गो गो गोवा..

धमाल मंगळागौरींची!

Mangalagouri is a famous Marathi festival celebrated by mainly ladies of Brahmin community.

हाश्शss हूश्शss करायला लावणाऱ्या वैशाख वणव्यातून मुक्ती देत मेघराज धरतीला जलधारांनी न्हाऊ घालू लागले…., की नव-विवाहित मुलीचे मन मोरासारखे थुई थुई नाचत माहेरी ओढ घेई.... ती माहेरची आणि सासरची मंगळागौर कधी ठरते याची आतुरतेने वाट बघायला लागे. सासूबाईंचे ‘कस्स्ं होईल...काय होईल’ करत  नमनाला घडा भर तेल सरे. सगळ्या गावातल्या, नात्यातल्या मंगळागौरींचे  टाइमटेबल परत परत उजळणीमुळे  करत सगळ्या घरादाराला पाठ होई. मग कुठे अर्थसंकल्प सादर केल्याच्या अविर्भावात दोघी विहिणी मिळून तारखा ठरवत. एकदाची तारीख ठरली की कर्त्या बाईला जगजेत्या सिकंदरा सारखा आनंद होई. घरादारात वेगळाच उत्साह संचारे … लगेच बायका लगबगीने उठत, कामाला सुरुवात करत. पूजेला बोलवायच्या सुहासिनींना सगळ्यात आधी बुक केलं जायचं. वाण-सामानाची यादी काढली रे काढली की आषाढातल्या धो धो पावसात गृहिणी  'अहो हे आणा ते आणाsss ' चा घोशा लावून पुरुष मंडळींना बाजारहाट करायला दामटत. हे राहिलं ते राहिलं करत येरझाऱ्या घालायला लावून  बायका त्यांना नाचवून घेत. त्या काळी ऑर्डर देऊन जेवण आणण्याची पद्धत नव्हतीच. सगळे कसे घरीच केले जायचे, त्यामुळे फार नियोजन करावे लागे. पुरुष मंडळींना मुख्य पूजेच्या  कार्यक्रमात काही भूमिका नसते. ते फक्त पक्षाला बाहेरून पाठिंबा देत काही तरी मह्त्वाचे करतोय असे भासवत रहातात. खरे कर्तृत्व घरातल्या जहांबाज बायकाच दाखवतात. घरे गुळगुळीत सारवून घेणे, आमंत्रणे देणे, मोठ्ठ्या भांड्यांची जुळवाजुळव करणे आणि हे सगळे करत असताना वडे/चकली  भाजणी, करंज्या, लाडू अशा फराळाची तयारी… असे सगळे एकाच वेळी अष्टभुजा दुर्गे सारखे सुरु असते. पुरुषमंडळी वाण सामान आणून टाकले की सूत्रे बायकांकडे सोपवून निर्धास्तपणे झोपाळ्यावर बसून मंद झोके घेत बसत. बायका तोंड आणि हात यांची अखंड लढाई करत पुढचे कार्य सिद्ध करणारच याची खात्रीच असे त्यांना !....


             हे व्रत नवविवाहित मुली प्रत्येक श्रावण मंगळवारी पहिली पाच वर्षे करतात. तिच्या माहेर किंवा सासरच्या कुरघोडीत सुरेख साडी, दागिने नवविवाहितेला दोन्ही कडूनही मिळतात, मग ती जास्तच खूष होउन आनंदे पूजा आरंभते.

 'मागू शाश्वत सौभाग्याप्रती गौरीला, 

उजळू पंचारती तिजला... '

अशा आरतीतून ती आपल्या कुंकवाचे आयुष्य बळकट करायला मंगळागौरीला साकडे घालते. थोडक्यात काय तर नावोढेने उरातला सौभाग्याचा आनंद मनसोक्त नाचत बागडत साजरा करायची ही पूजा.आमच्या छोट्याशा मलकापूरमध्येसुद्धा मंगळागौर महोत्सव साजरा होई. गाव छोटंसं पण कलासक्त, त्यामुळे कधी रिमझिम तर कधी धुवांधार पावसात हिरव्याकंच ऋतूत सगळ्या पारंपारिक खेळांना आणि कलांना बहरच यायचा जणू ! सगळ्या बायकांना काय करू नी काय नको व्हायचं, आषाढापासून खेळाच्या तालमी सुरू व्हायच्या. वास्तविक त्या काळी चुलीच्या आणि फारतर एखाद्या फरफर्या स्टोव्हच्या संगीत साथीने स्वयंपाक चाले. बायका रडव्या मुलांना खाऊ घालू घालू अगदी दमून जायच्या तरीही तिन्हीसांजा झाल्या आणि बाहेर टाळ्यांचे आवाज आले की परत उत्साहाने भरून खेळायला हजर ! दुर्मुखलेली, आळशी बाई सुद्धा लगबगीने  घरच्यांना जेवायला वाढून खेळायला हजेरी लाऊन आपले कौशल्य दाखवणारच! लहानपण परत अनुभवणारच! रस्त्यावरचे खेळ म्हणजे प्रॅक्टिस आणि मंगळागौर म्हणजे स्टेज परफॉर्मन्स, कारण इथे वाहवा, हास्य-कारंजे आणि टाळ्यांची भरभरुन  मिळालेली दाद. गावात सगळे कसे सार्वजनिक त्यामुळे गल्लीतल्या बायका आणि त्यांचा पदर धरुन आलेली बारकी मुले मंगळागौरीला हरखून नाचायला, मज्जा करायला हक्काने येत.


मंगळागौरीला आमच्या गल्लीत सगळ्यात आधी परांजपे अण्णांचा मोठा वाडा खेळण्यासाठी बुक करून टाकायचा. त्या वाड्यात प्रशस्त मोठ्ठा सोपा आणि बाहेर मोठे अंगण होते. त्या डेरेदार आंब्याच्या झाडाखाली केवढाही मोठा फेर धरावा. आण्णासुद्धा प्रेमाने श्रावण लागण्यापूर्वीच गड्याकडून अंगण छान गुळगुळीत करून, सारवून घ्यायचे. लिमये, सबनीस वाड्यात ही भला मोठ्ठा चौक सारवून खेळण्यासाठी सज्ज केला जायचा. कोणीही यावे आणि आपली मंगळागौर तिथे जागवावी. यांची अंगणे, चौक, सोपे यावर सगळ्या गावाचा प्रेमाचा हक्क असे. वागण्यातली सहजता, आपुलकी यामुळे सगळे कसे सोप्पे होई. कुणालाही पैसे मोजून भाड्याने हॉल घ्यावा लागत नसे. मंगळागौरीच्या मुलींचे बुकिंग सगळ्यात आधी होई आणि लगेच आम्हा खेळणाऱ्या मुलींना आमंत्रणे यायची. आम्हाला एकाएकी महत्व प्राप्त होई, एरवी आम्हाला ओरडणाऱ्या बायका अचानक गोड वागू लागत. आम्हीही मग फुले, पत्री गोळा करणे ते मंगळागौर जागवण्यापर्यंतची सगळी जबाबदारी आनंदाने पार पाडायचो. हे सगळ्या गल्लीचे घरचे कार्य असे. कुठल्याही  management शिवाय कामाची छान विभागणी होई. कुणाला रांगोळी, कुणाला केळीची पाने, कुणाला कर्दळीचे खुंट आणण्याचे काम मिळे. एकदा तर आम्हाला पत्री गोळा करताना अस्सल पिवळ्याधम्मक नागराजाचे दर्शन झाले! त्याने नीटपणे आम्हा वेड्या मुलींकडे बघितले आणि क्षणार्धात सळसळत नजरे आड झाला! अंगाला कापरे सुटले, अक्षरशः बोबडी वळणं म्हणजे काय ते समजलं आणि लटपटत घरी आलो. नागराजाने शहाणपण दिले आणि त्यानंतर फक्त अंगणातली फुलेच तोडू लागलो. त्याकाळी ताटे, वाट्या, भांडी, चौरंग, समया, आरसा, पाटांची उसनवारी सर्रास चाले, त्यात कोणाला कमीपणा वाटत नसे. त्या वस्तूंची जुळवाजुळव करणे म्हणजे मोठे काम असे. लोकांनी आपापली नावे घालून ठेवलेल्या या वस्तू महिनाभर या घरातून त्या घरात अशा मांजरासारख्या फिरतीवर असायच्या, श्रावण संपला की बिनबोभाट मालकिणीकडे परतायच्या. जोशी, परांजपे किंवा सबनीसांच्या शेतातले केवड्याचे कणीस सगळ्यांच्या मंगळागौरींची  शोभा वाढवायचे. फुले तर कुणाच्याही अंगणात असोत, ती मंगळागौरीसाठी राखून ठेवलेली असत. कुणाच्या अंगणातून काय आणायचं याची पहाणी  आम्ही सोमवारच्या आतच करून ठेवत असू. मंगळवारी फक्त execution असली जोरदार युद्धपातळीवर कामे चालायची. 


            एकीकडे वस्तूंची जमवाजमव करताना साक्षात अन्नपूर्णा वेणूताई अष्टेकर यांना पण बुक केलं जायचं. या वेणूताई म्हणजे अगदी छोट्या चणीच्या, नाजुकशा, चुणचुणीत अशा पाककला निपुण बाई. वेणूताईंचा अवघा देह श्रीकृष्णाच्या वेणू इतकाच चैतन्याने भारलेला भासे. श्रावणापासून ते दिवाळीपर्यंत त्या फक्त इकडेतिकडे पळताना दिसत. नवरात्रात तर खुद्द पंतप्रतिनिधींनीही नऊ दिवस बुक केलेलं असायचं त्यांना! वाड्यातल्या देवीला देखील यांच्याच हातचा नैवेद्य लागायचा. सदा हसतमुख चेहरा, भारदस्त नऊवारी साडी, मोठे कुंकू, मोठा आंबाडा, त्यावर खोचलेलं फूल आणि कमरेला लावलेला नॅपकिन-अशा कायम टिपटॉप असायच्या वेणूताई ! घरचा दहा माणसाचा कुटुंब-कबिला सांभाळून त्या सगळ्यांच्या मदतीला अगदी आवडीने जात. वेणूताई  स्वयंपाकात मदतीला हो म्हणाल्या की घराची मालकीणबाई नि:श्वास टाके. मंगळागौरीच्या घरातल्या लाडू, वड्याच्या भाजणीपासून ते कवडीदार दही लावण्यापर्यंत सगळीकडे वेणूताईंचा सल्ला मोलाचा. कुठलाही अंदाज कधीही चुकायचा म्हणून नाही असा हातखंडा! सुरुवातीला मदतीला म्हणून सगळे बोलवत होते मग हळूहळू हक्काने बोलावू लागले. कितीही माणसांचा स्वयंपाक असो सूत्रसंचलन फक्त वेणूताईंचेच. एरवी सगळ्यांशी उठता-बसता वाद घालणाऱ्या सगळ्या ललना वेणूताईंचं मात्र सगळं मनापासून ऐकायच्या. त्यामुळे हसत खेळत स्वयंपाकाची सिध्दता बरोब्बर वेळेत होई. वेणूताईंच्या हर नमुन्याच्या बायकांना सांभाळून, उत्तम स्वयंपाक करण्याच्या कौशल्यामुळेच मलकापूरचे सत्यनारायणपासून मंगळागौरींपर्यंत सगळे कार्यक्रम अनेक वर्षे यथासांग पार पडले. या सगळ्या नैवेद्याचं पुण्य पदरी जमा असलेल्या वेणूताई आजही वयाच्या ब्याण्णव्या वर्षी आरोग्यपूर्ण निरामय आयुष्य जगत आहेत. आजही तितक्याच छान टवटवीत आणि प्रसन्न दिसतात यात शंकाच नाही!

Ladies used to cook at home for the guests of Mangala Gouri previously. Puran poli has been favourite since generations.
वेणूताई अष्टेकर

    मंगळागौरीच्या दुपारच्या जेवणात आवर्जून पुरणपोळी असे आणि पुरणाच्या सोळा दिव्यांनी अन्नपूर्णेची आरती होई.. 'जयss देवी मंगळा गौरीsss' या आरतीला आज अखेर कोणीही संगीतकार चाल म्हणून लावू शकलेला नाही (नव संगीतकारानी चॅलेंज स्विकारायला हरकत नाही).. सगळ्या बायकांना 'रतनांचे दिवे, माणिकांच्या वाती' अस्सेच म्हणावे लागते.. 'रत्नांचे दिवे' असे म्हणालो तर तालात बसत नाही.. नवविवाहिता (वशेळ्या) नटूनथटून दाग-दागिन्यांनी मढून, शालू नेसून, घराण्याची पारंपारिक नथ, ठुशी घालून सुंदर रुपात अवतरत. नानाविध रांगोळ्या, पत्री आणि फुलांनी  षोडशोपचारे मंगळागौरीची सजावट होई. कांचन, कर्दळी, प्राजक्त, तगरी, सोनचाफा, सोनटक्का, गुलाब, शेवंती अशी विविध फुले तसेच गुलबक्षीचे हातांनी विणलेले हार अर्पिले जात. गंज काळा करुन शंकराची पिंड करुन, पिंडीवर पिवळा केवड्याचा नाग बसवून  साग्र संगीत पूजा संपन्न होई. मोठा आरसा मागे आणून ठेवला की प्रतिबिंब  मागे दिसे. ही अशी परंपरा वर्षानुवर्षे सुरु आहे.


संध्याकाळी मोठे दिवे तिथे अंगणात लागले की सगळ्यांना जागराची  हुरहूर लागे. रात्रीच्या फराळाचा, धमाल जागरणाचा आनंदी क्षण येई. बायका आम्हा मुलांना लवकर फराळ करायला लावून खेळायला सुरुवात करायला लावत. खेळांची सुरुवात नवीन सून-सासू, नणंद-भावजय अशा नामी जोड्यांच्या सलामी फुगडीने होई. जोडी भांडणात नामांकित असेल तर टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळे! सुरुवातीला एकमेकींना ‘वैजयंती माला, हेमा मालिनी’ वगैरे स्तुती सुमने उधळणारे उखाणे नंतर नंतर 'ललिता पवार' पर्यंत घसरायचे. हास्याच्या धबधब्यात कुरघोड्या करत फुगड़ी घुमे. फुगड़ीत बायका सुंदर पकवा घालत. भव्वर भेंडी, आकाशी बंगला, तव्यात लहान मुलांच्या टाचा टेकवून त्याना गोल घुमवत ब्रह्मकमळ, कोंबडा, लहान मुले पायात घेऊन केलेला घोडा करत टणा-टण उड्या मारत असलेल्या आयांना बघून फार मजा वाटायची. गोफ विणू बाई गोफ विणू ,

तिखट-मीठ-मसाला, रहाट- गाडगे, घसर-फुगड़ी अशा नाना स्पर्धा होऊन एकमेकींना हरवले जाई. विहिरीवर पाणी भरुन भरुन सगळ्या रणरागिणी fit and fine होत्या, कोणीच सहज हरायचं नाही. रात्र चढेल तसा खेळाचा उत्साह वाढत जाई. शेवटी गाडी झिम्म्याच्या फेरावर येई. टाळ्यांच्या तालात सुरेख गाणी रंगत. त्या फेरामध्ये लाटण्याने अगं-का गं करत लुटूपुटूची भांडणे करत, यातही जिची ताकद जास्त ती समोरच्या बाईला लगेच हिसका दाखवे आणि नामोहरम करे. लाटण्याचे सगळे उखाणे सासू-सुनेच्या दागिने देण्या-घेण्या वरुन असत. सुनेने काहीही मागितलं की ढालगज सासू नकार घंटा वाजवे! ही परंपरेने आलेली सगळी लोकगीते या जोडीची कुरबूर जगजाहीर करणारी असत. विनोदी अंगामुळे मने मोकळी होऊन दोघीही गालातल्या गालात हसू लागत.


    सूप नाचवताना आम्हा लहान मुलींना 'आई मी येऊ का'..असे करत  'नको रे बाळा-नको रे सोन्या' करत पळणाऱ्या आईच्या मागे लागावे लागे, हा हटवादी खेळ मस्त रंग भरे. घागरी नाचवत फुंकताना हातातल्या अंगठीचा खण-खण असा कर्णमधूर नाद होई. फेरात नवीन लग्न झालेल्या मुलींना ‘खुर्ची का मिरची’ करायला लावत आणि मधे पकडून ठेवले जाई, पतिदेवांचे नाव उखाण्यात घेतल्या शिवाय सोडायचेच नाही. तिच्या भोवती कडेकोट बंदोबस्त करायचा. मग सगळ्यांना उखाणे घ्यायला लावणे सुरु होई. अगदी वयस्कर बायकाही नवऱ्याचे नाव घेताना लाजून चूर वगैरे होत. (आत्तासारखं नाही!) आम्हाला मोठ्या बायका अशा लहान मुलांसारख्या पोरकट वागताना बघून फार मजा यायची. जुनी आज्जी बाई झिम्म्याची रसाळ गाणी सांगत, वेगवेगळे खेळ आणि तालावर सगळं अनुभवाला येई. वाकळ आपटणे असा एक खेळ होता. बाई पाय पसरून बसे आणि गुडघे आपटून वाकळ आपटल्याचा फाट-फाट आवाज काढायची, आमच्या गुडघ्यांवर गुंजभर मांस नसल्याने काही आवाज यायचा नाही आणि मग या बायका आम्हाला हसायच्या. एखादी चपळ आज्जी गाठोडे नावाच्या खेळात शरीराचे गाठोडं करुन इकडे तिकडे लीलया पळवे, तर एखादी जलातल्या माशा सारखी फूss फूss करत जमिनीवर पोहून दाखवे! हे बघून आम्ही अचंबित होत असू. असले खेळ मी परत कधी फारसे पाहिले नाहीत.


    असे अनेक सर्वांगसुंदर खेळ झाले की शेवटी पिंगा घालायचा. पिंगा म्हणजे वधू पक्षाच्या बाजुने खेळत असलेल्यांनी मुलाच्या उखाळ्या-पाकाळ्या काढायच्या आणि वर पक्षाने मुलीला मनसोक्त नावे ठेवून घ्यायची. भांडा सौख्यभरे या तत्वाला अनुसरुन तुंबलेली मने मोकळी करुन गंगेच्या पाण्यासारखी निर्मळ करायची!!! हे सगळे खेळ म्हणजे catharsis असे, यामुळे मन शुद्ध पवित्र होई. सगळे खेळ खेळून दमणूक झाली की सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होई. नकला, गाणी, नाटक सगळं उत्तरोत्तर रंगत जाई.  


Fugadi, zimaa, fugdi and such types of activities are done in Mangala Gouri.

मंदा काकिर्डे- परांजपे काकूंचा आवाज खूप मधुर होता, त्या ‘मी मज हरपून बसले गं’ गायला लागल्या की आमचेच भानच हरपायचे मग शैलजाबाई सबनीस ‘बहरला पारिजात दारी, म्हणत सुरांच्या फुलांचा सात्विक सडा पसरत त्या नंतर आमची माणिक जोशी ‘आज कुणीतरी यावे’ असं आर्जव करे. तिला आकाशवाणीवर गायला बोलावले होते  इतका सुमधूर कंठ लाभला होता. जोशी-कोळेकर कुटुंबियांकडे त्याकाळी शास्त्रीय संगीताची बैठक होई, गावातला एकुलता एक तंबोरा त्यांच्याकडे होता. शुभाची आई पल्लेदार शास्त्रीय आलापी घेत ‘काटे रुते कुणाला’ गायच्या आणि त्यांची लेक शुभा ‘रिमझिम झरती श्रावणधारा' गाऊन आसमंतात गोडवा पसरवायची. वैशाली आंबार्डेकरचा ‘भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास’ मधला गोडवा अजून कानात बसलाय. आमची सर्वांची लाडकी हसरी शुक्राची चांदणी, निळ्या डोळ्यांची लता वाहिनी जोशी मस्त मान हलवत ‘मांग के साथ तुम्हारा’ सारखी अनेक हिंदी गाणी सहज गात मैफिलीत रंग भरायची. त्या काळात मलकापुरात फारतर रेडिओ होते पण आपली गायनकला सगळ्यांनी कशी जोपासली होती याचे आश्चर्यच वाटते. रेडिओवर गाणं लागलं की जीवाचे कान करून असं ऐकायचं की शब्द आणि सूर सगळं डोक्यात आणि गाणं गळ्यात बसलं पाहिजे. मग वहीत शब्द लिहुन दिवस-रात्र ते गाणं गुणगुणणे हाच काय तो सगळ्यांचा रियाज. आपली आवडमध्ये आवडीचे गाणे लागले की आनंद गगनात मावायचा नाही. ही सगळी परवलीची गाणी झाली की नवीन कलाकारांना छोट्या कलाकारांना गायनकला, नकला, डान्स, नाटुकली सादर करायची संधी मिळे. अशा अनेक मधुर आवाजांनी आमचे कान अगदी तृप्त केले. आमच्या मातांची पिढी तेंव्हा मालती पांडे, माणिक वर्मा यांची गाणी गायची. आईच्या आवाजातली माणिक वर्मांची  जुनी गाणी ऐकायला माझं मन अजूनही लहानपणात पिंगा घालतं….. 


मंगळागौरीच्या बऱ्याच कामांना पुरुषांची मदत लागे पण जागरणाच्या वेळी मात्र त्यांना अगदी दूर ठेवले जात असे. काही वेळा एखादा तरुण पती काही बहाणा काढून आपल्या नटलेल्या सुंदर पत्नीला पहायला आलेला दिसलाच तर मोठ्ठा ‘ऐय्याsss’ करून बायका हसायला लागत. मग त्याची एखादी मनकवडी बहीण त्याला पकडे आणि त्याच्या सुंदरी बरोबर फुगडी घालायला लावायची. टाळ्यांच्या गजरात.. दंगा ऐकत दोघे अगदी लाजत-बुजत  फुगडी घालायचे. सगळ्या चेष्टा मस्करीला ऊत येई. अलिकडे नवविवाहित जोडपी अगदी बिनधास्त फुगड़ी घालतात आणि खरंच ते पाहायला मजा येते. मंगळागौरीचे बदललेले स्वरूप अगदी समाधानकारक  आहे. आपल्याला खेळ नसले येत तरी हौसेने व्यावसायिक मंडळांना पाचारण केलं जातं, त्यांच्या तालावर घरातले, बाहेरचे सगळे पुरुषही उत्साहाने त्यात जमेल तसे सामील होतात. नव-सुहासिनी साज शृंगार करून, हौसेने पारंपरिक नऊवारी साडी, आजे सासुबाईंची नथ, साज, पैंजण, मेखला असे नाना दागिने लेऊन अंबाड्यावर सुरेख गजरा  माळून पेशव्यांच्या महाराणी सारख्या तयार होतात. त्यांचे नवरेही तितक्याच रसिकपणे झब्बे वगैरे घालून खेळायला उत्साहात येतात. दोघे जोडीने छान फोटो, सेल्फी, वीडियो काढतात. सांस्कृतिक कार्यक्रमांना दाद देतात तसेच भाग ही घेतात. खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता आलेल्या हे जोडीचे मंगळागौरी पूजन मलातरी खूप सुखद वाटते. माझी पिढीही त्यातच जोडीने फुगड्या घालून आणि झिम्मा खेळून आपली राहिलेली हौस-मौज करून घेतीये हेही अगदी छानच!


Mangala Gouri set up includes Shiva, Annapurna and Ganapati

अशा सुंदर वातावरणात गाणी, नाटुकली, नृत्ये आणि उखाणे यांच्या चढाओढीत रात्र पुढे सरकायची. मग कधीतरी, कुठल्यातरी आदर्श मातेला भान येई आणि ‘चला गं, पुरे आता…. उद्या शाळा आहेत ना मुलींच्या’ ही घोषणा होई. शाळेचे नाव काढताच आमचे विमान जमिनीवर येई. तोपर्यंत झोपेचे खोबरे झालेलं असे…. मग आम्हा नाचऱ्या   मुलींना आमच्या माता दंडाला धरुन कैद्याला नेतात तसे जवळ जवळ ओढत घरी न्यायच्या. मन तिथेच विसरुन शरीराने आम्ही घरी जाऊन अलगद फुलासारख्या निद्रादेवीच्या मांडीवर झोपी जात असू… स्वप्नात ही ती छान आरास दिसे, हास्याचे आवाज कानात दुमदुमत, मधुर गाणी ऐकू येत आणि धिंगाणा आठवून खुदकन हसू येई... दिवस सत्कारणी लागला याच्या समाधानात छान झोप येई. 

मनःपटलावर कायमच चिरंजीव राहिलेल्या या गाजवलेल्या आणि जागवलेल्या  मंगळागौरींची अशी ही सुरस कहाणी.


या ब्लॉगसाठी फोटो पुरवल्याबद्दल आमच्या नातेवाईक मृदुला उर्फ शैला चिटणीस, रेखा उपाध्ये आणि हक्काची शेजारीण मानसी मुकुंद कुलकर्णी
यांचे अनेक आभार.


विजयश्री तारे-जोशी

कोल्हापूर ता 1.8.2020


टिप्पण्या

  1. मस्त आणि सुरेख मांडणी .
    सर्व व्यक्तीरेखा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.

    उत्तर द्याहटवा
  2. छान लेख. मंगळागौर डोळ्या समोर साकार झाली.

    उत्तर द्याहटवा
  3. श्री, खरंच genius आहेस ग तू!!!कसल भन्नाट वर्णन केलेले आहेस तू!!! सगळा मंगळागौरीचा कार्यक्रम डोळ्यासमोर उभा केलास!!! आणि तू किती श्रीमंत( खऱ्या अर्थाने) बालपण जगलीस हे ही लक्षात आले, नशिबवान आहेस. आणि जे जगली आहेस त्याच तू आता सोन करीत आहेस!!! आमच्या पुढे शब्द रूपाने ते जगणं उभे करून! तुझे मनापासून आभार😊

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अनेक आभार मंदा!! 😃

      बालपण खरंच समृद्ध होतं त्यामुळे सगळ्या आठवणी जशाच्या तशा डोळ्यासमोर येतात अजूनही..😊

      हटवा
  4. आग ह श्री!! वेणूताई अष्टेकर खुपच सुंदर!!! ह्या वयातही खूप खूप सुंदर दिसत आहेत त्या!! खूप आवडल्या मला त्या!!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे

    1. हो गं.. अंतर्बाह्य सुंदर आहेत त्या.. या ब्लॉगमुळे त्यांच्याशी परत बोलणे झाले. इतकं छान वाटतंय!!! अगदी welcoming आणि appreciating फॅमिली आहे त्यांची..

      धन्यवाद!!

      हटवा
  5. खरंच धम्माल उडवून टाकली आहे . मंगळागौर आता तसा professional झाला आहे.बाहेरून बायका खेळायला बोलाऊन संध्याकाळीच जगर संपवून टाकतात. या पाशर्वभूमीवर तुझा लेख म्हणजे मंगळागौर साजरी करण्याची गरज किती आहे याची कल्पना येते. खेळांचे वर्णन अप्रतिम कोणालाही खेळायचा मोह व्हावा असे.वेणूताई किती छान वर्णन केले आहेस ? फोटो पण मिलावलास ग्रेट. परांजपे वाडा बुक करण्यापासून ते जागर करण्यापर्यंतचे वर्णन म्हणजे आँखो देखा हाल.शेवटच्या फोटोत मागे आरसा आहे. मला आठवते त्यावेळी मागून पण पिंड दिसावी म्हणून लावायचो. या मुळे लेखनात खरेपना आला आहे.आठवणींचा नजराणा खूप आवडला 👌👌👍👍
    मृदुला चिटणीस..सानपाडा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अनेक आभार शैला मावशी!! 😃 फोटोमुळे जास्तीच मजा आली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार.

      हो ती आरसा लावायची पद्धत अनेक वर्ष तशीच सुरु आहे. आता तर या मुली फोटोसाठीच वापरात असतील आरशाला त्या. 😃

      हटवा
  6. Atishay chan vrnan kelay ji nave lihaliy tya sarv najaresamor disalya khup chan asech lihit ja👍👌👌
    संगीता पाटील भोसले

    उत्तर द्याहटवा
  7. जया आत्ताच तुझा ब्लॉग वाचला आणि पटकन उठून मंगळागौरीचे 2/3 खेळ खेळले एकटीच. माझा नवरा माझ्याकडे बघत बसला की हीचं काय चाललंय? पहिले खेळ आठवतात चांगले आणि खेळताही आले .😃 खरंतर आज आम्ही एका ट्रेकला गेलो होतो खूप चालणे झाले. दमायलाही झालं होतं पण तुझा ब्लॉग वाचून इतका उत्साह आला की दोन तीन खेळ खेळून टाकले. आमच्या अंगणाची आणि आईच्या गाण्याची आठवण जागी केलीस. माझी आई अजूनही खुप छान गाणी म्हणते. मी तीला, सुषमाला तुझे ब्लाॅग्ज् नेहमीच फाॅरवर्ड करते. त्यांनाही खुप आवडतात.
    निलिमा परांजपे ..श्रुती डोंगरे
    कोरोलिना USA

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हाहाहाहाहाहा 😂.. विडिओ पाठव नक्कीच!!
      तू आलीस की आपण सगळ्यांना जमवून खेळ खेळूया, श्रावण नसला तरी !!

      अनेक आभार निलिमा!! 💓

      हटवा
  8. किती बारकाव्यांसह वर्णन केले आहेस तू!!श्रावणातले दिवस डोळ्यांसमोर आले.मन ४०/४२ वर्षं मागे वळून वर्तमानाचे भान विसरले,अप्रतिम !!
    वेणुताई कुठे आहेत?त्यांचा फोटो छान आहे, भेटले पाहिजे.तू भेटलीस तर सांग, आठवण झाली म्हणून .....
    शुभा जोशी कोळेकर

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वेणूताई सध्या डोंबिवलीला आहेत इतर वेळीमलकापूरला असतात कोल्हापूरला असतात

      हटवा
    2. धन्यवाद शुभा जोशी कोळेकर !!
      वेणूताई सध्या मुंबईमध्ये आहेत, बोलले परवाच त्यांच्याशी. छान मजेत आहेत! भरपूर मजेशीर आठवणी सांगितल्या त्यांनीही. मलातर त्यांचा नेहमीचा उखाणापण आठवत होता पण तेंव्हा हसायचो आम्ही त्या सगळ्या उखाण्यांवर 😂😂. भरपूर गप्पा झाल्या.. त्यांच्या मुलींशी, सुनेशी आणि नातवंडांशीही बोलले. अगदी सुरेख कुटुंब आहे!!! Very welcoming !!

      नक्की सांगेन तू आठवण काढत होतीस हे. 😃

      हटवा
  9. खूप सुरेख वर्णन केले आहेस. मंगळागौर जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहिली. ओघवती भाषाशैली!

    उत्तर द्याहटवा
  10. Phar chhan varnan kele ahe madam.tumhi etka barkava kela ahe ki mala amchya bahini khelay geleli athvan zali.Amhi jage aseparyant tumhi sangta tase khelnyache awaz,gayileli gite aikayala yaychit.vayaskar mahila kasha pokta asaychya tepan mastach varnan kele ahe.Chhanach,madam punha Abhinandan.

    उत्तर द्याहटवा
  11. जया किती सुंदर लिहिले आहेस. त्या काळात घेऊन गेलीस. आठवणी जपून ठेवणं ही कला आहे. तुझ्या या गुणांची साठवण खूप आवडली. सर्वांच यथोचित वर्णन भावलं. अशीच लिहीत रहा. सरस्वती तुला बळ देवो. या शुभेच्छा.
    राजन सबनीस

    उत्तर द्याहटवा
  12. ✌I have gone through Ur Dhamal Mangalagiri n a very good write up as usual ...detailed one ...noted Ur comments sweet one on "purush Sanskriti"(Mancha var basun) 😁🤣😁 .take it easy . Pl keep going .
    But the earlier blog is not unloaded as on today .so not read. All the best .excuse for delay.
    Tophkhane..Belgavi

    उत्तर द्याहटवा
  13. खूप छान लिहलयस जयश्री मावशी मी माझ्या लहानपणी अशीच मंगळागौर पहिली आहे। आणि वेणू आजीच्या हातच्या जेवणाची चव अजून जिभेवर आहे तुझ्या लिखाणातून मलकापूरच्या आठवणी ताज्या झाल्या,

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हो खरंच अजूनही ते सुग्रास जेवण आठवतंय!!

      अनेक आभार स्वप्ना!! 😃

      हटवा
  14. आईच्या डोळ्यात पाणी आले तिने तुझा फोन नं मागीतला आहे शुभा कोळेकर कोठे रहाते फोन नं असेल तर दे तसेच मंगळागौरीची सर्व पोस्ट अतिशय भावपूर्ण आहेत की शब्द अपुरे आहेत माझ्या आईसाठी लिहिले दे इतके आवडले वाचून डोळे भरून आले आम्हा कडून तुला शाबासकी व खूपच धन्यवाद
    मंगल अष्टेकर..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ही खरी प्रतिक्रिया जिची वाट पाहत होते. आपलं फोनवर बोलणं झालंच आहे.

      वेणूताईंचे फोटो आणि त्यांच्याशी बोलणे घडवून दिल्याबद्दल अनेक आभार !!! 😃
      खूप छान वाटलं!! 😃

      हटवा
  15. वेणूताई.. कोल्हापूर (मलकापूर) येथील आहेत का.... या वयात सुद्धा त्यांचा खूपच अभिमानास्पद उपक्रम

    उत्तर द्याहटवा
  16. धमाल मंगळागोरीचे वर्णन आपल्या श्रावणातल्या पावसाच्या सरीप्रमाणे असणाऱ्या तुझ्या शब्दांनी करून तू अक्षरशः आम्हाला आपल्या सुंदर, पवित्र परंपरेची विलोभनीय सफर घडवून आणलीस बाई !तू स्पेशल इंग्लिश ची विद्यार्थीनी आणि मराठीवरची(जरी आपली मात्रुभाषा असली तरीही)तुझी एखाद्या मराठी लेखकाला लाजवेल अशी भाषेवरची कमांड पाहून मी थक्क झाले बाई!
    मंगळागोरीतल्या प्रत्येक खेळाचे इतके हुबेहूब आणि मनोज्ञ दर्शन तुझ्या लेखातून झाले आणि भरून आले किती दिवसांनी तो पुनःप्रत्ययाचा आनंद घेताना .आम्हीही हे सर्व खेळलो आहे .वाचत असताना आपण तिथे वावरतो आहे असेच वाटले .छान आहे मलकापूर आणि तिथली माणसें .सर्व घटनां किती छान लक्षात आहेत तुझ्या!खेड्यात अगदी असेच होतात कार्यक्रम त्यामुळे वास्तवताही छान वाटली कुठेही क्रुत्रिमपणाचा आव नाही सर्व मनापासून ही मानसिकता खरचं होतीच खेड्यात !सर्व खूप छान वाटले वाचून !👌🏻👍🏻🙏🏻🌹🌹
    मनिषा कुळकर्णी..दुबई

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद मनीषा!! 😃
      मराठी लिहायला गेलं की जमतं ग सगळ्यांना.. इंग्लिश मध्ये ‘वशेळ्या’ आणि ‘उखाणे’ लिहिणं जास्ती अवघड आहे 😂😂.. Google translation वाच मजा म्हणून कधीतरी. 😃

      अशाच प्रतिक्रिया (आणि असतील तेंव्हा सूचनाही) देत राहा! लिहायला खूप प्रोत्साहन मिळतं !!

      हटवा
  17. काकू हल्ली अशा मंगळा गौरी होत नाहीत..कोणे जागाय्ला तयार नसतात..गाणी येत नाहीत पुर्वीची,उगीच सिनेमे लाऊन टाईम पास..10 वाजले की पळतात
    आरती पाठक,पुणे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अगदी खरं आहे. सांस्कृतिक वारसा जपणं अवघड होत चाललंय technology मुळे.

      ब्लॉग वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल अनेक आभार आरती 😊

      हटवा
  18. माझ्या वैनीची काकू कोकणातली होती त्यामुळे त्यांनी माझी व वैनीची मंगळागौर तिकडे केली होती. तुम्ही केलेले वर्णन हुबेहूब तसेच. खूप छान वाटले. माझी आई व माझ्या दोन आत्ये बहीणी उत्कृष्ट खेळ खेळायच्या सगळीकडे त्यांना बोलावणे असायचे .
    Dipa Desai

    उत्तर द्याहटवा
  19. फार मस्त लिहिता तुम्ही..बायकोला फार आवडला .अगदी पाहिली मंगळा गौर आठ्वली.
    मिलिंद कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  20. अगं दोनदा टाईप केले परत गेल आता फेसबुकवर बघ पुष्पा सातपुते

    उत्तर द्याहटवा
  21. आत्ताच तुझा ब्लॉग वाचला तिथे पण कॉमेंट्स दिल्या पण publish झाल्यकी ki नाही ते कळलं नाही इथे फेसबुक वर दिसलीस म्हणून परत कॉमेंट करते ब्लॉग खूपच छान लिहिलं आहेस 55 वर्षा पूर्वी च्या आठवणी जाग्या झाल्या अण्णा परांजपे मंदी काकिरडे वेणू अष्टेकर शैलाताई सबनीस यांचे चेहरे डोळ्यासमोर आले अशीच लिहित जा माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा
    अनु चंद्रचूड

    उत्तर द्याहटवा
  22. आज मला ब्लॉग मिळाला..वाचून रडून घेतले...ते दिवस फिरून परत यावेत गं...

    उत्तर द्याहटवा
  23. jgd. "धमाल मंगळागौरी!" हे प्रकरण पुरुषांचे विश्वातले नाही व त्यापेक्षा मला तर अपरिचित जगात नेणारं आहे, नवोढा स्त्रीसाठी आनंद सोहळा! स्त्रीमनाचं दर्शन घडवणारा लेख, मलकापुरच्या तुझ्या अनुभवाला आलेल्या मंगळागौरींचा सोहळा हा अभिनव प्रसंग. तरीही रेखाटन मंगळागोर मनापुढे साकार होते.पुरुष बहिष्कृतच! शब्दांकनामुळे यात डोकावता येतयं ,इतकंच!पण छान चित्रउभा केलय.सासरवासिनी व माहेर यांचे नातं आता बदलत चाललं तरी माहेरची ओढ अजून आहेच व जिवंत राहणारी आहे. समारंभ बदलत जाणारच!पण माहेर भोवती रुंजी घालणारं मन "रुणझूणत्या पांखरा। जा रे माझ्या माहेरा।" गूणगुणणारंच. जुन्या काळातल्या या आठवणी पिंगा घालत असणारं!आता ते झिम्मे फुगड्या व रंगतदार खेळ अस्तंगत होत आहेत, अधूनिक स्त्रियांना वेळ व फुरसत कूठय?ऐसपैस जीवन जगायचे दिन हरवले आहेत,नामशेष होत चाललेल्या गत जीवनातल्या या सूरम्य आठवणी!आता बचक्यातल्या पाण्यात नक्षत्रांकित आकाश पहावे तसं धावत जीवन ! अजून त्या आनंद सोहळ्याचे पडसाद नव्या रुपाने अनूभवण्याचा प्रयत्न आहे, स्त्री आता मुक्तही होत आहे.बंधनाच्या काळात मोकळीक देणारे ते सण!आता तसा मोकळेपणा येतआहे नव्या रुपात!मंगळा "गौरीं"च अंतःकरण उलगडणारा सहज लेख!🌷🌹🌻🌸💐
    जगदीश शेटे..सागाव

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सुंदर प्रतिक्रिया सर!! धन्यवाद!! 😊😊
      तेंव्हा खरंच बंधनात मोकळीक देणारे सण होते हे. पुरुषांना का एवढं बाहेर ठेवायचा अट्टाहास करायचे हे नाही कळलं तरीही. 😅
      काही रूढी, परंपरा कशा साजऱ्या करायच्या याच्या नियमावल्या थोड्या बदलल्या पाहिजेत. नवी पिढी अगदी उत्साही आहे सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी, पण १०-१२ तास काम केलेल्या मुला-मुलींकडून किती अपेक्षा ठेवायच्या हे घरच्यांना कळलं पाहिजे. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर ‘कटकट कमी करून जरा chill मारली’ की अगदी पारंपारिक पोशाखात सगळं साग्रसंगीत, पद्धतशीरपणे करतात हे लोक, असा अनुभव आहे माझा तरी. 😃
      पूर्वीची मजा नाही हे खरं आहे पण Facebook वर छान दिसतं म्हणून तरी सगळं केलं जाईलच पिढ्यानपिढ्या.. 😂

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -