- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अत्यंत देखणे राजस रूप लाभलेली माझी माता अवघ्या सोळाव्या वर्षी माप ओलांडून मलकापूरच्या ताऱ्यांची सून झाली. माझ्या आजोबांचे पंतप्रतिनिधी घराण्याशी थेट नातेसंबंध त्यामुळे त्यांच्या राजवाड्यात आई-बाबांचा विवाह शाही थाटात पार पडला. पौराणिक देवतेसारखा सुरेख गर्द जांभळा शालू आणि वाकी पासून साधारण पन्नास-साठ तोळे सोने धारण करून मातेचा जमीनदार तालेवार घराण्यात गृहप्रवेश जाहला. आरस्पानी नितळ गुलाबी गोरा वर्ण, सरळ धारदार नाक, टपोरे काळे डोळे, भरदार उंचीपुरी देहयष्टी आणि मनमोहक भुरकट काळा किंचित कुरळा लांब सडक केश सांभार असे विधात्याने तिला अत्यंत सुंदर रूप बहाल केले. या वर्णनास शोभणारे सुंदर काठ पदराचे नऊवारी पातळ नेसली की स्वर्गातली एखादी देवताच प्रकटली आहे असे वाटे. तिचे सात्विक, तेजस्वी तरीही करारी दैवी रूप पाहून अनेक जण रोज जाता येता नकळत तिला नमस्कार करत, शुभ कामाला जाताना आवर्जून तिचे दर्शन घेत. शाळेतल्या सगळ्या मुली तुझी आई किती सुंदर आहे असे बोलल्या की अंगावर मूठभर मास चढे. माझे वडील गावाचे काका म्हणून ती गावाची काकी झाली. त्या मानाने अत्यंत साधे अन् सामान्य रूप लाभलेल्या माझ्या वडिलांना तिने पसंत कसे काय केले असे सारे गावच काय आम्ही घरचे आणि शेवटी आमची मुलेही तिला विचारून भंडावून सोडत. राशिवडेकर घराण्याची ही ज्येष्ठ लाडकी कन्या म्हणून माहेरीही कायम लाडकीच होती. माझ्या वडिलांची बुद्धी आणि साधेपणा पाहून मलकापूरवासी तिच्या एका मामाने पुढाकार घेतला आणि तिला मलकापूर नगरीत विवाह करून आणले. माझे वडील त्या काळचे म्हणजे १९४८ सालचे BSc आणि अत्यंत हुशार. त्यामुळे भावी नवऱ्याचे रूप न पाहता गुणगान ऐकून माझी आई लग्नास उभी राहिली असावी. (त्या काळी आई बापावर मुलांचा विश्वास होता 😋 )
केवळ नजरेने अचूक बेरीज वजाबाकी गुणाकार करणाऱ्या कुशाग्र बुद्धीच्या माझ्या गणिती बाबांना संसाराचं कुठलं आर्थिक गणित मात्र सुटलं नाही. तुकाराम महाराजासारख्या साध्या-भोळ्या अव्यवहारी स्वभावामुळे सारे धंदे तोट्यातच चालले. अनेक लोकांनी उधारी करून धंदे बुडवायला मोलाची मदत केली. तरीही ते न कंटाळता दुसरा धंदा सुरू करून नेटाने संसार रथ ओढत राहिले होते. माझ्या वडिलांचे असंख्य बुडालेले धंदे हा एक स्वतंत्र विषय आहे. आजही आम्हाला व्यवहार कशाशी खातात हे तशीच आनुवंशिकता असल्याने कळत... वळत नाहीच. परिणामी माझ्या आईला बरीच वर्षे संन्याशाचा संसार करावा लागला. आपल्या म्हणणाऱ्या काही नातेवाईकांनीही त्यांच्या भोळ्या स्वभावाचा पुरेपूर फायदा घेतला आणि आपले उखळ पांढरे करून घेतले. या अशा परिस्थितीतदेखील माझ्या मातेने त्यांना कायम हसतमुखाने समर्थ साथ दिली. कुठल्याही हालाखीच्या परिस्थितीत त्यांचे परस्परावरचे प्रेम तीळभरसुद्धा कमी झाले नाही. त्यांचे जिवस्य कंठस्य मित्र अप्पा जोशींनी अनेकदा वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार त्यांना कोणत्याही व्यवसायात यश आले नाहीच. तुझी मुले खूप विद्वान निघतील, मग सुखाचे दिवस येतील आणि तू आरामात बसून खाशील हे भविष्य मात्र खरेच ठरले. कोणत्याही विपरीत परिस्थितीत त्यांच्या मुखावरचे समाधान आम्हा मुलांमुळे कायम राहिले हा दैवयोग असावा. त्या भोळ्याच्या गायी देवाने कशा हाकल्या, याला सारा गाव साक्षी आहे.
साठ वर्षांपूर्वी मलकापूर गावात लाईट सुद्धा नव्हती. संस्थान गाव अगदी छोटेसे तरीही सुसंस्कृत होते. हळूहळू माझी आई आजीच्या तालमीत छान तयार झाली. माझी सगळ्यात मोठी बहीण दुर्दैवाने मतिमंद राहिली आईने कायम तिला उत्तम सांभाळले. बहिणीची बुद्धी देवाने आम्हा तिन्ही भावंडात वाटली असावी. आम्ही बाकीच्या तिन्ही मुलानी वयाच्या अठराव्या वर्षी पायावर उभे राहून अमाप सुख मातेच्या ओटीत घातले. माझ्यासाठी तर 'चांगली बुध्दिमान मुलगी होऊदे ' म्हणून तिने नवस केला होता. देवाला अनेक प्रदक्षिणा घातल्या होत्या, त्याचे फल म्हणूनच देवाने मला बालपणापासून उत्तम स्मरणशक्ती दिली आणि पाय ठेवेल त्या क्षेत्रात अमाप यशही दिले असावे. स्कॉलरशिपवर पूर्ण शिक्षण घेताना आणि आजही तिचा देव सतत आम्हा मुलांची पाठराखण करत असलेला जाणवतो. मुलीच्या जन्मासाठी आराधना करणारी आई मला लाभली हे माझे अहोभाग्य म्हणावे लागेल. त्याकाळी मुलगी झाली म्हणजे पाप केले अशी लोकांची धारणा असे. 'ज्याने केले आहे पाप त्याला मुली होती आपोआप' अशा अर्थाच्या म्हणीही होत्या. मुलीला 'नकोशी' असे नाव देऊन त्या निरागस जिवाची अवहेलना केली जायची. आजही अनेक लोक कन्येशी दुजाभाव करतात. या सामाजिक पार्श्वभूमीवर माझ्या मातेचे हे वेगळेपण मला आयुष्यभर I am most wanted baby असल्याचा आत्मविश्वास देत आले आहे. आयुष्याचे वाट्याला आलेले कटू क्षण त्यांनी आपले भोग समजून आनंदाने झेलले. आईचे शिक्षण फार नव्हते फक्त नववीपर्यंत झाले होते पण आम्हा मुलांना संस्कार देताना ती कुठेही कमी पडली नाही. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामांची गाथा असे ग्रंथ वाचन अखंड दुपारभर सुरू असे. दासबोधाचे उत्तम निरूपण करायची. संसारातील त्रिविधतापे पोळल्यामुळे ती एक परमार्थाचा स्वामीच झाली होती. दासबोध तिला बराच मुखोदगत होता. समर्थांना गुरू मानल्यामुळे अखंड त्यांच्या ओव्यांची चपखल उदाहरणे आम्हाला देत असे. असे परखड गुरू मानल्या मुळे कायम स्पष्ट आणि खरेच बोलायची. वागणे बरोबर की चूक ती चक्क तोंडावर सांगून टाकत असे, तोंडदेखले गोड बोलणे तिला कधीच जमले नाही. मी ही तिचा हा गुण मात्र पुरेपूर उचलला आहे उगीच खोटी स्तुती, कुणाचे लांगूलचालन आपल्याला जमत नाहीच.. उगीच खोटे का बोला? तिच्यामुळे आम्हाला मुर्खांची सगळी लक्षणे, विशेषणे तिने सारखी लावून लावून पाठच झाली होती. (अजूनही पाठच आहेत !) पदवीधर वडिलांना तिने
'विद्या उदंड शिकला,
प्रसंगमान चुकतची गेला,
मग तया विद्येला कोण पुसे??’
असा प्रश्न पुसला की माझे बाबा तिला
'ठेविले अनंते तैसेचि रहावे
चित्ती असो द्यावे समाधान'
असे सांगून निरुत्तर करत असत. मग त्यांना हसून दाद देऊन अनेक कटू अनुभव पदराशी बांधत तिने शांतपणे संसाराचा गाडा ओढला. देवावर विश्वास ठेवत अनेक व्रत वैकल्ये केली. चांगल्या कर्मावर भर देऊन कुणाचेही वाईट चिंतले नाही. फसवणारे आप्त आपले गुरू आहेत, त्यांच्या मुळेच मुले हुशार झाली, पटापट पायावर उभी राहिली यावर दोघांचाही ठाम विश्वास होता. खरेच त्यांच्या अनुभवातून आम्ही भावंडे खूप लवकर शहाणी आणि समजूतदार झालो हे बाकी त्रिकालाबाधित सत्य आहे. आई शंकरभक्त तर वडील दत्तभक्त त्यामुळे कायम घरात भक्तीमय वातावरण असे. कायम भजन, ओव्या, स्तोत्रे यांची सुरेल आवाजात जुगलबंदी सुरू असे. त्यांच्या उपासनेचे सारे पुण्य दैवाने आमच्या पदरात टाकले असावे म्हणूनच आम्ही मुले उत्तम आयुष्य कंठीत आहोत याची पदोपदी प्रचीती येते. इतके असून देखील ती कधीच अंधश्रद्धाळू नव्हती. कोणत्याही धार्मिक प्रथेचे, रूढी परंपरेचे तिने अवडंबर केले नाही. आम्हाला आमच्या विचारानी वागायचे पूर्ण स्वातंत्र्य दिले कोणतीही प्रथा तिने आमच्यावर लादली नाही.
माझी माय म्हणजे गावाची काकी उत्तम सुगरण होती. सर्व लाडूची तार तिला उत्तम समजत असल्याने दिवाळीत शेजारी तिला बोलावून नेत. ती सारे पदार्थ उत्तमच करायची. साधा चाकवत, मेथीची भाजी सुद्धा इतकी चविष्ट करायची की जेवताना बोटे चाटली पाहिजेत. लोणची, मुरांबा तर कुठल्या ही रसायनाशिवाय वर्ष वर्ष टिकायचे. गल्लीतल्या सगळ्या बाळंत बायकांना तिची लोणच्याची वाटी जायची. कोणी आजारी पडले की तोंडाला चव नाही म्हणून हिच्या लोणच्याला मागणी असायचीच. त्यामुळे भल्यामोठ्या बरणीत दर वर्षी किमान शंभर लिंबाचे लोणचे मुरत पडायचे. संक्रांतीचा नाजूक खसखशीवरचा हलवा, भोपळ्याच्या बी वरचा हलवा तर पहात रहावा इतका अलवार नाजूक करायची. आम्हा मुलांना जेवायला घालून सारे आवरले की चुलीतल्या निखाऱ्याच्या शांत धगीवर एक एक थेंब पाक सोडत ती रात्री बोटाच्या टोकानी हलवा पाकवण्याची तप:श्चर्या करायची ते चित्र आजही तसेच लोचनासमोर उभे आहे. आम्हीही हिरिरीने प्रयत्न करून पाहिला पण भरारा पाक सोडल्यामुळे आणि चुलीच्या धुरामुळे ते काळपट गणगोटे झाले. आमचे बंधू सगळ्यांना दाखवून दाखवून खो खो हसले. मग काय मी त्या पाक कौशल्याचा नाद केला नाही, तिच्या संयमाला नमन करून सपशेल माघार घेतली. एवढे तासंतास एका जागी स्थिर कोण बसून रहाणार? आणि तो हलवा हाताच्या बोटांनी हलवावा लागतो, चटके बसतात मगच काटे येतात त्याला. यास्तव त्या काट्याचा अन् बोटे पोळण्याचा नाद सोडलेला बरा असे मी हुशार असल्याने ठरवले अन् काढता पाय घेतला. आजही तिचा नाजूक नि पांढराशुभ्र हलवा सगळ्या शेजारीण बाईंना आठवतोच. तिचे दरवर्षी थंडीत घडणारे डिंकलाडू, डांगर, मेतकूट किती नी काय नोकरी करते म्हणून शिकायचे राहूनच गेले. ती डबे पाठवायची त्यामुळे असंख्य गोष्टी आपल्या हातांनी तिच्या देखरेखीखाली करणे राहूनच गेले. ती मऊ सुती नाजूक फुलांची नऊवारी साडी नेसायची. त्या साडीची नंतर सुरेख दुलई स्वत:च्या हातांनी शिवायची. ती दुलई मला हवी, मला हवी करून आजही माझी मुले भांडतात. ती पांघरली की उन्हाळ्यात थंड वाटते आणि थंडीत उबदार वाटते. दुसरे काही पांघरावे असे वाटत नाही. हल्ली सगळ्या नायलॉन साड्या त्यामुळे तिच्या साडीसाठी होतकरू बाळंतीणी नंबर लावून ठेवायच्या. गावातली अनेक तान्ही बाळे तिच्या उबदार पातळात गुडूप झोपी गेली. लोणचे आणि साडी तारे काकीने दिलेच पाहिजे, असा बायकांचा प्रेमळ दंडक असे.
आमची माता नेहमी वयस्कर शेजारणीची काळजी घ्यायची. जे वृद्ध एकटे रहातात अशा काही लोकांना पितळेच्या मोठ्ठ्या ताटातून सणावाराला जेवण वाढून देई. एवढेच काय कावळ्याची सुद्धा तिला काळजी असायची. रोज त्याचा घास घरावर ठेवल्या नंतरच आम्हाला भोजन मिळे. व्यायलेल्या मांजरीला आठवणीने बाळंतीणबाई सारखे पौष्टिक खाद्य खाऊ घाले. आमच्या घरी गाई म्हशी होत्या. त्या सगळ्यांचे बाळंतपण तीच सुईणीच्या कुशलतेने, अत्यंत ममतेने करे. व्यायल्या नंतर त्या मुक्या जनावरांना तेल लावून गरम पाण्याची अंघोळ, उत्तम ओल्या खोबऱ्याचे तुकडे, ओवा, गूळ घालून केलेला गव्हाचा गरम गरम खिचडा प्रेमाने खाऊ घाले. बाळंतवेणातून सुटलेल्या त्या गायी देखील तिला चाटून, भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पहात उतराई होत असत. प्राण्यांची वेदना आणि उपाय तिला बरोबर समजत होते. माणसेच काय सारे प्राणिमात्र तिला लळा लावत असत. अनेक देशी आयुर्वेदिक औषधांची तिला खडान खडा माहिती होती. हे सारे ज्ञान तिने कधी कुठे मिळवले देवच जाणे.
गोष्टी वेल्हाळ बोलका स्वभाव असल्याने नातवंडा बरोबर तिची छान गट्टी जमायची. मुलांना ती चक्क संस्कृत शिकवायची. मुलांना सगळ्या पौराणिक गोष्टी पाठ झाल्या होत्या. साऱ्या नातवंडांना म्हणतील ते पदार्थ खाऊ घालायची. स्टीलची कळशी भरून केलेले कैरीचे पन्हे मुले तृप्त होई पर्यंत प्यायची. म्हणून माझी मुले मलकापूरला प्रत्येक सुट्टीला एका पायावर नाचत जायची. एक तर लवकर उठायला नको आणि वरून उत्तम बोधपर गोष्टी, कौतुक, मनसोक्त नवनवे पदार्थ खात हुंदडायला मिळायचे. असे हरहुन्नरी चतुरस्त्र व्यक्तिमत्व लाभलेली माझी आई मलकापूरसारख्या ठिकाणी राहून सुद्धा अनेक गोष्टी सहज करे. आमच्या संसारावर आजही तिचा संस्कार कायम आहे. त्या काळात आम्हा मुलांना सतराव्या वर्षी गावाबाहेर कोल्हापूरला शिकायला पाठवताना तिने काळजावर दगड ठेवला. मला कोल्हापुरात शिकायला पाठवताना देखील तिने हॉस्टेल मध्ये रहायचं असं सांगून स्वत:च्या माहेरी ठेवायला स्पष्ट नकार दिला. मुलगी म्हणून माझ्यावर कोणतेही बंधन कधीच लादले नाही. अमुक करू नको तमुक करू नको हे शब्द मी कधीच ऐकले नाहीत. आमच्या कर्तृत्वावर तिचा पूर्ण विश्वास होता. या दुर्दम्य विश्वासामुळे आमचे पाय कायम जमिनीवर राहिले. लहानपणापासून कायम मला भावांइतकेच काय थोडे जास्तीच प्रेम आणि स्वातंत्र्य मिळाले. आमच्या पंखाना तिने स्वप्न दाखवले आणि उंच भरारी घेण्याचे बळ दिले. आईने कायम आम्हाला स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. कितीही त्रास झाला तरी कोणावर भार टाकायचा नाही या बाळकडूवर आम्ही वाढलो. परिस्थितीने तिला अनेक कटू धडे दिले, आम्हाला स्वाभिमानाने वाढवताना तिचे सगळे दागिने एक एक करून विकावे लागले. ते दागिने तिने सहजपणे आनंदाने देऊन टाकले. तिच्या लखलखत्या तेजाला सोन्याच्या दागिन्यांची मुळी गरजच नव्हती. तिचे निष्कांचन सात्विक कणखर त्यागमूर्तीचे रूप मनात ठसून राहिले आहे. दागिने मोडल्याचे तिला कधीही दुःख झाले नाही. मुलांचे शिक्षण तिला त्या सोन्यापेक्षा महत्वाचे होते. नंतर आम्ही मुलांनी तिला सगळे सोने घेतले, पण तिला त्याचे काही कौतुक नव्हते. तिचे मन कधी त्या धातूमध्ये रमले नाही. अडचणीच्या काळात ही कायम हसतमुख असेल पाहिजे हा संस्कार या कृतीतून मनावर कोरला गेला.
अखेरच्या क्षणापर्यंत तिने हे हसतमुख रहाण्याचे व्रत पाळले. ती कधीही दुर्मुखलेला चेहरा घेऊन वावरली नाही. एकदा हात मोडला म्हणून ऑपरेशन केले तर बेशुद्ध अवस्थेत सुद्धा तिचा हसतमुख चेहरा पाहून डॉकटर आश्चर्यचकित झाले होते. नशिबाने तिला कधीच admit होऊन उपचार घ्यावे लागले नाहीत. शेवटी शेवटी फक्त अशक्तपणा आला इतकेच. शेवटी आता आयुष्य पुरे, मला कुठल्याच दवाखान्यात न्यायचे नाही, इंजेक्शन टोचायचे नाही असे सारखे निक्षून सांगायची. आयुष्यावर आपल्याच हातांनी तुळशीपत्र ठेऊन ती तिचा सखा मृत्यूची वाट हसतमुखाने बघायची. तिच्या लाडक्या देवाने तिचे हे मागणे मात्र अगदी आवर्जुन पूर्ण केले. रथसप्तमीचा मंगल दिवस होता. तिने वाहिनीला सांगून दिवशी हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित केला. भाऊ-वाहिनी कडून घरादाराची सफाई करून घेतली. गावभर आमंत्रणे गेली. सायंकाळी दारात शुभ मुहूर्ताचे सडासंमार्जन झाले, रांगोळी रेखली गेली. सुरेख साडी नेसायला बाहेर काढून ठेवली. सूर्य अस्तांचलास चाललेला होता. घोटभर चहा करून मला उठव असे सांगून दोन मिनिट डोके उशीवर ठेवले. त्या शुभमुहूर्तावर ती त्या मावळतीच्या सुर्यदेवाच्या सुवर्णरथात बसून केंव्हा कशी निघून गेली कुणाला समजलेच नाही. पारिजातकाच्या फुलासारखे देहफुल अलवार, कोणताच आवाज न येता भुईवर ओघळून पडले होते. असा कोणी कधी स्वप्नात सुद्धा न कल्पिलेला मृत्यू तिला मिळाला... तिचा प्राणसखा तिला अगदी हळूवारपणे भेटला. एका क्षणाची सुद्धा वेदना न देता त्याने अलगद तिला आपल्या सोनेरी किरणाच्या बाहुपाशात सामावून घेतले. ‘मला उठता बसता मृत्यू येऊ दे, कोणावर भार होऊन जगायचे नाही’ अशी तिची आर्त विनवणी त्याने अखेर पूर्ण केलीच. सुवासिनी आनंदाने नटून हळदी-कुंकवाचा वसा घ्यायला आल्या आणि त्यांना तिने हा असा निरोप दिला. कायम समाधानात हसतमुख, आनंदी राहण्याचा बहुमोल वसा दिला जणू. रथसप्तमीचे आगळेवेगळे वाण नियतीने असे अलगद तिच्या ओटीत घातले होते... आज पाच वर्षे झाली, मी रथ सप्तमीला तिला सूर्यदेवाच्या सोनेरी रथात शोधत असते.. त्याला अर्घ्य देते… ती त्या रथातून कोवळी किरणे टाकत मला आशीर्वाद देतच असते… यालाच मातृप्रेम म्हणत असावेत ज्याची परतफेड शक्य नाही. आपण कायम त्यांच्या ऋणात रहायचे.
ती शरीररूपी गेली तरीही तिचे अनमोल ग्रंथ आम्हाला आजही योग्य मार्ग दाखवतात. ते ग्रंथ तिच्या आठवांचा ठेवा बनला आहे. त्या प्रत्येक ओवीत वसलेल्या तिला शोधताना तिचा आवाज नकळत अंतर्मनात कानी घुमत रहातो ... तिच्या पावलावर पाऊल ठेवत त्याच सोनेरी मार्गाने जावे…. तिला भेटावे अशी हुरहूर मनात दाटून येतेच…आजही मी तिने शिवलेली तिच्या पातळाची दुलई जपून जपून वापरते. ती दुलई पांघरून झोपताना तिच्या मांडीवर डोके ठेवल्याचा आभास होतो….तिचा चंदनगंध, उबदार मुलायम स्पर्श अनुभवते….
मग ओठावर आपसूक गीत उमटते….
घे जन्म तू फिरोनी, येईन मी ही पोटी
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी
प्रेम स्वरूप आई . . . .
विजयश्री तारे-जोशी
कोल्हापूर - १९.२.२०२१
स्थान:
Kolhapur, Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या




निशब्द झाले. आई वडिलांची खूप आठवण येऊन डोळे पाणावले. खूप सुंदर शब्दात वर्णन केले आहेस . आईचे फोटो पाहून तू अगदी यथार्थ वर्णन केले आहेस हे जाणवले. त्रिवार वंदन.🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाआई बद्दल खूप छान अगदी मनातले जसे घडले तसे लिहिले आहेस. इतक्या चांगल्या आईच्या पोटी तुझा जन्म झाला हे तुझे भाग्यच. आई बद्दल काय लिहू, किती लिहू असे होते, परंतु तू तुझ्या भावना खुप चांगल्या प्रकारे प्रगट केल्या आहेस, तू चांगली लेखिका आहेस! असेच विविध आठवणींवर लिखाण कर. धन्यवाद शुभ रात्री.
उत्तर द्याहटवाChan
उत्तर द्याहटवाMalutaichya aathvnine ruday helavle...
उत्तर द्याहटवाJayashri tuzya lekhan kaushalyala tod nahi
Apratim.....
Chan Aaiche hubehub varvan tiche kasht tichipakala yabadal mala hi mahiti ahe pan Tu he lihile ahes te dolyat alelya ashrumule vachne avghd zale
उत्तर द्याहटवाPurvichya ntya mage padtil b and w photo
उत्तर द्याहटवाBeautiful and nostalgic, keep it up madam, your grand parents and parents have earned you many blessings and your good works are appreciated by the knowlegable💐🙏🏼👍
उत्तर द्याहटवाBurchell
खूप छान लेख! स्वतःच्या आईचे इतके सुंदर शब्दचित्र काढले आहे! 👌🏼👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवालेखिका मॕडम
उत्तर द्याहटवाखूप खूप खूप छान.
भाषा ओघवती. मजा येते वाचायला. विषयची मांडणी पण छान. विनाकारण उदात्तीकरण नाही का खवचटपणा नाही. संतुलित.
खूप छान.
जीवन बोडके
👌👌👌
अतिशय उत्तम आणि ओघवती भाषा त्यामुळे वाचन सलगपणे तसेच सहजपणे होत गेले.क्षणभर आई समोर उभी असल्याचा भास झाला.👌👌
उत्तर द्याहटवाP.S.Shinde
"Matru devo bhava"
उत्तर द्याहटवा"Pitru devo bhava "
"Athiti devo bhava"
👏Ayi ..
A..atma..yi ...lshwar
Ayi che kiti koutuk keletari te kameecha ahe . Kase vachat gelo tase maja ayiche jeevan samor unhe rahile .Pushkal prasang ekasarakhecha ahet. Asalya potat janmala yene mhanaje sat janmanchi punayi lagate .
Bare vatale ..Chan .
Majhe asankhya pranam AYINA .
R.B.Tophkhane Belgavi
छान लिहिलंय.
उत्तर द्याहटवाMANISHA BHOSALE: प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंघु आईं.......
उत्तर द्याहटवाखरंच खूप छान लिहिलंय..
उत्तर द्याहटवाखुप सुंदर तुमच्या भावना व्यक्त झाल्यात मॅडम. वाचताना मला ही माझ्या आईची आठवण होत होती. मला वाटते या लेखाचं हेच यश असावे. 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाShurish Kotibhaskar
श्री, खूप खूप छान👌 सर्वाचा आवडता विषय, पण त्याला मनाप्रमाणे साकारणारी तू आणि फक्त तूच!!! तुझी नितांत सुंदर आई डोळ्यासमोर उभी राहिली. डोळे पाणावले, पण तरीही वाचणं सोडलं नाही!! आईचे मरणही एव्हढे सुंदर असावे हे खरंच आश्चर्य!मस्त👌👌👌👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम वर्णन
उत्तर द्याहटवादुसरी श्यामची आई
आई समोर उभी राहते
from bottom of my heart मी तुमचा एक भाऊ व्हायला हवे होते .........😊😌
Dr.Ranjit Patil
Aaiche varnan apratim kele ahe.Aaiche man kiti mothe ahe karan tyaveli tyani mala mulgi hounde mhanun prarthana keli hoti,ata konihi karel pan tyaveli mulga ha vanshacha diva ashi bhavna hoti.Madam hech gun ,sanskar,tumchya bhavandat ahet,asha Aai Vadilapoti janmala yene he tumche bhagya ahe.Ethunpudhe tumhi Bahin,Bhavande asech Aai,Vadilanche nav roshan karnar yat shankach nahi.Aplya sarvana asech Aai Vadil labhot hich prarthana.Punnha abhinandan madam karan Aai Vadilanche upkar thor astat te tumhi abhimanane,anandane prakat kele ahet
उत्तर द्याहटवाकिती सुंदर आनंद वाह!!
उत्तर द्याहटवाAsiche yatarth atisundar Darshanacha aanand ghetala. Marathivaril prabhutwa, oghavati shaili aani surekh shant. Manat mazhyahi aaichya aathawani datun aalya. Asech chhan vhanychi sandhi deshil ashi apeksha.
उत्तर द्याहटवा