- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
‘मनी sssमनीsss ये बरं इकडे.. शोनू आता मुळीच बाहेर जायचं नाही हं, खाऊ हवा का तुला???… खाली चल बघूsss..’ हे एकतर्फी प्रेमळ संवाद मला रोज ऐकू येत पण ही गोडुली परी चकार शब्द बोलायची नाही. मनी फार आज्ञाधारक…. आमच्या मुलांसारखा दंगा नाही की उच्छाद नाही. गॅलरीच्या कठड्या वरून ती मला दिसायची नाही, पण बाईंचा आवाज, सूचना मात्र छान ऐकू यायच्या. या छोट्या पोरीशी दोस्ती करायलाच हवी, नवीनच आली आहे शेजारी पण पाहिलंही नाही तिला अजून असा विचार मनात यायचा.👧 काही दिवस गेले आणि मॉर्निंग वॉक करताना मनीच्या आज्ञाधारकपणाचं गुपित अचानक उलगडलं.. ती चक्क एक मांजर होती !!! भुरा काळा रंग, रंगास मुळी न शोभणारे हिरवी पिवळी झाक असलेले डोळे असे सामान्य रुपडे लाभलेले गावठी मांजर होते ते. मालकीणबाईंच्या मुखकमलाकर 'पर्शियन कॅट आहे आमचं' असा अभिमानी भाव ओसंडून वहात होता.🐈 गुलहौशी मालकीणबाईंनी तिला गळ्यात रेशमी सुरेख दोरी अडकवून फिरायला आणलं होतं. मी चकितच झाले. आजपर्यंत मी कुत्र्यांना गळ्यात पट्टा बांधून ओढत फिरायला आणणारे लोक पाहिले होते. काही दांडगट कुत्री मालकाला टर टर ओढत.. कुत्रे पुढे मालक मागे अशी फिरवत असतात… 🦮पण इथेतर चक्क एक लाडली मांजर मालकिणीच्या पावलावर पाऊल टाकून टेचात इकडे तिकडे पहात मॉर्निंग वॉक करत होती ! दोन-पाचशे पावलांचा वॉक झाल्यावर मालकीणबाईंनी तिला लाडाने अलगद उचलून खांद्याच्या मांजर-पिशवीत ठेवलं, त्यात तीही अगदी पटकन छान तोंड बाहेर काढून पोझ घेऊन नटी सारखी बसली आणि मग मालकीणबाईंचा वॉक सुरु झाला. त्या तिच्याशी छान गप्पा मारत चालत होत्या. 'दमलीश मनी ?आज थंडी आहे नाई...गारठून गेलीस का ग ?' या प्रश्नावर मनीने हो म्हटले की नाही….ते बाकी समजले नाही. बरोबर असलेला त्यांचा छोटा मुलगा मात्र मांजरासारखा चुपचाप चालला होता. त्याला एका हाताला धरून फरफटत नेणे सुरू होते अन् कावेबाज मार्जार ऐटीत त्याच्या मातेच्या काखोटीत बसले होते! काय दिवस आलेत त्या बिचाऱ्या कुलदिपकावर !.. विरोधाभास पाहून डोळे तृप्त जाहले.😹
हे मनोरम दृश्य पाहून मी एकदम लहानपणात गेले. आमच्या गावात तर मांजरांचे पेवच फुटले होते. घरचे दूध-दुभते असल्यामुळे आणि कुटुंब नियोजन मार्जार कुटुंबियाना लागू नसल्याने दर सहा महिन्यांनी पाळणा हलत होता.त्यांची जनगणना कारायची पद्धतही नव्हती तेंव्हा. आमचे मलकापूर शेती प्रधान असल्याने धनधान्य उदंड होते, मग उंदरांचा सुळसुळाट होई म्हणून सर्वांच्या घरी मांजरे पाळलेली असायची. मांजर पिले गुप्त जागी ठेवते. ती केस नसलेली, डोळे न उघडणारी पिले अगदी दीनवाणी दिसतात. अगदीच परावलंबी लाल गोळे.. ही पिल्ले दोन आठवडे डोळेही उघडत नाहीत. पंधरा दिवसांनी बारीक आवाजात म्याऊ म्याऊँ ऐकू येते अन् त्यांच्या आगमनाची चाहूल लागते. महिनाभर ती आईच्या कुशीत लुचत बसलेली असतात. ती आदर्श माता त्यांना चाटून चाटून स्वच्छ करत गोंजारत बसते. ती मांजर माता कोणाला तिकडे मुळीच फिरकू देत नाही, ओचकारत, फिस्कारत बसते. चोवीस तास खडा पहारा देत असते. आयुष्यभराचे प्रेम त्यांच्यावर उधळत असते. पिलांना तोंडात धरून पिलांना सात घरे फिरवते,आणि त्यांचे शत्रू म्हणजे त्यांचेच जन्मदाते.. बोक्यापासून रक्षण करते. फिरवून एकदा त्यांची सुरक्षित घरवापसी झाली आणि ती गोंडस मऊ मऊ केसांची काळी, शुभ्र, सोनेरी, करड्या रंगाची सुरेख गाठोडी घरभर पळू लागली… की आम्ही बच्चेकंपनी हरखून जायचो आणि लगेच त्यांची वाटणी करायचो हे माझं ते तुझं. एखादं सुंदर सोनेरी,पांढरे शुभ्र सगळ्यांनाच पाहिजे असायचं आणि एखादं कुरूप राखाडी, भुरकट मरतुगडं कुणाला अगदीच नको असायचं. त्या वाटणीत भांडण, प्रसंगी मारामाऱ्या ठरलेल्या असायच्या. आमची आज्जी/माता मग लवादाचे काम करून द्यायच्या आणि मग मालकी प्रस्थापित व्हायची. सुट्टीत टाईमपास करायला आणि त्यांचे खेळ पाहत बसायला धमाल यायची. त्यांचे डोळे पिवळे, हिरवे, निळे अशा विविधरंगी छटांचे पाणीदार मन मोहक असायचे, आणि रात्री भयानक लकाकायचे. शेपूट, मिशा, गुलाबी छोटे कान गोड दिसायची एकदम. त्यांच्या आवडी निवडीही वेगवेगळ्या असायच्या. आमचं एक मांजर तर चक्क काकडी तर एक गरम भाकरी खायचं! कधी एखादं पिलू हरवायचं, वाट चुकून पळून जायचं. हरवलेल्या पिलाची वाट बघत बसण्यात आणि ठिकठिकाणी त्याला शोधण्यात आम्ही दिवस-रात्र एक करायचो. त्याचा मालक हवालदिल रडवेला होई. कुठे गेले? काय करत असेल? दूध भात कोण देणारं त्याला?... गारठेल का ते?... असे शेकडो प्रश्न पडत. मलकापूर मध्ये काही हरवले आणि कोणताही प्रश्न पडला तरी भट गल्लीत जाऊन भटजीबुवांना विचारायची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे मांजर हरवले की आम्ही भावंडे रडक्या तोंडाने तडक भट गल्ली गाठत असू आणि मांजराचा ठावठिकाणा दीनवाणा चेहरा करून विचारत बसायचो. गुरुजी हसत पण आमचे दीनवाणे चेहेरे बघून थातुर-मातुर उत्तरे देऊन आम्हाला कटवत.😅 'कोणत्या रंगाचं होतं? कोणत्या वारी, किती वाजता गेले?' असे प्रश्न करून आकाशाकडे बघत बोटे घालून आकडेमोड करून परतेल की नाही ते सांगत. एकदा भटजीबुवांनी आमच्या प्रश्नांच्या सरबत्तीला कंटाळून सांगितलं की ‘ते मांजर दक्षिणेला गेलं आहे’. मग घरी येऊन आईला दक्षिण कोणती हे विचारून भंडावून सोडले. ‘अभ्यासात लक्ष दे जरा... बाईंना विचार शाळेत जाऊन.’ अशी उलटी सुलटी उत्तरे मिळून शेवटी ती दिशा कळली की बारीक नजरेने मांजर शोध सुरु व्हायचा. सूर्याकडे तोंड केल्यावर उजवी दक्षिण दिशा. आम्ही मुलेसारखे सूर्याला बघून सारा गाव पालथा घालायचो. सूर्य डोक्यावर आला की उजवी कोणती परत यक्ष प्रश्न पडे सूर्य दिशा बदलून टाकतो असे वाटे. ४-८ दिवसांत उत्साह संपायचा आणि ते मांजर पळून गेलं हे मान्य करत, परत कधी मांजरीला पिले होणार याची वाट पहायचो. 🙃
ही मांजरे आमच्याच ताटांमध्ये जेवायची, बरोबर गुर् गुर् करत आमच्याच पांघरुणात उबेला झोपायची. स्वच्छता नसते, अंगावर जीवजंतू आहेत, त्यांचे केस श्वसननलिकेत जाऊन दमा होतो... असे hygiene वाले विचार चुकूनही डोक्यात यायचे नाहीत. पण खरंच त्यांच्या मुळे आम्हा कुणाला काही रोग झालाही नाही. आम्ही त्यांचे सोनी, डॉन, बॉबी, राखी, सांबा असे फॅशनेबल फिल्मी नामकरण ही करत होतो. हाक मारली की पिले पळत यायची. दर रविवारी लाईफ बॉयच्या उरलेल्या तुकड्यांनी पिलांना गरम पाण्याने अभ्यंग स्नानही घालायचो, अगदी घट्ट पकडून ! ती बिचारी पिले पळायला बघत पण आम्ही त्यांना जबरदस्तीने पकडायचोच. दुष्ट बोक्या पासून पिलांचे रक्षण करण्यात आमचे १-२ महिने सहज सरायचे. त्यांच्या लीला पहायला, त्यांच्याशी खेळायला अत्यानंद होई. तो रेशमी मऊ मऊ मखमली स्पर्श हवा हवासा वाटे. बोक्याने पळवू नये म्हणून त्यांच्या गळ्यात काचेच्या बांगड्या घालायचो आणि त्यांना टोपलीखाली झाकून ठेवत राखण करायचो. कुणाच्याही घरी अभ्यासाचा घोषा लावणारे आदर्श पालक नसल्याने घरोघरी हे मार्जार प्रेम उतू जात असे. गुलाबी थंडीत गोंडस मांजर पिलू कुशीत घेऊन मस्त उन्हं खात बसायचे स्वर्ग सुख अनुभवले त्यालाच कळेल. 🙂
परवा मात्र कहरच झाला सकाळी उठल्याबरोबर देवाचं नाव ऐकायला मिळावं, भजन भक्तिगीत ऐकायला मिळावं म्हणजे दिवस बरा जातो, तर कुठलं काय मनीss मनीss चा गजर सुरु झाला. त्या मनीने पळून जाऊन गांधर्व विवाह केला की काय? मला प्रश्नच पडला. आमचा चहा झाला तरी मालकीणबाईंचा कंठशोष थांबेन, आता तिच्या सुरात सूर मिसळून तिचे पतीदेव, मुलगा, मुलगी सगळेच मनीच्या नावाचा जप तार स्वरात करू लागले. मागच्या गल्लीत दोघे आणि पुढच्या गल्लीत दोघे असे आर्त स्वरात हाका मारत फिरू लागले. बाई नाईट गाऊनवर, मुले अंघोळीच्या खास वेषात अन् पतीदेव बनियन घालून मनीsss मन्याsss करत वेड्यासारखे गल्ली भर येरझाऱ्या घालू लागले. आता त्या मुक्या मांजराच्या प्रायव्हसीवर यांची का गदा? ती मनी काय हिची शोडषा मुलगी होती का पाळत ठेवायला?? मला प्रश्नच पडला. इतक्या वेळा देवाचं नाव घेतलं असतं तर तुकारामांसारखं पुष्पक विमान खाली आलं असतं असाही एक विचार मनास चाटून गेला. एक-दोन तासांनी आवाज येणं बंद झालं. ती मनी मित्राला भेटून स्वगृही परतली असावी असा कयास बांधला आणि मी माझा जीव भांड्यात टाकला. असेही मला ‘मनी’च्या नामघोषात माझा दिवस व्यर्थ दवडायला आवडलाच नसता इतके ते मनी पुराण डोक्यात गेले. 😅
याउलट, माझ्या स्वयंपाकघराच्या मागे एक कलता पत्रा आहे. त्यावर एक सोनेरी मार्जारसुंदरी कायम निवांत पहुडलेली असते. माझा कुकर, चहा, स्वयंपाक, ऑफिसची घाई, कशाकशाकडे म्हणून तिचे लक्ष नसते. फक्त कुकरची शिट्टी वाजली की मान उचलून ‘ही बया कुकर बंद का करत नाही’ अशा नजरेनी ती माझ्याकडे बघते. आवाज बंद झाला की परत निवांत! कोवळ्या उन्हात ती मस्त आपलेच अंग छान चाटून सूर्य स्नान करत असते.मधून मधून शेपूट हलवून मोहक विभ्रम करत स्वत:चे कौतुक करत असते. मी ऑफिसला निघेपर्यंत ही बया तिथेच पडून मला 'गप जा ऑफिसलाsssतुझ्या नशिबात हे मस्त सुख नाही' असे हिणवत असते. अंग चाटणे हाच काय तो व्यायाम करते. तिचा मस्त राजयोग सुरु असतो. ' मला काय करायचंय’ असा एक दिव्य दृष्टिकोन तिने अंगिकारला आहे. 'दुनिया गयी भाड मे' असे म्हणत ती तुच्छ नजरेने इकडे तिकडे पहाते. आजूबाजूला घोटाळणाऱ्या बोक्याना सुद्धा ती हिंगलत नाही. गर्विष्ठ सुंदरीसारखी त्यांना चक्क निग्लेक्ट करत, आपल्याच धुंदीत असते. बोके तिला प्रेम विव्हल होऊन विनवत असतात. पण ही आपल्याच मस्तीत असते. पैलतीरी पोहोचलेल्या योगिनींसारखा शांतपणा तिच्या चेहेऱ्यावर विलसत असतो. ती सोनेरी मनी पोटापाण्याचे काय करते हा प्रश्न मला अधून मधून पडतो पण नीट अंग धरून गुटगुटीत आहे त्यामुळे विशेष काळजीचे कारण नाही. 🤣
आता परदेशासारखे इथेही कॅट शोज होतात, स्पा आहेत, हेअर स्टाईल करण्या साठी पार्लर आहेत... केवढं कोडकौतुक आहे मांजरांचं. त्यामुळे खाऊन खाऊन उडीही मारता येत नाही इतके बाळसे धरलेली मांजरे पाहून मजाच वाटते. त्यांचे वेगळे शॅम्पू, कंगवे, केशरचना पाहून हसूच येतं. तसे मांजर चालताना लचकत, मुरडत नाही, तरी सौन्दर्यस्पर्धेत ‘कॅटवॉक’ का शब्द कुठून आला? याचा बरिक शोध घ्यावा.पण मांजराचा बेरकीपणा असलेली नजर, लुच्चेपणा आणि मीच काय ती सुंदर असा over confidence असलेली नजर मात्र सगळ्या मॉडेल्सनी कमावलेली असते बरे! नाहीतर मांजर कुठे स्पर्धा जिंकण्यासाठी स्वतः सहभागी होत नाही आणि तुमच्या मर्जीने आपल्याच पायात आपलेच पाय वाकडे पाय टाकत तर मुळीच चालत नाही. आता त्यांचे शो मालकाची हौस म्हणून भरवले जातात. मालक अन् मांजर नटून सजून तिथे जातात हे बाकी मस्त. या वरून आठवले, मांजर आडवे गेले तर घाबरून कॅसेट रिवांइंड केल्या सारखे उलट पावली परत मागे जातात. अहो त्यांच्या पेक्षा जास्त आडवी तर माणसेच जातात ना.. ती सुद्धा चांगल्या कामात ? तेंव्हा जाता का उलटी पावले टाकत?🐈
मांजर हा खरंतर शेतातले उपद्रवी उंदीर खाण्यासाठी पाळायचा प्राणी हे बाळबोध वचन होते.आमच्याकडे एकदा रात्री अंधारात गोठ्यातून मांजराचा जोरात फिस्कारल्याचा, भांडणाचा आवाज येऊ लागला. बाबा कंदील घेऊन धावले... पहातात तर काय आमच्या माऊने एका विषारी सापाला घायाळ करून टाकले होते, त्यामुळे गाईचा जीव वाचला. अंगावर भीतीने काटा आला. मांजरांना अंधारात नीट दिसते आणि कान, डोळे तीक्ष्ण असल्याने बरोब्बर उंदराची शिकार करतात. पण हल्लीची फॅशनेबल मांजरे उंदीर खातात का? की उंदीर मामांना घाबरून आपणच पळतात ? उंदीर-मांजर वैरभाव हा natural instinct विसरलीत का ? हा मोठ्ठा प्रश्न आहे. अभ्यासूंनी कृपया उत्तर द्यावे. त्यांचे हाय स्टँडर्ड पाहता ती ‘उंदीर खाऊ’ मांजरे वाटतच नाहीत हेच खरे. आपण कधी सुंदर नटीला ‘बाथरूम धुतेस का?’ असं विचारतो का? तसंच. शिकार करणारी ही वाघाची मावशी माणसाच्या नादाला लागून ऐदी, नको इतकी गुबगुबीत होत चालली आहे हे खरं. उंदराची शिकार न करणारी ही मांजरे आता टॉम अँड जेरी सारखी एकत्र येऊन मालकीणबाईंना त्रास देऊ नयेत म्हणजे झालं. 😼
एकूणच मला मानव प्राण्याने मांजराचे सद्गुण घेतल्याचे अनेक ठळक पुरावे सापडले. आता ‘मांजर जरी डोळे मिटून दूध पीत असले तरी जगाला समजते’ ही म्हण घ्या, हल्ली असे दूध पिणारी मंडळी पाहून आपणच नाही का डोळे मिटत? खाउदे काय खातंय ते असं म्हणून गप्पच बसतो ना ? अगदी अतीच दूध पिऊन पातेल्याचा खडखडाट झाला की मग कोणीतरी फटका देतो.😸 मांजराची पिले लवकर पायावर उभी राहत नाहीत, डोळे उघडत नाहीत हे सुद्धा एक साम्यच आहे की! आपली पिले तर पंचवीस वर्षे काय करावे असा विचार करण्यात दवडतात,पुढे सात नोकऱ्यांची घरे बदलत कशी तरी लडखडत पायावर उभी रहातात… ती बिचारी मांजरे दोन महिन्यात पळायला लागतात आणि परत कधीच मातेवर अवलंबून रहात नाहीत, हा गुण आपण का घेत नाही ?
राजकीय मंडळींनी त्याचा सात घरे बदलण्याचा गुणधर्म किती अंगिकारला आहे… हे आपण दर निवडणुकांपूर्वी पहा तोच. तसेच त्या वेळी सात पक्ष बदलून कुणाच्याही ताटा खालचे मांजर व्हायला त्यांना मुळीच संकोच वाटत नाही. पाठीत सोटा बसेपर्यंत डोळे मिटून दूध प्यायला मिळाले म्हणजे झाले! तेवढे निगरगट्ट मात्र व्हावे लागते बरे. पण घर बदलताना यांचे दात कार्यकर्त्यांना लागत नसावेत असे सकृतदर्शनी तरी वाटते. अंदर की बात राम जाणे. मनीचे दात मात्र पिलास मुळीच इजा करत नाहीत हे बाकी खरे हो. तसा मनी राजकीय निग्रह असावा लागतो. आणखी एक गुण म्हणजे लाडी गोडी लावत पायात घोटाळणे आणि खोबरे तिकडे चांगभले करणे - हा गुण आपल्याला जिथे तिथे दिसतो. असे आता एखाद्या पक्षाने 'मांजर' हे निवडणूक चिन्ह मागितले तर मुळीच आश्चर्य वाटून घेऊ नये. या पक्षास लगेच मत देऊन डोळे मिटून दूध पिण्याचा लाभ घ्यावा / सुखे घेऊ द्यावा हे बरे. सूज्ञास अधिक सांगणे नलगे.😉
मला बापडीला मी अगदीच सामान्य नागरिक असल्याने मांजराचा कसेही टाकले तरी पायावर उभे राहायचा गुणधर्म फारच आवडतो. प्राप्त परिस्थितीशी झुंज देऊन कोणत्याही प्रसंगी पायावर उभे राहण्याची उर्मी हा बेरकी जीव नकळत देऊन जातो. आम्ही लहानपणी मजेने त्यांना कुठून ही टाकायचो पण हे आपले पायावर उभे! एकदा तर एक वेडे पिलू सर सर नारळीच्या झाडावर चढले! आता याला कसे उतरवावे असा विचार करत बसलो.. ते ही घाबरलेच होते त्याला उतरता येईना केविलवाणे म्याव म्यावं करू लागले. दया येऊन त्याला ये ये करत खाली साडीची झोळी करून बोलावू लागलो…. थोडे खाली आले अन् डोळ्याचे पाते लवायच्या आत खाली पडले… पायावर उभे राहिले..अन् धूम पळाले. आमच्या मात्र काळजाचा ठोका चुकला. कधी कुठले मांजर सपशेल आडवे पडल्याचे पहिलेच नाही, इतके अष्टावधानी. त्याला हार मानणे मान्यच नसते जणू ! देवा.. प्रत्येक माणसाला त्याचा हा एक अपराजित हा गुण दिलास, तर किती गोष्टी सोप्या होतील रे ? प्रत्येक जण सकारात्मक विचार करेल असे वाटून जातेच.😺
अशा या लबाड, चतुर तरीही देखण्या, लोभस जीवाचे म्हणूनच लोक एवढे कौतुक करत असावेत. आता काही अवलक्षणी नतद्रश्ट मांजरे गृहलक्ष्मीची नजर चुकवून दुधाचे पातेले मोकळे करतात. पण यांच्या पाठीत लाटणे घालायला भारतीय संस्कृतीत बंदी आहे! का ?.. तर हातून नकळत मांजर मेले तरी सोन्याचे मांजर करून काशीला जाऊन, भटजीला दान करावे लागते. आता सोन्यास पन्नास हजार रुपये प्रति तोळा दर असताना असले काही जमणे नाही… त्यापेक्षा त्याचे चोरून, डोळे मिटून प्यायलेले दूध परवडले…. हा एक दूरदर्शी व्यवहारी विचार करावा हे बरे. 😾
पुढचा जन्म मांजराचा मिळणार असेल तर परदेशातल्या एखाद्या जीव ओवाळून टाकणाऱ्या सुंदर रमणीकडे दे असे मी देवाला विनवेन. किमान आयुष्य पॉश आणि निवांत जाईल. तिथे भरपूर व्हरायटीचे कॅट खाद्य मिळेल आणि चोरून दूध प्यायल्याचा एवढा बोभाटा तरी होणार नाही! तिथे काशी..सोन्याचे मार्जार अशी पाप पुण्याची भानगड निर्माणच होणार नाही… हवे तर ही दहशत घालणारी एखादी भारतीय सुसंस्कृत महिला शेजारी असावी म्हणजे अगदी सेफ झोन मध्ये लाईफ एन्जॉय करायला मिळेल, कुणी वाकड्या नजरेने पहायला देखील नको ! 😹
अशी ही लाख मोलाची माऊ... आपलीच सर्वात देखणी मार्जार सुंदरी आहे असे खुशाल समजून, तिच्यासारखेच डोळे मिटून तिच्यावर जिवापाड प्रेम करा. तिच्याशी गोड गप्पा मारून जनांचे मनोरंजन ही करा !😺
विजयश्री तारे जोशी
२४.१२.२०२०
स्थान:
Kolhapur, Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या






आपल्या घरी पूर्वी मांजरीन होती तीच नाव मी चिमी ठेवलं होतं, चिमे चिमे चिमे म्हणून हाक मारलीकी पळतच यायची...मस्त लेख
उत्तर द्याहटवाविजय मोरे
Mast जमलाय. मलाही मांजरे फार आवडतात. पूर्वी पाळली पण होती .पण आता आपण घराला कुलूप लावून गेलो तर त्यांचे काय म्हणून बंद केले. निवांत असतात मांजरे. त्यांना त्यांच्या शिवाय जगाची फिकीर नसते.
उत्तर द्याहटवासीमा मोरे
किती सुरेख लेख...फार फार आवडला..मांजर आणि माणूस तुलना होऊ शकते हे आज कळले
उत्तर द्याहटवाR.S.Patil
श्री अग तुझा लेक एकदम " अप्रतिम "👍 आणि त्यातून मी कुत्रे आणि मांजर यात रमणारी मग काय माझा आवडता विषय. लहानपणी मामा कडे उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत ह्या पिल्लां बरोबर खेळण्याचा आनंद लुटायची पण लग्नानंतर फ्लॅट सिस्टिम मध्ये हा आनंद घेता आला नाही पण पुन्हा पंधरा वर्षांपासून स्वतंत्र घर असल्याने माझ्याकडे माझ्या ह्या आवडत्या प्राण्यांची ये जा चालूच असते. मी पण असं प्रत्येकाचं नावं ठेवतेच मनी, मन्या, मिकू, मिनी, चिकू, गोल्डी, ही माझ्या मांजराची नावं आहेत 🐈 अग श्री ह्या प्राण्यांपासून अजून एक शिकण्यासारखं म्हणजे उद्याची चिंता नाही. उगीच आपलं उद्या साठी साठवणूक करत आजचा दिवस आपण खराब करतो. एक मात्र अजून शिकले की मांजर वास्तूवर लवकर प्रेम करते तर कुत्रा हा माणसावर प्रेम करतो. हे माझं वैयक्तिक मत आहे. पण मला मात्र दोघेही खूप खूप आवडतात म्हणून तुझा हा विषय आणि लेख खूप खूप आवडला 👌👌👌असंच सतत लिहीत रहा . तुला पुढील लेखासाठी खूप खूप " शुभेच्छा " 👍 " All the Best "👍
उत्तर द्याहटवाकुंदा पाटील बदला पुर
अती सुसाट..सुदंर लिहीलाय ..आवडला..
उत्तर द्याहटवाप्राजक्ता पाटील
खूप सुंदर, माहितीसभर & कटाक्ष पण
उत्तर द्याहटवाफार सुरेख लेख, मांजर या प्राण्यावरील हा अतिशय गमतीदार लेख प्रथमच वाचण्यात आला, खुप आवडला. माझ्या कन्येस मांजरांची खुप आवड आहे, परंतु फ्लॅट मध्ये आम्ही रहात असल्याने मांजर पाळण्याचे धाडस नाही केले, परंतु cute मांजर मिळाले तर जरुर पाळेन. तू निवडलेला मार्जार प्रेमा वरील विषय आवडला, अशीच लिहीत रहा. असंख्य शुभेच्छा.
उत्तर द्याहटवाNice articles...proud of you...you are a nice writer..
उत्तर द्याहटवाNisha
Madam ...ATI sunder .
उत्तर द्याहटवाChan develop zalel ahe .ekdum pasant apli" money ."
Asecha likhan rahude ...with good wishes. ..RBTophakhane Belagavi .
Madam phar surekh lekhan,Mansana manjar he jari kshullak vatat asel tari tumhi itke changle lihile ahe,karan sarasari khedegavat jast manjre astat te lahan satana tyanchi Aai tyana tondat dharun sat ghare phirat aste,mhanun tumhi phar barkaine lihile ahe he sahasa konala mahitpan nahi pan tumhi changle lakshat thevun lihile ahe.Kasehi padle tar payavarch padte ha barkava phar chhan.Apratim lekhan madam ata apan Sarvagun Samppanna lekhikach zale ahat.asech lihit rahave amhi vachat rahin
उत्तर द्याहटवाMadam खूप खूप छान..आमच्या कडे दोन मनीआहेत जाहीर वाचला तुमचा लेख...खूप हसली सगळी..खास तुम्हास धन्यवाद सांगितले आहेत
उत्तर द्याहटवामिलिंद कु लकर्णी
भारी आवडला लेख.. मांजर प्रेमी ग्रुप वरपाठवा
उत्तर द्याहटवाआवडेल
बाई किती किती कौतुक करू तुझे...माझ्या सासूबाई fan आहेत तुझ्या...दोन तीन वेळा वाचतात... हासायला मिळते....धन्यवाद...आता श्वान बद्धल लिहिणार ना..
उत्तर द्याहटवामाधुरी कुलकर्णी
विजयश्री, आपल्या भारतीय रूढी,परंपरा, रम्य बालपण,यौवनातील college life ,सणवारांचे सुरेख वर्णन या मानवी व मानवनिर्मित सणवारांचे सोहळे यांचे वर्णन उत्साहाने करणारी आमची सिद्धहस्त लेखिका मुक्या प्राण्यांच्या दुनियेचेही अचाट निरीक्षण क्षमतेच्या व स्मरणशक्ती च्या जोरावर उत्तम व परिणामकारक वर्णन करू शकते हे तू या मांजरावरील लेखाने सिद्ध करून दाखवलेस आणि तुझी लेखनक्षमताही सिद्ध केलीस
उत्तर द्याहटवाअगदी मुक्या प्राण्यातील मांजर या प्राण्याचा विषय जणु प्रबंधासाठी घेतल्यासारखा त्याचे दिसणे,विविध रंग, त्याच्या सवयी,त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य हे सर्व तू इतक्या डिटेलमध्ये व बारकाईने लिहीले आहेस की त्यावर तुला सहज पीएच्डी मिळेल आणि तुझ्या विनोदी स्वभावाप्रमाणे मध्ये मध्ये विनोदी वाक्यें जसे
नटीसारखी पोझ देऊन मालकीणीच्या पिशवीत बसलेली मांजरी,मांजराना कुटुंब नियोजन नव्हते,मुक्या मांजराच्या प्रायव्हसीवर गदा,पुष्पक विमानाचा संदर्भ, सूर्य स्नान करणारी व गप जा ऑफिस ला म्हणणारी व दुनिया गयी भाडमे अशा अनेक सुंदर विनोदी वाक्यांनी लेख फारच मनोरंजक झाला आहे
आणि शेवटी मांजरासारखेच आपण हार न मानता कितीही संकटे आली तरी मांजर जसे कसेही कुठुनही पडले तरी दोन पायांवर उभे रहाते तसे आपण संकटात न खचता उभे रहावे असा छान संदेशही दिला आहेस .एकुण लेख अत्यंत परिपूर्ण, दर्जेदार झाला आहे यात मुळीच शंका नाही !🙏🏻🙏🏻🌹🌹
मनीषा कुलकर्णी दुबई
नेहमीसारखाच मस्त लेख. विशेष म्हणजे मला ही माझ्या लहानपणची आठवण आली. कारण आम्ही त्यावेळी गावात गंगावेश ला रहायचो. कायम घरात एक तरी मांजर असायचे. आम्हा सगळ्यांना म्हणजे आमचे वडील काका चुलत भाऊ मी स्वत: माझा भाऊ मांजराची प्रचंड आवड. त्याला दुध पाजणे खायला देणे वगैरे प्रकार आम्ही हाैसेनं करायचो. मजा असायची. 👍👍👍
उत्तर द्याहटवाशिरीष kotibhaskar
कसलं भारी लिहीलय अगदी जबराट😻🔥❤💕
उत्तर द्याहटवा