गो गो गोवा..

केशपुराण

Life is too short to have boring hair.
                                       

        'प्रकाशचं आयुर्वेदिक माक्याचं तेल काळया रेशमी केसांसाठी सुखमय निद्रेसाठी'...ट्रिंग.. अशा जाहिराती रेडिओवर ऐकून ऐकून घरोघरी त्या हिरव्यागार तेलाची कमनीय बांध्याची काचेची बाटली येई. नव्या आगंतुक टकलावर हिरवळ उगवली आहे असे दिवास्वप्न पहात मंडळी तो माक्याचा विशिष्ट सुगंध मिरवत असत.👨‍🦲 तरीही काही कातळांवर हिरवळ उगवतच नसे… मग कच संजीवनी, कोरफड तेल आणि नाना प्रयोग सोसून डोके तेजोमय योग्यासारखे लकाकू लागे मग त्यांनीच ते विद्वत्तेचे लक्षण आहे अशी अंध श्रद्धा पसरवली असावी.😋 युगा न युगे  या नादाला लागून आपण केश कौतुक करत आलोय. बाळाच्या मऊ मऊ जाऊळावर फुंकर मारून त्याला हसवले की ते मखमली कुरळे केस भान हरपून टाकतात. हे केशवैभव बाळाचा बाळकृष्ण करून टाकते. तो वेखंडाचा  गंध जीव मोहून टाकतो. असे जन्मापासून  केसांचे आणि आपले अतूट नाते असते. पुरुष जमातीला मात्र असून अडचण नसून खोळंबा असे हे वरदान आहे!😅


                                'ये रेशमी जुल्फे, ये शरबती आँखे......इन्हे देखकर, जी रहे हे सभी '

असे म्हणत ७०-८० मधली तरुण पिढी या रेशमी जुल्फावर आपली जान कुर्बान करत असे. जया भादुरी, अर्चना जोगळेकर अशा काही नट्यांचे सुंदर लांबलचक केस पाहून साऱ्या तरुण तरुणींचा कलेजा खलास होई. सुकेशिनी मुलींना तर भलताच डिमांड होता कारण सुंदर केस हे सौंदर्याचे लक्षण मानलं जाई.अगदी मागणी घालून लग्ने संपन्न होत. केस लांब व्हावेत म्हणून आम्ही मुली विहिरीजवळून ब्राह्मीचा, माक्याचा पाला आणून मातांना त्यांचे तेल करायला लावत असू. लहानपणी काही  मुली गोमातेचे शेपूट डोक्यावर फिरवून घे, पूजेचे तीर्थ पिऊन तो हात केसांना पूस असे गमतीशीर प्रकारही ‘लंबकेशा’ होण्यासाठी करत असत. यासाठी प्रसंगी गोमातेचां प्रेमळ लत्ताप्रसादही अनेक बालिकांनी सोसला.🤣 माझ्या लहानपणी लांब केसांचे कौतुक साऱ्यांनाच होते. मग कालानुरूप केसांवर कात्र्या फिरू लागल्या आणि लांब नागिणीसारख्या सळसळत्या शेपट्यांची फॅशन कमी कमी होऊ लागली. त्या काळी गंगावन उदयास आले, ज्या बायका लांबकेशा नाहीत त्या असे गंगावन  आपल्या शेपटीला जोडून डौलात तो लांबवलेला शेपटा तोऱ्यात मिरवू लागल्या. हे गुपित असे, ते कोणालाही कळू नये म्हणून ललना अनेक युक्त्या करत. मग खुंटीवर अडकवलेला उसना केशसंभार कुणी पाहिला की बोभाटा होई.😆 आम्ही अगदी जवळ जाऊन एखादीने गंगावन लावून शेपटी लांबवली आहे का हे निरीक्षण करून या गुपिताची सनसनाटी बातमी इप्सित बायकांना पुरवत होतो! काही चतुर नारी ही भेसळ इतक्या बेमालूमपणे करायच्या की त्यांचे बिचारे पतीदेवही फसत असावेत! नियोजित वधूच्या लांब केसात गुंतलेले काही नवरदेव फशीही पडले. केसभेसळ समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असे, अक्षता पडून जायच्या.... एकदा सप्तपदी विधी झाला की नारीचे केस लांब काय नी आखूड काय... त्याचे महत्व कमी होऊन जीभेच्या लांबीवर संसाराचे भाकीत ठरे! एका नववधूचा असा जोडलेला शेपटा ऐन लग्नविधी सुरू असताना गुरुजींच्या अंगावर पडला! तरी दचकलेल्या गुरुजींनी हसत लगीन लावून 'नांदा सौख्यभरे' हा आशीर्वाद दिलाच!😃

Invest in your hair. It is the crown you never take off.

        माझ्या पूर्ण शाळेत बॉबकटवाली एकमेव मैत्रीण होती. त्याकाळी मलकापूरला ब्युटीपार्लर असायचा सवालच नव्हता, त्यामुळे गाव ज्या कलाकारांकडे केस कापे, तोच तिचा ‘बॉब’ करत असावा. 💇‍♂️💇‍♀️ पंतप्रतिनिधींच्या वाड्यात पांडू आणि धोंडू असे दोन भाऊ अनेक वर्षे राहायचे. ते त्यांचे  सरकारी केशकर्तनकार होते. रिकाम्या वेळात ते गावभर धोकटी घेऊन फिरायचे आणि सगळ्या गावाचे केशकर्तन बैत्यावर करायचे. बैत्यावर म्हणजे वर्षभर जवळ जवळ उधारी वर केशकर्तन करून दिवाळीला लोक त्यांना धान्य, पैसे देऊन हिशेब भागवत. त्या दोघा भावांची बायका-मुले कुटुंबे आजूबाजूच्या गावात असावीत. बैत्यावर ते कसा संसार चालवायचे हे आई अंबाबाईच जाणे. ते सरकारांचे नोकर त्यामुळे कायम टेचात असायचे. सरळ नाक, तेजस्वी सावळा वर्ण, मध्यम तरीही धष्टपुष्ट बांधा, धोतर, फेटा, पैरण, पायात चामडी कर्रर्रर्र कर्रर्रर्र वाजणाऱ्या वहाणा आणि खांद्याला अडकवलेली चामडी धोकटी अशी जुळ्या भावांसारखी वेशभूषा असे. त्यातले पांडूकाका जरा हसतमुख बोलके होते. धोंडूकाकांना बोलणे, हसणे याची नावड असावी. ते मक्ख चेहऱ्याने सपासप  कात्री चालवत. ते दोघं वार ठरवून घरी येत आणि घरातल्या साऱ्या पुरुषांचे ‘मेकओव्हर’ करून टाकत. दारात, अंगणात एक पोते टाकून कोवळ्या उन्हात उघड्या अंगाने हा कार्यक्रम चाले. त्याकाळी झिरो मशीन मारणे हा एक काटकसरीचा  कट होता. ते झिरो मशीन मारून घेताना लहान मूल भोकाड पसरे, नाक तोंड लाल बुंद होई… दुखत असावे चांगलेच. शाळेतले मास्तरसुद्धा पोराचे केस बोटाच्या पेराएवढे दिसले की हाकलून काढायचे. त्यामुळे मुलं गप पैलवान कट करून घेत. ज्ञान मिळवताना ते केसांत अडकू नये, पटकन मेंदूत शिरावे यासाठी शिक्षक पुरेपूर काळजी घेत. पालक ही केस लवकर परत कापणीला येऊ नयेत म्हणून मास्तरांना दुजोरा देऊन एका दगडात दोन पक्षी मारत. डोक्याचा डोंगर उघडा पडून मुले विद्रूप दिसत याचे कोणास काही पडले नव्हते. केस वाढवणे, त्याचे कोंबडे करून मानेला झटका देऊन उडवणे हे प्रकार ते बाळ कॉलेजला गेले की सुरु होई. शाळा संपेपर्यंत पांडूकाकांनी केलेला पैलवान कट हीच त्याची स्टाईल असे, त्याचा वचपा ती बाळे कोंबडा उडवून नंतर काढत. बच्चन जमाना आल्यावर तर ते केस मानेपर्यंत रुळू लागले! आतातर खांद्यापर्यंतही आले आहेत!🤷‍♀️

Love yourself as much as I love my new hair.
        मुलींचे केस कापणं निषिद्ध असल्यामुळे आमचा या काकांशी मुळीच संबंध येत नसे. आपण मुलगी आहोत ते फार भाग्यवान असल्या सारखं वाटे. पण पुरुषमंडळी यांची चातकासारखी वाट पहात. या बंधूंना बाळाचे पहिले जाऊळ काढताना फार मान असे. एरवी मख्ख चेहेरे करून चालणारे काका मग अगदी बोबडे बोल बोलत, रांगत, वाकुल्या दाखवत बाळाला लाडीगोडी लावत कर्तन अगदी प्रेमाने करत. त्या भावी गिऱ्हाईकाचे पहिले केशकर्तन केले की काकांचा मानपान होई. गडाबडा लोळून रडणारे बाळ खेळवत मामाच्या मांडीवर बसवून हा  कार्यक्रम उरकला जाई.👶 सणवार आला, विशेषतः दिवाळी आली की हे पांडूकाका आणि धोंडूकाका घरोघरी पळत केश कर्तन करताना दिसत. लोकांच्या, पोरांच्या मुंड्या पायात धरून हे भरारा कात्री चालवत. वितभर आरसा तर अगदी शेवटीच दाखवायचा! ते बोडके स्वरूप पाहून कोणालाही परत आरशात पहावे वाटू नये…😆 अशी अगदी निर्मोही योगी अवस्था करून टाकत.! मग 'फार केस कापले' असे म्हणत भुईतून वर आलेली मुले नाराज झाली तर 'वाढतात आठवड्यात' असे सांगून ते गोड हसत. मुलाचे आदर्श पिता 'अजून कापा कानावरचे...' असे फर्मान सोडत मुलांचां पूर्ण चकोट करूनच समाधानी होत. घरादाराचे समाधान होईपर्यंत कापणी सुरूच! आम्हा मुलींना द्वाड भावांना चिडवायला झकास कारण मिळे. अलिकडे काही ऍप्स आणि वेबसाइट्स ही ५० वर्षांपूर्वीपासून चालत आलेली परंपरा आपल्याला ‘होम सर्विस’ च्या नावाखाली अव्वाच्या सव्वा पैसे आकारून देतात. अनेक वर्षांनी रितसर दुकाने थाटली गेली आणि भल्या मोठ्या आरशासमोर कलाकारी सादर होऊ लागली. आता तरी त्या दुकानांत ऍप्रन, हातमोजे, मास्क असे काय काय घालून उभी असलेले  कलाकार दिसतात. समोर शंभर बाटल्या, डब्या आणि नानाविध शस्त्रास्त्रे असा जामानिमा  मांडलेली ही मंडळी कोणत्याही क्षणी इंजेक्शन मारून ऑपरेशन सुरु करतील असे वाटते. हे अगदी निष्णात सर्जनचा आव आणून कॅटलॉग दाखवून पसंतीचा कट करतात (शिजवतात) आणि हौसेने लोक केसाबरोबर खिसा ही कापून घेतात. एके ठिकाणी केस कापणावळ सहा हजार आहे हे ऐकून माझे डोळे पांढरे झाले…😅 आज ते दोघे असते तर नक्की कोट्यधीश केशसर्जन झाले असते हो… एवढे पैसे त्या बिचाऱ्यांना एक गिऱ्हाईक आयुष्यभराचे केशकर्तन करून  देत नसेल.
        
        केशकर्तनालय ते पार्लर हा मोठा प्रवास केलेली ही दुकाने आता बक्कळ पैसे कमावतात. केस रंगवून, धुवून, वाळवून ते छान सेट करण्याचे कामही ही दुकाने उत्साहाने करतात. माझ्या लहानपणी मात्र केस काळे करून वय लपवणे कमीपणाचे मानले जाई. ज्येष्ठ लोक ‘हे केस उन्हात पांढरे नाहीत झाले’ हा डायलॉग कसा मारणार ना ?... म्हणून असेल.😆 नाहीतर पांडूकाकांनी हे डांबरीकरणाचं काम नक्की शिकून घेतलं असतं. काही उच्चभ्रू लोक कलप करीत पण काटकसरी लोक त्यांना नावे ठेवत बसत. त्यामुळे ते ही चोरून चोरून कलप करत, कोणी वय झाले हे कसे उघडपणे स्वीकारेल? हे दोघे  बंधू कायम बिझी असायचे, त्याकाळीसुद्धा त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागे कारण गावातल्या दोन-तीन हजार बाप्याना सभ्य आवतारात राखण्याचे मोलाचे काम ते करत. घेरा, बिस्कीट कट लहान मुलांचे करायचे. पैलवानकट आणि झीरोकट हे दोनच प्रकार जास्त प्रचलित असल्याने कट बिघडला म्हणून कुणी शेंडीत राख घातल्याचं ऐकिवात तरी नाही. 🤣

Girls with natural hair smell like tropical paradises, coconut, and fruit salad.

        केशसंभार सुंदर असलेली रमणी पाहताक्षणीच नेत्र सुख देते. एखादी सुकेशिनी ललना चालू लागली की पाठीवर तिची सुंदर वेणी डौलात  झोके घेते. एखादी सुस्नात सुंदरी केशसंभार सोडून चालली की तिच्या केसांचा मोर पिसारा हालताना फार मोहक दिसतो. अशावेळी पुरुषच काय बायकाही पुढे जाऊन तिचा चेहेरा पाहिल्याशिवाय राहत नाहीत. मोराच्या चेहेऱ्यापेक्षा पिसाऱ्याकडे जास्ती लक्ष जावे असा काहीसा प्रकार होतो! म्हणूनच केस हे एक अस्सल सौंदर्याचे लक्षण मानले गेले आहे. आमच्या काळी शॅम्पूचा उद्रेक झाला नव्हता. दर रविवारी आदल्यादिवशी भिजवलेली शिकेकाईची पावडर रिठे टाकून शिजवली जाई. घरातल्या बायका त्या शिकेकाईच्या अर्काने घरातल्या मळक्या मुला-मुलींचे केस खसाखस चोळून, कडकडीत पाण्याने धुवायच्या. ते शिकेकाईचे पाणी डोळ्यात जाऊन डोळे चुरचूरत त्यामुळें मुले रडत, मग वरून धपाटे मिळत. 😀 शिकेकाई च्या चोथ्याने अंग घासून मुलेबाळे भांड्यासारखी चकचकीत घासली जात. घरोघरी मुलांचा करूण आरडाओरडा चाले. मग दिवसभर ते केस मोकळे सोडून उन्हात वाळवत बसायचं सुख थंडीत मस्त वाटायचं. तो एकच दिवस मुलींचे केस मोकळे सोडलेले दिसायचे. मग दुपारी त्या प्रेमळ माता मुलींच्या केसातला गुंता सोडवत वेणी-फणीचा सामुदायिक कार्यक्रम गप्पा मारत साजरा करत.😅 त्या वेळी मात्र जीव नको होई इतके केस दुखायचे, रडावे तर वरून धपाटे खावे लागत...अशी दिवसभर शिक्षा च होई. शेवटी  तेल चोपडून घट्ट वेण्याच वळल्या जायच्या आणि बायका मोकळ्या व्हायच्या. दोन वेण्या,पाच पेडी वेण्या, बट वेण्या, टोप वेण्या अशा अनेक प्रकारच्या वेणीत  केस गच्च बांधून ठेवलेले असायचे. 🎀 वर शोभा वाढवायला रंगीबेरंगी रिबीनीचे झकास फूल घातले की डौलात वेणी हलवत चालायचे. परदेशात ही Wimbledon ग्राउंड वरच्या मुली किती सुरेख वेणी घालतात. आता तर अगदी उलटी परिस्थिती आहे, वेण्या घातलेल्या मुली- बायका कमी दिसतात. वेगवेगळे कट्स करून, रंगवून, मोकळे केस उडवत राहण्याची फॅशन अगदी रंगात आली आहे. महिलांनी पोनीटेल नामक घोड्याची शेपूट आपलीशी करून चापात बसवली आहे. हल्ली तरुण मुलेही फॅशन म्हणून ही पोनीटेल घालतात! केस आवळून बांधतात हे पाहून बाकी आश्चर्य वाटतेच. आमचे केस जन्मभर बांधून ठेवल्यामुळे मला मात्र मोकळे केस ठेवले की सुचतच नाही. वरून आई किंवा शाळेतल्या बाई 'झिंज्या  आवरा...वेणी घाला' असे जोरात ओरडतील असे वाटू लागते उगाच. अगदी या उलट माझ्या कन्येचं आहे, बांधून ठेवले की केस दुखतात असं टुमणं गेली १०-१५ वर्षतरी मी ऐकत होते, पण परवाच स्टाईल म्हणून, विस्कटलेली वेणी ‘messy plaits’ ची फॅशन आहे असं सांगुन घातली!  माझा out dated शेपटा या पिढीला आत्ता, तो ही विस्कटून आवडायला लागला! दुनिया गोल आहे इतकंच काय फॅशन ही गोलच आहे  याचा साक्षात्कार मला पुन्हा एकदा झाला. आता गंगावन जोडून शेपूट हालवत चालू नका म्हणजे झाले!🤣


        ‘मोकळ्या केसांत माझ्या तू जीवाला गुंतवावे’ असे जुन्या नट्या काळा कुरळा केशसंभार मिरवत म्हणायच्या, त्या काळी कुरळ्या बटांचे खूप अप्रूप होतं. आता केसांवर इस्त्री फिरवण्याची फॅशन आहे. असले ताठ सरळसोट केस चांदोबातल्या चेटकीणबाईचे, हडळीचे असायचे!🙃 आता कुरळ्या केसांमध्ये पण वेव्ही, लूस कर्ल्स, टाईट कर्ल्स, इनवर्ड, औटवर्ड असे आमच्या पिढीला ‘सारखंच तर दिसतंय’ असे वाटणारे अनेक नवीन प्रकार आहेत. रंगरंगोटीबद्दल तर बोलू तेवढं थोडंच, हायलाईट्सपासून ते केस पिकवून त्यावर लाल,हिरवे-निळे रंग देणे इथंपर्यंत सगळं अगदी हौसेने चालतं. हे केशरंगारी एका डोक्यासाठी इतके पैसे घेतात की त्यात एखादे आख्खे घर रंगवून होईल! त्या केसांवर आता भलतीच हुकूमत चालते. केसांचं नैसर्गिक रूप, रंग सगळं काढून काही वेळा अगदी चित्रविचित्र प्रकार केले जातात. असेल ते नसवा आणि नसेल ते भेटवा हे सुरूच. कुरळे केसवाल्याना ताठ केस हवेत तर ताठ असलेल्यांना वेव्ही हवेत! देवाने दिलेत त्यात समाधान म्हणून नाही आणि मुलेही यात अगदी हिरिरीने स्पर्धा करतात. केसांवर प्रयोग हा उद्योग तेजीत  सुरु आहे. काही वेळा खरंच सौन्दर्य खुलते पण काही दिवसातच केस मूळ रूप दाखवून देतात आणि मग तो ‘लूक’ अगदीच हस्यास्पद दिसायला लागतो. या  नवकलाविष्काराने  अनेक कलाकारांचे पोट भरते हीच एक समाधानाची गोष्ट. परवा तर एका मुलाचे डोके मुंगूस, खार असे प्राण्याच्या डोक्यासारखे दिसले! कोणी साळिंदर बाळ रंगीत केसांचे काटे डोक्यावर अभिमानाने मिरवू लागलेले पाहून छान मनोरंजन होते.😃

My hair doesn’t need fixing. Society’s views of beauty do.

        वाढते वय न स्वीकारणे हे तर आताच्या मालिकांमध्येही सर्रास दिसून येते. पन्नाशीच्या सासुबाईचाच काय तर ऐंशीच्या आसपास असलेल्या आज्जेसासुबाईचाही एक केस पांढरा दिसत नाही. सगळे स्त्री-पुरुष अगदी शेवटच्या घटका मोजेपर्यंत कुळकुळीत काळ्या केसांचे, चिरतरुण दिसतात. आता दिसला आज्जीचा एखादा केस पांढरा तर प्रेक्षक रडणारेत का ??? पण नाही.. सगळ्या स्त्रिया आणि पुरुष केस, भुवया, पापण्या, मिशा काळ्याकुट्ट करून वावरताना दाखवतात.😅 साठीनंतर दुसरं बालपण येतं ना, मग काय फुलाफुलांचे शर्ट घालून आणि काळेकुट्ट केस करून त्याचं स्वागत करावं आणि पोरात पोर होऊन मस्त हुंदडावं असा हा दिखाव्याचा जमाना आहे. असो केस पिकले म्हणजे कोणी ज्ञानी होत नाही आणि काळे केले म्हणजे अज्ञानी नाही. प्रत्येक जण स्मार्ट, सुंदर, presentable दिसू पाहतो आहे हे ही नसे थोडके… 😉

I’ve had long hair, I’ve had short hair, and I’ve had in between hair… and it’s all good.

        त्या मानाने दक्षिण भारतात लांब, नैसर्गिक केसांचे अजूनही कौतुक आहे. माझ्या नणंदेची कर्नाटकातली नात ५-६ वर्षाची असतानाच ‘मी लांबच लांब केस वाढवणार आहे’ असं सांगत होती. लांब केस कापत कापत अगदी बॉयकट वर पोहोचले आणि आता कुणीतरी लंबकेशा सुकेशिनी होण्याचे विचार प्रकट करतंय हे मजेशीर आणि कौतुकास्पद आहे.😊 फार काही तंत्र न वापरता छान धुवून मोकळे सोडलेले केस सुंदरच दिसतात हे माझे अगदी प्रामाणिक मत आहे. माझे केस मोकळे सोडले की मी अस्वस्थ होते पण दुसऱ्यांचे केस छान मोकळे पाहायला मस्त वाटतं (घरी जाऊन मला थोडीच गुंता सोडवावा लागणारे !). आजही ‘ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली’ हे गाणं ऐकून आपण ताल धरतोच, कारण ही केसांची बटच आपल्या भारतीय सौन्दर्याचं अविभाज्य अंग आहे. असे हे केशपुराण बायकांपेक्षा पुरुषवर्गाला जास्त त्रास देणारं असतं. स्त्रियांना टक्कल सहसा नसते पण ते पुरुषवर्गाचा  मात्र छळ करते. पूर्वी टोप निघाले होते, आता tricologist डोक्यावर केसांची पेरणी, लावणी करून बक्कळ पैसा मिळवतात. 👨‍🦲पूर्वी जो कोंडा करंजेल तेल, कोरफड, मेथी या घरगुती उपायांनी बरा होई त्यासाठी हजारो रुपये मोजून specialist लागतो. आता टक्कल म्हणजे अक्कल हे कोण  सहज मान्य करत नाही. असण्यापेक्षा दिसणे महत्वाचे आहे...आणि सुंदर चिरतरुण दिसायचा ठेका काय नटानीच घेतलाय? आहे बुवा सोय तर आपण ही खिशाला परवडेल तेवढं तरुण दिसायला काय हरकत आहे? आरसा तरी हसेल ना?😊

        असे हे केस कितीही केसाने खिसा कापत असले तरी आपण.. त्यांचे लाड पुरवत कोड कौतुक करत जुल्फे उडवत स्वत:ला चॉकलेट हिरो हिरोईन समजायला हवे ना?....कालाय तस्मै नमः! तर चला मंडळी मस्तपैकी केस रंगवा.. हाय लाईट करा आणि सुंदर रूप आरशात पहात खुशीने शिळ घालत मधुबालासारखी फू करत बट उडवा.. किंवा कोंबडे उडवा ..🧒👩


विजयश्री तारे-जोशी

१३.१२.२०२०

टिप्पण्या

  1. श्री, नेहमीप्रमाणे च अतिशय सुंदर लेख!!! अभिनंदन तुझं💐💐💐
    तुझा प्रत्येक लेख वाचतांना सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळतो!! कारण आपल्या पिढीने हे सगळं असच्या अस पाहिलं आहे! मलाही दुसऱ्या चे मोकळे केस छान वाटतात, पण स्वतः चे ठेवायला बिलकूल आवडत नाहीत, खरच अस्वस्थ होत, मान दुखायला लागते.
    स्रियांचा आवडता असणारा हा विषय, पण काही पुरुषांना त्या काळी ताटात केस सापडलेला बिलकूल चालत नसे (आताही कोणाला चालतो? पण काय करतील बिचारे😊.आता केस स्त्री चा आहे की पुरुषांचा? हे कोणालाच सांगता येणार नाही हे ही खरे!) माझे स्वतः चे आजोबा ताटात केस सापडला की सरळ न सांगता ताटावरून उठून जायचे. त्यामुळे त्यांचं जेवण झाल्यानंतर च रविवारी केसांचा गुंता काढावा लागे!

    उत्तर द्याहटवा
  2. खुपचं सुंदर लेख.👍👌.. नेहमीप्रमाणेच..खुप खुप अभिनंदन.🌷🌷.अगं जयश्री...तुझे लेख भुतकाळात घेऊन जातात,तेव्हा खरच तिथुन वर्तमानात यावसं वाटतच नाही.‌..पण यावच लागतं..कारण परत तु दुसरीकडे घेऊन जातेस ना?..खरच छान वाटतं भुतकाळात रमायला...आम्ही खरच भाग्यवान आहोत..कारण तुझ्यासारखी मैत्रीण मिळाल्यामुळेच आम्ही हे अनुभवु शकतो.... खुप खुप धन्यवाद 🙏🙏😍

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम लेख...फोटो सुद्धा किती स मर्पक फार आवडला लेख...निवांत वाचला आज..तुम्हाला कसे काय पांडू आठवले...कमाल आहे

    R.S,Patil

    उत्तर द्याहटवा
  4. मला एक गांगवान सापडले होते ते आठवले...मस्त मजेशीर लिहिता तुम्ही..असेच लिहित जा..आनंद मिळतो
    रसिका जोशी

    उत्तर द्याहटवा
  5. विजयश्री, तुझा हा केसावरचा लेख अतिशय अप्रतिम झाला आहे ,आत्तापर्यंत केसांच्या सौंदर्यावर आधारित उत्तम गाणीं ,लेख वाचनात आले ,केसांच्या सौंदर्यावर तर हिंदीतल्या व मराठीतल्या प्रथितयश कवींनी भरभरून लिहिले ते छानच होते पण तुझा लेख वाचल्यावर माझ्या मनात एक गंमतीशीर विचार आला तो म्हणजे "घरगुती खानावळ "व "प्रोफेशनल खानावळ "या दोन्हीत जो फरक असतो तो तुझ्या व प्रथितयश कवींच्यात आहे असे मला वाटले म्हणजे त्या प्रोफेशनल खानवळीत सर्व चकाचक असते घरगुती खानावळीच्या मानाने पण घरगुती खानावळीच्या पदार्थाना जी घरची चव असते ती वेगळीच !तसे तुझे सर्व लेख अगदी घरगुती विषयांवर,आपण गप्पा मारतो तशा घरगुती भाषेत,कोणताही शब्दांचा भपका,न दाखवता असे तुझे लेख असतात ,त्या प्रत्येक लेखातून तुला त्या घटना,ती त्यातील माणसे ,सण,या सगळ्यांबद्दल तुला असलेले आत्यंतिक प्रेम, जिव्हाळा हेच प्रतित होते कुठेही शब्दांचा कोरडेपणा नाही आणि हो,तुझा स्थाईभावच असणारी विनोद बुद्धी, त्याची चार वाक्यागणिक होणारी पेरणी,यामुळे लेखाला कुठेही रटाळपणा न येता लेख बहारदार होतात व तुझ्या विनोदी बुद्धीचे कौतुक वाटते
    आत्ताच्या या "केसपुराणा"तही केसांच्या बदलत जाणार्या फ्याशनचा प्रवास लिहिताना"अगांतुक टकलावर हिरवळीचे दिवास्वप्न,"पुरुष जातीचे केस म्हणजे असून अडचण...मुली केस वाढायसाठी गाईचे शेपूट ,प्रसंगी लत्ताप्रहार सोसून फीरवत,लांब केसाची अट लग्नाच्या वेळी घालून गंगावनाने फसवले गेलेले नवरदेव,ऐन लग्नात गुरूजींच्या अंगावर नवरीचे गंगावन पडून दचकणारे गुरूजी,पांडू धोंडू भावांच्या गंमती अशा अनेक विनोदी गोष्टीनी तूझा लेख जास्त च रंगतदार होतो .साधी सरळ सोज्वळ भाषा आणि विनोदाची मध्ये मध्ये पेरणी त्यामुळे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे हे "केसपुराण" वाचताना मन हलके करते व बहार आणते !!
    मनीषा कुलकर्णी दुबई

    उत्तर द्याहटवा
  6. Madam
    Barecha divas jhale apla pen shant n visram ghetla ka? Aaj mala group bar vachayala .milal .vachala.chan .
    Kharach koutuk karayalacha pahije .kiti details lekhani la lihitana yetat tyacha.uttam .sunder.
    Ek Matra visarle te takkal var 'top' basavatat .thik ahe .
    Jatajata ani yek ...ya takalyala visarlat pathavayala .Tari thik ahe . Vachayala group milalacha ki take it easy ...with kind regards.n good wishes .
    R.B.Tophakhane .Belagavi .

    उत्तर द्याहटवा
  7. Jayu खूप मस्त...पांडू व धोंडू किती मस्त लिहिलेस..तुझे केस लांब आहेत म्हणून इतके सुचले तुला...तुझा फोटो टाकायला हवा होता स.. मस्त लेख
    रेखा कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  8. अती सुंदर.फेसबुक वर वाचले..
    उपाध्ये काका

    उत्तर द्याहटवा
  9. अती सुरेख..ममाझा ही पचका झाला..लांब केस वाली हवी होती... बोबकट मिळाला
    K.R.bokil

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -