गो गो गोवा..

आली आली दिवाळी आली...

नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले.

    'दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी' या  तालावर दिवाळीची लगीन घाई सुरु होई, झारे, कढया या घरातून त्या घरात पळत. माता-भगिनींची पाककलेची प्रात्यक्षिके लगबगीनं सुरु होत. त्या काळी ऑर्डर देऊन पदार्थ डब्यात भरण्याचे सुख नव्हते त्यामुळे प्रत्येक बाईला पदर खोचून सुगरण व्हावेच लागे. सुरुवातीला ओवीच्या तालावर करंज्या बिनबोभाट पार पडत. आम्ही खमक्या पोरी गावाच्या करंज्या लाटायला हौसेने पोळपाट घेऊन धावायचो. काही घरात खुळखुळ्या सारख्या पोकळ करंज्या करत, त्या चहात बुडवून खाव्यात म्हणे!😅 करंज्या डब्यात पडल्या की चकलीकडे मोर्चा वळे. चक चक चकली... जमली तर जमली... नाहीतर फसली. त्याकाळी अगदी दणकट लाकडी साचे मिळत. तो दट्टया दाबत ती गोलाकार दिव्य चकली गाळायची. बायकांची बोटे, मनगट  दुखायला लागायचे. त्या एकमेकींना मदत करत ती मोहीम पार पाडायच्या. आम्ही गाळलेल्या चकलीची ताटे फिरवत परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवायचो. काही वेळा चकली तेलात पडताच तिचे हजार तुकडे पडत,  तर काहीवेळा मात्र ती तळून झाल्यावर स्प्रिंगच्या गुंडाळीसारखी अखंड सुटे इतकी मृदुकाय होई.😁 अशा आणीबाणीच्या प्रसंगी शेजारच्या पाककलातज्ञ बायकांना बोलावण्यात येई. मग त्या पिठात इतर पिठे घालून तिचे अखंडत्व राखण्याचा आटोकाट प्रयत्न करत. कधी ‘मोहन’ जास्ती होई तर कधी कमी. या मोहनचे प्रताप पाहून मी त्याची अजूनही चांगलीच धास्ती घेतलेली आहे. उकळत्या तेलाला त्या मोहक कृष्णाचे ‘मोहन’ हे नाव देण्याची बुद्धी कुणाला आणि का बरे झाली???🤔 अशा सगळ्या दिव्यातून एखाद्या सुगरणीने केलीच खुसखुशीत चकली तर काही वेळा मलकापूरची थंडगार पावसाळी हवा तिला अशी नामोहरम करे की लगेच तिचा खुसखुशीतपणा इतिहासजमा होई आणि सुगरणीचे गर्वहरण होई! कधी  ही चकली अखंड कडकलक्ष्मी रुपात प्रकटली की चावता चावत नसे आणि कवळीधारकांची परीक्षा घेई. तुकडे रुपात प्रकटली तर खुसखुशीत असल्याने कवळीसुख देई पण नेत्रसुख  देत नसे त्यामुळे तिला चकली म्हणवत नसे. बरं रंग ही अगदी सोनपिवळा पासून काळसर तांबूस पर्यंत कुठंलाही घेऊ शकते. काही बायका रंग न जमल्याचे न सांगता ‘कालपर्यंत छान सोनेरी रंग होता होsss, आज पालटला होss’ असे सांगून पाककलेवर पांघरूण घालायच्या. रंग पालटायला ती काही शॅमेलिऑन सरडा असते का?? पण चूक कबूल करेल ती बाई कसली???😛


    चकली परीक्षेनंतर शंकरपाळी, शेव असे सोपे पदार्थ उरकले जात ते झोपेत केले तरीही बिघडत नाहीत. तो बायकांचा तोंडी पेपर असे. एकदाचे तळण संपले की त्यानंतर उरलेल्या तेलात चिवडा फोडणीस टाकल्यावर बायका हुश्श म्हणत . या चिवड्यासाठी गावातले सारे कढीलिंब सांगून किंवा बिनबोभाट खुशाल ओरबाडले जात. ते बिचारे कढीलिंब हुतात्मा होत. खमंग चिवडा डब्यात भरून झाला की शेवटी बायकांचा मोर्चा लाडूकडे वळे. रव्याच्या लाडूची मजा आणि पाककला म्हणजे अर्जुनाचा मत्स्य नेत्रभेद.. इतकी कठीण परीक्षा असे. काही सुगरणी बॅटिंग करावे तरी फुटणार नाहीत असे पांढरेशुभ्र अजरामर चेंडू वळतात. ही पाककला फक्त भारतातच पाहायला मिळते. त्याचे पेटंट काही लोकांनी अगदी जन्मभरासाठी घेऊन ठेवलेले असते यांची कोठेही शाखा नसते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ते पेटंट विदेशात विकायचे नाही. अगदी सि.के. नायडू सारखा सिक्सर मारला तरी घड्याळ फुटणार पण  तो लाडू फुटणे नाही. पाक कच्चा झाला तर लाडू फतकल मारून बसे आणि पुढे गेला तर लाडू स्वतःस मुळीच वळून घेऊ देत नसे. मग परत वेणूताई अष्टेकर, माझी माता- मालती तारे अशा तज्ञ बायकांना पाचारण करावे लागे. माझ्या मातेस लाडू सुधारण्यासाठी अनेक स्वयंघोषित सुग्रणी बोलावून घेत. आपल्या घरचे पदार्थ अर्धवट सोडून, पदर खोचून, गल्लीभर पळून ती बायकांच्या पाकाची तार बघत बसे आणि स्वत:चे तारे आडनाव सार्थ करत असे.😃 अस्से हे सुंदर पण अवघड रवा लाडू बाईचा जीव टांगणीला लावत. ही पाकाची तार एकतारी, दोनतारी करत सुरात बोलली तरंच लाडू खरा जमला म्हणायचा! ही फराळाची कामे करून गृहलक्ष्मी दमून जायच्या. त्यानंतर महिनाभर ‘मी आहे म्हणून करते होsss’ हे पालुपद ऐकवत घरच्यांना फराळाचा नित्यनेमाने खुराक लावायच्या. घरचे कर्ते पुरुष आणि निष्पाप बालके सुरुवातीला अगदी हिरिरीने फराळाचा समाचार घेत. आठवड्यातच तो उत्साह मावळे आणि मग ‘संपवल्याशिवाय सुटका नाही’ या जेल मधल्या बंदिस्त कैद्याच्या अविर्भावात फराळ संपवा मोहीम सुरु राही. फराळाची ताटे एकमेकांना देण्याची पद्धत असल्याने ‘कुणाचे काय कसे बिघडले’ याचे चर्चासत्र फराळडबे  संपेपर्यंत रंगे. एकमेकांकडे फराळाला जायची पद्धत असल्याने.. तेवढाच चव पालट होई, जिभेस बरे वाटे. त्या काळी स्टोव्ह आणि चूल यावर हे पदार्थ उत्तम तयार होत असत. पाककलेचे पुस्तक लिहून अनेक पिढ्या सुगरणी घडवणाऱ्या कमला ओगले सारख्या अनेक भगिनींना मानाचा मुजरा, त्यांच्यामुळे ही परंपरा टिकून आहे. आज यू-टयूब दिमतीला आहेत, भगिनींना प्रोत्साहन द्या आणि बिघडले तरी छान छान करत आनंदे समाचार घ्यावा.🙂


    हे सारे सुरु असतानाच बालचमू किल्ले पूर्ण करत. स्थापत्य अभियंत्यानी ठरवलेला गड काही वेळा तसा न होता विचित्रगड का दिसे ते कळत नसे. गडरक्षणाची पूर्ण जबाबदारी बालगट घेई. गल्लीत डॉ. अंबिकेंच्या अंगणात, लिमये वाड्यात आणि तिकटीवर असे किल्ले गल्लीत बांधले जायचे. डॉ. अंबिकेंच्या अंगणातील फुलझाडांमध्ये तो सुंदर किल्ला छान उठून दिसे. त्याचे रक्षणही अगदी सोपे  कारण त्यांचा दवाखाना तिथेच होता. बाकीचे किल्ले मात्र हमरस्त्यावर असल्याने  त्यावर अगदी जनावरेही चाल करुन यायची. गोमाता, शेळ्या, म्हशीही जाता जाता किल्ल्या वरच्या जंगलाकडे आकर्षित होत. शिंगाने किल्ले पाडायचा प्रयत्न करीत, त्या शिवाय इतर गल्लीतली अत्रंगी बालके सामुग्री पळवत. त्यामुळे दिवाळीचे नवे कपडे, घरी आलेले पाहुणे, पालकांचा आरडाओरडा या कश्शा-कश्याची पर्वा न करता किल्ल्यावर मावळ्यांचा खडा पहारा असायचा.😃 पालकांचे सारखे खेकसून घेणे ही ओवाळून घेण्याइतकी महत्वाची परंपरा होती. मातीत हात घालून फतकल मारून किल्ल्याजवळ बसणाऱ्या मावळ्यांना सुगंधी उटणे, सुगंधी तेल, स्वच्छ-सुंदर नवे कपडे यांची मुळीच पर्वा नसे. ते सारे तहान-भूक, देहभान हरपलेले जिवाची बाजी लावणारे छत्रपतींचे मावळे असत. भल्या  पहाटे किल्ला रोषणाईने उजळून निघे. शिवछत्रपती सिंहासनी विराजमान होऊन मावळे, प्राणी, गवळणी यांच्या मूर्ती किल्ल्यावर उभ्या रहात. सगळेजण आपापल्या मूर्ती किल्ल्यावर ठेवायला आणत. शेवटी किल्ला दिसेनासा होई, इतकी तिथे तुफान गर्दी होई! गडाच्या रक्षणार्थ छोटे मावळेही नवे कपडे घालून दिमाखात उभे दिसत. मातीत लोळून कायम अवतारात असलेली मुले नीटच सुवासिक तेल चोपडून, देवानंद किंवा राजेश खन्ना सारखा भांग पाडून, नवीन कपडे ‘इन’ शर्ट करुन येत.👦 तासभर नव्या नवऱ्यासारखी बरी नी सभ्य दिसत. तासाभारात उसने अवसान गळून पडे आणि तोंडावर तेलाचे सुवासिक ओघळ, आउट झालेला इनशर्ट, विस्कटलेला भांग, नव्या कपड्याना फटाक्यांचा दर्प अधिक मातीचे दाग असा मूळ अवतार धारण करत. नव्या चपला भिरकावून नित्याचा आरडाओरडा करत पहारा सुरु राही. ही परंपरा कोल्हापूर नगरीत अजूनही छान जोपासली आहे. प्रत्येक गल्लीत किल्ला असतो. रंकाळा परिसरातील संध्यामठ गल्लीत बाळगोपाळ दरवर्षी उत्कृष्ट किल्ला बनवतात. कोल्हापूरात किल्ले स्पर्धाही दिमाखात होतात.🤩


दिवाळीत मुलांनी किल्ला तयार करणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य सांगता येते. महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत मुले आणि मुली आपल्या घराच्या परिसरात डोंगरी किल्लयांच्या प्रतिकृती तयार करतात.
Sandhya Math Galli, Rankala, Kolhapur- 2019 killa.

    दिवाळीला लवकर उठायचे आहे म्हणून घड्याळात गजर लावून झोपलो की  झोप उडायची. कोणी तरी अगदी लवकरच उठून फटाके उडवायला सुरु करत. 'का लवकर उठवले नाही' म्हणून ओरडतच उठायचे. लवकर अंघोळ हवी म्हणून घरभर पळायचे. परसात आई,आजीने सगळीकडे पणत्या लावलेल्या असायच्या, रांगोळीने नटलेली  चूल ढण ढण पेटलेली आणि पाणीही कडकडीत तापलेले असे. चुलीसमोर शेकत बसावे वाटे इतकी कडाक्याची थंडी. मग आई पाटाजवळ, खाली रांगोळी काढे आणि आम्हा मुलांना नावडते, घरी बनवलेले खरखरीत उटणे लावून चोळे. चांगला घोड्याला खरारा करतायत असं  वाटे, पण पहाटेचे धपाटे नकोत म्हणून टोचकं उटणं  सोसायचं.🤣 'कार्टीच्या अंगावर गुंजभर मास म्हणून नाही, नुसती भिंगरीसारखी भिरभिरती, का गं बाई रोड तर गावाची ओढ' असे आज्जी बोले तर 'खाल्ल्या घरची अब्रू काढ़तात ही पोरं, खाद बोकडाची आणि जात लाकडाची' अशा वेचक म्हणी बारीक, गालफडे बसलेल्या मुलाना ऊटणे लावताना  ऐकाव्या लागत. आम्ही सगळी मुले त्या काळी झिरो फिगर होतो कारण कुणाला ही पोटाची शुद्ध नसे इतके खेळात गुंगायचो.😅 देव ही देण्याची वेळ मात्र कायमच चुकवत आलाय. लहानपणी गुंजभर हवे असलेले मास आता मणभर वाढले! पण आता त्याचे कोणास कौतुक??? आमचा जन्म स्तुतीसुमनां साठी नाहीच मुळी. त्या झिरो फिगरचे लोकांना आता कोण कौतुक.. आणि आम्हाला मात्र मरतुगडी, लुकडी करुन हिणवले गेले! आमच्या कानात ती आई, आज्जीची  निर्मळ स्तुती शिरायचीच नाही. नव्या फ्रॉकच्या तंद्रीत मोती साबणाचे छान अभ्यंगस्नान घडे. ओवाळून झाले की नवा फ्रॉक, रिबिनी, बांगड्या असा जामानिमा करून फटाके घेऊन कांचनचा कट्टा गाठला की मगच दिवाळी सुरु झाली असे वाटे. लगेच तिथे वृंदा, मंजूषा अशा अनेक सख्या नटून-थटून हजेरी लावत. चार फटाके लावले की मस्त वाटे. मग तुझा फ्रॉक छान.. माझा ही छान करत विठोबा मंदिरापर्यंत मिरवायचं.👧


    एका सखीच्या मातेने 'सैरंध्रीचा सल्ला' वाचून घरीच सुवासिक तेल व उटणे बनवले. ती रोज आईच्या या कलेचे सार्थ अभिमानाने वर्णन करायची. दिवाळी दिवशी ती ते तेल लावून आली, आम्ही कौतुके तिचे मस्तक हुंगून मस्त म्हणालो देखील. ती डौलाने आमच्या शेजारी बसली मात्र… आजूबाजूच्या समस्त घुंगुरट्या  जमा झाल्या आणि फक्त तिच्याच मस्तकावर घोंघावू लागल्या! ती बसे तिथे घुंगुरट्या हजर व्हायच्या. तिच्या मातेची तेल-कला घुंगूरट्याना फारच आवडली, हा रसिक दाखला पाहून आम्ही दिवसभर हसलो. परत काय तिने ते तेल लावले नाही. त्यांच्या होममेड उटण्याला कोणत्या प्राण्याची दाद मिळाली ते मात्र गुपितच राहिले!🤣

आनंदाची दिवाळी।  घरी बोलवा वनमाळी॥  घालीते मी रांगोळी।  गोविंद गोविंद॥ -- संत जनाबाई
Beautiful Rangolis by Rangoli Artists - Arun Khatavkar and Amol Nagawekar from Malkapur. 

   मलकापूर कलासक्त नगरी आहे. जरा समजायला लागल्या वर आम्ही मुली त्या नटीच्या गालासारख्या गुळगुळीत दारासमोर सुरेख रांगोळ्या काढायला लागलो. कुठलेच प्रशिक्षण न घेता गुलाब कारेकर, भिकूताई मानकर, सक्रे, वाकडे, पास्ते अशा शेजारणींच्या रांगोळ्या  बघून ही कला आत्मसात केली. सगळं गाव एकमेकांच्या रांगोळया बघायला लोटायचं, भरभरुन कौतुक करायचं. दोन दोन तास पायात मुंग्या येईपर्यंत केलेल्या कष्टांचं चीज व्हायचं. त्या काळापासून आज अखेर मलकापूर नगरी  दिवाळीला उत्तमोत्तम रांगोळ्यांनी सजते. कोसमकर, नागवेकर, पोतदार, खटावकर अशी अनेक मातब्बर मुले अप्रतिम रांगोळ्या काढतात. कोल्हापुरी येऊन कलाप्रदर्शन भरवतात तेंव्हा ऊर अभिमानाने भरून येतो. तिथे राहून त्यांनी कलाराधना पिढ्यान पिढ्या सुरु ठेवली. त्यांच्या या अजरामर कला प्रेमाचे खूप खुप कौतुक वाटतं.🙂


    अंबिके डॉक्टरांकडे लपवलेली हिडिंबा आकाशात सोडणं हा दिवाळीचा अविभाज्य कार्यक्रम असे. खूप राबून तयार केलेल्या त्या पाच फूट उंचीच्या महाकाय आकाशडबा/हिडिंबा मस्त सजवून कागदी साडी चोळी नेसवून रस्त्यांवर आणला जाई. गावातले सगळे नागरिक मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाला हजेरी लावत. खाली मशाल सदृश पलिता पेटवून त्याच्यात धुराचा गॅस भरला जाई. गॅसने टम्म फुगला की तो निसटू पाहे, मग चार जण त्याला घट्ट पकडून ठेवत. शेवटी अगदी पूर्ण फुगल्यावर तो आकाशात उड्डाण करी. मुले टाळ्या, शिट्टया  वाजवून आरडाओरडा करून आनंद साजरा करत. अगदी अवकाशात चांद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण केल्यासारखे! हे हिडींबा प्रक्षेपण अनेक सलग वर्षे  यशस्वी झाले. एका वर्षी मात्र या आकाश डब्याने उडताच पेट घेतला आणि आमच्या प्रेमळ हळव्या मनाच्या लेले बाईंच्या घरावर पडला.. झाले  बाई मोठ्या आवाजात ओरडू, रडू लागल्या, त्यांना वाटले घर पेट घेणार…. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला…. बाईंच्या आईनी 'गप्प बस शांते, काही होणार नाही' असे ओरडून  आमच्या बाईना शांत केले…😅 तिकडे पेटलेला आकाश डबा  लगेच विझला. तो अटीतटीचा प्रसंग आणि बाईंच्या आईची खमकी भूमिका विसरता विसरत नाही. बाई जितक्या कोमल तितक्या त्यांच्या मातोश्री कणखर होत्या. कुणाचे नुकसान होऊ नये म्हणून त्या नंतर मात्र ही प्रथा बंद पडली असावी. नंतर प्रत्येक दिवाळीत ही कथा आणि ती बाईंच्या घरावर पडलेली दुष्ट हिडिंबा(आकाशडबा) आठवायची, आज ही आठवलीच !🙂


    दिवाळीत वासुदेव, पिंगळा, बहूरुपी, कडकलक्ष्मी असे सारेजण गावात येऊन स्नेहसंमेलन भरवत. पुढे वर्षभर पुरणारी मनोरंजनाच्या शिदोरीची बेगमी करत, नगरवासी त्यांचा फराळ, कपडे, पैसे देऊन मानपान करत. सगळ्या मुलांना त्यांची लोकगीते तोंडपाठ होत. नगरीत कधीही पोलिस येत नसत. पोलिसांचे हुबेहूब  सोंग घेऊन बहुरुपी येई. छोट्या व्रात्य मुलाला पकडे आणि 'चल पोलिस स्टेशनात..दंगा करतोस काय' असा दम देई. ते पोर रडून 'नाही नाहीsss सोडा हो सोडाssss. परत नाई करत दंगाsss' असे ओरडे, रडे... शेवटी रस्त्यावर  लोळण घेई. त्याची आईही येऊन हसत त्याला 'न्ह्या जावा..फार वांड आहे' असे म्हणे.😂 मग कुठे आम्हाला तो बहूरुपी आहे हे समजे आणि सगळे हसू लागत. एकदा साक्षात सांब सदाशिव प्रकटले. निळाभोर देह, डोक्यावर जटा, चंद्रकोर आणि वाहती गंगा, गळ्यात रुद्राक्ष माला आणि चूप बसलेले नागराज असा झकास पेहराव केलेला. सोबत एक लहान मुलगा होता. स्वत: शंकर काही ‘ओम नम: शिवाय’ म्हणतात असे काही ऐकिवात नाही… हे मात्र स्वत:च्या नावाचा असा जप करत तांडव करत दर्शन द्यायचे.😊 भोळ्या बायका त्याच्या पाया पडत. गावभर फिरून त्यांच्या गंगेचे पाणी आटले म्हणून त्यांनी पाणी मागितले. आम्ही त्यांना पाण्याने पिचकारी भरताना पाहिलं आणि गंगेचे गुपित समजले. ती पिचकारी काखेत दाबून शंकरोबा डोक्यावरची गंगा दाखवत. शंकरोबा दमून निवांत कट्टयावर बसले, त्यांनी भाकरीची पोटली सोडली आणि दोघे डाळ-कांदा, चटणी आणि भाकरी खाऊ लागले. ऐन दिवाळीत साक्षात कैलासपती असे पायरीवर बसून गरीबासारखी भाकरी खाताना पाहून आम्हाला फार वाईट वाटलं. मी त्वरेने मातेकडे जाऊन शंकरासाठी फराळ मागून आणला. माझ्या सख्यांनीही माझ्या पावलावर पाऊल ठेवत फराळ आणला. आम्ही प्रेमाने त्या कैलासपतीना दिला. 'खावा ना हो करंजी,चकली' असा ते जणु काही आमचे काका मामा असल्या सारखा आग्रह केला. 'आता भाकरीच्या टायमाला भाकर खायाची बाळाss, फराळ सावकाशीनं खायाचाss' असे म्हणत त्या भोळया शंकराने झोळी उघडून वेग वेगळ्या कप्प्यात करंजी, चकली, लाडू टाकले. पाहतो तर काय झोळी फराळाने भरलेली! घरी येऊन भरलेल्या जादूई झोळीची कथा सांगताच हास्यकारंजे उडाले. मी मात्र ऐन दिवाळीत  'डाळ-कांदा अन भाकर खायला दे, भाकरीच्या टायमाला चकली नको' असे सांगताच आज्जी खो खो हसली !🤣


    फटाके मोजकेच असल्याने आम्ही पुरवून पुरवून उडवायचो. दिवाळी आहे म्हणून दुपारभर कांचनच्या कट्टयावर बसून दगडाने केपा कुटत बसायचो. शेवटी कोणीतरी येऊन ओरडेपर्यंत हे चाले. मुले तर चित्रविचित्र उद्योग करत. पायाच्या अंगठ्याने केपा घासून उडव, हातात फटाके माळ पेटवून उडव, विझलेले फटाके शोधून हाताने त्यातली दारू काढ, बंदुकीने केपा उडवताना बोट चिमटून घे असे लाखो उद्योग.😆 मग सत्कर्माची गोड फळे वाट्याला येऊन नव्या शर्टाला जळून भोके पडायची. हाता पायाला काळपट चंदेरी  रंग चढे, काही जण दाताने फटाक्यांच्या वाती काढून तोंडही चंदेरी रंगवत! ही मुले घरी जाताच घर आवाजाने दुमदुमे… 'काय हा अवतार, होउदे दिवाळी बघतेच तुला'.. अशी मातेची धमकी, तर 'थांब कुटतोच तुला' असे पित्याचे गोड बोल घुमत. अशा बाक्या प्रसंगी पाठीशी घालायला आज्जी-आजोबा मात्र हवेतच, तेच केवळ असले हल्ले परतवू शकतात. ते मुलांना दिवाळीच्या दिवशी मारायचे नाही, बोलायचं नाही असे निक्षून सांगत पालकांना गप्प करतात.😊 अशा मळक्या मुलांना मग आया नारळाच्या शेंडीने घासून धुवून काढत. भोकाचे नवे कपडे लपवत दिवाळी संपे. मग ही विद्रकल्याणी नेहरूंची गुलाबाची फुले, गुण उधळत राहत आणि भोके पडलेले शर्ट बिनबोभाट पुढच्या दिवाळीपर्यंत वापरत.🤣


लक्ष्मी पूजन सोडले तर मराठी लोकांच्या दिवाळी कुठलाही धार्मिक विधी नाही. खाणे-पिणे सणांचा आनंद लुटणे, मित्र-मैत्रिणींच्या, आप्तांच्या भेटी घेणे, एकमेकांच्या घरी फराळाला जाणे, त्यांना आपल्या घरी बोलावणे, रात्री फटाक्यांची आतशबाजी करणे ही यांची दिवाळी.

    या सगळ्या गोंधळात घरचे कार्यक्रम यथासांग सुरु असतात. वसुबारस, धन्वंतरी पूजन, लक्ष्मीपूजन असे नित्य धार्मिक आनंदपर्व सुरुच असते. मग आमची आवडती भाऊबीज येई. माझा मामा दरवर्षी आईला माहेरची शिदोरी घेऊन येई. सहा बहिणी असल्या तरी  दोघे मामा ठरवून सगळीकडे जात. शेवटपर्यंत हे प्रेम टिकले कधीच आईला माहेरची भाऊबीज आणि शिदोरी चुकली नाही. माझ्या दोन्ही प्रेमळ मामींनी लाख मोलाची साथ देऊन प्रेमज्योत तेवत ठेवली आहे. आई सकाळपासूनच मामाची वाट पाही. मामा एक-दोन बहिणींकडे जाऊन निवांत मलकापूर मुक्कामी येई.😊 मामा आला की आमच्या आनंदाला पारावार नसे. सर्वांच्या घरी मामा आलेले असायचे. आमचा मामा आम्हाला भटकायला घेऊन जायचा. पाय दुखेपर्यंत दरी डोंगर चढणे, नदीत डुंबणे, गुऱ्हाळावर रस पिणे असे विविध उद्योग चालायचे. तो ही मुलात मूल होऊन दंगामस्ती करायचा. दुपारभर पत्ते कुटत दंगा चाले. ओवाळणी काय आणि किती पेक्षा ते प्रेम अनमोल असते. आजही मामा हवाच असतो. ओवाळणीचा कार्यक्रम फार मजेदार असे. माझे बाबा भावांना मूठभर चिल्लर आम्हाला ओवाळणी म्हणून द्यायला सांगत. मोठा भाऊ निमुटपणे  तसे करायचा पण धाकट्या शेंडेफळाच्या जिवावर येई.🤣 आम्हाला ओवाळणी म्हणून ते पैसे दिले की जणूकाय याचेच दिवाळं वाजून कंगाल झाल्यासारखा ओक्साबोक्षी रडायला लागायचा… मग त्याची समजूत म्हणून बाबा पाटावर बसत त्याने बाबांना ओवाळून त्यांच्या कडून ओवाळणी म्हणून पैसे घेतले की मग स्वारी खुष! असली बाबा-बीज आमच्या कडे बरीच वर्षे सुरु होती!😃 आता आठवले तरी हसू येते. पाडव्याला बाबा आईला काय देतात याकडे आम्ही चौकस लक्ष ठेवायचो. ते खिशातले सगळेच पैसे तिला ओवाळणीत देत. आम्ही आवाक होत असू... लगेच दोन दिवसात त्यातलेच पैसे खर्चाला मागत, आई हसतमुखाने काढून देई मग खरी मजा कळे! त्यांच्या नात्यात तुझं-माझं हा शब्दच नव्हता आणि हाच खरा पाडवा असतो हे आज उमजते.😊


    अशी ही दिन दिन दिवाळी आली कधी नी गेली कधी कळायचे नाही, अजुनही कळतच नाही. फार हुरहूर लागते, फराळही डबे संपता संपताना खावा वाटतो. ही दिवाळी सोनपावलांनी आपली वाट उजळून फक्त अपरिमित सुख आपल्या झोळीत टाकते. मनातला अंध:कार दूर करत ती नाती दृढ करते, आशेचे नवे झगमगते मार्ग दाखवते. तृप्त शांत मनानंं ती हळूच आपला निरोप घेते… आपण मात्र स्वप्नं रंगवत पुढच्या दिवाळीकडे डोळे लावून बसतो.❤


विजयश्री तारे जोशी

१५-११-२०२०

टिप्पण्या

  1. Khoop chan. Balpanachya Diwalichi athavan zali.pakachi.tar ani Tare avadale. Hidimba prakash pan prakar navin ani
    Majeshir vatali.I think after Retirement vel jaycha prashna yenar nahi. Likhan he uttam vyavadhan ahe.👍👍
    माधुरी घाटे कोल्हापूर

    उत्तर द्याहटवा
  2. मस्त लेख. लहानपणीच्या दिवाळसणाचा आनंद आणि उत्साह संपूर्णपणे तुमच्या लेखात उतरलेला आहेच पण एकप्रकारची हुरहुर लावून पण गेलाय. God bless you, Madam.

    उत्तर द्याहटवा
  3. आपला लेख वाचून, खरं सांगतो दिवाळी असल्या सारखं वाटलं 🙏💐👌👍
    Vijay More

    उत्तर द्याहटवा
  4. Dear Madam ...Really speaking trully commenting ..on Ur memory power n power expression r beyond my capacities .
    Wonderful which includes all incidents .Remembering the mother .n sixer of CK Naidu r outstanding . There r many such minute points which I cannot go on writing .
    Please accept my Deepavali shubhashaya on this note n pray many more such write ups come our way from u n Ur memory .
    RBTophakhane .Belagavi . All the best .

    उत्तर द्याहटवा
  5. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम...शब्द संपले..अगदी लहान झाले ग मी वाचताना
    रेखा पाटील

    उत्तर द्याहटवा
  6. लाख मोलाची दिवाळी, आपल्या बालपणीची दिवाळी असे.... अगदीं तंतोतंत वर्णन, फारच भारी आहे तुझी लेखनशैली... Proud of you 💐💐💐
    Manisha Bhosle Desai

    उत्तर द्याहटवा
  7. काल रात्री तूझ्या लिखाणाचा आस्वाद घेतला. दिवाळीतील फराळा इतकाच तो रुचकर होता. तु अभ्यासात हुशार होतीस हे मला माहिती होत. पण आज तुं अष्टपैलू आहेस हे जाणवलं. इतक्या आठवणी जपून ठेवल्या आहेस की त्याची कादंबरी होईल. आणि हे सर्व आपल्या माणसासाठी हे महत्वाचं. अशीच खुप मोठी हो. मोठा भाऊ म्हणून तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचा अधिकार माझा आहे. या नात्याने पुनःश्च अभिनंदन आणि आभार.
    राजन सबनीस

    उत्तर द्याहटवा
  8. दिवाळीच्या दिवशी लेख वाचून दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला! खूप छान!👌🏼👌🏼👌🏼
    मिलिंद गुर्जर

    उत्तर द्याहटवा
  9. इतके कसे आठवते ग..तो बहूरपी अजून ,शांकर..भारी..
    विजय कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  10. विजयश्री ,तू ज्या विशिष्ट काळातल्या घटनांचे वर्णन तुझ्या लेखात करत आहेस त्या काळात मलकापूर किती छोटेसे गाव असेल पण त्याच्यावर सुंदर लेख लिहून तू आम्हा सर्व वाचकांचे लक्ष मलकापूरावर वेधायला चांगल्या अर्थी भाग पाडलेस ही तुझ्या लेखणीची खरच कौतुकास्पद कामगिरी म्हणावी लागेल .
    आपल्या रूढी,परंपरा याबद्दल सर्वांच्या मनात थोड्याफार फरकाने प्रेम असतेच पण तुझी त्या परंपरेवरील श्रद्धा, नितांत प्रेम जास्तच आहे .तुझ्या मनाचा बराच भाग या आठवणींनी,त्या आठवणींनी इतका व्यापला आहे की तू पटकन लहान होऊन(मनाने😄)त्या वातावरणात शिरतेस व एक एक प्रसंग अगदी खुमासदार पद्धतीने आमच्या समोर उभा करतेस आणि आम्हीही त्यात समरस होऊन ती अनुभूती घेतो.अगदी प्रत्येक प्रसंग ,मग तो बिघडलेल्या चकलीचा,मुलांच्या किल्ल्याचा असो नाहीतर लाडवाचा पाक शिकविणार्या तारेबाई (तुझी आई)चा असो त्या सर्व प्रसंगनिष्ठ विनोदाची पेरणी करून वाचकांना चांगलेच हसायला लावतेस व स्वतः चा विनोदी स्वभाव सिद्ध करतेस .प्रत्येक घटना आपल्या समर्थ शब्दांनी जिवंत करण्याचे तुझे कसब अवर्णनीय आहे आता आम्हाला मलकापूर व तेथील परंपरा, तेथील माणसे,त्यांचे स्वभाव, तेथील सणवार साजर्या करायच्या पद्धती व अतिउत्साहाने करणारी तेथील मोकळ्या मनाची माणसे या सर्वांची तुझ्या लेखामुळे छान ओळख झाली .छान लिहीले आहेस ,अशीच लिहीत रहा.👌🏻👍🏻🙏🏻🌹🌹
    Manisha Kulkarni Dubai

    उत्तर द्याहटवा
  11. Wah wah wah, khoopach sundar lihiles ga! Tuze blogs sundar asatatach pan ha blog amhala chotya Vijayashree chya gharat, darat gheun gela,amhala chhan diwali faral dilas tu 👌🏻👌🏻👌🏻
    Smita sapre

    उत्तर द्याहटवा
  12. दिवाळी दोन्ही लेख अप्रतीम सूरेख..धन्यवाद त्या दिवसाची आठ्वण ताजी केलीत
    मिलिंद कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  13. दिवाळी चे दोन्ही लेख खूप छान लीहले आहेस. लहानपणीची दिवाळी अगदी डोळ्यासमोर आली.खुसखुशीत विनोदी शैली खूप छान आहे.

    उत्तर द्याहटवा
  14. जुन्या आठवणी आल्या...खजीना आहे तुमच्या कडे...खूप धन्यवाद
    माणिक कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  15. किती सुरेख आठ्वणी...आता बाकी मलकापूर
    पहावेसे वाटू लागले
    विवेक आपटे पुणे

    उत्तर द्याहटवा
  16. Very very nice madam...but please translate and publish in English..google makes funny translations..
    Please translate all articles

    R K Patil

    उत्तर द्याहटवा
  17. सुंदर भाषा आणि अगदी मनमोहक presentation.. परदेशी राहून काही छान वाचल्याचे समाधान मिळाले. अशाच लिहीत रहा. सर्व पोस्टवर टाकलेले फोटो छान आहेत. खूप कष्ट घेतले आहेत हे पाहता क्षणीच कळले.. keep it up..

    उत्तर द्याहटवा
  18. Madam phar phar chhan athvani.Diwalitil pratyak varnan baghun amhi ajun lahan aslesarkhe vatate karan evdhe prasang ,pharal,lavkar uthun rangoli kadhne,navin kapde,sarv athvani sadar kelelya ahet.Apratim lekh,lahan vayatil itkya athavani thevne hi tumhala phar mothi dengi ahe,pratyakachya lakshat aste pan ase mandne hech tumchya buddhiche kaushalya ahe.Abhinandan madam,ani asech lihit rahave.

    उत्तर द्याहटवा
  19. खूप खूप खूप छान.
    ओघवत्या भाषेत लिहिलेल्या आठवणी वाचायला मजा आली. आठवणीत रमायला झाले.😀

    तुमची मेमरी आणि लिखाणाची शैली लई भारी आहे.
    मलकापूर गांव आतून बघायची इच्छा ब्लाॕगमुळे झाली आहे.
    Nostalgia आवडला 👌👌👌👌👌👌
    Excellent
    जीवन बोडके

    उत्तर द्याहटवा
  20. जरा लेट प्रतिक्रिया देतोय. 😊
    पण मलाच नव्हे तर सर्वाना त्यांच्या बालपणीची आठवण नक्की आली असणार. बालपणाच्या दिवाळीची सुंदर सफर घडवुन आणलीत. 👌👌😄
    Shirish Kotibhaskar

    उत्तर द्याहटवा
  21. आताच्या पिढी ने जरूर वाचावे असे खुमासदर लेखन करुन आपल्या मलकापुर च्या आठवणीतील दिवाळी पुन्हा समोर आली . पहाटेच्या रम्य वातवरणात दिवाळीचे अभ्यंगस्नान घराच्या दारात करायची रीत फ़क्त आपल्या मलकपुरात आहे . ताई आपले या लेखा बद्दल खुप खुप आभार . श्री सुहास सुरेश पाटील बाजारपेठ मलकापुर

    उत्तर द्याहटवा
  22. अत्यंत खुमासदार...खमंग लेखन.असेच लिहून आम्हाला जुन्या जगात नेऊन सोडा

    उत्तर द्याहटवा
  23. Madam diwalitil lahanpaniche sarv prasanga hubehub sakarlele ahet Apratim lekhan, happy Dipawali madam

    उत्तर द्याहटवा
  24. ।।ॐ॥ "आली आली दिवाळी आली" हा तुझा दिवाळीच्या फराळासारखा गोड व चमचमीत खुमासदार लेख छान जमलाय.आता तू तर सिद्ध 'लेखकू'झाल्याची चिन्हे दिसत आहेत. दिवाळी अंक अलीकडे फार वाचत नाही पण या लेखाने अंक वाचल्याचे समाधान दिले. मलकापूरची अशी आठवणीतली दिवाळी कोणालाही भूतकाळात घेऊन जाणारी आहे.फराळापासून फटाक्यापर्यंत , दर सुगीला हजेरी लावणार्‍या वासुदेवादि कलाकारापासून ते ज्याची वाट मुले चंदामामासारखी वाट पहातात त्या जिव्हाळ्याच्या मामा पर्यंत सर्वजण या लेखात भेटले. चकलीतल्या 'मोहना'चे मायावीपणापासून लाडूच्या पाकसिद्धीच्या पाकक्रियांची गुपिते व मजेशीर किस्से मनमोहक व मजेशीर आहेत.हिडिंबाचे मलकापूरच्या सॅटेलाईट स्टेशनावरुन होणारे अवकाश उड्डान हा अफलातून प्रयोग व लेले बाईंच्यावर बेतलेली आपत्ती ,हे सारे गमतीदार वर्णन बहारीचे आहे. बाल वास्तुतज्ञांनी घडवलेले किल्ले व गमतीशीर प्रसंग मनोरंजक आहेत. नव्या कपड्याची बाल मनाची ओढ व खेळताना कपड्यांची आबाळ किती सहज होती. "दिन दिन दिवाळी"च्या ओवाळणीतून सुरु झालेला महोत्सव चढत्या वाढत्या उत्साहाने भाऊबीजेच्या ह्रद्य भावावेगाने आनंदाचा महापूरच आणतो.भाऊबीजेतली "बाबा बीज" नाविन्यपूर्णच! आसपासच्या शैजारणी व मैत्रीणींना आता तू लेखबद्भ करुन अक्षर केले आहेस.दीर्घ लेख असूनही वाचत रहावा अशी उत्कंठा वाढवत रहातो. कंटाळवाणा होत नाही, अगोदर जुन्या स्मृतीना उजाळा देत हा लेख मनाला भिडत रहातो.मध्येच हास्याचे कारंजे फूटावेत असे प्रसंग व तशीच वर्णशैली यामूळे लेख चटकदार झाला आहे.कोल्हापूरी भोजनासारखा चमचमीत व क्षुधावर्धक आहे. शेवटपर्यंत वाचनाची ओढ वाढत जाते व लेख अचानक चटका लावून निरोप घेतो.कोल्हापूरच्या किल्लेकारागिरीचे व मलकापूरच्या रांगोळी कलाकारांचेही स्मरण लेखात येवून जाते.छान आहे दिवाळीसारखाच आनंदोत्सवी लेख!👌👍🙏

    उत्तर द्याहटवा
  25. Nilambari Apte लेख खूप छान लिहिला आहे सर्व प्रसंगांचे हुबेहूब वर्णन केले आहे मी 76 ते 80 ह्या कालावधीत मलकापूर ला राहत होते लेख वाचून जुने दिवस आठवले धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -