- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वसंत ऋतू आला,कोकिळा देई साद
आनंद उपवनी, हसत पानोपान
कोकीळ कुहू कुहू बोलू लागला की वसंत आल्याची चाहूल मिळते. एरवी कुठे तरी गुडूप असणारा कोकीळ बरोबर आता पंचम लावतो. हा नेमका वार्षिक परीक्षेचा अभ्यासाचा सिझन त्यामुळे आमच्या लेकराला सकाळपासून एक कोकीळ येऊन सोss हम, सो sssहम अशी हाक मारून अभ्यासाला उठवतोय असे वाटे म्हणे. त्याला तसेच ऐकू येई! मग आम्हीही हो हो अरे तुलाच उठवतोय… असे म्हणत त्याला अभ्यासाची संधी द्यायचो. वार्षिक परीक्षा झाली की कोकीळ गायब होई मग अभ्यास आपोआप उद्यावर ढकलला जाई. पिढ्यान् पिढ्या हेच करत आल्यात त्याला अपवाद का असावा ? का उगीच डोके तुच्छ गोष्टीत वाया घालवायचे ?
वसंतात मस्त पैकी निसर्गाच्या चमत्कारांचे निरीक्षण करावे. चैत्रात शिशिरात झालेली पानगळ विसरत झाडे अंगोपांगी बहरायला उत्सुक होतात. वेडावाकडा चाफासुद्धा फुलांनी बहरून येतो, त्याचे बेढब रूप सुंदर दिसू लागते. कुठेही कसाही असला उभा तरी हिरवागार कडुनिंब रणरणत्या उन्हात चवरी ढाळून आपले चित्त आकर्षित करून घेतो. रानावनात नाजूक पोपटी, गुलाबी नाजूक पालवी झाडा झाडावर फुलायला लागते नी डोळे आनंदाने निवतात. ग्रीष्म ऋतूच्या झळा ही वनराई अगदी खुशीने झेलत अंगोपांगावर कोवळ्या पानांचा शृंगार करत बसते. तो नाकाखाली पारंब्या सोडणारा वडीलधारा अश्वत्थ वृक्ष अनेक सळसळती गुलाबी चकचकीत देखणी हृदयाकार पालवी पांघरून इकडे तिकडे डौलाने पहातो. प्रत्येक वृक्ष आपले आगळे ठेवणीतले वैभव काढून आपल्यासमोर त्यांची आरास मांडतो जणू. अखिल मानव जमात तपत्या झळाना शरण जात नामोहरम झालेली असताना निसर्ग मात्र आपल्या फजितीला हसत विविध रंगांची उधळण करत आपल्याला चकित करून सोडतो. केशर लाली गाली फासलेला गुलमोहर हिरवीगार पाने नीट विंचरून डोलत बसतो, हिरव्याकंच पानांत सुरेख निळा रंग खुलवत उभा असणारा नीलमोहर, अंगा-खांदयावर सुवर्णवर्खी कुंडल डोलवणारा पिवळाजर्द बहावा, रक्तरंजित काटेसावर, लालेलाल केशरी पलाश, लाल-गुलाबी-पिवळे रंग उधळणारी बोगनवेल, शुभ्र तुरे लेऊन सजलेला सुवासिक मोगरा- जाई-जुई- सायली- प्राजक्त- तगारी, मंद गंधित गुलाबी मधुमालतीची देखणी कमान.. अक्षय सुगंध उधळणारा नाजूक फुलांचा बकुळ… टप्पोऱ्या कळयानी बहरलेला मदनबाण… आणि रात्री मदनबाण मारून जागवणारी प्रणयोत्सुक रातराणी… किती किती ते रंग आणि किती किती ते गंध! वर्णन शब्दात व्यक्त करताच येत नसते. डोळे उघडुन पहावे आणि डोळे मिटून फक्त हे वसंतगंध प्राशन करीत बसावे.
आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यातल्या गुढी पाडवा या सणाने होते. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम वनवासातून सीतामाई आणि लक्ष्मणासहित चौदा वर्षांचा वनवास संपवून परतले. त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या-तोरणे उभारली गेली होती. या पवित्र दिवशी आपण नव वर्षाचे स्वागत गुढी उभी करून करतो. साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक पाडवा म्हणूनच नव्या जावयाचे, सुनेचे कौतुक सोन्याचा दागिना देऊन करायची प्रथा आहे ती ही खिशाला विचारून चालू ठेवा बरे ! लाडक्या गृहलक्ष्मीस दरसाल एखादा दागिना अशा मुहूर्तावर घेऊन संसारातील गोडी कायम ठेवायचा प्रामाणिक प्रयत्नही सर्वांनी करावा. बाकी वर्षाचा पहिला दिवस म्हणून कितीही पक्वान्ने केली तरी मराठी घराघरात मूठभर पुरण रटरट शिजलेच पाहिजे. मस्त शेवग्याची शेंगा घातलेली कटाची आमटी भुरकली की बेत जमून येतो. श्रीखंड, बासुंदी पुरी, पुरण पोळी असे सुंदर बेत शिजत असले तरीही कडुनिंबाच्या कोवळ्या पानांची कडुझार चटणी खाऊनच स्वास्थ्यमय वर्ष सुरू करायचे असते. ही चटणी खाताना मुले तोंड वाकडे करतात पण त्या कडू घासानंतर पुढच्या श्रीखंडाची खरी चव समजते. चाफा चैत्रात बहरून येतो, एरवी या बिचाऱ्याला कोणी मुळीच विचारत नाही आणि तो कोणत्या देवाचा आवडता आहे असे काही ऐकिवात नाही. वर्षभर दुर्लक्षित असलेल्या सावत्र मुलासारखा एकाकी पडतो बिचारा, पण या दिवशी चाफा हवाच.... भलताच तोरा मिरवतो. त्याची माळ अगदी गुलबकावलीच्या माळेचा दर वसूल करून वर्षाच्या दराचे उट्टे काढते. या दिवशी चाफ्याच्या फुलांचा हार, कडुलिंबाची कोवळी पालवी, साखरेची माळ घालून रंगीत नववस्त्रांनी सजवून उंच गुढी उभी केली की कसे प्रसन्न वाटते. गुढीजवळ सुंदर रांगोळी आणि चाफ्याच्या कळीचे घोडे करून ठेवतात. हल्ली समस्त भगिनींना नथ आणि पारंपारिक दागिने घालून सुंदर पैठणी नेसून सेल्फी काढून घेतला आणि सगळीकडे गृपवर टाकला की जिवास बरे वाटते. रवि किरणांनी पिळून निघालेले चराचर आणि प्राणिमात्र निसर्गाच्या या रंगपंचमी मुळे मंत्र मुग्ध होउन गेलेले असतात. आम्रतरू वर मोहक बाळ कैऱ्या लटकू लागल्या की हमखास तिथे कोकीळ कुजन सुरू होते.सुमन गंधित सुरांच्या तालावर अवघे विश्व डोलू लागते आणि गुंजारव करत वसंताच्या रंग लीलात डुंबायला लागते. चैत्र चाहूल लागली की घरा दाराला मुलांच्या रटाळ वार्षिक परीक्षेचा अभ्यास, बायकाना उन्हाळी कामे आणि चैत्रागौरीच्या आगमनाचे वेध लागतात. गृहिणी पूर्ण महिना भर दारात चंद्र, सूर्य, तारे अशा विविध निसर्ग आकृतींनी नटलेले पारंपारिक चैत्रांगण रांगोळीत रेखाटतात.
सौ. स्मिता सुनील कुलकर्णी, पुणे यांच्या चैत्रागौरीची यंदाची सुंदर आरास.
चैत्र शुद्ध तृतीयेला चैत्रागौरीचे घरोघरी आगमन होते. ही गौर आपल्याकडे लेक म्हणून महिनाभर माहेरपणाला येते. महिनाभर तिला गोड धोड खाऊ घालून सगळे लाड पुरवायचे असतात. माझ्या लहानपणी चैत्रागौरीचे हळदी कुंकू म्हणजे साऱ्या गल्लीने मिळून मजेत साजरा करायचा उत्सव असे. पोरासोरांच्या परीक्षा पार पडताच त्यांच्या अंगात उत्साह संचारतो ती हिरिरीने एका पायावर मदतीला उभी असायची. त्यांना आंब्याचे डहाळे आण, कैऱ्या आण, शेजारणीकडची आराशीत मांडायची सावंतवाडीची लाकडी फळे नी खेळणी उसनी आण, पाट आण, झोपाळा आण अशी नाना कामे लागायची. मुले हे करायला एका पायावर तयार असायची. मलकापूरला तर कोणीही कैऱ्या विकत आणत नसे. गल्लीत आण्णा परांजपे, ए. एस. पाटील सर यांच्याकडे डेरेदार आम्रवृक्ष होते आणि काकिर्डे यांची आमराई तर गावाचीच होती. त्यामुळे चार कैऱ्या मागून घेताना काही हळूच दडपून टाकण्यात यायच्या. झाडाचे मालक दुपारचे कधी एकदा वामकुक्षी घेतील याची गल्लीतले सगळे पराक्रमी शूरवीर वाट पहायचे. सारखे टेहळणी पथक घिरट्या घालायचे. सामसूम होताच हळूच आंबे लांबवायचे! पाटील यांचे झाड तर मुलांच्या शाळेला लागून त्यामुळे सगळी मुले कायम आशाळभूत नजरेनं त्या टपोऱ्या कैऱ्या निरखत असायची. दगड मारून पाडावेत तर त्यांचे घर पलीकडेच.. त्यामुळे हात चोळण्यापलीकडे मुलांच्या पदरात काही पडायचे नाही. काकिर्डे यांच्या आमराईत मात्र मनसोक्त कैऱ्या तोडायला मिळायच्या. तिथे रखवाली नसे सहसा कोणीही पकडुन किती कैऱ्या पाडता असा जाब विचारत नसे. या साऱ्या आम्रवृक्षांनी कैऱ्या देऊन अनेक वर्षे चैत्रगौर नैवेद्य बिनबोभाट पार पाडला आहे, त्यांनाच ते पुण्य लाभले असेल. वस्तूंची सारी जुळवा जुळव झाली की मगच लहान मुलांना घरोघरी आमंत्रणे द्यायला पाठवले जाई.
अगदी आजही चैत्र गौरीच्या नैवेद्याला चढाओढ करून शेव, चकली, लाडू, बर्फी असे विविध पदार्थ बनवले जातात. मागे सुंदर पडदे सोडून आरास केली जाते काही बायका शिवणकाम, भरतकाम, मण्यांची बदके सारख्या वस्तू मांडून वर्षभर मान मोडून वेळ काढून केलेल्या सगळ्या कलाविष्काराचे प्रदर्शन भरवतात. यात जुन्या वस्तू दरवर्षी ठेवायच्या असतात… म्हणून आरास दरवर्षी वाढतच जाते. हळदी कुंकवाला आलेल्या ललनानी तिच्या कलेचे कौतुक केले की गृहलक्ष्मीस मूठभर मांस चढते. अशा कार्यक्रमांमुळे या कलांना पुनरुज्जीवन मिळाले आणि पुढील पिढ्यातील गृहिणी ते क्रोशे, मणी, बटवे, जाळीचे टेबल क्लॉथ, लोकरीचे विणकाम एक उलट एक सुलट करत शिकत राहिल्या. सावंतवाडीचे लाकडी खेळ, भातुकली, फळे या वस्तू मात्र घरोघरी अगदी जपून उंचावर ठेवल्या जायच्या त्या या वेळीच बाहेर निघायच्या. आम्हाला रंग उडाले तरी ती खेळणी हाताळायला मिळालीच नाहीत, जणूकाही ती चैत्रगौरीच्या मालकीची होती! बहुधा ही तिची भातुकलीची लाकडी खेळणी तिच्या माहेरी कशी जपून ठेवलीत हे दर वर्षी तिला आरास मांडून दाखवली जातात. तिच्या लाकडी सख्यांनासुद्धा तिथे खेळ खेळायला बोलावून घेतले जाते. त्या ही आराशित बसलेल्या असतात. ती आरास पाहून गौराबाई कुठल्याही क्षणी उठून त्यांच्या बरोबर खेळू लागेल असा सजीव वाटणारा मनोरम देखावा असतो तो. गौराबाई खेळात बालमैत्रीणीसवे रमलेली सुंदर बालाच दिसते. गौराबाईंना सुंदर साडी नेसवून दागिन्यांनी मढवून, सजवून, गजरा माळून कमळात किंवा झोपाळ्यावर बसवले जाते. अशी निवांत हिंदोळे घेत बसलेली माहेरवाशीण अगदी सुंदर दिसते. माहेरी असे सुखद निवांत क्षण साऱ्या लाडूबाईंना आवडतातच. समोर असंख्य प्रकारचे लाडू, चकल्या, शेव, करंजी आदी खाद्य पदार्थ, करवंदे, जांभळे, तोरणे, काजूचे जांभ असा रानमेवा, कलिंगड कापून त्याचे सुंदर कमळ ठेवले जाते. गौरीची कैरीचे पन्हे, हरभरा डाळीची कोशिंबीर नैवेद्य दाखवून हरभरा आणि काकडीने ओटी भरली जाते. अत्यंत सुंदर फुलांची आरास केली जाते. गौरीसमोर आणि दारात आंब्याचे कैऱ्या लटकणारे हिरवेगार डहाळे लावले जातात. दारात उत्तम रांगोळी रेखाटली जाते. गौरीसमोर दोन राघू आंब्याची किंवा काही ठिकाणी टकलू नारळाची गाल कुंकवाने रंगवलेली बाळे पारंपारिक खणाच्या कुंच्या घालून बसवली जातात. गौर आपल्या लेकरा-बाळासहित माहेरी येते.
माझ्या धाकट्या मामी कविता राशिवडेकर यांनी केलेले हे मोत्यांचे अप्रतिम चैत्रांगण
आया बाया ठेवणीतल्या गर्भरेशमी साड्या नेसून, ठळक मोत्याचे सोन्याचे दागिने, नाकात नथ, केसांवर मोगरा, अबोली, सुरंगीचा वळेसर घालून नटून थटून हळदी कुंकवास येतात. हसत खेळत एकमेकींची चेष्टामस्करी करत हा कार्यक्रम रात्री उशीरपर्यंत चालतो. इकडे हास्यकल्लोळ घुमत असताना, बायका काय बोलतात ते ऐकायची इच्छा असताना सुद्धा, पुरुष लोकांना रात्री उशिरापर्यंत शेजारी किंवा दारात माशा मारत बसून रहावे लागते. नव्या सुनेला जुन्या अनुभवी बायका नाव घेण्याचा आग्रह करतात. ती लाजत मुरकत नाव घेते बिचारे नवविवाहित नवरे कान देऊन ऐकायचा प्रयत्न करतात पण काहीच कानी पडत नाही की दिसत नाही. बायकांच्या रंगलेल्या गप्पा संपता संपत नाहीत. आलेल्या समस्त ललनाना हळद कुंकू लावून, वाळा, मोगरा असे अत्तर नजाकतीने मनगटामागे लावून सुगंधित केले जाते. मग आम्ही लहान मुली गुलाबदाणी मधून हळदकुंकू साठी आलेल्या बायकांच्यावर ती बाई पुरे पुरे असे म्हणत सुखावून हसेपर्यंत गुलाब पाणी उडवायचो… आताही ही प्रथा आहे बरे का. यामुळे वातावरण एकदम सुगंधी, गारेगार आणि प्रफुल्लित होते. आलेल्या भगिनी, मुलींना डाळीची कैरी घातलेली कोशिंबीर देऊन ओटी भरली जाते. मग कैरीचेच गुळाचे थंडगार माठातल्या पाण्याचे वेलचीचा घमघमाट असलेले पन्हे प्यायला देतात. आम्ही सगळीकडे पन्हे पिण्यासाठी जायचो आणि ते मोठ्या स्टीलच्या पिंपात बनवले जायचे. पुरुषमंडळीही मनसोक्त आस्वाद घ्यायला येत. असे हळदी कुंकू अगदी कालपरवापर्यंत माझ्या आजोळी मामी यथासांग करत होत्या याची आठवण होऊन डोळे नकळत ओले झालेच. आम्ही नातवंडे मलकापूरचे हळदी कुंकू करून इकडे कोल्हापूरला आजोळी सुट्टीला धूम ठोकायचो. सात-आठ नातवंडे आली की कोल्हापूरी आजोळचे राजेशाही हळदी कुंकू व्हायचे.
आता सगळ्या माहेरवाशिणीना नोकरी, असंख्य व्याप त्यामुळे लेकी सूना माहेरी येत नाहीत. त्यांचे कोड कौतुक करावे नातवंडांना छान काही खाऊ पिऊ घालावे हे विचार मनातच राहून जातात. सगळ्या गृहिणी आपल्या लाडक्या लेकीची, दूरस्थ मुलगा सुनेची आणि आपल्या तुटलेल्या माहेराची आठवण काढत गौराबाईची सगळी सरबराई करतात. मुली, सुना, नातवंडे जवळ असली किंवा त्या निमित्ताने आली तर मग काय गृहलक्ष्मीच्या उत्साहाला उधाण येते. अनेक पदार्थ करून त्या गौरीला आणि घरातल्या गौरीना मुलांना प्रेमाने खाऊ घातले जातात. लहान मुलांची खाऊची चंगळ होते ती खुश होतात. सगळे जण हौसेने आनंदाने नाचत हा सोहळा पार पाडत असतात. गौरीचे हे माहेरपण अक्षय्य तृतीयेच्या दिवसा पर्यंत चालते. या निमित्ताने आपल्या अनेक कलांचे प्रदर्शनच होते. चार मैत्रिणी, नातेवाईक घरी जमतात गप्पा मारताना मन मोकळे होते आणि सगळ्या प्रसन्न मनाने घरी परततात. ज्या वास्तूत माहेरवाशीण खुष त्या घरादारात उदंड सुबत्ता असते.
आमच्या कोल्हापूरच्या अंबाबाईचा अक्षय्य तृतीयेचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी अनेक जन्म अपुरे वाटावेत. अंबाबाईचे श्री पुजक दुपारी चारला सन्मानाने देवीला बोलावण्यासाठी गाभाऱ्यात जातात. तिथून तिची उत्सव मूर्ती सालंकृत रुपात वाजत गाजत गरुड मंडपात आणली जाते. आमची अंबाबाई नखशिखांत दागिन्यांनी सजून सुंदर शालू नेसून गरुड मंडपात चांदीच्या सिंहासनावर आसनस्थ होते. हे सिंहासन वरच्या हुकाना टांगलेले असते त्यामुळे त्याला छान झोके देता येतात. फुलापानांनी सजलेला गरुड मंडप प्रकाशात झगमगत असतो. प्रत्येक वर्षी उत्तम वेग वेगळी आरास करून केळीचे खुंट, आंब्याच्या डहाळ्या, नानाविध फुलांनी गरुड मंडप सजतो. समोर भालदार चोपदार चांदीचा दंडक घेऊन उभे रहातात. श्री पूजक,चोपदार झुल्याला हळुवार झोका देत असतात. पारंपारिक सनई चौघड्याच्या कर्णमधुर तालावर आई अंबाबाई अगदी समाधानाने मागे पुढे डोलताना मनोहर दिसते. श्री पूजक स्त्रियांनी देवीला हळदी कुंकू ओटी देतात. या नंतर अंबाबाई… आमची आई सुहास्य मुद्रेने आम्ही करवीरवासीयांनी दिलेले हळदी कुंकू स्वीकारते. चैत्र ही सृजन सोहळ्याची सुरुवात आणि आश्विन हा अंत म्हणून या मुहूर्तावर वेलवर्गीय पिकांची परसातल्या भाज्यांची पेरणी केली जाते. मंद झोके घेत मोठ्या समाधानाने आई अशी शांत रुपात बसलेली पहाताना अवर्णनीय दिसते. साऱ्या ललना सगळे सौभाग्यवाण देऊन तिची हरभऱ्यानी ओटी भरतात आणि एकमेकींना हळदीकुंकू ओटी देतात. जमलेल्या समस्त महिलांना पन्हे कोशिंबीर हळदीकुंकू वाटप होते. पुरुष सुद्धा हा प्रसाद घेण्यासाठी येतात. आईला असे माहेरवाशिणीच्या सृजनशील शांत रुपात पाहून मन उचंबळून येते. घराघरातून आईला अक्षय तृतीयेला ओटी आणि कोशिंबीर रवाना होतेच. अक्षय शाश्वत सौभाग्य आईलाच मागायचे असते ना ?...'पद्मासन स्थितेदेवी परब्रह्म स्वरुपिणी' रुपातली…. फुला फुलात सजलेली आणि फुलाच्याच रंगीत झुल्यात बसून सुखाचे हिंदोळे घेणारी 'प्रसन्ना वरदा शुभा' अंबाबाई पाहिली की डोळ्याचे पारणे फिटते. ज्योतिर्मय अशी ती त्रिपुरासुंदरी या वेळी कोल्हासूर मर्दिनीच्या उग्र रुपात नाही तर सृष्टीचे सृजन गीत गाणारी मुग्ध रमणी भासते. आता ती अन्नपूर्णा अन्नब्रह्माच्या पूजेला सुरुवात करते आणि भक्तांना सुखाचे अक्षय दान देते. अत्यंत आनंदात माहेरी आलेली कन्या… काही मागत नाही, तर ती तृप्त समाधानी वृत्त्तीने काही द्यायला आलेली असते. तीच सुखदा, तीच वरदा आणि तीच वैभवलक्ष्मी असते. तिच्या सोन्याच्या पाऊली ती सौख्य आणि आनंद आणते. त्या दिवशी ती एक निरपेक्ष माता असते आणि तिला लेकरांची ओटी सुखाने भरायची असते. देवीचे हे जगतजननी मातृरुप वर्षानुवर्षे पाहून सुद्धा मनाचे समाधान होत नाही. हा सोहळा आयुष्यात एकदा तरी अनुभवावा इतका सुंदर असतो. अक्षय तृतीयेच्या साडेतीन मुहुर्तावर पिकलेले रसाळ पिवळे धमक आंबे यायला सुरुवात होते. देवीचा गाभारा या केशरी सुंदर आम्रफलांनी आणि पानांनी सजवला जातो. अशी आम्रपूजा भक्त अनेक देवांची बांधतात. असा हा अक्षय मधुर क्षण आपण याची देही याची डोळा पाहून तृप्त होतो. आई अंबाबाईचे सौम्य मधुर मातृरूप हृदयात साठवून घेतो आणि मनात गुणगुणत रहातो..
अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं
हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं…
असा हा मधुर चैत्र संपतो तो नयनरम्य सोहळ्याने आणि आपण परत त्या पन्हे कोशिंबिरीसाठी आसुसून पुढच्या चैत्रगौरीच्या आगमनाची आणि लेकी सुना नातवंडांची वाट पाहू लागतो.
विजयश्री तारे जोशी
कोल्हापूर ता. १२.५.२०२१
स्थान:
Kolhapur, Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या




Sunder
उत्तर द्याहटवाछान लेख. डोळ्यांसमोर सर्व उभे राहते.लेखन कौशल्य उत्तम.
उत्तर द्याहटवाखूप सुंदर.चैत्र महिन्याच्या निसर्गाचे वर्णन खूप मस्त केले आहेस.
उत्तर द्याहटवाजयश्री, नेहमी प्रमाणेच किंबहूना अधिक चांगल्याप्रकारे तू निसर्गाचे वर्णन, मलकापूर येथील चैत्र गौरीचा उत्सव, चैत्र गौरी ची पुजा, कोल्हापूर येथील उत्सव याचे छान वर्णन केले आहेस,मलकापूर येथील तो बालपणीचा तो आनंदोत्सव नजरेसमोर उभा राहतो, तुझे लेखन कौशल्य व स्मरणशक्ती व मलकापूर प्रेम अफाट आहे! असेच वरचे वर लिहीत जा व आम्हांस वाचनाचा आनंद देत जा. चैत्र गौरी तुला नेहमी अशीच मस्त आनंदी ठेवो ही प्रार्थना.
उत्तर द्याहटवाjgd."चेत्र चाहूलीचे झुले" हे टायटलच लक्ष वेधक! वसंत ऋतुचा काळ हाच मोहिनी घालणारा.त्याचा सखा मदन जोडीनेच येतो. मनाला अनामिक हुरहुर लावणारा काळ!त्यात तारुण्याचे पदार्पण झाले असेल तर और बहार! सगळी सृष्टी साज शृंगार करुन नटलेली. यात येणारी चेत्र गौर तुझ्या लेखात बरेच न ऐकलेलं व वाचलेलं व अननुभुत असे आहे. सारुरवासिनींची माहेरपण!गौरीच आगमन! निसर्गात बहरलेल्या वृक्ष वेलींच सुंदर विश्व! बारकाईने वर्णन करताना तुझी लेखणी किती भावमग्न होते. आम्रतरुवरचे कोकिळेचे मधूर गायन व त्याला साद देणारा सुंदर निसर्ग! रंग व गंधाची उधळण करणारी फूले, हिरव्या हळव्या वृक्षवेली !रंग,नाद,रुपांचे भांडार वसंतात उधळलेले! चैत्रगौरीच्या सजावटीच्या ,चैत्रांगणाच्या व अक्षयृतृतीयेच्या सणांच्या आठवणीत पन्हे,पक्वान्ने पण सहभागी आहेतच. याच वेळी मलकापूरच्या—माहेरच्या— परांजपे,काकिर्डे सह अरुण पाटील सरांच्या अंगणा परसातील कैर्यांचा डल्ला मारण्यासाठी टपलेली मुलांची वानरसेना ही आठवलेली दिसते. चोरीतले साहस व गोडी सणासाठी! चैत्रगौरीसारख्या सजलेल्या अंगना अंगणात व घरात गप्पागोष्टीत रमून जात.हा प्रसंग मजेशीर! बायकोला खुष करण्यासाठी गुढीपाडव्याला सोन्याचे अलंकार घ्यायची सोय आता पुरुषांना नाही. व या कोरोनात सणाचे सणपण हरवलय! "वो दिन याद करो" असे झूरत बसण्याचा काळ! बाकी आठवणी मस्त! नाजूक लेखणीने हळुवार कविता लिहावी तशी ही गद्यातली वर्णनेही लालित्यपूर्ण आहेत, सरस्वती जिभेवर स्वार झाली असावी. ती वाणी व लेखनीतून लीला नृत्य करीत आहे, लेख सुंदरतेने सजला आहे—चैत्र गौरीसारखा! वसंतातल्या सृष्टी सारखा! लिहित रहा!खूप सुंदर!!!🦚🌳🌈🌧️🌄
उत्तर द्याहटवालेख चांगला आहे. बरीच माहिती मिळाली. आमचा संबंध फक्त पळसाच्या पानावर मिळणारी कोशिंबीर आणि पन्हं एवढ्यापुरताच राहिला.
उत्तर द्याहटवालेख चांगला आहे. बरीच माहिती मिळाली. आमचा संबंध फक्त पळसाच्या पानावर मिळणारी कोशिंबीर आणि पन्हं एवढ्यापुरताच राहिला.
उत्तर द्याहटवाअतिशय समर्पक असे चैत्राचे अणि हळदी कुंकू अणि त्याची तयारी अणि त्याची लगबग यांचे वर्णन
उत्तर द्याहटवाMadam Vasant rutumadhil nisargache varnan hubehub Apratim kele ahe.Sasurvashiniche varnan suddha changle kele ahe,Phule,phale,zade yanchepan varna apratim.Vasant Rutumadhhil lekh pharach chhan.
उत्तर द्याहटवातारे मॅडम नमस्कार,
उत्तर द्याहटवाआपला चैत्र चाहूल.. लेख वाचायला सुर वात केली व जेव्हा तो वाचून संपला तेव्हा मी अर्धा एक तास एका वेगळ्याच वातावरणात गेलो होतो, वेळ काळ , देहभान, सभोवताल, सर्व विसरून गेले होते. लेख संपल्यावर भानावर आल्यासारखे वाटले, इतके ते मनावर गारूड करून गेले..... कारण ते केवळ शब्द नव्हते,अक्षरशः ते ते प्रसंग, निसर्ग, सजावटी, गमती , जमती, प्रत्यक्ष नजरेसमोरून एका नंतर एक पुढे सरकत होते इतकी हुबेहूबता लेखात आहे.
लेखाची सुरुवात वसंत आला हो... अशी साद घालणाऱ्या कोयल कुजनाने झाली... नंतर वसंताच्या स्वागतासाठी जुने जीर्ण सगळे फेकून देऊन नवे रंग, गंध लेऊन सज्ज झालेल्या लता, वेली, वृक्ष, आपापल्या वैशिठ्या सह (जणू त्यांची सौदर्य स्पर्धा आयोजित केल्या प्रमाणे)... नटलेला वेडावाकडा चाफा, हिरवागार, चवरी ढळणारा कडूनिंब, चकचकीत पालवी फडकविनारा अस्वत्थ, गुलमोहोर, मधोमध भांग पाडून केस विंच्रल्यासारखी दिसणारी त्याची पाने...(छान उपमा दिली आहे) बाहवा त्याचे पिवळे झुंबर (मी मुद्दाम माझ्या अंगणात लावला आहे) लाल भडक काटेसावर... काय सांगावे तो तर मलकापूर येथे मी रहात होतो त्या भिंगार्डे वकिलांच्या परसदारी होता. वारा सुटला की भूर भूर उडणारा कापूस अगदी नयमनोहर, सर्वत्र शाहूवाडी तालुक्यात जिकडे तिकडे पळस, पंगरा, बोगनवेली, मधुमालती सर्व नजरें समोरून तरळून गेले.
गुढपाडव्याच्या वर्णनात मला मलकापूर कडे असलेल्या अनोख्या पद्धतीचे कौतुक वाटायचे, नाना कामेरकर सजवलेली गुढी उभी करायचे, त्यांची कन्या संजोत पाटावर रांगोळी व चाफा कळी चे सुंदर घोडे करून पाट सजवायची... हे सर्व आठवले
चैत्र गौरी बद्दल मी खूप अनभिज्ञ आहे, कारण आमच्या भागात असा उत्सव होताना दिसत नाही. मी तो मलकापूर येथे असताना मात्र थोडा अनुभवला आहे. तुम्ही तो खूप छान लिहिला आहे. ती आरास, हळदी कुंकू, झुला, खमंग खाद्य पदार्थ, रान मेवा, गौरीची बाळे, पन्हे, हे सर्व मला खूप आवडून गेले. लेख बरोबर दिलेले दोन फोटो अप्रतिम आहेत.
शेवटी, महालक्ष्मीचा नयनरम्य सोहळा (फोटो अप्रतिम) इतका हुबेहूब रंगवला आहे की तो सोहळा समोर चालू आहे असे वाटते महालक्ष्मीची किती रुपे... शांत रूपातली, माहेरवाशीण, सृजनशील, परब्रम्ह स्वरूपिनी, प्रसन्न वरदा शुभा, मुग्ध रमणी, अन्नपूर्णा, सुखदा, वैभवलक्ष्मी, निरपेक्ष माता जगत जननी, तिचे मधुर मातृ रूप...... खूप सुंदर आणि चिंतनीय.....
आणि शेवटी, अधुरं मधूरं....असा खरोखरच मधुर सुंदर लेख छान वाटला. अशीच आनंदाची बरसात करीत रहा. पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा, धन्यवाद.
प्रा. सुभाष बेले .१५. ०५ .२०२१
तुझे लिखाण दिवसेंदिवस बहव्यासारखे बहरत चालले आहे. वर्णना साठी कसे शब्द सुचतात याचे आश्चर्य वाटते. मनाची एकाग्रता व स्वस्थता असावी लागते. ती तुला छान जमते.वसंताचे वर्णन अप्रतिम. निसर्ग डोळे उघडून बघण्याची दृष्टी तुझा लेख देतो. चैत्र गौरीचे हळदी कुंकू मस्त रंगवला आहेस. त्यात आपल्या महालक्ष्मी मंदिरातील अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाणारी आरास याचे वर्णन अप्रतिम.कोशिंबीर पन्ह्याचे हळदीकुंकू मन लाऊन लिहिले आहेस. आजच्या पिढीसाठी आठवणींचा खजिना च समोर ठेवला आहेस.फोटो छान टाकले आहेस. नीलवहीनिंच्या कलेला प्रसिद्धी दिलीस बरे वाटले.तुझे लिखाण आरामात वाचून आनंद घेण्यासारखे 👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान,एक लेखिका बहरत आहे-प्रा एस पी चौगले
उत्तर द्याहटवाविजयश्री,खूप छान,मराठी भाषा जागृत झाली,अनेक शब्दांचा खजिना जागे झाला.
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद...आश्वासक दाद मिळाली की लेखणी बहरते..
हटवाश्री, खूप छान लिहितेस तू! वर्णन तर अस करतेस की मलकपुरचे त्यावेळीचे संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहते. उपमा पण कशा सुचतात ग तुला? साक्षात सरस्वतीच आरूढ होते तूझ्या लेखणीवर! मस्त. अशीच लिहीत राहा
उत्तर द्याहटवाहो सखी..धन्यवाद..तुमच्या सारखे रसिक असेल तर शब्द आपोआप मनी येतात..
हटवाJ p sangrulkar, Madam Vasant rutumadhil varnan, Mahalaxmi Mandiratil varnan, Holding kunkumadhil varnan, navin lagna zalelaya mulina nav ghenes sangne ashi sarvprakarche blog phar Changle lihile ahet ashach prakare tumhi likhan karat raha, Amchya shubhechha tumchya pathishi ahet
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर लिखाण, वसंतोत्सवाचं....👌👌
उत्तर द्याहटवाखूप धन्यवाद...नाव समजले नाही हो..पुढच्या वेळी नक्की लिहा
हटवाअभिनंदन. वसंत ऊत्सोवाचे अप्रतिम वर्णन. चैत्र गौरीची आरास,मोत्यांची चित्रागंण, महालक्ष्मीच्या देखाव्याचे वर्णन अप्रतिम. मी आमरस,श्रीखंड, बासुंदी, पुरणपोळी, कटाची आमटी सगळ्याची चव अनुभवलेली आहे परंतु कोवळ्या कडुनिंबाची पानांची कडुझार चटणीची चव अजूनही घेतली नाही. एकदा मलकापूरास येऊन कडुनिंबाच्या पानांच्या चटणीची चव अनुभवावी. गंमत केली. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत. शिरीष वाडेकर, पुणे.
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद...कडुनिंबाची चटणी कधीही करता येते...चैत्रात जरा कमी कडू लागते कारण पालवी कोवळी असते...तुम्ही या नक्की श्रीखंड आणि चटणी दोन्ही खाऊ घालते. मला सर्वांना खाऊ घालायची खूप हौस आहे...
हटवानेहमी प्रमाणेच..भरपूर आणि खरी माहिती..खूप चांगल्या शब्दात मांडणी . आपल्या लेखणीला पण असाच वसंताचा बहर मिळो आणि कोकीळ गण सारखा आपला ब्लॉग पण लोकप्रिय हो,अश्या हार्दिक शुभेच्छा.🙏💐- सौ. अनला बापट
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी...तुझ्या प्रेरणेने बल मिळते बरे..असेच मला सुधारणा पण सांगत रहा
उत्तर द्याहटवा