गो गो गोवा..

एजंट ट्रेनिंग सेंटर

  

New India Assurance Head office, Mumbai

         बालवयात भातुकली खेळताना आम्ही शाळा भरवून ‘जोशी बाई, भिडे बाई’ अशी भूमिका करायचो. शिक्षकांचा दरारा, रुबाब पाहून आपण शिक्षिकाच व्हावे असं वाटे. स्वप्नपूर्तीसाठी उत्तम शिक्षणही घेतले पण हाय...माझे स्वप्न अधुरे राहिले आणि वाट चुकलेली मी न्यू इंडियात आले. कविता, कला अशा स्वप्न नगरीत वावरणारी मी न्यू इंडियाच्या वरकरणी रुक्ष क्षेत्रात आले, पण टिकले कशी? याचं  मलाच आश्चर्य वाटतं. अल्लाउद्दीनचा राक्षस मात्र कायम माझ्यावर प्रसन्न असतो ‘काय आज्ञा आहे आका ?’ असे विचारत बसतो, म्हणूनच की काय कंपनीने हुकलेला मास्तरकीचा  रोल अनुभवायची संधी दिली. कोल्हापूर एजंट ट्रेनिंग सेंटरची व्यवस्था माझ्याकडे चालत आली आणि चक्क १८ ते ७५ या वयोगटाची मास्तरीणबाई झाले! ट्रेनिंग सेंटरमधे तारेवरची कसरत करताना नानाविध गमती मला समृद्ध करून गेल्या. 

              प्राथमिक शाळेतल्या बाई जसे मुलांना पोषण आहार म्हणून खिचडी खाऊ घालतात, तसं इथंही रोज चहा, जेवण अशी सगळी व्यवस्था चोख करावी लागते. फक्त खिचडी शिजवायचे काम मात्र नाही! न्यू इंडिया ही मूळची आदर्श व्यक्तिमत्व टाटांची कंपनी असल्यामुळे ‘make them comfortable’ हे तत्व कसोशीने पाळले जाते. एजन्सी सुरु  होण्यापूर्वीच पूर्ण ज्ञान देऊन खाऊ-पिऊ घालून लढण्यासाठी सक्षम केले जाते. कोल्हापूर संस्थानी संयोजन करताना अनेक अस्सल कोल्हापुरी किस्से अनुभवता आले. अतीविद्वान पुणे / स्मार्ट मुंबई इथले ट्रेनिंगचे किस्से अजून बौद्धिक, रंजक असावेत… तरी आमचे रांगडे कोल्हापुरी झटके भारीच हो !!!


आमच्याकडे नवीन एजंट ट्रेनिंगसाठी नाव नोंदणी अखंड सुरु असते. पन्नास जणांची नावे आल्यावर बॅच घेतली जाते. ट्रेनिंग सुरू करण्या पूर्वीचे पहिले काम म्हणजे नावनोंदणी केलेल्या भावी एजंटना फोन करून ‘मुहूर्त काढलाय, कृपया येणेचे करावे’ असे सांगणे. काही लोक उगीच मजा म्हणून, काही बायको/नवरा यांच्या आग्रहास्तव व इतर काही जाता जाता जमतंय का बघूया म्हणून टाईमपासला नाव नोंदवतात. कोल्हापूर संस्थानात पाच दगड भिरकावले तर त्यातले दोन ‘पाटील’ लोकांना लागतात, आमचे असंख्य एजंट या महान आडनावाचे आहेत. पाटील म्हटले की यांचा ‘नाद करायचा नाय’. फोन आला की पहिल्या रिंगला झट्क्यात उचलणे या लोकांना शोभत नाही… तो कमीपणा असतो. बघू परत आला तर… म्हणून फोन उचलत नाहीत. तिनदा फोन केल्यावर बऱ्याच वेळा त्यांची विद्रकल्याणी बाळे फोन उचलतात. गुणी बाळे ‘बाबा घरात नाहीत’ असे सांगायला सांगितल्याचे सांगतात.आईला फ़ोन दे असे सांगितल्यावर कुर्रेबाज पाटलीण बाई फोन घेतात,मग आमचीच उलट तपासणी घेत ‘कोन पायजे? का फोन केलेला? कसली एजंसी? आमाला काय नक्कोय’ करतात… मग परत पाटलांनी नाव नोंदवलंय सांगितले की… अगदी नाईलाजाने नवरोबाला हाकारतात मग कुठे पाटील रुबाबात फोन घेतात. स्वत: नावनोंदणी केल्याचं ते सपशेल विसरून गेलेले असतात मग ‘अरारा sss आत्ता काय जमत नाई म्याडम, फूडच्या महिन्यात ठेवा, म्हेवणीचं लगीन हायss, बायको सोडणार न्हाई...कसं यूss?’ असा खडा सवाल करून  मलाच कोड्यात टाकतात. वारीला चाललोय, ऊस भांगलायचाय अशी अनेक नामी कारणांची जंत्री तयारच असते, एकाने तर मला म्हैस विणार असल्याचे शुभ वर्तमान देऊन असमर्थता दर्शवली! काही पाटील लोक येण्याचे आश्वासन देऊन पाळत नाहीत, ते राजकारणी, सरपंच, दूध डेअरी चेअरमन….. वगैरे असतात. असा एकूण पाटलांचा नाद का करायचा नाही हे उमजू लागले.


न्यू इंडिया एशुरन्सचे माजी चेअरमन जी श्रीनिवासन यांच्यासोबत CMD क्लब मेंबर एजेंट
न्यू इंडिया एशुरन्सचे माजी चेअरमन जी श्रीनिवासन यांच्यासोबत CMD क्लब मेंबर एजेंट

               बाकीचे लोकही काही कमी विनोदी नसतात… 'LIC चे चालू लायसन्स असताना तुमची परिक्षा कशाला घेताय? ट्रेनिंग कशाला? देऊन सोडा की हो डायरेक्ट लायसेन्स'.. असे सुचवत बसतात. तिथे LIC त वाहन/ आरोग्य विमा असतो का विचारले तर ते ‘आपोआप येतंय की ते.. त्याला कश्शाला ट्रेनिंगची बैदा…’ असे आम्हालाच शिकवतात. शेवटी अगदी नाईलाजाने बोहल्यावर चढायला तयार होतात. मग त्याना ऑफिसचा पत्ता सांगायला लागतो. काही मात्र पत्ता सांगताच ‘आपल्या यम्ं जे वाईन समोरचं न्हवं?’ असं विचारतात आणि मी ऑफिसचा हा नवा पत्ता ऐकून गारच पडते. काही लोक पाच दिवस ‘लै’ होतंय जरा दिवस कमी करा अशी भाजी मंडईत करतात तशी घासाघीसही करतात. तेवढ्यात एखादा जेवण व्हेज की नॉनव्हेज विचारून, आपण श्रावण पाळतोय बरं का असे सांगून टाकतो! जणू काय आम्ही याना लगेच तांबडा- पांढरा रस्सा भुरकायला देणार आहे!!! अस्सल कोल्हापूर हे असे सगळी कडे खाद्य रसिकता दर्शवत असते….


बायकांच्या तर अजूनच वेगळ्या तऱ्हा, ‘आमचे मालक बरोबर आले तर चालेल का? मला एकटीला सोडणार नाहीत, ते आत बसले तर चालंल का?’ ‘माझं बाळ लहान आहे त्याला ठेवायची काही सोय होईल का?’ असे अनेक अगदी रंजक प्रश्न विचारतात. आता मला याना विद्या देताना पाळणाघर काढून यांची  रडणारी बाळे मलाच सांभाळावी लागतील का काय असा प्रश्न पडे. आता या बाईचा नवरा आत नुसता बसून काय करणार? ट्रेनिंग ही काही सत्य नारायणाची पूजा आहे का, जोडीने बसायला? आता माझ्यापेक्षा ते पेपर भारी सोडवतील तेच बसुदेत का परीक्षेला...असा प्रश्न येईल का काय असे वाटू लागले आहे. असे दांपत्य जेऊ घालू लागलो तर कंपनीची भरभराट होईल का… विचाराने हसू येते. दोन दिवस असा चर्चेचा धुमाकूळ सुरू असतो. बोलून बोलून तोंड फुटायची पाळी येते, हे खरे सत्वपरीक्षेचे काम असते. असे वऱ्हाड जमवाजमव करत नमनाला धडाभर तेल जाळून ट्रेनिंग सुरु होते. बॅच सुरु झाली तरी ‘आमाला काय माहित नाही हो, फोन बिघडला होता हो, पोराने घेतला होता हो, पडला हो..’ करत ‘आता आम्हाला घ्या होss, घ्या होss’ चा घोषा शेवटच्या दिवसापर्यंत लागलेला असतो. 


 ट्रेनिंग सुरु होताच पहिला तासभर, ‘काय म्हणून आलोय? झक्क  मारली आणि या फंदात पडलो’ असा त्रासिक चेहेरा करून हे प्रौढ शिक्षणार्थी शिष्य गपगार बसतात. सगळं विमा ज्ञान अलगद डोक्यावरून, कानावरून आदळून पुढे जात असतं. कुणाचे शिकायचे वय नाही आणि इच्छाही नाही असे सारे मारून मुटकून आलेले असतात. त्यात त्यांची एका जागी दिवस भर बसायची शाळेची सवय केंव्हाच सुटलेली असते, त्यामुळे शक्य तेवढा निर्विकार चेहरा करून भावसमाधीत बसतात. मग दुपारी स्वयंसिद्धा संस्थेच्या पद्मजा जोशी जेवण घेऊन येतात. त्यांचे जेवण इतके सुरेख असते की सकाळ पासून कैद झालेले त्यांचे चेहेरे जेवण झाले की आपोआप उजळू लागतात. पोटात सुग्रास अन्नाचा घास गेला की कोणताही जीव सुखावतो हेच खरे. बरेच लोक विटा, सांगली, गडहिंग्लज असे दुरून, भल्या पहाटे उठून आलेले असतात त्यामुळे जेवण झाल्यावर साहजिकच त्यांचे डोळे मिटायला लागतात. दुपारचा पहिला तासात शिकवण्याचे कसब पणाला लागते, डुलकीबहाद्दर शिष्याला जागे करत त्याच्या डोक्यात विमा ज्ञान ओतावे लागते. दुपारच्या जागरणात, जांभयांची सलामी देत, अर्धवट जागृत अवस्थेत थंडगार ए.सी. मध्ये यांचं ज्ञानार्जन सुरु असतं. थोड्यावेळाने चहा येतो आणि मग चुळबूळ सुरु होते आणि तरतरी येते. पुढचे तास बऱ्यापैकी जागृत अवस्थेत पार पडतात. आमच्याकडे अगदी उत्तम, अनुभवसंपन्न शिकवणारे लोक आहेत ते अर्धजागृत विद्यार्थ्यांची सारखी नीट उलट तपासणी घेऊन यांचा मेंदू ताळ्यावर आणून मग अनुभवाचे धडे देतात.


पहिल्याच दिवशी ‘काय हे.. तुमच्या खुर्च्या बारक्या आहेत, दिवसभर बसून अंग दुखायला लागलं’ अशा तक्रारी सुरु होतात. मी त्यांना परत असे पाच दिवसाचे ट्रेनिंग शक्य नसतं, कॉलेजला गेल्या सारखे या सगळे एन्जॉय करा असे सांगून वातावरण हलके, हसरे करून टाकते. डायना झेरॉक्स मधून पाचशे पानी पुस्तके आली, की पुस्तक बघून सगळे हबकून जातात. आता कवा वाचायचं… डोळ्यासमोर दिवसा काजवे चमकू लागतात. सर्वसाधारण दोन दिवसांनी सगळे विद्यार्थी नव्या नवरीसारखे रूळू लागतात, एकदम उत्साह  संचारून शंका विचारायला लागतात. खुर्ची पण ठीक वाटायला लागते. पहिली शंका म्हणजे ‘कमिशन किती?’ मग आम्ही विचारतो ‘झाड लावताना आंबे किती लागणार समजतं का? जितकी मेहनत तितके फळ.’ काही शंकासूर आम्हाला शिकवू देत नाहीत इतक्या शंका विचारतात. हे शंकासूर नंतर काही उजेड पाडत नाहीत असाही एक कटू अनुभव आहे. तिसऱ्या दिवशीपासून जेवण फार आवडू लागतं आणि शिक्षणही छान डोक्यात शिरतं. पाचशे पानांचे पुस्तक फक्त पाच दिवसात शिकायचंय आणि परिक्षा पास व्हायचे आहे या दिव्याची जाणीव होते. सगळे एकदम एकाग्र, स्कॉलर बॅचचे विद्यार्थी होतात. चेहेऱ्यावर ज्ञानाचे तेज चमकू लागतं. आपल्या वाहनाचा विमा नाही, कुटुंबाचा आरोग्य विमा नाही असे दिव्याखालचे अंधारही जाणवायला लागून, ते किती गरजेचं आहे हे स्वत:लाच उमजतं. हसत खेळत मजेत ट्रेनिंग सुरु रहातं. सगळे लहानपणापासून दोस्त असल्यासारख मिळून धमाल करतात.


माझा गौरव करताना मंडल प्रबंधक गीता हेगडे आणि काही महिला भावी एजेंट

माझा गौरव करताना मंडल प्रबंधक गीता हेगडे आणि काही महिला भावी एजेंट 


विटा, सांगली असे बाहेरून येणारे लोक नेहमी वेळेत पोहोचतात आणि कोल्हापूरचे संस्थानिक लोक डुलत डुलत उशिरा येतात. श्रीकांत कोलेसाहेब मग त्यांना वर्गाबाहेर ठेउन time management चे प्रॅक्टिकल ‘धडे’ देतात. या मुळे ग्राहकाच्या वेळचे महत्व त्वरीत समजते. 'right timing' आयुष्यात खूप कामी येते. अमोघ वक्तृत्वाची दैवी देणगी लाभलेले सज्जाद मुजावर साहेबांचे लेक्चर ज्या शिष्यानी ऐकले त्याच्या आयुष्याचे सोने झाले. त्यांचे SWOT Analysis कोणीही कदापी विसरणार नाही. विलास व्हटकर साहेबांची कळकळ शिष्यांना भावते. कोल्हापूर मधले सगळेच उत्तम जीव ओतून शिकवतात, त्यामूळे बेळगाव, गोव्यापासून लोक इथे फक्त ट्रेनिंगसाठी  येतात. गुरु-शिष्यांचे वर्गातले एकाहून एक भन्नाट किस्से सांगायला अजून एक लेख लिहावा लागेल. या सेंटरला अनेक मोठे वक्ते खास एजंटांना व्याख्यान देण्यासाठी आले. कोल्हापूरचा हा ज्ञानयज्ञ पंचवीस वर्षे  अविरत सुरु आहे याचा सार्थ अभिमान वाटतो.


          प्रत्येक बॅच वेगवेगळा अनुभव देते.वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. रणजीत पाटील खेड्यात रुग्ण सेवा करतात. गरीब रुग्णांना उपचारात मदत मिळावी, म्हणून पॉलिसी काढण्यासाठी  एजन्सी घेतात तेव्हा खूप बरे वाटते. नकळत त्यांच्या कडून ही समाज सेवा घडते. बँकेतून निवृत्त झालेले राजीव गुर्जर यांच्या सारखे मॅनेजर विमा सेवेतून उत्तम विमा-हीत साधतात. मेकैनिक, शिक्षक, इंजीनियर, शेतकरी, डॉक्टर अशा विवीध क्षेत्रातील एजंट ताऱ्यांनी न्यू इंडियाचे नभांगण तेजोमय आहे. ट्रेनिंग घेऊन आमचा एक एजंट क्षितिज पाटुकले तर उत्तम लेखक, प्रकाशक झाला, त्याने पुस्तक छापले 'विम्या विषयी सर्व काही'. साध्या घर सांभाळणाऱ्या सामान्य महिला, तरुणी पायावर उभे रहाण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन इथे येतात, तेव्हा ऊर अभिमानाने भरुन येतो. अगदी साठाव्या वर्षी सांगली विटा येथून प्रवास करुन काही महिलांनी एजन्सी घेतली आहे त्या उत्तम कामही करीत आहेत. एक बाई तिच्या लहान मुलाला घेऊन वर्गात यायची. तिचे पतीदेव बाहेर मुलाला सांभाळायचे आणि ही आत ज्ञानार्जन करताना अधूनमधून मुलाला बघायची. ते मूल तिच्याशिवाय रहातच नसे त्यामुळे असे दिव्य सुरु होते. या आधुनिक हिरकणी आणि तिच्या नवऱ्याचं मला खरंच कौतुक वाटलं. पूर्ण पाच दिवस तो प्रेमळ पिता बाहेर बाळ घेऊन बसला होता. शेवटी निरोप समारंभाला मलाच वाईट वाटलं आणि तिचं कौतुक केलं तर ढसाढसा रडायलाच लागली… मला काय बोलू कळेना, अगदी वधू-माय झाले!


असं करत शेवटचा दिवस येतो. समारोपाला दोन्हीकडचे प्रबंधक गणेश आपटे आणि केशव जोशी साहेब येत, त्यांना उत्तम मार्गदर्शन करत आणि  शिष्यांना feedback द्या म्हणून भाषण करायला लावत. आता ही पद्दत रूढ आहे. आमचे व्याख्यान पाच दिवस ऐकून त्यांची चांगलीच तयारी होते आणि ते उत्तम भाषण ठोकतात. बहुतेक सगळेजण काय शिकलो यापेक्षा जेवण कसं छान होतं हे परत परत सांगतात! पाच दिवस भुर्रकन उडून जातात आणि शेवटच्या दिवशी सगळ्यांना Online परिक्षेची, पुढच्या कामाची कल्पना येते. मंडल प्रबंधक मग यांच्यात आणखीच हवा भरतात आणि हे उत्साही फुगे आकाशात उंच उडू लागतात. उत्साहाने भारून कधी एकदा काम सुरु करतोय अशी अवस्था! तरी आम्ही समजावून सांगतो की सासरी गेलेल्या मुलीच्या हातात पहिल्याच दिवशी सासू कधी तिजोरीच्या चाव्या 'बहू ये लो चाबिया' करुन  सोपवते का?  ऑफिस मधे कोणीही तुम्हाला Red Carpet घातलेले नाही. काम करा सलाम मिळेल, कामातून अस्तित्व सिद्ध करून विश्वास संपादन केला पाहिजे. अपडेटेड राहिलं पाहिजे, कष्ट घेतले पाहिजेत, मग कुठे व्यवसाय सुरु होतो. उत्तम एजंट होण्यासाठी फार शिक्षण असण्याची मुळीच गरज नाही पण नीर-क्षीर विवेक आणि व्यवहारज्ञान महत्वाचे. धनाजी पाटील, किरण पडवळ, शिवाजी मोरे, रवी साळोखे, सूर्यकांत कालेकर,आनंदा म्हातूगडे, गणेश माने, राकेश खोत, नदाफ, सचिन बावडेकर, महेश उरूणकर यांच्या सारखे एजंट अनेक वेळा CMD क्लब मेंबर होऊन कंपनीच्या CMD ना भेटले. आम्हाला 33 वर्षात तो योग आला नाही, पण हे मात्र त्यांच्या कडून बक्षिसे घेऊन आले. हे कशाच्या जिवावर? तर ‘राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तद नंतरे’ या तत्वामुळेच. लोकसंग्रह हेच तुमचं भांडवल आहे त्यामुळे त्यांच्या गरजेला धावून गेलं पाहिजे, लोकांच्या सुख दुःखात सोबत असाल तर तुम्हाला कधीच मागे वळून बघावे लागणार नाही. विमा गरजेची पूर्ण माहिती करून द्या आणि तळमळीने समाजकार्य म्हणून यात उतरा यश तुमचेच आहे. किरण पडवळ एका पक्षाचा कार्यकर्ता आहे, मनुष्य संग्रह दांडगा आहे. कुणाचा वाढदिवस असो की बारावा, कुणाचे लग्न असो की पोलिस मदत हवी असो… कोणाच्याही मदतीस पडवळ जातीने हजर असणारच. शहाजी पाटील पत्रकारितेतून जनसंपर्क वाढ़वतो. धनाजी पाटीलने तंटा मुक्त गाव करून प्रगती केली आहे. विजय मोरे सत्संगामुळे जीवन-विमा तसेच इथे उत्तम व्यवसाय करतो. बहुतेक सारे यशस्वी एजंट एखाद्या तरी समाज कार्यात मग्न असतात. जनसंपर्क वाढवा व्यवसाय आपोआप वाढेल, लोकांना उत्तम सल्ला द्या, नवीन बदल लगेच शिका, मोबाइल लॅपटॉप असे उत्तम तंत्रद्यान वापरा आणि सर्वात महत्वाचे क्लेम साठी ग्राहकांना पूर्ण सहकार्य करा या शिकवणीवर  निरोपसमारंभ संपन्न होतो. 


खूप एजंटानी मला तर ‘आई’ करून टाकले! पण खरी ‘आई’ आमची कंपनीच आहे, जी त्यांना जन्मभर काही म्हणून उणे पडू देणार नाही. सगळ्यांना प्रशस्तिपत्रक मिळाले की आनंदोत्सव साजरा होतो भाषणे, पुष्पगुच्छ सगळं फोटोत साठवले जाते. सगळे ग्रुप करतात, पाच दिवसाचे कॉलेज जीवन परत अनुभवता आले असे सांगताना भावूक होतात. पाठवणीच्या वेळी 'मैडम उद्यापासून इथलं जेवण आठवणार बघा, पद्माताईंसारखी कोशिंबीर, आमटी जन्मात खाल्ली नाही' असे म्हणून परत परत त्या अन्नपूर्णेची आठवण काढतात.

आम्ही कोल्हापुरी लोक मनसोक्त उत्तम खाऊ घालून पोटातून माणसे आपली करतो.जाताना काही भोळेभाबडे लोक चक्क पाया पडून आशिर्वाद सुद्धा घेतात, शुभेच्छा देत आणि न्यू इंडियाच्या चोख व्यवस्थेचे  गुणगान ऐकत हा गोड दिवस संपतो.



 सगळेजण आपापल्या ऑफिस मधे कागदपत्रे देऊन परीक्षेस बसतात. सर्वांचे परीक्षा पास झाल्याचे फोनही आवर्जून येतात, कृतकृत्य वाटतं. ‘पहिल्यांदाच online परीक्षा दिली, छातीत धाडधाड झालेलं, कापरं भरलेलं, घड्याळ लैच फास्ट पळतय तिथं.. पण टिक्का मारल्या आणि परीक्षा पास झालो एकदाचा.. रिजल्ट बघताना डोळे मिटले.. देवा सुटलो एकदाचा’ हे उस्फूर्त समालोचन ऐकल्यावर मलाच जास्ती आनंद होतो. जणू काय IAS परिक्षा पास झालो इतका त्यानंद असतो. एवढ्या अग्नीपरिक्षेतून गेल्यावर मग कुठे एजन्सी सुरु होते. अशा रितीने नवीन सूनबाई माप ओलांडून आत येतात. मग आमच्या सारखी सासरची माणसं तिची रितसर हळद काढतात, बोलून बोलून तिला सरळ करतात आणि तिचे रुपांतर आदर्श सूनबाई मधे करतात! हे सगळे अगदी मोकळ्या वातावरणात होते. नंतर हे लोक आमच्या पेक्षा शहाणे होऊन, आम्हालाच काही नव्या क्लुप्त्या शिकवतात! आज सगळे उत्तम आर्थिकस्थितीत असून, मोठ्ठ्या गाड्या घेऊन पेढे देतात! या पेक्षा मोठ्ठा आनंद नाही, कारण हे त्यांच्या अथक मेहनतीचे गोड फळ असते. अनेक ग्राहक याना विमा हप्त्याचे कोरे चेक देतात इतकी यांची विश्वासार्हता! उत्तम कंपनीला अजून काय हवे ?


            एजन्सी घेतल्यापासून बरेच टाकीचे घाव सोसून न्यू इंडियाचे सर्व एजंट खूप हुषार, टेक्नोसेवी झाले आहेत, ते पटापट सगळे शिकून घेतात. खूप जण पोर्टलवर उत्कृष्ट काम करतात. या सगळ्या गोपालांनी या वाईट काळात हजारो पॉलिसी पोर्टलवर भरुन, लोकाना आश्वस्त केले… हे आमचे खरे योद्धे आहेत. यांनी साथीच्या जागतिक आजाराचा गोवर्धन पर्वत आपल्या असंख्य करांगुलीवर तोलून धरला आहे आणि सगळे विमेदार त्या छत्रछाये खाली निश्चिंत आहेत. देशसेवा करतांना कृष्ण-रुपी न्यू इंडिया एशुरन्स कंपनी कुठेही कमी पडणार नाही याची ग्राहकांना खात्रीच आहे. असे गुणवंत एजंट लाभल्या मुळेच कंपनी आपले धृवाचे अढळ स्थान राखून आहे. हे सगळे आमचे भक्कम आधारस्तंभ आहेत,बिझनेस पार्टनर आहेत… यांच्या सक्षम हातात कंपनीचा ध्वज असाच डौलदारपणे फडकत राहणार आहे यात मला तीळमात्र शंका नाही....



विजयश्री तारे-जोशी 

कोल्हापूर-29.8.2020


टिप्पण्या

  1. हसत खेळत जसा ट्रेनिंग देतात त्याचे किस्से मस्त

    उत्तर द्याहटवा
  2. म्याडम, अतिशय सुंदर लेख लिहला आहे, वाचून खरंच डोळयांत पाणी आलं 😢 आपण आम्हा एजंट बांधवांच्या ग्रेट शिक्षिका आहात हे मी मनापासून सांगतो, आणि ऐक गोष्ट की, माज्या कडून आपल्या प्रति काही चूक झाली असेल तर मला माफ करा. आपल्या पुढील लिखाणाला हार्दिक शुभेच्छा 💐🙏हरेकृष्ण धन्यवाद, आपला विध्यार्थी विजय मोरे

    उत्तर द्याहटवा
  3. म्याडम आपण ट्रेनींग सेंटरचा अनुभव वाचत असताना, कोले साहेब आपले ब्रँच अधिकारी, जबरदस्त माणूस आहे, कारण त्यांनी मला ट्रेनींग सेंटर मध्ये फक्त दोन मिनिट वेळ झाला तर आत घेतले नव्हते, याचा मला भावी जीवनात खूप फायदा झाला की, मी माज्या कस्टमर कडे ठरलेल्या वेळेच्या आधी पाच मिनिट पोहचतो आणि ग्राहक खूष होऊन मला चेक देतो, ही कोले साहेबांची पुण्याई म्हणायची
    विजय मोरे कोल्हापुर

    उत्तर द्याहटवा
  4. वा मॅडम काय मस्त लिहिलंय,अगदी लोकांनी काय काय कारण दिली,कसं वागले खरच ट्रेनिंग चा दिवस आठवला..ट्रेनिंग संपल्यावर मी जसं म्हणालो होतो,की नारी शक्ती ला तोड नाही,आम्ही फक्त tv, सिरीयल मध्ये बघत होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने ताकदीच्या आणि सक्षम असलेल्या कर्तृत्ववान महिला बघायला मिळाल्या.. आपण आम्हाला जे ज्ञान दिले त्याचा तोड नाही..मी पुनश्च आपले आभार मानतो..आपले कार्य लाखमोलाचे आहे,ते शब्दात व्यक्त करण शक्य नाही..आपल्या कार्याला ,धडासाला सलाम,आई करविरनिवासींनी आपल्याला उत्तम आरोग्य,उदंड आयुष्य देवो..अश्याच आमच्या सारख्यांचे आयुष्य घडवत राहा..तुम्ही नक्कीच एक प्रेरणादायी व्यक्ती आहात.. नारीशक्ती ला सलाम..💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  5. मॅम जोशी, वाचुन झाली खुशी, एकदम छान, कारण मुंबई मध्ये ३ वर्ष मला एजंट ला उपदेश पर भाषणास बोलवीत. पुण्यात R.M. असताना इन्चार्ज होतो,पण कोल्हापूरी अनुभव आला नाही.देव मेंदूला बळ देवो. असेच लिहीत रहा... शिवाजी साठे सातारा.

    उत्तर द्याहटवा
  6. तुमच्या प्रत्येक दिवस वेळ शिकवण आम्हाला दिलेत मी तुमचा थोडक्यात वाचला पण तुम्ही दिलेल्या सुचनेनुसार एक आठवण झाली. तुम्ही शिक्षक हा पेक्षा तुम्ही पुर्ण केली आहात.तुमच्या कडे एक कडक (शिक्षक) शिस्त बध्दता मी अनुभवली व शिकलो आहे.मँडम पुन्हा तुम्हाला भेटायला यायचे ठरविले होते..पण तुम्ही जाणता आहात कोरोना मुळे काही दक्षता घ्यावी लागते.
    तुमचा वेळ घेऊन तुम्हाला भेटणेस येतो.
    मँडम तुम्ही भरपूर ज्ञान दिले आहात
    तुम्हाला परमेश्वर सदैव असीच क्षमता देवो..आणि येथुन पुढे तुमच्या कालावधीत शिक्षण देणार आजुन तुमच्या कालावधीत चांगले विमाप्रतिनिधी निर्माण करणार ते ही माझ्या सारखे आपले मनोगत लिहीतील.मँडम काही चुक असेल तर क्षमा असावी..
    तुमची काळजी घ्या.
    अनिल घाटगे..
    दि.न्यु इंडिया विमाप्रतिनिधी

    उत्तर द्याहटवा
  7. वा मॅडम काय मस्त लिहिलंय,अगदी लोकांनी काय काय कारण दिली,कसं वागले खरच ट्रेनिंग चा दिवस आठवला..ट्रेनिंग संपल्यावर मी जसं म्हणालो होतो,की नारी शक्ती ला तोड नाही,आम्ही फक्त tv, सिरीयल मध्ये बघत होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने ताकदीच्या आणि सक्षम असलेल्या कर्तृत्ववान महिला बघायला मिळाल्या.. आपण आम्हाला जे ज्ञान दिले त्याचा तोड नाही..मी पुनश्च आपले आभार मानतो..आपले कार्य लाखमोलाचे आहे,ते शब्दात व्यक्त करण शक्य नाही..आपल्या कार्याला ,धडासाला सलाम,आई करविरनिवासींनी आपल्याला उत्तम आरोग्य,उदंड आयुष्य देवो..अश्याच आमच्या सारख्यांचे आयुष्य घडवत राहा..तुम्ही नक्कीच एक प्रेरणादायी व्यक्ती आहात.. नारीशक्ती ला सलाम..💐💐💐
    शिरीष आडके..लक्ष्मिपुरी शाखा

    उत्तर द्याहटवा
  8. बाप रे!तुझ्या लेखातील शब्दांची श्रीमती पाहिली की मला धाप लागायची बाकी असते !काय ती एखाद्या अखंड प्रपातासारखी वेग घेणारी भाषा,काय ते हलके फुलके प्रसंगनिष्ठ विनोद, काय ते बारीकसारीक गोष्टींचे तीव्र निरीक्षण, कशाकशाचे कौतुक करू मी ,खरचं भारावल्यासारखे झाले गं !एखाद्या अनुभवसिद्ध, श्रेष्ठ, प्रथितयश लेखकांसारखी लेखणी चालवलीस !लेख संपूच नये असे वाटणे हे त्या लेखकाच्या लेखनकलेच यश असते नेमके तेच तुझ्या बाबतीत झाले आहे .किती सुंदर किस्से, वाचताना छान करमणुक झाली .असेच आणखी अनुभव लिही लोकांना नक्की आवडतील !
    All the best !!👍🏻👍🏻🙏🏻🌹
    मनिषा कुलकर्णी -दुबई

    उत्तर द्याहटवा
  9. मॅडम, सुंदर लिखाण. तुम्ही सुरुवातीला व्यक्त झालात की, मी कला शाखेचा आवडता भाग सोडून इकडे आले आणि न्यु इंडियाचीच झाले. माणसाचं कर्तृत्व यातचं असतं की, हा आपला प्रांत नाही म्हणायचं आणि सिद्ध करून दाखवायचं. सुंदर .. अप्रतिम..

    उत्तर द्याहटवा
  10. सुरेख. अप्रतिम..
    कथा, कविता, लेख लिहायचं सोडून तुमचं न्यु इंडियात येणं हे ज्याना तुम्ही घडवतायं त्यांच्या पथ्यावर पडलयं. सहज आणि सोप्या भाषेत तुम्ही ट्रेनिंग सेंटर सजवलयं. विविध व्यक्तीरेखा मांडत असताना त्यांचे व्यक्तीगुण देखील तुम्ही व्यक्त केलेत. त्या गुणांची एकत्र यादी करून एकेका गुणावर जरी लेखन केलेत तरी सुरुवातीला लेखनाचा व्यक्त केलेला तुमचा मानस पूर्ण होइल असे वाटते. सुंदर ब्लॉग...
    अरविंद कुलकर्णी इचलकरंजी

    उत्तर द्याहटवा
  11. सुप्रभात मास्तरीणबाई 🙏☺️😄

    लेख भारी झाला आहे. अनुभव मजेशीरपणे मांडले आहेत. वाचायला मजा आली. ज्ञानात भर पडली.

    एका बाजूने बघितलं तर हे मेंढरं गोळा करायचं आणि हाकायचं असं हे कटकटीचं काम. पण मास्तरीनबाईंच्या कौशल्यामुळे रंजक आणि माणसं घडवणारे झाल्याचे दिसत आहे.



    ....आपल्या या मास्तरणीला नुसतं शिकवायलाच नाही तर उत्तम लिहायलाही येते. ब्लाॕग आवर्जून वाचा. 🙏☺️😄
    जीवन बोडके..कोल्हापूर

    उत्तर द्याहटवा
  12. हा रुक्ष विषय ही तुमच्या दिलखुलास शैलीत चांगला खुलवलात. एजंट्स तयार करणे हे सुद्धा तुमचं New India साठी खुप महत्वाचं contribution आहे. 👍
    शिरीष कोटीभास्कर

    उत्तर द्याहटवा
  13. जोशी मँडम,
    आपल्यातला कला गुणांचा व्यासंग पाहता, न्यू ईंडियाने दिलेली ही जबाबदारी योग्यच आहे. शिक्षिकेचा धाक व त्याला मात्रृत्वाची झालर, यांनी कंपनीचे भावी शिलेदार
    घडतील यात शंका नाही.
    By the way, पाटलांच कौतुक भारीच.
    मन:पूर्वक शुभेच्छा.
    यश आपलेच आहे.
    .. .. .. .. R N Patil...again Patil

    उत्तर द्याहटवा

  14. मॅडम अत्यंत सुंदर ATC च्या कामकाजाचे सुरवाती पासून शेवट पर्यंत शब्दांकन येवढे किस्से लक्षात कसे राहतात व ते सुंदर व विनोदी भाषेत मांडणे हे कसबी लेखकाचे काम आहे व ते तुम्ही चांगलेच अत्मसाद केले आहे. मी या सर्वाचा अनुभव नासिक ATC त घेतला आहे त्यांचीच आठवण करून दिली.
    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  15. कुंदा पाटील, बदलापूर
    श्री अग काय अप्रतिम लेख लिहिला आहेस👌👌तुझी आदर्श शिक्षिका होण्याचं स्वप्न न्यू इंडिया ने पूर्ण केलं शेवटी बालपणीच तुझ्या मनात जी सुप्त दडलेली एक चांगली इच्छा शक्ती आणि स्वप्न होते ते या ना त्या प्रकारे पूर्ण झाले.आता खरं तर आमचेही बँकेचे ट्रेनिंग असते पण इतके विनोद आणि विविधतेने नटलेलं नसतं शेवटी स्टाफ च ट्रेनिंग म्हटलं की रुक्षच असणार 😜 तर असो तुझ्या ट्रेनिंग सेंटर चे छान छान किस्से, हलके फुलके वातावरण निर्मिती, जेवणाचा स्वाद याचे तू इतके सुंदर वर्णन केले आहेस की मलाच आता तुला भेटण्यासाठी ट्रेनिंग सेंटर ला नाव नोंदवून यावे असे वाटते 👌👍 श्री अग तू आदर्श शिक्षिका तर आहेसच पण 'श्रेष्ठ'आणि ' BEST' 👍लेखिका पण आहेस तुझी लेखणी अशीच अविरत चालू राहो हीच प्रार्थना. तुला पुढील लेखासाठी " शुभेच्छा " 👍 " All The Best "
    कुंदा पाटील, बदलापूर

    उत्तर द्याहटवा
  16. ✌✌✌
    Chanacha ...aple anubhava sunder mandlaya. Mala apana trg.centre chalavita he Kalpana navata.klp la training centre kadhi chalu klelel ahe he attach mahit zala. Amhi training la Ali asato mhanaje mala tumhala aayakayala milala asata .think ahe sunder lihilela kahitumache Vidyarthi sunder appreciate klelel vachoon khoop bare vatale .Amhi pan trg la yava ASE vatulagaleya .😁😊😁 Pravesh milel ka???

    R.B.Tophkhane Belgavi

    उत्तर द्याहटवा
  17. खूप छान Madam माझ्या डोळ्यासमोर मला Insurance शिकविणार्या प्रेमळ Madam उभ्या राहिल्या. Madam you really very good teacher and exellent writer.Your student,
    Dr Ranjit Patil

    उत्तर द्याहटवा
  18. प्रत्येकाच्या मनात कुठल्यातरी कोपर्यात लपलेले बालपण, धमालमजा , हळव्या आठवणी असे बरेच काही पुन्हा एकदा समोर घडत असल्याचा अनुभव येतो तुमचे लेख वाचताना. माता सरस्वती तुमच्यावर अशीच प्रसन्न राहो ही प्रार्थना. तुमचा विद्यार्थी रणजित पाटील

    उत्तर द्याहटवा
  19. जोशी मँडम आपण खुपच सुन्दररितिने एजंट ट्रेनिंगमध्ये वेगवेगळे अनुभव व मनोगत या लेखात मांडलेले आहेत. या मध्ये 18 ते 75 वयोगटातील विदयार्थाना शिकवणे हे कोणत्याच college अथवा university मध्ये नाही, ते तुम्ही न्यु इंडिया मध्ये शीकवले आहे. हे तुमचे मोठे भाग्यच आहे. आजपर्यन्तच्या सर्व एजंटाचे नक्कीच तुमचेवर आशिर्वादचा वर्षाव हा राहणारच आहे. असेच आपण येथून पुढेही नविन एजेंट्स ट्रेनिग सातत्य देत रहावे हीच आपणास शुभेच्या ...💐
    महेश उरूणकर-लक्ष्मिपुरी शाखा

    उत्तर द्याहटवा
  20. मैडम मला परत परत ट्रेनि ग ला यावे असे वाटू लागले.आम्ही पाटील लोकांनी किती त्रास दिला हे खरेच आहे.तुम्ही आमचे आयुष्य घडवले,आणी काय बोलू,तुम्ही आदर्श आहात माझा.तेव्हा भाषण केल नाही.परत एकदा नमस्कार
    A.k.Patil

    उत्तर द्याहटवा
  21. Joshi Madam., आपल्या सेवा काळला छानच रुप देवून सुंदर साज चढवला फारच छान. P.m.kulkarni. nia.rtd

    उत्तर द्याहटवा
  22. सुंदर लेखन! सर्व साग्रसंगीत लिहिले आहे. एजंट घडवण्याचा प्रवास सुंदर रेखाटला आहे.

    उत्तर द्याहटवा
  23. हाडाच्या शिक्षिकेने स्वानुभव लिहावा असे लिखाण झाले आहे. सर्व साधारण विमा कंपनी मध्ये काम करत असताना शिक्षिका होणे व ट्रेनिंग देणे या परस्पर विरोधी भूमिका निभावणे सोपी गोष्ट नाही यात शंका नाही. एजंट ट्रेनिंग चे तपशीलवार वर्णन जे लिहिले आहेस ते वाचनाचा आनंद देऊन गेले. कोल्हापुरी लोकांचा रांगडेपणा जेवढा लिखाणात डोकावतो तितकाच त्यांचा प्रामाणिक प्रयत्न अभ्यासपूर्वक लिहिलेला जाणवतो. त्यांची खववयेगिरी 😀😀खासच. त्याचे वर्णन छान जमले आहे.मधून मधून कोल्हापुरी भाषेचा वापर लेखनाची शान वाढवतो.एजंटना जमवून त्यांचे ट्रेंनिंग घेऊन परीक्षा पास होण्यापर्यंत चा प्रवास विनोदी पद्धतीने रंगवल्यामुळे वाचनीय झाला आहे.विम्याच्या रुक्ष खेत्रात काम करूनसुद्धा विनोदबुद्धी जागृत ठेवलीस मानलं पाहिजे. एजंट ट्रेनिंग हा सुद्धा लेखनाचा विषय होवू शकतो याची कल्पना पण कोणी करणार नाही.ती तू प्रत्यक्षात लिहिलीस 👍👍

    उत्तर द्याहटवा
  24. Mrs. Nilima Kapse.

    मुजावरजी,शेअर केल्याबद्दल प्रथम धन्यवाद. विजयश्री जोशींचा लेख अत्युत्कृष्ट आहे. एकेक विमा एजंट घडवतात काय काय दिव्ये करावी लागतात ट्रेनिंग सेंटरला ते अगदी पटले. विमा क्षेत्राविषयी संपूर्ण अनभिज्ञ विविध क्षेत्रातील, वयोगटातील व्यक्तिंना ट्रेनिंग देऊन न्यु इंडीयाचा एजंट बनवणे हे अवघड काम असते. आणि अनेक अनुभवी शिक्षक,ट्रेनिंग सेंटर चे प्रिन्सिपल यशस्वीपणे पार पाडतात.
    असे प्रशिक्षित एजंट्स जेव्हा भरपूर बिझिनेस आणतात, स्वतः ची आणि ब्रांच / डीव्हीजन आँफिसची प्रगती करतात,बक्षिसे मिळवतात,सी एम् डी क्लब मेंबर्स बनतात तेव्हा खूप आनंद व अभिमान वाटतो या ट्रेनिंग अँक्टिव्हिटीचा.आणि असे ट्रेनिंग देणार्या न्यु इंडीयन्सचा.
    💐💐

    उत्तर द्याहटवा
  25. Mrs. Asha Paranjape.

    फार उत्साही आहे विजयश्री जोशी.एजंट मॅनेजर म्हणून खूप मनापासून काम करायची . तिच्या ऑफिसच्या एजंटची छान काळजी घ्यायचीच..पण कोल्हापूर च्या कुठल्याही एजंट चे प्रॉब्लेम छान handle करायची..तिची ही उत्कृष्ट लेखनाची कला आत्ता कळली..👏👏

    उत्तर द्याहटवा
  26. superb write up. she deserves special congrats. your lecture has been appreciated in prrfect words. Proud feeling. pls convey my regards to Joshi mam. Her write up made anybody feel as if one was personally attending the training. What a lucid language.
    Riyaj Mujawar

    उत्तर द्याहटवा
  27. जोशी मॅडम, अतिशय सुंदर लेख लिहला आहे, वाचून trainning period आठवले.
    Thanks for your suuport all time.👍🏼

    👍🏼सूभाष जाधव

    उत्तर द्याहटवा
  28. मँडम
    नमस्कार..🙏🙏
    तुम्ही शिकवलेल्या प्ल्यान इतर माहिती आम्हाला भविष्यात घडणाऱ्या गोष्टी व तुम्ही कोणत्या प्रकारे काम करायचं याचे.नसांगता येणारे तुम्ही ज्ञान दिले.
    तुमच्या ३३ वर्षे सेवेतुन भरपूर शिकवले
    अनिल

    उत्तर द्याहटवा
  29. jgd."एजंट ट्रेनिंग ह सेंटर"चा अपरोक्षअनुभव लेखभर चमचमीत स्वादाने दरवळत आहे. प्राध्यापिका म्हणून आॅंग्ल साहित्यात रमणारी व विद्यार्थीवर्गाला रमवणारी एक राजहंसी म्हणून वावरायला हवी ,अशी क्षमता असताना एक कशी ट्रेनर "मास्तरीण" झाली याची ही कहाणी मजेशीर आहे. जीवनात कधी कधी "कहाॅं जा रहे थे ।मगर कहाॅं आ गये हम।" असे होवून जाते.वाट चुकली तरी शेवटी राजरस्त्यावर नसेल पण आडवाटेने "शिक्षकी" मंझिलवर पावले पोहोचली. साहित्यसरोवरात संचार करुन रसिक जिज्ञासुना साहित्यिक आनंदाचा मोतीचारा द्यायच्याऐवजी खर्डेघाशीच्या मैदानात उतरावे लागले पण त्या निमित्ताने अनेकांचा उदरनिर्वाहाचा व्यवहारी प्रश्न सोडवत सामाजिक बांधिलकी जोपता आली,हे ही नसे थोडके!मला अजून न सूटलेले कोडे हे की ललितक्षेत्रात रमणार्‍या ललनानांना "गणिती आकड्यांशी "मैत्री कशी साधता येते? डोक्यातले वाकडे आकडे आवडता आवडता गणाती आकड्यांचा लळा कसा लागतो? शकुंतलादेवीच्या वारसदार हव्याच ना?एरव्ही विमा हीच कल्पनाच मजेशीर वाटते. न्यु इंडिया विमा कंपनीचे ब्रीद व कार्य याविषयी माझे ज्ञान यथातथाच! पण गीतेतल्या भगवान श्री कृष्णाच्या आवेशात LIC जेव्हां "योगक्षेमं वहाम्यहं" सांगते व नसणार्‍या गोष्टीची प्राप्ती हा योग व मिळालेल्या मिळकतीचे संरक्षण करण्याचे आश्वासन भगवद्गभुमिके वरुन कसे देते?भगवंताचा LIC अधुनिक अवतार आहे का? तसा LICचा माझा अनुभव कटुच आहे. असो! पण तुझ्या कंंपनीचे मिशन चांगले असावे!हे लेखावरुन वाटते. बालजगतात रमणारी शिक्षिका ही वेगळीच! पण प्रौढ साक्षरतेच्या वर्गाचे अनुभव भन्नाट! ट्रेनिंग सेंटरचे ट्रेनीजचे अनुभव म्हणजे खास मासलेच! भोजनप्रियताही ज्ञामलालसेवरही मात करणारी! लक्षात राहते ती भोजनाची चवच! कुंभकर्णाचे प्रियेचा विद्यार्थ्यांवर व कीर्तनरसिकांवरचा अम्मल वर्णन करावा तेवढा थोडाच। प्रौढ नरनारींचे प्रशिक्षणकालातील प्रश्न हा संशोधनाचा विषय आहे. संसारी बापयगडी व लेकुरवाळ्या आयांचे वर्गात असणे ,हे नमूनेच चिंतनीय! अशाना हाताळणारे धन्यच!शेवटी तू "मास्तरीण" व्हायचा अनूभव घेतलास पण त्यातले आपूलकीचे व आव्हानांचे क्षणटिपले आहेस व या निमित्ताने जोडलेले ऋणानूबंधही तेवढेच ह्रद्य,तूझ्यातली "आई" त्यानाही कळाली.हे सन्मानपत्र व पारितोषिक!पडली जबाबदारी पेललीस.छंद व व्यवसाय यांचा संयोग आनंददायी, पण तसे घडेलच असे नाही. पण "जे जे दैवे दिधले हाती।हिरे कोळसेअथवा माती। त्यातून घडवू त्याच्या स्वप्नमुर्तीचा विकास।आम्हांला चिरंतनाचा ध्यास।"( कवी बा.भ.बोरकर)या न्यायाने घेतले व्रत टाकले नाहीस ,त्याची मधुरफळे चाखत आहेस. साहित्यप्रेमाची हौस आहे.ती लेखाद्वारे तृप्ती देत आहे. सुरस व मनोहारी लेख, हे सिंहावलोकन आनंदाचीशिदोरी. अभिनंदन!💐💐💐👌👌
    शेटे सर..सागाव

    उत्तर द्याहटवा
  30. Thank you so much everyone!!
    It is becoming hard to thank everyone individually but I always read all these comments and they inspire me a lot.

    Please keep writing these reviews. :) And I promise you I'll manage things better and reply to every comment!

    उत्तर द्याहटवा
  31. Madam surekh lekhan,Abhiman vatava ase shikshakache kam tumhi kele ahe,khaokhar tumhi professorach honar hota pan amche New India che bhagyaki apan amhala training centerla aplya New Indiachi agent maphat businesschi bharbharat keli.tumhi kelele jevnache varnan,lahan bal gheun aleli mahila,apratim khare mudde sangitle ahet.Ajun tumhi ashach prakarche navin agent ghadvnar yat tilmatra shanka nahi.Agent training officer mhanun tumhi ethunpudhehi asech agent nirman karun aple New India chi busineschi bharbhrat hovo,Madam pudhil lekhas hardik shubhechha

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you so much J.P.Sangrulkar. Agadi sundar ani motivating comment!! 😃

      Asech vachun abhipraay kalawat raha. Tyatunach mala pucdhache lekh lihayla urja milte.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -