- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
‘लाडक्या जावयासाठी खुसखुशीत अनारसे मिळतील’ अशी पाटी पुण्यनगरीत बाजीराव रोडवर दिसली की अवघी जावई जमात खुश होते.😊 एक तर जावई म्हणजे 'दशमग्रह' तो न आलेलाच बरा असे पौराणिक दाखले असताना सासुरवाडीहून चक्क ‘लाडका’अशी उपाधी मिळाल्याने त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले नाहीत तरंच नवल. कोल्हापूरमध्ये मात्र जावयाशी फार लाडिकपणा न दाखवता ‘हितं अनारसं मिळतील’ असे रोकठोक बोर्ड लागतात!🤣 एकूण काय जावई जातीचा हा अत्यंत आवडता महिना असून त्यांना गोडधोड उत्तम पदार्थाचे वाण लाभून वरुन बोनस म्हणून त्यांना चार कौतुकाचे शब्दही कानी पडतात. आता या महिन्याला ‘धोंडा महिना’ असेही एक नाव आहे हे सुज्ञांनी लक्षात ठेवावे.😉 हा मास तीन वर्षातून एकदा येत असल्याने असे जावई खुष करणे परवडत असावे. दरवर्षी आला असता तर 'रोज मरे त्याला कोण रडे?' असे म्हणत तो एक दुर्लक्षित घटक राहिला असता. अधिक मास ही एक एक्स्ट्रा इनिंग असल्यामुळे कोणतेही शुभकार्य करायचे मुहूर्त या महिन्यात नसतात, फक्त हळदी-कुंकू, धार्मिक कार्य, प्रवचन, भजन, कीर्तन, सत्पात्री दान आणि जावई कौतुक सोहळा अतिमहत्वाचा गणला जातो.
हल्लीच्या एकुलत्या एका जावयांचे कौतुक करायला सगळी सासुरवाडी आतुर असते. स्माइली🙂, पाऊटी😗 करत फोटो वर फोटो काढत मजा मजा सुरु असते. मुली कमी आणि सुबत्ता फार. माय-बापाना काही कमी नसतं. त्यामुळे जावई रुसणे फुगणे फारसे होत नाही कारण अंतर्गत स्पर्धाच नसते. पण एक काळ असा होता की घरामध्ये डझनाच्या आकड्यात अर्धा, पाव डझन मुली असत आणि त्यामुळे जावईही डझनात!😅 त्यांची कौतुकं करायला माता पित्याना वर्षभर पैशाची जोडणी करावी लागे आणि जमेल ते उत्तम दान देताना माय बाप भिकेस लागायची पाळी येई. हा मास त्या मुलींच्या माहेरच्या लोकांची सत्वपरिक्षा घेई. त्या मुलींची माता गल्लीभरच्या पाककलातज्ञ सुग्रणींना बोलावून ‘अनारसे’ नामक पदार्थाचा घाट घाले. 👩🍳 पारंगत ललनांचे दशमुखाने दिलेले सल्ले ऐकत आधी तांदूळ काही काळ भिजत टाकून वाटायचे, वाटणात गूळ घालून ते पीठ छान मुरवायचे. मग या पिठाची गोळे करुन वर खसखस लावून हळुवार हातांनी, बोटांनी नजाकतीने थापायचे. फक्त बोटांची अग्रे वापरूनच ही कला हळूवार साकारायची, उगीच भाकरीसारखे धपा-धपा थापटायचे नसते. हळूहळू त्याला गोल आकार देत मस्त साजूक तुपात त्याचे गाल गुलाबी होई पर्यंत खुसखुशीत तळून काढायचे. कधी कधी तो अनारसा ‘हसतो’ म्हणजे तुपात टाकला की त्याचे एकसंध सैन्यदल विखुरुन जाते, बारीक तुकडे होऊन त्या तुपात स्वतंत्र उमेदवारां सारखे तरंगू लागायचे. मग सगळ्या तज्ञ रणरागिणी मिळून त्या पिठात काही बाही घालून त्याला नीट वळणावर आणत.🙃 अगदीच बिघडले तर ते पीठ कुणाची नजर लागून 'पायरवले' असे म्हणत, त्या अज्ञात व्यक्तीस दूषणे देऊन परत घोळ घालत बसत. सगळे पाककौशल्य इथे पणाला लागे. अनारसे तुपात मंद तळावे लागतात, नाहीतर क्षणार्धात करपून जाऊन शीघ्रकोपी जावया सारखे तोंड काळे करतात!🤣 थोडा जरी जास्त तळला तरी चव बदलतो, गुणही बदलतो. मऊ पडला तर जावयाच्या घराण्यातील लोकांच्या टाळूस चिकटतो, कडक झाला तर मात्र दातांच्या कवळ्या बाहेर काढतो किंवा दातांच्या नकली टोप्या उडवून टाकतो. पुढच्या अधिक मासाला जावई 'अनारसे नकोत.. नकोत' करून कंठशोष सुरु करतो. अनारशांच्या या प्रथेने अनेक सुग्रण ललनाना अगदी तोंडघशी पाडले आहे. आता बरे आहे होsss ऑर्डर दिली की अनारसे ताटात तय्यार!!! पण त्यांना गृहलक्ष्मीच्या हस्तस्पर्शाची मजा नाही बरं ! 🤗
अनारसा हा पदार्थ जावयास देण्याची प्रथा कोणी का सुरु केली हा संशोधनाचा विषय ठरावा. असा हा महाप्रयत्नांनी साधलेल नाजूक पदार्थ ३०+३ अशा संख्येत ताटात मांडून मधे तांब्याचा दिवा ठेऊन जावयास मानपान म्हणून देण्याचा प्रघात आहे. हल्ली चांदीचे दीपही दान देतात पण तांब्याच्या दीपाचे दान सर्व श्रेष्ठ मानले जाते. 🪔 सोबत लाडक्या लेकींचेही साग्रसंगीत मानपान होते. सगळ्या गल्लीला बोलावून, हळदीकुंकू करत, साक्षी-पुराव्यासह हे दान केले जाते. पुर्वीच्या काळी अमुक हवे तमुक हवे असे करून ‘जावईबापू’ रुसत त्यामुळे बिचारी वधूमाय कायम टेन्शनमध्ये असे.😅 अनारसा हसला की जावई रुसला हे बघण्यात तिचा अख्खा महिना कारणी लागायचा. असा हा अनारसा या महिन्याचा राजा आहे, भले कडक झाला म्हणून गरम गरम चहात बडवून खावा लागला तरी याचे महत्व तिळभर (खसखस भर) कमी होत नाही. जितक्या मुली जास्त तितका सोहळा रंगतदार होई आणि पुढच्या अधिकापर्यंत डझनातले जावई आपल्याला काय कमी दिले याचा हिशेब पाठ करुन ठेवत. सगळी गल्ली पुढच्या अधिकापर्यंत त्या 'पुरुषोत्तम ' जावयांचे कौतुक करत बसे. 😂
जावयाला जाळीदार पदार्थ द्यायचे असतात असा एक समज असल्याने सगळीकडे चढाओढ लागलेली असते.🍥 अनारसे हा मुख्य हिरो असला तरी जाळीदार मैसूरपाक, बत्तासे असेही दान चालते. जाळीचा अधिकाशी काय संबंध आहे ही पद्धत कुठून सुरु झाली आणि कारण काय असावे समजत नाही. शास्त्रीय आधार पाहता आपले नेहमीचे मराठी महिने म्हणजे चांद्रमास असे ३३ चांद्रमास गेले की एक अधिक मास येतो. या मासाला पुढच्या मासाचे नाव देतात. अधिक मास सौर कालगणनेची उणीव भरुन काढतो. सर्व काही अधिक करणारा तो अधिक. या महिन्यात दानाचे पुण्य खूप असते. काही ठिकाणी दानाच्या दहापट पुण्य मिळते असे लिहिले आहे तर कुठे तेहतीस पट पुण्य मिळते असे नमूद केले आहे, एका पुस्तिकेत तर शंभर पट असेही लिहिले आहे. तो हिशोब चित्रगुप्तच पाहून घेईल हे एक बरे !📝 उगीच इथे सामाजिक संघर्ष कशाला पेटवायचा? या मासाला पुरुषोत्तम मास असेही संबोधन आहे. या महिन्यात कोणतेही शुभकार्य करायची परवानगी नसल्याने हा धोंड महिना नाराज होऊन भगवान विष्णूंकडे गेला. म्हणून भगवान विष्णूंनी त्याला ‘पुरुषोत्तम मास’ हे नाव दिले. या नामांतरणास कुणीही विरोध केला नाही हे विशेषच ! काही पौराणिक दाखल्यानुसार भगवान श्रीकृष्णानी या महिन्याला पुरुषोत्तम हे नाम दिले. आता भगवान विष्णू की श्रीकृष्ण हा निर्णय भक्तांनी स्वमताने घ्यावा पण दान आणि आराधना करावी हे बरे. 🙏
![]() |
| Beautiful Adhik Maas pooja performed by my friend Manisha Bhosale-Desai. |
हा महिना व्रतवैकल्य आणि दैवी आराधना यासाठी राखून ठेवलेला आहे. पुण्यप्राप्तीसाठी जेवणावळी, दांपत्य पूजन, दानधर्म केले जाते. दांपत्यास विष्णू-लक्ष्मीचे रूप समजून आधी त्यांची पाद्यपूजा केली जाते. चरणावर उष्णोदकाचा अभिषेक करून, चरण पुसून त्यावर हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढतात. मग झोपाळ्यावर बसवून, ओवाळून लक्ष्मीची हळदीकुंकू लावून ओटी भरली जाते व विष्णुरूपी पुरुषोत्तमास यथाशक्ती दान दिले जाते. तेहतीस दांपत्याना भोजन देऊन तृप्त केले जाते. सर्व सुख प्राप्ती साठी अनेक व्रते केली जातात. रोज देवा समोर रांगोळीची तेहतीस शुभ चिन्हे काढतात.अकरा ज्योतींची मंजूळवात करून तुपाचा दीप लावतात. घराचे वातावरण पवित्र रहाते. जावई हा घरात अधिक झाला म्हणून त्याचेही कौतुक करण्याची प्रथा रूढ झाली असावी.🤴 आता घरात सून नवीन सदस्य आली म्हणून प्रेमळ सासूबाईनी तिलाही वाण देऊन कौतुक करावे.👸 आता काही पूर्वीसारख्या डझनावारी सुना-जावई नसतात.
आसाम/केरळमध्ये काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धत अस्तित्वात आहे. तिथे जावई पसंत करताना त्याला नारळाच्या झाडावर सरसर चढता येते की नाही, घरकाम येते की नाही अशी साग्रसंगीत वरपरीक्षा होते.🤷♂️ वधू पक्षाला सर्वगुणसंपन्न, धट्टाकट्टा जावई हवा असतो, अशा पारखून घेतलेल्या जावयाने मग घरजावई होऊन मुलीच्या घरी कायम नांदायला जायचे असते. तो जावई सासरी सासूरवाशिणी सारखा राब राब राबतो.💁♂️ त्यांच्या माहेरच्या आठवणींची गीते, विरहाचे दुःख असणारी गाणी, आई-बाबांच्या आठवणीने ढाळलेले अश्रू आपल्या मराठी संस्कृतीस माहीत नाहीत. त्यांच्या मनीच्या कथा नक्कीच जाणून घ्यायला आवडतील. असे ही काम करत नांदणारे जावई सुद्धा आपल्या विविध परंपरेने नटलेल्या देशात आहेत! 🙆♀️
अशी ही अधिक मासाची मजा भक्ती रंगात रंगून लुटू, मनापासून आनंदोत्सव साजरा करू. मंजूळवातीचा दीप लावून वातावरण पवित्र करून यथाशक्ती दान उपेक्षित गरजू लोकांना देऊन खरा अधिक साजरा करुया. गेल्या सहा मासाचे सगळे दिव्य विसरून त्या भगवान विष्णू, श्रीकृष्णच काय आपल्या तेहतीस कोटी देवाना सगळ्या जगाचे कल्याण कर, सगळ्यांनाच सुखी, समाधानी ,आरोग्य संपन्न आयुष्य दे असे विनवू. 🙂
अरे होsss त्या तीस-तीन अनारशाचा घाट मात्र घालाच ! तेवढं खुसखुशीत प्रेम नको का आपल्या लाडक्या जावयावर ???😉
विजयश्री तारे-जोशी
२६-०९-२०२०
स्थान:
Kolhapur, Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या




लेख मस्त बनलाय. अजिबात 'हसला' नाही.
उत्तर द्याहटवाधन्यवाद वसंत जोशी! 😃😃
हटवाअश्शी सासूबाई मिळावी प्रेमळ... प्रत्येक जावयाला.. !!
उत्तर द्याहटवा😃😃 Nakkich!!
हटवालेख चवदार झालाय बघा.
उत्तर द्याहटवाThank you Mr. Sathe!!
हटवाहा हा हा...ंंमला आजून कधी दान दिले नाही हो..विचारतो त्याना...लेख फार भारी..इतक काय माहीत नाही हो..कधी इतका अभ्यास कर्ता..
उत्तर द्याहटवाR.S Patil
Vichara nakki!!! 😃
हटवाThank you Mr. Patil. Abhyas kuthla aho, athaun athaun lihila. Baryach maitrinihi khup madat kartat! 😊
मस्तच! जावई इतका महत्वाचे असतात हे पहिल्यन्दा कळले. खूप छान लेख, अधिक मास मध्ये थोडी अधिक माहिती, म्याडम हा पुरषोत्तम मास म्हणून पण प्रसिद्ध आहे, या महिन्यात गीता भागवत श्रवण केले पाहिजे. कीर्तन केले पाहजे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे!हरे राम हरे राम राम राम हरे हरे! धन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवाविजय मोरे
Thank you Mr. More!!
हटवाHo bhajan, Kirtan nakkich kartat ya mahinyat. 😊
मस्त खुसखुशीत
उत्तर द्याहटवाThank you!!
हटवाखूपच सुंदर मॅडम....तुमचा लेख वाचून मला अनारसे खावेसे वाटू लागलंय..जे मला कधीच आवडले नाहीत.🤣🤣🤣
उत्तर द्याहटवा😂😂 Ghari karaycha ghaat ghala nakki!! Ugich baherche khau naka!!
हटवाThank you so much.
विजयश्री,आपल्या महाराष्ट्रात असलेल्या इतर पारंपरिक मंगळागौरीच्या वर्णनाप्रमाणेच अधिक महिन्याची अगदी वाणातल्या खुसखुशीत अनारशासारख्याच खुसखुशीत शैलीत लिहीलीस !अनारसे बनवतानाचे कौशल्य तर तुझ्या लेखणीच्या कौशल्याची कमाल करणारे वर्णन आहे .जावयाचे रूसणे,अनारसें कडक झाले तर पुढच्याखेपेस अनारसे नको म्हणून कंठशोष करणे अशा गंमतीदार वर्णनाने लेखाला हलकेफुलकेपणा आला आहे केरळमध्ये जावयाला घरजावई होऊन सासूरवाडीला राबराबराबावे लागते ही नवीन माहिती मिळाली
उत्तर द्याहटवाएकुणच लेख खुसखुशीत विनोदाचा मधून मधून शिडकावा केल्यामुळे व अतिशय ओघवती भाषा असल्यामुळे लेख अप्रतिम झाला आहे यात शंका नाही !!
मनिषा कुलकर्णी दुबई
धन्यवाद मनीषा!
हटवाकिती छान प्रतिक्रिया.. आता केरळचा जावई शोधते मुलाखतीसाठी आणि पार्ट २ करते या आर्टिकलचा. 😂 म्हणजे वाचक लेकी सुना अगदी खुश होतील.
ताई किती सुरेख माहिती..पुण्यात खरंच असा बोर्ड लागतो..आता आनारसे खावे वाटायला लागले...केरळ जावई माहिती भारी,आमचा जीव भंड़यात पडला
उत्तर द्याहटवामिलिंद कुलकर्णी
Yes, I have seen those boards in Pune and laughed a lot.
हटवा😂😂 खरंच महाराष्ट्रात जन्माला येऊन बरेच पुरुष सुखी आहेत. पण केरळवासियांचा संसार जाणून घेणारच आहे मी आता.
धन्यवाद मिलिंद कुलकर्णी!!
Sunder bhashet poorn mahiti jyana mahit nahi "Adhik masa "baddal chanasi mandalela ahe. Apla mahit Karun ghene Karun dene ATI mojakya shabdat ATI sunder. Pan unfortunately mala Kanya nahi ani javayi.Devani nivadak lokanacha javayi deto ASE mala vatate. Anakin Kaya lihu.chan .
उत्तर द्याहटवाR.B.Tophkhane
Sundar ani bhavanik pratikriya.
हटवाThank you so much Mr. Tophkhane. 😊
As usual very nice blog.
उत्तर द्याहटवाAnarase Hasane upama Sunder.
I like your all blogs.
Thank you so much!! 😊
हटवारात्री वाचला...खूप खूप छान वाटलं,तुम्ही विनोदी भाषेत संस्कृती जिवंत ठेवता...फार आवडलं
उत्तर द्याहटवाअजय कुलकर्णी
Thank you Mr. Kulkarni.
हटवाHo toch prayatna ahe maza, Sanskruti japali geli pahije pan hasat khelat . 😊
आमचेवेळी पूर्वी असी काही पद्धत नव्हती तेव्हा अंगावर रोमांच ते कुठले?आत्ताचे जावाईबापू मात्र भाग्यवान हो.
उत्तर द्याहटवातारे मॅडमनी विषय कोणताही निवडला तरी त्यातील बारकावे, पाक कृती त्या मध्ये होणाऱ्या गमती जमती, अनारशा प्रमाणे अगदी खुसखुशीत वर्णन करतात. निरीक्षणे तर कमालीचे मध्ये काही चिमटे काढले आहेत, टोप्या उडवल्या आहेत.
अधिकमास पूजा, मंजुळ वातीचे दिवे कापसाच्या वाती अतीसुदर मी अश्या वाती प्रथमच पहातोय. आम्हालाही एक तुमच्या भाषेत लाडके जावाईबापू आहेत तेव्हा आता तयारीला लागा यला हवे. असो छान वाटले अधिक मासावर इतके प्रथमच वाचतोय अभिनंदन l असेच लिहित रहा
प्रा. सुभाष बेले.२९ . ९ .२०२०
पूजा आणि त्या वाती मैत्रिणीने केल्या आहेत. वाती मलाही नीट आठवत नव्हत्या कशा करायच्या ते, तिनेच सांगितलं! 😊
हटवाधन्यवाद बेले सर!
नक्कीच तयारी करा अधिकाची!! अनारसे केले तर फोटोही पाठवा. 😃
मुली कमी व सुबत्ता फार.यथार्थ वर्णन. आजची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे जावयाचे कौतुक किती करू नी किती नको असे होते. अधिकमास महात्म्य चांगले लिहिलेस. ज्यांना माहित नाही त्यांना खूप उपयोगी.पूर्वीच्या काळी खूप मुली असल्याने जावयाचे इतके लाड परवडायचे नाहीत. विकत अनारसे घेणे महाग पडायचे त्यामुळे घरीच घाट घातला जायचा. अनारसा हसल्याचे वर्णन छान.माझे पण हसतात 😒😒 पण आजकाल विकतच आणतात. वेळ,श्रम,हसणे 😀 वाचते.विनोदी पद्धतीने परंपरा लिहिण्याची तुझी हातोटी विलक्षण आहे. लक्ष्मी विष्णुची पूजा सविस्तर लिहिली आहेस 👌👌 दानाचे महत्त्व अधोरेखित केले आहेस. परंपरा सांगण्याचा तुझा प्रयास सफल झाल्याचे जाणवते कारण सर्व इत्यंभूत माहिती दिली आहेस. मंजुळवात सुरेख. धोंड्याचा महिना,पुरुषोत्तममास ,दशामग्रह ,पायरव ले,३० +३ या शब्दांची ओळख व निवड छान. आधिकवाणसुंदर लिहिले गेले आहे 👍👍
उत्तर द्याहटवाशैला उर्फ मृदुला चिटणीस..सानपाडा
तुमच्यासारख्या सुगरणींचेही अनारसे हसतात हे ऐकून बरे वाटले खरंतर.😝 खूप कठीण नसले तरी tricky आहेत त्यामुळे अलीकडे लोक विकतच आणतात. हसवायचा प्रश्नच नाही. 😂
हटवाधन्यवाद शैला मावशी. तुमच्या प्रतिक्रिया खूप छान असतात!! 😃
अप्रतीम माहिती...आता सासूबाई ंंमला वाण करतात का बघते..
उत्तर द्याहटवा.
😂😂 लेख पाठवून द्या त्यांना hint कळेलच.😝
हटवाअनारसे ला दिलेल्या उपमा परफेक्ट
उत्तर द्याहटवाAnarasechi upma १dam परफेक्ट सर्व वर्णन सुंदर
उत्तर द्याहटवाjgd.अनारशासारखाच खुसखुसीत लेख! विषयच अगावू येणारा अधिक महिना! तसे त्यालाच सार्या मासानी वाळीट टाकलेले. वर्षाच्या हिशेबातला मलदोष काढणारा हा पोरका मलमास. देवांनी कैफियत ऐकली व कृष्णाकडे मलमासाची शिफारस केली व कृष्णाने त्याला लाडका पुरुषोत्तम केले.व्रतवैकल्रे व तप साधनेचा महिना!पण जावयांचे सासुरवाडीतील कौतिक किती सुरेख वर्णन केलय. इतरांचा परानूभव व स्वजीवनातला कालचा व आजचा अनुभव या सामुग्रीत असावा.पण जावयी व त्यांची सरबराई अणि अनारस्यांचे रसभरीत वर्णन भरल्या वांग्यापेक्षा बहारदार! पण हा सदा क्रुर,सदा वक्र व सदा नवनीतयोगपरायण अपेक्षा करणारा कन्याराशीत सदा विराजमान असणारा दहावा ग्रह असा कुविख्यात असणारा जावई म्हणून टीकास्त्र
उत्तर द्याहटवायाचे नशीबी आहे.ते मान्य करावे तर पंचाईत! बिरबल बादशहाच्या "कथेत "सारे जावई नमक हराम " ःम्हणून बादशहाने सुळावर द्यायचा हुकुम दिल्यावर बिरबलाने सोन्याचा व एक चांदीचा सूळ करायला सांगितले.कारण दोघेही कुणाचे
तरी जावई!आता जावयांची तरफदारी करावी वा निंदा करावी तर प्रकरण माझ्या गळ्यात येणार।एकूण जावई व अधिक महिना हे जड जाणारे नाजूक प्रकरण आहे.असो धर्म शास्त्रकार पुरुष असल्याने व आर्यसंस्कृती
पुरुषप्रधान असल्याने जामात महात्म्य असणारच!आता लंबक दुसर्या टोकाला चालचाय.उद्या भविष्य काळी "सुन "महात्म्याची पोथी रचली तरी आश्चर्य वाटू नये.असो अनारस्याची पाकसिद्धी कशी कठीण कठीण किती हे वर्णन अफलातूनच! मधेच मातृसत्ताक पद्धती असणार्या नेपाळची मुशाफिरी वेगळ्या परंपरेच्या अनुभव राज्यात घेवून जाते
शेवटी पुण्यसंचयाचा हा पुरुषोत्तम मास खगोलशास्त्रापेक्षा कर्मकांडात रंगणारा व रमणारा आहे. याची खासियत साजश्रृंगारासह खेळकरपणे सजवली आहे. अपूपांचे अप्रूप व व्रतवैकल्याचे ृवैपुल्य असणारा हा "काहीना तरी दुष्काळात "धोंडा " वाटतो.खरेतर ही कालगणणेचा लीप इयरचा वेगळा नमूना! पण किती रसाळ,मधाळ व सुढाळ रुप घेतो भारत वर्षात.एक अख्खा सणासुदीचा महिना जणू! त्याचे मानवी नात्याचा जोडलेला बादरायणी जावई शोध कोण्या शास्त्रकाराने पुरातनकाली लावला,हाही संशोध्य विषयच आहे.पण कशाला डोक्याला ताप! मजेत अनारशाची चव घेत व्रतवैकल्याचे अनाकलनीय गूढ गूंजन करीत "अधिकस्य अधिक फलम् " या नात्याने अधिकाधिक आनंद लुटावा ,हेच बरें! छान "धोंड्या"ला ललितवाणी व लेखणीने सुरम्य रुप देवून"पुरुषोत्तम मास पूजन केलेस.हे पुण्य नसे थोडके! अभिनंदन शब्दांच्या गारुडी किमयेचं!🌗🌄🦚🌳⛅🌈(श्री.एस.डी.शेटे.सागांव —वारणा)