गो गो गोवा..

आप्पा जोशींची भविष्यवाणी


 जगी सर्व सुखी असा कोण आहे

विचारे मना तूच शोधून पाहे


असे समर्थांनी म्हणूनच ठेवलंय...तरी माणूस नावाचा प्राणी कायम सुखाच्या पाठीस लागतो. त्या खोल विहिरीत वाकून वाकून चेहरा बघतो. वर्तमानात सुखाचे घास खाताना सुद्धा माणसाला उद्याची चिंता भेडसावते. माणूस उद्या सुखी होण्याची दिवा स्वप्ने पहातो अन् हा उद्या कायमच हुलकावण्या देत उद्याच्या दिशेनं पळत असतो. आमचे मलकापूर निसर्गकृपेने तसे सुखवस्तू गाव.  भिर भिर चालत निवांत हिंडावे किंवा कट्टयावर नाहीतर पायरीवर बसून खुशाल चकाट्या पिटत चर्चासत्र घडवावे असा दिनक्रम. दोन वेळचे पोटाला मिळावे आणि बरे कपडे मिळोत इतकीच काय ती अपेक्षा आणि आकांक्षा. तरीही लोकांना आपल्या उद्याच्या भविष्यात काय लिहिले आहे...याची फार चिंता असे. दरी डोंगरांनी वेढलेले मलकापूर संस्थान जसे तिथल्या नयनरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध तसेच बिनचूक भविष्यासाठी मान्यता पावलेले आहे. मलकापूर संस्थानच्या दशग्रंथी पुरोहिताना विद्वत्ता पाहून राष्ट्रपतींनी सोन्याचे कडे घालून सन्मान केला होता असा इतिहास आहे. पुरोहित घराण्याने आज अखेर तो सन्मान जपला आहे. याच  मलकापूरच्या ज्योतिष इतिहासातले एक सोनेरी पान म्हणजे कै. प्रभाकर वासुदेव जोशी उर्फ आप्पा जोशी.


आदरणीय कै.आप्पा जोशी यांच्या घराण्याकडे आजूबाजूच्या शंभर एक गावांचे पौरोहित्य होते. त्यांच्याकडे पंत प्रतिनिधी घराणे, सबनीस, देशपांडे अशा अनेक कुलांचे कुलोपचार होते. ते ज्योतिष शास्त्राचे गाढे अभ्यासक होते. अनेक राजकारणी लोक आणि त्या काळातले मंत्री देखील  खास गाड्या भरभरून आप्पा जोशींचा सल्ला घेण्यासाठी मुद्दाम येत.आप्पा जोशी म्हणजे मलकापूरचे होराभूषणच होत.  हुरमुजी गौर गुलाबी वर्ण, किंचित स्थूल मध्यम उंचीचा बांधा, मनाचा ठाव घेणारी अत्यंत करारी धारदार नजर आणि सर्वात महत्वाचा म्हणजे खणखणीत तरीही प्रेमळ आवाज लाभलेले लोभस असे दैवी व्यक्तीमत्व म्हणजे आप्पा जोशी! भारदस्त तरी रसाळ आवाजात  त्यांचे वेदघोष सुरू झाले की मंत्रमुग्ध होउन ऐकत रहावे असे वाटे. नवचंडी होमाचा विधी असो की गणेश याग सगळे मंत्र आप्पांना मुखोदगत होते. मंत्रोच्चार देखील स्पष्ट आणि खणखणीत असत. चार चार तास मंत्रांचा वेद घोष सुरू असायचा पण स्वर जो सुरुवातीला लागलेला तोच शेवटपर्यंत असे. कुठेही शॉर्टकट नाही की अर्धी पट्टी खाली नाही. त्यांनी  टेकडीवर सांगितलेली सत्यनारायण कथा अजूनही तशीच आठवते तो आवाज ध्वनीक्षेपकाने गावभर घुमायचा. काळाशी सुसंगत असे दाखले देत अगदी रसभरीत कथा सांगत त्यामुळे गावकरी रंगून जात. प्रत्येक वेळी तीच कथा वेगळ्या ढंगाने कशी सांगायचे त्याचे मोठे नवल वाटे. त्यांची वेद संपन्नता पाहून सारा गाव नतमस्तक होई. 




ते सगळ्या गावाचे तारणहार होते. आप्पा जोशींचा भटगल्लीतला सगळे मुहूर्त काढणारा तसेच बिनचूक भविष्यवाणी दरबार सकाळी नऊ ते रात्री पर्यंत फुलून गेलेला असायचा. बाजाराला आलेल्या बाया बापड्या, पुरुष आपापले अवघड प्रश्न घेऊन हा दरबार गाठत. आप्पा पहाटे लवकर उठून शुचिर्भूत होऊन देवपूजा करून सप्तशितीचे पाठ आणि इतर नित्य उपासना करीत. उपासनेचे तेज त्यांच्या मुखकमलावर सदैव विलसत असे. गावा गावातले सर्व ठरलेले पौरोहित्य करून नंतर ते या जनता दरबारात येत असत. त्यांनी ज्योतिष शास्त्राचा कोणता अभ्यास केला होता ते त्यांना आणि देवास ठाऊक पण उपासनेने त्यांना वाचासिद्धी प्राप्त झाली असावी. खूप वेळा त्यांनी बोलावे आणि तसेच घडावे हा अनुभव अनेक लोकांनी घेतला आहे. त्यांच्या मुखातून साक्षात परमेश्वर बोलत असावा इतके त्यांचे ठोकताळे बरोब्बर ठरायचे. खेड्यातले लोक … ना जन्म तारखेचा पत्ता ना सालाचा मग कुंडलीचा काय संबंध ? त्यामुळे तसेच प्रश्न विचारायला येत तरीही आप्पा त्यांच्या चेहऱ्याकडे बघून अचूक भविष्य सांगत असायचे. त्रिकालदर्शी असल्यासारखे असे दाखले द्यायचे की चुकीचे अनैतिक वागणाऱ्या माणसाची भर दरबारात दातखीळ बसली पाहिजे. असा त्यांचा सगळीकडे दरारा होता. आप्पा एका आसनावर बसत त्यांच्या समोर  चौरंगावर एक पोथी, पंचांग ठेवलेले असे. कोपऱ्यात एक अगरबत्ती लावली जाई. शुभ्र धोतर सदरा उपरणे असा वेष धारण करून तिथे येऊन बसले की एखादा ऋषी तपाला बसला आहे असे वाटे इतके पवित्र वातावरण असे. समोर सतरंजीवर आयुष्याचे प्रश्न सोडवायला आलेले रंजले गांजलेले लोक चिंताग्रस्त चेहरा घेऊन स्थानापन्न होत. मग दरबाराच्या कामकाजाला सुरुवात होई.


गावातले तसेच पंचक्रोशी मधून लोक धापा टाकत चालत  येत आणि  त्यांचा बहुमोल सल्ला घेण्यासाठी सकाळपासून गर्दी करत. एक एक जण क्रमाने आप्पांना मनातला सल सांगे आणि काय करू ते  सांगा असे विचारत असे. या दरबारातील प्रश्न आणि उत्तरे भारी रंजक असायची. आप्पा खेळकर वातावरणात त्यांच्याच ग्रामीण भाषेत जे संवाद बोलायचे ते ऐकून इतर लोकांचे छान मनोरंजन होई. काही प्रश्न फार मजेशीर असत.

 

'आप्पा...काय करू??? कशात येश येत न्हाई… सोनं हातात घेतलं तरी माती हुतिया.. काय तरी मार्ग दावा '…. असे वेग वेगळेच विषय घेऊन लोक आप्पाना कळकळीचे साकडे घालत. मग आप्पा  दोन मिनिट डोळे मिटून घेत आणि मग ती धरदार नजर टाकुन रोकडा सवाल करत… 'काय रे पांड्या म्हातारीला जेवायला घालतोस का गुमान, कसा वागतोस तिच्याशी.... सगळे मलाच पाहिजे म्हणत का त्रास देतोस तिला ? भावाला वाटणी दिलीस का ? ' तो पांड्या बुचकळ्यात पडायचा आणि तोंड पाडून गप बसायचा. त्याच्या मौनात सगळे समजायचे आप्पाना मग त्याला चांगला खडसावून कुठे काय चुकते ते कान पकडुन सांगायचे. पांड्या गप सारे ऐकून घेई...आणि शेवटी शरणागती पत्करून काकुळतीला येऊन 'व्हय आप्पा चुकलो, माफी असावी, त्यामुळच येश यिना… तुमच्या सांगन्या परमानं करतो. येतो आता पुढच्या पूनवंला..'....असे म्हणून सटकायचा. सगळ्या भरलेल्या दरबारात आप्पांनी कान पिळल्याचे ओशाळवाणे हसू चेहऱ्यावर यायचेच. 


मग खेड्यातली एखादी सबला नारी हळूच विचारायची..'आप्पा सून नांदायला यिना झालीया...पोराचं दुसरं लगीन लावावं काय ? 'यावर आप्पा त्या नारीवर जळजळीत कटाक्ष टाकत विचारायचे… ' काय गं आज्जे, सून कवा गेली माहेराला ? का गेलेली ? तुझा पोरगा आलाय का बरोबर ? ' मग जर का ते पुत्ररत्न तिथे असेल तर त्याला चांगले फैलावर घेत. त्या लाडक्या पुत्ररत्नाच्या सगळ्या कळा अवकळा त्या मातेस सांगून त्या पोरीला दोष देण्यापेक्षा आधी तुझ्या मुलाला सुधार असे सांगून तिचे डोळे उघडत असत. ती बाई मग बघतो त्याला... बघतो त्याला करत मुलाला तिथेच जाब विचारत असे. त्या मुलाने आप्पा सांगतात ते मानले तर काय त्याची खैर नसे. त्या जनता दरबारात खरडपट्टी निघाली की लेकरू आपोआप वळणावर येई. कालांतराने सूनबाई नांदायला येई आणि एक कुटुंब सुखी होई. आप्पांना पुढच्या वर्षी लेकरू झाल्याची बातमी आणि पेढे द्यायला ते चांगलेच सुधारलेले पुत्ररत्न उजळलेल्या तोंडाने येई. असे भविष्यकथनाबरोबर संसार कसा नेटका करावा, प्रामाणिकपणाने कसे वागावे हे सल्ले मिळत. कोणी एखादा पोरीचे लगीन होईना, मूल होईना म्हणून विचारायला येई. नडलेल्या सगळ्या प्रश्नांना आप्पांकडे उपासनेचे उपाय होते. त्यांनी नियतीच्या कोणत्या प्रश्नांपुढे हार मानली नाही, काही ना काही उपाय असेच.



आप्पांवर माझ्या बाबांचा गाढ विश्वास होता. आप्पा  शाळामित्र त्यामुळे आमच्या घरातील सगळी कार्ये त्यांनीच सिद्धीस नेली त्या तयारीसाठी माझे लहानपणी त्यांच्या दरबारी जाणे होई. माझेच काय गावातल्या बऱ्याच मुलांचे करियरचे निर्णय आप्पांनी घेतले. त्यामुळे या दरबाराची जवळून अनुभूती मिळाली. करेल तो धंदा बुडायचाच त्यामुळे एकदा माझ्या बाबांना अगदी गाव सोडावा की काय असा यक्ष प्रश्न पडला.  बाबांनी आप्पांचे घर गाठले.... दोघात काय चर्चा झाली ते देव जाणे. आप्पानी 'अमुक तारखे पर्यंत वाट बघ मग निर्णय घे ' असे बाबांना सांगितले होते.  सांगितले तर खरे वाटणार नाही की बरोब्बर त्या तारखेच्या आधी दोन दिवस माझ्या बाबांना लाखाचे लॉटरीचे तिकीट लागले !  काही दिवसांपुरते संकट दूर गेले. त्यानंतर आम्हा भावंडांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कोणती शाखा निवडू पासून कोणती नोकरी ठेवू इथ पर्यंत.पंचविशी पूर्वी मी तीन सरकारी नोकऱ्या बदलल्या ...आणि प्रत्येक वेळी त्यांचा सल्ला घेतलाच. शेवटी आता ही नोकरी सोडायची नाही असे त्यांनी प्रेमळपणे  दटावल्यावर कुठे थांबले. नाहीतर माझे फुलपाखरू मन एके ठिकाणी फार वेळ अजूनही रमत नाही. आजही नित्य नवे वातावरण आणि अनुभव हवा असतोच. आता हिचे लग्न करू का आता  असे विचारायला गेले बाबा… तर आप्पा गडगडाटी हसायला लागले.' तू एकही स्थळ बघू नकोस हिचे लग्न सहज जाता जाता होणार '  हे  त्यांनी वर्तवलेले ही भविष्यही खरेच ठरले. अगदी विनासायास विनाहुंडा लग्न होऊन गेले. आमच्या कुटुंबाला कठीण काळी तारण्याचे काम या महापुरुषाने केले. त्या वेळी त्यांच्या धीराच्या शब्दांची, प्रेरणेची नितांत गरज होती. पाठीवरती हात ठेउन फक्त लढ म्हणायला आप्पांचा प्रेमळ वरदहस्त लाभला होता. त्या आशिवार्दाच्या जोरावर आमच्या प्रमाणे अनेक लोकांचा कठीण मार्ग सुकर झाला. आप्पांचे असे अनेक किस्से मलकापूर मध्ये ऐकायला मिळतील. भोळेभाबडे जीव कोणतेही संकट आले की भांबावून जात. हे करू का ते करू असा सारखाच विचार पडलेला, मग त्यांना असा ठाम विश्वास देऊन दिशा देणारे कुणी आपले माणूस हवे होते. आप्पा सगळ्या गावाला संकटमोचक वाटायचे म्हणून प्रत्येक जण त्यांच्याकडे आपले मन मोकळे करत मार्गदर्शन घ्यायचे. प्रेमळ हक्काने ते कधी गोंजारत, समजूत घालत तर कधी फटकारून समोरच्या व्यक्तीच्या योग्य कृती करायला सांगत. शस्त्रास्त्रे टाकून युद्ध भूमीत मान खाली घालून बसलेल्या अर्जुनाला जसे कृष्णाने '. उठ... युद्ध कर ' म्हणावे तसे परिस्थितीने हरलेल्या प्रत्येक माणसातील स्फुल्लिंग जागवण्याचे लढण्याचे बळ देण्याचे काम आप्पांनी त्या काळी केले होते. 


मानले तर हे ज्योतिष आणि नाही मानले तर एक उत्तम नि:पक्षपातीपणाने दिलेला सल्ला. आता कोणी याला अंधश्रद्धा म्हणत असतील ही पण जेंव्हा इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण होते माणूस संकटात सापडतो तेंव्हा तो असे सल्ला घेण्यासाठी भक्कम आधार शोधतो. हे शास्त्र सांगणाऱ्या व्यक्तीच्या अभ्यासापेक्षा तर्कशास्त्रावर जास्त चालते असे वाटते . काही माणसांना समोरचा माणूस नीट वाचता येतो, याला कोणते शास्त्र नाही... तर डोळस अनुभव  त्यांना ते विश्वज्ञान देत असावेत. मलकापूर चे प्रसिद्ध व्यापारी कै. मारुती ता.भिंगार्डे यांनी आप्पांनी कोल्हापुरात पसंत केलेल्या घराचे दोष पाहण्यासाठी नेले. आप्पांनी घर घेऊ नको असा सल्ला दिला होता. पुढे तीन वर्षात असे प्रसंग आले की त्यांना ते घर विकावे लागले. आप्पा लोकांकडे फक्त पाहून कशी उत्तरे देत हे गुपित आजवर उलगडलेले नाही. ते आणि त्यांचं ज्योतिष कार्यालय यावर अनुभवसिद्ध प्रबंध लिहिता यावा पण मूळ मात्र सापडू नये अशी काहीशी कथा. त्यांचे ज्येष्ठ बंधू वसंत उर्फ पमेश जोशी हे पेशाने शिक्षक होते पण छंद म्हणून कुंडली पाहून भविष्य सांगत असत. पमेश सराना लोक आण्णा म्हणत. ते ही निरपेक्ष भावनेने अनेकांच्या आयुष्याला दिशा देत असत. त्यांच्याकडे अनेक बडे लोक गाड्या घेऊन भविष्य विचारायला येत असत.


त्यांच्या घरातले देवघर अतिशय सुंदर होते. आपुलकी तर इतकी की माहेरी दिसले की थांबवून… कशी आहेस विचारून घरी यायला लावणारच. गावातली मुले आपलीच आहेत इतक्या आपुलकीने वागणारे ते दोन्ही तेजस्वी बंधू कधीही विस्मरणात गेले नाहीत. कुणाचे तोंडभर कौतुक करावे तर ते या बंधूनीच. आपल्या घरातल्याच काय गल्लीतल्या विजू कुलकर्णी सरुडकर, माणिक जोशी, माधवी जोशी, पद्मा वारंगे यांना त्यांनी अथर्वशीर्ष आदी मंत्र म्हणायला शिकवले. आप्पा थोडे धीर गंभीर, पूर्ण वेळ पौरोहित्य ज्योतिष यात रमणारे तर पमेश सरांच्या चेहऱ्यावर कायम मिश्किल हसू आणि नजरेत लहान मुलाचा खट्याळपणा. सर नेहमीच गोड हसत आणि मृदू आवाजात बोलायचे आणि सारखे सगळ्या जगाचे कौतुक त्यांच्या नजरेतून ओसंडून वहायचे. गावातले कोणीही नोकरीला लागले की या दोघांकडून तोंड भरून कौतुक आणि आशिर्वाद मिळायचे. 



आप्पांनी कुणाकडे कसल्याही सल्ल्यासाठी पैसे मागितल्याचे ऐकिवात नाही. लोक त्यांच्या मनासारखे झाले की आपण होऊन येऊन त्यांच्या चौरंगावर पैसे ठेवत. परिस्थिती बेताची असलेले बरेच लोक यथा शक्ती आपल्या मनाप्रमाणे दक्षिणा देत असत. शाहूवाडी हा सह्यगिरीच्या कुशीतला अती  पावसाळी तालुका पण सगळा पाऊस डोंगर कपारीतून वाहून गेला की पाण्याचे दुर्भिक्ष असायचे. सगळी शेती पावसाच्या पाण्यावर निसर्ग लहरीवर अवलंबून असे. धरणे हल्ली बांधली गेली आहेत. तेंव्हाही शेतकरी राजाचे हालच होत असत. पिकले तर पिकले नाहीतर वाहून गेले. तसे लोक खाऊन पिऊन सुखी होते पण हातात पैसा खुळखुळत  नसे. हे आप्पा जाणून होते. त्यानी ना कुणाला काही मागितले ना त्यांना काही कमी पडले. काही वेळा लोक म्हैस हरवली तरी त्यांना विचारायला येत मग आप्पांनी सांगितलेल्या दिशेला ती सापडे किंवा परत येई. मग तो मालक एक दुधाची भरलेली चरवी घेऊन यायचा आणि त्यांचे पाय पकडायचा. शेतातील धान्याचे पोते, गुऱ्हाळ घरातली पहिली गुळाची ढेप आधी आप्पांना स्वखुशीने अर्पण केली जायची. त्यांचे दुमजली घर कायम धन धान्य, गूळ, खोबरे, नारळ यानी भरलेले असायचे. आप्पांनी अनेक लोकांना अडचणीच्या वेळी आर्थिक मदत केली. दरवर्षी ते जन संघाला मोठी देणगी गुरुदक्षिणा म्हणून देत. अनेक परिस्थिती नसलेल्या हुशार मुलांना त्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली. सगळे  व्यवहार तोंडी …. कशाची म्हणून नोंद नाही. काहीजण पैसे परत करत तर काहीना जमत नसे. पण त्यांनी कुणाला देण्याची आठवण करून दिली नाही. या घराण्याची वाहती गंगा सगळा परिसर तृप्त करून गेली. आज अनेक घराणी केवळ त्यांच्या कृपा छत्रामुळे तिथे सुखात रहात आहेत. निर्मळ गंगा वाहत रहाते तसे त्या बंधूंचे निरामय जीवन आजू बाजूच्या सर्वांना समृद्ध करून वहात राहिले. ते फक्त नारळ, लिंबू ,अंगारा असे काही देऊन देवाची उपासना करायला सांगत असत. आज हस्त रेषा, पायाच्या रेषा, टॅरो कार्ड, पोपट भविष्य, अंक शास्त्र असे हजारो प्रकार उपलब्ध असून बक्कळ पैसे आधी घेऊन माणसाचेच काय देशाचे सुद्धा भविष्य लोक वर्तवत असतात. असे आप्पांसारखे प्रेमाचा सल्ला कळकळीने देणारे  निरपेक्ष लोक विरळाच. 


आप्पांना सकाळी चहा पिता पिता अचानक देवाज्ञा झाली. असे ऐकिवात आहे की त्यांचे देहावसान झाल्यावर एक दोन तास त्यांची वास्तू अचानक चंदन गंधाने भरली होती. लोकांनी सगळे घर फिरून पाहिले पण त्या गंधाचा उगम समजला नाही. गावात अनेक दिवस या अनुभूतीची चर्चा होती. असे वाटते की त्यांच्या परोपकारी पुण्यवान आत्म्याचाच तो चंदनगंध असावा. देवाने त्यांना अदृश्य चंदनमाला अर्पण केली होती. असे पुण्यवान लोक आम्हाला याची देही याची डोळा पहायला मिळाले. नंतरच्या काळात ही गूढ भट गल्ली ज्योतिष सांगणाऱ्यांची गल्ली झाली. आता तिला  'ब्राह्मणपुरी ' असे संबोधतात. आप्पांकडून वामन जोशी, नंदु जोशी, नाना जोशी, रवि जोशी असे बरेच शिष्य गण तयार झाले जे आज त्यांची गादी चालवतात. वामनदादाची आई तर सगळ्या गावच्या बाळंतीण बायांना खोबरे, गूळ, खारका असे पदार्थ पोहोच करायची. या मदतीमुळे गरीबाघरच्या बाळंतीण मुलींना पौष्टिक पदार्थ मिळायचे. ती माऊली सगळ्यांच्या मदतीस धावून जायची.आज ही माहेरी गेले की मला या गल्लीत उगीच फेर फटका  मारावा असे वाटते...न जाणो… 'अहो बाहेर याsss माहेरवाशीण आलीss...ओटी भरा तिची ' ... अशी आप्पांची  खडी गर्जना घुमेल असे वाटत रहाते. आप्पांच्या धर्मपत्नी मालती बाई  फार प्रेमळ होत्या सगळ्यांचे उत्तम आदरातिथ्य करायच्या. त्या खाऊ पिऊ घातल्याशिवाय कोणाला बाहेर पडू द्यायच्या नाहीत त्या बाहेर येतील असे वाटते. ती वामनदादाची आई पाटावर बसवून  कौतुकाने माहेरपण करेल असे उगीच वाटून जाते. गेले ते दिवस आणि गेली ती गावातल्या सगळ्या मुलींची आस्थेने चौकशी करणारी निर्मळ हृदयाची माणसे… असे म्हणत सुस्कारा सोडत त्या आठवणीत रमायचे. लहानपणापासून असे अनुभव गाठीशी आले. अगदी मांजर हरवले तरी आम्ही भट गल्लीत जाऊन कुठे गेले कधी परत येईल असे विचारत असू. आजही मला नाना प्रश्न पडतच असतात. आता मात्र कुणाकडे जाऊन काही विचारावेसे वाटतच नाही. प्रश्न पडला त्याने फक्त आप्पांचे स्मरण करावे… आणि मार्ग आपोआप सापडतो. 


आज लाखो रुपये मोजले तरी या तुच्छ जंतूचा अंत कधी आणि ठोस उपाय काय हे  छातीठोकपणे सांगणारे कोणी भेटेल का ??? परत परत नवनव्या रुपात येऊन मानवी जीवन ठप्प करणाऱ्या या जंतूचे करायचे काय? मागची दोन वर्ष अनेक भविष्यवाणी ऐकल्या आहेत पण प्रश्न तिथेच आहे. मीच काय सारे जग हे भविष्य जाणायला उत्सुक आहे… शेवटी गाडी उद्या काय या चिंतेकडे वळते आणि कोण आकाशातून भविष्यवाणी करेल काय ? असे भोळ्या मनाला वाटत रहाते. आज मला कुणी विचारले की तुला देव दिसला का तर माझ्याकडे उत्तर आहे… मी देव नाही पण आप्पा जोशी नावाचा देवमाणूस पाहिला आहे आणि त्यांची अचूक भविष्यवाणी अनुभवली आहे.


(टीप - या लेखात मी माझे वैयक्तिक सत्य अनुभव लिहिले आहेत. हा मनोरंजनात्मक लेख असून कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा मनोदय नाही याची कृपया नोंद घ्यावी. वाचासिद्धी असलेले लोक आम्ही डोळ्यांनी पाहिले आणि अनुभवले याचे मला आजही नवल वाटते.)


विजयश्री तारे जोशी

कोल्हापूर -१०.६.२०२२



टिप्पण्या

  1. लहानपणी काही काळ आप्पा आजोबांचा सहवास लाभला होता लेखातून अगदी अप्पा आजोबांना भेटल्यासारखे वाटले

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर वास्तव लिखाण... पण काही गोष्टी शी सहमत नाही... नक्कीच माझे अनुभव शेअर करायचा प्रयत्न करेन .. प्रामुख्यानं भट गल्लीतले... पण लिखाण खूप आवडले... Keep it up...

    उत्तर द्याहटवा
  3. जयश्री, अतिशय सुरेख वर्णन केले आहेस. मी सुध्दा लहानपणा पासून अप्पा जोशी व पमेश मास्तर (जोशी सर)यांना पाहिले आहे, त्यांच्या ज्योतिष विद्येची प्रचिती घेतली आहे.
    व. वा. जोशी सर आम्हास हिंदी विषय शिकवीत, अतिशय मिश्किल, सहज जाता जाता विनोद करुन सर्व वर्गाला हसवत. त्यांच्या कडून हिंदी विषयाचे धडे घेताना खुप आनंद वाटायचा. चांगले गुण काढले तर कौतुकाची पाठीवर थाप असायची. अप्पा व जोशी सर हे ऋषितुल्य बंधू मलकापूर चे वैभव होते, अजून सुध्दा त्यांची सर्वत्र आठवण निघते. मलकापूर म्हणजे ज्योतिष शास्त्री यांचे गाव असे जणू समीकरणच झाले आहे. जयश्री तुझ्या लिखाणामुळे मलकापूर या आपल्या गावाकडच्या आठवणी भरुन आल्या!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Amhi asha soneri panache, daivtanche natevaik aahot. He aamche Parambhabya ..🙏🙏
      Likhan khup sunder.. Mahiti sanklan Chan...sarv barik goshtincha Ullekh..avarnaniya.. Abhinandan.. 💐💐

      हटवा
    2. आपले नाव समजले नाही...पण आपण नक्कीच भाग्यवान आहात म्हणून त्यांचा सहवास लाभला
      .धन्यवाद

      हटवा
  4. Amhi asha soneri panache, daivtanche natevaik aahot. He aamche Parambhabya ..🙏🙏
    Likhan khup sunder.. Mahiti sanklan Chan...sarv barik goshtincha Ullekh..avarnaniya.. Abhinandan.. 💐💐

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मनापासून धन्यवाद...आपले गाव इतके सुंदर आहे आणि माणसे देखील इतकी उत्तुंग की आठवणी येतच राहणार

      हटवा
  5. छान वाचन करताना मन अगदी प्रसन्न झाले, काही वेळ जुन्या आठवणी जाग्या झाल्या .

    उत्तर द्याहटवा
  6. एस पी चौगले, एक समाजसुधारक असणाऱ्या आप्पांवरील किती सुंदर लेख, आप्पा जोशी यांच्या व्यक्तिमत्वाचे सुरेख पैलू आपण लिहिले आहेत, धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  7. आपला पुनः ऐक नवा आणि विचार करायला लावणारा लेख वाचून खूप आनंद झाला, आपला अनुभव चुकीचा नाहीं आहे बरोबरच आहे समाज्यामध्ये असे लोक पूर्वी होते, कारण ते तपस्वी होते, आज काल कोणाला तपश्या नको आहे फक्त काम न करता आयत पाहिजे आहे. ब्रह्म देव जे ह्या सृष्टीतले पहिले जीव त्यांना माहिती नाहीं कि मि कोण आहे. त्यांच्या कानावर तीन वेळा ऐक शब्द पडला तप तप तप बुद्धीमान ब्राम्हदेवांना समजले कि मला तपश्चर्या करावी लागणार आहे,(जशी आपण new india मध्ये 35वर्ष तपश्चर्या केला )आणि त्यांनी 10 हजार वर्षां तपश्चर्या केली आणि त्यांना हृदयात भगवान श्रीकृष्ण चे दर्शन झाले, आणि त्यांनी श्रीकृष्ण ची स्तुती पर वर्णन केले "ईश्वर: परम कृष्ण सचिदानंद विग्रह अनादी राधे गोविंदम सर्व कारण कारणम" याला ब्रम्ह संहिता असे म्हणतात यामध्ये पुढे भरपूर श्लोक आहेत, आणि ब्राम्हदेवानी सृष्टी निर्माण केली त्यामध्ये प्राण घातले भगवान श्रीकृष्णणी, "अहं बीज प्रजपीता"
    म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच कि, आपले जोशी अप्पा ना ती दैवी बुद्धी त्यांच्या पूर्व जन्माच्या संचितमुळे आली असणार जी बुद्धी भगवंताकडूनच येते, भगवंत गिते मध्ये सांगतात कि 'ज्ञानियान मध्ये ज्ञान मि आहे' भगवद्गीता अध्याय 14विभूती योग.
    धन्यवाद आपला विजय मोरे आणि हो nice dp 👌🙏🌹

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. विजय आपल्याला सगळी कडे परमात्मा दिसतो तसाच त्यांच्या रुपात होता हे उमजून आले. त्यांची पूर्व जन्माची पुण्याई महान असेल की ज्या मुळे ते सर्वांना सल्ला देऊन मोठ्ठी मदत करत होते. आमचे संचित चांगले की देवाने त्यांच्या मुखातून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. धन्यवाद

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -