- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
तुम्ही म्हणाल या वाळवंटात कुठले आले काश्मिर?
रसिक हो,फोटोतला हा सुंदर शुभ्र बर्फाच्छादित देखावा, गोठलेला नायगारा आणि मधोमध वसलेले परी राज्यातले नितळ निळे नयनरम्य सरोवर पाहून जीव हरकून गेला ना ?
हे चिंचेचे झाड दिसे
मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू दिसशी तू
नवतरूणी काश्मिरी
हे गाणे म्हणत प्रियेच्या मागे पळत मस्त व्हिडिओ काढावा असे प्रत्येक युवकाला वाटावे आणि आपल्या जिवलगा बरोबर लोळण घ्यावी अशी मनीषा प्रत्येक युवतीच्या मनात यायलाच हवी. इतके हे सुंदर ठिकाण. आमचे हे गोठलेल्या प्रपाता जवळचे निळाईने वेढलेल्या तळ्यातले सुंदर फोटो पाहून मला 'कुठे आहेस? कुठले ठिकाण?' असे अनेक मेसेज आले. राजस्थानच्या वाळवंटात हिला बर्फ कुठे सापडले कुणाला समजेचना ! मी पण फक्त मनात हसत.. मौन ठेवत सगळ्यांची फिरकी घेतली. बरं इतक्या थंड बर्फात हिच्या पायात साधी चप्पल आणि अंगावर ना स्वेटर ना कोट..हे कसं काय सगळ्यांना प्रश्न पडला.
मग मीच विचारले पहा नीट आणि सांगा... हे फोटो मानस सरोवराचे आहेत, काश्मिरचे आहेत का कॅनडाचे? … हे पेंगोंग लेक जवळचे फोटो आहेत असे अनेकांनी ठासून सांगितलं...फसलात ना??? आता मजा सांगते
जहां न जाये रेलगाडी
वहां जाये बैलगाडी
जहां न जाये बैलगाडी
वहां जाये मारवाडी!
ही तर मारवाडी कमाल आहे!
हे मारवाडी मनात आणतील तर कोणताही चमत्कार करतील याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे वाळवंटी काश्मिर. रसिक हो हे फोटोत दिसणारे चमकते बर्फ, म्हणजे चक्क संगमरवरचा वाया गेलेला चुरा आहे. राजस्थान मध्ये पुष्कर ते रणथंबोर मार्गावर किसनगड तेथे संगमरवर कोरून विविध वस्तू तयार करण्यात येतात. देव्हारे, विविध कमानी, खांब,मूर्ती, शोभेच्या वस्तू साकार करणारे परिसरात अनेक कारखाने आहेत. गुलाबी, काळे,पिवळसर पासून शुभ्र निळसर छटा असलेले संगमरवर येथे सापडते. या वाळवंटी प्रदेशावर उदार आकाश जलरुपी प्रेमाने बरसत नसले तरी भूमातेची अखंड कृपा आहे. तिच्या पोटात सापडणाऱ्या अनेक खडकांनी आणि खानिजांनी या प्रदेशाला आर्थिक सुबत्ता दिली आहे. विधात्याला सगळ्यांची काळजी आहे आणि तो एक दिले नाही तर दुसरे अनेकपट देतो याचे हे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे राजस्थान. बांधकामास संगमरवर वापरणे हे आपल्याकडे प्रतिष्ठेचे आणि श्रीमंतीचे लक्षण मानले जाते..तिथे मात्र बरीच घरे, हवेल्या संगमरवरी आहेत. इतकेच काय खूप ठिकाणी कंपौंडची भिंती देखील या शुभ्र, पिवळसर, आणि काळपट रंगाच्या वाया जाणाऱ्या संगमरवरी तुकड्यात बांधलेल्या आढळतात. शेतामधील बांधावर देखील मोठ्या प्रमाणात हे मौल्यवान दगड निवांत पडलेले दिसतात. आपल्याकडे संगमरवरी देवघर केले तर मालकाचा ऊर अभिमानाने फुलून जातो. ही फरशी तर अगदी राजे लोकांनीच बसवावी इतकी भाव खाऊन जाते. संगमरवरी वस्तू तयार करणारे अनेक कारागीर तिथे अहोरात्र कष्ट करून सुंदर मूर्ती कोरत असतात. या देखण्या दगडातला कोणताही कलाविष्कार अत्यंत नयनरम्य दिसतो. माउंटआबू येथे कोरलेली पांढरी शुभ्र दिलवारा मंदिरे नाजूक कलाकुसरीने सजली आहेत. छतावरचे बारीक सुबक कोरीवकाम पाहताना मान अवघडते . वेलींच्या पानावरच्या शिरा देखील हुबेहूब दिसतात. कमलदलावरचे दवबिंदूच काय त्यावर बसलेला भृंग देखील खरा वाटावा इतकी विलोभनीय कला. देव देवतांच्या मुखावरचे प्रसन्न भाव देखील दगडातून आकारास आणले आहेत. त्या महान कलाकारांनी सजीव वाटावी अशी संगमरवरी सृष्टी कलेतून निर्माण केली आहे. इतके सूक्ष्म तरल आविष्कार साकारायला त्या कलाकारांनी किती वर्षे कष्ट घेतले असतील ते देवच जाणे. जागतिक कीर्तीची ही मंदिरे आपला फार अमूल्य ठेवा आहे. हा शुभ्र पाषाण अशा कलात्मक नाजूक नक्षिकामा साठी सुयोग्य आहे म्हणूनच ताजमहाल देखील नितळ संगमरवरात बांधला गेला. मोत्या सारखा तेजस्वी संगमरवर हे राजस्थानचे सर्वात मोठे वैभव आहे. जितकं वय जास्त तितका संगमरवर अधिक तेजस्वी दिसायला लागतो हा दैवी चमत्कारच आहे. वर्षानुवर्षे लोटली तरीही ताजमहालचे तेजस्वी सौंदर्य तसूभर देखील कमी झाले नाही ते या चमत्कारा मुळेच. चंद्रकिरण देखील याच्या शुभ्रतेला चंदेरी आभा देऊन याचे सौंदर्य वाढवतात.
सूर्य किरण पडले की ते देखील परावर्तित करण्याची क्षमता या खडकात आहे म्हणून यात बांधलेल्या वास्तू अत्यंत देखण्या आरस्पानी दिसतात. जोधपूरचा मोती महल असाच मोत्या सारख्या चमकत्या संगमरवरात बनवला आहे. राजस्थानात अनेक इमारती शुभ्र आणि रंगीत संगमरवरात बांधल्या गेल्या.
संगमरवरी खडक आधी खाणीतून शक्य तितक्या मोठ्या आकारात बाहेर काढला जातो. मग हव्या त्या आकारात कापतात. मोठे खडकाचे भाग मशीनने कापताना त्याचा पिठासारखा शुभ्र भुगा पडतो. खडक कापताना फुटू नयेत म्हणून पाणी वापरावे लागते. पाणी आणि संगमरवरी शुभ्र भुगा मिळून लुसलुशीत पांढरा लगदा बनतो.अगदी आपल्या गणपतीच्या शाडू सारखा मुलायम असतो. रंगीत संगमरवर कापताना देखील असा भुगा पडत असेलच. ते गडद थर खाली दिसणार नाहीत असे वापरले असावेत. असा वाया गेलेला संगमरवराचा भुगा एके ठिकाणी जमा केला जातो. यातला शुभ्र भुगा नजाकतीने रचून आभासी बर्फाळ प्रदेश तयार करण्याची कल्पना ज्या कुणाला प्रथम सुचली त्याच्या कल्पकतेला त्रिवार वंदन. विणा वर्ल्डने हे वेगळे ठिकाण आम्हाला आवर्जून दाखवले म्हणून हे आक्रित जवळून अनुभवता आले. आमच्या समोरच त्या ठिकाणी शुभ्र भुगा घेऊन अनेक डंपर येत होते. काही लोक भल्या मोठ्या क्रेन ते कापसा सारखे दिसणारे ढीग एकत्र करून त्यांना हीमकड्यांच्या आकारात दाबून बसवत होते. सुरुवातीला या पडीक रेताड जागी ते ढीग आणून टाकले असावेत. कालांतराने दुरून दिसणारा ढीग चमचमत्या बर्फाचा आभास देतो हे समजले.. तसे या हुशार लोकांनी त्याला सुंदर आकार देऊन त्याचा हिमालय पर्वत केला. मधे पाणी सोडून हे कृत्रिम तळे देखील वसवले ! तिथे उभे राहिलो तेंव्हा खूप मस्त वाटत होते...जणू काही आपण बर्फाळ प्रदेशात उभे आहोत आणि समोर एक निळे सरोवर पसरले आहे असा भास होत होता. शेजारी काही घोडेही पर्यटकांना फिरवत उभे होते. हुबेहूब अमरनाथ यात्रेचा फोटो वाटावा असे दृश्य वाळवंटात साकारले होते. हा देखावा व्हिडिओत चित्रित करायचा प्रयत्न केला.
हे विस्मयकारी दृश्य पाहून डोळ्याचे पारणे फिटले..किंचित थंडीत तिथे काश्मिर खोरे अनुभवता येत होते. फक्त चिनार वृक्ष, बोटी आणि पहाडी धून यांचीच काय ती कमतरता होती. मला खात्री आहे की येत्या काही वर्षात किसनगड राजस्थानचे प्रचंड मोठे पर्यटन स्थळ होईल. त्या अवाढव्य बर्फाळ प्रदेशात कृत्रिम चिनारच काय सफरचंदाची झाडे लावून केशराचे मळेही फुलवतील. सुंदर सरोवरात कृत्रिम कमळे डोलवून राजहंस देखील सोडतील! आत्ता फारसे तिकीट नाही पण तेंव्हा मात्र बक्कळ पैसे मोजून आपण आत जाऊ आणि वाळवंटी बर्फाचे फोटो अमरनाथचे किंवा पेनगोंग लेकचे आहेत असे खुशाल सांगू. अरे मारवाड मे हर चीज बिकती हैं...क्यूँ की बिकनेवाला मारवाडी हैं.. तो शुभ्र चिखल बर्फ म्हणून दाखवून आपला व्यवसाय करत असतो. काही दिवसात तिथे बर्फातले स्वस्त दरातले सिनेमाचे शूटिंग सुरू होईल…नट नट्या प्रेमविव्हल होऊन एकमेकांच्या मागे धावतील किंवा लोळण फुगडी घालतील. मारवाडी त्यांच्या कडून छान पैसे उकळतील. हे उद्याचे चित्र मनात रंगवत आम्ही देखील तिथे उगीच स्टाईल मारत फोटो काढून घेतले. भर उन्हात किरण परावर्तित होऊन ते हिमनग छान चमकत होतेच म्हणून गॉगलही वापरला! त्या ठिकाणी इतके सुंदर फोटो येतील असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. तरी बरे आमच्यातल्या कुणी लावण्यवतीने त्या नील सरोवरात स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली नाही, अन्यथा ती नक्कीच गीत गाया पत्थरोने मधली शुभ्र संगमरवरी देवता दिसू लागली असती!
तिथेही पांढरे काळे रुबाबदार घोडे फिरवून हुशार पोरे आपला धंदा करत होती. सगळे कष्टाने आपली भाकरी कमवत होते. रंगिल्या राजस्थान मध्ये मंदिरा जवळ पैसे मागणाऱ्या धडधाकट बाया आणि छोटी मुले सोडली तर सहसा कोणी भीक मागत नाही.. पाव किलो वजनाच्या चांदीचे पैंजण,दागिने घालून पैसे मागत मागे लागलेल्या एका ललनेला आमच्या ग्रुप मधील हुशार मुलींनी दिव्य हिंदीत निरुत्तर केले. 'तुम जैसा पैंजण हैं क्या हमारे पास? ..तुम अमीर हो.. हम सब गरीब हैं..काय को भीक मंगती हो?.. जा कुछ काम कर'..हे अचाट हिंदी ऐकून ती सुंदर बाला लाजून पळूनच गेली!
राजस्थानी शक्यतो आपली एखादी कला सादर करून पैसे मागतील.कोण बुलंद आवाजात 'केसरीया बालमा.. पधारो म्हारो देश' असे म्हणतील तर कोणी सारंगी आणि दोन फरशीचे तुकडे वाजवत गातील. जिथे जावे तिथे कोणते ना कोणते वाद्यसंगीत कानावर पडतेच. बरं संगीत आणि आवाज इतका खडा आणि ताल पक्का की पर्यटक त्यांच्या प्रत्येक कलेला भरभरून दाद देतात. वय आणि वजन विसरून मनसोक्त नाचतात देखील! एक थेंब पाऊस न पाहिलेले अनेक भाग राजस्थानात आहेत.पंजाब कडून दान म्हणून मिळालेल्या पाण्यावर त्यांचे जगणे अवलंबून आहे. इतका रुक्ष भाग पण जगण्यातला आनंद रसिकतेने लूटताना दिसतात कोणीही तोंड लांब करून बसलेले आढळत नाही. ओसाड शेतकामात मग्न असलेल्या रंगीबेरंगी कपड्यातल्या सावळया सुंदरी लाजून गोड हसतात. छोटी मुले आपल्याला इतका निरागस हसरा टाटा करतात की त्यांच्या समाधानी जगण्यावर जीव ओवाळून टाकावा असे वाटू लागते. गाणी म्हणून,कला सादर करून पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करून पर्यटनावर चरितार्थ करणाऱ्या या लोकांचे अपार कौतुक वाटते.
महाराष्ट्र इतका सुजलाम सुफलाम आहे की काही नगण्य भाग वगळता पाण्याचे दुर्भिक्ष कुठेही नाही. सह्याद्रीच्या छायेत सगळे कसे हिरवेगार आबादी-आबाद आहे. तरीही रुक्ष वाळवंटापासून हिरवाई पर्यंत अनेक भूभाग असलेल्या राजस्थानात फिरताना मनात एक विरोधाभास प्रकर्षाने जाणवला की.. कुठे पाऊस जास्त पडला, कमी पडला म्हणून हताश होणारे आपण आणि कुठे ते पाऊस कसा पडतो माहीत नसलेले आनंदी लोक! ती रेताड रुक्ष भूमाता त्यांच्या समाधानी सुहास्य मुद्रेवर प्रसन्न होते. आपल्या पोटात दडवलेले सगळे हिरेमोती यांच्यावर उधळून टाकते आणि त्यांच्या पोटाची खळगी भरते. रेताड भूमाता त्यांच्या मुखावर आजन्म हास्य कोरत असावी. मोठ्या मोठ्या मिशाळ मुद्रा असलेले पहाडी आवाजाचे भारदस्त देहयष्टीचे पुरुष, नाकात भली मोठ्ठी रिंग, पायात चांदीचे तोडे, हातभर नव्हे दंडापर्यंत बांगड्या घालून, नाकापर्यंत ओढणी घेतलेल्या त्या हसऱ्या बाया आणि जन्मल्या पासून पैसे मिळवायला
धडपडणारी बोलक्या डोळ्यांची स्मार्ट बिट्टी पोरे काही केल्या नजरे समोरून जात नाहीत. सगळे भडक रंग यांच्या पेहरावात अगदी शोभून दिसतात. हा रंगवेडा राजस्थान आपल्याला त्याच्या लाल भडक-गुलाबी–पिवळ्याजर्द रंगात भिजवूनच टाकतो, त्याच्या संगीता वर नाचवतो आणि ' बन जा रंगीला रे.'.म्हणत त्या धुंद वातावरणात परत परत बोलवत रहातो.
धन्यवाद
विजयश्री तारे जोशी
कोल्हापूर
स्थान:
Rajasthan, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
Great
उत्तर द्याहटवाफारच सुंदर वर्णन केले आहे, पुढील लेखाची आम्ही वाट पहात आहोत..
हटवाखूपच सुंदर *किसनगड*, .....👌👌👌👌
उत्तर द्याहटवाकित्ती सार्थ वर्णन रंगिला ' राजस्थानाचं. असं वर्णन करायला प्रतिभाशक्ती लागते , ती तुमच्याकडे आहे हे भाग्यच. आणि आम्हाला ते वाचायला मिळतं आहे हे आमच भाग्य. तुम्ही खुप चांगल्या लेखिका आहात यात शंकाच नाही. लिहीत राहा.
उत्तर द्याहटवाछान माहीती... 👌👌
उत्तर द्याहटवाछान केलेत लिहिले ते..आता आम्ही पण जाऊ कधीतरी
उत्तर द्याहटवाApratim ,Sundar .varnan marvadi lokancha kuthehi pohchnyacha Ani kahihi khapynya chadhanda tar chalu asto rajstan firuon anles __chabuk
उत्तर द्याहटवाKhup chhan varnan kele ahes atta kharach rajasthan la jayachi ichya zali ahe
उत्तर द्याहटवा