गो गो गोवा..

डिसेक्शनचा थरार !!!



शाळेत आम्ही बडबड करुन शिक्षकांचे इतके डोके उठवायचो की फार क्वचित कुणी आम्हाला प्रेमाने संबोधत असे. 😅 नेहमी 'गाढव आहेस, घोड्या झालात' वरुन 'भोरड्यांनो गप्प बसा' इतके प्रेमळ बोल ऐकून आम्ही छानच आदर्श कोडग्या  मुली झालो होतो. कॉलेजला गेल्यावर मात्र आमचा भाव एकाएकी वधारला होता. सगळे प्राध्यापक आम्हाला मिस्स तारे, मिस्स अमुक, मिस्स तमुक करुन बोलवायला लागले.👸 बरे वाटले, कानाला गुदगुल्या झाल्या. आता तरी आपण मोठ्ठ्या शहाण्या झालो असेही वाटले. पहिली मोठ्ठी खरेदी म्हणजे डिसेक्शन बॉक्स विकत घेतला, खूप भारी वाटलं. त्या मखमली गुलाबी पेटीत कात्र्या, सुई सारखी बारीक मोठ्ठी दाभणे, वेगवेगळे चिमटे असे बरेच साहित्य होते. जणूकाही डॉक्टर होणार अशा अविर्भावात सगळ्या गल्लीभरच्या  छोट्या मुलांना तो जादूई बॉक्स दाखवून घाबरवून  झालं. सायन्स साईडला प्रॅक्टिकल करायला मिळणार म्हणून कोण आनंद झालेला.😊 शाळेत सगळे प्रयोग सरांनी करावे मुलानी पहावे असे चालत. आता आम्ही प्रत्यक्ष प्रयोग करायला अधीर झालो होतो. जिवा-शिवाची मैत्री म्हणजे जीव शास्त्र. सगळ्या जीवांची अंतर्बाह्य रचना तपासायची, सगळं काही जागच्या जागी ठेवलय ना नीट ही निसर्गाची उलटतपासणी  करायची म्हणजे जीवशास्त्राचे महान प्रैक्टिकल. आमची जीवशास्त्राची प्रयोगशाळा  एका लांबलचक हॉल मधे एका कोपर्यात निसर्गाचे  चमत्कार पहायला बसवलेली होती. वनस्पतिशास्त्रात  पानं - फुलं - देठ मायक्रोस्कोपच्या खाली घालून बघायला मजा वाटायची. वनस्पतीचे देठ, फुले, पुंकेसर, स्त्रीकेसर यांचे पातळ काप करुन सूक्ष्मदर्शकामध्ये घालायचे. कमळ पाण्यावर कसे तरंगते, पानावर पाणी का टिकत नाही याचे प्रात्यक्षिक पाहिले की निसर्गाची अद्भूत किमया आवाक करुन सोडे.🍀🌿 वनस्पतीच्या अजब गजब दुनियेत मन हरवून जाई. हे प्रॅक्टिकल आम्ही मुली अगदी आवडीने आणि आनंदाने करायचो. बेले सर देखील जीव ओतून कुठून कुठून अभ्यासाला असलेल्या/नसलेल्या सगळ्या वनस्पती पैदा करुन आम्हाला निसर्गातली गूढ गुपिते उलगडून सांगून मंत्रमुग्ध करून सोडत.


            बॉटनी टूर म्हणजे तर सगळ्या सायन्स साईडला आनंदाचे रम्य शिखर दाखवणारी पर्वणी असे. डिसेंबरच्या गारेगार हवेत मलकापूरच्या रम्य डोंगर दरीत काही उत्साही प्राध्यापक मंडळींना सोबत घेऊन बेले सर आमची बॉटनी टूर काढायचे. डबे घेऊन पहाटे लवकर आंबा घाटात पोहोचायचं, तिथून कळक दरा पर्यंत आठ-नऊ किलोमीटर चालायचं. बेले सर गांधीजीं सारखे भर चालत, पुढे जाताना अविरत इकडचे तिकडचे वृक्ष, वन संपदा याची माहिती सांगायचे. बेले सर तसे खूप मितभाषी, शांत व्यक्तिमत्व त्यांना  इतकं भरभरुन बोलताना, हसताना कधीच पाहिले नव्हते, त्यामुळे सगळेच चकीत होत. मधुनच झरझर दरीत उतरुन एखाद्या दुर्मिळ वृक्षाची, झुडपाची फांदी आणायचे, त्याची पर्ण रचना, पुष्प रचना प्रत्यक्ष दाखवायचे.🌴🌳 सरांच्याकडे ज्ञानाचा अफाट सागर होता, त्यातले काही थेंब गोळा करताना आमची दमछाक होई. सरांची उर्जा इतकी की आम्हांला पळत पळत त्यांच्या मागे जाऊन माहिती ऐकावी लागे. सरांमुळे सह्याद्रीच्या कुशीत कळक दरीत लपलेल्या आगळ्या  वनसंपदेची ओळख झाली. आज ही तिथे फिरताना बेले सर हातात फांदी घेऊन रचनेचे प्रश्न विचारतात की काय असे वाटते. अशी सुंदर आठवण आंबा घाटात वसलेली आहे. सजीव निसर्ग चमत्कारानी भरलेले त्यामुळे अगदीच जिव्हाळ्याचे वाटले वनस्पतीशास्त्र पण प्राणिशास्त्राने  मात्र आमची सत्वपरिक्षाच घ्यायची असं ठरवलं होतं, पावलो पावली आम्हा युद्धाचा प्रसंग.



            प्राणीशास्त्र प्रॅक्टिकल कसे असेल याची फार उत्सुकता होती. सरच काय ती प्राण्यांची चिरफाड करतील आणि आत अवयव निसर्गाने कसे चपखल बसवलेत ते दाखवतील अशी अपेक्षा होती. प्राण्याला हात लावणे ऐच्छिक असावे अशी धारणा होती. पहिल्या प्रॅक्टिकलला सरांनी ‘डिसेक्शन’ बॉक्स आणायला सांगितला. 🐸 आता काय कापायला लागणार याची धागधुग सगळ्यांनाच होती. आम्ही आपापल्या स्टूलवर बसलो. हॉटेलमध्ये जसे आधी ताट-वाट्या, चमचे, पाणी, लोणचे आणून ठेवले जाते तसे आमच्यासमोर मेणाचा थर असलेला  ट्रे आणून ठेवलेला होता. तो ट्रे अर्धा पाण्याने भरायला सांगितला. मग आमच्या बेले सरांची एन्ट्री झाली. सगळेजण शांत बसले. शिपायाने हळूच प्रत्येकाच्या ताटात एक एक बेशुद्ध अवस्थेत असलेलं गांडूळ आणून ठेवलं. सरांनी स्वत: डिसेक्ट करुन दाखवून त्याची पचनसंस्था उघडून दाखवली. आता तुम्ही करा, हे केल्याशिवाय पास होता येत नाही असे खडसावून सांगितले, मग नाईलाजास्तव त्या दिव्याला तयार झालो. आयुष्यात प्रथमच त्या गिळगिळीत अशा बिचाऱ्या प्राण्याला स्पर्श केला. मुले फटाफट प्रॅक्टिकल करुन निघून सुद्धा गेली, आम्ही मुली मात्र ई .. ई  करत श्वास रोखून कसे बसे फाडले त्या निरुपद्रवी जिवाला, पाहिली त्याची लांब पचन संस्था आणि पोटातली शुद्ध माती! तरी बरं त्याच्यात लाल रक्त नसतं, एवढंच काय ते समाधान. तो गिळगिळीत स्पर्श आठवून त्या वासाने जेवावे असे वाटेना, डोके उठले. या नंतर अजून ज्ञान वाढवण्या साठी दोन तीन उपद्रवी झुरळांना मुक्ती दिली. झुरळ फाडताना वाईट नाही तरी किळस खूप वाटली. त्याचे श्वेत रक्त पाहून कसेसेच झाले. एरवी झुरळांना पाहून किंचाळून उड्या मारणे तेवढे सरांच्या धाकाने आणि मुलांना हसायला संधी द्यायची नाही म्हणून बंद झाले. झुरळ चावत नाही, बेशुद्ध अवस्थेतले तर नाहीच नाही या ज्ञानात मोलाची भर पडली. आजही मी झुरळांना भीत नाही! 😆


               प्राणीशास्त्राचे प्रॅक्टिकल म्हणजे रोजची अग्निपरीक्षा  वाटू लागले. आज काय बरं  त्या मेणाच्या ट्रे मधे वाढले असेल... या भयाने अंगावर काटा यायचा. असेच एकदा जाऊन प्रैक्टिकल साठी स्टूलवर वट वट करत बसलो होतो. मितभाषी सरांनी खुणेनेच शिपायाला डबा आणायला सांगितले. शिपाईमामा लगेच पार्ले ग्लुकोज बिस्कीटचा डबा घेऊन आले. आम्ही  काय काय  विचारायला लागलो, त्यानी छद्मी हसत  डब्याचे झाकण काढले आणि प्रत्येकाच्या ट्रे मध्ये एकेक गुंगीत असलेला बेडूक ठेऊ लागले! आता मात्र आमचे धाबे दणाणले, पळून जावे असे वाटले पण शूर शिपाई असल्यासारखे सगळे चुपचाप बसलो. 🐸 बेडूकरावांना कधीच इतक्या जवळून पाहिले नव्हते. आता याची चिरफाड  करायची आणि हे जमलं नाही तर  काय  हा यक्ष प्रश्न होताच. हे जमले नाही डॉक्टर  होता येणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती, वरुन वर्ष वाया जायची भिती. एका बेडका पायी पायावर धोंडा पाडून घेणे शक्य नव्हते. मुले मात्र अजिबात घाबरल्यासारखं दाखवत नव्हती, ती दुष्टच असतात असं वाटलं आम्हाला. नामुष्की नको म्हणून आम्ही उसनं अवसान आणून पुढच्या सूचनेची वाट पाहू लागलो. ते  सारे बेडूकराव गुपचूप पडून होते. सरांनी बेडकाच्या श्वसनसंस्थेची माहिती सांगितली आणि आता आपण ट्रे मधल्या बेडकाचे डिसेक्शन करूया असे म्हणाले. आधी सर स्वतः डिसेक्शन करून दाखवणार होते. त्यांनी त्या पाण्यात पहुडलेल्या बुळबुळीत बेडकाला, लहान बाळाला ज्या मायेने अंघोळ घालतात तशी चोळून मोळून अंघोळ घातली. त्याचे चारीही पाय बांधले आणि अगदी निष्णात सर्जनसारखी त्याची शस्त्रक्रिया सुरु केली. आम्हाला त्याची श्वसन तसेच पचनसंस्था दाखवली, ती श्वास रोखत आम्ही पाहिली. त्याचे धडधडणारे हृदय डोळ्यानी पाहून छातीत धडधड़ू लागले. दृश्य बघूनच पोटात  डचमळायला लागलं. सरांनी शांतपणे सुहास्य मुद्रेने डिसेक्शन नीट पार पाडलं आणि ‘आता तुम्ही पण मी केलं तसेच करा’ असे सांगून मोकळे झाले. 😅

Prof. Bele Sir who tought us how to dissect animals. 

आम्हाला काय त्या बेडूकरावांना हात लावावा असे वाटेना. आयुष्यातली सगळ्यात अविस्मरणीय, चित्त थरारक परीक्षा द्यायची वेळ आली ! शिपाईमामांच्या मदतीने घाबरत घाबरत त्याचे पाय बांधले आणि अगदी नाईलाजाने त्याच्या पोटावर कात्री चालवली. त्या वासाने डोके गरगरत होते मग कसेबसे त्याचे अवयव  सरांना दाखवले. इकडे एका सखीने एका दमात बेडूकरावांची मुख्य धमनी तोडली, तिचा सगळा ट्रे रक्ताने भरला आणि ते बघून तिलाच चक्कर आली. तिला पाणी पाजून शुद्धीवर आणेपर्यंत बिचाऱ्या बेडकाने राम म्हटले. ही रक्तरंजित क्रांती पाहून आता डोके भणभणायला लागले होते. पण संयम ठेवत नेटाने आपण  बेडकाला मुळीच घाबरत नाही हा अभिनय सुरु ठेवला. तिकडे एका मुलाने फार मोठ्या नामांकित सर्जनचा आव आणून ‘मला मोठ्ठा बेडूक’ करून भला मोठ्ठा बेडूक मागून घेतला होता. डिसेक्शन करताना त्या बेडकाची गुंगी उतरली आणि तो बांधलेले पाय हलवू लागला, पूर्ण ट्रे  गदा गदा हलू लागला ! 😝 मग मात्र तो शूरवीर सर्जन मित्र घाबरून सरांना बोलावू लागला. वर्गातला मुलगा म्हणजे शत्रूपक्षातला सैनिक, त्यामुळे आमचे कितीही हाल चालले असले तरी त्याला फिदीफिदी हसायची संधी आम्ही मुळीच सोडली नाही. त्याच्या फजितीला आणि स्वत:च्या अघोरी शिक्षण कर्माला हसत कसेबसे डिसेक्शन गुंडाळून घरी आलो. रस्ताभर त्या बेडकांची कथा ईsईss  च्या पार्श्वसंगीतावर सुरु होती. त्यातून काय शिकलो ते एक सर आणि तो बेडूकच जाणे. 😂


बेडकाच्या आंतड्याना लावलेल्या हाताचा हिवळ, विचित्र वास, त्या बुळबुटीत स्पर्शाची जाणीव काही केल्या मनातून जाईना. एरवी घर दणाणून सोडणारी मी चेहरा पाडून घरी येउन गप्प बसले. बेडकाची सगळी कर्म कहाणी घरी सांगत नेहमी प्रमाणे हसे करुन घेतले. माझ्या हुश्शार तिरक्या डोक्याला कायम हसणारी भावंडं गप्प कशी बसतील? ‘कशाला गेलीस सायन्सला?’ करून चिडवायला टपलेलीच होती. शेवटी ५-६ वेळा साबणाने  हात धुवून झाल्यावर शेक्सपिअरचा फेमस डायलॉग आठवला, ‘अख्ख्या जगातील  समुद्रांचं पाणी आणलं तरी हात स्वच्छ होणार नाहीत!’ जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तो मरू घातलेला धडधडणाऱ्या काळजाचा बेडूक दिसू लागला. प्रत्येक प्राणी फाडल्यावर आईला बरेच दिवस भात कालवून द्यायला लावून, मी चमच्याने जेवायचे. तो हात भाताला लावला की हट्कून बेडकाची सय येई. रात्री झोपेतही बेडूक स्वप्नात येऊन  डराँव डराँव करून मला घाबरवू लागले. आज्जीच्या भूतदयेच्या गोष्टी आठवून मनास अपराधीपणाची  टोचणी लागली. 😓


माझी आज्जी फार हळवी आणि प्रेमळ होती, सतत संतांच्या रचना, ओव्या गुणगुणायची. केतकी गोरा वर्ण, टपोरे काळे डोळे, सोनेरी पांढर्या लांब केसांचा नेटका अंबाडा, छान नऊ वारी लुगडे आणि  तोंडाचे बोळके पदराने झाकुन सारखी खुसू खुसू हसायची. माझे डोके तिरकस चालते हे सर्वात आधी तिनेच ओळखलेले. मलकापूर मधे पाऊस जास्त त्यामूळे नाकतोडे, टोळ यांचा सुकाळ असे. माझी भावंडे नाकतोड्याच्या पायास दोरा बांधून त्याना उडवायची. पापभिरू आज्जी सारखी त्यांना ओरडे, आत्मा शाप देतो असेही सांगे. माझी मायाळू गोष्टी वेल्हाळ आज्जी  ‘अरे, मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये, त्यांच्या आत्म्यात देव वसलेला असतो रेsss’ असं कळवळून सांगे. ‘कोणाही जीवाचा न घडो मत्सर’ म्हणणाऱ्या त्या साध्या भोळ्या आज्जीने वरून माझे कारनामे बघितले असतील तर?.... असा प्रश्न पडला. लहानपणी आम्ही आज्जीची थट्टा करायचो ‘का गं आज्जी ? डास तरी कशाला मारायचा? त्याचा ही आत्मा शाप देईल ना?’ असे विचारायचो. तिने मग या प्रश्नाला राम नामाची जोड दिली. डास मारताना राम राम असे म्हणा असे सांगितले… का ?... तर त्या डासाच्या आत्म्याला मुक्ती मिळाली पाहिजे ! मग काय आम्ही मर्कटे राम राम करत उड्या मारत डास मारून त्यांचे आत्मे मुक्त करु लागलो की तीच लागायची हसायला. पिंजऱ्यात सापडलेल्या उंदरालाही न मारता दूर सोडून येण्यावर भर असायचा तिचा,  'मरु दे मेला त्याच्या कर्मानं 'असं म्हणायची. अशा माझ्या आज्जीनं  हे माझे प्राणी फाडा फाडीचे उद्योग पाहून स्वप्नात येउन ‘कुठं फेडशील ही पापं?’ असा खडा सवालच केला.😔 मी खडबडून जागी झाले, मातेला स्वप्न सांगितलं तर ती ही हसायलाच लागली. 


न राहवून दुसऱ्या दिवशी शिपाईमामांना त्या सगळ्या फ़ाड़लेल्या बेडकांचे काय केले असे विचारले. ते चांगलेच खवळले. आता माझ्या पापावर शिक्कामोर्तब झालं, नक्कीच मी अश्राप जिवांच्या मृत्यूस कारण ठरले होते. मग काय शास्त्र प्रॅक्टिकल म्हणून गरीब बिचारे गांडूळ, घाणेरडे झुरळ हे प्राणी फाडावे लागले. नंतर न्यू कॉलेज मधे तर उंदराचेही अंतरबाह्य अवलोकन करावे लागले. उंदरीण बिचारी सात पिल्लांची आई होणार होती. 🐭 अरेरे काय हे… माझ्या ज्ञान प्राप्ती साठी  एकाच वेळी आठ जीवांनी  बलिदान दिले असेच वाटले. एक मात्र खरे की डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला मेंदूने केंव्हाच तिलांजली दिली. सायन्सला जाण्याआधी हे मृतप्राय बेडूक कुणी दाखवले जरी असते तरी निम्म्या वर्गाने क्षणात पोबारा केला असता. आज प्राणीमित्रांच्या पाठपुराव्या मुळे मुलांना हे असे प्रॅक्टिकल नसते. पण डॉक्टर होताना आजही या पेक्षा भयावह प्रॅक्टिकल अनुभवायला सामोरे जावे लागते हे मात्र खरे. त्या समस्त डॉक्टरना आणि त्यांच्या अतुलनीय धाडसाला मानाचा सलाम. 👏


Once upon a time, this was laboratory for Malkapur junior college. Now it's home to some poor people. 

मी माझे पातक अजूनही शिरावर घेऊन जगत आहे पण आता मात्र मुंगीलाही नीट रस्ता दाखवते. कविता, पाने, फुले यात रमणाऱ्या माझ्या हातात कात्री देऊन मी काही प्राण्यांना सद्गती दिली हे जरी खरे असले तरी तो माझा प्रांतच नव्हता हे आज लेखणी हातात आल्यावर पटले. सायन्स मधेही माझे मन  हळव्या कलाकाराचेच होते. मी डॉक्टर होऊन ऑपरेशनसाठी पेशंट आला असता  तर तिरक्या डोक्याने हा आजारीच का पडला, त्याच्या मनाला काय वाटत असेल असा विचार करत बसले असते. नाहीच ते माझे विधीलिखीत… देवाक काळजी... दुसरे काय ? 😅


             चराचराच्या रचनाकाराने सगळ्या प्राण्यांना दिलेले इतके सुंदर बाह्य शरीर आणि आत बसून त्या सगळ्या वर नियंत्रण ठेवणारी ती अनाम शक्ती दिली आहे. डिसेक्शन करुन अवयव पहाल पण त्यांचा  ताळ-मेळ कोण  कसा राखतो ते कसे समजावे? मनात आलेला विचार आचरणात कोण आणतो.. बुद्धी, मन  की देह ? कसे शोधायचे डिस्सेक्ट करुन? सृष्टीच्या त्या किमयागाराने प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी सुंदर देह दिला, वर कातडीचे आवरण दिले, फार शहाणा मेंदू नीट टणक कवटीत सुरक्षीत ठेवला, डोळे-कान नाजूक म्हणून  खोबणीत ठेवले, हृदय छातीच्या पिंजर्यात ठेवलं, फक्त राबणारे हात आणि पोटा मागे धावणारे पाय तेवढे वर ठेवले. बरं  जग दाखवणाऱ्या त्या नाजूक डोळ्यांना अखंड फडफड करणाऱ्या पापण्याही दिल्या.….. अजून किती वर्णन करावे जिवाच्या देहाचे? मनुष्य प्राण्याला तरी अफाट प्रतिभा, अथांग मन आणि अमोघ वाणी  देऊन सर्व प्राणी मात्रात सरस करुन ठेवले आहे. त्या  सृष्टीच्या अभियंत्याचे कौतुक करावे तेवढ़े थोडेच आहे. 💕


शेवटी विधीलिखीत म्हणून मला प्रथम वर्ष  B Sc पूर्ण होताच नोकरी लागली आणि माझे डिसेक्शनचे पाप कायमचे थांबले. आता मी फक्त संधी मिळेल त्यांच्या मनात डोकावून त्याची नकळत छाननी करते. यात पापही नाही त्या, उलट झाली तर मदत करत बसते. तसेही मनाच्या सप्तपाताळात काय काय दडून बसलय कोणाला  डिसेक्शन करुनही  समजलंय ? आपण केवळ परत परत तना-मनाच्या निर्मात्या त्या अगम्य अनाकलनिय  अदृष्य जादुगारास  त्रिवार वंदन करुन नतमस्तक व्हावे !!! 👏


विजयश्री तारे जोशी

ता-20.9.2020



टिप्पण्या

  1. खूपच सुंदर. झालाय लिखाण. आधी मनसोक्त हसल्यानंतर शेवटच्या paragraph मध्ये केलेले मनाचे विश्लेषण आणि ह्या चराचरात असलेल्या परमेश्वरी शक्तीचा हात ह्याने अंतर्मुख झाले. खूप सुंदर. आजपर्यंतच्या सर्व ब्लॉग मध्ये मला हा सर्वात जास्त आवडला

    उत्तर द्याहटवा
  2. नेहमीच छान लिहीता मॅडम तुम्ही... तुमच्या ब्लॉगने माझे राजाराम कॉलेजमधले दिवस आठवले.विशेष म्हणजे बेडकाचे डिसेक्शन करताना मला दिलेले बेडूकराव पण शुध्दीवर आले होते आणि आमची प्रयोगशाळेत पळापळ झाली होती ते सर्व परत आठवले.पण एकंदरीत मजा यायची.खूप खूप धन्यवाद कॉलेज मध्ये परत घेऊन गेल्याबद्दल....🙏🙏🙏🙏🙏
    सुहास नाईक

    उत्तर द्याहटवा
  3. जया नेहमीप्रमाणेच खूप मस्त .प्रत्येक वाक्य वाचताना मी हसत होते कारण या सगळ्या अनुभवातून मी गेली आहे. मस्त मजेचे होते ते दिवस .

    उत्तर द्याहटवा
  4. अहो मॅडम , फारच छान लिहिलंय.कॉलेज चे दिवस आठवले आणि आम्हीही डिसेक्शन केल्याचे आणि बेडूक रावांनी जागे होऊन पाय मारून अंगावर पाणी उडवल्याचे आठवले. आमची एक सहाध्यायी पाणी अंगावर उडवल्यावर स्टूल वरून घाबरून पडल्याचे आठवले.. एकंदरीत तुम्ही आम्हाला आमच्या रम्य भूतकाळात नेण्याचे काम छान करत आहात.

    उत्तर द्याहटवा
  5. यातुन मीही गेलोय
    आठवड्यातुन२ दिवस desection
    practical..
    नंतर ४ दिवस जेवण जायचे नाही
    आम्ही पडलो pure veg.
    detail mg lihito
    👌👌👍
    excellent..writing
    u r the best..
    लेखिका .
    विषय कोणताही असो.हुबेहुब प्रसंग वा कल्पना समोर उभी करणेचे उत्तम कौशल्य
    काय करताय विमा कंपनीत?😀😌
    साहित्य क्षेत्रात उच्च शिखरावर जा.
    👌👌👍👍.

    उत्तर द्याहटवा
  6. लिखाण करा.
    सर्वोत्तम. कायम शुभेच्छा
    मनापासुन.

    उत्तर द्याहटवा
  7. एकदम मस्त. बेडकाचं डिसेक्शन वर्णन वाचतांना मजा आली. बरं झालं तुम्ही डाॅक्टर झाला नाही. आम्ही एका साहित्यिकाला मुकलो असतो 😁
    कोटीभास्कर

    उत्तर द्याहटवा
  8. एकदम मस्त. बेडकाचं डिसेक्शन वर्णन वाचतांना मजा आली. बरं झालं तुम्ही डाॅक्टर झाला नाही. आम्ही एका साहित्यिकाला मुकलो असतो 😁
    निलिमा परांजपे..श्रुती डोंगरे

    उत्तर द्याहटवा
  9. मॅडम, खूप छान लेख आहे, आपला प्रयोग, प्राण्याची चिरफाड हे सगळं सोडून इन्शुरन्स क्षेत्रात कसे काय आलात, यांचावर ऐक लेख लिहा, असं मला वाटतं. 🙏
    विजय मोरे

    उत्तर द्याहटवा
  10. आठवण झाली कॉलेज दिवस ,मी पण घाबरले होते ,न बेडूक ट्रे मधून खाली पडला ,आठवणी ताज्या झाल्या मॅम
    श्वेता पोक्ले

    उत्तर द्याहटवा
  11. बेडूकच काय उंदीरही फाडलाय. बेडूक परवडला हा नको. त्या टाचण्या टोचताना वेदना व्हायच्या. कठे तरक येशू दिसायचा. किती क्रौर्य होत ते डिसेक्शन? जोशी मॅडमना पक्ष पंधरवडा संपताच का आठवावा? कावळे झाले बेडूक आता पुढचा प्राणी कोण ते सांगावे म्हणजे डबल मास्क लावून व्हाट्स अप उघडतो.
    डिसेक्शन बाॅक्स दोन प्रकारचे होते. एक भारी दुसरा हा गुलाबी कचकड्याचा. मेडिकलला जाणारे तो भारी वापरायचे. दुसरा कसं बसं वर्ष संपवणार्यासाठी.
    बिच्चारा बेडूक हात पाय पसरून पाण्यात पडलेला असायचा. त्याच वेळी तो डेमाॅनस्ट्रेटर कात्रीने उभा कट घ्यायचा. मी आपला ए ग्रुप निवडला. मुलगी मात्र माझ्या पुढे गेली.
    1967 ला केलेलं डिसेक्शन 2020 आज आठवलं जसच्या तसं.
    अशोक हवालदार

    उत्तर द्याहटवा
  12. ✌👌✌🙏 Really great u r 😊😁😊
    Tujya batavya madhe ani kiti dadaleya he tya devala pan mahit nahi ASE vatateya. 😊
    ATI sunder dissection
    Bare zale Dr zale nahis te .Nahi tar tar ek Chan lekhak la gamavalo asato nahika .Ani amhala amacha utara vayat vachayala milaletar nasate .Chan asecha lihit ja.

    उत्तर द्याहटवा
  13. डीसेकशनचा थरार मस्त रंगवला आहेस. बॉटनी ची टूर एन्जॉय करतानाच प्राण्यांची कापाकापी करतानाचा थरकाप याचा विरोधाभास अनुभवालास आणि आत्ताच अनुभवलास असा लिहिलास म्हणून जास्त परिणामकारक झाला .अनुभव मजेशीर होते .आमच्यासारख्या कॉमर्स वाल्यांना पण छान समजले डीसेकशन म्हणजे काय ते इतकं डिटेल मध्ये लिहिलं आहेस.रक्तरंजित क्रांती उपमा मस्त. अज्जीच्या भुतदायेच्या गोष्टी ऐकून dissection केलेल्या प्राण्यांची आलेली
    दया संवेदनक्षम मनाची ओळख करून देते . लेखामध्ये आलेला याचा उल्लेख केवळ लाजवाब. चराचराचा रचनाकार आणि किमयागार राची सृष्टी यांची महानता मान्य करत केलेला शेवट लेखाला खूप अर्थपूर्ण बनवतो. मस्त जमलय डीसेकशन
    शैला उर्फ मृदुला चिटणीस

    उत्तर द्याहटवा
  14. खूपच छान वर्णन केल आहे श्री तू!!! डिसेक्शन केलं प्राण्यांचं, नोकरी करते आहेस न्यू इंडियात!!! पण तुझा खरा प्रांत आहे लेखनाचाच!!! खूप खूप छान लिहितेस तू! नोकरी करताना किती भावना तू डांबून ठेवत असशील नाही? आवडणार काम करायला खूप काही करावं लागतं नाही, न आवडणार काम करायला च खरी हिंमत लागते!!
    तू नोकरीत पण कुठंच कमी पडली नाहीस आणि लेखिका म्हणून तर नाहीच नाही!!! दोन्ही आघाड्यांवर अग्रेसर आहेस आणि राहणारच!!!👍

    उत्तर द्याहटवा
  15. jgd. "डिसेक्शनचा थरार" हे शीर्षकच चकरावयला लावणारं! यात thrill की भयातील खुमार ? हा प्रश्न मला पडतो कारण या शरीर विच्छेदनाच्या कल्यनेतील भयगंडाने मी "सायन्सला प्रवेशपूर्व रामराम ठोकला.त्याच विषयावरचे एका स्त्री मनाचे मनोगत या लेखात आहे. फिजिक्स मॅथस् सारख्या निर्जीव शास्त्रात जीवशास्त्र कसे सामील झाले हेच कोडे आहे. एकीकडे पंचभौतिक देह व दुसरीकडे चैतन्य या संधीवर वसलेला जीव मन बूद्धिच्या मेळ्यात कसा सापडला !हे गूढच उलगडत नाही.जीवशास्त्रातील वनस्पती शास्त्राविषयी अभ्यास आवडणारा असला तरी प्राणिशास्त्रासाठी करावयाचे विच्छेदन न मानवणारे असल्याने तो पंथच मी सोडला.त्या विच्छेदन शास्त्राचे विच्छेदन करायचे धाढस होत नाही. तुझा अनुभव तेच सांगतो की विच्छेदन किती जीवघेणे आहे. जीवाचे रहस्य उलगडण्यासाठी पिंडाची चिरफाड करुन काय जीवरहस्य समजते हे न समजणारे स्पिंक्सचे कोडे वाटते. anatomy of human body or other animal body शरीर हे यंत्र (mechanism) समजून शरीररचना समजू शकते व चिकित्साशास्त्राला त्याचा उपयोगही होतो,उपचार शास्त्रासाठी आधार मिळतो तरी . जीवाचे शास्त्र समजून ते कळण्यासाठी कोणाचा जीव घ्यावा हे न पटणारे क्रौर्य वाटते,पण रोगनिवारणासाठी कठोरपणे करुणा धारण करणार्‍या शस्त्रविशारदाला हे विच्छेदन तंत्र आवश्यक असते,त्याच न्यायाने "अहिंसा परमो धर्मः" व जीवदया हे मानणार्‍या बेले सरांसारख्या प्राध्यापकांना प्राणिविच्छेदन शिकवावे लागते व विद्यार्थ्यांला हळवेपण असताना ते शिकावे लागते. बेशुद्ध केलेला उंदिर, गांडूळ,झूरळ असो वा बेडूक फाडून तपासताना संवेदनशील मनाची होणारी तडफड ही विच्छेदित जीवाच्या तडफडीपेक्षा वेगळी नसते. मुलांपेक्षा मुलींना कसे वाटते,हे अनुभव या लेखात आहेत, बेशुद्ध पडलेली मैत्रीण!,जेवताना फाडलेल्या प्राण्याची आठवण, मनावरले पाप पुण्याचे जूने संस्कार व त्यामूळे मनाची होणारी बेचैनी ,सारे लेखात सहज येते. "जीवातळी अंथरितू जीव आपला" या भावना झूसळासारख्या चिरडताना मनाचा होणारा थरकाप! डाॅक्टरांची कठोरपणातील करुणा रुग्णासाठी वरदान असते,हे खरे पण हे विच्छेदनातले क्रौर्य मनाला टोचत रहाते. बेले सरांचे मितभाषेतून ही नेमके मार्गदर्शन करण्याचे कौशल्य व कळकळ खरोखर चांगली आहे. आंबा घाटातील बोटॅनिकल ट्रिप्स या समृद्ध वनस्पती वनामूळे स्मरणीय व अनुभवसंयन्नट! काॅलेजचे जीवनातील या आठवणी या पुढच्या आयुष्याची समृद्ध ठेवच जणू!सारे लेखणीतून साकार झाले आहे, विषयाचे वेगळेपण व सरांचे कृतज्ञ स्मरण आणि प्रयोग शाळेतील थरार,दडपण सारे कांही सुरेख शब्दबद्ध झाले आहे. विच्छेदनाचा भयकारी अनूभवही मनोरंजकपणे खुलवला आहे. काॅलेजच्या कट्यावरच्या गप्पा रंगवाव्या तसा अनुभव रंगवला आहे. अभिनंदन!💐💐💐(श्री, एस.डी.शेटे,सागांव *वारणा)

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. जय कर्मवीर
      आदरणीय शेटे सर,सप्रेम
      नमस्कार,तुमच्या कोमल मनास सायन्सचा माझा थरार रूचणे शक्य नाही.पण अप्पानी तरी मला या अनुभवासाठीच तिकडे धाडले की काय नकळे.नंतर साइड बदललीच की😁 असे सगळे अर्धवट सोडून मी जास्त समृद्द झाले.इथे काय तिथे काय आहे असे सगळी कडे धावत खूप क्षेत्रांची मुशाफिरी झाली. आता समजले की प्रत्येक गोष्टी मागे अगदी झाडाचे पान हालणे हे ही त्याच्याच इच्छेने.आता इतके आयुष्य मुठीतून निसटल्यावर व्यक्त व्हावे असे वाटले...ते ही लेकी मुळे नाहीतर हे सगळे माझ्या डायरीत,मनात बंदिस्त राहिले असते.तुमच्या शब्द संपदेस शोभतीलसे दागिने नाहीत माझ्या ओंजळीत.मनात येईल ते वेडे वाकडे लिहीत जाते. अड्खळत चालणाऱ्या मुलास आई कौतुके हसते..असे झाले हो हे😁 असो मला चुकीची जाणीव द्या इतुकीच मागणी..


      आपलीच फुलपाखरू शिष्या
      जयश्री तारे जोशी

      हटवा
  16. जादूगाराने त्याच्या पोतडीतून एकेक मनाला भुरळ पाडणार्या वस्तू काढाव्यात तशा तू तुझ्या आठवणींच्या पोतडीतून एकेक सुरेख आठवण बाहेर काढून आम्हाला अगदी खिळवून ठेवतेस बघ .तुझ्या महाविद्यालयातील प्राण्यांची चिरफाड करतानाच्या गंमती तुझ्या खुमासदार शैलीत अशी रंगवून सांगतेस की आपणासमोर तो प्रसंग जणु घडतोय इतकी तुझी लेखन हातोटी बोलकी आहे आणि अशा विनोदात आपण रंगलो असतानाच जीवनाचे तत्त्वज्ञान पण उत्तम सांगतीस,आजीच्या स्वभावातील भूतदया पण हळूवार होऊन सांगतेस अशा या बहुविध भावना जपणार्या तुझ्या आठवणीं वाचायला मजा येते ,लेख मोठा असूनही कुठेही रटाळपणाचा वारा त्याला लागत नाही हे मोठे वैशिष्ट्य आहे तुझ्या लेखाचे !
    मनीषा कुलकर्णी दुबई

    उत्तर द्याहटवा
  17. अप्रतिम...काय प्रतिक्रिया द्यायची हेच समजत नाही....you are genius writer...प्रतिभावंत लेखिका....शुभेच्छा 💐💐👍
    अप्पासाहेब इनामदार

    उत्तर द्याहटवा
  18. प्रा एस पी चौगले। मला माझे सायन्सचे दिवस आठवले.आम्हाला botany, zoology प्रा जाधव मॅडम शिकवत. महिला असून त्या गांडूळ,झुरळ,बेडकांचे dissection करताना आम्हाला आश्चर्य वाटायचे. ते सर्व दिवस आठवले. खूप छान अनुभव, भाषा ओघवती आहे.धन्यवाद ।।।

    उत्तर द्याहटवा
  19. तारे मॅडम आपला लेख वाचायला सरुवात के ली आणि नजरेसमोरून रम्य ती मलकापूर नगरी, हिरवीगार महादेव टेकडी, (कास पठारा सारखा) लांडोबाचा माळ, शाळी व कडवी नद्या मनाला वेड लावणारा आंबा घाट , विशाळगड चे घनदाट जंगल,आणि माझे ज्युनियर कॉलेज व लॅबोरेटरी माझ्या नजरे समोर आली.
    १९७५ ला केवळ १७ विद्यार्थी व रत्न प्रभा तांदळे नावाची एकमेव विद्यार्थिनी असा १८ विद्यार्थ्यांचा ११ वी सायन्स चां क्लास पंत प्रतिनिधीच्या वाड्यात सुरु झाला. त्या छोट्या रोपट्या चे आज भव्य इमारती व शेकडो विद्यार्थी असे वटवृक्षात रुपांतर झालेलं पाहून समाधान वाटते
    आपण ४० वर्षापूर्वीच्या प्रसंगाचे जे वर्णन केले आहे ते थक्क करणारे आहे.

    बॉटनी टूर चे वर्णन तर लाजबाब. आजही आंबा घाटातून प्रवास करताना तुमच्या प्रमाणेच प्रतेक वळनावर माझ्या अनेक आठवणी आहेत. येथे सर्वांनी डबा खाल्ला, येथे झऱ्याचे थंडगार पाणी पिलो, येथे मुले कब्बडी खेळली, इथे मुलींनी गाणी गायली, या डेरेदार झाडाखाली दुपारची विश्रांती घेतली, या टेकडीवर मुले वर पर्यंत गेली होती, या ठिकाणी फोटो काढले, इथे आवळा व शिकेकाई ची खूप झाडे होती, अशा अनेक आठवणी

    रंगबिरंगी फुलपाखरांचा थवा अथवा किलबिलाट करणाऱ्या पक्ष्याचा थवा असावा असे माझ्या भोवती चैतन्याने सळसळणारी तरुणाई सोबत घाटात दिवस कधी संपला हे कळत नसे.

    प्रयोगशाळेतील वर्णन सुद्धा इतके हुबेहुब शब्दबध्द केले आहे की जणू ते प्रॅक्टिकल मी आजच घेतले आहे इतका जिवंत अनुभव देऊन गेली धन्य ती आपली लेखणी ( सायन्स student असून सुध्दा) आणि भाषाशैली आणि अचूक निरीक्षण (बेडकाच्या आंघोळीचे) तर कमालीचे थक्क करणारे आहे. या निमित्ताने आठवले. राजन हर्डीकर, असाच एक स्मार्ट अवखळ विद्यार्थी प्रयोग शाळेत येतानाच ग्राऊंडवर पकडलेली बेडके दोन हातात दोन घेऊन यायचा मुलींना भीती दाखवत माझे एक्स्ट्रा बेडूक मी पुन्हा dissect करणार आहे असे म्हणायचा असो खूप मजा येत असे. अश्या किततरी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

    ७५ ते ८७ या काळातील खूप आठवणी आहेत एक वेगळा लेख लिहीन. रिटायरमेंटचा काळ आणि lockdown मध्ये तुमचे लेख खूप ऊर्जा व आनंद देऊन जातात असेच लिहीत जा शेवटच्या paregraph बद्दल लिहिण्यासाठी माझे कडे शब्द नाहीत.

    या तुमच्या या लेखाचा आणखी एक अपूर्व योगायोग असा माझी कन्या मेघा माझ्या भाचीला मलकापूर कॉलेजचे मोकळे आकाश हा लेख पुन्हा एकदा वाचून दाखवत होती तेव्हा मी म्हणालो बेडूक dissection वर तारे मॅडम आणखी एक लेख लिहिणार आहेत आणि अहो आश्चर्य काही वेळातच हा लेख झळकला.

    प्रा. सुभाष बेले. २२-९-२०. कर्मवीर जयंती.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सर,सर्वात आधी आपले स्फूर्ती स्थान आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. लेखा वरचा आपला अभिप्राय वाचून डोळ्यात पाणीच भरले. तुम्ही,शेटे सर,शेख सर आज माझे लेखन वाचता,आणि त्यातून माझ्या वेड्या लेखणीचे कौतुक करता ..यात सगळे भरुन पावले. खूप भरुन आलेलं आभाळ,पाऊस मात्र पडत नाही,अंगाची काहिली असं काही झाले होते डोक्यात.मग लेकीने भरीस घातले म्हणून हा लेखन प्रपंच. फार काही नाही,त्याचे शब्द लेखणीतून धो धो बरसू लागले. तब्बल 40 वर्षाचा प्रवास आज केला इतके मन फ्रेश झाले. माझ्या लोकांस जिवंत करुन जोडताना पुनर्जन्म झाला असे वाटले. घड्याळ उलट फिरवून ते निर्धन,निष्पाप पण स्वर्गसुख देणारे श्रीमंत दिवस जगायला मला फार आवडेल.सगळ्याना आनंद द्यावा असा एकमेव ऊद्देश असल्या मुळे अजून तरी सीरियस काही लिहावे वाटत नाही. आनंद वाटावा आणि सल आत ठेवावा असेच वाटते.तसे ही प्रत्येक जण सल सांगू लागला तर जगातील निखळ आनंदाने कुठे जावे??? माझ्या लेखांचे सार्थक गुरुचरणी व्हावे या उपर भाग्य ते कोणते..

      तुमचीच भाग्यवान शिष्या
      जयश्री तारे.उर्फ विजयश्री जोशी

      हटवा
  20. [20/09, 17:57] Smita Sapre: Pratham khoop hasavnuk hote ga, pan nanatar tya dissection chya jevanchya yatana wachun ( pahilya asatya tar malahi gheri ali asati) khoop radavnuk kelis bayo
    [20/09, 17:59] Smita Sapre: Tumchya shri Bele sarancha photo ani tyanche knowledge wachun tyana 🙏🏻🙏🏻
    Smita sapre

    उत्तर द्याहटवा
  21. हे नको होते म्हणून आठवी पासुन बारावी पर्यंत टेक्निकल घेतले होते...
    😆😆😆

    उत्तर द्याहटवा
  22. What a horrible story...I am laughing a lot. .my daughter also enjoys your story..keep writing

    R.s.Patil

    उत्तर द्याहटवा
  23. खुपच सुंदर लिखाण..भुतकाळातल्या आठवणी जाग्या झाल्या..मीच डिसेक्शन करत आहे,असंच वाटत होतं.श्री.बेले सरांचा फोटो बघुन बरं वाटले..लगेच सर डोळ्यासमोर आले..सरांना माझा आदरपुर्वक नमस्कार..🙏🙏.तुझी लेखणी जादुची आहे का गं?एवढं सगळं तुझ्या लेखणीतुन येतच कसं?खरच तुझ्या भुतकाळातल्या आठवणी जशाच्या तशा आमच्यापर्यंत पोहोचवतेस..कसं काय करतेस?सलाम तुझ्या लेखणीला आणि तुझ्या आठवणीला.🙏🙏..असेच लेख लिहीत जा...आणि आम्हाला भुतकाळाची सफर घडवत जा..
    सौ.प्रतिभा हरोलीकर पुर्वीची प्रतिभा प्रभावळकर

    उत्तर द्याहटवा
  24. काय सुरेख वर्णन...सायन्स मधून पळालो ते बर झालं...पाप नै हो...कोमर्स बरे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -