गो गो गोवा..

खमंग जिभेचे चोचले !

Indian non veg recipes includes chicken starters, fish starters, chicken and mutton biryani recipes, chicken 65, chili chicken, biryani and many


बाईsss तुम्ही मनानं लै निर्मळ 

           पण जिभेनं लै फटकळ 

           खरं का खोटं ????

वासुदेव/नंदीवाला बोलला की बाई नाईलाजाने हो हो करत मान डोलावे 😃 मग तो दुसऱ्या बाईकडे वळून म्हणे…

बाईsss तुम्ही मात्र जिभेने लै गोड

           पण  हातच्या लै जड 

           खरं का खोटं ????

या असल्या बोलावर ती उष्ट्या हाताने कावळा न हाकणारी बाई हो हो करत 😂 मान  डोलावल्यावर आमचा बालचमू चकीत होत असे. यांच्या जिभेच्या या कलागती याने कशा ओळखल्या? … त्याला कसं समजलं ? ...

अगदी नकळत्या वयापासून अगदी जन्मापासून म्हणा मला या जिभेने बुचकळ्यात पाडले आहे. आता आयुष्याच्या उत्तरार्धात सांगोपांग विचार करताना बरीच गृहितके लक्षात आली, मग तुम्हाला मजेशीर अनुभव सांगून जागतिक जिव्हा आरोग्य वाढवता येईल का पाहावे असा  विचार मनी आला. लेखणीतून चवचाल चिनी जीभ सुधारता आली तर किती बरे… 😉 असे ही एक दिवा-स्वप्न! यांचे असल्या चित्र-विचित्र बीभत्स रसनेचे चोचले पाहून, ऐकून आणि त्याचे जागतिक परिमाण पाहून दमले आणि लेख लिहायला बसले!


           " सुनबाई, जरा लिंबाचं लोणचं वाढतेस का गं ? जिभेला मेली चव म्हणून नाहीsss" असं म्हणत सासूबाई चटक-मटक करत लोणच्याची फोड चाटतात. जिभेवर मेथी, हिंगाचा मस्त स्वाद आला की डोळे मिटून घेत त्यांची भाव-समाधी लागते. सासरे बुवा "बरं का आज मी फक्त मुगाची खिचडी खाईन म्हणतोsss"... असे लाडक्या सूनबाईंना सांगतात. मग काय, त्या बरोबर तोंडी लावायला भरली मिरची, पापड आणि छानशी कढी नको का? सगळा बेत कसा फर्मास जमला पाहिजे. 😊 कधी मुलं आईला धो-धो पावसात कांदाभजीची फर्माइश करतात, तर लहान मुलं कुरुम कुरुम करत वेफर्स आवडीने मटकावतात. जेवणाचं ताटसुद्धा कसं साग्रसंगीत हिरव्यागार केळीच्या पानावर इवलीशी पोपटी चटणी, पिवळा लिंबू, हिरवंट/लालसर भाजी, पिवळंधमक वरण, पांढरा शुभ्र अंबेमोहराचा भात, वर कणीदार तूप असे नेत्र सुखद असले की वासाने भुकेल्या जिभेला पाणी सुटायलाच हवं. भरल्या पानावर बसलं की रंग-गंधांनी आजच्यासारखं उद्या मिळो ही प्रार्थना ओठावर यायलाच हवी. ज्याची या परब्रम्हा समोर ब्रह्मानंदी टाळी लागते तोच खरा रसिक जिव्हा प्रेमी! 😉


जीभ हा एवढासा टिचभर अवयव, याला सौंदर्याचे कोणतेच निकष लागू पडत नाहीत. बघावं तेंव्हा दात रूपी भक्षक टोळीच्या कडेकोट बंदोबस्तात बंद असते (कधी कवळीच्या 😂). जिभेचं जाहीर प्रदर्शन निषिद्धच मानतो आपण, उगीच कोणी कोणाला जीभ दाखवत नाही. याला अपवाद डॉक्टरचा तो मात्र सगळ्यांच्या 'आss' वासून वेडावलेल्या विनोदी जिभा आवर्जून  पाहतो. अजून जीभ स्पेशालिस्ट ही पदवी अजून कशी अस्तित्त्वात आली नाही याचं नवल वाटतं. इतर प्राणी जीभ फारशी दाखवत नाहीत, फक्त  मनीमाऊ मात्र जिभळीने कायम अंग चाटत बसलेली दिसते. हे मार्जारकुलीन प्राणी जिभेने बछड्याना चाटून माया व्यक्त करत त्याना छान साफही करून टाकतात. यांचे अनुकरण करून काही वेळा मनुष्य प्राणी चाटायचा वसा घेतात आणि नको त्याच्या मागे जातात असे ऐकीवात आहे. नागीण नृत्य सोडता माणसाच्या जिभेचे जाहीर प्रदर्शन फारसे पाहायला मिळत नाही, पण आपल्या कर्तृत्वाने माणसाला नाचवायला हिचा आकार कुठेही आड येत नाही. ‘माणूस टिचभर जिभेच्या तालावर नाचतो’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गोड खाल्लं तर तोंड गोडमिट्ट झालं म्हणून परत तिखट खायचं आणि ते तिखटाने  परत जीभ भाजली म्हणून परत  तिला गोडाचा सुग्रास घास चाटवायचा. तिखट लागले म्हणून कोणीही हिला कडू कारली चाटवत नाही. या जिभेचे कशानेच समाधान म्हणून होत नाही, सारखा आपला तिला ‘चवीत बदल’ हवाच असतो. गोड- खारे- तिखट- गोड आणि मग किंचीत आंबट  असे पाठोपाठ हिचे बालहट्ट पुरवायचे … अन्यथा ती रुसून तिला ‘पाबळी’ येते आणि आयुष्यात अर्थ नाही असा साक्षात्कार होतो. 😃


Indian cuisine consists of a variety of regional and traditional cuisines native to the Indian subcontinent.

या जिभेवर सहा प्रकारच्या रुची कलिका असतात म्हणे त्यांची सगळी करामत असते असे शास्त्र सांगते. पण इथे ती लाखो चवी नीट ओळखून हे संशोधन अपुरे असल्याचे सिद्ध करते. 'पुरण पोळी करावी ती आईनेच!.. मस्त  जिभेवर विरघळते..' असे लाडक्या पत्नी समोर  म्हणून तर पहा, नाही तिने तिच्या जिभेचा हिसका दाखवला तर तुम्ही नशीबवान! 😉 जीभ मिठाला जागून तिला कोणी काय चाटवून तृप्त केले होते ते बरोब्बर लक्षात ठेवते… आणि शत्रू पक्षाच्या फसलेल्या पदार्थाची चव तर आमरण विसरत नाही, कथा सांगत फिरते... म्हणजे हिची स्मरणशक्तीही अफाट असते. इतर सगळेच प्राणी ‘उदरभरण नोहे, जाणी जे यज्ञकर्म’ म्हणत उदर भरतात. ‘आज हिरवा चारा मिळाला बुवा...वा !!..वाळका कडबा खाऊन कंटाळलो होतो’ असं कुणी बैलोबा बोलल्याचे ऐकिवात नाही किंवा चेहेऱ्यावर तशी खुषी दर्शवत नाही. चिमणी तांदूळ, कणी खाता खाता कधीतरी पोळीचा तुकडा खाऊन पोट भरते. साळुंकी, कावळा, कबुतरे तर अगदी वाट्टेल ते खातात, पण पोपटाला मात्र दिसेल तर खात सुटलेले पाहिले नाही. रावा पेरू, फळे, मिरची असे श्रीमंती उच्चप्रतीचे खाणे खाऊन जिव्हा तृप्ती  करतो. सगळे प्राणी विना तक्रार आपापला ठरलेला आहार गुपचूप खातात. माणसाची जीभ मात्र सगळ्यात चावट आहे, सारखी ‘डिमांडिंग’ असते ती. म्हणूनच दात हिला अधूनमधून शिक्षा करून चिमटे काढून, चावून जखमी करून वळणावर आणायला बघतात. कधी गर्रम गर्रम चहा हावरटपणे पिताना हिच्या जिवाला चटका बसतो पण हिच्यात सुधारणा नाहीच! आपलेच दात आणि आपलीच जीभ, 😁 सांगता कोणाला??? बरी झाली की काहीतरी मागणारच. सगळ्या साधू-संतांनी कानीकपाळी ओरडून ‘जिभेला जिंका, जिभेला जिंका’ हाच संदेश दिला. समर्थांनी तर हिला जिंकायलाअन्न धुवून खाल्ले. पण ही हट्टी बया आपले काही अजिबात ऐकत नाही आणि ‘अजिंक्य’ बनून मनाच्या नाकावर टिच्चून स्वतःचे लाड पुरवून घेते आणि  इतर सगळ्या इंद्रियांवर हुकूमत गाजवते. 😃


शाकाहारी लोकांच्या जिभेला षड-रसांची गरज असते आणि पुराण काळापासून या समतोल भोजनाचा मोठ्या आनंदाने ते आस्वाद घेत आहेत. त्यांनी असंख्य चवी या रसनेस दाखवून तिला जागृत ठेवले आहे. खमंग राजस पक्वान्नांनी खचाखच भरलेली पेशवाई थाळी याचे उत्तम उदाहरण आहे. मांसाहारी जिभेस मात्र वेगळ्या झणझणीत चवीची चटक असते. कधी हिच्या मालकाला श्रावण पाळायची हुक्की येते, मग हिचे हाल कुत्रे खात नाही.😂 ‘श्रावण पाळला’ म्हणजे जणूकाही अन्नत्यागच केला या सात्विक    अविर्भावात हे लोक गणपतीपर्यंत वावरतात. हे लादून घेतलेले शाकाहारी व्रत आणि जोडीला वाढविलेल्या दाढीमुळे ते आयुष्यातून उठल्या सारखे दिसू लागतात. शेवटी तर सर्वसंग परित्याग केलेल्या योग्यासारखे ऋषीमुनींचे तेज यांच्या चेहेऱ्यावर विलसू लागते. गणपती विसर्जन झालं रे झालं की कधी एकदा ‘सामिष’ आहार घरी येतो असे होऊन जाते. यांच्या आदर्श गृहिणी सगळ्यांच्या जिभेला झिलई चढवायला मसाले, वाटण आणि बाकीची जय्यत तयारी करतात आणि घरोघरी रस्से रट-रट शिजून गल्लीभर परिमळ सोडू लागतात. महिन्याभराच्या निग्रहाने तांबडा-पांढरा रस्सा भुरकला की जिभेला कसं ग्वाssड वाटतं. जिभेस आलेली पाबळी काढत माणूस गरमागरम रस्सा एकाग्र चित्ताने आणि सुहास्य वदनाने भुरकतो. श्रावण संपल्याचे पडघम वाजवायला झणझणीत तांबड्या रश्श्याचा उतारा लागतोच ! समाधानी जीभ मग तरतरीत होऊन चुरूचुरू बोलू लागते. 😃


Some ingredients commonly found in Indian dishes include: rice, wheat, ginger, green chillies and spices.

ही टीचभर जीभ आजारी माणसाचे हाल हाल करून सोडते त्यातलं  ‘गोड खाऊ नका’ हे पथ्य तर अगदी काळजाला घरं पाडतं. जोडीला ‘तळलेले- तेलकट टाळा, जास्ती मीठ मसालेदार नको, आंबट नको’ अशा पथ्याची वर्णी असेल तर 'या असल्या पुळचट जिंदगीचा काय उपयोग?' असा प्रश्न रसिक जिभेला पडतोच. आयुष्यातून उठल्या सारखे वाटू लागते. जे खायचे नसते तेच खवळलेली जीभ खा-खा असे म्हणते ‘मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर’ अशी अवस्था होऊन जाते. मग रोग ‘वाढाय वाढाय’ झाला की भोगा आपल्या कर्माची फळं…. खरंतर हीच बया माणसाला नादाला लावून हे खा ते खा करत असते. ती कर्ता आणि माणूस कर्म होऊन जातो. तिच्याच हुकुमाचा ताबेदार होऊन जातो आणि विनाकारण रोगाला निमंत्रण देतो. अश्शी ही चावट जीभ वय वाढेल तसे आपले हाल करू लागते. त्या चिनी जीभेने सगळ्या मानव जातीला बट्टाच लावला आहे. अगदी  झुरळ, सापापासून वटवाघळापर्यंत कुणालाही चाटल्याशिवाय यांची जीभ थंड होतच नाही. 😨 जगतात जन्माला आलेले सगळे प्राणी यांच्या जिभेचे चोचले पुरवायालाच आहेत, असला समज झालाय यांचा. यांच्या मिचमिच्या नजरेतून काही म्हणून सुटेना. एवढे हिंदी सिनेमे 'जबान कौ लगाम दो' असे बजावतात, पण जगाला रोगाच्या खाईत लोटून हे मेले चिनी परत मेलेले वटवाघूळ जिभेने चाटायला आतूर! आता काय म्हणावे या चाटक्या जिभेस ??? 😓

नको का चांगली शिक्षा फर्मावायला ??


मानवी जिभेला फक्त चव चाखणे एवढे एकच काम नाही तर अखंड बोलून व्यक्त व्हायची extra curricular activity पण तिच्यावरच असते. एक बाई दिवसाला सरासरी १०००० शब्द बोलते आणि पुरुष २५०० असे एक संशोधन मधे वाचनात आले. लहानपणी आम्ही शाळेत इतकी अखंड वटवट करायचो की आमच्या बाईंनी आम्हाला ‘ए भोरड्यांनो  गप्प बसा’ असे ओरडायच्या. 😂 अलिकडे शिवाजी विद्यापीठात ‘भोरड्या’ हे खूप वटवट करत एका सुरात गाणारे, मस्त कलकल करत कसलेल्या वैमानिकासारखे मनोहारी कवायत करणारे भुरकट गुलाबी पक्षी पाहिले तेंव्हा थोरात बाईंची खूप आठवण झाली…   मनोमन पटले आणि मनसोक्त हसून घेतले. भोरड्या खरेच अगदी आमच्या सारख्याच अखंड वटवटत गोंगाट करत  होत्या! बाईंनी आम्हाला छानच उपमा दिलेली! एकूण काय तर जिभेला खाणे-बोलणे अशी सोळा तासांची फुल्ल ड्युटी असते, बिचारीला फक्त झोपेत काय ती विश्रांती. एवढे करूनही एखादी जीभ दमली भागली असे ऐकिवात नाही. बाका प्रसंग ओढवला तर ही जिव्हा अगदी आरामात जादा काम करून निभावू शकते, त्यातून ती बाईची असेल तर शंकाच नको! यासाठी  इंग्रजीत एक म्हण आहे God made woman beautiful, but he gave her tongue and spoiled everything. आमचे एक सर हे सुभाषित सारखं ऐकवायचे पण आम्ही काही असले ऐकून काणाडोळा करत जीभ चालवणे सुरुच ठेवत असू. काही वेळा सौम्य शिक्षा म्हणून उभे केले गेले तर पुढे पुढे वर्गाबाहेर जाण्याची वेळही आली… पण मूळ स्वभाव जाईना. 😂


Indian sweets and desserts, also called mithai, a significant element in Indian cuisine. Many Indian desserts are fried foods made with sugar, milk and saffron.

अशा या सर्वगुणसंपन्न जिभेला चिरतारुण्याचे वरदान लाभले आहे. वय वाढेल तसे केस पिकतात, डोळे-कान poor performance दाखवू लागतात, दात पडून तोंडात कवळी हसते, सारे अवयव गलितगात्र होतात. पण या जिव्हेची  life long employment असते… ही शेवटपर्यंत तरतरीत! हिला निवृत्ती नाहीच. वय वाढेल तशीतर ही जास्तीच खवळते… काहीही चवीला मागते आणि काहीही बोलते! वयस्कर माणसे हिच्याच बळावर दहा जणांना लोळवू शकतात. बोलणाऱ्या जिभेचे वय पाहून समोरचा चूप बसतो. 'उचलली जीभ लावली टाळ्याला' ही म्हण हिच्या सकल कलांचे पुरे प्रदर्शन करते. 😃


काही संगीत प्रेमी लोक हिला भलतीच ताब्यात ठेउन हिच्या जिवावर संगीत रागदारी सुद्धा वाजवतात! माझी सखी डॉ. विश्रब्धा पवार, नातलग प्रदीप उपाध्ये छंद म्हणून अप्रतिम गाणी, शास्त्रीय रागदारी वाजवून हिला अंकित करून ठेवतात. त्यासाठी ते जिव्हेस बरीच धारेवर धरत असावेत... तरीही अशी लोकांना श्रवणसुख देणारी रसना विरळाच, त्यासाठी भले ते तिला कितीही वेळ वेठीस धरोत. काही मोजक्या लोकांना ही वागेश्वरी देवी प्रसन्न होते जी मेंदूची आदन्या पालन करते. केवळ या लोकांना स्वामी विवेकानंद, प्रा. शिवाजीराव भोसले, अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज यांसारखे  अमोघ वक्तृत्व लाभते. यांची वाणी अजरामर असते म्हणूनच त्यांना वक्ता दशसहस्त्रेषु संबोधले जाते. या लोकांनीच जीभ जिंकली आणि तिचा उद्धार केला असे वाटते. 😊


Indian food is unimaginable without spices. Turmeric, cinnamon,  clove, cumin, mustard are some common examples.

      आपली सामान्य जीभ कधी हिचा लगाम सुटून कुणावर शब्दबाणांनी तुटून पडते, तर कधी घसरून काय वाट्टेल ते बोलून जाते. मग जन्मभर आपल्याला ‘अस्से  बोलला, तस्से बोलली’ करत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून, काळ्या पाण्याची शिक्षाही सोसावी लागते. जगातल्या सगळ्या कलहांना जिव्हा हेच कारण असते. कधी हिच जीभ नको नको ते  मागते… आणि आरोग्य बिघडवून टाकते. डॉक्टर म्हणतात 'जे जिभेस आवडते ते आरोग्यास वाईट....' जिव्हा हा अवयव शरीराच्या सत्तेत राहून विरोधीपक्षाचे काम  करतो की काय ?? असा प्रश्न पडतो. काहीही असो....तोंडात विरघळणाऱ्या भजीला, चमचमीत सुरमईला, उत्तम श्रीखंड-पुरीला, कोल्हापुरी तर्रीदार मिसळीला, मटणाच्या रश्श्याला हिच्याशिवाय दाद  द्यावी कशी ??? ‘जीभ जिंकली त्याने जग जिंकले’ हे कितीही खरे असले तरी आवळे, चिंचा, कैरीच्या फोडी बघून जिला रस  सुटत नाही ही मुळी जिवंत रसना नाहीच. ‘खाण्यासाठी जन्म आपुला’ असे म्हणावे आणि मस्तपैकी सगळ्याचा आस्वाद घेऊन रसना तृप्त ठेवावी.. आणि  फटकळ वाणी जिंकून दे अशी देवाजीला करुणा भाकावी हे बरे! 😉

 

ही ब्लॉगपोस्ट वाचून जर तुम्ही रसना तृप्तीचे खमंग बेत आखलेत तरच तुम्ही जगण्यास लायक..... अन्यथा नरदेहाचे मोठे घबाड मिळूनही तुम्ही काय साधले??? 😉😂


विजयश्री तारे-जोशी

14.8.2020



टिप्पण्या

  1. जीभ हा सुद्धा लेखनाचा विषय ठरवलास छान.

    उत्तर द्याहटवा
  2. जीभ ..हा सुध्दा लेखनाचा विषय होऊ शकतो हे पाहून लेखकाची कल्पनाशक्ती काय काय विचार करू शकते ह्याची कल्पना या तुमच्या लेखावरून आली. खूप छान आणि चौफेर लिहिलंय.. तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम!!!

    उत्तर द्याहटवा
  3. नेहमीप्रमाणे खुपच छान👌👌👌जिभेला हाड नसत आणि तुझ्या लेखणीला सीमा नसतात हेच खरं. परत एकदा तुझं खूप खूप अभिनंदन💐💐💐👌👍

    उत्तर द्याहटवा
  4. देवा जोशी म्यमला उदंड आयुष्य लाभो व भरपूर लिखाण करून घेवो.

    उत्तर द्याहटवा
  5. काय गं बाई !या टिचभर जीभेवर अगदी प्रबंधही फिका पडेल असा अभ्यास केलास तरी कधी ?टिचभर जीभेने आम्हाला मात्र वावभर भारावायला भाग पाडले !खरच तुझे निरीक्षण,अभ्यास आणि सुरेख ओघवती भाषा हे पाहिल्यावर आणि जीभेचे माहीत असणारे पण फारसा विचार न केलेले सामर्थ्य पाहून भारावून गेले बघ 😃आणि जीभेबद्दल आणि तिचे महात्म्य लिहीणार्या लेखिकेबद्दल फारच अप्रुप वाटले किर्तनकाराचे किर्तन कसे रंगत जाते तसे जीभेचे वर्णन रंगत गेले व "अरे काय पराक्रमी आहे ही टिचभर रसना"असे वाटून तिच्यात असलेले दुर्गुण नजरेआड झाले !
    मनिषा कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  6. Apratim jibheche varnan madam,Tichbhar jibhechi kimaya kashi aste te barobar mandle ahe,tasech pakshat asun virodhi bhumika kashi hote he pan barobar mandle ahe.Abhinandan madam,asech lihit raha.

    उत्तर द्याहटवा
  7. नमस्कार मॕडम
    खूपच छान लिखाण आहे .
    आपल्या लेखन शैलीवर पु ल देशपांडे यांचा प्रभाव पदोपदी जाणवतो .
    आपले हे लेख केवळ blogspot पुरते मर्यादित न राहता पुस्तक रुपात प्रकाशित व्हायला हवेत अशी माझी मनोकामना आहे .
    Heartly best wishes.🙏🏻
    Dr Ranjit Patil

    उत्तर द्याहटवा
  8. चटकदार लेख! फक्त शाकाहारी असली तरी खाद्य पदार्थांची नावे वाचूनच जीभ खवळली! फेसबुकवर चाटकी जीभ संघटना नावाचा एक ग्रुप आहे,त्याचे संस्थापक एक जोशीच आहेत ते कोणत्या हॉटेल मध्ये कोणता पदार्थ चांगला मिळतो यावर लिहितात! लेख वाचून मजा आली, जीभ खवळली तर बोलवा असे लिहिले आहेस,तर काय खायला घालणार!😜😜😜
    मिलिंद

    उत्तर द्याहटवा
  9. जीभ हा विषय p hd la ठेवला तर हा ब्लॉग जसाचा तसा पास होईल खूपच छान पुष्पा सातपुते

    उत्तर द्याहटवा
  10. कुंदा पाटील, बदलापूर
    श्री पुन्हा एकदा तुला सलाम !!! या बत्तीस दातांच्या पडद्याआड दडलेल्या जिभेवर तू इतकं सुंदर लिहिलंस की बस...👌 तुझी निरीक्षण शक्ती, ओघवती आणि सहज सुंदर समजणारी भाषा शैली,याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच.तुझी कल्पनाशक्ती आणि जिभेच महात्म्य यांचा सुरेख संगम झाला आहे 👌जिभे बद्दल जरा अजून जास्तच जिव्हाळा 😜 वाटायला लागला. असं वाटतं तू असंच छान छान लिहीत रहावं आणि आम्ही वाचत रहावं. पुन्हा तुला पुढील लेखासाठी ' शुभेच्छा ' 👍 " All The Best "👍
    कुंदा पाटील, बदलापूर

    उत्तर द्याहटवा
  11. अग तुझ जिभेवर लिहलेले लिखान येकदम छान च होते
    तु। आमचा पण श्रावण मोडला तुझे ते मांसाहारी ताट बघुन😜👌👌👍🏻
    कला...

    उत्तर द्याहटवा
  12. मैडम...किती सुंदर लिहिता..तुमच्या शब्दा ना दृष्ट ना लागो...अगदी श्रवण संपायची वाट बघतो य
    तुमचे वाचून अजून बाभळीची जाणीव झाली..तो शब्द बाभळी असावा..तुम्हाला माहीत नसणार..हा हा हा...मी पाटील आहे..

    R.S.Patil

    उत्तर द्याहटवा
  13. आता माझी स ट क ली..अप्रतिम..मी जिभेवर असा लेख प्रथमच वाचला...काय विषय भरलेत डोक्यात...कमाल आहे..तुमचे थोडे डोके द्या आम्हाला..सरस्वती प्रसाद असाच मिळो
    रेखा पाटील

    उत्तर द्याहटवा
  14. Apratim ....ya lahanasha avayava var pan evadha lihu shakala ..kitichan...ani Sunder .
    .sarvabajune Chan amche shabda totake padatat..
    Ek Chinese proverb ahe tyache English rupantar ase "God has given two eyes to see more God has given two ears to listen more ..has given two hands to work more ..has given two legs to walk more but ..but God has given only one tounge to talk less n eat less ."
    Tondala Pani sutala ho atta kayatari chamchamit zalacha pahije ..tumhi hi alatar Anakin Chan .
    Great writer is in the making no doubt ..
    All the best ..Atta pudachi blog chi vat pahane hecha Kam .
    R B Tophakhane Belagavi .

    उत्तर द्याहटवा
  15. jgd."खमंग जिभेचे चोचले"वाचता वाचता तोंडाला का पाणी नाही सुटणार?चवदार लेख! खव्वयांसाठी पर्वणी! जे जन्मसिद्ध खव्वय्ये असतात ते जगण्यासाठी नव्हे ,खाण्यासाठीच जगत असतात? येरव्ही काय येते सोबत? "खावो!पियो! आराम करो!" "To eat , drink and be merry for torrow we die." असे चार्वाकसारखे जगणार्‍यासाठी "रसना" हीच रसिकता!रसनाप्रियासाठी खास अन्नपदार्थांची इतकी शब्दांकित रेलचेल केली आहेस की त्याना कधी ते पदार्थ खाऊ की गिळू व्हावे.सुगरण असल्याशिवाय असे बहारीचे वर्णन कसे जमावे? व्वा! भोजनभक्तांना इथे बरे वाटावे,असे बरेच काही शब्दांतून वाढले आहेस, अन्नपूर्णा जणू अवतरलीय!कोणा कोणाच्या चवीढवी कशा हे चांगलं समजलय तुला! गटारीत लोळून झाल्यावर अख्खा श्रावण ज्यांचेसाठी अग्निपरीक्षा असते अशा मांसाहार प्रेमीसाठी गौरी गणपतीपर्यंतची प्रतीक्षा केवढा विरहकाल असतो?पांडवांचा व रामाचा वनवासही बरा!त्या सामिषभक्तांची व्यथाही लेखात मांडली आहेस. एरव्ही प्रत्तेक विषयासाठी दोन दोन ज्ञानेंद्रिये देणार्‍या विधात्याने कंजूषपणा करुन एकच मुख स्वतः चतुर्मूख असता मानवास का दिले? हाही गंभीर चिकित्सेचा विषय आहे. शिवाय बोलणे व खाणे दोन कामे एका मूखावर सोपवणे केवढा अन्याय?एकीकडे रसास्वादाचे ज्ञानकार्य व बोलण्याचे कर्मेद्रियाचे असे दूहेरी काम! बिचार्‍याने डबल लोड कसा सहनकरावा?दोन तोंडे दिली असती तर कसा कसा तमाशा झाला असता ,हे ही विधाताच जाणे, मौन व मितभाषण हा साधकासाठी संयममार्ग असावा ,हा हेतू असेल.तोंडे वाढली असती तर त्याना खाद्य व बोलणारांची बेसुमार बडबड कशी आवरायची? त्यात निरर्थक बडबडण्यात पुरुषावरही मात करणार्‍या रणरागगिणींचे काय ?हाही प्रश्न आहेच. वायफळ बोलण्यातून होणारे कलह हा प्नश्न आहेच. बेताल बोलातून होणार्‍या भांडणांचा उल्लेखही आहेच. रसिकप्रिया जिव्हा तशी कलहप्रियाही आहे, सैल सुटलेली जीभ कसे घोटाळे घराघरात व जगात करते,हे सांगायला हवे?कलह कलियुगाची जननी आहे. घसरणारार्‍या शब्दांतून गृहयुद्धे व जागतिक युद्धेही झाली आहेत,दातांच्या पहार्‍यात अडकलेली जीभ म्हणते '" तूम बत्तीस मैं अकेली माय। जरा टेढी चलूं तो बत्तीस गोते खाय।" अशी ही जीभच वाणीची वाहिका बनून शारदेची दासी बनते तेव्हा दिव्य ज्ञानाचे अवतरण होते व साहित्याची उद्याने बहरतात.सारस्वताचे मळे फुलतात. संताची वाक्गंगा ओसंडून वाहू लागते. सरस्वती वक्त्यांचे जिभेवर अवतरली की दिव्य ज्ञान प्रकट होते, साहित्यिकांचे वाणीतून अक्षरगंगा धरतीवर उतरुन मानवाला संजीवनी मिळते. शिव्या आणि ओव्यांची जननी रसनाच आहे.रसना रसिकरंजनी व मनमोहिनीही आहे.रसनेनेचे हे नाना अवतार लेखात आले आहेत.ती बहूरुपिणी आहे ,बहुआयामी (multi diamentional ) आहे. शापिताही व वरदायिनी आहे. अशा जीभेचे खमंग चोचले ,चंचलत्व व शिवरुपही लेखात प्रकटले आहे. खुमासदार शैलीतून रंगलेलाृहा ललितावतार मनोहर आहे. अभिनंदन!💐💐💐
    शेटे सर..सागाव

    उत्तर द्याहटवा
  16. चावट जिभेवरचे आख्यान फार सुंदर रंगले आहे. वेगळ्या विषयावर लिहिण्याची तुझी कला वाखाण्यासारखी. टीचभर अवयवाचे वर्णन झकास. तिखट गोड लपाछपी छान. असं आपल्या बाबतीत पण घडत.भारताचे चित्र मस्त निवडलेस.जिभेला खाणे बोलणे ही १६ तासांची duty असते ही कल्पना आवडली. जिभेची लाईफ लाँग एम्प्लॉयमेंट 👍👍
    पदार्थांची किती नावे सहजपणे उपलब्ध करून दिली आहेस. जिभेची रसना तृप्त करून सोडलीस 👌👌
    मृदुला चिटणीस ..सानपाडा

    उत्तर द्याहटवा
  17. जिभेचे चोचले मस्त जमून आलंय. टीचभर अवयव पण कौतुक किती तिचे?आत्तापर्यंतच्या सगळ्या लेखात हा मला जास्त भावला. कदाचित आपला हा जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवाय महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती म्हणजे जगात1नंबर. खरंच आपला वरणभात तूप आणि लिंबू इतका चौरस आहार कुठेच नाही. यावरून1आठवलं. माझी आज्जी होती वडलांची आई तिने वाढलेले पान पण इतके बघण्यासारखे असायचे म्हणे. करणे तर अप्रतिम. मी तिला पाहिले पण नाही.पण ऐकलंय.
    माधुरी घाटे

    उत्तर द्याहटवा
  18. जया तू कोणत्याही विषयावर उत्तम लिहू शकतेस हे सिद्ध केलेस. एलढुशी ती जीभ पण किती चोचले तीचे. आणि तू इतके बारकावे दाखवतेस ना त्याचे खुप कौतुक वाटते. 😊👍👍

    उत्तर द्याहटवा
  19. ज या अजून बरेच प्रकार आहेत गं कानडी,खानदेशी,असे प्रांत टाकता येतिल..त्या साठी अजून एक भाग लिही..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -