे आणि पूर्ण अलिप्त राष्ट्राचे धोरण स्विकारून जपाची माळ ओढत बसावे. एकमेकाशिवाय पर्याय नसला की सुतासारखे नीट नांदू लागतात.


हल्ली मुले एकमेकाला मोबाइल वरुन मेसेज करत भांडणे करतात. ज्याचा टायपिंग स्पीड जास्त तो जिंकतो या तत्वाने इथेही मुली फडाडा टाइपिंग करत पुरूषजातीला नामोहरम करतात,😂 यांचे भांडण स्माइली.. इमोजी टाकत संपून जाते. 💏


लग्न गाठ बांधताना पूर्वी प्रियकर 'तुम दिन को अगर रात कहो तो रात कहेंगे'.. असं भोळेपणाने म्हणायचा, प्रेमभंग झाल्यावर  'दिल तुझे दिया था रखनेको, तुने दिल को जलाके रख दिया' असे रडत म्हणू लागला.. आणि आता प्रैक्टिकल पिढी …'कभी छोड दिया दिल, कभी कॅच किया दिल' म्हणू लागली!...हल्लीच्या मॉडर्न मैत्री कम लग्न नात्यात सगळे निर्णय प्रैक्टिकल असतात. कुणी कुणासाठी देवदास-पारो बनत नाही, हे छानच आहे! दोघे पूर्ण विचार करून डोक्याने प्रेम करतात.😊 आता प्रेमाची स्टाइल बदलली आहे. एका अर्थी हे  सबळ strong  नाते नाही का??? आपली मुलेच सांगतात…'take it easy mom, take it lightly'... 😅 आपणच उगीच आपलं जुन्या काळातलं खुळं प्रेम हुडकत, तुलना करत बसतो…. मुले मात्र छान लॉजिकली भांडत संसार-रथ भरारा ओढत असतात. आपण सगळं त्रयस्थ  नजरेने बघायला शिकूया…. मतभेद असुदेत मन-भेद नसावेत म्हणजे झाले! 😊


  भांडण ही इतकी सुंदर कला आहे की क्रिडा म्हणून ऑलिम्पिक मधे या कलेचा सहभाग व्हावा असे मला मना पासून वाटते. सगळी पदके आपणच घेऊ यात कोणाला तिळमात्र शंका नसावी.😂 हवं तर आम्ही खास कोल्हापुरी पंचांचे पथक पुरवू. बौद्धिक वाद घालायला आणि पथकात होणारी संभाव्य अंतर्गत हाणामारी थोपवण्यासाठी पुण्याचे वाद-निपुण पथक सोबत पाठवू. अशी ही कलह-कला पदक देऊन सन्मानित केली पाहिजे. 😀


असं वाटतं ‘निकोप भांडा आणि भांडू द्या’ हा मूलमंत्र करावा. प्रत्येकाने योग्य कारणासाठी मनास वाटेल तेंव्हा, वाटेल तितक्या वेळा मनसोक्त भांडावे आणि मन मोकळे करावे. भांड्याला भांडी लागूदेत, चेपली भांडी तर चेपूदेत पण मनात कटूता ठेऊन हार्टअटॅकला आमंत्रण देण्यापेक्षा वळीवाच्या पावसा सारखं बुद्धीने भांडून निरोगी राहावं.😂 भांडण ही कला आहे आणि त्यातून मनातील जळमटं  दूर करून जीवनाचा आनंद घेणं ही पण एक कलाच आहे. असे हे भांडण पुराण सुफळ संपूर्ण!!!😃


आपले मौलिक विचार पटल्यास संशोधनात अमुल्य भर घाला, न पटल्यास कोणाशी तरी मनसोक्त भांडण करून आत्मिक उन्नती तरी साधा. 😝



विजयश्री तारे-जोशी

कोल्हापुर-18.7.2020


टिप्पण्या

  1. नेहमी प्रमाणे झकास, खुसखुशीत लेख..👍👌

    उत्तर द्याहटवा
  2. प्रा एस पी चौगले, वाकरे भांडणाचे भरपूर प्रकार समजले,लिखाण मस्त,पीएच डी या विषयावर होऊ शकते, मस्त जयश्री, keep it up, best luck

    उत्तर द्याहटवा
  3. अहो, भांडणे ही कला देवा ने बायकांना एवढी जास्त का दिली आहे याचे उत्तर एखाद्या संताला ही कळणार नाही. स्व:ताची बायको असेलतर प्रतेक वेळी संपूर्ण कुळाची शकलं ऐतिहासिक पणं ऐकावी लागतात. यामुळे सायकोलाजीची तपासणी होते असं वाटतं. एकदम छान लिहिलंय मडम.... साठे शिवाजी सातारा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. उस्फुर्त प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार मि. साठे.😃
      स्मरणशक्ती चांगली राहील तुमची त्यासाठी खटपट सुरु आहे त्यांची एवढी. 😂

      हटवा
  4. झकास लेख! व.पु.काळेंची एक जे.पी. नावाची गोष्ट आहे, त्यात एक जोशी आडनावाचे पात्र भांडण कलेचा सांगोपांग अभ्यास करून भांडावे कसे याचे क्लासेस काढते! योगायोगाने तुझे पण आडनाव जोशी आहे! अभ्यास तयार आहे, तेंव्हा बघा!😜😜😜..मिलिंद गुर्जर

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. 😂😂 retirement नंतर नक्की विचार करते. तोपर्यंत अभ्यास सुरु ठेवेन.

      धन्यवाद मिलिंद गुर्जर!!

      हटवा
  5. सुंदर!खूप सुंदर!!खूप खूप सुंदर!!!काय लिहितेस गं बाई तू !
    भांडण हा खरं तर अगदीच सामान्य विषय !रोज हजारो, लाखो भांडणं घडत असतात त्यात नावीन्य किंवा विशेष दखल घेण्यासारखे काय आहे असा कोणीही विचार करून या विषयांकडे दुर्लक्ष करेल पण तू त्या दुर्लक्षित विषयाला केवढे जिवंत आणि मनोरंजनात्मक रूपडे दिले आहेस !अगदी तुझ्या विषय आणि शब्दंप्रवाहात आम्ही अलगद तल्लीन होऊन पोहत राहिलो.मधले विनोद तर फारच बहारदार .भांडणाचे इतके सुंदर विश्लेषण माझ्या तरी वाचनात नाही .पट्टीची लेखिका आहेस तू !ओघवती भाषा सुरेख आहे .अशीच लिहीत रहा !
    मनिषा कुलकर्णी ..दूबई

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अनेक अनेक आभार मनीषा कुलकर्णी!
      किती सुंदर अभिप्राय!! 😊 असेच वाचत राहा आणि मला प्रोत्साहन देत राहा. 😃

      हटवा
  6. श्री, नेहमीप्रमाणे च सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख!!! भांडणाचे एव्हढे प्रकार असतात !!हे एव्हढ विश्लेषण!!!
    खरच मानलं तुझ्यातील लेखिकेला👍तुसी ग्रेट हो!!!
    लेख शेवटपर्यंत मनोरंजन करीत राहतो. असच लिहीत राहा. All the Best 👍

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अनेक अनेक आभार मंदा!
      तुझा अभिप्राय वाचला की ब्लॉग लिहिल्याचं सार्थक झालं असं वाटतं बघ. Truely motivating always!!

      हटवा
  7. कुंदा पाटील, बदलापूर
    श्री भांडण ही कला आहे हे मान्य आणि तसा हा विषय दुर्लक्षित अशा ह्या सामान्य विषयाला तू इतकं जिवंत केलं की बस..... अप्रतिम 👌👌आणि त्यातून भांडण याची विभागणी तू खूप छान केलीस. पुरुष प्रधान, स्त्री प्रधान, पारंपरिक, सासू-सून, नवरा-बायको खरंच खूप छान विषय निवडलास. श्री अजून एक उच्च शिक्षित-उच्च-शिक्षित, अशिक्षित-अशिक्षित, एक शिक्षित तर दुसरा अशिक्षित ( या प्रकारात मात्र मी तरी शिक्षित माघार घेताना आणि अशिक्षित जिंकताना बघितला आहे )😒 'भांडणात मतभेद असूदेत मन-भेद नसावेत म्हणजे झालं 'हे तर चिंतनिय आहे खूप छान संदेश दिला तू 👌तुझी निरीक्षण शक्ती आणि स्मरण शक्ती कौतुक करण्यासारखीच आहे. अशीच लिहीत रहा तुला पुढील लेखासाठी ' शुभेच्छा '👍 'All the best ' 👍
    कुंदा पाटील, बदलापूर

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अनेक आभार कुंदा.
      हो ग आता publish केल्यावर अनेक नवीन नवीन प्रकार आठवतात. पार्ट २ काढूया नक्की. शिक्षणावर आधारित नव्हतं सुचलं मला खरं. नक्कीच नवीन प्रकार.
      तुझीपण Phd सुरु दिसतीये याच्यावरती. 😉

      सुंदर अभिप्राय!! 😊 असेच वाचत राहा आणि मला प्रोत्साहन देत राहा. 😃

      हटवा
  8. Apratim lekh,Madam bhandan ha kshullak shabda vatato pan tumhi itke changle rangavle ahe tyala todach nahi.Bhandi chepne,hart attakpeksha bhandan bare,he sarv shabda prayog vaprun bhandnachya kathes pharach godi dili,chhanch lekh Abhinandan,Ek vinanti amchyabarobar kadhi bhandu naka

    उत्तर द्याहटवा
  9. जयश्री, अगदी अवघड विषय निवडून तू तो छान केला आहेस. वाचतांना फार मजा वाटली . छान लिहिले आहेस, तुझी लेखणी अजोड आहे! तुझ्या लिखाणात पू. ल, व. पू, अशा नामांकित लेखकांची छाप दिसते! मस्तच!!

    उत्तर द्याहटवा
  10. जयश्री, छान लिहिलं आहेस.. उत्तम निरीक्षण आणी सखोल अभ्यास आहे.. लिखाणाचे विषय ही वेगवेगळे आणी उत्कंठापूर्ण... असेच लिखाण चालू राहू दे.. all the best.. !!!

    उत्तर द्याहटवा
  11. जयश्री खुप सुंदर लिहिले आहेस. चांगलं लिहिणारा कोणत्याही विषयावर छानच लिहू शकतो हे तू दाखवून दिलस. मलकापूरात आपण सगळे भांडणाचे प्रकार अनुभवले आहेत. नळावरची भांडण were part & parcel of our life. पुढे ती सवय सुटली म्हणा. 😃
    निलिमा परांजपे...USA..

    उत्तर द्याहटवा
  12. Chan ...sunder ..
    "Tophakhane " "Mahabharat n Ramayan ". Sarva Kahi vachoon Bhari vatala. Navara ...n ...bayako Che bhandana ajoon thoda rangavayala pahije ASE vatataya.thodakyat avarle ASE disate ..Tari hi Chan .Barik drusti ahe bhandanyavar Maja Ali.
    Asecha likhan vahu de.
    R B Tophakhane Belgavi

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Navara-baykochya bhandanakade ajun mi trayastha najareni nahi pahu shakat tyamule far nai lihila. 😂😂 One sided watel na mag te.

      Detailed reviews baddal anek abhaar Mr. Tophkhane!

      हटवा
  13. अप्रतिम
    मिरे जीरे वाटणे
    पामराला कळा काय कळणार
    आजीसासूची गोलंदाजी
    अफलातून व अचूक
    खूप शुभ कामना मॕडम
    आपण मराठीच्या प्राध्यापक असायला हव्या होता .डाॕ. रणजित पाटील

    उत्तर द्याहटवा
  14. लेख बरा झालाय. लेखाचा शेवट विनोदी ढंगाने झाला असता तर अधिक मजा आली असती. असो.

    उत्तर द्याहटवा
  15. jgd.कमाल व धमाल! भांडणाचे अस्सल प्रकार व नमूने मांडलेस. सासुसुनेच्या व नवराबायकोच्या परंपरागत लोकमान्य कलहापासुन ते आधूनिक मोबाईल जमान्यापर्यंत सारे कलगी तुरे यात आले. कोल्हापुरी अस्सल रांगड्या भांडणापासून पुणेरी शिष्ट प्रकारांचा मागैवा आहे. विशिष पुरुष व महिलांच्या कलह शैलीचे नमूने व भेद सुरेख! या भांडणशास्त्राचे विषयावर मनोविज्ञानातील विद्दावाचस्पतीची पदवी तुला मिळायला हवी! का प्रयत्न केला नाहीस असे सारे कलह नमुने व त्यांचे केलैल्या विश्लेषणावरुन वाटते, बघूया प्रबंध लिहितेस का? लोमान्य व लोकप्रिय होईल! कलह शास्त्रावरील या लैखाबद्दल करावे तितके अभिनंदन अपुरै!
    जगदीश शेटे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बापरे!! विद्यावाचस्पती वगैरे नाही ओ सर. 😅 पण असा प्रबंध लिहायला नक्की आवडेल. भांडण बघायला आणि त्या raw emotions मध्ये माणसाचा मेंदू किती सुंदर आणि तल्लखपणे चालतो हे पाहायला खूप मजा येते मला त्यामुळे हा विषय सुचला खरंतर.

      प्रोत्साहनात्मक अभिप्राय दिल्याबद्दल अनेक आभार शेटे सर. 😃

      हटवा
  16. मलकापूर मधे भांडनासाठी क्लास आहेत काय...फार भारी
    R.k.Patil pune

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -