गो गो गोवा..

'निर्जळी' हरितालिकेची कहाणी !

 

Teej is the generic name for a number of Hindu festivals that are celebrated by women in many parts of India and Nepal. Haryali Teej and Hartalika Teej welcome the monsoon season and are celebrated primarily by girls and women, with songs, dancing and prayer rituals.

          'देवा, मला चांगला नवरा दे…'  अशी प्रार्थना करत लहानपणीच माझ्यासारख्या वेड्या मुली हे हरितालिकेचे कडक व्रत सुरु करायच्या. 😅 पन्नास वर्षांपूर्वीही जोशीबाईंसारख्या खुल्या, आधुनिक विचारसारणीच्या बायका होत्या मलकापूरमध्ये, त्यामुळे तसं आमचं गाव फार काही कर्मठ रुढी परंपरा मानत नसे. तरीही ‘नवरा’ या प्राण्याविषयी कुठलीही प्राथमिक माहिती/अंदाज नसताना उगीचच मी हे व्रत अगदी वयाच्या सातव्या वर्षी आरंभले... कारण काय तर माझ्या जिवलग सख्या कांचन घुगरदरे, वृंदा जोशी, मंजुषा कुलकर्णी, मयुरा पास्ते इत्यादी मुलींनी हा उपवास सुरु केला. ‘चांगला नवरा’ म्हणजे काय हे यातल्या एकीलाही तेंव्हा कळत आणि वळतही नव्हतं. जणू काय चांगल्या नवरदेवांचा सेलच लागलाय… आणि सगळे चांगले नवरे संपले तर??? असा स्त्रीसुलभ विचार मनी डोकावला असावा आणि ‘आ बैल मुझे मार’ करत सगळ्यांनी उपास सुरु केले..😂 माझी मनकवडी आई  'तुला मुळीच झेपणार नाही, काही नको उपास-तापास' असे  म्हणत असतानाही धिंगाणा घालून उपवास सुरु केला.


हिमकन्या अपर्णेच्या मनी तो भोळा शिव वसला होता, ती त्याच्या प्रेमातही पडली आणि त्याच्या प्राप्तीसाठी चौसष्ट वर्षे वनस्पतीची पर्णे खाऊन ती तप करत होती.💕 सर्व सुख-वैभव प्राप्त करुन वैकुंठात शेषनागावर निवांत पहूडलेल्या नारायणाचे स्थळ नारदानी तिच्या बाबांना सुचवले त्यानी लगेच होकार दिला. हे ऐकून उमेला फार राग आला, तिने हे सुसंपन्न स्थळ नाकारले. आपला विवाह भणंग योगी कैलासपती शिवाशी व्हावा म्हणून तळमळू लागली. तिच्या सखीने तिला हे हरितालिकेचे हे व्रत सांगितले. दोघी वनात रवाना झाल्या आणि पार्वतीने हे कडक व्रत आरंभले .. 👸 म्हणून आम्ही वेडपट मुलींनी काही अक्कल नसताना माहित नसलेला ‘नवरा’ चांगला मिळूदे यासाठी हे व्रत करायचे प्रयोजनच काय? पण एका शेळीमागून इतर शेळ्या डोळे मिटून आपोआप जातात तसा सगळ्यांनी ‘कडक’ उपास सुरु केला. 


हरितालिकेच्या व्रताच्या आदल्या दिवशी ‘पारणे’ असते. या दिवशी छान खमंग भाजके पदार्थ खायचे असतात. ते सगळे भरपेट खाऊन मग आम्ही पूजेची दूर्वा, पत्री, फुले, बेल गोळा करायला सगळ्यांच्या अंगणात पाहणी सुरू करायचो. गणपतीचे पडघम वाजायला सुरु झालेले असतात त्यामुळे या बरोबरच तीही तयारी करायची. पत्री-फुले गोळा करून झाली की आमचे मुलींचे काम संपे. माझ्या लहानपणी आत्ताच्या गणोबा सारखी फक्त मातीची सुरेख सखी-पार्वतीची मूर्ती मिळे, तिला रंगवलेले मात्र नसे. दरवर्षी गणेशचतुर्थीच्या आधीच्या दिवशी ही पूजा असते. आई, आजीच्या मागे लुडबूड करत मी साग्रसंगीत पहिली पूजा केली. गंमत म्हणजे माझी सत्वपरिक्षा पहायला त्या वर्षी हरितालिका आणि गणपती एकाच दिवशी होत्या! तिथी एक आली की क्वचित असे होते म्हणे. घरात बाप्पाच्या नैवेद्याची तयारी सुरू होती. खीर,मोदक, बटाट्याची माझी आवडती भाजी….😋 सुग्रास भोजनाचे परिमळ घराघरात दरवळत होते. उपास असल्याने सारखे लक्ष तिकडेच जात होते. ‘पूजा झाली की एखादे फळ खा’ असे मातेने सांगितले. मी अतिशहाणपणा करत ‘मी निर्जळी उपास धरला आहे’ असे सांगून वाद घातला.😖 मग आज्जी येऊन ‘कर होss निर्जळी उपास, मग चांगला नवरोबा मिळेल’ असे बोलून माझी पाठराखण केली. दोघी तोंडाला पदर लावून खुदू खुदू हसत बसल्या आणि मला काही तरी कामात गुंतवून टाकले.


भाद्रपदातील वद्य तृतीयेला भारताच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते. ही पूजा म्हरजे पार्वतीची पूजा आहे. तीन दिवस चालणारे हे व्रत महिलांसाठीचे व्रत असून ते अतिशय खडतर मानले जाते.


        दुपारची गणेशाची आरती झाली आणि सगळे जेवायला बसले. मला काही चैन पडेना.. आमचे कळगुटे बंधू मुद्दाम बटाट्याच्या भाजीचे, मोदकाचे वर्णन करत 'व्वा.. व्वा.. उत्तम'... करत भोजन चापू लागले.😠 आता भाजी संपणार असे वाटू लागताच मी मातेच्या मुखाकडे पाहत बसले, तिने बरोब्बर ओळखले आणि परफ़ेक्ट टायमिंगवर फसवा बॉल टाकत … ‘बसतीस का जेवायला?’ असे विचारले मात्र… मी लगेच मांडी घालून पाटावर बसले आणि अगदी अलगद सोप्पा झेल दिला!...😝 प्रेमळ बंधू एकदम खदा खदा हसायला लागले.. आईने खुणेनेच त्यांना दटावले. भुकेली मी इकडे तिकडे न बघता.. मोदक आणि बटाट्याच्या पिवळ्या जर्द भाजीवर तुटून पडले!  माझा उपास मोडला म्हणून बंधूराज, आई, आज्जी सगळेच खो-खो हसायला लागले!  आईने टाकलेला मोहक चेंडू माझ्या वेळाने लक्षात आला… पण एकदा झेल दिल्यावर तो नो बॉल होता असे मीच कसे म्हणणार?... मोडलेला उपास आता कसा जोडणार ?.. शास्त्रात याला पळवाट काढणारे उत्तर नसल्याने, पुढचे सगळे वर्ष भावंडांना चिडवायला छान कारण मिळाले… एका तुच्छ बटाटा भाजीने मला मोहात पाडले आणि मी स्वत: माकडांच्या हातात कोलीत दिले! बंधू सगळ्या गावात सांगत सुटले.. 'उपास मोडला...उपास मोडला, हिला चांगला नवरा मिळणार नाही'... असे प्रथम ग्रासे अपयश पदरी पडले. नापास झाल्यासारखे अपमानास्पद वाटून कान, नाक लालेलाल झाले. हुकमी शतक झळकावणाऱ्या पट्टीच्या फलंदाजाला शुन्यावर आउट झाल्यावर कसं वाटावं तसं वाटलं! 'मला अर्धे तरी पुण्य मिळेल का? मी केला ना अर्धा उपास?' असा केविलवाणा प्रश्न मी आई, आज्जीला विचारुन पाहिला. यावर भावंडानी 'उपास अर्धवट तर नवरा अर्धवट' असे उत्तर दिल्याने… मी रडून कांगावा केला.😅 शेवटी बाबांनी 'लाडक्या लेकीस मी चांगला नवरा शोधून आणतो'  ही खात्री दिल्यावर मनास बरे वाटले. नवरोबाचा भार प्रेमळ पित्यावर टाकून मी खेळायला पळाले.😊


           पुढचं पूर्ण वर्ष आमच्या भावंडांचं चिडवणं सुरुच होतं. मग आठव्या वर्षी मात्र गड सर करायची मनाची पूर्ण तयारी केली. नशीबाने त्या वर्षी हरितालिका आदल्या दिवशी आली आणि माझा निर्जळी उपास सुरु झाला. वर्षभर भांडणे सोडवून दमलेल्या मातेने आधी तंबी देऊन भावंडांची तोंडे गप्प केली होती.😂 ती सारी माझा पचका पहायला टपली होती. 'याना चांगली बायको मिळायला नको? याना पण व्रत करायला सांग'..अशी भुणभुण मी मातेच्या मागे लावून स्त्री-पुरुष समानता आणायचा बालप्रयत्न केला होता, पण खादाड विरोधीपक्षानी कडाडून विरोध केला आणि प्रस्ताव बारगळला!😅 ते मला हसायची एक संधी सोडत नव्हते. मग दुसऱ्या वर्षापासून मी नेटाने निर्जळीचा प्रामाणिक प्रयत्न सुरु केला. आई, आजी बरोबर पूजा केली की आजीने हळूच फळे दाखवली ...पण मनावर दगड की काय ते ठेवला आणि निर्जळी उपास सुरु केला. पोटात काही नसलं की वेळ जाता जात नाही, घड्याळाचा काटा सरकतच नाही पुढे. मग कांचनच्या गोल काट्यावर जाऊन, सगळ्या सख्यांना जमवून ‘तू काय काय खाल्लंस?, मी काहीच कसं नाही खाल्लं’ याची सांगोपांग शहानिशा, चर्चा रंगे. सगळ्याच जणी सुरात सूर मिसळून निर्जळीचा संकल्प ठासून सांगत. एखादी स्मार्ट मुलगी त्यात भर घालून ‘थुंकी सुद्धा गिळायची नसते’ असं सांगून उगीच वेड्यासारखी थुंकत बसे.😂 रात्री बाराला रुईच्या पानावर दही घालून चाटायचे असते असे तिने सांगितलं. लगबगीने जाऊन आम्ही बाकीच्या शेळ्यानी काट्याकुट्याची पर्वा न करता ती पानेही पैदा केली. थुंकत बसलेल्या सखीचा उपास सगळ्यात कडक, आपण उगीच थुंकी गिळतोय असे अपराधी वाटू लगे. दर तासाभराने पोटाची जाणीव होई पोटातून कुsरss..कुsर ssअसा आवाज येई. पाय आपोआप घराकडे वळत. पाण्याने उपासाचा ‘कडकपणा' पातळसर करायची सुरुवात व्हायची. आईकडे आणि आज्जीकडे पहाताना कटाक्ष आपोआप केविलवाणे व्हायला सुरुवात व्हायची. त्या दोघी कुठे गूळ चिर, कुठे खोबरे खवण अशा कामात गर्क असत. गूळ/खोबरे तोंडात टाकायचा मोह होई… पण निर्जळी उपवासाला चालत नाही, हे आठवून तोंड बंद ठेवावे लागे. सारणातील गूळ, खोबरे, खसखस अशा खमंग वासानी जिभेस पाणी सुटे. एरवी घरात न ठरणारे पाऊल घरात स्थिरावलेले पाहून दोघीही गालात हसत असायच्या. मग आज्जीला दया येऊन वात्रट भाऊ जवळ पास नाहीत याची खात्री करून ती दोन केळी हातावर ठेवायची.. ‘पटकन खा, चालतात उपासाला’ असे सांगून. ती गप्पकन पोटात गडप करून मी दोघींनाही ‘मैत्रिणी घरात आल्या तर माझा निर्जळीच उपास आहे, मी काssही खाल्लेले नाही असे सांगा’ अशी सक्त ताकीद द्यायचे.😂 सगळ्या सख्या अशाच तासा तासाने घरी फक्त पाणी प्यायला जायच्या आणि परतायच्या. संध्याकाळी सगळ्यांच्याच आया आणि आज्ज्या टाळ्या देत काय बोलायच्या… की आमच्या ‘निर्जळी’वर  हसत बसायच्या… हे बाकी कोडेच आहे.😉 


पुराणातील संदर्भाप्रमाणे हिमालयाची कन्या पार्वती हिचे शंकरावर प्रेम जडले. मात्र शंकराला त्याची कल्पनाच नव्हती. शंकर हाच पती मिळावा म्हणून पार्वतीने हिमालयात खडतर तपश्चर्या सुरू केली. सतत १२ वर्षे केवळ रूईची पाने चाटून पार्वतीने ही उपासना केली व अखेर शंकर तिच्या व्रताने प्रसन्न झाला आणि तिचा पत्नी म्हणून त्याने स्वीकार केला.


फळे हा पदार्थ जेवणाची कसर अजिबात पुरी करू शकत नाही आणि कितीही फळे खाल्ली तरी पोट भरत नाही. येता जाता सारखी चरायची सवय, असं तोंडाला कुलूप लाऊन कशी जाणार? आमच्या आया बाया मात्र कमाल होत्या, अगदी कडक उपास करुन, गणपती च्या आगमनाची सगळी जय्यत तयारी करुन रात्री खेळायला मैदानात उतरत आणि मग धमाल सुरु होई. आमची म्लान मुखकमले पाहून सगळ्या आम्हाला ‘उपासाचं तेज आलंय हांss चेहेऱ्यावर!!’ असं मुद्दाम खवचटपणे सांगत.😃 बऱ्याचशा बायकांना कडक उपासांची सवय होती त्यामुळे त्यांच्या उत्साहात काडीएवढा फरक पडलेला नसे, अगदी फ्रेश असायच्या त्या. ‘गणोबा,गणपती आज तुम्ही माहेरी येशीला', असली गाणी सुरू होत.. 'गौरी माहेरा जाशील, काय काय लेणे लेऊन येशील?'  ही पारंपारिक गाणी सुरू होत. सगळ्या गीतात गौरी लंकेची पार्वती आहे हे सिद्ध केले जाई. अनादी काळा पासून बायका इतर बायकांच्या दागिन्यांकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवत असाव्यात, असा निष्कर्ष निघतो. असे करत सगळं वातावरण गणपती, गौरी आणि शंकरोबाच्या आगमनात नाहून निघे. देहभान हरपून आम्ही पोरी उपाशी पोटी चोरट्या फलाहारावर रात्री एक-दोन पर्यंत अनेक खेळ खेळत असू. दमून आईच्या कुशीत शिरलं की मात्र पायात गोळे यायला लागत आणि रडायलाच येई. झोप कुठली यायला?... मुलाच्या पोटातली भूक मातेला बरोब्बर समजते. आई हळूच उठायची आणि मिणमिण पेटणाऱ्या वातीच्या स्टोव्हवर वरीचे तांदूळ तिखट मीठ घालून रांधायची आणि आम्हा बहिणींना खाऊ घालायची. हे सगळं अगदी खुट्ट आवाज न करता चाले. कारण काय, तर आमचे झोपलेले वात्रट बंधू जागे होऊन ‘उपास उद्या सकाळी सोडायचा असतोsss आत्ता नाहीsss’ करून आम्हाला चिडवून रात्री अपरात्री भांडणे हातघाईवर येउन, दंगल उसळू नये. गुपचूप केलेले ते वरीचे तांदूळ दूध-दही घातले की अगदी चविष्ट लागायचे. ते गुटू-गुटू ओरपले की झोपही अगदी मस्त डाराडूर लागायची.😃


सकाळी लवकर उठून गणपती बसवायला गुरुजी येण्यापूर्वी हरितालिकेला उत्तरपूजा करून दही भाताचा नैवेद्य दाखवून निरोप द्यायचा. तो भात खाउन उपवास सोडायचा, मस्त दहीदूध भात आणि मिरचीचं लोणचं फक्कडपैकी लागायचं. मग तृप्त मनाने  हरितालिकाना विसर्जीत करायला नदीवर जायचे. एकदा गणपतीसाठी छान नवीन कपडे घालून, तयार होऊन हरितालिकेच्या मूर्तीचे विसर्जन करायला आम्ही बहिणी नदीवर गेलो. चिरचिर पावसाने सगळा लाल मातीचा रस्ता निसरडा झाला होता. आम्ही पटकन परत यायचे म्हणून भराभर चालत होतो. त्या उतरत्या आणि निसरड्या रस्त्यावर ती घसरली आणि चांगली ५-७ फूट घसरगुंडीसारखी पुढे गेली, धबाक असा आवाज करत डायरेक्ट पाण्यात पडली. चिखल असल्यामुळे तिला पटकन उठताही येईना म्हणून मी हात द्यायला गेले आणि दोघीही छान कपड्यांना चिखलात लोळण फुगड़ी खेळून घरी आलो. चिखलाने बरबटलेली आमची रुपे बघून घरच्यांचे चेहेरे अगदी बघण्यासारखे झाले होते, पण गुरुजी आल्यामुळे आम्हाला रागे न भरता ‘झटकन आवरून या’ चे फर्मान मिळाले. 


या दिवशी संपूर्ण दिवस उपास करण्याची प्रथा आहे. कांही महिला पाणीही न पिता हा उपवास करतात. कुमारिका चांगला नवरा मिळावा व विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे व संसार सुखाचा व्हावा अशी प्रार्थना मनोभावे करतात.

मनोभावे पुजलेली अशी ही निर्जळी हरितालिका मला चांगलीच पावली आणि मनपसंत पती मिळाला. या जन्मीचा प्रश्न सुटला असा धूर्त विचार करुन मी लग्नानंतर पूजेपर्यंत निर्जळी आणि मग खाऊन-पिऊन असा उपास सुरु केला.😆 लहानपणी करायचे तसा केला तर माझे कौतुक करायला आता आई कशी येणार? त्या उमेसारखी उगाच मोठ्ठी होऊन गेले आणि नवरा करुन बसले होते. ती तपास बसली होती आणि मी नोकरी करत संसाराचे रहाट गाडगे ओढत होते.. कालाय तस्मै नम:, मग उपास लागणे परवडणारे नव्हतेच. माझ्या खऱ्या साग्रसंगीत हरितालिका आम्ही स्वाती कॉम्प्लेक्समधे राहायला गेल्यावर रुपाली उपाध्येंमुळे सुरु झाल्या. त्या कर्नाटकच्या आहेत आणि कर्नाटकी परंपरेनुसार सगळे भाजके पदार्थ उपासाला चालतात. कर्नाटकाची ही एक गोष्ट बरिक मला फारच पसंत आहे. हे लोक पोटावर खूप प्रेम करतात. उगीच उपोषण करून तोंडाला फेस आणणारी व्रते करत नसावेत. सगळेच कसे खाद्य सम्राट… पोटातला एक पदार्थ लगेच दुसऱ्यास जोडीला बोलावून घेतो, रिकामी जागा म्हणून सोडू देत नाही. यांच्या उपासाला पोहे, उप्पीटपासून मुगाची खिचडीपर्यंत आलम पदार्थ दिमतीला हजर असतात. असा ‘भाजका’ उपास करण्यासाठी उत्तम सुगरण शेजारीण मिळाल्यावर जिव्हेचे जे यथेच्छ कौतुक करता येते त्याचे काय वर्णन करू!!😃 वहिनींची शाबू खिचडी तर माझी पचडी, माझी खारकांची खीर तर वहिनींचे खारे काजू. पुढे पुढे कुलकर्णी वहिनींचे श्रीखंड, रानडे काकूंचा रताळ्याचा खिस, बटाटा पापड आणि शेवटी पित्तप्रकोप होऊ नये म्हणून आटीव दूध!असे करत ताटभर पदार्थ चापून ‘सुजळी’ हरितालिका होऊ लागल्या!!!😂 घरचे पुरुष, मुले यांना पण अचानक उपासाची उपरती झाली, ते ही आनंदे सगळे चाखू लागले. साग्रसंगीत उपास, गाणी, दंगा बारा वाजता आरती असे जागरणही सुरु झाले. अशी ही हरितालिकेची कहाणी एकविसाव्या शतकात सुरुच राहिली. 


बाकी निर्जळी उपासाचे कौतुक मोडीत काढले ते नऊ दिवस लिंबू पाणी पिऊन नवरात्राचे उपास करणाऱ्या सगळ्या भक्तांनी फलाहार, घनाहार, दुग्धाहार करुनही उपवास लागणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य पामरानी त्यांच्याबद्धल काय बोलावे??? त्यांना खरंच माझे साष्टांग दंडवत. 👏 माझ्या कपाळी 'उपास न झेपणारी' हा सातव्या वर्षी मारलेला शिक्का अजूनही अबाधित आहे. चांगला नवरा मिळावा म्हणून आम्ही ‘निर्जळी’ हरितालिका व्रत केले पण चांगली बायको मिळावी म्हणून एखाद्या शंकरोबाने उपास केलेले ऐकिवात नाही. तशी समानता आली तर जास्त  बहार येईल! त्या सोनेरी दिवसाची वाट पहात आणि पुढच्या पिढीस 'निर्जळी' झेपो, त्यांना मनासारखा जोडीदार भेटो असा शुभाशिर्वाद देऊन ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण..😊


विजयश्री तारे-जोशी

२०-८-२०२०


टिप्पण्या

  1. जयू...किती मनातले लिहीतेस..अगदी पटले

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच मस्त लिहिला आहेस. अगदी पटले. कारण आजही मला उपास झेपत नाहीत. खाऊन पिऊन असतो माझा पण. सोडायला नको वाटते . तरी आता श्रावणातले बंद करायचा विचार आहे..
    सीमा मोरे केसरकर पुणे

    उत्तर द्याहटवा
  3. श्री खूपच छान👌 आणि सर्व स्रियांचा जिव्हाळ्याचा विषय! हरतालिका आणि उपवास!! खूप सुरेख वर्णन केलेस, बालपणीच्या हरतालिकेचे!! तेव्हा खूप भूक लागायची ग! खायचे आणि जिरवाचे, दुसरं काही काम नव्हते😊 माझ्यापण पोटातून असेच आवाज यायचे उपवास असला की😊मस्त लेख👍

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. 😂😂 खायचं नाहीये असं ठरवलं की भरल्या पोटी पण भूक लागायला लागते.
      धन्यवाद मंदा !! 😊

      हटवा
  4. शंकर तुला पावला का ?😃😃लहानपणी आपल्या किती वेड्या समजूती असतात ना!आता हासू येते पण त्यावेळी आई,आज्जी ने सांगितलेल्या गोष्टीवर आपण किती श्रद्धेने विश्वास ठेवतो व कोणताही विचार न करता त्या गोष्टी करतो त्या दोघीं आपले दैवत असतात .खूप गंमत वाटली तुझ्या न झेपलेल्या उपासाची कथा वाचून .अतिशय ओघवती ,कुठेही रटाळपणाच्या आरोपातून मुक्त अशी भाषाशैली ,गोष्टीरूप कथन करण्याची व मध्ये मध्ये हलक्या ,निखळ विनोदाची पेरणी यामुळे हे "निर्जळी व्रताचा"आव आणणारी कथा मनाला मनोरंंजनाचा चांगलाच "ओला"शिडकावा करत तरतरीत करून गेली !👌👍
    मनिषा कुळकर्णी

    उत्तर द्याहटवा
  5. प्रा एस पी चौगले, वाकरे। वा, मस्त,हरतालिका उपवास का आणि कसा करतात हे आज कळाले, तुमची स्मरणशक्ती जबरदस्त आहे,धन्यवाद।।।।
    पुस्तक तयार करायचे आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. 😂😂 पुस्तक हा मुद्दा काय सोडणार नाही वाटतं!!

      धन्यवाद प्रा.सदा चौगुले.

      हटवा
  6. जोशी मडम, एकदम छान. काय मस्त लिहिलंय. अशा भाषेत अशा च छान कथा वाचायच्या आहे ते. लिहा छान भाषा, विनोदी, ओघवती शैली, मनाला पकडून ठेवणारी मांडणी, कोल्हापूरी झटका ... शिवाजी साठे सातारा.

    उत्तर द्याहटवा
  7. बालपणीच्या आठवणी, थोड्या फार फरकाने सर्वांच्या अश्याच असतात, तू मात्र बारीक सारीक गोष्टी अशा लिहितेस की सारे प्रसंग डोळ्यासमोर तंतोतंत उभे राहतात, ग्रेट💐💐💐
    मनिषा देसाई

    उत्तर द्याहटवा
  8. वा..वा आता अम्ही पण उपास करायला लागतो,इतके खायला मिळत असले तर मला हीच्ग बायको चालेल.तुमच्या मुळे का करतात ते समजले.किती मस्त लिहित जाता,वाचताना मजा येते.आपले बालपण किती छांन गेलय.लिहिता कधी इतके? मी आश्चर्यचकित होतो,मला हे टाइप करायला कंटाळा येतौ हो..
    R.S.Patil

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे

    1. 😂 नक्की करा उपास, आदल्या दिवशी मेनू बघून ठरवा कुठले कुठले करायचे ते 😂

      ब्लॉग चं Typing आणि publishing मुलगी करते. माझापण speed कमी आहे त्यामुळे कंटाळा येतो. कंमेंट्स तेवढे करते मी.

      धन्यवाद R.S. Patil

      हटवा
  9. jgd.हरितालिकेच्या आज पर्व दिनी तुझ्या "निर्जली हरितालिकेची कहाणी"चा परामर्ष घेण्याचा सुयोग आहे.तुझ्या साठा ऊत्तराची व्रत कहाणी त्या वरदायिनी आदिजननीच्या कृपेने सफल झाल्याची ग्वाही लेखातच आहे. बालपणीच्या कोवळ्या वयात आरंभलेलं हे व्रत असल्यानं भुकेनं खलनायिकेसारखं छळून सत्वपरीक्षा घेणं स्वाभाविक! पण तुझा मृत्यूदेवतेपुढेही हार न जाणारा सावित्रीसारखा दृढनिश्चय जाणून आदिजननीने तुझे सटरफटर खाद्य अपराध "बच्ची,तुझे माफ कर दिया।"म्हणत क्षमापित केले असावेत, प्रत्यक्षात दर्शन न देता व "वरं ब्रुहि" असं न म्हणता मनीचे मनोरे पुर्ण होण्याचं वरदान दिलं असावं!"नवरा" काय चीज असते हे न कळणाच्या वयात सुरु केलेलं कठोर व्रत आठवून तिला आपल्याला झालेल्या वेदनांची याद आली असेल. नको घ्यायला सत्वपरीक्षा म्हणुन तुझे किरकोळ अपराध क्षमा केले असतील, त्यामूळे या जन्मीची तपस्या (कदिचित पूर्व जन्मीचीही भर असेल ,कोणी सांगावे?) सफल करीत मनी चितारलेला स्वप्नातला राजकुमार जीवन साथ म्हणून जोडून दिला, त्यामूळे तू "तारे" ची जो(ति)शी म्हणजे जोतिसारखी जोतिर्मय बनून वाडःमय प्रकाश वितरीत असावीस. अपर्णेने पानेही खायची सोडून अपर्णाहारी बनली. पवनाहार करुन शिवाला जिंकले. तुलाही फूले पत्रीवेचताना मलकापुरी धूंधारपावसात कसरत करावी लागलीच ना? लालमातीच्या चिखलातली अंगप्रत्यंग रंगवणारी घसरगुंडी व रौद्ररम्यरुपातलं नागराजाचं (रुद्र)दर्शन थरारुन गेलं. सख्यांच्या सोबतच्या लीला ,गप्पा टप्पा व भावंडांचे चिडवणेअनूभवता अनूभवता शैशव सरले. हरितालिकासारख्या व्रतानी भारतीय संस्कृतीची वीण घट्ट विणली आहे. वैराग्ययोगी भणंग भोळ्या शंकरावर मनोमन प्रेम करणार्‍या असंख्य गौरायानी मराठी सांबांचे संसार सावरले आहेत, "वैभवपूजित वैकुंठेश्वर तिच्या पित्याने योजियला वर " असे असता भोळ्या शंकरावर भाळणारी संपन्न हिमराजांची कन्या आगळी वेगळीच. पतीचा अवमान दक्षाच्या यज्ञात पाहून अग्निप्रवेश करणारी मानिनी सती दाक्षायिनीच पार्वती म्हणून जन्मघेते व बीजवर शंराला वरते, हे अतूट शिवशक्तीचे अभंग अक्षय नाते अर्धनारीनटेश्वराचे रुपात भारतीय संस्कतीचे प्रतिक आहे व अध्यात्मिक रहस्यही!"बा! भारता वैरागी शंकर तुझा आदर्श आहे।"असे स्वामी विवेकानंद सांगतात कारण त्याग भारताचा आत्मा आहे. भोगप्रवण पाश्च्यात्य देशात होमरच्पा "इलियड" मधली एक मूलगी असताना पॅरिस बरोबर ट्राय
    ला पळून जाणीरी विश्वसुंदरी हेलन आहे व हॅम्लेटमधली विश्वासघाती गर्ट्युड आहे, तर पळवून नेले असताही रावणाला वश न होणारी सीता आणि यमाला जिंकून सत्यवानाला जिवंत करणाली सावित्री भारतीय संस्कृतीत आहे.हिमालय अपर्णेवर तिच्या मनाविरोधी वर लादू शकत नाही. मनस्वी व मानिनी पार्वतीने पतीसाठी तप करुन मनासारखाच पती मिळवला.हा स्वयं निर्णयाचा हक्क या आदिकालातही आहे, बटूरुपाने परीक्षा घ्यायला आलेल्या शंकराने शंकराची निर्भत्सना केल्यावर पार्वतीने केलेला युक्तिवाद व प्रतिवाद तिच्या अस्मितेची निशाणी आहे. ही आदिकालीन अपर्णेची प्रेमकहाणी उदात्त व आदर्श आहे. हा सांस्कृतिक पाया अजून भक्कम असला तरी पाश्च्यात्य चंगळवादाचे आघात !हा पाया हादरवीत आहेत, बालपणीच्या संस्कारातून मनात रुतलेली ही हरितालिकेची कहाणी हा अपला वारसा आहे. तर्कापेक्षा भावना व श्रद्धेवर आधारीत आहे वआमचा आधारवड आहे, तुझी नार्जल कहाणी या आदिबंधाबद्दल खूप सांगून ञाणारी आहे, या श्रद्धेची पाळेमुळे खोलवर रुतलेली आहेत तोवर चिंता करायची गरज नाही.तरीही हे जपायला हवं. लेख nostalgicग आहे.लालित्य आहे.अभिनंदन!🦚🌳🌄
    शेटे सर..सागाव

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद शेटे सर,
      अतिशय माहितीपूर्ण आणि वाचनीय प्रतिक्रिया!!
      अनेक अनेक आभार!

      हटवा
  10. Vijayshri ...
    Another sixer by u as usual..
    Fasting since childhood has paid good dividend n yeilded into fine realities . Converting from Tare to Joshi is magnificent one . Very happy to have read Ur "upavas story ".Ur Guru has perfectly analysed it in fine words n terms. Wish u many more marvels n fine results . Recent pramotion is also a result of Ur "prayatna" very good going ..keepit up . with good wishes on the ii s auspicious day .Thank u for keeping trust n respect .Thank u
    Good wishes all of u .
    R B Tophkhane Belgavi

    उत्तर द्याहटवा
  11. जया खुप सुंदर ! पुन्हा एकदा मलकापूरचे बालपण आणि त्यातली गंमत डोळ्यासमोर उभी केलीस‌ . तु इतक्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवतेस आणि आवर्जून सगळ्यांचा उल्लेख करतेस त्याचे खरच खुप कौतुक वाटते.

    उत्तर द्याहटवा
  12. काल हर्तालिका विसर्जन करताना तुझी आठ्वण झाली..बाई इतके कसे लक्षात ठेवतेस्स देव जाणे..मला तर काल चे आज आठ्वत नाही..
    माधुरी कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. 😂 मलाही कालचं आठवत नाही काही वेळा. घरातले आता छान टोमणे मारतात स्मरणशक्ती वरून..

      Thank You माधुरी!! 😃

      हटवा
  13. मला हे ३/४ दिवसापूर्वी म्हणाले जयश्री च नवीन ब्लॉग वाचला का ? खूप छान आहे
    पण मला डिटेल वाचायला वेळ नव्हता.
    कडकं उपासाचे वर्णन छान. भूक कशी चाळवली जाते व लोक कसे उपास मोडायला उत्सुक असतात हे वर्णन झकास जमले आहे.शेळी मागून शेळी उदाहरण छान
    त्या वयात आपण सर्व असेच वागत असतो.हरितालिका विसर्जनाची गम्मत मस्त. भाजका उपास सर्वांना आवडणारा.त्याच उल्लेख योग्य ठिकाणी करून निर्जळीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. पारणे मला पण आवडायचे.. पण निर्जळी जमली नाही 😁😁 पण तुझी निर्जळी वाचून मन भूतकाळात जाऊन आले. हेच तुझ्या लेखनाचे वैशिष्ट्य.खरोखर विषय निवडणे व तो डिटेल मध्ये लिहिणे कठीण आहे.
    म्हणून कौतुक 👌👌
    मृदुला चिटणीस..सान पाडा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद शैला मावशी. 😃
      खरी निर्जळी किती जणांना जमते हा संशोधनाचा विषय आहे. 😂
      हा विषय पाहून male audience या post कडे अगदी दुर्लक्ष करेल असं वाटलं होतं पण एवढ्या प्रतिक्रिया पाहून अगदी छान वाटलं.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -