- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चलो बॅग भरो निकल पडो.. एका शुभ सकाळी विणा वर्ल्डची सहलीची जाहिरात पाहून जिवास बरे वाटले. दोन वर्षे घरात बसून आलेला उबग क्षणात झटकला. नेहमी प्रमाणे ईशान्येस जावे की नैऋत्येस असा गदारोळ सुरू झाला. मीच वेड्यासारखी दोन तीन विभिन्न दिशांची स्थळे दाखवत होते. आमची लेक कायम आम्हाला घोड्यावर बसवायला टपलेलीच असते या वेळी उंटावर बसून शहाणे होतात का पाहूया असे म्हणून तिनेच निर्णय घेतला आणि झटक्यात संपूर्ण राजस्थान टूरचे बुकिंग करून टाकले. इतके पैसे घालवून वाळवंट पहायला कशाला जाता असेही कोणी म्हणाले. आयुष्यात एकदा तरी आपण त्यांचे जगणे आणि वागणे अनुभवायला नको का ? एरवी आपण आपल्या राज्यात सुखात जगतोच की. तरीही राजस्थानची दोन आठवड्याची सहल म्हणजे माझ्या पोटात गोळाच आला. तिथे फारच थंडी असते हे ऐकून मी 'अर्धे पाहू,अर्धे पाहू ' असा ठेका लावला पण काही उपयोग झाला नाही. लेक पैसे भरून मोकळी सुद्धा झाली. आता तुम्ही फक्त सहल एन्जॉय करायची बॅगही उचलायची नाही अशी प्रेमळ ताकीद देऊन टाकली. आम्ही कसं होईल काय होईल अशी धागधुग उरात ठेवत प्रस्थान ठेवलं.
दोन दिवसांनी तिकीट पहातो तर काय पहाटे साडे पाचचे विमान! ते पकडायला रात्री तीन वाजता मुंबई विमानतळावर जाण्यासाठी कूच करावी लागणार हे ऐकून आमचे धाबे दणाणले. असं रात्री अपरात्री आपण कसे जाणार या विचाराने झोप उडाली. गरम कपडे, शाल स्वेटर अशी जुळवा जुळव केली. दहा वेळा हे घेऊ ते नको करत बॅग पुन्हा पुन्हा उपसून भरली. एकदाचे मुंबईला दोन दिवस आधीच पोहोचलो. तशी विणा सहलीत भरपूर खाउ पिऊ घालते हे ऐकून होतो तरीही थोडा सुका मेवा, चॉकलेट पर्समध्ये टाकलीच. मुंबईचा एक तुळशी माळ गळा आणि कपाळी अबीर बुक्का असा सावळा विठ्ठल रात्री तीन वाजता बरोब्बर आम्हाला न्यायला आला. त्याचे प्रसन्न रूप आणि सात्विक बोलणे ऐकून मुहूर्त तरी बरा झाला म्हणून जीव भांड्यात पडला. विमानतळावर आत शिरण्यासाठी लांबच लांब रांगेत लोक जांभया देत उभे होते. तासाभराने आत प्रवेश मिळाला. रात्रभर जागरण झाल्याने झोप आणि जाग याच्या मधल्या पेंगुळलेल्या अवस्थेत दाराजवळ बसून राहिलो. काही हनिमूनला निघालेल्या नवविवाहिता आपल्या पतीच्या खांद्यावर मान ठेवून रोमँटिक पोझ देऊन अर्धोंमिलित नयनांनी बसल्या होत्या. आमच्या सारखी जुनी दांपत्ये एक तर गप्प बसली होती किंवा करवादत काही तरी विसरले असे एकमेकांच्या कानात कुरबुरत होती. काही अरसिक दांपत्ये पूर्व-पश्चिम तोंड करून पेंगत बसली होती. काही पुरुष नाईलाजाने बायकोने दंडाला धरून आणल्यासारखे तोंड करून बसले होते. पहाटे साडे चार वाजता एका अनुभवी रसिक गुजराथी कुटुंबाने खाकरे काढून कुर्र कुर्र आवाज करत खाल्ले आणि थर्मास मधील चहा देखील भुर्र भुर्र करत प्राशन केला. विमानतळावर सगळे महाग असते हे त्यांना बरोब्बर माहीत होते. एकूण स्वरूप एस टी स्टँडचेच होते. फक्त मराठीत फलाट क्रमांक सांगणारे कोणी नव्हते त्यामुळे थोडी शांती होती इतकेच. बाकी पोरांचे रडणे, रुसणे, फरशीवर लोळण घेणे यथासांग सुरू होते. आमच्या विमानाची घोषणा झाली, लोक पटापट उंदरासारखे त्या बिळात शिरले अन् विमान जयपूरच्या दिशेने झेपावले. उड्डाण करताच विमान पाण्यात पडले तर ते जॅकेट कसे फुगवा आणि उघडा याचे प्रात्यक्षिक हवाई सुंदरीने करून दाखवले. एका हुश्शार मुलाने त्या शांत सुंदर ब्रम्ह मुहूर्तावर, "आपले विमान पाण्यात पडणार आहे का गं आई? ती बाई काय सांगती?" असा केविलवाणा प्रश्न मातेस विचारलेला नेमका माझ्या कानी पडला… काळजात धस्सच झाले ! हे विमान कंपनीवाले न चुकता आकाशात उड्डाण करताच आपल्याला नश्वर देहाची जाणिव करून देतात ! उगीच तुम्ही जास्त उडू नका असा बारीक चिमटा त्या सुंदरी कडून काढून घेतात हो. तेजोनिधी सूर्य नारायण आकाशातून सोने उधळीत पूर्वेस आले. तो क्षण अनुभवताना त्या विद्वान बालकाच्या प्रश्नाचे विस्मरण झाले. काही महाभाग तेवढ्या तुटपुंज्या वेळात सुरात घोरू लागले! माझा भित्रा जीव मात्र नकळत मुठीत धरला गेला होता तो विमान जमिनीवर बसल्यावर सुटला!
जयपूर विमानतळावर आमचे स्वागत करण्यासाठी वीणा वर्ल्डचे ग्रुप लीडर दिनेश बांदिवडेकर आणि प्रशांत सकपाळ सुहास्य मुद्रेने उभे होते. त्या क्षणापर्यंत अनोळखी असे आम्ही पंचवीस लोक वीणाचे कुटुंबीय झालो. सहप्रवासी सर्व वयोगटातील होते. अगदी नवरंग उधळणाऱ्या नऊ जोड्या धमाल करायला सज्ज झाल्या. स्थल दर्शन घडवणारी सुसज्ज गाडी बाहेर उभी होती. सगळे लोक आत बसलो. गाडी काय सुटायचे नाव घेईना. मग लिडरनी बातमी सांगितली की एक बॅग मिळालेली नाही, गहाळ झाली. टूर लीडरची सत्व परीक्षा सुरू झाली. त्यांनी बरेच प्रयत्न करून माहिती मिळवली की बॅग मुंबईतच आहे आणि संध्याकाळ पर्यंत पोहोचेल. मग त्या जोडीने जयपूर येथेच रहावे आणि बॅग मिळाली की आम्हाला टॅक्सीतून गाठावे असा निर्णय घेतला. विघ्नहर्त्या गणेशा बरोबरच उंदीर मामा- मामी आणि चिचुंद्री मामीचा जयघोष करून गाडी मारवाडकडे रवाना झाली. गाडीत बसताच एका चिरतरुण दांपत्याने गाडीत आपल्या विवाहाचा त्रेचाळीसाव्वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. त्यांची उत्साही जोडी पाहून सर्वांच्या अंगात उल्हास संचारला. परदेशात इतकी मोठी मजल मारली म्हणून त्यांचे जंगी कौतुक झाले असते,मग आम्हीही टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या. चॉकलेट वाटप झाले आणि गाडी पुढे रवाना झाली. भरपेट नाश्ता करून रात्रभर जागलेली मंडळी गाडीत गाढ झोपली.
बाहेर दूरवर नजर जाईल तिथे रुक्ष भाग दिसे. कडुनिंब, वेडीबाभूळ एवढीच झाडे आणि काही चुकार पक्षी असा ओसाड निसर्ग. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या या भागात शेते उजाड भासत होती. बाहेर पाहताना सगळा राजस्थान असाच असेल की काय असे वाटून गेले. किल्ले, ठिकाणे खूप सुंदर आहेत हे माहीत होते. पदोपदी हिरवाकंच महाराष्ट्र पहाणाऱ्या आमच्या डोळ्यांना हा भूप्रदेश सुखवत नव्हताच. पहिला मुक्काम अत्यंत देखण्या अशा मांडवा या ठिकाणी होता. सुंदरशा नैसर्गिक चिरे मातीत बांधकाम केलेल्या गढी सदृश खोल्या दूर दूर अंतरावर होत्या. बाहेरून सध्या दिसणाऱ्या छोट्या हवेल्या आतून राजमहाला पेक्षा तसूभरदेखील कमी नव्हत्या. सगळीकडे काचाकवड्या लावून भिंती सजवलेल्या होत्या. शेण मातीने सारवलेल्या भिंती शुभ्र वेलबुट्टीच्या नाजूक चित्रांनी रेखल्या होत्या. प्रत्येक हवेलीत राज घराण्यातल्या राजबिंड्या मिशिवाल्या राजवंशियांचे तसेच तेजस्वी राण्यांचे फोटो लावले आहेत.तीन फूट उंच प्रचंड मोठ्ठा शिसवी पलंग आणि सगळे जुन्या काळातील फर्निचर, बैठक पाहून आपण जणू राजकन्या आहोत असा भास होऊ लागला. पलंगावर उडी मारूनच बसावे लागले! वीणामुळे असे राजवैभव आम्हाला पुढे अनेक हवेलीत अनुभवास आले. हे मारवाडी लोक भिंत,खांब,कोपरे नक्षीकाम करून भरून टाकतात. जिथे जिथे सपाट पृष्ठभाग दिसेल तिथे अगदी रस्त्यावरच्या कमानी वर देखील सुंदर वेलबुट्टी, मोर, पोपट यांची चित्रे काढली होती. अगदी बाथरूम जवळच्या इवल्याशा जागेत, बेसिनजवळ छतावर सुद्धा यांची पाने फुले स्वागताला आहेतच. यांच्या अफलातून आविष्कार पाहून आपण इतके गुंगून जातो की निसर्गाचा आणि मातीचा रुक्षपणा साफ विसरूनच जातो.
रात्र भर प्रवास करून ते बॅगसाठी रेंगाळलेले दांपत्य आम्हाला भल्या सकाळीच जॉईन झाले. त्यांनी सामानात पॉवरबँक ठेवली म्हणून विमानतळावर त्यांची बॅग जप्त केली असे समजले. त्यांनी अनेकदा तसा विमान प्रवास केला होता पण आता मात्र बॅग मिळवताना भुर्दंड सोसावा लागला. त्यांनीही तो सहजतेने सोसला. विणा वर्ल्डच्या लोकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील त्रास वाचला इतकेच. आम्ही सगळे हा प्रकार पाहून हादरून गेलो. अशी बॅग हरवली तर पंचाईत नको म्हणून एकमेकांच्या कपडे पॅकिंगवरून कितीही मतभेद असले तरीही दोन बॅग मध्ये दोघांचेही जरुरीचे कपडे असावेत अशी खूणगाठ बांधली. आपली बॅग जयपूर ऐवजी नागपूरला गेली तर करायचे काय? तिथे कुणाचे कपडे मागायचे? बॅग मिळाली आणि पहिला प्रश्न सुलभ सुटला.
वीणाबाईंनी या लीडर्सना छान तयार केले आहे हे बाकी कौतुकास्पद आहे. एक तर रोज आमच्या सारख्या सगळ्या बेशिस्त मंडळीना तसल्या थंडीत साडेपाचला उठवा, सात साडेसातला तयार होऊन नाश्ता खायला बोलवा हे सोपे काम नाही. बिचारे तीन तिनदा आम्ही उठलो की नाही याची खात्री करायचे ! तरी बरे फोन होते नाहीतर पट्टी घेऊन त्यांना मास्तरकीच करावी लागली असती. दोन्ही ड्रायव्हर सुद्धा अगदी छान तयार होऊन साडे सातला गूड मॉर्निंग करत बसलेले असायचे. कोणीही कंटाळलेले किंवा वैतागलेले दिसले नाही. पूर्ण पंधरा दिवस हा ताजेपणा टिकून होता. गाडी देखील दररोज चकाचक असे. तिसऱ्या दिवशी जैसलमेर मुक्कामी तंबूत शिरताना एक बाईं पडल्या आणि त्यांना चालणे कठीण होऊन बसले. पुढे दोन दिवस विणा वर्ल्डचे लोक त्यांना सगळे फुलासारखे जपत होते. दवाखान्यात धावपळ केली. शेवटी ऑपरेशनशिवाय त्या चालू शकणार नाहीत हे समजल्यावर त्यांच्या मुलाला कळवले. शेवटी त्यांना अहमदाबाद येथे पोहोचवायचे ठरले. रात्रभर टॅक्सीतून प्रवास करून त्यांना मुलाकडे काळजीपूर्वक सुपूर्त करून रातोरात प्रशांत माउंट अबुला परतला. पूर्ण रात्र जागून देखील दुसऱ्या दिवशी तितक्याच उत्साहाने जबाबदारी पार पाडत होता. असे उत्तम साथीदार आहेत म्हणूनच वीणा वर्ल्डचा हा नावलौकिक आहे हे मात्र खरे. कोणतीही संस्था नावारूपाला येण्यासाठी असे जबाबदार सहकारी असणे फार महत्वाचे. हे लोक संस्थेचे खरे झाकले माणिक आहेत.
रोज नवनवीन विषय देऊन गाणी, भेंड्या यात कसा प्रवास संपत होता समजतच नव्हते. दिनेशजीना छान मुलायम आवाज लाभला आहे. त्यांची गाणी ऐकली आणि नंतर हळू हळू सगळ्यांचे सुप्त गुण उफाळून आले. मंडळी अगदी रंगात येऊन मुक्त कंठाने साभिनय गाणी गाऊ लागली! दिनेशजीनी सर्वांना स्फूर्ती देऊन मजा आणली. प्रशांत आणि ते दोघेही उत्तम माहिती सांगत पुढील ठिकाणांची उत्सुकता वाढवत होते. आमच्या ग्रुप मधील मंडळीना हाताला धरून रस्ता पार करणे, औषधे आणून देणे अशी सगळी कामे दोघांनी लहान भावाप्रमाणे केली. सगळ्यात मजेशीर स्पर्धा एक ही शब्द इंग्रजी न वापरता अस्खलित मराठीत तीन मिनिटे बोलण्याची होती. या स्पर्धेत अपवाद वगळता आपण एक मिनिट अस्खलित मायबोली बोलू शकत नाही याची कटू जाणीव झालीच. रोज नवनव्या गंमतीमुळे सहलीत कंटाळा या शब्दाची आठवण झाली नाही.
सहल संपेपर्यंत सगळेजण कुटुंबाप्रमाणे एकमेकांना सांभाळत होते. अरवलीच्या पर्वत रांगांनी रंगीला राजस्थान मेवाड आणि मारवाड मध्ये विभागला आहे. एका बाजूला मारवाड सारखा ओसाड प्रदेश,जैसलमेर सारखे वाळवंट पसरले आहे. काही पिकत नाही म्हणून पोखरण अणू चाचणीसाठी निवडलेला प्रदेश. तर दुसऱ्या बाजूस मेवाडमध्ये अनेक सुंदर तळी अंगाखांद्यावर खेळवणारे उदयपूर,जयपूर शहर आणि हिरवागार सुपीक भाग! उदयपुरला सात सुंदर जलाशयांनी वेढले आहे. निसर्गाचे असे बदलत जाणारे विषम रूप पाहून आपण चकित होऊन जातो. उजाड माळरानावर सुरू झालेला प्रवास एकाहून एक सुंदर मयूरपंखी देखावे डोळ्यात साठवतच संपतो. वाटेत रणथंबोर सारखे अभयारण्य तिथले प्राणी आणि पक्षीगण मन मोहून टाकतात. राजस्थानी निळेभोर मयूर डोळ्यांचे पारणे फेडतात. सुंदर पिसारा ल्यायलेले टपोरे मोर अगदी घरावर, झाडावर मस्त पोझ घेऊन बसलेले दिसतात. तिथल्या मोरांना देवाने झुकते माप देऊन अत्यंत सुंदर रंग रूप दिले आहे. आपल्याकडचे मोर त्या मानाने बापुडवाणे वाटतात ...अगदीच खाल्ल्या घरचे वासे मोजतात. राजस्थानी चित्रात हा राजस मोर आवर्जून असतोच. हे सारे वैभव डोळ्यात साठवताना दिवस कसे सरले समजलेच नाही. डालबाटी, चुर्मा, मालपुवा, घेवर असे नानाविध राजस्थानी पदार्थ खाऊन रसना तृप्त झाली. किलोभर वजन वाढवून हसत मुखाने परतलो. इतके पंधरा दिवस काढले तरी ते राजस्थान पहायला कमीच आहेत. ही अपूर्णतेची गोडी मनात राहून गेली.
बॅग मोकळी करताना नेलेला सुकामेवा तसाच परत आलेला पाहून हसू आले. विणाबाईंनी असे सुंदर माहेरपण केले. विणा वर्ल्डने टोपी दिली नाही म्हणून आम्ही विषय उकरून टूर लीडरना बरेच पिडून घेतले. बिच्चारे हसत हसत विषय टाळायला पहायचे. यांचे पिवळेधमक शर्ट मैला वरून दिसायचे..मग आम्हाला यांनी शोधायला सोपे म्हणून तरी टोपी द्यायची! आमचा खट्याळ निरोप नक्कीच वीणाबाई पर्यंत गेला असावा अशी आशा…
पुढच्या टूरला टोपी, पाउच नक्की हवा असे सांगत आम्ही त्यांचा निरोप घेतला. हाताला धरून आमची नौका निर्धोक पार करणारे पाठीराखे लीडर्स, आम्ही उतरताना लक्ष ठेऊन काळजीने स्टूल पकडणारे ड्रायव्हर हे वीणाचे खरे वैभव आहे याची साक्ष पटली.
राजस्थानात अनुभवलेले मजेशीर रंगिले किस्से सांगण्याचा मनोदय आहे … मस्त फोटो व्हिडिओ युक्त प्रत्येक भाग अवश्य पहा.
रसिक हो ..वाचकांनी हा पहिला प्रवासी ब्लॉग कसा वाटला ते अवश्य सांगा आणि माझ्या लेखणीला स्फूर्ती द्या.. ब्लॉगवर खूप फोटो टाकता येत नसल्याने व्हिडिओ अवश्य पहा.
धन्यवाद
विजयश्री तारे जोशी
कोल्हापूर.
स्थान:
Kolhapur, Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Comment box -