गो गो गोवा..

मलकापूर कॉलेजचे मोकळे आकाश !

स्पर्धा गावी नसलेल्या खेड्यात अगदी साध्याशा दगडी इमारतीत आमचे कॉलेज होते. आता गावाबाहेर टेकडीच्या समोर, नदी किनारी गर्द वनराईत सुरेख कॉलेज बांधले आहे. आमच्या शिक्षक रुपी गुरूंनी,पालकांनी ज्ञानाचं मोकळं आकाश आम्हाला दाखवलं हे आमचं परम भाग्यच. त्यांच्यामुळेच अनंत आकाशात स्वछंदीपणे विहरताना आयुष्याच्या अलौकिक रंगांची उधळण अनुभवता आली आणि मी उच्चशिक्षणासाठी कोल्हापूरला जायला सिद्ध झाले. साध्या बाळबोध मलकापूरने, तिथल्या शिक्षणाने जीवनाकडे पहायची ही सुंदर निकोप दृष्टी दिली आहे. खरंच जननी आणि जन्मभूमी ती स्वर्गाहून महान. 🌄

दहा वर्षे युनिफॉर्मचा निळा स्कर्ट घालून घालून एकच रंग बघून अगदी कंटाळा आला होता. डोळे बाकीचे रंग ओळखायला विसरतील का काय असे वाटायला लागलेले.😅 बोर्डाची परिक्षा झाली, आता कॉलेजमध्ये युनिफॉर्म लागणार नाही याचा अत्यानंद झाला. करड्या शिस्तीत सगळ्या गुरुजनांनी महाकष्टाने आमची अत्रंगी डोकी सरळ करून सोडली होती. दहावीपर्यंत career confusion काय असतं हे गावीच नव्हतं. कोकरू वाट चुकायचा संबंधच नव्हता. कधी लुसलुशीत हिरवा चारा चारवत तर कधी छडीचा धाक दाखवत गुरुजन कोकरांचे कळप पुढच्या वर्गात ढकलत होते. करिअर, जीवघेणी स्पर्धा असले काही कुणाच्या गावी नव्हतं. मुले पायावर उभी रहावीत हीच काय ती माफक अपेक्षा. मुलींना तर फारच मुभा होती. नसेल एखादीला शिक्षणात गती, तर तिने उगाच ओढून ताणून शिकायलाच पाहिजे ही सक्ती नसे. अशा मुली मग खुशाल छान घरकामाचे, उत्तम भावी गृहिणी होण्याचे प्रशिक्षण आई-आज्जी कडून सुरू करत. यांचे आदर्श पालक अभिमानाने या गृहकृत्यदक्ष मुलींना लवकर उजवून टाकायची तयारी सुरू करत. त्यांच्या करिअरचे कुण्णाला काही पडले नव्हते. मुलांना मात्र या अशा सर्वगुण संपन्न गृहिणी आणि पुढे होणारी लेकरं-बाळं पोसण्यासाठी लवकर पायावर उभे रहाण्याची जणू सक्तीच होती. एकूण काय तर मुलींचे शिक्षण म्हणजे गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली या प्रकारात मोडत होते. फार मेहनती मुली शिक्षिका वगैरे होऊन करिअर घडवत असत. हसत खेळत शालेय जीवनाचे ते मयुरपंखी दिवस संपले. आयुष्यातले निखळ सुखाचे सुंदर दिवस फार लवकर संपले अशी जिवाला चुटपुट लागली. बोर्डाला चांगले मार्क्स मिळालेल्या आम्हा वेचक मुलींना पुढे शिकवून गाजराची पुंगी वाजवून पाहू असे काही पालकांनी ठरवले. बाकीच्या बिचाऱ्या कामसू मुली 'गृहकृत्यदक्ष' पदवी मिळवायला आनंदाने राजी झाल्या, कारण त्यांना लवकरात लवकर उत्तम गृहलक्ष्मी व्हायचे होते. त्या काळी 'नॉन-मैट्रिक' अशी पदवीही लग्न करताना फार उपयोगी पडे. काही दूरदर्शी पालक मुलींना मैट्रिकचा भोजा शिवायला लावून, उत्तम स्थळी या उच्च शिक्षित मुलीचे लग्न लावून देत. 😅

         एवढ्याशा  छोट्या खेड्यात नुसते मुलांना शिकवू म्हणून भागत नाही तर कोणती शाखा हा यक्षप्रश्न असतोच. काही लोक मुलांना कोल्हापूरला शिक्षण घेण्यासाठी पाठवत होते. आमच्या समस्त खानदानात व्यवहार, नफा-तोटा असले शब्द औषधाला नव्हते. 📉 सगळे धंदे तोट्यातच जायचे त्यामुळे जेनेटिकली मला वाणिज्य शाखेत काडी इतका रस नव्हता आणि घेऊन उपयोगही नव्हता. "सगळ्या कला हे भिकेचे डोहाळे असतात, मुळीच कुठल्या कलेत वेळ दवडू नको" हे वाक्य आमच्या मामाश्रीनी जन्मापासून मनावर असे बिंबवले होते की चित्र काढताना सुद्धा देवळासमोर काढतोय, लोक पैसे टाकत आहेत असे दारूण चित्र नजरे समोर येई!🙈 या कारणास्तव कला शाखेला जाणे पटणारे नव्हते. सायन्स साईड घ्यावी का असा प्रश्न पडला. मलकापूर मध्ये प्रश्न कोणताही असो त्याचं उत्तर फक्त आणि फक्त अप्पा जोशीकाकाच सांगत. त्या मुळे मला कोणत्या शाखेत गती, यश मिळेल हे फक्त अप्पांच्या शब्दावर ठरणार होते. अप्पा जोशी म्हणजे किंचीत स्थूल भारदस्त देहयष्टी, गौर गुलाबी वर्ण, पिंगट विशाल डोळे, मुखावर विलसणारे दैवी विद्वत्तेचे तेज, अस्ख्लीत शुध्द वाणी आणि भिमसेनी तरीही अत्यंत मुलायम असा आवाज लाभलेले मलकापूरचे उत्तुंग व्यक्तिमत्व. वाणी इतकी श्रवणीय की ऐकतच रहावी असे वाटे. नजरेचा धाक असा की कोणाचीही नजर खाली झुकणारच. लगेच माझ्या बाबांनी मला दंडाला पकडून ‘अप्पा जोशी’ यांचे घर गाठले. अप्पा माझ्या बाबांचे शाळूसोबती दोघंही एकत्र वाढलेले, त्यामुळे आमच्या आयुष्याचे बरेच महत्वाचे निर्णय घेण्याची मुभा अप्पांना असे. गावातल्या सगळ्यांच्या मुला-माणसांना योग्य दिशा देण्याचे काम त्यांनी केले. अप्पा एक विद्वान दशग्रंथी ब्राह्मण आणि त्यांचा ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास होता. वाचासिद्धी अशी त्यांनी बोललेला शब्दं शब्द खरा व्हायचा. त्यामुळे घराचा पाया, लग्न अशा सगळ्यासाठी लोक अप्पांना विचारूनच कार्याचा श्री गणेशा करायचे. त्यांच्या मुखी देव बोले आणि कार्य नीट सिद्धीस जाई. त्या काळी विद्यार्थ्यांची ‘कल चाचणी’ घेण्याची पद्धत नसल्याने सगळ्या गावच्या नामी मुलांचा कल अप्पा बरोबर ओळखायचे. त्यांनी दिशा दाखवली की निमूट पुढे जावे यश हमखास मिळणारच. माझे मार्क चांगले असल्याने अप्पानी भारदस्त शैलीत 'हिला सायन्सला टाका'असे सांगितले. नमस्कार करताच मलाच पेढे देऊन छानसा आशिर्वादही दिला. त्या काळी हुशार मुले सायन्सला जात म्हणून उगीच आपल्याला हुशारीची शिंगे फुटलीत, ती अप्पांना बरोब्बर दिसलीत अस्से वाटले. खुष होऊन पळत घरी आले. 😃

अशा रितीने मार्कांनी नाही तर केवळ अप्पांच्या सल्ल्याने माझी रवानगी ज्युनिअर कॉलेज मलकापूर येथे सायन्स साइडला झाली. कॉलेजचे प्राचार्य बोरगावे सरांना पाहून सायन्सची भिती कमी झाली. बोरगावे सर म्हणजे अखंड चैतन्याचा खळाळता निर्झर. हसतमुख, प्रसन्नवदनी, दिलखुलास व्यक्तिमत्व. त्यांचा आश्वासक चेहरा पाहून  कुणाचाही आत्मविश्वास जागृत व्हावा. साठ टक्क्याच्या पुढच्या सर्व मुलांना सरांनी सायन्सच्या वर्गात ढकललं. त्या काळी पालक अगदीच साधे आणि निरुपद्रवी होते त्यामुळे सरांचा निर्णय योग्य मानत. आपल्या पाल्याला बृहस्पती समजून शिक्षकांचे डोके कोणीच खात नसे, सारं  काही ईश्वररुपी सरांवर सोडून मोकळे होत. माझ्या शाळेतल्या सात-आठ मुली आणि मुलांच्या शाळेतली पस्तीसएक मुलं असं पहिल्यांदाच co-aid education सुरु झालं.👦👧 अवतारात काही फरक पडला नाही. युनिफॉर्म बंद होऊन दोन-तीन बरे कपडे मिळाले. परकरचे थोडेसे आधुनिक रुप मैक्सी म्हणजे अगदी फॅशनचा कळस होता. या कपड्यांचा  फार खर्च होतोय असे पालकांना वाटू लागले! आरशात तोंड बघण्याची सवय नव्हतीच. फक्त दोन वेण्यांचे वर टांगणे कमी होऊन त्या पाठीवर रूळू लागल्या. या साध्या रहाणीमुळे बाह्य सौंदर्याचे कौतुक आयुष्यात कधीच वाटले नाही. सगळ्याच कॉलेजकन्या जुन्या नटी सारख्या साध्या दिसायच्या. मुले काही मलकापुरचीच तर काही आजूबाजूच्या खेड्यांमधून येणारी होती ती ही बिचारी अगदी साधीच होती. आम्ही मलकापूर शहरातल्या अतिशहाण्या राजकन्या मात्र स्वत: मोठ्या लंडन, पॅरिस शहरातून आलो आहोत असं वागत होतो. सुरुवातीला वर्गातली सगळीच ‘मुले’ आम्हाला शत्रुपक्ष वाटायची आणि उगीच भारत-पाक, भारत-चीन सीमेवर असतो तेवढा तणाव वर्गात असायचा. सारख्या चकमकी, कुरबूरी, कुरघोड्या सुरु असायच्या. दोन्ही पक्षांना शांतता, सलोखा वाढावा असं मुळीच वाटायचं नाही, कारण आम्ही त्यांच्याच राज्यात जाऊन त्यांच्यावर दादागिरी (की ताईगिरी?) करत होतो. मुलांना पाहून उगीच फिदीफिदी हसणे, एकमेकीच्या कानात कुजबुजणे, त्यांच्याशी अबोला ठेवणे, शिष्टपणा करणे असा सगळा सवता सुभा ठेऊन सात मुली पस्तीस मुलांवर भारी पडायचो.😂 मुलं खरंतर आमच्यापेक्षा मॅच्युअर्ड आणि शहाणी होती पण आम्हाला सतत त्यांच्या शहाणपणाचाच राग येई. पहिले सहा महिने शांततापूर्ण तणावात गेले आणि मग आम्हालाच त्यांची गरज पडू लागली. जरनलमधे मदत, नोट्स अशा स्वार्थी कारणांसाठी आम्ही त्यांच्याशी बोलू लागलो. एकीला तर अमिबा काढायला येईना, इतकी चित्रकला भारी!😆 मग ती कुणालातरी कायम आकृत्या काढायला  सांगू लागली. जरनल पूर्ण करायला मुले आम्हाला मदत करु लागली. तणाव निवळून हळूहळू मग ती मुलं आमच्यावर कुरघोड्या करण्याएवढी comfortable होत गेली. एकदा chemistry चा तास सुरु होता, माझ्या एका मैत्रिणीने पेन काढायला बाकामध्ये हात घातला, तिच्या हाताला मऊ मऊ काहीतरी लागलं, रुमाल असेल म्हणून तिने ते बाहेर काढलं आणि ओरडली ‘उंदीर ssss’🐀 आणि तो उंदीर तिने पट्कन मुलांच्या बाजूला भिरकावला. त्यांना तर तिथे काय आहे हे माहितीच होतं, त्यामुळे ती खो खो हसू लागली.😁 आम्हालाही हसू येत होतं पण आमचा घोर अपमानही झाला होता. वर्गाचे लगेच युध्द भूमीत रुपांतर झाले, दोन्ही बाजूच्या सैनिकांनी शस्त्रे परजली. दिवटे सर मात्र या माकडचेष्टा पाहून खूप चिडले. एका मुलाला तो उंदीर बाहेर टाकायला लावून ते निघूनच गेले. सर निघून गेले याची खंत तेंव्हा कुणालाच वाटली नाही, आता मात्र लाज वाटते.😛

My teachers in junior college.
    Anti- clockwise = Principal Borgave Sir, Professor Shete Sir, Prfessor Bele Sir, Professor   Shaikh Sir, Professor Diwate Sir. And Professor Kore Sir in send off ceremony of Bele Sir. 

आपले मूल सायन्सला घेतले म्हणजे अतिहुशार असून आइन्स्टाइनसारखे मोठे शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनिअर होणार असं दिवास्वप्न सगळ्यांना पडे. बोरगावे सर जादुगार असून पोरं त्यांच्या सांगण्यामुळे फार अभ्यास करणार आणि आकाशातून बदाबदा मार्क्स पडणार असं भाबड्या पालकांना वाटे. इकडे सायन्स साईड  घेऊन आमची काय वाट लागली ते आमचं आम्हालाच माहित. एक तर पहिले दोन महिने सगळे इंग्रजीतून काय बोलतात ते डोक्यात शिरत नसे सगळे विमानासारखे वरुन झुईकन निघून जाई.😅 त्यातून आमचे लक्ष शत्रूपक्षाच्या फालतू कारवायावर  लक्ष ठेवण्यात जाई त्यामुळे कसला अभ्यास आणि कसलं काय. स्वत:ला उगीच हुश्शार समजत होतो तरीही कसं झेपेल हे शिवधनुष्य असे वाटू लागले.

आम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषा होत्या. माळगे सर कानडी हेल काढून मराठी शिकवू लागले की सगळे मनसोक्त हसत. शेख सर मराठी काव्य शिकवताना अस्खलित अलंकारयुक्त मराठी बोलू लागले की ऐकतच राहावे असे वाटे. आरती प्रभू शिकवावा तर शेख सरांनीच. मान किंचीत तिरपी करून काही वेळा किरमीजी डोळे मिटून भाव समाधी लावून तल्लीनतेने ते  इतकं सुंदर, रसाळ शिकवत की मन कवितेत हरवून जाई. मायबोलीच्या गोडीची ही अनुभूती आम्ही पहिल्यांदाच घेत होतो. सायन्सला गेल्यावर मला  मराठी जास्त आवडू लागली!😊 मराठी ऐकताना जी समाधी लागे तीच शेटे सरांचे अस्खलीत इंग्रजी ऐकताना लागे. आपल्याला कधी असे इंग्रजी बोलता येईल का असे वाटत राही. शेटे सर म्हणजे अगदी मूर्तिमंत चैतन्य, कायम हसरा चेहेरा आणि आमच्याशी गप्पा मारत बारीक लक्ष ठेऊन मजेत शिकवत. आमचे सगळे भांडण उद्योग, सर्व बावळट चाळ्यांकडे अलिप्तपणे  पाहायचे. त्यांचा आत्मानंदी रंगलेल्या योग्यासारखा शांत समाधानी चेहरा बकुळ फुलांची आठवण करुन देतो. त्यांनी शिकवलेली 'death be not proud' ही कविता अजूनही हृदयावर कोरली गेली आहे. जॉन किट्स, वर्डसवर्थ ही सगळी ग्रेट माणसे त्यांच्यामुळे  आमच्या आयुष्यात आली आणि  इंग्रजी साहित्याची ओढ लागली. इंग्रजीच्या तासाला वर्गात pin drop silence असे. 😃

My teachers in junior college Malkapur.
Junior College Professors at 'get-together' 


आमची प्रयोगशाळाही भन्नाट होती. एक लांबलचक हॉल आणि त्यामध्ये Physics, Chemistry आणि Biology यांचे सारे गुण्यागोविंदाने नांदणारे भाग! कोरेसर जीव तोडून  सोप्या भाषेत भौतिकशास्त्र शिकवत असत. आज भौतिकशास्त्रामधले फक्त  pendulum, sonometer, resonance tube एवढेच आठवते. कागदी घोडे करून त्यावरून उडवायचो. त्यातून practically काय शिकलो देव जाणे. मार्क्स मिळवायला उत्तरावरून रीडिंग लिहिणे तर अगदीच सोप्पा प्रयोग होता. लोलकांमधून परावर्तित होणारे रंग चित्त आकर्षित करायचे. तो ध्वनी प्रकाशाचा वेग सूत्रात बांधण्यापेक्षा लखकन् चमकून पळून गेलेल्या विजेला घाबरवणारा मेघांचा गडगडाट जास्त लक्ष वेधायचा. ⛅⛈ न्यूटनचा तिसरा नियम चराचराला लागू होतो- 'for every action there is equal and opposite reaction'. ती रिएक्शन देणे जन्मभर सुरूच आहे, अगदी जीवनोपयोगी सिद्धांत. रसायनशास्त्राची तऱ्हा वेगळीच होती. दिवटे सर डोक्यात ज्ञानरूपी रसायन ओतण्याचा खूप प्रयत्न करायचे. मला सारखं ती मूलद्रव्ये जगूदेत ना आपल्या स्वभावाप्रमाणे असे वाटे. का जबरदस्तीने त्यांच्या रासायनिक अभिक्रिया घडवून आणायच्या? ज्याला ज्याच्याशी संधान बांधायचे आहे त्याने बांधावे, उगीच आपली लुडबुड का? असले अशास्त्रीय प्रश्न पडत. नसते प्रयोग करून काहीतरी अनाकलनीय द्रावण तयार करताना परिक्षा नळ्या फुटायच्या. 🧪 फुटक्या परिक्षानळ्या हळूच बदल,  ज्याच्यात त्याच्यात लिटमस बुडव असे प्रयोग चालायचे. द्रावण पिप्पेटने ओढताना तर एका सखीच्या ते कायम घशात जायचे, ती लगेच ‘चक्कर आली चक्कर आली’ करायची. तिच्या सेवेला धावताना आमच्या नाकी नऊ यायचे. काही द्रावणे एकमेकांत मिसळून त्यांचे गुण बदलतात, तर काही स्वतःचे गुण विसरतात, काही अधिक  उपद्रवी होतात,(संगती संग दोषा) तर काही मात्र टस से मस होत नाहीत-ती आपल्या तालावर दुसऱ्यास नाचवतात.  काही मूलद्रव्ये tasteless, colourless, odourless असतात म्हणजे अगदी निरुपद्रवी!  तर काही अगदी स्फोटक! अगदी मनुष्य स्वभावासारखंच आहे हे रसायन शास्त्र. दोन अनिष्ट माणसे युती करुन काय करतील हे सांगता येणं अशक्य!

        गणिताची गोष्ट आगळी.📐 वास्तविक दहावीपर्यंत हा अगदी आवडीचा विषय, पण अकरावी पासून डोक्यात शिरायला राजी नाही झाला. ते साइन, कॉस, थिटा, म्यू, पाय हे सारे चित्र-विचित्र त्रस्त ब्रम्हसंबंधासम भासू लागले. आर ए.पाटील सर सेम टू सेम अमोल पालेकर सारखे दिसणारे अगदी तरुण प्राध्यापक ते शिकवत ही उत्तम. पण गणिताने काय आमच्याशी सूत जुळवलं नाही. असा एकूण सायन्स साईड घेऊन चूक तर केली नाही ना असा प्रश्न काही जणांना पडू लागला. पहिल्या सत्रा नंतर आम्हाला जरा समजू लागले. काही जण मात्र जीव घेऊन दुसऱ्या साईडला पळाले, कोवळी पानगळ झाली.🏃 त्या छोट्या खेड्यात औषधाला कोचिंग क्लास नव्हता त्यामुळे हात दाखवून अवलक्षण का करा असे वाटले असावे. फक्त जीवशास्त्राने तेवढा जीव लावला. एक तर बेले सर अगदी शांत आणि शिकवणे इतके उत्तम की गोष्टीतला जादुगार जसा मुलाना पुंगी वाजवत दूर जंगलात नेतो तस्से नकळत अलगद आम्हाला जिवांच्या जादूई नगरीत नेत. त्यातून वनस्पतीशास्त्र म्हणजे पाना फुलांनी बहरलेले. 🌱 विविध पुष्प प्रकार, पानांच्या रचना पाहून जीव हरकून जाई. निसर्गाचे अद्भूत चमत्कार रात्री चमकत असलेल्या किटकभक्षी वनस्पती आवाक करून गेल्या. जीव-जंतू जवळचे वाटल्यामुळे पटकन समजू लागले. प्राणीशास्त्र अभ्यासायला आवडले, पण डिसेक्शन केल्यावर परत मनाने हाय खाल्ली. ते मजेशीर पण भयाकूल अनुभव आठवून आजही हसू येते.🐸

Malkapur Junior College, Shahuwadi, Kolhapur.
My Junior College.

        आपल्या देशात मुलांना ढकलून एखाद्या मळलेल्या वाटेवर सोडायची पद्धत आजही  रूढ आहे. त्या मुलाची आवड लक्षात कोण  घेतो? आई-बाबांचा दवाखाना आहे म्हणून मुलांना मारून मुटकून डॉक्टर करणारे महान लोक दिसतात. चाळीस वर्षांपूर्वी क्वचित काही हुश्शार मुले लहानपणी ध्येय वगैरे ठरवत असतीलही. त्या काळी घरटी चार-पाच मुले असत, मग इतका विचार कोण करणार? म्हणूनच तर आयुष्याचे सगळेच निर्णय शिक्षक/प्राध्यापक वर्गावर सोपवून पालक निर्धास्त रहात. मुलांना चांगले मार्गदर्शन मिळेच. सारे ज्ञान पैसे टाकून विकत मिळत नाही. अनेक निर्मोही शिक्षक-गुरुंनी देशाला उच्चप्रतीचे शास्त्रज्ञ, डॉक्टर, अधिकारी दिले. आता मुलांना जीवघेण्या स्पर्धेत पळावे लागते. अकरावी आणि बारावीत तर त्यांचे हाल कुत्रे खात नाही. पहाटे साडेपाच पासून रात्री नऊ पर्यंत घोडे पळवायचे. सोळा-सतरा वर्षाची कोवळी मुले जीव तोडून मार्कांच्या शर्यतीत धावत सुटतात. सगळे ज्ञान मार्कात तोलले जाते, सगळ्या संधी  मार्कार्थी आहेत. मार्कांपलीकडे उत्तुंग, खोल काही आहे जे मार्कांच्या फूटपट्टीत मोजता येत नाही हे समजेनासे झाले आहे. आपण किमान आपल्या मुलाची शारिरीक, बौद्धिक  क्षमता आणि आवड पाहून क्षेत्र ठरवावे इतकेच. मुलांना फार समजतेच असे नाही, निर्णय त्यांना घेउ द्या, काही वेळा निर्णय चुकेल. आपण मात्र त्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहून कर्तव्य पार पाडू. क्षेत्र कोणतेही असो, क्षितिज सगळ्यांना समान संधी देते फक्त पंखात ताकद वेगवेगळी हे  त्रिकालाबाधित सत्य. 

        स्पर्धा गावी नसलेल्या खेड्यात अगदी साध्याशा दगडी इमारतीत आमचे कॉलेज होते. आता गावाबाहेर टेकडीच्या समोर, नदी किनारी गर्द वनराईत सुरेख कॉलेज बांधले आहे. आमच्या शिक्षक रुपी गुरूंनी,पालकांनी ज्ञानाचं मोकळं आकाश आम्हाला दाखवलं हे आमचं परम भाग्यच. त्यांच्यामुळेच अनंत आकाशात स्वछंदीपणे विहरताना आयुष्याच्या अलौकिक रंगांची उधळण अनुभवता आली आणि मी उच्चशिक्षणासाठी कोल्हापूरला जायला सिद्ध झाले. साध्या बाळबोध मलकापूरने, तिथल्या शिक्षणाने जीवनाकडे पहायची ही सुंदर निकोप दृष्टी दिली आहे. खरंच जननी आणि जन्मभूमी ती स्वर्गाहून महान. 🌄


विजयश्री तारे-जोशी

12.9.2020

    

टिप्पण्या

  1. सर्वांगपुर्ण, एकदम छान निरीक्षण, बालमनापासून, बलमनापर्यंत छान वर्णण, रीटायर होऊन, पुर्ण वेळ लेखन करा...
    शिवाजी साठे सातारा.

    उत्तर द्याहटवा
  2. श्री, नेहमीप्रमाणे च सहज सुंदर👌👌👌 तुझं लेखन म्हणजे वाहती नदी आहे, ती ओघवती भाषा, ते अलंकार कसलं कसलं कौतुक करू?Realy you are great👍

    उत्तर द्याहटवा
  3. विजयश्री तुझे शाळेमधून college मध्ये ज्या निरागसतेने तू दाखल झालीस तशीच निरागस,सहजसुंदर, सहजसुलभ,अशी तुझी लिहण्याची भाषाही आहे त्याला कोणत्याही शिक्षकांना शब्दांने फटकारणे ,डंख करणे तुझ्या भाषेला मान्यच नाही उलट प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची हातोटी,त्यांचे विषय सोपा करून शिकवण्याची कला याचे तू अगदी परिपूर्ण शब्दचित्र उभेकरतेस की आपण आत्ता समोरच तो अनुभव घेतो आहे असे वाटते तुमच्या मुलामुलींची सुरवातीची समज कमी असल्याने होणारी भांडणे,नंतर.स्वार्थ असल्याने त्यांच्याशी सलोखा हे तुमचे कारनामे काहीही हातच न राखता तू छान सांगितले आहेस एकुणच लेख फारच देखणा,तुझ्या सिद्धहस्त लेखणीची पुरेपूर साक्ष देणारा व आमचे पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यत वाचकाना बांधून ठेवणारा झाला आहे .तुझ्या या लेखणीला सलाम !!👌🏻👍🏻🙏🏻🌹
    मनिषा कुलकर्णी दुबई

    उत्तर द्याहटवा
  4. Once again, it is a treat to read .little or more, it was the experience of all of us coming from rural or semi urban areas. Like you, I was first year science and then to extreme liking for English literature, completed M A in English. Afterwards, turnover to practical life with New India. You have got ability to describe vividly. It reminds me of the great novelist Thomas Hardy. Keep it up. I would like to read some articles
    J.P.Kulkarni pune

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thanks for the review J.P.Kulkarni!
      Yah, it is so surprising that we have had such a similar career path. 😃
      I'll definitely write more articles! Keep reading and keep on giving comments.

      हटवा
  5. jgd.तुझ्या लालित्यपूर्ण लेखांचे भरभरुन कौतुक करताना मनमयुर आनंदाने नृत्य न करेल तरच आश्चर्य! पण आठवणीने घनश्याम आषाढी घनासारखे तुझे मन बरसत आहे अविरत भावधारा! किशोरावस्थतेतील अनाकलनीय मधुर तितके धोक्याच वळण असणारं हे वय व यावेळी काॅलेजचे उलगडणारे नवे मोहक व आश्वासक क्षितिज! या लेखाविषयी लिहिताना मला "No comment" इतकच म्हणाव वाटतं! सार्‍या सरांविषयी बरसणारार्‍या कृतज्ञतेच्या सरीवर सरी ओळीओळीतून तुडूंब भरुन वाहत आहेत.फुलायच्या दिवसातले विश्व ! इथं माझे शब्द माघार घेत आहेत.मौनातच लपुन रहावं शब्दश्रीनं,हेच बरे!पाषाणालाही परमेश्वर बनवणारी जिथे श्रद्धा असते तिथे तर्काची समशेर म्यानबंदच होते. श्रद्धा व प्रेम निराकारालाही साकार करु शकते,तिथे माणसात ती श्रद्धा देव का पहाणार नाही.? कोण कसा असतो यापेक्षा कोण कोणाला काय मानतो यावर सारं मूल्यांकन ठरते. डोंगरातील मातीची मूर्ती आचार्य मानणार्‍या कोळियाने जगी एकमेवता सिद्ध केली ,ही गुरुभक्तीची शक्ती त्याचे अंतःकरणाचे सामर्थ्य होते,त्याने हा चमत्कार घडवला.इथे बुद्धिप्रामाण्य शरणागत होते.त्यामुळे तर्काच्या विश्लेषणाची धार बोथट बनते. गुलाबपुष्पाचे विच्छेदन करुन त्याच्या सौंदर्याचे रहस्य उलगडत नाही !तिथे समग्रतेचा परिपाक असे संश्लेषणच कामी येते.त्यामुळे इथे निवांतपणे श्रद्धाभाव संवेदावा,हेच भले! आपल्या उपवनातील वृक्ष वेली फुलांफळांनी डवरुन आलेल्या पहाताच माळ्याला जो आनंद होतो ,तसा आनंद इथे अनुभवाला येत आहे, या परते बोलावे ते काय?🌳🦚🌳🌳⛅🌈🌄(श्री.शेटे एस.डी.,सर,सागांव —वारणा)

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you so much sir!!

      I always wait to read your comments on my posts. Thanks a lot for being that 'Guru' who has inspired, motivated and supported me! You have blessed me and many students with your knowledge and we all are grateful to God for gifting us such a fabulous teacher. 😃

      हटवा
  6. जयश्री, तुझी स्मरशक्ती अचाट आहे, तुझे लेखन वाचताना त्यात नेहमी ताजेपणा जाणवतो,४० वर्षा पूर्वीच्या आठवणी शब्दबद्ध करताना, तू जी मधुर भाषा वापरली आहेस, ज्या शब्दांची योजना केली आहेस, ते वाचताना आश्चर्य वाटते. अतिशय छान, तू कोणत्याही विषयावर लिहू शकतेस या बद्दल शंका नाही.
    तुझ्या हातात सरस्वती आहे, त्या लेखणीचा समाजासाठी उपयोग व्हावा, अवघे जग वाहवा करेल असे तुझे लिखाण खूप आवडले, श्री शेट्ये सरांनी तुझ्या लिखाणाबद्दल किती सुरेख प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, सर्व सरांचे बद्दल तुला किती आदर होता हे तुझ्या लिखाणातून सूचित होते. अशीच लिहित रहा, तुझे लिखाण वाचून आनंदाने ऊर भरुन येते, मन प्रसन्न होतंय व मलकापूर ची म्हणून अभिमान वाटतो. बेस्ट लक, कीप इट अप!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you so much Dr. Maruti Potdar.

      Very glad to have such huge support system in my life. Everyone from Malkapur have been so appreciative in this little venture of mine, that I am overwhelmed with it!

      हटवा
  7. प्रा एस. पी. चौगले, वाकरे, कोल्हापूर
    जयश्री, शाळेतून कॉलेजमध्ये प्रवेश करतानाचे जादुई दिवस अत्यंत तन्मयतेने शब्दबद्ध केले आहेत.मला तुमच्या लेखनातून मलकापूर नजरेसमोर उभा राहत आहे.शाळा,कॉलेज आणि शिक्षकांविषयी कृतज्ञता हे सर्व वाचताना भान हरपून जाते.सहजसुंदर भाषा आणि लेखन,भविष्यातील लेखिका मला दिसत आहे, पुस्तक प्रकाशित करायचे आहे, राहून राहून मलकापूरात जन्म घ्यायला पाहिजे होता असे मलकापूरचे वर्णन आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you so much Prof. S.P.Chougale.

      I don't know about book but I want to write more for sure and Malkapur will definitely be a huge part of that writing. 😃

      हटवा
  8. वा. छान लिहिलात लेख. वाचकांना त्यांच्या good old days मधे नेण्याचे तुमच्या लेखनाचे कसब मात्र अप्रतिमच. आजपण "मी आर्ट्स ला जातो" म्हंटल्यावर "आर्ट्स जाऊन काय भीक मागणारेस का काय" हे माझ्या थोरल्या भावाचे उद्गागार जसेच्या तसे आठवले. लेख बाकी अप्रतिम.
    वसंत जोशी.

    उत्तर द्याहटवा
  9. लेखाची सुरुवात छान झाली आहे.युनिफॉर्म ची बसलेली तिडीक 😥😥 आठवली.खरंच करिअर काय असते हेच माहिती नव्हते त्यावेळी.आप्पांच्या सल्ल्याने science ला घेतलेली admission आणि त्यानंतरची शिक्षणाची कसरत छान रंगविली आहे. मलकापूर च्या मानाने कोल्हापुरात शाळांची परिस्थिती बरी होती. पण सायन्स ल जाणाऱ्यांची कथा तुझ्यासारखी . त्या परिस्थतीचे वर्णन छान जमले आहे. पण छोट्या गावातील गुरु शिष्या नातेसंबंधांचे अत्यंत भावपूर्ण वर्णन आणि जीवनाकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन ही त्यातून मिळालेली आयुषयभरासाठी देणगी याचा उल्लेख लेखाची शान वाढवतो.
    प्रयोगशाळेचे वर्णन भारी जमले आहे. शिक्षकांच्या विशिष्ट लकबी कौशल्याने लिहिल्या आहेस. ज्युनियर कॉलेज चा संपूर्ण काल बारीक सारीक तपशिलासह लिहिला स कमाल आहे तुझी. कॉलेज मधील भन्नाट दिवस मुलं मुलींचं चीड वाने अगदी पटेल असे .जीवशास्त्र ने जीव लावला,जीव तोडून मार्कांच्या शर्यतीत धावणे, science सोडून दुसऱ्या साईड ल पळणे या सर्व उपमा छान जमल्या आहेत. प्रत्येक लेखात आठवणींचा खजिनाच उलगडून दाखवते स. त्यामुळे लेखात खरेपणा जाणवतो. आपण अनुभव जगल्याचे फिलिंग येते. मस्त लेख 👍👍
    शैला उर्फ मृदुला चिटणीस

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you so much Shaila Mavashi!!

      कोल्हापूरची परिस्थिती नक्कीच बरी होती पण तेंव्हा career counseling वगैरे प्रकारच नसल्याने अनेक गोंधळ उडायचे. अर्थात आताही ते उडतातच. 😂 त्यामुळे झालं ते छानच म्हणायचं आता!

      हटवा
  10. जय कर्मवीर.
    सौ. तारे जोशी. स.न. वि. वी.
    आपला लेख वाचला भूतकाळाच्या स्मृती जागृत झाल्या. मलकापूर, महादेव खर्डा , राजवाडा, नरसोबा, विठ्ठल मंदिर ,शाळा, कडवी, नद्या आणि शाळी नदीच्या उत्तर दिशेला असणारे रयत ज्यु. कॉलेज.
    मलकापूर पंचक्रोशी व गजापुर पासून बोरपडले पर्यंतचे येणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, जोतिबा, पावनखिंड, विशाळगड यांचे दर्शन घडविणारा कॉलेजचा परिसर भव्य क्रीडांगण १९८७ पासून आज पावतो मलकापूर सोडले, आपला लेख पाहून क्षणभर मलकापूर मध्येच आहे वाटले.
    आपली प्रतिभा संपन्न आहे. आपली लालित्यपूर्ण अलंकारिक ओघवती भाषाशैली व नर्म विनोदी कृती यांच्या साहाय्याने आपण हायस्कूल, कॉलेज जीवनाचा लेखाजोखा मांडला आहे, हे स्थुत्य आहे.
    प्राध्यापक, कॉलेज, विद्यार्थी, विद्यार्थिनी, आप्तस्वकीय व समाजाच्या विषयी आपण केलेले अवलोकन, निरीक्षण स्वभाव वैशिष्टे व लकबी चिकिस्तकपणा साइन्स विद्यार्थिनींना साजेल असा आहे.
    लेख वाचला, दोन तीनदा आठवण झाली लक्ष्मीबाई टिळक यांच्या स्मृतिचन्ह या आत्मकथन याची.
    लेखन कला विकसित करावी, लेखातील प्राध्यापकांचे फोटो व ज्युनिअर कॉलेज इमारत पाहून धन्य झालो, आणि नकळत डोळे ओलवले .
    भूतकाळ, वर्तमान काळात आणण्याचा आपण जो प्रयत्न केला आहे तो अभिनंदनीय आहे.......
    आपली प्रगती होवो, आपले आपल्या कुटुंबीयांचे आरोग्य चांगले राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना........
    प्रा. *बी*. *एम*. *शेख* *सर*.
    (सेवानिवृत्ती)

    उत्तर द्याहटवा
  11. हो आताच पाहिली..
    खूपच समरसून लिहीले आहे..
    वाचताना प्रत्यक्ष त्या काळात गेल्यासारखं वाटतं..मलकापूरचे ते मंतरलेले दिवस पुन्हा अनुभवायला मिळाले..🌈सर्व शिक्षकांविषयी अतिशय आदराने लिहले आहे ..प्रत्येक सरांच्या व्यक्तीमत्वाचे बारकावे टिपले आहेत .. वाचताना 'अरे हे आपलेच अनुभव आहेत 'असे वाटते..😊
    भाषाशैली अतिशय उत्तम..ओघवती व नर्म विनोदी आहे..मलकापूरच्या रम्य दिवसांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या...🙏🏼🌹

    धन्यवाद..🙏🏼💫(मनोज बोरगावे,)

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -