गो गो गोवा..

एक पावसाळी दिवस





चिंब भिजलेले,रूप सजलेले ..बरसूनी आले रंग प्रीतीचे …असे गात वरुणराजा आमच्या करवीर नगरीत रास रंग उधळत आगमन करतो. खाऊन पिऊन तुस्त अशा रंगेल कोल्हापुरी पैलवाना सारखा याचा बाज असतो. सुरुवातीला …आपल्याला काय करायचंय? असा हुलकावणी देणारा हा कलंदर पाऊस नंतर दमदार बरसून मनसोक्त गोंधळ घालू लागतो. नकळत तो रांगड्या कोल्हापुर नगरीच्या प्रेमातच पडतो आणि मुक्काम पाच सहा महिने लांबवत नेतो.  झिम्माड पावसाच्या हुमदांडग्या प्रेमामुळे सह्यगिरीच्या छायेत निवांत पहुडलेला कोल्हापूर जिल्हा कायमच हिरवाकंच असतो. डोंगरांच्या अंगा खांदयावर खळाळणारे अवखळ निर्झर वर्षा ऋतू येण्याची जणू वाटच पहात असतात. इतकेच काय बाया-बापड्या सांडगे, पापड, शेवया वाळवत आभाळाकडं नजर लावून उसासे टाकत याची वाटुली पहातात. पुरुष मंडळी शक्य तितक्या कमी कपड्यात मंडळाच्या बाकावर ठाण मांडून पान सुपारीच्या संगे गप्पाष्टक रंगवत, जुन्या कथा सांगत पावसाच्या आगमनाची वाट पहातात. बालकांना उन्हाळ्याशी काही देणेघेणे नसते ती सुखाने भर उन्हात सायकली दामटत असतात. तरुणी मात्र घामाने मेकअप बिघडतो आणि उन्हाने सुंदर मुखकमल काळवंडते म्हणून धुसफूस करत त्याच्या नावाने खडे फोडत बसतात. वैशाख वणव्यात पोळून गेलेल्या समस्त जनतेला पावसाच्या आगमनाची आस लागते. रंकाळा तलाव हे कोल्हापूरचे सुखस्थान. दोन चार सणसणीत वळीव होऊन गेले की पोपटी हिरवाईचे अंगडे टोपडे घालून तो सर्वांना साद घालतो.रंकाळा आणि अंबाबाई पाहिल्याशिवाय कोणी कोल्हापुरी माणूस जगत नाही आणि पर्यटक सुखी होत नाही. ज्योतिबाच्या गुलालात नाहून गेलेले गुलाबी भक्तजन  पन्हाळा फिरून संध्याकाळी रंकाळा चौपाटीवर सांडलेले असतात.


परवा सायंकाळी एक सोनेरी चंदेरी कडा ल्यायलेला सावळा मेघ रंकाळयात वाकून स्वत:चे रुप निरखू लागला…आणि एक दोन दिवसात भेटीला येतो असे कुजबुजला. काल सायंकाळी पहाते तर काय त्या सावळयाने आपले इतर बालगोपाळ बोलावून घेतले आणि नील नभात मस्त पळा पळीचा खेळ मांडला! या खेळाला पवनाचे सुमधुर संगीत सूं ssss करत साथ देत होते.त्या दैवी संगीताच्या तालावर अवघी धरती नर्तन करू लागली. झाडे डोलू लागली. पक्षीगण बेभान होऊन नभांगणात विहार करू लागले आणि सुरेल गात आपापल्या प्रियेला बोलावू लागले. अवघा उल्हास आसमंतात भरून गेला. संसार करायला आसुसलेल्या पक्षिणी धन्याच्या हाकेला प्रतिसाद देत लाजत मुरकत या फांदीवरून त्या फांदीवर उडू लागल्या. हुलकावणी देण्याचा स्त्रीस्वभाव तिथेही दिसून आला. आढेवेढे घेतले की प्रेमाची खुमारी वाढते याची त्यांनाही उपजत जाणीव असावी. नरपक्षी कितीही  चांगल्या काड्या,मऊ पिसे घरट्यासाठी आणोत, मादीपक्षी चिर्र चिर्र.. कुरकुर करून त्यांना सतत झापतात. सारख्या त्याच्या कानापाशी कलकल करत टुमणे लावत बसतात. शांतपणे ऐकून घेणारे बिचारे नर असावेत असा आपला माझा कयास. दुचाकी वरून जाताना अनेक नारी मागे बसून बिचाऱ्या पतीदेवाचे असेच कान खाताना दिसतात. प्रणयाराधन करताना नर पक्षी जास्त वटवट करतात आणि घरटे बांधायची वेळ आली की मादी पक्षी अरेरावी करून त्याची परतफेड करतात. एकूण काय सृष्टीचे रहाट गाडगे ' अरे कारे' या तालावरच चालते. कोतवाल, चिमण्या, बुलबुल, साळुंक्या,दयाळ साऱ्या जोड्या मिळून कोलाहल करत होत्या. 




हे सजीव संसार कथा पाहून मनात हसत असतानाच समोरच्या वीज मंडळाच्या लोखंडी पेटीतून एकदम चित्कार ऐकू आले आणि पाहिले तर काय…त्यात खारू ताईंनी आपला संसार मांडलेला ! आत गवत अंथरले असावे त्याच्या काड्या बाहेर डोकावत होत्या. एवढ्याशा छिद्रातून तिची ये जा..लगबग सुरू होती. पिले चिक चिक आवाज करून इवल्या इवल्या काळ्याभोर मण्यासारख्या डोळ्यांनी वाकून बाहेरचे जग निरखत होती.  झुपकेदार शेपटीचे त्यांचे पिता दुरून आपल्या भरल्या कुटुंबाकडे नजर ठेऊन होते. पावसाच्या आगमनाची वार्ता देणारी धुंद कुंद हवा रंकाळ्याचे हिरवट निळसर पाणी डहुळत होती. त्या जलतरंगावर आरूढ झालेली काळी,शुभ्र, राखाडी बदके वारा नेईल त्या दिशेला डोळे मिटून निवांत जात होती. आपले डोके न चालवता बदकीण बाई देखील त्यांच्या सहचरांच्या मागे पावलावर पाऊल टाकून चालल्या होत्या… जणू काय त्या  'चलो दिलदार चलो.. चांद के पार चलो ' हे गाणे गुणगुणत होत्या. नभाची सोनेरी संध्याछाया जळात पसरली…आणि शांतपणे सारी बदके पश्चिमेच्या लालिम्यात बुडून गेली. हजारो वर्षे लोटली तरी आजही सावळा मेघ आपल्याला कालिदासाचा दूतच वाटतो. तसाच एक कृष्णमेघ  प्रियकराचा सांगावा घेऊन सरिता, सागर,डोंगरदऱ्या पार करत होता.  तो  सजल घन विरहाग्नित पोळणाऱ्या कोल्हापुरी प्रियकराचा संदेश त्याच्या प्रियेला द्यायला वायूवेगाने चालला होता. सोनेरी काठाचे उंची वस्त्र ल्यायलेले शुभ्र सवंगडी त्याच्या मागे पळू लागले. ओथंबून आलेले आकाश,झाडांशी मस्ती करणारा सुसाट वारा आणि अमृत धारांसाठी आसुसलेली धरती पाहून मनास एक अनामिक हुरहूर लागून राहिली आणि अंधार दाटून आला.




आज सकाळ पासून धुवांधार पाऊस बरसू लागला मृद्गंध आसमंतात पोहोचला. आसुसलेली धरणीमाता जलधारांनी तृप्त झाली. दुपारनंतर पाऊस थांबला... 'झाले मोकळे आकाश' असा देखावा तयार झाला.  पहिला वहिला पाऊस अनुभवलेला रंकाळा पाहायला संध्याकाळी आतुरतेने  उद्यानाकडे कूच केली. दारातच प्राजक्त फुलांनी धरतीला मोतिया रंगाचे केशरी अर्ध्य वाहिले होते, अजूनही तो मंद सुवास मृद्गंधाच्या कवेत बसून होता. सारी फुले अधोमुख होऊन  विखुरली होती…जणू काही मातेचा पापा घेणारी बालकेच. ते दृश्य पाहून देवकीच्या निरागस कान्ह्याची उगीचच आठवण आली. एका बंगलीच्या कमानीवर चढलेल्या जाईजुईच्या मोहक शुभ्र फुलांनी भुईवर पखरण करून कृतज्ञता व्यक्त केली होती. वाऱ्याने त्या इवल्या चांदण्या रस्ताभर पसरून टाकल्या होत्या. पुष्पासंगे मातीस वास लागे. फुले ओंजळीत घेऊन गंध श्वासात खोल भरून घेतला. पुढच्या चौकात टपोर काळी जांभळे भुईवर लोटांगण घेऊन आपल्या व्यर्थ जन्माचे मूक आक्रंदन करत होती. भुईवर निळ्या जांभळ्या रंगाची नक्षी उमटली होती. या उंचच उंच जांभळाचे घोस  फक्त पक्षी आणि मर्कटाना सुखवतात. सहजा सहजी हाती येत नसल्याने बरीचशी जांभळे खाली पडून टचकन फुटून वाया जातात हे पाहून मन हळहळते. या जांभळाचे घोस झाडावर पाहून समाधान मानावे आणि विकत घेऊनच खावेत असा काहीसा योग. जी तऱ्हा जांभळाची तीच तऱ्हा उंबराची… वास्तविक औदुंबर दत्त महाराजांचा आवडता औषधी वृक्ष. पण त्या बिचाऱ्या फळांना समाजात कोणते स्थान म्हणून नाही. त्याचा भाऊ अंजीर मात्र बाजारात चढा भाव खाऊन जातो आणि याचा खिसा कायम मोकळा..फक्त कावळेच काय ते आवडीने याच्यावर हक्काने बसलेले दिसतात आणि बाकीचे पक्षी देखील उगीच याची समजूत काढत अंगा खांद्यावर खेळतात. आम्ही लहानपणी उंबर खात होतो…पण कधी विकायला दिसली नाहीत. उंबरांच्या सड्याचा शेवटी चिखल होऊन माती अससी मातीत मिळशी असे सांगतो. अशा त्या तत्वज्ञानी बापड्या उंबरांचा तपकिरी चिखल अनेक ठिकाणी पसरला होता. 


रंकाळयावरील उद्यानात पडलेले सप्तरंगी फुला पानांचे सडे सकाळच्या पावसाच्या कथा सांगत होते. पिवळ्या धमक बहाव्याच्या फुलांनी धरतीच्या गाली ओली हळद लावून तिला हळदुली नवरी करून सोडले होते. जलधारांनी भिजलेल्या गुलमोहराच्या फुलांनी बागेचे एक सुंदर वळण लाल केशरी करून तिच्या कपाळी कुंकू रेखले होते. त्या सौभाग्यशाली लाल गालीचावर पाऊल ठेवायला अगदी नको नकोसे वाटू लागले. अनिलाच्या खट्याळ वागण्याने नाजूक  कांचन मस्त लाजली आणि तिच्या गडद गुलाबी पाकळ्यांनी लाजून भुईवर अंग टाकले असावे.. गुलाबी सडा त्या मुग्ध प्रणयाची साक्ष देत होता. फक्त रंगाचे सौंदर्य लाभलेली गुलाबी बोगनवेल मात्र कोपऱ्यात शांत उभी होती. तिची कागदी फुले जलाचे मोती मिरवत तशीच्या तशी वेलीवर डुलत होती. वाऱ्याच्या दंगा मस्तीने सगळी झाडे घुसळून टाकली होती. झाडांनी जुनापुराणा पर्णभार आनंदाने उतरवला होता. भुईवर सगळीकडे पोपटी पिवळ्या पानांची आरास मांडली होती. पांढरट दुधी फुलांनी, गुलाबी मण्यासारख्या नाजूक फळांनी वेडी चिंच बहरली होती..पायाशी फुलांची पखरण झाली होती. या चिंचेची कोवळी पाने… फुले… फळे सगळेच कसे मस्त आंबट चिंबट लागते. तो कोवळा मेवा खायला…बाल गोपाळ झाडाखाली रुंजी घालू लागले. वय विसरून मी ही ती नाजूक फुले,गुलाबी बाळचिंचा हळूच तोंडात टाकल्या.



इतक्यात तपकिरी रंगाची काळ्याभोर डोळ्यांची एक धष्टपुष्ट गोमाता आपले वय विसरून अल्लड किशोरी सारखी धावत बागेत घुसली! आम्ही घाबरून जीव वाचवायला इकडे तिकडे लपायला धावलो. ती मात्र आपल्याच नादात असल्याने  आमच्याकडे ढुंकूनही न पाहता तशीच हुंदडत पळून गेली.  ज्येष्ठ नागरिक आणि बालकांनी सुस्कारा टाकला. या आषाढ महिन्याच्या आगमनाने ती बिचारी आनंदून गेली असावी. काळ्याभोर म्हशी तशाच सुसाट धावत रंकाळयाच्या पाण्यात शिरल्या आणि डुंबत सायंशोभा अनुभवू लागल्या. गाई गुरांच्या गळ्यातील घंटा किणकिण करू लागल्या.सारे पक्षी तार सप्तकात कूजन करून पावसाच्या आगमनाचा आनंदोत्सव साजरा करू लागले. 


शालिनी पॅलेस जवळ नारळाची झाडे जटा पिंजारून वाऱ्याची मुजोरी सोसत उभी होती. त्या नारळाच्या झाडाच्या शेंड्यावर  भले मोठ्ठे स्थलांतरित पक्षी संसार मांडतात. ते देखील पत्रे घासल्या सारख्या आवाजात ओरडू लागले. तुझे माझे जमेना तुझ्या वाचून गमेना असे काहीसे यांचे संसार आणि शेजारधर्म असावेत. एकाएकी त्यांचे आवाज वाढले आणि दोन शेजारी भांडखोर पक्षी अगदी माणसांसारखे एकमेकांवर तुटून पडले. सीमावाद असावा किंवा एखाद्या मवाली नर पक्षाने देखण्या पतिव्रता पक्षिणीची छेड काढली असावी. पक्षी देखील आपल्या प्रियेकडे कुणी वाकडी नजर टाकलेली खपवून घेत नाहीत. असा हा टोकाचा वाद रंगात आला होता. खालून फिरत असलेले मनुष्यप्राणी आपल्या स्वभावा प्रमाणे त्यांचे भांडण थांबून पाहू लागले.  नारळीच्या टोकावरचे प्रकरण नजरेच्या टप्प्यात नसल्याने नाकही खुपसता येत नव्हते. हस्तक्षेप न करता लोक माना उंचावून भांडणाची मजा घेत होते. थोड्या वेळात तिथे बरेच प्रेक्षक जमा झालेले पाहून पक्षांनी मांडवली केली. शेवटी 'घर की बात घर में' असा समजुतीचा निर्णय घेतला की काय ते बाकी समजले नाही. 


तिकडे पक्षांचे काही का होईना…छत्रीचा आडोसा घेऊन लपलेल्या युगुलांचा प्रणय रंगात आला होता. इतक्यात तलावात पावसाचे बारीक तुषार उडाले, त्यावर सायंकाळचे गुलाबी किरण पडले आणि नभी इंद्रधनुचा गोफ तयार झाला! सगळे जण भान हरपून नभाकडे मान वर कर करून पाहू लागले. प्रेमी युगुले देखील प्रेमालाप करायचा विसरून त्या सप्तरंगात नाहून गेली. पावसाचे नाजूक सप्तरंगी जलबिंदू, अस्ताला चाललेले कोवळे सूर्यबिंब, चोहीकडे दाटून आलेली हिरवळ, पक्षांचे मंजुळ कूजन,बेधुंद वातावरण,झणाण वारा आणि हातात जोडीदाराचा हात…जगायला अजून काय हवं? कुणी तिच्या केसात विसावलेल्या जलबिंदूना कॅमेऱ्यात कैद करू लागले तर एखादा नवथर प्रियकर रोमँटिक होऊन तिला छत्रीत जवळ ओढू लागला. असा वातावरणात सगळी कडे एकदम उसळत्या तारुण्याचा साक्षात्कार होऊ लागला.  रोमँटिक तरुणाईकडे पाहणाऱ्या बालकांचे चित्त मातांनी गोड बोलून दुसरीकडे वळवले. 



चौपाटीवर भाजलेले कणीस,शेंगदाणे,भेळ वडे असे खमंग सुवास दरवळत होते. परत येताना कांहीं घरातून खरपूस भजी तळलेला वास आला. पदार्थाला पडलेल्या चरचरीत फोडणीचे,ओल्या मसाल्याचे गंध चित्त आकर्षित करू लागले. सकाळ पासून अनुभवलेल्या समग्र सुवासांचा क्षणात विसर पडला. भुकेची जाणीव झाली आणि सुग्रास अन्नाचा गंध शरीराला सर्वात जास्त भावतो याची साक्ष पटली. 

भजीचा मस्त बेत आखतच घराकडे मोर्चा वळवला.


विजयश्री तारे जोशी

कोल्हापूर

टिप्पण्या