गो गो गोवा..

प्रसूतीगृह एक आनंदयात्रा - Journey of motherhood

 ट्यांहा... ट्यांहा …असा आवाज हे जगातले सर्वात सुंदर असे हवे हवेसे संगीत आणि जे ऐकून भिंतीचे कान तृप्त होतात ती जागा म्हणजे प्रसूतीगृह. हा सृजन सोहळा पार पाडायला मदत करणारे तिथले डॉक्टर आणि सेवक म्हणजे देवदूतच. तिथला अनभिषिक्त सम्राट म्हणजे चिमुकले हात पाय  हलवत खड्या संगीताने ईश्वरी चमत्काराची ग्वाही देणारे ते तान्हे बाळ. त्या जिवाच्या पहिल्या रडण्याने सगळे आनंदून हसतात आणि  निःश्वास टाकतात. हा अटीतटीचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टरी कौशल्य पणाला लावतो. वास्तविक बाळंतपण म्हणजे पुनर्जन्म पण स्त्रिया त्याला हसत हसत सामोऱ्या जातात. बाहेर सारेजण लेकीची सुखरूप सुटका होउदे म्हणून डोळे मिटून देवाचा धावा करत बसतात. एक गुलाबी गोंडस इवलासा जीव दुपट्यात गुंडाळून कोणी देवदूत बाहेर आणतो...आणि नवागताच्या आगमनाची सुवार्ता परिजनाना देतो. सगेसोयरे त्या गोजिरवाण्याकडे डोळे भरून पहातात… …टेन्शन संपतं आणि क्षणार्धात सगळीकडे आनंदीआनंद पसरतो ! 

ते तान्हे इवलेसे डोळे उघडून इकडे तिकडे पहाते. आई बाबा खुष होतातच … आज्जी आजोबांचे  डोळेही कौतुकाने पाणावतात. आजीबाई आनंदाश्रू टिपत देवाला परत परत मनोमन  हात जोडतात, काय करू नी काय नको असं होऊन जातं. एरवी उग्र वाटणारे मिशाळ आजोबा नकळत सद्गदित होतात.  बाळाचे तरुण माता पिता आपल्या आनंदाश्रू पुसणाऱ्या आई बाबांना हसायला लागतात. सगळीकडे बातमी मोबाईल वरून त्वरेने फ्लॅश होते. आमच्या कोल्हापूर मध्ये ही वार्ता समजताच एक हजार फटाके असलेली माळ नव्यानवेल्या बापाच्या दारात वाजवून त्याच्या मर्दुमकीवर शिक्कामोर्तब करतात. सगळी गल्ली खुष होऊन कौतुक सोहळा पहाते, धूमधडाक्यात बातमी घरोघरी जाते. हल्लीच्या सुसज्ज हॉस्पिटल मध्ये डॉक्टर,नर्स यांच्या बरोबरीने फोटोग्राफर रुंजी घालत असतात. आले बाळ जन्माला की काढ फोटो...कर तो क्षण चिरंतन,टाक लगेच फेसबुक नाहीतर इंस्टावर ! सगळ्यांना याची घाई असते. पहिली अंघोळ घालताच त्या बाळाला सजवून मॉडेलिंग साठी तयार करतात. ते एकविसाव्या शतकातील बाळ सात जन्माचा अनुभव गाठीला असल्यासारखे पोझ देते ! हाताचे ठसे,पायाचे ठसे...फुलात फोटो काय विचारायला नको. फोटो सेशन आहे असे समजताच ती नवमाता चक्क प्रसूती वेदना विसरते आणि लिपस्टिक लावून तय्यार होते. फोटो हेच तिचे औषध असते ! 


उत्सव प्रेमी कोल्हापुरात मुलाचाच काय मुलीचा जन्मसोहळा देखील धूमधडाक्यात साजरा होतो. वंशाच्या दिव्या इतकेच कौतुक चिमुकल्या लक्ष्मीचे होते.  खूप प्रतिक्षे नंतर हा सोनियाचा दिनु उगवला असला तर बेंजो वर गाणी फुल्ल आवाजात लावून गल्लीचे समूह नृत्य होते. मुलाचा पिता पेढे,बर्फी आणून दवाखान्यात सगळ्यांचे आणि गल्लीचे तोंड गोड करतो. कौतुकाचा अभिनंदनाचा वर्षाव केला जातो. मग ही आप्तेष्ट मंडळी नाष्टा, बिस्किटे घेऊन दवाखान्याकडे धाव घेतात. गलका वाढतो,मग लोकांना 'गर्दी करू नका ' म्हणत बाहेर काढावे लागते. आलेले लोक बाळाचे मुखावलोकन करून कुणा सारखं वाटतंय याचे संशोधन करत आडाखे लावत बसतात. एक बाई म्हणते 'आई वाणीच दिसतंय'...'न्हाई गं, नाक बघ …थेट बापावर गेलंय' असे दुसरी बोलते आणि पहिलीचे बोलणे खोडून काढते. मग तोंड भर हसत बाळाची आज्जी येते….तिने बालमुख पाहिले की बाळाला सोन्याची अंगठी द्यायचीच असते, तशी खास खानदानी परंपरा आहे. हरखलेली आज्जी/पणजी मग पुढचे वर्णन त्या नखाएवढ्या पोराला चिकटवते.  'बघा बघा कसं पाय तालात हालवतंय... 'आज्ज्या वाणी चपळ हाय,आई वाणी सुंदाट न्हाय…काका गत फुटबॉल खेळणार जनू !'  असं बोलते. एखादी आज्जी तर 'पैलवान हुईल बग त्ये ' असं भविष्य वर्तवते. मग बाळाच्या बापाची पेठेतली खास जिगरी दोस्त मंडळी येतात. बाळाला दारातूनच बघतात आणि '  आग्गा यायायाsss    रांxx….थेट तुझ्यावर गेलंया मर्दा…. तुझ्यावाणीच  हसतंय की बेणं ....'  अशी मुक्ताफळे त्या निरागस  जिवावर उधळतात. अत्यानंदाच्या भारात आपल्या टिचभर बाळाला याने शिवी दिली हे त्या नवबापाच्या गावी सुद्धा नसतं. 'पार्टी कवा...बारसं कवा ?' असे करत प्रेमळ मित्रमंडळ पांगते. असे हे कोल्हापुरी कौतुक शिवी शिवाय सुरूच होत नाही मुळी. त्याची सख्खी आज्जी सुद्धा ते बालक पृथ्वीतलावर येताच  त्याचे स्वागत चार शेलक्या शिव्या  प्रेमाने हासडूनच करते ! व्हिजिटला आलेले डॉक्टर ह्या ओव्या ऐकून गालात हसतच पुढे जातात. यांनी या हास्य फवाऱ्यासाठीच जणू हे प्रसूती गृह उभारलेले असते. बाकीच्या कोणत्या दवाखान्यात असे विनोद चालतात? गंभीर मुद्रा इथे चालतच नाही, जो तो आपापले वय विसरून  'अले ले ले...का ललु आलंय ? का ललू आलंय?' असे बोबडे बोलत त्या जिवाला खेळवत असतो. फुलांच्या पायघड्या घालून बाळाचे स्वागत केले जाते.


श्री. आनंदा म्हातुगडे, कोल्हापूर यांच्या सुकन्येचा स्वागत सोहळा 


हल्लीची स्मार्ट मुले जन्म घेताच मस्त प्रतिसाद देतात… पुढची पिढी 'थँक्यू डॉक्टर, थँक्यू बरे का सिस्टर '…असे म्हणाली तरी नवल वाटायला नको. आम्ही उत्क्रांतीच्या मागच्या शतकात पृथ्वीतलावर आलो…त्या काळात मुले डोळे महिनाभर उघडत नसत म्हणे… आता या गोष्टीवर विश्वास बसेना. ते बिचारे  बाळ बाहेर काढले,कुणाला दाखवले तर डोळे उघडणार ना ? त्या काळी बाळ बाळंतिणीला तीन महिने अंधाऱ्या खोलीत ठेवत बिचाऱ्याने पहावे काय त्या अंधारात ? फोटो काढले की मूल दृष्टावते असा समज असल्याने आमच्या पिढीत कुणाचेही बालपणीचे फोटो अस्तित्वातच नाहीत. आमचा जन्म तर मलकापूर सारख्या गावात घरातच झालेला. कुणाला फार कौतुक नसे मूल जन्मास आले की घराच्या तुळईवर तारीख लिहित ! सौ अमुक तमुकला पुत्र / कन्यारत्न जाहले असे लिहिले की मामला खलास.काहीवेळा दुपारचे बारा की रात्रीचे बारा लिहायला मंडळी विसरत तर कधी साल लिहायचे  गडबडीत राहून जाई. गुरांच्या गोठ्यात अशाच तारखा वासरू,रेडकू यांच्या जन्माच्याही लिहून ठेवत. ते कर्ते पुरुष तरी किती नोंदी ठेवतील? एकत्र कुटुंब असेल तर सावळा गोंधळ ठरलेलाच असे. कुणाची तारीख कोणती समजायची नाही. म्हणून आम्ही मास्तरांची बाळे झालो. शाळेच्या सोयीची तारीख कायमची चिकटून बसली ! बाराव्या दिवशी बाळास पाळण्यात ठेऊन नामकरण केले की विषय संपे. पुरुष मंडळीच काय दस्तुरखुद्द बालकाच्या बापाने सुद्धा त्या खोलीकडे तीन महिने ढुंकून पहाणे वर्ज होते. तसा सक्त मनाई हुकूम असे. अम्मल बजावणी करायला मुलीची सासू,आज्जे सासू जातीने तयार असत. तीन महिन्यांनी मान धरल्यावरच ते बाळ घरच्या लोकांच्या आणि बापाच्या नजरेस पडे. तोपर्यंत ते बालक काजळाने माखलेले डोळे, टाळूवर तेलाचे ओघळ, त्यावर लावलेले वेखंडाचे थर, मेणचट मुखकमल, गोंड्याची कुंची, झबलं असा अवतार काढून सुती कपड्यात घट्ट गुंडाळून ठेवलेलं असायचं. फक्त अंघोळीच्या वेळी त्याने लावलेला वरचा सूर इतरांच्या कानी पडे. बाळंतीण मुली बाळंतकाढे घेणे, डोळ्यात काजळ घालणे, डोके कान घट्ट बांधणे,गरम कपडे घालून शेक घेत बाजल्यावर बसणे आणि देतील ते खाणे इतकेच काम करीत असत. डिंक, हळीव , मेथीचे पौष्टिक लाडू खावेत. तुपात बुडवलेला शिरा किंवा मिरपूड घातलेला  मेतकुत भात लिंबाच्या लोणच्या बरोबर खावा आणि निवांत पडून रहावे ….असे सुख होते. ती बाईही आनंदाने ही सक्तीची विश्रांती घ्यायची. बायका दोन चार आपली मुले आणि नणंदा -जावांची मुले सांभाळून,थकून गेलेल्या असायच्या. ही अशी हक्काची विश्रांती घेऊन टुणटुणीत होऊन त्या नव्या जोमाने संसाराचे टक्के टोणपे खायला सज्ज व्हायच्या.



आमच्या मुलांपर्यंत काळ बदलत गेला आणि प्रसूती दवाखान्यातच होऊ लागल्या. पंचवीस तीस वर्षांपूर्वी कोल्हापूरात परांडेकर, नागावकर, थत्ते, ठकार अशी मोजकीच प्रसूतीगृहे होती. तुटपुंज्या मोबदल्यात या डॉक्टरांनी जनसेवा केली. दवाखाने अगदी साधे. स्पेशल रूम म्हणजे दोन बाळंतीण बायकांच्या मध्ये एक तकलादू अर्धे मुर्धे पार्टीशन किंवा चक्क पडदा! इकडचे बोलणे तिकडे खुशाल ऐकू जावे.. इतकीच काय ती प्रायव्हसी. तरीही डॉक्टर इतके तज्ञ आणि मायाळू की दवाखाने कायम हाऊसफुल्ल असायचे. परांडेकर बाई, ठकार बाई घाबरलेल्या गरोदर मुलींशी अगदी गोड बोलून धीर द्यायच्या. नागावकर बाई न चुकता जातीने रोज सगळ्या पेशंट जवळ जाऊन प्रेमाने विचारपूस करायच्या. या सगळ्या दवाखान्यातल्या नर्स बाळंतीण मुलींची खूप काळजी घ्यायच्या. एखाद्या खेड्यातल्या मुलीचा  डबा लवकर आला नाही तर तिला आपला डबाही खाऊ घालायच्या. त्यामुळे ही खरी खुरी प्रसूती गृहे होती, जिथे मुलींना माहेरा सारखी आपुलकी मिळे. डॉक्टर सतीश पत्कीनी तर अनेक वंचित स्त्रियांना मातृत्वाचा आनंद मिळवून दिला ते ही वाजवी पैशात. कोल्हापूरचे लोक जसे मनमोकळे तसेच दवाखाने जिव्हाळा देणारे आहेत. आता लाखो रुपये ओतून बाळंतपण होते … सांगून ही खरे वाटणार नाही की त्याकाळी एक हजार रुपयात बाळंतपण होऊन मुलगी सात दिवस दवाखान्यात राही. गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी हे डॉक्टर रात्र रात्र जागायचे, पण सहसा शस्त्रक्रियेने बाळंतपण करायचे नाहीत. काही लोकांकडे पैसे नसायचे… तरी गरिबांचे काही अडले नाही. या देवदूतांनी नाममात्र पैशात प्रसूती करून आपला धर्म पाळला. नंतर एक या दो बस सुरू झाले आणि बायका भलत्याच सुधारल्या. आपल्या पतीने पहिल्या पासून प्रसूतीगृहात बरोबर आलेच पाहिजे असा स्त्रीहट्ट काही लाडक्या राण्यांनी धरला. आता पुराणापासून आपल्या संस्कृतीत हे सांगितलेच आहे की बुवा माणसाने स्त्री हट्ट कधीही मोडू नये नाहीतर वनवास घडतो. बिचाऱ्या आदर्श पतीनी पत्नी बरोबर जाणे सुरू केले. कालांतराने ही फॅशनच होऊन बसली. यात काही डॉक्टर लोकांचा  ' हात ' आहे असे म्हणतात. का?...तर पुरुष लोकांना तिचा त्रास समजला पाहिजे ! आता त्याला समजून उपयोग काय ? तो कळा देणार आहे… की तिच्या कळा वाटून घेणार आहे? पण या मुळे पुरुष लोकांना जबाबदारीची जाणीव झाली हे मात्र खरे.हा नवा स्त्रीहट्ट नावारूपाला आला आणि एक से एक मजा अनुभवायला मिळू लागल्या.  


प्रसूती गृहात बायको बरोबर तपासणीला आलेल्या  पुरुष लोकांसाठी बाहेरच्या खोलीत बाक टाकलेले असायचे. आत सगळ्या बाया मिळून   काहीवेळा इतका दंगा करायच्या  की…'गप्प बसा गं sss..नंबर कुणाचाsss? '  अशा प्राथमिक शाळेतल्या सूचना वेटींग रुममध्ये घुमत असायच्या. दोन बायका जमल्या की काहीतरी  हितगुज करणारच ना ?  नंबरात दोन तीन तास सहज जायचे, मग कोणती सबला नारी इतका वेळ तोंड बंद ठेऊन बसेल ?? ? इकडे बाहेर बिचारे आदर्श नवरे थोडा वेळ तोंड गंभीर करून जांभया देत बसत  …मग सैलावत…. मग विडी काडीची चाचपणी... हळू हळू गप्पा सुरू…. 'कशाला आलो ?.. कंटाळा आला कधी येणार नंबर  ?...ही उगच भुण भुण लावती … झक मारली राव, लई कटकट…' असे बडबडू लागत. टपोर पोटे घेऊन बायका आत निवांत गप्पा मारत खिदळत बसायच्या आणि बाहेर हे बिचारे पकडुन आणलेले नवरे जांभया, आळोखे पिळोखे देत बसायचे. आत बसलेल्या भावी आया मधूनच उठायच्या आणि डुलत डुलत बाहेर जाऊन नवरा आहे का पळाला यावर नजर टाकून यायच्या. 'आता येईल लगेच नंबर …जाऊ नका कुठं ' असं सांगून त्याला दटावायच्या आणि आत येऊन एकमेकींना  टाळी देऊन हसायच्या. 'बघ की...एवढं पण सोसंना होय? ' म्हणत गुपचूप खी: खि:  करायच्या. बिचारे पतीदेव दर महिना किमान दोन तास तंगी द्यायचे. लाडकी बायको आणि अप्रुपाची मुले ...करतो काय ? त्यांची ही गोड पण कंटाळवाणी शिक्षा पाहून मला कधी कधी त्यांची दया येई. तरीही आजवर ज्या लाडक्या राण्यांनी  नवरा तिथे हक्काने नेण्याची प्रथा सुरू ठेवलीच आहे. त्यांना माझा जाहीर पाठिंबा आहे बरं ! तेवढी तरी कळ  नको का सोसायला?  ते तोंड बारीक करून तिथे बसलेले नवरे जरा कमी कोर्टात आणलेले कच्चे कैदीच भासतात!




ती जोडीने केलेली तपश्चर्या फलास येते आणि गोड गोजिरे बाळ जन्मास येते. पूर्वी दुसऱ्या बाळाचे जुने मऊ कपडे त्या बालकास घालत आणि  सुती कपड्यात गुंडाळून ठेवत.अगदी पाच दहा वर्षापूर्वी पर्यंत डायपरची फॅशन नव्हती. फार तर फार सुती लंगोट बांधत असत. आता मात्र पृथ्वीतलावर आगमन होताच तान्ह्या बाळास डायपर चिकटून जाते. अगदी फेविकॉल का जोडच जणू. अरेरे त्या बाळाला मोकळ्या अंगाने मुतायची सुद्धा चोरी! उच्चभ्रू माता पिता चोवीस तास त्याला डायपर मध्ये जखडून ठेवतात. हे पाहून आमच्या पिढीचा जीव कळवळतो, पण आम्ही बॅकवर्ड असल्याचा शिक्का नको म्हणून उगी रहातो. अरे जुन्या काळा सारखी डझनात मुले  असती तर …यात तुमची अर्धी कमाई सरली असती...आणि मग खाल्ले काय असतेत ? पणजीच्या सुती साडीची माया, मुलायमपणा थोडीच त्या डायपरला असणार आहे ? परत कचऱ्याची समस्या वाढत आहे याचे भान कुणाला? सगळे कसे स्टायलिश हवे जग बुडाले तरी चालेल असाही एक दृष्टीकोन. असो... कालाय तस्मै नमः म्हणावे आणि रग्गड पैसा खर्च करून मुले कशी परवडत कशी नाहीत हे ऐकवत बसावे.. एकच परवडेना म्हणत त्याला लाखो रुपये फी ओतून स्टायलिश बालवाडीत, शाळेत घालावे… या उपर आपण काय करणार? 


हल्ली सुबत्ता असल्याने सगळे कसे पॉश आणि सुंदर असते. या मॉडर्न जमान्यात घरात बाळंतीण आहे हे समजत सुद्धा नाही. पूर्वी बाळंतीणीला भेटायला गेलं की वेखंड, ओवा,धूप याचा एक संमिश्र गंध येई. कमरेस चांदीचा करगोटा,पायात वाळे किंवा छुम छुम वाजणारे पैंजण,कानात सोन्या मोत्याची मुदी आणि तीट लावलेले प्रत्येक बाळरूप अगदी यशोदेच्या तान्ह्या सारखे दिसायचे. वास्तविक बाळाला चोळून मोळून केलेला मसाज, अभ्यंग स्नान खूप आवडते. आमची मुले तर अगदी आनंदाने हुंकार देत अंघोळ करायची. जॉन्सन साबण आणि पावडर यांचा एक अनोखा गंध लेऊन बाळे झोपी जायची. फक्त त्या स्नानातली मजा घेणे त्यांना हळू हळू शिकवावे लागते. आता मात्र बऱ्याच पारंपारिक पद्धतीना तिलांजली दिली आहे. मसाज,तेल, गुटी,काजळ,तीट सारे काही हद्दपार झाले. हल्ली काही बाळांना सगळ्याचीच ॲलर्जी होते म्हणे! यामुळे अमुकच तेल तमुकच साबण असे फॅड आले आहे. हे पाहून घरात जन्म घेऊन सुद्धा आमची सगळी पिढी कशी काय बुवा जिवंत राहिली ??? बेसन पिठाच्या घासून घातलेल्या आंघोळीची ॲलर्जी कशी काय आली नाही? असा प्रश्न पडल्या शिवाय रहात नाही.


 वजन वाढते म्हणून काही मुली तूप,दूध,डिंक हळीव लाडू असले काही म्हणून खात नाहीत. नट्यांचे आदर्श घेऊन लगेच व्यायाम सुरू करतात हे पाहून नवल वाटते तसेच कौतुकही वाटते. माझ्या मातेने मात्र शेकड्यात डिंक लाडू करून माझ्या बरोबरच पहायला आलेल्या लोकांना देखील खाऊ घातले. त्या काळात चढलेले बाळसे नंतर ओसरते म्हणे…पण मी अजूनही टिकवून धरले आहे. आता प्रमाणात खावा...व्यायाम करा हे खरेच आहे पण त्या वेळी सात्विक आहाराने पोषण  होणे सुद्धा तितकेच महत्वाचे नाही का ? सात्विक खाणे नसल्याने काही मुलींना दूध येत नाही आणि याचे त्या मुलींना जराही वाईट वाटत नाही. लगेच बाळाच्या तोंडी बाटली लागते. अरे स्तनपान करणाऱ्या बालकाला आणि मातेला जे सुख प्राप्त होते ते शब्दात कसे व्यक्त करता येईल? मातृत्व म्हणजे फक्त मूल  जन्मास घालणे नाही तर आपल्या देहावर तो निरागस जीव पोसणे होय. वजन कमी करायला आयुष्य पडले आहे...पण स्तनपान करायला मोजकेच दिवस असतात याची जाणीव हवी. आमच्या काळीही फिगर बिघडते म्हणून स्तनपान नाही असा कित्ता काही उच्चभ्रू मुली गिरवत होत्या. पण नीर क्षीर विवेक धरून काही सूज्ञ मुली गुगल करून स्तनपान करतात, उत्तम रीतीने मुले वाढवतात आपलेही आरोग्य चांगले ठेवतात.आजचे हे चित्र खरंच दिलासादायक आहे. सारे काही प्रमाणात असावे हे मलाही पटते पण जुने पारंपारिक सगळेच चुकीचे आणि आताचे सगळे बरोबर असे मुळीच नाही. दोन्हीचा योग्य ताळमेळ असावा हे नक्की.



आता पूर्वीची वेशभूषा पहाता मला दोन्हीही रूपात बाळकृष्ण दर्शन देतो. गोंड्याचं टक्कुचं घातलेलं, काजळ भरले डोळे घेऊन, टूकू टूकू इकडे तिकडे बघणारं, घुंगुर वाळा वाजवणारं बाळ जितकं प्रिय तितकंच ससुल्याची कान टोपी घालून, किंवा हुडी शर्ट घालून,डायपर मध्ये बसलेलं मॉडर्न बाळही प्रीयच. बाळांचे आताचे कपडे फारच सुंदर आणि नेटके असतात. त्यासाठी नेटका पैसा खर्च करावा लागतो आणि माता पित्यास तो परवडतो हे ही खरेच. हल्ली बाळाच्या एका पोषाखाला हजारो रुपये लागतात.  हातात पैसा खुळखुळत असताना कोण हो ते मणी,मोती लावलेल्या कुंच्या शिवतो? कुणाला हवेत जुन्या साड्यांचे आज्जी पणजीने हातावर शिवलेले कपडे ? तरीही  हौसेने शिवलेली, विकत आणलेली टोपडी कायम डोक्याला वाकडीच बसतात. बाळाची आई कायम ते टोपडे सरळ करत बसलेली असते,एक तर हा कान उघडा रहातो नाहीतर तो ! यावरून एक छान आर्या आठवली…


'टोपी सुंदरशी सुरेख झबले अंगावरी घातले

आईने सजवुनिया कटीवरी ते गोजिरे घेतले

वारंवार बघे कटीकडे, ती टोपी करी नेटकी

बाळे खोड करी जननीची माया खरी चेटकी'


आज एकविसावे शतक सुरू आहे तरी ही अनादी काळाची चेटकी माया संपली नाही आणि संपणारही नाही. शतक कोणतेही असो जोपर्यंत धरतीवर मानव जातीचा वंश वाढणार आहे तोपर्यंत हा सृजनानंद अक्षय रहाणार आहे. कुरळे केश ल्यायलेलं बाळकृष्णाचं निळं सावळं रूप असो की मेरीच्या कडेवरचं सोनेरी केसाचं येशूचं बाळरूप, ते  प्रत्येक मनास मोहिनी घालतच राहील.  


सृष्टीच्या अगाध लीलेने प्रत्येक मानवाला वेगवेगळे रूप मिळाले. मातेच्या उदरात तिच्याही नकळत एक सुंदर शिल्प आकार घेत असते. कान, नाक, डोळे ,हृदय,मेंदू सारे अवयव बिनचूक तयार होऊन काम  सुरू करतात. पंचेंद्रिये सगळे संदेश मेंदूस पाठवतात, असे कुठल्या यंत्रास जमेल का ? म्हणूनच समर्थ याला  'नरदेह मोठे घबाड ' असे संबोधतात. मी काळा की गोरा….सुंदर की सामान्य याचा विचार करण्या पेक्षा मला माणूस म्हणून जन्माला घातलंस  या बद्धल आपण त्या अज्ञात शक्तीचे कायम ऋणी राहिले पाहिजे. ज्याला हा मानव देह मिळाला त्याचे आनंदाने स्वागत करायलाच हवे. बाकी कुठला प्राणी पोरे झाली म्हणून हजार फटाक्यांची आतषबाजी करतो का ?


चला तर मंडळी लोकसंख्या वाढीत आपण जगात एक नंबर मिळवणारच...पण येणाऱ्या पिढ्या सक्षम आणि सुशील माणूस होवोत एवढीच काय ती चराचराच्या रचनाकारास कळकळीची प्रार्थना करू.


रसिक वाचक हो… बायको बरोबर संधी मिळताच प्रसूतीगृहाच्या आनंदयात्रेवर अवश्य जा आणि कुटुंबातल्या भावी पित्यांना देखील वेटींग रूममध्ये बसायला लावाच! 


धन्यवाद


विजयश्री तारे जोशी

कोल्हापूर





टिप्पण्या

  1. मॅडम लेख छान शब्दात वर्णन केला आहे. जुन्या व नव्याचा सुंदर मिलाफ झाला आहे. असेच लिहित रहा. धन्यवाद व शुभ रात्री.

    उत्तर द्याहटवा
  2. खरंच वाचून आनंदयात्रा घडली.... एकूणच बाळंतपणातील बारकावे अचूक टिपले आहेत..



    खूप छान लेखन जयश्री भाषाशैली ओघवती आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -