गो गो गोवा..

तोच चंद्रमा नभात... (कोजागिरी पौर्णिमा स्पेशल)

 

कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा, ही आश्विन पौर्णिमेला हा भारतीय धर्म संस्कृतीतील महत्वाचा दिवस मानला जातो. ही पौर्णिमा शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते.

         'तोच चंद्रमा नभात' हे गाणे 'उगवला चंद्र पुनवेचा' अशी चंद्राला समर्पित एकाहून एक सुमधूर अजरामर गाणी कोजागिरीला कानी घुमतात.🌚 मन अलगद सुरांवर आरुढ होऊन 'चलो दिलदार चलो चांद के पार चलो, हम हैं तैयार चलो 'असे म्हणत चंदेरी प्रकाशात चांद्रभूमीवर रवाना होतं. रोमँटिकपणा करत 'खोया खोया चांद ऽऽ' करत देवानंद सारखं रानोमाळ धावू लागतं. या शारद पौर्णिमेची शान काही औरच असते. 'को जागर्ति, को जागर्ति?' म्हणजे  'कोण जागे आहे, कर्तव्य दक्ष आहे?' असे म्हणत कोजागिरी पौर्णिमेच्या उत्तररात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर अवतरते! जे कोणी उद्योगात आहेत त्यांना लक्ष्मी माता भरभरून धन देऊन एकदम श्रीमंत करून टाकते. उद्योगाचे घरी रिद्धी-सिद्धी पाणी भरत असावी. कार्यमग्नतेला महत्व देऊन प्राचीन काळापासून ही  रात्र ‘कौमुदी पौर्णिमा’ किंवा ‘शरद पौर्णिमा’ म्हणून साजरा केली जाते. 


मलकापूर तर फक्त निखळ आनंदासाठी जगणारे खुशालचेंडू गाव त्यामुळे सगळे सण दणक्यात साजरे होतात. कोजागिरीच्या दिवशी तर फक्त ज्यांना बाहेर जाणे शक्य नाही तेवढेच लोक नाईलाजाने घरी, बाकी सगळे गाव चांदण प्रकाशात हिरवाईत विहरत असते. अशा या चंद्रोत्सवाचे आम्हाला लहानपणापासून अप्रूप होते. या चंदेरी  उत्साहावर पाणी ओतणाऱ्या त्याच वेळी टपकलेल्या सहामाही परीक्षेचा फार फार राग येई. शिक्षक लोक आणि घरचे सारखी परीक्षेची कटू आठवण करत आमचे नाचरे पाय त्वरेने मागे ओढत असत.😅 या परीक्षेच्या जाचातून कधी एकदा सुटतो असे वाटे, तशी लक्ष्मीला प्रार्थना करावी का काय असे वाटे. मलकापूर नगरीत नवरात्रीची लगबग संपताच कोजागिरीचे पडघम वाजत. श्रीमंत होण्याचा नाद नाहीतरी माणसाला आपल्यामागे धावायला लावतोच, त्यातून ही धुवांधार पावसानंतरची पहिलीच नितळ सुंदर, निरभ्र पुनवेची रात साहजिकच सगळ्यांच्या उत्साहाला ऊत आणायची. श्रीमंती देणारी लक्ष्मीमाता आणि आकाशीच्या तेजस चंद्राची दुधाळ साक्ष असलेल्या त्या उत्सवात मौजमजा लुटावी की वेड्यासारखा अभ्यास करावा हे आम्हा बालकांना मात्र कळायचं नाही. धन-संपत्तीचे आम्हाला काहिही पडलेले नव्हते, फक्त लख्ख चांदण्यात  धमाल करायची तीव्र इच्छा असे.😃


या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते [४]आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे.

आमचे बालमंडळ सखीच्या कट्टयावर किंवा लिमये वाड्याच्या पायऱ्यांवर बसून,  परीक्षेच्या नावाने बोटे मोडत, आपली कोजागिरी कशी वेगळी साजरी करायची याचे बेत आखत असे. आपले मेजवानीचे गुपित कुणीही फोडायचे नाही असेही ठरे, मग काय एकीमेकींच्या कानात कुचू कुचू सुरुच. अभ्यासाकडे काणाडोळा करुन कानगोष्टी करत कार्यक्रमाची आखणी चालायची.👭 तिकडे मुलांचा बालचमूही या चांदणरात्री काय काय गुण उधळायचे- ते ही फार ओरडणे/मार न खाता याचं प्लॅनिंग सुरु करे.👬 आमच्या हातात पैसेच काय दमडी देणे हे एकप्रकारचे अवलक्षण मानले जाई. Pocket Money हा शब्द सुद्धा आदर्श पालकांच्या गावी नव्हता. हातात पैसे असलेली मुले बिघडतात, गावावरून ओवाळून टाकण्याजोगी होतात असा एक पक्का ग्रह होता.😅 त्यामुळे कोजागिरीच्या फिस्टसाठी सुद्धा आम्हाला घरातल्या आया-बायांच्या नाकदुऱ्या काढून गव्हाचे पीठ, तेल, बटाटे, साखर असे पदार्थ कष्टाने मिळवावे लागत. सगळे पदार्थ एकत्र केले जायचे. मग कोजागिरीला संध्याकाळी चंद्राने मुख दाखवले की लगेच सगळे लिमयेवाड्याच्या अंगणात जमायचे. गप्पा गोष्टी करता करता पुरी, बटाटा भाजी, भडंग, मसाला दूध असे पदार्थ तयार व्हायचे.🥗🥛 कुणाची तरी मोठी ताई, काकू  हे सगळे आनंदाने करत. आम्ही उगीच लुडबुड करत असू. सगळे पदार्थ करून झाले की ते आटीव दूध मधे ठेऊन सारे छान गोल करून बसायचे आणि मनोरंजनाचे खेळ सुरु व्हायचे. चंद्राची सगळी मराठी, हिंदी गाणी आवर्जून म्हणायची आणि नकला नाटक असे बैठे खेळ सुरु होत. डोक्यात चढलेली निद्राराणी, ते प्रसन्न वातावरण पाहून पळून जाई. लवकरच खमंग खाणे पोटात गुडूप व्हायचे आणि फक्त आटीव दूध चंद्र प्रकाशात मागे उरायचे. साधारण अकरापर्यंत कसाबसा उत्साह टिकायचा आणि त्यानंतर केंव्हा एकदा ते मधुर दूध पितो आणि झोपतो असे होऊन जायचे. आमच्यासारखीच सारी बालमंडळे आपापल्या परिने सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करायची, त्यामुळे सगळीकडे दंगा-धोपा आणि सातमजली हास्याचे आवाज ऐकू यायचे.😆 या दिवशी होतकरू मुले स्वतःला सादर करून सभाधीटपणा अंगात आणायचा प्रयत्न करायची. लिमये, परांजपे, सबनीस, अंबिके, अष्टेकर अशा सगळ्या अंगणात बाल-थोर धमाल करत असायचे.🤗


या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा.

शारद पौर्णिमेला शेतकरी बंधू शेतीच्या कामातून नुकतेच मोकळे झालेले असतात. धरणी आईनं मायंदाळ मोती पदरात ओतलेले असतात.👨‍🌾 हे सुगीचे दिवस शेतकरी राजालाच काय ढवल्या-पवळ्या, गुरे-ढोरे, पाखरे साऱ्यांना खुषी देतात. भाताची मळणी करून खळी मस्त मोकळी झालेली असतात. शेतकऱ्यांच्या कारभारणी कामाने दमून आकाशीच्या चांदव्या सोबत मजा करायला आसुसतात. ही नवान्न पौर्णिमा आहे या दिवशी नवे आलेले पीक पहिल्यांदा रांधून देवाला गोड-धोड नैवेद्य दाखवतात. नवीन भाताच्या, जोंधळ्याच्या सुवासिक ओंब्या दाराच्या चौकटीला अडकवतात.🌽 पंचक्रोशीत शेती असलेले मलकापूरकर कोजागिरी खळ्यात साजरी करतात. तरूण मुले आणि पुरुष मंडळी शेताच्या खळ्यावर चांदण्यांत त्यांच्या आवडीचे फर्मास पदार्थ रांधून कोजागिरीची मजा लुटतात. खास निमंत्रीत मित्र मंडळी हौसेने मज्जा करायला खळ्यावर जातात. हे खास निमंत्रीत मग त्या चांदण प्रकाशात हळूच त्यांच्याच शेतातले उरलेले भुईमूगाचे वेल उपटून शेंगा खाऊ लागतात 🥜! कालांतराने कुटुंबेच्या कुटुंबे या चांदण महोत्सवात सहभागी होऊ लागली. थोडी शिंगे फुटल्यावर आम्हीही नजर ठेउन त्या रात्रीच्या पिट्टचांदण सैर-सपाट्यासाठी मोठ्यांकडे तगादा लावणे सुरु केले. परीक्षेचे कारण देत आम्हाला डावलण्याचा सगळे मोठ्ठे लोक निकराचा प्रयत्न करीत. आम्ही तोंडे बारीक करणे, रुसुन बसणे, उद्या दिवसभर अभ्यास करतो ( !) अशी वचने देत हर प्रयत्नाने कशी-बशी त्या पर्वणीला वर्णी लावून घेत होतो.😅 त्या गुलाबी थंडीतील शारद चांदणं पिण्यासाठी सगळ्यांची आठवडाभर लगबग चाले. त्या काळी हॉटेल मधे फार खायची पद्धत नव्हती. तानवडे, गांधी, माजले अशी दोन-तीन हॉटेल आणि शेट्टी बंधूंच्या दुर्गाभवन मधे भजी, वडे या खमंग पदार्थांसाठी सकाळ पासूनच नंबर लावले जात. कोणी मसाले भात, बटाटे रस्सा, कुर्मा असेही बेत ठरवत.🍛 मग पाक कलातज्ञ आचारी, बत्ती वगैरे सोबत घेउन चांदण्यात पदार्थ शिजत. काही रसिक चमचमीत जेवण बनवून फक्त खायला गावाबाहेर जात. बालमंडळी वर्गणीप्रमाणे भडंग, वडे असे सोपे पदार्थ ठरवत. सारा गाव अती उत्साहे पटापट वर्गणी जमा करून पुनवेकडे डोळे लावून बसे. काही तरूण उत्स्फूर्त कार्यकर्ते सगळी जबाबदारी अंगावर घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत. बिचारे शेवटपर्यंत पळापळ करत. काही हौशे-गौशे-नौशे वर्गणी देता देत नाहीत आणि या बिचाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांच्या खिशाला कात्री लागे. तर काही उपटसुंभ ऐनवेळी हजेरी लावत. तो हिशेबाचा घोळ पुढे  महिनाभर निस्तारावा लागे !😆


या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते.

खूप प्रतिक्षेनंतर ती मंतरलेली रजनी येई. तिन्हीसांजेला सूर्यमामाने दडी मारली आणि शुभ्र तेजाने चमकणारा भला मोठ्ठा चांदोमामा नभांगणी दिसू लागला की आनंदपर्व सुरु होई. संध्याकाळपासूनच तरुण-तरुणी, महिला-पुरुषांचे जत्थे गावाबाहेर पडायला लागत.👨‍👩‍👧‍👧 गळ्यात छोटा ट्रांझिस्टर, टेप रेकॉर्डर, हातात काठी, बॅटरी आणि स्वेटर-मफलर अशी जय्यत तयारी करून गडगडाटी हसत लोक बाहेर पडायचे. एकीकडे आटीव केशर दूध तर दुसरीकडे मेजवानीचा मेनू हसत खेळत तयार होई. महिला जेवणात गप्पा मारत हसत खेळत मदत करत. चेष्टा मस्करी, पांचट विनोद करत रात्र पुढे पुढे सरकत असे. चांदव्याच्या शुभ्र-दुधी प्रकाशात गुलाबी थंडीत दूरवर पाय दुखेपर्यंत भटकंती करून आल्यावर केशरी मसाला दुधावर नजर ठेऊन शेरो-शायरी, काव्यवाचन, भावगीत, चुटके, विनोद असे सुरु झाले की वेळ-काळाचे भान उरत नसे. रात्र भर गाण्याच्या भेंड्या चालत. रात्र वाढू लागली की हवेतला गारवा चांगलाच जाणवू लागे दातावर दात आपटू लागायचे.🥶 गरम गरम दुधाचे ग्लास रिते होत आणि रात्र रंगत जाई. पहाटे ३-४ पर्यंत चंद्र थकतो की आपण या इर्षेवर कोजागिरी जागवली जाई. पहाटे बुधदर्शन होईपर्यंत गप्पाष्टके रंगत. कोणी तरी हटकून भूताच्या गोष्टी, किस्से सांगत आमची पाचावर धारण बसवे. इथे कसे भूत आहे, तिथे कसे हाक मारून कोंबडी मागते असले अनुभव कथन सुरु होई.👻 मग मात्र त्या रुपेरी चांदण्यात इकडे तिकडं मान वळवायची भिती वाटे. काही सुंदर तरुणी फ्याशन म्हणून पांढरी साडी नेसून, पांढऱ्या बांगड्या घालून आल्या की आम्हाला त्या भूत आहेत का काय अशी शंका येऊ लागे. त्यांचे पाय उलटे आहेत का ते पहावे असे वाटे. आम्हाला असे घाबरवून झाले की मग कोणीतरी भूताचा भयानक विषय हसत बदले.😁 


आता आकाशातून साक्षात लक्ष्मीच अवतरते मग भुते कशी असतील? लक्ष्मीला घाबरणार ना भुते? या भरवशावर आम्ही मुले शूरवीरासारखी या चांदण सहलीला जात असू. कोवळ्या रुपेरी प्रकाशात जग कसे आगळेच भासायचे. शाहूवाडीच्या शाहू हायस्कूलच्या पटांगणात खूप मंडळी एकत्र असायची, तिथे आम्हाला ही शारद पौर्णिमा अनुभवता आली. काही रसिक सरळ महादेव टेकडीवर, आजुबाजुच्या डोंगरावर थोडे दूर मांसाहारी मजा लुटायला जायचे. आयुष्यात कधीच न हसलेली काही मंडळी विलोभनीय चंद्रप्रकाशात हसताना पाहून नवल वाटायचे. रुपेरी तेजाचा कोमल चांदणचुरा आसमंती पसरला की अवघी धरती चमचम करू लागे. प्रेमी जीव म्हणूनच तर या रजनीनाथावर जीव टाकतात. त्या काळी तिथेही काही प्रेम विव्हल युगुले असतील पण केवळ सलज्ज दृष्टा-दृष्टच होई बरे!❤ आतासारखी सार्वजनिक ठिकाणी बेभान चाळे करण्याची पद्धतच नव्हती. त्या मुळे मर्यादशील प्रेमीयुगुले एकमेकांच्या दर्शनावर समाधान मानत असावीत. त्या प्रियेसी छान नटून-थटून शुभ्र साडी नेसून कडक म्याचिंग करुन येत आणि शुक्रचांदणी सारख्या लुकलुकताना भिरी-भिरी नजरेने प्रियकराला शोधत असत. आमच्याकडे साफ दुर्लक्ष करुन त्या भलतीकडे पाहून नेत्रपल्लवी करू लागत. आमच्या बालमनाला इतकेच काय ते त्यांचे चांदण प्रेम उमजले.😆 आता ते आठवून हसू येते आणि वाटते… अरेरे तो काळ प्रेमिकांना बराच कठीण जात असावा… आमच्यासारखे सारे गनिम बारीक नजर ठेवून असल्यानं आजसारखा खुल्लम खुल्ला आचरटपणा घडत नसे.


कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते.

अशी ही मलकापूरची चित्त उत्साहित करणारी कोजागिरी ज्याने अनुभवली, तो त्या स्मृतीत रंगून जाणारच.😊 धवल तेजाने चमकणारे गूढ हिरवे-काळे डोंगरमाथे, मधूनच खळखळ आवाजात रुपेरी जल वाहून नेणाऱ्या नद्या आणि गर्द झाडीने वेढलेला हा परिसर शारद चांदण्यात नाहून निघाला की अद्भुत प्रदेश भासे. झाडा-माडांच्या शेंड्यावर पडलेली चंदेरी आभा पाहिली की वृक्ष जणूकाय त्या तेजोनिधीचे शेंडे हालवून आदरातिथ्य करत आहेत असे वाटे. नदीत पडलेले चंद्रबिंब आणि भोवताली त्याचीच मायाळू चांदण-प्रभा सारा परिसर उजळून टाके. तो अलौकीक रुप लाभलेला चंद्रमा डोंगरा आडून सलज्ज नववधू सारखा हळूवार उगवे. तोच शशी  रात्रीचा कैफ चढू लागला की  झरझर डोक्यावर येऊन, प्रत्येक जलाशयात स्वत:चे अलौकिक रूपडे न्याहाळून गालात हसत असावा. छोट्या मोठ्या डबक्यातही ते मनोहर बालबिंब दिसू लागे. आकाशीच्या दुधी चांदव्याची धरती वरची अनेक जलबिंबे बघून भान हरपून जाई. आसमंत अगदी परीकथेतल्या मोहक पण गूढ असा भासे. आजीने कोजागिरीची गोष्ट सांगितलेली असल्यामुळे आम्ही सारे कुठे लक्ष्मीचा रथ दिसतो का लक्ष ठेवायचो. या दिवशी ज्येष्ठ अपत्यास नवे धवल वस्त्र द्यावे आणि ओवाळावे अशीही परंपरा आहे. पंचांगात ‘ज्येष्ठ अपत्यास निरंजन’ असे लिहिलेले वाचून ‘इतर अपत्यांस मानाप्रमाणे धपाटा किंवा चापट’ असे वाचून हसत असू.😆 कुठली आई एकाच मुलाला ओवाळून बाकीच्यांना तसेच कसे ठेवेल??? या दिवशी तर चंद्रालाही आकाश दीपाने ओवाळतात. काही लोकांकडे लक्ष्मीपूजन करून आटीव दूध, शहाळ्याचे पाणी आणि पोहे असा नैवेद्य दाखवण्याची रीत आहे.🥥 दम्यावरचे एक आयुर्वेदिक औषध कोजागिरीच्या चंद्रप्रकाशात तयार केले तरच लागू पडते असे म्हणतात म्हणजे ती शितल किरणे औषधीही असावीत. काही प्रांतात या दिवशी द्यूत-क्रीडा करतात असेही ऐकिवात आहे. पण पांडवांसारखा घात करून घ्यायचा नसेल तर फक्त मसाला दूध पिऊन दंगामस्ती करणे कधीही चांगले! लक्ष्मी मातेलाही जुगाराचे उद्योग का बरे आवडतील ? असा भोळा प्रश्न उरतोच! 🤔


शाहूवाडी-मलकापूरची गावरान कोजागिरी चांदण्यात नहात हातात काठी  घेऊन पायात येणारे साप, बेडूक चुकवत साजरी होई. लक्ष्मी किती जणांना प्रसन्न झाली माहिती नाही पण सरस्वती आणि आरोग्यदेवता नक्कीच गावाला प्रसन्न आहे.🙂 लोक कायम आनंदी, उत्साही असतात. उत्तम आरोग्यामुळे कुणाला सर्दी, खोकला पलीकडे कोणताच आजार झाला नाही. Child specialist मुलांना लागतो हे अलीकडे समजले. तोपर्यंत डॉ.जोशी, डॉ.अंबिके, डॉ. देशपांडे आणि एक काकिर्डे वैद्यबुवा यांच्या ज्ञानावर सारे गाव ठणठणीत राहिले.💪 हातातून छन-छन होणारा लक्ष्मीदेवीचा धन वर्षाव आम्हाला आरोग्यरूपे प्राप्त झाला, हे ही नसे थोडके. अंथरूण पाहून पाय पसरणे या तत्वावर सगळे आपापले जीवन आखतात. कुठलीही जीवघेणी स्पर्धा नाही की उद्याच्या अवास्तव अपेक्षा नाहीत. सुखी, समाधानी व आरोग्य संपन्न असे हे टुमदार गाव. अगदी ‘भूतान’ एवढे आनंदी गाव आहे असे म्हणायला त्या चंद्राचीही काहीच हरकत नसावी. 😃


खेड्यातली ती कांदे-बटाटे अशी वर्गणी काढून केलेली कोजागिरीची फिस्ट चाळीस वर्षे डोक्यात अमरत्व घेऊन बसली आहे. आज मात्र उच्चभ्रू सोसायटीत राहूनही मी ती कोजागिरी आठवते. मनातल्या मनात टेकडीवर किंवा शाहूवाडीच्या झाडीत जाते आणि त्याच रजनीनाथाला वंदन करून उत्तम आरोग्याचं मागणं मागते. सख्यांबरोबरचे हरवलेले क्षण आणि हरवलेल्या रेडिओवर लागलेली चंद्राची गाणी मनात वाजत रहातात. कधीच न संपणारा अनमोल खजिना आहे तो. तो चंद्रमा लाखो कलाकारांचे स्फूर्तिस्थान आहे. जो पर्यंत जगात चंद्र तारे आहेत तोपर्यंत ही कोजागिरीची रात चिरंतन चिरतरूण आहे. 🤗


या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.

आता मी उंच टेरेसवर जाऊन त्या तेजोनिधी चंद्राला मस्त आटीव दूध नैवेद्य अर्पण करते. विचार करते… उंच बिल्डींग काय, झोपडी काय, शहर काय, खेडे काय, विशाल रत्नाकर काय, पर्वत काय.. हा देश काय आणि तो देश काय… आपला चंद्रमा साऱ्या जगतावर तारांगणाची निळसर रुपेरी उबदार दुलई  पांघरून त्याला मायेने कुशीत घेतो…🌃

आजही आई त्या चांदव्याला ओवाळून त्याच्या दुधी रुपात दूर असलेल्या तिच्या पिलाला पहाते, त्याला ओवाळले की तो आपल्या जादूई किरणानी ती वात्सल्यभावना तिच्या दूर देशीच्या पिलापर्यंत हळूवार पोहोचवतो….. एखादी ताई त्याच्यात भावाचे रुप पाहून त्याला भाऊच मानून भाऊबिजेला प्रेमाने ओवाळते…. कोणी विरहाग्नीत जळणारी प्रियसी त्याच्या साक्षीने प्रेम व्यक्त करते तर एखाद्या प्रियकरास त्याच्या प्रियेचा मुखडा चंद्रासम भासतो!…. इतका हा चंद्रमा आपला आपुलकीचा, हक्काचा आणि जवळचा आहे. आपल्या भावविश्वात त्याचे शीतल स्थान अढळ आहे… आणि कल्पांतापर्यंत राहिल….🌚


आपण सारे पृथ्वीवासी त्याच्या  चंदनासारख्या शीतल रुपेरी मायेसाठी  जन्मभर आसुसतो आणि बालकासारखे त्या शशी छायेत मस्त निद्रिस्त होतो. 😴


मनात गाणे गुंजत रहाते…'चंद्र आहे साक्षीला' 💞



विजयश्री तारे जोशी

28.10.2020



टिप्पण्या

  1. खूप सुंदर वर्णन. खरोखर अशी कोजागिरी तुला अनुभवता आली म्हणून हेवा वाटतो तुझा. डोळ्यासमोर चित्र चांदण्यात न्हाऊन निघाले. तुझ्या पुढच्या लिखाणाची वाट पाहते

    उत्तर द्याहटवा
  2. तुझ्या मनाच्या तिजोरीत बालपणीच्या अनमोल आठवणींचे किती अलंकार साठवून ठेवले आहेस बाई !अगदी शाळा,महाविद्यालय, मंगळागौर,अशा प्रत्येक प्रांतातला एकेक शुद्ध दागिना घेऊन त्याला छानसं शब्दांचे नक्षीदार कोंदण बनवून आम्हा वाचकांना किती तत्परतेने, हौसेने दाखवतेस ,त्यातलाच हा कोजागिरीचा चमकता दागिना !सर्व मलकापूरातील लोकांनी कोजागिरी कशी साजरी करत याचा जणुं तू छान सर्व्हे करुन त्या चांदण्या रात्रीचे मलकापूर जसेच्या तसे उभे केलेस आणि आम्हाला तो सोहळा आत्ताच पहात आहोत असे वाटण्याइतकी मलकापुळची सुंदर सफर घडवलीस खरच शब्दचित्र हुबेहूब उभे करण्याचे तुझे सामर्थ्य फारच भारी आहे आणि तेही अगदी खुसखुशीत लेखन शैलीत !फार सुंदर झाला आहे लेख !!👌👌💐💐
    मनिशा कुलकर्णी -दूबई

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद मनीषा!!
      कोजागिरीच्या अनेक शुभेच्छा..😃

      बालपण हा एकच अनमोल दागिना मिळाला आहे खरंतर त्याला मीच हौसेने ५० वेळा विविध बाजुंनी पाहत राहते आणि मग लिहिण्याचे विषय मिळतात. तुझ्यासारखे हौशी वाचक मिळाल्यामुळे आणखीच उत्साह वाढतो. असेच सारे लेख वाचून मला प्रेरणा देत राहा! 😊

      हटवा
  3. जया तू इतकं छान लिहीतेस की प्रत्येकवेळी कोणती विशेषणं द्यावीत हेच कळत नाही. मलकापूरची कोजागिरी झर्रकन डोळ्यासमोर आली. आमचं अंगण आणि तात्या आजोबांची खूप आठवण झाली. तुही त्यांचा आवर्जून उल्लेख केलास. 😊🙏🙏
    निलिमा परांजपे डोंगरे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अनेक आभार निलिमा!!
      मला त्यांच्याबद्दल लिहिताना तुझीही आठवण आली होती. 😊
      कोजागिरीच्या अनेक शुभेच्छा..😃

      हटवा
  4. निव्वळ अप्रतिम लेखन आणि शिरशिरी आणणारी भाषा...
    रेखा

    उत्तर द्याहटवा
  5. कोजागिरी हा विषयचं धमाल करणारा आहे. या विषयावर तुमचं लेखन एकदम खुलुन आलंय. सगळं वर्णन वाचुन मसाले दुध पिताना या लेखाची आठवण जरुर येणार. पण तुम्ही म्हणता तसं वातावरण सध्या फार कमी ठिकाणी अनभवायला मिळेल.सगळे जण आपापल्या टेरेस वर जाऊन साजरा करती.
    धमाल लेख. 👍👍

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे

    1. हो, आता अशी खळ्यात जाऊन कितीजण करतात माहिती नाही पण टेरेसवरही उत्साह टिकून आहे हे पाहायला बरं वाटतं. शेवटी celebration, मजा करणे आणि आपली संस्कृती जपणे महत्वाचे नाही का?
      कोजागिरीच्या अनेक शुभेच्छा..😃

      हटवा
  6. हाच ( तो) चंद्रमा आमच्या लहानपणी अनुभवला आहे!मस्त आठवणी त्या चांदण्या रात्रीच्या! (चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा! हेही गाणे आवर्जून गायले जायचे)
    रेखा उपाध्ये

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद उपाध्ये मॅडम. कोजागिरीच्या अनेक शुभेच्छा..😃
      हो, चंद्राची खूप गाणी आठवली लिहिता लिहिता मलाही.. नक्की म्हणेन आज मी, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता!! 😝

      हटवा
  7. खुपच छान माहिती...
    कोजागिरी च्या मनःपूर्वक शुभेच्छा.
    🥛🥛🥛🍦🍦🍦🍿🍿

    उत्तर द्याहटवा
  8. 😁😁😁🍿🍏🍊🍎🍿
    Madam ...chandani cha Masta garava ani thand.premal apulaki cha vatavaranat amhi navhun tya tumachya gavat khojagirit Masta Maja lutalo . Tumachya tya shabdarupi Jadu Che kiti koutuk keletari te kamicha.Bahut sunder .asecha amhana shabdat buduvun rahude ASE vatate.All the best .Anakin kayalihu .majhe Shanda Apure.
    R.B.Tophkhane Belgavi

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद मि. तोफखाने!!
      कोजागिरीच्या अनेक शुभेच्छा..😃
      गावातली मजा शहरांत आणण्यासाठी माझे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत आणि तुमच्यासारखे रसिक लोक त्याला दाद देऊन माझा उत्साह द्विगुणित करतात हे नक्की!! 😊

      हटवा
  9. अप्रतिम,फारच सुंदर लिहिलं आहेस....नेहमीसारखं.... छोटं असलं तरीही मलकापूर खूपच सुंदर आहे.
    लिहीत रहा.
    डॉ किरण भिंगार्डे,
    भुलशास्त्र तज्ञ,
    ९८२२२९८६५३.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद डॉक्टर!!
      कोजागिरीच्या अनेक शुभेच्छा..😃
      मलकापूर बेस्टच आहे!!!

      हटवा
  10. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम..शब्द संपले मैडम
    मिलिंद कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  11. तारे मॅडम नमस्कार, आपला कोजागिरी वरचा रम्य लेख वाचला. या लेखात कोजागिरी चे किती पैलू तुम्ही वर्णन केलेत, काय नाही यात, सुंदर चंद्रगितांची रोमँटिक बरसात आहे. पारंपरिक कल्पनाच उल्लेख आहे. मलकापूर नेहमीच कसा आनंद पूर आहे, चांदण्यात धमाल करण्याची ओढ बालपणी परीक्षेचा नावावर बोटे मोडत केलेली कोजागिरी, ते बैठे खेळ, खमंग खाणे. शेतकरी, त्यांचे ढवळ्या पवळ्या, नव्या अन्नाचे नेवेद्य, तोरण, किती निरीक्षणे. मग पुढे तरुणपणातील चांदण्या रात्रीतील सैर भटकंती, ती भुतांची भीती, सभोवतालच्या रसिकांमध्ये चालेले खेळ त्यावर तुमची गनीम नजर.
    त्या चंद्ररात्रीत दिसणारा मलकापूरचा निसर्ग, इतका सुंदर की अगदी झाडे, नद्या, तलाव, डबकी, डोंगर माथे, नववधू सारखा हळुवार येणारा चंद्रमा आपलेच रुपडे पाहून गालात हसणारा चंद्रमा. काय सांगावे तुमचे रसिकात्व. कसे भरभरून चंद्रिके प्रमणे उधळून टाकलंय तुम्ही मलकापूर परिसरावर.
    आजीची गोष्ट, पंचांग, ओवळणी, लक्ष्मीचा रथ, दम्याचे औषध, शाहूवाडीचा माळ, आजुन मनात जपून ठेवलेल्या त्या रम्य आठवणी, साऱ्याच जगाला मायेने कुशीत घेणारा चंद्रमा..... कस काय हे सुचत जाते हे तुम्हाला? आई, ताई, विरहणी यांचा आणि साऱ्या पृथ्वी वासियांचा चंद्रमा वा.... काय कमाल... काय लिहू पुढे.
    मधमाशी जशे शेकडो फुलांवर गुंजारव करून पराग आणते, त्यावर संस्कार करून मधू बनवते, तसे किती निरीक्षणे, किती अनुभव, किती जाणिवा, तंतोतंत जपून ठेवल्यात आणि इतक्या वर्षांनंतर ही ती अत्तराची कूपी उघडावी तसे सर्वांना तुम्ही हा आनंद गंध वाटून टाकला. वा....
    मला एक आश्चर्य वाटते, न्यू इंडिया सारख्या केवळ आर्थिक व्यवहार करणाऱ्या कंपनीत तुम्ही काम करत राहून इतकी रसिकता जोपासली, तर मग एखद्या कॉलेज मधे मराठीच्या प्राध्यापक झाल्या आसता तर काय.... आज लाखात पगार घेणारे मराठी चे प्राध्यापक सुध्दा इतक्या विविध विषयावर इतके सर्व रसिकतेने लीहणारे शोधूनही सापडणार नाही.
    असो.. मी सुद्धा १०-१२वर्ष मलकापूर कोजागिरीचा नयनरम्य सोहळा अनुभवला आहे तो अजून ही विसरलो नाही. आज पुन्हा या लेखाच्या निमित्ताने नव्याने आजची कोजागिरी अनुभवतो आहे. तुम्ही हा आनंद सोहळा असेच चालू ठेवणार आहात. या बद्दल खात्रीच आहे.
    प्रा. सुभाष बेले. कोजागिरी पौर्णिमा ३०.१०.२०

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सर..तुम्ही बेडुक कुरवाळत प्रेमाने डिसेक्ट करणारे जीव शास्त्राचे प्राध्यापक आहात यावर विश्वास बसत नाही. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट झाली आहे. तुमचे रसग्रहण लेखापेक्षा उत्कृष्ठ झाले आहे. तुम्ही उत्तम समालोचक आणि लेखक आहात. प्रत्येक शब्द इतका सुंदर गुंफलात की मी आवाक झाले आहे. शेटे सर,शेख सर,तुमच्या सारखे गुरु मला आशीर्वाद देत आहात म्हणूनच हे शब्द धन बाहेर येते. आज मी खूप श्रीमंत आहे...माझ्या जवळ लाख मोलाची माणसे आहेत.मी लक्ष्मीला माझे हे धन कायम सुरक्षित, आनंदात ठेव असेच सांगणार आहे. हा माझा आनंदाचा ठेवा आहे...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻तुमचे शब्द प्रमाण राहोत मला..धन्यवाद आणि कोजागिरीच्या मधुर चांदणभऱ्या शुभेच्छा 🌷🌷🌷🌷🌷

      हटवा
  12. कोजागिरी पौर्णिमेच्या स्मृती तुझ्या मनात खोलवर रुजलेल्या आहेत. त्यामुळे तुला या विषयावर ब्लॉग लिहावा वाटला.
    विषय साधा पण बारीक सारीक तपशील देऊन छान रंगवला आहेस.निखळ आनंद साठी जगणारे खुषालचेंडू गाव. ही उपमा आवडली.याची प्रचिती तुझ्या आधीच्या लेखात आलेली आहे.शेतकऱ्यांची खळ्या तील कोजागिरी वर्णन अप्रतिम. पुरी बटाटे भाजी एकत्र जमून करणे याची मजा घेता घेता मसाला दुधाचे वेध लागणे👌👌पाय दुखेपर्यंत भटकंती 😱
    सुंदर आठवणींचा चंदेरी प्रकाश वाचकांना सुखावून जातो
    शैला..मृदुला चिटणीस.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद शैला मावशी.
      तुमच्या प्रतिक्रिया वाचून मन अगदी तृप्त होतं. छोट्याश्या ब्लॉगपोस्टचा वाचता वाचताच इतके सुंदर विश्लेषण करणे हे तुमच्यासारख्या प्रतिभावंत लेखिकेलाच जमेल हे खरे!! 😊

      हटवा
  13. कोजागीरीचा हा चांदणचुरा कायमच आठवणीत राहील मनाला भावणारी ही शैली नियमीत वाचायला मिलावी
    Bhosle Bakers

    उत्तर द्याहटवा
  14. जया आमच्या शुभेच्छा कायमच तुझ्या बरोबर आहेत. असच छान छान लिहीत रहा. तुलाही कोजागिरीच्या खुप खुप शुभेच्छा !! 🎊🎊

    उत्तर द्याहटवा
  15. वाह. लेख सुंदर जमलाय. तुमचं निरीक्षण बाकी मस्त आहे. शब्दांकन पण छान.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद वसंत जोशी ..😊 माझ्या सासरेबुवांचं नावही वसंत जोशी आहे आणि ते ही तुमच्यासारखेच भरपूर वाचन करणारे आणि लेखांचा analysis करणारे होते. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया मला फारच महत्वाच्या वाटतात आणि त्या encouraging असल्या की अगदी भरून पावल्यासारखं वाटतं . 😃

      हटवा
  16. jayashree far chan lihites g
    mazya bahinila hi pathwate tilahi far awadtat.
    ashich lihit raha ani amhi maza ghet rahu.
    all the very best
    God Bless You.
    Damaniya - Hyderabad

    उत्तर द्याहटवा
  17. तुमचे विच्गर धन ..शब्द धन वाचून तृप्त झालोय..किती वेळा वाचले तरी मजा येते
    अप्रतिम लेखन
    शिवाजी काळे

    उत्तर द्याहटवा
  18. मैडम अती सुंदर लेख...अवर्णनीय..भाषा उच्च प्र्तीची....शब्द नाहीत हो तुमच्या सारखे
    प्रशांत दाते

    उत्तर द्याहटवा
  19. फार फार सुंदर लेख...अभ्यासाला ठेवावा इतका सुरेख..वाट बघ्तोय पुढच्या लेखाची

    उत्तर द्याहटवा
  20. तुमचे अलंकार किती आनंद देतात ...मलकापूर मध्ये शिक्लात यावर विश्वास बसत नाही
    ...अवर्णनीय आनंद देता तुम्ही
    अर्चना कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  21. Madam apratim lekhan,kiti manat athavani sathvun thevlelya ahet ani tya prakat karaychi takad tumhi prakat kele ahe,Surekh,tyatilchandrache varnan tar apratimach ahe te mhanje shital ruperi mayesathi janmbhar asusto he vakkya man uphalun yeil asech ahe.salam tumchya lekhnila ani buddhila,pudhil blogsathi shubhechha

    उत्तर द्याहटवा
  22. कोजागीरीचा हा चांदणचुरा कायमच आठवणीत राहील मनाला भावणारी ही शैली नियमीत वाचायला मिलावी

    उत्तर द्याहटवा
  23. छान लेख आहे वाचुन मनाला खूप बरे वाटले आज. तुम्ही आसेच आमच्या ज्ञानात भर घालत जावा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपली दाद प्रेरणा दायी आहे...धन्यवाद...शेवटीं नाव लिहिले असते तर अधिक आनंद झाला असता...

      हटवा
  24. ।।ॐ॥ "तोच चंद्रमा" हा कोजागिरी पौर्णिमेवरचा लेख हळुवारपणे मलकापूरच्या चंदेरी चांदण्यात डुंबत असल्यासारखा ,अभिषिक्त झाल्यासारखा मोहमयी वाटतो. शारदीय चांदण्याचे अप्रूप व भूरळ तशी युवा मनाला फार असते. ते हरवलेले शारदीय चांदणे वेचीतच तू गतकालात वावरत आहेस असे वाटत राहते. बालपणीपासुन चंदामामाची ओढ हळुहळु यौवनाच्या चाहुली बरोबर रमणीय रुप घेते, या बदलत्या रुपातली कोजागिरी व त्या हळव्या आठवणी मोहरुन टाकणार्‍या! सुगीच्या दिवसांनी मोहरलेली शेते,चांदण्याची मोहमयी जादुई दुनिया ,आनंदलेली मने ,सारे कसे या वेळी बहरुन आलेले असते. हे सारे मलकापूरच्या दिवसांशी जोडलेले आहे.आता बदलत्या मनूतही ती चांदरात कशी वेगळी झाली तरी त्यातही ऐक माधुरी आहे. हे सारे वर्णन करताना तुझे मनातून शब्दांचे चांदणे स्फूरत आहे व ओसंडून वाहत आहे असे वाटते. मनमोही लेख — कोजागिरीच्या मोहिनीसारखा! असेच हे चांदणे लेखातून शिंपित रहा,( श्री.एस.डी. शेटे.)

    उत्तर द्याहटवा
  25. सर आपण नेहमीच मला लिहायची स्फूर्ती देता म्हणूनच इतके लेखन होत आहे. हा लेख वाचताना मनास शीतलता लाभते म्हणून परत पोस्ट केला होता...मना पासून धन्यवाद...

    उत्तर द्याहटवा
  26. जयश्री," तोच चंद्रमा नभात "अतिशय सुरेख! मलकापूर येथे लहानपणी साजरे केलेल्या कोजागिरी कार्यक्रमाची आठवण झाली.
    आम्ही इयत्ता नववीत असताना अभ्यास करण्यासाठी"द टेन गोल्डन युनियन असा तब्बल १० मित्रांचा छान ग्रूप तयार केला होता.बाजारपेठेत श्री मारुती वलीवडेकर यांच्या घरातील पहिल्या मजल्यावरील जागा भाडयाने घेतली होती. कोजागिरी दिवसी मोठ्या पातेल्यात दूध अटविताना "मेरे दिल में आज क्या हैं"या गाण्यावर सर्वांनी आपल्या आवाजात सूर धरला तो आवाज ऐकून रस्त्यावर सगळी माणसे जमली. सर्वांना वाटले वलीवडेकरांची म्हातारी गेली वाटते म्हणून त्यातील काही मंडळी पहायला आल्यानंतर अमाचे ते बेभान गाणे बंद झाले, मग काय हसून हसून पुरेवाट झाली!
    असे कोजागिरीच्या किती तरी आठवणीं व किस्से अजून आहे तस्से आठवणीत आहेत, तुझा सुंदर लेख आठवून त्या ताज्या झाल्या!
    छान लिहितेस असेच नेहमी लिहीत जा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अरे बाप रे...त्या आज्जिंचे आयुष्य तुमच्या सुरेल गाण्यामुळे वाढले ते बरे झाले...वाचून डोळ्यात पाणी येई पर्यंत हसले बघ.पण तुझे नाव समजले नाही...शेवटी लिहीत जा.
      आपल्या आठवणी भंनाट आहेत म्हणून आजही तितकाच आनंद देतात ..तुझ्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद...पुढील दिवाळीचे लेख परत टाकणार आहे त्या पण अशा स्पेशल आठवणी सांग..

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -