गो गो गोवा..


येते चांदणे माहेरा, निजे सागरा कुशीत

माड घालतसे वारा,हसे किनारा खुशीत


मासे खात नाहीस तर कशाला जातीस गोव्यात? हे अनेकदा ऐकून घेते तरीही मला गोवा भुरळ घालतोच! संधी मिळताच मी गोव्याला पळते. खाया न पिया सिर्फ ग्लास तोडा या कॅटॅगिरीत राहूनही मन जल लहरीत रमते. गोवा म्हणजे तुडुंब मद्य प्राशन आणि चमचमीत मत्स्याहार हे चित्र बिंबले आहे. तरीही मला वाटते  Beauty lies in beholder's eyes म्हणजेच जो तो सौंदर्याचा आस्वाद आपल्या नजरेतून घेतो. वास्तविक गोवा हे भारताचे अथांग सागरात चमकणारे पाचूचे हिरवेगार बेट! विदेशी पर्यटकांना खेचणारे ठिकाण, आपल्या देशाचा अभिमान पण नाहक बदनाम झालेला प्रदेश. तिथले माडा पोफळीनी वेढलेले रंगीबेरंगी फुलांनी सजलेले वेगवेगळी वैशिष्ट्य मिरवणारे छोटे मोठे किनारे मंत्रमुग्ध करून टाकतात. डोळे उघडे ठेवून नुसते त्या निळाईत हरवून जा... घड्याळ.. कपडे… बाकीचे लोक, कशा कशाकडे लक्ष जात नाही. मद्याच्या थेंबालाही स्पर्श न करता सुद्धा हा निसर्ग पाहून बेधुंद गीत गात रहावे अशी या हवेत नशा आहे. थंडगार बोचरे वारे अंगावर झेलत मावळत्या नारायणाच्या साक्षीने  दर्यामध्ये तासनतास निवांत डुंबण्यातली मजा कधी संपूच नये असे वाटते. सागर आपल्याशी दांडगाई करून कधीच दमत नाही पण फेसाळ लाटा अंगावर घेऊन घेऊन आपला जीव दमतो, पोटाची जाणिव होते आणि अगदी नाईलाजाने बाहेर पडावे लागते. गोड्या पाण्याने स्नान करून हलके फुलके फुलापानांचे, नारळीची नक्षी असलेले कपडे घालून तिरावरच्या एखाद्या आराम खुर्चीत...बाकड्यावर अंग टाकले आणि वाऱ्याची झुळूक आली की स्वर्गसुख मिळालेच म्हणून समजा. हळू हळू सुरंगी सांज दाटून येते...आणि आकाशात तारका चमकू लागतात. चंद्राची कोर नभांगणी हसू लागते. अर्धोन्मिलित नयनांनी शांत पहुडावे आणि भावसमाधी लावावी. समोर लोकांचे मंद चंद्र प्रकाशात डुलणारा जलधी… हौशा गवशांचे अव्याहतपणे  चाललेले समुद्रस्नान... कोलाहल… संगीत… कशा कशाकडे आपले लक्ष जात नाही. अथांग सागराची गाज ऐकत मन शांत शांत होते. तिथेच ऑर्डर देऊन छानशी पोटपूजा करत करत लाटांचे नर्तन न्याहाळत  पडायचे. मऊशार वाळूत बांधलेले किल्ले, माणसांच्या पाऊलखुणा आणि सागराने चितारलेली नक्षी कितीही पाहिली तरी मन भरत नाही. संध्याराणीची चाहूल लागताच जहाजे किनाऱ्याला येऊन नांगर टाकून जलधीवर तरंगू लागतात. दूरवर लुकलुकणारे त्यांचे दिवे जणू साक्षात रत्नाकराच्या गळ्यात हिऱ्यांचा तेजस्वी हार घालून त्याचे सौंदर्य खुलवतात. तो रत्नाकर देखील हे कौतुक झुलत, हेलकावत स्वीकारतो.



गोव्यातली नितांत सुंदर स्वच्छ मंदिरे अपार मन:शांती देतात. फारशी कलाकारी, नक्षी, नाजूक कोरीवकाम तिथे नाही पण रंग संगती आकर्षक असते. हिरवाईमध्ये लपलेल्या प्रत्येक मंदिरासमोर उंच दगडी दीपमाळ शोभत असते. त्यात लागलेल्या तेजोमय पणत्या किती सुंदर दिसत असतील? हल्ली काही दीपमाळा विद्युत दीप लावून सुशोभित केल्या आहेत. नागेशी, मंगेशी, शांता दुर्गा, लक्ष्मी नारायण मंदिर अशी अनेक देवांची भव्य मंदिरे प्रेक्षणीय आहेत. इतकेच काय आजोबा, भूतनाथ आणि वेताळ देवाचे देखील मंदिर आहे! या वेताळाला चक्क चामडी छोटे चप्पल वहायचे… कारण गावाचे रक्षण करताना चालून चालून त्याचे जोडे झिजतात. प्रत्येक देवळाची वेगळीच कहाणी आहे. वनश्रीत, फुलापानात लपलेली ही मंदिरे डोळ्याला मेजवानी देतात. समुद्र एकच पण तिथला प्रत्येक किनारा वेगळा भासतो आणि वेगळीच अनुभूती देतो. या वेळी आम्ही मोर्जी (Morjim) आणि वागातोर (Vagator) किनारी राहिलो. मोर्जीचा किनारा छोट्या निरागस बालिकेसारखा लाजरा बुजरा, थोडीशी मस्ती करणारा शांत आणि प्रसन्न आहे. विदेशी गौरांगना, त्यांचे पिता इवल्याशा मुलांना कमरेला रंगीत टायर बांधून खुशाल पाण्यात सोडून डुंबायला शिकवतात. लाटा सर्वांना लडिवाळ गोंजातून मागे जातात… थोडासा सुद्धा धसमुसळेपणा नाही.  वागातोरचा किनारा मात्र ऐन तारुण्यातला बेधुंद, मस्तीत रंगलेला बंडखोर तरुण वाटतो. हा दंतूर किनारा आहे . लाटांनी काळ्याभोर दगडात सुंदर नक्षी कोरलेली आहे. किनाऱ्याभोवती  लहान मोठ्ठे दगड सागराला आव्हान देत उभे आहेत. भोवती गर्द नारळी पोफळीची झाडे, मध्ये स्वच्छ किनाऱ्यावर पाय पसरून बसलेले काळेभोर खडक आणि समोर अथांग सागर भान हरपून टाकतो. लाटा खडकावर आदळून घार…घुस…फुसस असे आवाज करत असतात. खडकावर फुटणाऱ्या फेसाळ लाटा आणि उडणारे जलतुषार अगदी आरती प्रभुंच्या कोंडुऱ्याची आठवण करून देतात. हा किनारा अवखळ आहे लाटा देखील मोठ्या  असतात… त्यामुळे जास्त  धाडस करू नये जपूनच पोहावे. 



वागातोरच्या नसा नसात मस्ती आणि धुंदी पसरली आहे म्हणूनच आजची तरुणाई सुद्धा अगदी रसिकतेने हा सागर किनारा अनुभवते.  गुजरात मधून एक मुलामुलींचा ग्रुप आपल्याच नादात जवळपास दोन तास बसकण मारून चिकाटीने काही तरी करत होता. शेवटी एकदम सगळे उठले तेंव्हा त्यांनी वाळू मधून साकार केलेला किल्ला दिसला! मोबाईल शिवाय दोन तास ती तरुणाई मस्त आपल्याच विश्वात दंग झाली होती. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारा हा सागर प्रेमी ग्रुप दर वर्षी गोव्यात येऊन अनेक किनारे पायी फिरत पहातो. हे ऐकून मला भारी कौतुक वाटले त्यात एक निलेश पाटील नावाचा महाराष्ट्रीय तरुण ही होता. माझा अतीउत्साह पाहून त्या मुलांनीही लगेच मला त्यांची आण्टी करून टाकले! माझी मुले आई काय हे … जाईल तिथे काय अनोळखी लोकांशी बोलतेस? म्हणून ओरडत असतात. पण एकदा आंटीची निर्मळ नजर कमावली की  कुणी परके वाटतच नाही. आंटीची भूमिका मला हल्ली आवडू लागली आहे… त्यामुळे मी सगळ्यांचा डोळा चुकवून तरुणाईशी निर्व्याज नाते जोडते. नाही पटले तरी त्रयस्थपणाने विचार करता येतो आणि आणि अनुभवी सल्ल्याचा डोस पण पाजता येतो. आजपर्यंत मला कोणताही वाईट अनुभव आला नाही…आपली नजर छान तर जग छान. त्या मुलांशी बोलताना त्यांचे फोटो मी माझे अगाध ज्ञान वापरून काढले आणि त्यांच्या रेखीव किल्ल्याला चिरंतन केले. नशिब बरे की फोटोत कुणाचे पाय किंवा डोके उडवले नाही. त्यानी बांधलेला किल्ला त्यांच्या स्थापत्य अभियांत्रिकी ज्ञानाची ओळख देत होता. रात्री येणाऱ्या लाटा तो किल्ला परत आपल्या कुशीत ओढून घेणार ….म्हणून का कुणी किल्ला, घर बांधायचे नाही? खरे होणार नाही म्हणून का स्वप्न पाहायचेच नाही ? अरे इथे काय शाश्वत आहे?... जिंदगी ख्वाब हैं हे गाणे उगीचच ओठांवर आले. अथांग सागर कुशीत अनेक चिमुकली मुलं, तरुणाई आपले उद्याचे स्वप्न वाळूत साकारतात शिंपल्यानी सजवतात. प्रत्येकाचं स्वप्न वेगळं तसं वाळूचं घर ही वेगळंच. आम्ही पूर्वी पायावर ओलसर वाळू लिंपून हळूच पाय बाहेर काढून घर करायचो …घर कसले? आदिमानवाची गुहाच असायची ती पण अफाट आनंद मिळायचा. आमच्या बुद्धीची झेप तेवढीच होती.आताच्या या मुलांनी उभारलेली घरे, किल्ले पाहून थक्क झालो. तरुणाई सृजनशील आहे खूप वेगळे आणि काही छान करू पाहते आहे हे दृश्य आश्वासक आहे. क्षणभंगुर  किल्ले, छोट्यांची छोटी छोटी घरे मनाला प्रमुदित करून गेली. ती घरे कवेत घेताना तो सागर देखील मनात हुरहूर वाटून या मुलांचे स्वप्न पूर्ण होवो असा आशीर्वाद  देत असेल. प्रेमाने जवळ येणाऱ्या सर्वांच्या पाऊलखुणा त्याच्याही हळव्या हृदयावर कोरल्या जात असतील ना?





किनाऱ्यावर सगळीकडे लोक खात पित आपापल्या परीने आनंद लुटत असतात. हॉटेल मालक भरमसाठ पैसे घेऊन का होईना म्हणेल त्या पद्धतीचे गरमा गरम जेवण देतात. मासे आणि सागरी पदार्थांवर ताव मारताना लोक अगदी तल्लीन होतात. मासे खाण्याचा अनुभव मी घेतला नाही पण लोकांच्या मुखकमलावर पाहिला. शाकाहारी माणसं असे देहभान हरपून क्वचितच जेवतात. आम्ही मोर्जीच्या सागर किनारी एका हसऱ्या पंजाबी स्मार्ट तरुणीचे हॉटेल पाहून ठेवले. ती अगदी मनापासून आम्हाला अगदी हवे तसे करून हौसेने खाऊ घालत होती. पंजाबातील या तरुणीने गोव्यात छान बस्तान बसवले आहे. ती उंची पुरी स्मार्ट सावळी बाला मला पाहता क्षणी आवडून गेली कारण बुलंद आवाजात ती सगळे कंट्रोल करत होती. कुणी नशेत आवाज वाढवला तर गचांडी पकडुन सहज वाळूत लोळवेल याची मला खात्री पटली म्हणूनच जास्त निवांत वाटले. तिथे प्रत्येक ग्रुप आपापल्या नादात असतो कोणी कुणाच्या फंदात पडत नाही की ढुंकून पहात नाही. मी मात्र आंटीच्या निर्मळ नजरेने सगळीकडे खुशाल ढुंकून पहात होते.🤪 अनेक तरुण तरुणींचे जत्थे वाढदिवस आणि  वेगवेगळ्या पार्टी साजरे करत होते. अगदी छोटी बाळे घेऊन आलेली तरुण जोडपीदेखील मनसोक्त धमाल करत होती. लहान मुले पालकांचे हात सोडून पुन्हा पुन्हा वाळूत लोळण घेत होती आणि कानात वारे शिरल्यासारखी यथेच्छ हुंदडत होती. सगळी कडून वाद्यांचे नाद .. गाण्याच्या ओळी… हास्य लकेरी आपसूक कानावर पडत होत्या. किनाऱ्यावरील कँडल लाईट डिनर रोज नवनवे अनुभव देत होते. परदेशी कुटुंबेदेखील कायमची इथलीच रहिवासी असल्या सारखी निवांतपणे विहरत होती. एकदा आमच्या अगदीच शेजारी मद्यपान करून झाल्यावर दोन उच्चभ्रू तरुणी दात ओठ खात एकमेकींवर तुटून पडल्या! त्या दोघींचे काय बिनसले ते बाकी समजले नाही हिंदी इंग्रजीतून फैरी झडत होत्या . ग्रुप मधल्या इतर तरुणांनी वेळीच हस्तक्षेप करून ते भांडणं सोडवले आणि तरुणी तणतणत तिथून रवाना झाल्या. अन्यथा मला सागरतिरी लेडीज डब्लू डब्लु एफ मॅच विना तिकीट पहायला मिळाली असती 😝😝😝 खूप दिवसांनी बायकांचा बाका प्रसंग पाहून मजाच वाटली... आसपासचे सगळे तरुण मात्र मनसोक्त हसत आपापली पार्टी न भांडता अनुभवत होते.😄 मला अभिजात भांडणं कलेचा दुरून आस्वाद घ्यायला खूप आवडते तो मी घेतलाच. त्या दिवसाची सुरुवातच भांडणाने झाली होती. भल्या सकाळी वागातोरच्या किनाऱ्यावरून त्याच्याशी सलग्न छोटा वागतोर किनारा पहायला गेलो. खूप चालून दमल्यावर तहान लागली. मी एका बाईकडे सहज नजर टाकली आणि दुसऱ्या बाईकडे शहाळे घेतले…आणि… गोवेकर नारींची चांगलीच जुंपली! मी नजर टाकलेल्या बयोला वाटले की दुसरीने तिचे गिऱ्हाईक ओढले. ती अस्सल  भांडकुदळ असल्याने दुसरीवर तुटून पडली. एकीकडे ती कजाग बाई विरुद्ध मी शहाळे घेतलेली बाई अधिक तिचा नवरा असा सामना रंगला. अर्थातच भांडकुदळ बाईचे पारडे जड होते ती एकटी या दोघांना पुरून उरली. मला कशाला तिथे शहाळे घेतले असे झाले… कसे बसे पिऊन टाकले. दहा मिनिटात गोव्याच्या अस्सल गावरान भाषेची झलक पाहिली. आमच्या पती देवाने मला कळीचा नारद ठरवून टाकले! त्या गोड कोकणी भाषेत देखील इतक्या इरसाल शिव्या आहेत हे ज्ञान प्राप्त झाले…. सुरुंगाची वात पेटवून तिथून हळूच काढता पाय घेतला आणि दिवस भर ते आठवून हसलो. त्याच रात्री उच्चभ्रू भांडण कला पाहून तर डोळ्याचे पारणेच फिटले. एकूण नारी शक्ती मोकळ्या हवेत मन भरारा मोकळे करते हे बाकी खरे…कोकणात उगीच कुणाशी भांडणाचा नाद करू नये नाहीतर वाळूतच शरणागती होणार हे नक्की. 



गोव्याचे रस्ते इटुकले  पिटुकले आहेत पण कुठेही ट्रॅफिक जाम नाही की जीवघेणे सिग्नल नाहीत.  एवढ्याशा नागमोडी गुळगुळीत रस्त्यावरून गाड्या सुसाट धावत असतात याची कमाल वाटली. आमच्या महाराष्ट्राला देखील समुद्र किनारा लाभला आहे पण त्या मानाने रस्ते आणि पर्यटन विकसित नाही. आपला कोकण किनारा नितांत सुंदर आहे…थोडासा व्यापक दृष्टीकोन ठेवून पर्यटकांचे आदरातिथ्य केले पाहिजे. त्यांना मनसोक्त खाऊ पिऊ घातले तर नक्कीच लोक आकर्षित होतील. गोव्याला चांगला पर्याय कोकण देऊ शकते आणि आपल्या मुलांना चांगला व्यवसाय मिळेल. मुंबईची वाट धरावी लागणार नाही. असा विचार मनात डोकावला कारण लोक गोव्यात येऊन प्रचंड पैसा खर्च करतात आणि कोकणात उसळ पाव, चिवडा या शिवाय काही मिळत नाही. विदेशी पर्यटक गोव्यात तळ ठोकून बसतात. सायंकाळ झाली की तिथला दिवस सुरू होतो. शामरंगात किनारा बुडतो आणि कंदिलाच्या काचेखाली  मेणबत्तीची ज्योत तेवते. त्या मंद पिवळसर प्रकाशात फक्त आपलेच विश्व तेजोमय आणि बाकीचे जग धूसर मोह नगरी भासते.  सागर लहरींच्या संगीतात सगळे आवाज मिसळून लुप्त होत जातात. तिथल्या हॉटेल मालकांनी लोकांच्या दिमतीला अनेक परप्रांतीय मुले ठेवली आहेत. काही नेपाळी वाटतात तर काही अगदी उत्तर प्रदेश, बिहार मधून आली आहेत. ऑर्डर घे… पाणी आण...जेवण आण....हे आण..ते आण.. करत सगळ्यांच्या तालावर नाचत असतात. बिचारे पायांचे तुकडे पडेपर्यंत पळत सर्व लोकांचे विविध हट्ट हसऱ्या चेहऱ्याने पुरवत असतात. दोन चार महिने राहून, मिळेल ते खाऊन, हॉटेलच्या दारात झोपतात. रात्री अपरात्री पर्यंत सगळ्यांची सेवा करून चार पैसे गाठीला बांधून सिझन संपला की परत जातात. सकाळी फिरायला जाताना यांची दमलेली मुटकुळी  हॉटेलच्या दारात पडलेली दिसतात. ज्या वाळूत चालायला कष्ट पडतात त्या मऊ वाळूत पळून पळून इतकी दमणूक झाल्यावर बिचारे कसे लवकर उठतील? यांनी फक्त लोकांची चैन आणि विलास पाहायचा...मिळेल ते गिळायचे जागा मिळेल तिथे रात्री अंग टाकायचे, अन पुन्हा गावी परतायचे एवढेच काय ते नशिब. त्यांचे अपार कष्ट पाहून आम्ही रोज प्रत्येक वेटरला छान टीप दिली.... त्यांच्या डोळ्यातला आनंद खूप सुख देऊन गेला. 

निर्भेळ आनंद मिळवायला मद्य कशाला हवे??? असे सुखाचे चांदणे अनपेक्षित कुणाच्या ओटीत घालावे. आनंदाचा धक्का कुणाच्या नजरेत दिसला की चांगुलपणाची मस्त नशा चढते आणि ती खूप मन:शांती देते...

कर के तो देखो...😄😄😄


विजयश्री तारे जोशी

रसिक गोवेकर😂🤷‍♀️ 

३.१२.२२




तळ टीप:

तुमका आवडलो आसात माझो ब्लॉग तर नक्की लाईक करा आणि तुमच्या बरोबर माका पण आनंद देवा. त्येका काय पैशे पडणत नाय!


टिप्पण्या

  1. गोवा अवर्णनीय आहेच...तुम्ही त्याच्या सौंदर्याला अजुन खुलवले. अप्रतिम लेख पुन्हा पुन्हा वाचावा इतका सुंदर झालाय.गोव्यात बसल्यासारखे वाटले. पुढील लेखासाठी लाख लाख शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. माझ्या नजरेतून गोवा जसा दिसतो...तसे सांगितले इतकेच. तुमच्या प्रतिक्रियेसाठी मना पासून धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा मला प्रेरणा देतात.
      विजयश्री

      हटवा
  2. माझ्या गोव्याच्या भूमीत
    गड्या नारळ मधाचे
    कड्या-कपाऱ्यां मधुन
    घट फ़ुटती दुधाचे !!
    माझ्या गोव्याच्या भूमीत
    आंब्या-फ़णसाची रास
    फ़ुली फ़ळांचे पाझर
    फ़ळी फ़ुलांचे सुवास!!
    माझ्या गोव्याच्या भूमीत
    वनश्रीची कारागिरी
    पाना-फ़ुलांची कुसर
    पशु-पक्ष्यांच्या किनारी!!
    माझ्या गोव्याच्या भूमीत
    उन्हाळ्यात खारा वारा
    पावसात दारापुढे
    सोन्याचांदीच्या रे धारा!!
    माझ्या गोव्याच्या भूमीत
    येते चांदणे माहेरा
    ओलावल्या लोचनांनी
    भेटे आकाश सागरा!!
    माझ्या गोव्याच्या भूमीत
    चाफ़ा पानाविण फ़ुले
    भोळा भाबडा शालिन
    भाव शब्दाविण बोले!!
    माझ्या गोव्याच्या भूमीत
    गडे साळीचा रे भात
    वाढी आईच्या मायेने
    सोन-केवड्याचा हात!!
    माझ्या गोव्याच्या भूमीत
    सागरात खेळे चांदी
    आथित्याची, अगत्याची
    साऱ्या षडरसांची नांदी!!
    – बा. भ. बोरकर

    माझ्या गोव्याच्या भूमीत,
    गड्या नारळ मधाचे कड्या-कपाऱ्यां मधुन घट फ़ुटती दुधाचे !!
    माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या-फ़णसाची रासफ़ुली फ़ळांचे पाझरफ़ळी फ़ुलांचे सुवास!!
    माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पाना-फ़ुलांची कुसरपशु-पक्ष्यांच्या किनारी!!माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा
    पावसात दारापुढे सोन्या चांदीच्या रे धारा!!
    माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा,
    ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा!!
    माझ्या गोव्याच्या भूमीत चाफ़ा पानाविण फ़ुले
    भोळा भाबडा शालिन भाव शब्दाविण बोले!!
    माझ्या गोव्याच्या भूमीत गडे साळीचा रे भातवाढी आईच्या मायेने सोन-केवड्याचा…

    -बा. भ. बोरकर...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अरे व्वा...रसिक वाचकांना तुम्ही ही पर्वणी दिली आहे. बोरकर गोव्याचे होते त्यांचे कोकणावर अतोनात प्रेम म्हणून बऱ्याच कविते मध्ये त्यांनी कोकण अमर केले आहे.
      ब्लॉग वाचताना ही नादमय कविता खूप आनंद देईल. दोन्ही कविता तिथे अनुभवायला मिळतात.
      मनापासून धन्यवाद
      विजयश्री

      हटवा
  3. श्री, गोवा मुळातच नितांत सुंदर! त्यात तुझ्या शब्दांचा शृंगार तो ल्यायला! तर दुग्ध शर्करा योगच! किती सुरेख वर्णन करतेस ग तुझी लेखणी. जे वाचून आपणच तेथे आहोत अस वाटत! आणि त्यानंतर तू ह्यावेळी तर छान सूचनाही केली तुझ्या लेखामध्ये! खरच कोकण अस उत्तम पर्यटन स्थळ निश्चित होऊ शकत!
    नेहमीप्माणेच खूप खूप छान लेख.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद...अगदी राहवले नाही म्हणून लिहिले बघ. सुंदर अनुभव घेतला आणि तो आनंद चार जणांना वाटला की बरे वाटते. बाकी कोकण कर लोकांनी मनापासून खाऊ घालायला शिकले पाहिजे तरच पर्यटन वाढेल...लोक पैसे उधळत असतात ग...पण आपण त्यात संधी शोधली पाहिजे. गुजराथी लोक बघ जाईल तिथे धंदा करत असतात.
      तुमची दाद ऊर्जा देते.

      विजयश्री

      हटवा
  4. Agadi saaras ani agadi khara aahe ki kashala kharcha karun jave foreign la kar aamchya

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण ब्लॉग वाचून आनंद घेतला की लेखनाचं सार्थक झाले. धन्यवाद
      विजयश्री

      हटवा
  5. Agadi saaras ani agadi khara aahe ki kashala kharcha karun jave foreign la jar aamchya deshyataach yevda sundar nisarga aastana.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपल्या देशात विदेशी लोक येऊन अगदी कमी खर्चात मजा करतात. दुबई सिंगापूर खूप महाग आहेत परवडत नाहीत. आपल्याकडे खूप काही चांगले आहे याची जाणीव ठेवून ते सारे स्वच्छ ठेवले पाहिजे.
      धन्यवाद
      विजयश्री

      हटवा
  6. Madam khup khup Sundar lekhan kele ahe.Nonvege Bina khata,Beear na ghetasuddha Anand lutata yeto he tumhi siddha kele ahe.Mahilanche bhandanache varnantar mahilena shobhnarech ahe.Up,,Biharche mulanche varnan tar yogyach kele ahe,Goa Sundar ahech,pan tumhi barobar hubehub varnan kele ahe, Chhanch,From.J P Sangrulkar

    उत्तर द्याहटवा
  7. जे पी. तुम्हाला आनंद मिळाला...यात माझ्या लेखाचे सार्थक झाले. आता कोकण पर्यटन तसेच तुमच्या शेतात कृषीपर्यटन करून इथे रोजगार निर्मिती झाली पाहिजे.
    धन्यवाद
    विजयश्री

    उत्तर द्याहटवा
  8. जयश्री,खुपच सुंदर वर्णन .आमचा देव गोव्यात असल्यामुळे आमचं वरचेवर गोव्याला जाणं होतं.मी हे सगळं अनुभवलं आहे..माझी आई पण कोकणी असल्यामुळे पहिल्यापासुन कोकणाविषयी प्रेम आहेच.. ..तरी पण तु केलेले वर्णन वाचुन तर आताच गोव्याला जावेसे वाटत आहे.... सुंदर शब्दांत वर्णन केले आहेस..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मना पासून धन्यवाद सखी...कोकणी लोक प्रेमळ आहेत पण सगळे तरुण मुंबईला पळते म्हणून मनुष्य बळ कमी पडते आणि कोकण विकास होत नाही. हे दुष्ट चक्र थांबले पाहिजे असे मनापासून वाटते बघ. इतक्या जवळ आहे तर आपण सारखे कोकणात तरी जाऊन...मजा करायलाच हवी. लगेच चल मी पण येतंय

      हटवा
  9. गोवा सुंदर आहेच. पण आपले कोकण पण सुंदर आहे. Nagaon बीच अलिबाग जवळ फार सुंदर आहे. पुण्या पासून 150km.mazya saduche resort आहे. जरूर visit कर. बाकी ब्लॉग अतिशय उत्तम. लगेच Goayala जावेसे वाटले

    उत्तर द्याहटवा
  10. अल्टिमेट पोस्ट!
    गोवा डोळ्यासमोर परत उभे राहिले...
    😊

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -