गो गो गोवा..

मनभावन हा श्रावण ....


Shravan / savan is an auspicious month in Hindu calendar. It comes with many beautiful flowers like hibiscus

फांद्यावरी बांधले गं 

मुलींनी  हिंदोळे,

पंचमीचा सण आला,

डोळे माझे ओले.

        हा मनभावन श्रावण सगळ्या स्त्री जातीला हुरहूर लावतो आणि मनात माहेराची सय देतो. कितीही वयाची बाई असो तिचे तन-मन आईच्या कुशीत अलगद शिरते…. सगळी लोकगीते बाईला तिच्या हिरव्या माहेराला घेऊन जातात आणि  नागपंचमीच्या झुल्यावर हळुवारपणे बसवतात... 😇


विजांचा कडकडाट, मेघगर्जना करत उरात धडकी भरवणारा आषाढ संपत आला की श्रावणाची सोनेरी चाहूल लागते. आषाढात जलधारानी चिंब चिंब भिजलेली धरणीमाय हिरवे उसासे टाकते आणि हिरवा सोहळा सुरु होतो. आकाशात कधी अवचित इंद्रधनू दिसते तर कधी सोनेरी झालर लावलेले सावळे अभ्र इकडे तिकडे पळू लागतात. अवघे चराचर डोलू लागते. रुमझुम पावसात, हिरव्यागार आसमंतात रंगीत फुलांचा गंध पसरतो. समस्त झाडे  छान सुस्नात होउन  श्रावण-अर्घ्य द्यायला फुलांनी बहरून जातात. श्रावणालाही माहिती असते की ही फुलांची गंधीत ओंजळ परमेश्वराच्या चरणी जाते आणि प्रत्येक फुलाचे आयुष्य कृतार्थ होत आहे. श्रावणात बहरलेला नाजूक पारिजात, सुगंधी बकुळी, गुलाब, सोनचाफा, सोनटक्का, केवडा,  कृष्णकमळ, गुलबक्षी…. किती म्हणून नावे सांगावीत, सगळे आपापल्या रंग-गंधानी अवनी भारून जणू आसमंताची पूजाच आरंभतात. 😍

Shravan comes in July- August in English calendar, rainy season is about to be over and everything is lush green.

निसर्गदेवता श्रावणात मलकापूरला हिरवा गार शालू नेसवते. लोकांच्या मनात उत्साहाचे उधाण येते. माझेही मन तिथला गंध श्वासात भरुन घेण्यासाठी आपोआप पाचूच्या माहेरी रवाना होते आणि लेखणीतून हिरवेच मोती टपकायला लागतात…. या इवल्याश्या गावात नागपंचमीपासून आम्ही मुली झिम्मा-फुगड्या खेळायला सुरु करत असू. त्यावेळी सोडियम व्हेपर लॅम्प पहिल्यांदाच आमच्या रस्त्यांवर लागले आणि मग उत्तर रात्री पर्यंत आमचे झिम्म्याचे फेर, फुगड्या, घसरफुगडी, पिंगा, घोडा, गोफ विणू , आकाशबंगला हे सगळे पाहून रस्ते तृप्त होत असत. रात्रीचं जेवण झाले की आम्ही एक कान बाहेरच ठेवून असू, अभ्यासाचं नाटकही चाले त्याच्याबरोबर जेमतेम अर्धा तास, मग मैत्रिणींचा हाकारा येई की लगेच आम्ही पसार! ‘अभ्यास करा, कशाला उगीच जागरण करता’ असे शब्द आम्ही चुकूनही ऐकले नाहीत कारण... आमच्या माता.. भगिनी.. आज्जी.. आमच्या पाठोपाठ खेळायला रस्त्यावर हजर असत. त्यांची जुनी गाणी, ओव्या, ठेवणीतले खेळ यांच्या तालावर आमचे पाय भिरभिरत आणि हा उपक्रम गणपती विसर्जनापर्यंत सुरूच राही. महिनाभर मस्त सर्वांग-सुंदर व्यायाम होई. वर्षभर त्या आठवणी आतुरतेनं श्रावणाची वाट बघायला लावत. मुली एकमेकींना मजेशीर उखाणे घालत पकव्याच्या तालावर.. "चुलीवर ठेवला पापड गं.. पापड गं… xxxच्चा नवरा माकड गं.. माकड गं".. असला नामी उखाणा घालत... मग जोडीदार मुलगी हिच्या  असलेल्या/नसलेल्या पतीला घोडा.. बैलोबा करुन टाके! हास्य कल्लोळ उठायचे आणि फुगड़ी गोल गोल घुमायची. सगळे उखाणे-गाणी सासरा, सासूबाईं, नणंद, जाऊबाई… पतीदेव अशा सासरच्या कुर्रेबाज मंडळींची  मनसोक्त थट्टामस्करी करणारी असत. त्या काळी नव्या सुनेला काही बोलायची सत्ता नसे, तिच्या मनाला गुदगुल्या होत आणि ती खुदूखुदू हसू लागे. ते दिवे सुरुवातीला मंद निळा प्रकाश टाकत… मग रात्र होईल तसा स्वप्न नगरमध्ये असावा तसा नीळसर चंदेरी  वेगळाच प्रकाश पडे. आटपाट नगरीत खेळणाऱ्या सगळ्या बायका मुली त्या रुपेरी प्रकाशात खूप सुंदर दिसायच्या. गुलाबाच्या फुलाप्रमाणं सुंदर रुप लाभलेली सुहास्य-वदनी, मृग-नयना गुलाब कारेकर खेळताना खूप सुरेख दिसायची. त्या प्रकाशातले तिचे दैवी सौंदर्य अजून आठवते. जुनी गाणी सांगणारी उत्साही चपळ भिकूताई मिरजकर-मानकर, पवार, वारंगे, पास्ते, सक्रे, घुगरदरे, जोशी, कुलकर्णी, शिंदे, राजमाने, अशा अनेक लेकी-सुनांचा आमचा मोठा परिवार होता. 👯


फुगड्यांची मस्त सलामी झाली की  रहाट-गाडगं, खिस बाई खिस, झाका-झकुटा, गोफ विणू असले छोटे खेळ करत  झिम्म्याचे फेर धरून खेळ  रंगात यायचा. मारुतीच्या देवळाजवळ शांता वर्णे-विंचू यांचं घर. तिला खूप गोड पण खणखणीत आवाजाची ईश्वरी देणगी आहे. शांताचं गाणं इतकं सुरेल तालबद्ध  की सगळ्या गल्लीला ऐकू जाणारच. तिने ‘रुणुझुणुत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा ss’ सुरु केलं की पाऊलं आपोआप तालात पडायला लागायची. ‘बारा घरच्या बाराजणी खेळती अंगणी, अंगणात रंगली गं माहेरची गाणी..’ हे गाणं अजूनही तिच्याच आवाजात कानात  घूमतं. सुरुवातीला हळूहळू चालणारी गाणी आणि मग टाळ्यांच्या तालात पळणारे पाय, खूप धमाल यायची. असा चढत्या क्रमाने खेळ रंगून पूर्ण दमणूक झाली की इतर बैठे सांस्कृतिक कार्यक्रम, नाटुकली, नकला, गाणी असे करत उशिरापर्यंत खेळ रंगायचा. सगळ्या बायका कायम कामात असल्या तरी हा महिनाभर त्यांना खूपच बळ येई आणि त्या दंगा करत टाळ्यानी, गाण्यानी आणि लोकगीतानी गल्ली दणाणून सोडत. घरात अखंड भांडणारया सासू-सुना, जावा-जावा  अशा नामी जोड्यांच्या फुगड्या, एकमेकीवर केलेले लाटण्याचे हल्ले बघायला विशेष मजा येई, याला जास्त टाळ्या पडत! एरवी फक्त मुलांवर ओरडणाऱ्या मायाळू आया-बायांचे ते भन्नाट करमणुकीचे कलाविष्कार  बघून आम्ही आवाक होत असू. हा महिना संपूच नये असं मनापासुन वाटायचं. त्या काळी Idiot Box  नव्हता त्यामुळे आम्हाला वर्षभर पुरणारी अस्सल किस्से- कला- क्रिडा यांची मेजवानी मिळे. सगळी लहान मुले सुद्धा पेंगुळलेल्या डोळ्यानी सगळं पाहात बसायची. दुसऱ्या दिवशी शाळा आहे हे आठवलं की दचकून… नाईलाजाने.. ‘उद्या लवकर खेळ सुरु करू’ या बोलीवर रात्रीची सांगता व्हायची. त्या रम्य आठवणी घेऊन, त्या भिर-भिर तालावर आम्ही झोपी जात असू. कधी रिमझिम पाऊस पडू लागायचा मग हेच खेळ indoor होऊन नरसोबाच्या किंवा मारुतीच्या देवळात रंगायचे. सगळ्या बायकांच्या उत्साहामुळे ही १००-१२५ वर्षांपूर्वीची गाणी, खेळांचा सांस्कृतिक ठेवा छान पिढ्यानपिढ्या पुढे चालत राही. 😃

Champa, chafa, jaswandi and many more flowers come in this season.
Thank You Mrs. Rekha Upadhye for sending this beautiful picture.  

     श्रावणी सोमवारी शाळा चार वाजता सुटे परत येताना घराघरातून पापड कुरडईचे तळण, अळूवड्या, मोकळी डाळ, काकडीची कोशिंबीर यांचे परिमळ दारोदारी दरवळायचे. लगेच पळत त्यांच्याच घरातल्या पानावर जाऊन बसावं की काय असं वाटून जाई. सोमवारी प्रत्येक मलकापूरकर टेकडीवरच्या महादेवाला आवर्जून जातोच. घरी दप्तर टाकून आम्हा मैत्रीणींची स्वारी टेकडीवर पळायची. तिथली हिरवीगार वनश्री मन मोहून टाके. पावसाचे मोती केसात माळत हिरव्या पठारावर पळून गार वारा उरात भरून घ्यायचा. छत्री वाऱ्यासोबत उडायची म्हणून नेण्याचा प्रश्नच नसे. श्रावणसरी अंगावर घेताना अगदी मस्त पिसा सारखं हलकं वाटायचं…. मग पोटात कावळे ओरडायला लागले की आई आठवायची  की भराभर पायऱ्या उतरून घर गाठायचं. आई-बाबांचा उपवास असे, पण ते सुग्रास भोजन आधी आमच्या मुखी पडायचे. आई आम्हाला तृप्त करुन मगच जेवायची.. त्याची जाण आत्ता आली.. शुक्रवारी कुमारिका पूजनाला आमंत्रणे येत, पोपटी केळीच्या पानात असे रंगीबेरंगी पदार्थ दिसले की पाहूनच मन तृप्त होई. पानाचा विडा खात १० पैसे दक्षिणा घेऊन येताना झुमझुम पाऊस अक्षता डोक्यावर  घेत त्याच्या तालावर आम्ही नाचतच घरी जात असू. शुक्रवारी घरा-घरात चुलीवर रट-रट पुरण शिजे… जोडीला खमंग तळण, मसालेभात, चटण्या, कोशिंबीरींच्या थाटात गौर बसे, जिवंतिका पूजन होई. सवाष्ण, कुमारिका, मुंजा अशा जेवणावळीचे पुण्य घडे. संध्याकाळी दूध फुटाणे देऊन हळदीकुंकूचे कार्यक्रम होत. अस्सा  हा शुक्रवार कुठे उगवे आणि कुठे मावळे कुणालाच कळायचं नाही. प्रत्येक वाराची वेग-वेगळी व्रते आणि मजा अगदी रविवारी सुद्धा आदित्य राणूबाईची कथा. या कथा वाचताना फार मज्जा येई, आम्ही उलटे-सुलटे शास्त्रीय प्रश्न विचारले की आज्जी 'अगं शास्त्र आहे ते… वाच बघू नीट' करत गूळ-दाणे खायला देई आणि प्रश्नांना हळूच बगल देई. 😆


श्रावण आणि अध्यात्म यांचं जवळचं नातं असावं कारण त्याकाळी प्रवचन आणि कीर्तनाची रेलचेल असे. कीर्तनकारबुवा निजामपूरकर बुवा, दशपुत्रे बुवा श्रावणातील श्रवणीय कीर्तन करत. एकदा तर एका बुवांनी कृष्णजन्माचं अस्सं जिवंत वर्णन केलं की देवकीचे हाल ऐकून डोळ्यातून आपोआप अश्रुधारा वाहू लागल्या आणि कृष्णजन्माबरोबर  सगळे आनंदाने नाचले. हे असे अवघ्या जनांना भक्तिरसात कृष्णरंगी डुंबायला लावणारे कीर्तनकार श्रावणाची देणगीच होते! जन्माष्टमीचा सोहळा झाला की दुसऱ्या दिवशी दहीकाला… दही दूध पोहे असे काही एकजीव व्हायचे की त्या प्रसादाने आपण  गोप-गोपी आहोत असं वाटायला  लागायचं (ही दही हंडी देवळात फुटे, उगीच मानवी मनोरे नसत).  मलकापूर मधे त्या काळी जन्माष्टमीचे सुंदर हालते देखावे, जिवंत देखावे सादर करत असत… त्यामुळे सगळीकडे बाळकृष्ण, यशोदा, नंद, वासुदेव-देवकी अशी जिवंत/चित्रातली पात्रे दिसत...आणि आपण गोकुळवासी आहोत अशी नकळत अनुभूती येई! 😊


श्रावणात सगळे सात्विक, सोज्वळ खाणे.. त्यामुळे वागणेही आपसुकच गोड प्रेमळ होई. या पवित्र महिन्यात सत्य नारायण पूजा सगळीकडे संपन्न होत. अनेक जेवणावळीचे सोहळे घडत. कर्दळीचे खांब उभे करुन चौरंगी विविध फुलांनी सजवून छान पूजा असायची. केळे घालून केलेल्या त्या प्रसादाची चव जिभेवर रेंगाळत राही, परत कधीही शिरा तस्सा होत नाही. घरोघरी प्रसादाचा द्रोण पोहोच व्हायचा. त्या साधूवाण्याची गोष्ट तर पाठ होई… आणि ती ऐकून ऐकून आयुष्यात कधीही नवस बोलायचा नाही असा ठाम निर्णय घेतला… हो  उगीच विसरलं तर सत्वपरीक्षा होणार असा धसका बालवयातच  बसला. त्या निमित्ताने होणारे गीत रामायण, सोंगी भजन, भक्ती-गीतांचे कार्यक्रम मनापासुन ऐकले. या संत-गुणी महिन्याने आमचे बालपण खरे समृद्ध केले. 😃

Indian festive season starts around Shravan / savan and they continue till Diwali. Many pujas and religious things are performed in Shravan.

          मंगळागौर पूजन आणि जागरण  हा श्रावणाचा सर्वोच्च आनंद. सर्व मंगळवारी आम्हा प्रवीण मुलींना आमंत्रणे असायची. एरवी आम्हाला खसाखसा ओरडणाऱ्या बायका गोड बोलू लागत. कुणाचीही मंगळागौर असो फुले, पत्री गोळा करण्यापासून पहाटे पर्यंत धमाल उडवून देण्यापर्यंत सगळी कामे आम्ही आनंदाने करत असू. खेळून दमलो की विनोद, नाट्यछटा, गाणी या विविध गुण दर्शनाची रंगत चढे. त्या गाजवलेल्या मंगळागौरींच्या अनेक सुरस कथा आहेत. असा हा श्रावण हळूच संपायचा आणि आम्हाला अलगद भाद्रपदातल्या गणपतीकडे ओढून न्यायचा. 😃😍


हरतालिकेचा कडक उपास करूनसुद्धा रात्रीपर्यंत आम्ही खेळत असू आणि दुसऱ्या दिवशी पायात गोळे यायला लागत. मग आईची बोलणी आणि भावांची चेष्टा सगळं चुपचाप सहन करावं लागे. आई प्रेमाने पाय दाबून देई, भाऊ मात्र 'चांगला नवरा हवा ना..  मग रहा उपाशी '...असे म्हणून फिदी फिदी हसत. हरतालिकेदिवशी गणपती आले की मात्र पंचाईत व्हायची. भाऊ उपाशी भक्त मुलींना चिडवून चिडवून पैजा लावून भरपेट मोदक खात आणि आम्हा बहिणींना मात्र त्या सुंदर मोदकांच्या वासात उपास धरून तोंड वाळवून बसावं लागे. आईने भावाना रागे भरले, ‘उद्यापण फक्त तिच्यासाठी मोदकाचा बेत आहे’ असे ठासून  सांगितले तरी मनातून ‘आज मोदक खायला मिळाले नाहीत’ ही खंत असेच. भावांचे चिडवणे अती झाले की परवलीचे अस्त्र भोकाड पसरायचे, आई हसत त्याना धपाटे देई, तरी त्यांचे चिडवणे सुरुच असे. ती बाळबोध भांडणे आणि  कांगावा आठवला की आता मनोमन हसू येतं. 😂


श्रावणाचा रंग चढत चढत गणेश आगमनाची चाहूल लागे. त्या काळात चुलीवर किंवा फरफऱ्या स्टोव्हवर स्वयंपाक चाले. बायका घरातली कामे करून खूप दमून जायच्या तरीही खेळायला आल्या की विजेच्या चपळाईने खेळायच्या. विहिरीचे पाणी भरून सगळ्या कशा fit and fine होत्या. कुणाची कंबर, पाय दुखल्याचं कधी ऐकिवात नाही. गणपती आले की उत्साहाची परिसीमा येई. गौरीच्या आगमनाने तर अवघं चराचर नाचू लागतं. पवारांच्या दारात मोठा झिम्म्याचा फेर धरायचा. मधे लुडबुडी लहान मुले हातात हात घालून चालायची, मग आम्हा मुलींचा फेर आणि बाहेर अवघ्या निपुण, चपळ बायकांचा फेर. हळूहळू ताल वाढत जाई आणि गाण्याचा, टाळ्यांचा टिपेचा आवाज घुमू लागे. पोरे घाबरुन गोला बाहेर पळत, मग मधे काही बायका मधे सूप नाचवत, घागर फुंकत आणि घागर फुंकताना ताल-सूर-नादाच्या एका उच्च पातळीवर  एकदम… पवारकाकूंच्या अंगात गौरीचा संचार होई. त्या 'फूss फूsss' करत घुमू लागल्या की त्यांना कुंकू लावायला आणि ओटी भरायला बायकांची झुंबड उडे. पवारकाकूंना धरून घरी नेले जाई. तिथे परातीवर उलथणे घासून  खर्राssखर्राss असा आवाज काढत गौरीचे कान उघडले जात. मग आया-बाया ‘यंदा मुलीचे लग्न होईल का?, घरात पाळणा हलंल का?’ असले प्रश्न गौरीला विचारत. त्या फक्त मान हलवत हूं हुं करत हो की नाही सांगायच्या. बायकांच्या गोंधळात उत्तरे ऐकू येत नसत पण मळवटाने भरलेला त्यांचा तो चेहेरा सुंदर आणि तेजस्वी दिसे हे खरे. आम्ही साक्षीदारासारखं वाकुन बघत रहात असू. मग कुणीतरी आम्हा मुलींना बकोटीला धरून बाहेर काढे. गावातले सामाजिक प्रश्न आम्हाला कळू द्यायच्या नाहीत. आम्हाला अगदी शेवटच्या ओव्हरला लाईट गेल्यावर वाटते तसे व्हायचे. महत्वाची ओव्हर चुकायची… पुढचे वर्षभर आम्ही त्या काकूंना चांगल्याच वचकून असायचो. हा कार्यक्रम गौरीच्या जेवणादिवशी वर्षानुवर्षे अगदी न चुकता रंगायचा. ओट्या भरून झाल्या की मग गौरीबाई सगळ्यांना आशीर्वाद देऊन शांत व्हायच्या. आम्हाला घरी परतताना मार्क किती पडतील विचारायला हवे होते.. असे वाटून जाई….पण इतक्या सगळ्या उचापती करत अभ्यासाचा उजेडच असे त्यामुळं  झाकली मूठ ठेवली तेच बरे केले हे ही पटे! 😝

Ganesh Chaturthi comes in Bhadrapad which is followed by Shrawan. Ganapati is Hindu God of intelligence and this festival is mainly celebrated in Maharashtra.

असा हा माझा हरवलेला श्रावण दरवर्षी टेकडीवर  न चुकता इंद्रधनूचा दुहेरी गोफ दाखवी आणि त्याचे रंग मोजेपर्यंत अंतर्धान पावे!  हा रंग बावरा, हिरवागार, टाळ्यांच्या तालावर नाचणारा श्रावण मी आज ही शोधत फिरते… कधी कधी तो मला एखाद्या गल्लीत, मंगळागौरीत नाचताना सापडतोही.. तरीही मन  माझ्या लहानपणीच्या श्रावणात रमतं.. आणि मी गुणगुणते

     काय सांगू ,काय सांगू Sss

      माझं माहेर मोलाच्ं….

      कसं सांगू ,कसं सांगू sss

      राजा इंद्राच्या तोलाचं….


                                                                      ********


ता. क. 

 हा  लेख माझ्यासाठी या बालपणीच्या आठवणीचा अमुल्य खजिना आहेत. या गोष्टी  चाळीस वर्षा पूर्वी घडून गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांना ‘मनोरंजन’ याच साठी वाचून त्यातून आनंद घ्यावा. यात कोणत्याही अंधश्रद्धेला खत-पाणी घालण्याचा मनोदय नाही. घडले तसे सांगितले इतकेच याची कृपया नोंद घ्यावी. 😀


विजयश्री तारे जोशी

नागपंचमी ता 25.7.2020


टिप्पण्या

  1. छान!! मी यातले तसे कोणतेही प्रकार केले नाहीत. पुरोहित कन्या ला असणं हादगा असायचा व प्रसाद.बाकी या season मधली हिरवाई मात्र आत्ता अधिक अनुभवते

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मजा असायची अगं यात. आता मीही हिरवाई जास्ती एन्जॉय करते आणि जमतील तेवढे सणही करते.

      हटवा
  2. श्री, श्रावणाच खुप छान वर्णन!!! हे सगळं आपल्या वेळी होत, आताच्या मुलांना- मुलींना कशाला असा श्रावण पगायला मिळेल? शाळेला तर श्रावण सोमवार, आणि शनिवार कधीच बंद झालेत!! मी तुझ्या इतका नाच गाण्यात श्रावण अनुभवला नाही, तरी तुझ्या श्रीमंतीची मी कल्पना करू शकते. परत एकदा तुझ्या स्मरणशक्तीला सलाम😊👌

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. काय माहिती आजकालच्या शाळेतल्या मुली काय करतात. माझ्या मुलीच्या शाळेत तेंव्हा चालायचं काहीतरी.. थोडक्यात पण लक्षात राहण्यासारखं.. आता नाच-गाणी म्हणजे धांगडधिंगाच करतील.

      अनेक आभार मंदा.. अशीच अभिप्राय कळवत राहा.

      हटवा
  3. जयश्री, मन भावन श्रावण, या तुझ्या आठवणींना सलाम!४०/४५ वर्षापूर्वीच्या नाग पंचमी, श्रावण महिन्यातील झिम्मा फुगडी , गाणी व त्या काळात तुम्ही मैत्रिणींनी गायलेली गाणी, श्रावणातील शाळा सुटल्यावर बरोबर दर सोमवारी संध्याकाळी महादेव टेकडी वर थंडगार हवेत खेळलेले खेळ , संध्याकाळी ७ वाजता केळीच्या हिरव्यागार पानावर वरण भात, पुरण पोळी, बटाटा भजी, तळलेले पापड, कुरुडाई , मसाले भात यावर ताव मारताना मजा यायची, मन तृप्त व्हायचे. गोकुळ अष्टमी, गौरी गणपती हे सर्व तुझ्या लेखणीतून आहे तसे अनुभवायला मिळाले. हा तुझा लेख मनाला खरोखर खूप खूप भावला आहे. अशीच छान छान लिहित जा.

    उत्तर द्याहटवा
  4. जया खुप सुंदर लीहीला आहेस लहानपणीच्या मलकापूरची सफर घडवून आणलीस. एकेक प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिला. 😊👌👌👍

    उत्तर द्याहटवा
  5. व्वा! जया तुझी स्मरणशक्ति अफाट आहे. मलकापूरातले सगळे सण, उत्सव तंतोतंत डोळ्यासमोर उभे केलेस‌ . माझं मलकापूरला फारसं जाणं होत नाही त्यामुळे बऱ्याच गोष्टी विसरायला झाल्या होत्या. तुझा ब्लाॅग वाचून पुन्हा नव्याने मलकापूरची सफर करून आले. खुप छान लिहिले आहेस
    निलिमा परांजपे..कोरोलिना

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद निलिमा!
      असं विसरून कसं देईल मलकापूर तुला?? या ना त्या स्वरुपात ते भेटत राहीलच!

      हटवा
  6. खूप सुंदर वर्णन . आम्ही पण kolhapur la खेळायची हे खेळ. आठवणी जाग्या झाल्या. हल्लीच्या मुलाना आपल्या सारखे काहीच अनुभवता येतं नाही. आपली पिढी भाग्यवान. नव्या जुन्या सर्वाचा अनुभव घेतला
    सीमा मोरे केसरकर पुणे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अगदी खरं आहे. आपली पिढी खरंच भाग्यवान. आता overall ‘trend’ की काय म्हणतात तो परत रूढी आणि परंपरा जपण्याचा दिसतो मला. आशा करूया की तो वाढत जाईल.

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

      हटवा
  7. सुरेख वर्णन.. आमच्या ही बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आता पुढील पोस्ट मध्ये कोल्हापूर विषयी वाचायला आवडेल.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद वर्षा !!!😃
      लिहायचं आहे कोल्हापूरबद्दल पण अजून मलकापूरमधून बाहेर यावंसं नाही वाटत बघ! 😅

      हटवा
  8. किती सुरेख लिहीले आहेस गं !अगदी श्रावण महीन्यातील प्रत्येक सणाच्या बोटाला हळूवार मायेने धरून शब्दांच्या मदतीने ते सर्व सणं जसेच्या तसे उभे केलेस आमच्यासमोर आणि पूर्ण श्रावणमहिन्याची छान अनुभूती आली व मन त्या मनभावन महिन्याची सैर मनाने पुन्हा करायला सज्ज झाले अगदी झोपाळ्यावर झुलण्यापासून झिम्मा फुगडी खेळायला सुद्धा !
    खूप सुंदर लेख !!👌🏻🙏🏻🌹
    मनिषा कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अरे वाह मनीषा!!
      नक्की हौस पूर्ण कर मग यंदा! शुभस्य शीघ्रम..

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!

      हटवा
  9. Atisundar lekhan kele ahe,Apratim,Sravan mahinyatil sarv prasng hubehub rekhatle ahet,zimma fugdi,ratrichi gite,tasech Gramin bhagat kirtankar bolvtat tepan tumhi lihile ahe,Chhanach,Madam tumchya smaranshaktila salam,Asech lihit raha amhi vachat jato.

    उत्तर द्याहटवा
  10. ✌🕉✌
    As usul good write-up once again a memory lane n "Maher"chi athavani n childhood .Ur memory is really a fantastic n good n fine turns of life .Good going .
    All the best .excuse for delay in replying Ur blog .Thank u
    Tophkhane..Belgavi

    उत्तर द्याहटवा
  11. आपली स्मरणशक्ती आणि शब्द भांडार अफलातून!!
    वाचताना आनंद वाटला, मजा आली..

    #अनिरुध्द गायकवाड

    उत्तर द्याहटवा
  12. आज वाचले गं...अगदी मलकापूरला गेल्यासारखे वाटले...सही न सही वर्णन..गुलाब कुठे असते..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अनेक आभार..
      गुलाब बहुतेक पुण्यात असते पण माझाही contact नाही. ही पोस्ट जाते का पाहूया तिच्यापर्यंत.

      हटवा
  13. भावनांचे इंद्रधनू खरोखर उलगडलेस. कोल्हापुरात मलकापूर इतकी निसर्गाशी जवळीक किंवा मैत्री आम्हाला नाही जमली करायला. त्यामुळे तुझे मलकापूर येथील बालपण तेथील वातावरण यांच्या आठवणी छान वाटल्या वाचायला. श्रावणातील खेळांचे अप्रतिम वर्णन वाचताना तुझ्या स्मरणशक्तीला पुन्हा दाद द्यावी वाटली.फुलांची किती नावे लिहिली आहेस ? ग्रेट.फुगड्यांचा पापड माकड उखाणा 👌👌😁😁
    खेळांचे तर किती प्रकार अनुभवलेस. छान अनुभवसमृद्ध बालपण जगलीस. याचे पुरेपूर प्रतिबिंब लेखात दिसते.
    लेखनामधील सहजता व सलगता मला नेहमीच आकर्षित करत आली आहे.
    इतकं सविस्तर वर्णन फार क्वचित वाचायला मिळत.म्हणून निवांत वाचते.
    श्रावणात श्रावणाची सफर घडवून आणलीस छान वाटले.👍👍
    शैला चिटणीस..सा न पा डा..मुंबई

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अनेक आभार शैलाताई!!

      इतकी सविस्तर प्रतिक्रिया एका लेखिकेकडून येणं म्हणजे खरंच माझं भाग्य समजते! अशाच वाचून अभिप्राय कळवत राहा.

      हटवा
  14. कुंदा पाटील, बदलापूर
    श्री अग लेख खूपच सुंदर.. अगदी श्रावण महिन्याला साजेसा 👌 " श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे l ........देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत l " बालकवी आणि बालपण असं सगळंच छान छान, मनभावन श्रावण. हिरवीगार झाडे, त्या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती किती... विविध रंगीबेरंगी फुलं, त्यांचा तो गंध... त्यात भर पडते त्या श्रावणातल्या सणावारांची. मला तर लहानपणापासून वाटत की श्रावण महिना आणि भगवान शंकर यांच अलौकिक नातं आहे अगदी लहानपणी अध्यात्म कळत नव्हतं तेंव्हा पासून हा श्रावण महिना म्हणजे देवांचाच असं वाटायचं. सगळीकडे सात्विक जेवणाचा सुगंध 😋 श्रावण सोमवार, मंगळागौर,जीवतीचा शुक्रवार, संपत शनिवार, नागपंचमी, नारळी पौर्णिमा/रक्षा बंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पोळा अजून किती तरी सांस्कृतिक आणि संस्कारांचा ठेवा. प्रत्येक सणाची आणि वारांची आगळी वेगळी मनाला भावणारी कहाणी सगळंच कस सुंदर ..रम्य ते बालपण 👍 खूप छान विषय निवडलास लिखाणही खूपच कौतुकास्पद सुंदर आहे श्री अग असंच लिहीत रहा आणि आमच्या आठवणींना उजाळा देत रहा. 😊 तुला पुन्हा पुढील लेखासाठी " All The Best "👍
    कुंदा पाटील, बदलापूर

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अरे वाह कुंदा, तूही माझ्यासारखी श्रावणवेडी दिसतीयेस!! अगदी सुंदर प्रतिक्रिया..💓💓
      हा सोहळा संपू नये असंच वाटतं नेहमी मला आणि नक्कीच तुलाही तसेच वाटत असणार.

      प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार!!

      हटवा
  15. फारच सुंदर वर्णन.. हुबेहूब त्यावेळची चित्रं उभी केली आहेत.. खूप सूक्ष्म गोष्टी
    वेचून पुढे ठेवल्या आहेत त्या आम्ही मलकापूर बघितले नसताना सुध्दा त्यात रममाण झालो..तुमच्या स्मरणशक्तीला सलाम!!!

    उत्तर द्याहटवा
  16. तुमचे हिरव माहेर ..आणि खेळ पहायला मिळतील काय? अजून खेळत असतात का तिथे
    रेखा पाटील

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद रेखा पाटील!
      बहुतेक खेळतात अजूनही पण पूर्वीएवढं नाही. टीव्ही आणि फोनमुळे करमणुकीची गरज कमी झालीये ना.
      निसर्ग आणि श्रावणातली हिरवळ मात्र नक्की मिळेल.

      हटवा
  17. jgd."मन भावन सावन"आठवणींच्या श्रावणधारा मनाच्या अंगणात बरसवीत येतो.ह्रद्य आठवणींची श्रावणगीते गातच लेख उतरला आहे.आठवणींचे हे घनशाम सजल मेघ गतकाळांच्या आठवणींच्या जलधारा कध मनोकुंभात तर नयनांच्या संपूटात वर्षावत येतात. आनंदधनू ह्रदयाकाशात विलसू लागते. मनोमोर नाचू लागतो. श्रावण मनाला भावणारा जणू मधूमास! हरिततृणांच्या गालीच्यानी नटलेली वसुंधरा कधी राधा असते तर निळेसावळे बरसणारे आकाश शाम असते. वेळूंच्याबनातून मधुर बासरी घुमत असते, अशा श्रावणाचे वर्णन करणारा लेख ललित सौंदर्याचा नृत्यविलासच. मलकापूर मुळात निसर्गराजीचे ःमाहेर, शाळी कडवीनद्यानी वेढा घातलेले रमणीय गाव! श्रवणरम्य श्रावण आनंद पर्वणीच असतो,इंद्रधनुचा कमानदार आकाशाचा मंडप जलधारांच्या मोतीसरीनी सजलेला असला की स्वर्गीय शोभाही ऊणी ठरावी, असे देखणे मलकापुर सणासुदींची रेलचेल असलेल्या श्रावणाने तर बहरुन येते, त्यावेळचे सण व सणातल्याप्रसंगाने पुलकित झालेल्या अंगनाच्या खेळामुळे घर अंगणे निनादू लागत,असा तो काळ ,तुझ्या प्रतितीने रेखाटला आहे.रमून व रंगून गेलेले मन जेव्हा आनंदविभोर होते व ते शब्दसुमनांनी बहरुन येते तेव्हा सुंदरतेचा सडा पडतो. सृष्टीविलासाबरोबर मानवी जीवनात उतरलेला आनंद छान वर्नन केला आहेस, विस्मृतीत चाललेले झिम्मा फुगड्यासारखे तल्लीन करणारे खेळ टिपले आहेस, गल्लीतले सख्याॅचे संदर्भ लक्षात येतात, "मृगनयना" म्हणुन केलेला उल्लेख किती चपलख आहे ,हे पटते. पोथ्यापुरांणांचे पारायण ,कथा कीर्तने यांचे श्रवणाचा हा मास संदर्भासह उभा केला आहे.श्रावणाचे आरंभापासून भाद्रपदातील गौरीगणपती पर्यंतचा रम्य पर्वकाल आनंदोत्सवाने भारला आहे. श्रावण सरी सारखा हा लेख ऊनपावसांसारखा लपंडाव खेळत मनमुध करुन जातो.अभिनंदन!🌳🦚🌈⛅🌷🌞
    शेटे सर..सागाव

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कुंदा पाटील, बदलापूर
      शेटे सर प्रथम आपणास दंडवत 👏👏 मी आपल्या प्रतिक्रिया ( श्री च्या प्रत्येक लेखाला दिलेल्या) वाचत असते जसा श्री चा लेख सुंदर तशीच आपली प्रतिक्रिया पण खूपच छान असते 👌गुरू आणि शिष्य दोघेही अप्रतिम लिहितात. सर असे गुरु मिळणे म्हणजे भाग्य...माझ्या कडे दुसरे शब्द नाहीत. सर माझा आणि श्री चा संवाद झाला तो मी पाठवीत आहे

      हटवा
    2. किती सुंदर लिहिता तुम्ही सर. 👏
      कायमच तुमच्या अभिप्रायाची मी वाट पाहत असते. तुमच्यासारखे गुरु लाभायला पण भाग्य लागतं!!
      अनेक अनेक आभार!! 😊

      हटवा
  18. श्री अग किती छान शब्दांचे वैभव आहे ग असे गुरू आपणास मिळाले हे सुद्धा आपलं भाग्य आहे ग. प्रत्येकाचं गुरू शिवाय शिक्षण नाहीच पण प्रत्येकाला असे गुरू मिळतीलच असं नाही. अर्थात आपल्या वेळी आपण गुरू म्हणजे दैवतच मानत असू. आता नाही ग ती भावना मुलां मध्ये आणि खरं सांगायचं तर शिक्षण व्यवस्थाच आता तशी नाही. आदर, आदर्श, नम्रता हे शब्दच मला तर डिक्शनरीतुन गायब झाल्या सारखे वाटतात ते काहीही असो अजूनही तू तुझ्या लेखणी च श्रेय गुरूंना देतेस हा मोठेपणा ग बस .....👌👍
    कुंदा वाडेकर..बदलापूर

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कुंदा पाटील, बदलापूर
      चुकून कुंदा वाडेकर लिहिलं क्षमस्व
      कुंदा पाटील

      हटवा
    2. माझ्या सरांचे शब्द वैभव🌹👆🏻👌🏻😃 माझे नशीब चांगले म्हणून मला तुमच्या सारखी समीक्षक मंडळी भेटली..अगं हे शब्द..जीभ जोडत आहे आपल्याला...तुला भेटायची ओढ लागली...जीभ आता बोटाने बोलत आहे😃😃😃

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -