गो गो गोवा..

पूर्वरंग दिवाळीचे !!

दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे.
‘या नागदेवताsss, या मच्छिंद्रनाथाsss 
 कुडबुड कुडबुड........कूडss’

अश्विन पौर्णिमा झाली की  मलकापूरला कडक्याची थंडी पडे. त्या गुलाबी गारठ्यात एक ‘पिंगळा’ भल्या पहाटे अवतरे. पहाटे पाच ते साडे-सहापर्यंत गावात या एका डमरूसारख्या वाजणाऱ्या 'चिडबुडे' नावाच्या वाद्याचा घंटेच्या टण-टण साथीने गूढ आवाज घुमायचा. पिंगळा मुक्तकंठाने  वरील लोकगीत  गाताना सारा गाव जागे करायचा. ते वाद्यही मस्त घुमायचे. ही खरंतर आमच्या आमच्या साखरझोपेची वेळ त्यामुळे पिंगळा हा माणूस असून तोच हे आवाज काढतो हे मला जरा मोठी झाल्यावरच समजले, तोपर्यंत तो एक देवदूत असून फक्त पुण्यवान लोकांना दिसतो असे वाटे.😛 घुगरदऱ्यांच्या फॅमिली कट्टयावर तो पिंगळा चहा पिताना पहाडी आवाजात पहाटगप्पा करायचा. कांचन घुगरदरेने त्याचे सांगितलेले अचूक भविष्यवाणीचे महात्म्य आणि बहारदार वर्णनं ऐकून एकदा भल्या पहाटे उठून, त्याचे याची देही याची डोळा दर्शन घेतलेच. पावणेसहा फूट उंचीचा, रापलेला दणकट देह, धोतर, पैरण, त्यावर काळा कोट, डोक्याला लाल मुंडासं खांद्यावरून मागे सोडलेल्या घंटेचा टण-टण आवाज, पायात कर्र कर्र वाजणाऱ्या वहाणा आणि हातात त्याचे स्पेशल वाद्य असा जामानिमा असे या पिंगळे  महाराजांचा. चिडबुडं  वाजवत, खणखणीत लोकगीत म्हणत, घंटेच्या तालावर हे महाशय चालायचे. बरोबर दिलेला शिधा गोळा करायची झोळीही असे. हा पिंगळा देवांची नावे घेता घेता भविष्यपण सांगायचा! लोक भक्तिभावानं त्या देवदूताच्या पाया पडायचे आणि सुपातून धान्य देऊन भविष्य विचारायला अधीर व्हायचे. एका सखीला कायमच पास होण्याची चिंता लागलेली, ती दरवर्षी त्याच्याकडून ‘बाळ तू पास व्हणार’ असे न चुकता वदवून घ्यायची. मी सूर्यवंशी असल्याने तसे वदवून घेणे मला जमायचे नाही आणि मग निकाल येईपर्यंत हुरहूर लागलेली असायची. मग घरच्यांचे ‘अभ्यास करायचा होतास गप्प… लागली भविष्य विचारायला’ हे ऐकून घ्यावे लागायचे.😅 आमच्या एका बंधूने घरच्यांची नजर चुकवून पिंगळ्याला पास होण्याबद्दल विचारले. तो म्हणाला ‘ बाळ तू लै हुश्शार हायस, डागदर (डॉक्टर) व्हशील.’.. झाले...खुशीने ऐन दिवाळीच्या दिवशी त्याने अंगातला नवा कोरा शर्ट काढून आनंदाने त्याला दान केला आणि कुडकुडत घरी आला. ऐन दिवाळीत उघड्या अंगाला चौदावे रत्न लागले!!! वर पुढचे वर्षभर इतकी बोलणी खावी लागली की तो बिचारा डॉक्टर होणेच काय बदली नवा शर्ट मागणे ही विसरून गेला.🤣 अशा रीतीने पिंगळ्याच्या सलामीने दिवाळीची नांदी सुरु होई. एकतर हे सुगीचे आनंदाचे दिवस, कापणीनंतर घरात धन-धान्य भरलेले म्हणूनच हे पिंगळा, वासुदेव, विविध सोंग काढणारे लोक येऊन उपजीविका करायचे, लोकही मोठ्या मनाने धान्य दान द्यायचे.


    सहामाही परीक्षा होईपर्यंत आम्ही अभ्यास करता करता कासवा सारखी तोंडे बाहेर काढून विविधरंगी तयारी गुपचूपपणे करायचो. सगळे गनिम शाळेत, घरात आमच्या कारवायांवर सक्त नजर ठेउन असत. काही मागा 'परीक्षा होऊदे,मग बघू' चे पालुपद रात्रंदिवस सुरु असे, अगदी घराघरातून तोच पडसाद ऐकू येई ! हे सुरु असतानाच बायकांची दिवाळीच्या फराळाची लगबग सुरु होई. सर्वात आधी शरद गुजर, कोठावळे, बाश्टे अशा किराणा मालाच्या दुकानात तोबा गर्दी उसळे. मलकापूरची आख्खी बाजारपेठ पंचक्रोशीतील लोकांनी फुलून जाई. सारी दुकाने सुवासिक साबण आणि रंगीत लाल-हिरव्या तेलानी सुगंधित होत. आमच्या अंगाला वर्षातून एकदाच लाईफबॉय सोडून वेगळा मोती साबण लागे. लाईफबॉय म्हशीपासून माणसापर्यंत चाले.😅 पण मोतीचा गोटा दुकानात दिसला तरी मुलायम नेत्रसौख्य देई. दुकानदार थकायचे इतकी गर्दी. आम्ही पोरे गडबड, गोंधळ, ढकलाढकली करून शरद गुजरकाकांना सतावून एकदाचा किराणा माल काबीज करत होतो. शरदकाका गाढ झोपेत सुद्धा हाताने पुडीचा दोरा गुंडाळत असतील असेही वाटे! मग कुठे घरोघरी जय्यत तयारी सुरु होई. चकली भाजणीची तयारी करताना ‘तुझं प्रमाण कसं? माझं असं’ असं करत एकमेकीला नव नव्या टिप्स घेत, ‘बरं का धणे टाक, हळकुंड, ओवा टाक’ करत घरोघरी डाळी, धणे, जिरे भाजल्याचा खमंग वास दरवळे. झारा-कढईच्या खण खण आवाजाच्या तालात भाजणी भाजून होई. वासानेच नाक तृप्त होई, कानही सतत स्वयंपाक घरात कानोसा घेत आणि अभ्यासावरचे लक्ष उडे. भाजणीचे आणि बेसन दळप सरुडकर, आवटे  किंवा सबनीसांच्या गिरणीत रुखवतासारखे दिमाखात मिरवत जायचे. आमच्या   ज्ञानावर फारसा विश्वास नसल्याने गृहलक्ष्मी जातीने हे काम करत.🙃 वाकून वाकून त्या पिठाला सारखं चाचपून, सूचना देत दळण व्हायचं, तरी बरं पट्टयात हात घालायच्या नाहीत!  मग ठाक ठाक करत त्या पिठाच्या गिरणीवर छोट्या काठीने मारत मारत एकदाचे हात, पाय, तोंड, केस पांढरे करून पीठ निघाले की अर्धी लढाई जिंकल्याचे समाधान चेहऱ्यावर घेऊन त्या दुर्गा घरी येत. 😃

पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो.

    मुलांवर सोपवण्यात आलेला 'पोहे फुलवून आणणे' हा एक साग्रसंगीत कार्यक्रम असे. रात्रभर भात भिजत घालून, निथळून त्याचे पोहे काढायला भट्टीत नेणे यात एक दिवस जाई. सकाळी तोंड खंगाळून झाले रे झाले की एका भावंडाने पिशवी नंबरात ठेउन बसायचे, दिवसभर बाकीच्या भावंडांबरोबर आळीपाळीने तिथे एका पायावर तपश्चर्या करायची. मग कुठे दुपारी नंबर येई. उभे राहून पाय दुखले तर त्या पिशवीवर बसून रहायचं, पण तिथून हलायचं नाही.😅 त्या भट्टीजवळ भल्या मोठ्या लोखंडी कढईत वाळू असे, खाली जाळ लावला जाई. त्या वाळूत ओले भात टाकले की पोहे छान फुलून यायचे. मग मोठ्या, लोखंडी चाळणीसारख्या झाऱ्यात ते फुललेले पोहे वाळू चाळत चाळत बाहेर काढायचे. फार कौशल्याचे, कष्टाचे काम असे. फटाफट आवाज करत कमळा सारखे फुलणारे पोहे वाकून पाहताना अत्यानंद होई.😀 तोंडाला धग लागत आहे याची जाणीव नसे. धगीने लालभडक झालेले माकडासारखे तोंड आणि भट्टीच्या काजळीने, दिवसभराच्या खाल्लेल्या धुराने काळवंडलेले हात-पाय, कपडे अशी दिवसभर तंगी द्यावी लागे.😆 त्या पायलीभर ओल्या भाताला प्रेमभरे राखण्याची मेहनत केल्यावरच ते पोहे फुलत आणि पिशवी गरम ताज्या पोह्यांच्या मस्त सुगंधात नाहून जाई. कष्टाचे पोहे मूठभर चहात टाकून खाताना फारच मधुर लागायचे. सुदामाकडे कृष्णाने पोहे का मागितले असावेत ते बरोब्बर समजे. कृष्णाने भट्टीतले ताजे पोहे खाल्ले असणार, त्यालाच त्याची अमुल्य किंमत !!!☺ पोह्याबरोबरच शेंगदाणे भट्टीत भाजताना अवर्णनीय गंध येई, अगदी तोंडाला पाणी सुटे! आता मुलांना भट्टी नेऊन दाखवायला हवी, म्हणजे किमान त्या मागचे कष्ट तरी समजतील. पण ती मजा और असे हे बाकी खरे. किराणामाल हेलपाटे आणि पोहे भट्टीचा आमचा रोल संपला की घरातल्या बायका त्वरेने पुढच्या तयारीला लागत. आम्हाला तांदळातल्या खड्यासारखं उचलून बाहेर टाकणं हे त्यांचं पहिलं काम असे. ‘लुडबुड करू नको, अभ्यास कर जा’ असे करून सत्वर हाकलत. 😐

        आता एकदाची ती परीक्षा संपली की फक्त मज्जाच मज्जा अशी स्वप्नं दिसत. सगळीकडे धावणारे अचपळ मन ताब्यात ठेवत आम्ही काय अभ्यास करत होतो ते एक ईश्वररुपी शिक्षकच जाणोत. बावरे मन सगळ्या जिभेला पाणी सुटायला लावणाऱ्या अन्नब्रम्हाच्या गंधाने नाहून फुलपाखरांगत गंध हुंगत घरोघरी उडत जायचं.🦋 आमचं शरीर मात्र फक्त ती सहामाही पार पाडायचं निरस काम नाईलाजाने करत असे. पालकांना हुलकावणी देत हळूच आम्ही कानगोष्टी करत आमच्या दिवाळी मेकअपची जुळवा जुळव करायचो. पिना, रिबिनी, रोज पावडर, गंधाची बाटली या खरेदी एक-दोन रुपये बजेट असे. सगळ्या बालसख्या एकाच वेळी जाऊन, सगळ्या दुकानदारांचे दोन दिवस डोके फिरवून, घासाघीस करून ही खरेदी करत होतो.🎀 रिबिनी परत कर करुन त्याला वीट आणत होतो. त्याकाळी  चिट, मांजरपाट आणि पापलीन असे दोन-तीन कापड प्रकार होते. आम्हाला दुकानात कापड पसंतीला कैद्यासारखे दंडाला धरुन नेले जाई. ‘फक्त रंग सांगायचा, बाकी तोंडातून आवाज काढायचा नाही’ ही सक्त ताकीद असे! एका दिवाळीला मी आणि कांचनने एका ताग्यातले निळ्या फुलांचे कापड आणले, ऐन वेळी शिंपीमामानी शिवण्यास साफ नकार दिला. मग आमची हिरमुसलेली  तोंडे बघून  ममतेने  आमची सखी वृंदाची ताई, विद्या जोशीने हौसेने मस्त फ्याशनेबल फ्रॉक शिवले, ते ही अवघ्या दोन दिवसात!👗 केवळ एक छंद म्हणून! आम्ही खुशीने जुळ्या बहिणीसारख्या ते एकसारखे  फ्रॉक घालून नाचलो. आज प्रिय सखी कांचन आणि  मायाळू विद्याताई दोघीही या जगात नाहीत… तो फ्रॉक मात्र डोक्यात अमर होऊन प्रत्येक दिवाळीत घालावा असे वाटत राहिले आहे.


दिवाळीच्या फटाक्यासाठी अधून मधून घरी हट्ट करणे सुरु असे. फटाके वाटण्या करताना भावंडे  शत्रूपक्ष असल्याने त्यांच्या कारनाम्यावर जातीने लक्ष ठेवावे लागे. त्या काळी लक्ष्मी, विलायती, चिमणी, लवंगी असे तोटे मिळत. दुर्गंध सोडणारी नागाची गोळी, आमने-सामने, चंदनकाडी असे वेगळ्या प्रकारचे फटाकेही होते. गृहयुद्ध  होऊ नये म्हणून बाबा स्वत: सर्व फटाके समान वाटत. मला केपा फार आवडत, दिवसभर कुटायला मिळायच्या. मी तोटे बदलून केपा मागायचे. त्यातून मोठे वाजणारे फटाके बदली करताना मोठी भांडणे, वाद, मारामारी शेवटी मातेचे दिवाळीपूर्व धम्मकलाडू, चापटपोळ्या खायला मिळत. 'पुढच्या वर्षी फटाके नाहीत' असा धमकीलाडू ही मिळे. ✨ हे ओघाने न चुकता दरसाल घडेच. आमचे बंधू माझे पाताळात लपवलेले फटाके कसे पळवत आणि कधी उडवत ते आजतागायत समजले नाही… आता जाब विचारावा तर तह करून भांडण सोडवणारी माता नाही.

दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदलेले आहे

        एकीकडे मुलांचे वेगळेच उद्योग सुरु असत. बुरूड गल्लीत जाऊन दिवसभर हेलपाटे टाकत बांबूच्या कामट्या कापून, रंधून घ्यायला मुले नंबर लावत. मग अंबिके डॉक्टरांच्या अंगणात वर्गणी  काढून मोठ्ठा आकाशडबा/हिडिंबा तयार करण्यासाठी कामट्या बांधून मेढे केले जाई. त्यांचीही गुप्त खलबते चालत. ‘प्लॅनची आयडिया’ फोडायची नसे म्हणून चोरुन पोळी आणि ओरडून गुळवणी असे.🤣 लोक उगीच आपल्याला काही माहित नाही असे सोंग घेत. तो आकाशडबा उर्फ हिडिंबेला  लपवत लपवत अगदी शेवटी कागदी साडी नेसवून, झालरी लाऊन नवरीसारखे नटवायचं. इकडे काही मुले दारात लावायला आकाशकंदील घरी करायचा घाट घालत. त्या कामट्या, रंगीत कागद आणून डोक्याला डोकी लावून वीस वेळा करुन विस्कटून राब राब राबत असत. सारे घरदार खळीने चिकट झाले की वैतागून घरोघरी माता-पित्यांचा गोड, प्रेमळ आवाज चढे. 'अभ्यास करा' चे  धृवपद इंग्रजी सिनेमातील पार्श्वसंगीतासारखे तार सप्तकात सूरू होई.  शेवटी कशीबशी ती एखादे टोक बाहेर एखादे आत अशी बेढब, पोक काढलेली, अशक्त चांदणी उदयास येई. तिला रंगीत कागद नेसवला की ती गरीब  बिचाऱ्या चांदणीचे रुप घेई.⭐ स्वत:च्या मुलांनी केलेली असल्याने सगळ्यांना ती 'उत्तम' झाली असे म्हणावे लागे… ज्यासाठी ही बालके झटत. (अन्यथा पुन्हा खळीने घर-दार बरबटून घेणे तरी सोसावे लागेल ही भिती!) 😆

        आपली रांगोळी उत्तमच यावी म्हणून दिवाळीपूर्वी दारासमोरचे अंगण/रस्ता गुळगुळीत करणे हे मोठे काम असे. अंगण नटीच्या गालांइतके गुळगुळीत करण्यासाठी मुरूम, माती, शेण असा रोज रस्त्याचा मेकअप चालायचा. कधीकधी जोरदार पाऊस येऊन आमचा रस्ता मेकअप साफ धुवून टाकायचा पण तरीही परत परत आमचं लेपन सुरूच असायचं. इकडे कोळसा कुटून काळा रंग बनव, हळदी, कुंकूं, काव, गुलाल, पिवडी, नीळ वापरून विविध रंग आम्ही घरी तयार करत होतो. परीक्षेचे संकट डोक्यावर घोंगावत असे म्हणून कलाराधना चोरुन चोरुन सुरु असे. मग गुलाब कारेकर, भिकुताई माणकर अशा प्रवीण कलाकारांकडून रांगोळी वहीत काढून घेणे, पुस्तके जमवणे चाले. ते ठिपके उंटासारखे तिरकस  वर-खाली जाऊन जीव काढत. त्या ठिपक्यांची  सरळ रेषेत काढायला सारखा सराव लागतो, नाहीतर ठिपके जुळवताना हमखास राजहंसाची  कोंबडी होते! ते ठिपक्यांचे तुळशी वृंदावन आणि कासव बायका डोळे मिटून काढत, इतके लोकप्रिय! आम्ही आपलं ठिपक्यांच्या वाकड्या चालीस कंटाळून फ्री हैण्ड रांगोळी सुरु केली.🤣 असा  त्याकाळी सुद्धा रांगोळी हा फार महत्वाचा विषय असे.

        मुले दर वर्षी किल्ला करायची. अशीच गडबड किल्ल्याची माती आणायला पण चाललेली असायची.  सगळ्यांची अंगणे पालथी घालून कच्ची सामुग्री, वाळू, तट्टे, पत्रे, विटांचे तुकडे, दगड इत्यादी गोष्टी जमवत असू. ढोर मेहनत करत ही मुले बादल्या घेऊन मातीसाठी नदीकिनारे पालथे घालत. घरातून शिवाजी महाराज, मावळे अशा मूर्ती, तोफा, हळीव, मोहरी हे आणणाऱ्याला विशेष भाव मिळे.🧱 आम्हा मुलींना अंगण धुंडाळून वस्तू जमा करण्यासाठी हेरगिरीचे काम दिले जाई. एका मैत्रिणीने तोफ करायला घरातली चुलीवरची लोखंडी फुंकणी आणली. तोफ छान झाली, पण तिच्या घरच्यांना हा पराक्रम कळताच तोफ ताबडतोब जप्त झाली, तीच फुंकणी पाठीत बसली. मग ती अख्खी दिवाळी तिच्या घरच्यांना नावं  ठेवण्यात आणि ‘ती कशी झाशीची राणी आहे’ हे सांगण्यात रंगली.🤣 किल्ला बांधकामाच्या वस्तू जमा करेपर्यंत परीक्षा संपे. मग मुलांच्या दंग्याला ऊत येई. इतिहासाची पुस्तके धुंडाळत कोणता किल्ला बांधायचा ही गुप्त मसलत सुरु होई. आपला किल्ला भारी झालाच पाहिजे या साठी सगळे मावळे झटत. सगळे किल्ले ठरवत मग विचीत्र गड साकार होणार हे ही सगळे प्रेक्षक जाणत असत. साधारण आकार देऊन हिरवळ पेरणी आधी करावी लागे कारण दिवाळीत किल्ल्यावर गर्द जंगल दिसावे ही समस्त बालकांची मनिषा!🏡

  अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो
    या दिवाळीच्या सुट्टीत मुलांनी धमाल करताना अभ्यास करावा हे कोणाच्या डोक्यात प्रथम आले ते माता सरस्वतीच जाणे, तिने त्यास का सदबुद्धी दिली नाही ??? हा अनुत्तरित प्रश्न उरतोच.😅 मुलांची ज्ञानाने भरलेली डोकी चकली-करंजी खात खात सपाट खोकी होऊ नयेत म्हणून शाळा उगीच ढिगभर गृहपाठ देत, आजही देतातच. असला अमानवीपणा पाहून पोरे रडकुंडीला येत. आजही मला हा प्रकार निषिद्धच वाटतो. माझी लेकरेही सुट्टी लागताच चिडचिड करत, अत्यंत घाणेरड्या अक्षरात, दोन दिवसात तो महिन्याभराचा गृहपाठ खरडून टाकत हे चांगले आठवतं.😆 अरे त्या गोजिरवाण्या मुलांना बिनधास्त खाऊदेत, मस्त खेळूदेत, मातीत लोळूदेत, डुंबूदेत थंडगार जलात कार्तिक स्नान करत... का त्यांचे सुंदरसे बालपण दिवाळी गृहपाठाने कुरतडायचे? आम्ही फार शहाणी मुले असल्यामुळे मस्त बालपण जगलो. या गृहपाठाला ना आम्ही फार महत्व दिले, ना आमच्या आदर्श पालकांनी.🙃

    परीक्षा झाली म्हणून मोठ्ठा कल्ला करत बाल गोपाळ घरी येत. दप्तरे कोपऱ्यात  फेकून देत आणि किल्ला बांधणीचं काम  रात्रं दिवस जोमात सुरु करत. अगदी शर्यत लागे लवकर किल्ला बांधण्याची.👨‍🔧 ही मुले कायम किल्ल्यावर मुक्कामाला असत, घरी पाऊल ठेवायची नाहीत, पोटाचीही शुध्द नसे. त्यांच्या प्रेमळ माता अधून मधून येऊन, त्यांना बखोटीला धरुन, ओढत घरी नेऊन, न्हाऊ माखू घालून, पोटभर खायला लावून, परत मोहिमेवर धाडत. किल्ल्यांचे गारुड शिवकाळापासून असे मावळ्यांना भारून टाकत आहे. एकदा किल्ल्यावर हिरवळ उगवू लागली की मुले खुष होत पुढच्या सजावटीला लागत.

    असे अनेकविध पूर्व रंग उधळत दिवाळी उंबरठ्यापर्यंत येई. दिवाळी अंक, लेकरांचे  गड-किल्ले, फटाके, नवे कपडे, रांगोळी, सुवासिक तेल, उटणे, साबण आणि चविष्ट फराळ या सगळ्या जय्यत तयारीने या दिवाळीचे स्वागत करायला आम्ही अगदी अधीर व्हायचो…✨

    पन्नास वर्षांपूर्वीच्या दिवाळीच्या स्वर्गीय आनंदोत्सवाची अफलातून मजा पुढील भागात नक्की वाचा.

विजयश्री तारे-जोशी
०७-११-२०२०

टिप्पण्या

  1. खूप छान! लहानपणी च्या आठवणी ताज्या झाल्या! कोल्हापूर मध्ये मुलींनी रांगोळी काढण्यासाठी कट्टा करणे,आणि मुलांनी किल्ला करणे,अशी विभागणी असायची,शिवायला दिलेले नवीन कपडे झालेत का म्हणून शिंप्याकडे फेऱ्या मारणे हा एक लघु उद्योग असायचा! आताच्या मुलांना ती मौज फारशी माहिती नाही!
    मिलिंद गुर्जर

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम दीपावली वर्णन प्रत्यक्ष या भूमिकेतून गेल्या सारखं वाटलं. सुंदर Malkapur आणि नागरिक. 🙏🙏🌹🌹
    संजय कापसे

    उत्तर द्याहटवा
  3. लेख नेहमीप्रमाणेच उत्तम. पुढील भागाची वाट पहातोय.

    उत्तर द्याहटवा
  4. विजयश्री !त्रिवार वंदन तुला "असेच म्हणावसे वाटते मला ,तुझा प्रत्येक लेख वाचताना ,अगदी त्या लेखात वर्णन केलेला काळ,घटना,ती सर्व माणसे आपण पहात आहोत आपण त्या प्रत्येक घटनेचे साक्षीदार आहोत ,तो काळ जिवंत होऊन आपल्यासमोर सगळं घडतय असाच फिल वाचताना येतोय आणि हे सगळे कौशल्य आहे तुझ्या सिद्धहस्त लेखणीतून उतरणार्या प्रवाही शब्दांचे !तुझी ही प्रसंग जिवंत करण्याची किमया खरचं अफलातून आहे
    अगदी पहाटेचा खड्या आवाजात गाणं गाणारा वासुदेव, बायकांची दिवाळीच्या फराळाची लगबग, मुलांची किल्ल्याची तयारी, परिक्षेचे टेन्शन, आकाशकंदिल बनवायची छुपी तयारी ह्या सर्व प्रसंगाची वातावरण निर्मिती तू इतकी छान केली आहेस की वाचक आपसूकच त्याच्या न कळत त्या वातावरणात कधी शिरतो ते त्याचे त्यालाच कळत नाही इतके हुबेहूब रंग तू त्यात भरतेस आणि विनोदप्रचूर भाषेमुळे तर लेख आणखीनच नजाकतदार होतो .आपल्या प्रत्येक लेखात आपल्या परंपरा छान जपल्या आहेस आणि आम्हालाही त्या घटनांचा पुनःप्रत्ययाचा आनंद देण्यारी यशस्वी लेखिका झाली आहेस !
    अशीच लिहीत रहा आणि इतराना "गुजरा हुआ जमान्या"ची आठवण देत रहा!!🙏🏻🌹
    मनिषा कुलकर्णी दुबई

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अनेक अनेक आभार मनीषा ! नक्की प्रयत्न करत राहीन ‘गुजरा हुआ जमाना’ आठवणीत आणण्याचा.
      😃

      हटवा
  5. फारच सुंदर आठवणी. जयश्री तू खर्या अर्थाने मलकापूर अनुभवलं आणि त्या आठवणी कागदावर उतरल्यास.

    असेच सुंदर लिहिण्यासाठी खुप खुप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  6. आतच तुझा दिवाळी चा लेख वाचला. लहानपणी च्या आठवनी जपून ठेवणं तसं अवघड असतं. पण त्या लक्षात ठेऊन डोळ्यसमोर ठेवणं ही एक कला आहे. त्या काळात आपल्या वेळेस असणारी दिवाळी आज आपण सुखवस्तू असून सुद्धा ती मजा घेउ शकत नाही. प्रेमाने बनवला गेलेला पदार्थ अवीट गोडीचा वाटायचा. आहे त्या परिस्थितीत मुलांना खूष करणारी ती दिवाळी आज त्या आठवणी ताज्या करणारी वाटली. तुझं पाठीवर थाप मारून शाबासकीच कवतुक. आणि अश्याच गोष्टी साठी शुभेच्छा.
    राजन सबनीस

    उत्तर द्याहटवा
  7. अतिशय सुंदर वर्णन. डोळ्या पुढे चित्र उभे राहिले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पुढच्या भागाची वाट पाहते आहे.

    उत्तर द्याहटवा
  8. तुझं किती कौतुक करावे कळेना..अप्रतीम अप्रतीम अप्रतीम...
    रेखा पाटील

    उत्तर द्याहटवा
  9. किती मस्त तुमचे मलकापूर....आणि त्या आठ्वणी...जावे वाटते तिथे लगेच
    Vansant Desjpande

    उत्तर द्याहटवा
  10. तारे-जोशी मॕडम ब्लाॕग खूपच छान झाला आहे.

    पोह्याची भट्टी, अंगण तयारी, बुरूड गल्ली, पिंगळा 👌👌👌😀☺️

    गरम ताजे पोहे, चहा 👌👌👌

    Complete Nostalgia.

    खूप खूप खूप छान!
    👌👌👌😀☺️

    खरोखर मजा आली वाचायला.
    दिवाळीची तयारीतच खरी मजा असते.

    अभ्यंगस्नान झाले की दिवाळी संपली.😀☺️





    पेपरमधे का देत नाही.


    संपादक महोदयानी दखल घ्यावी.🙏
    जीवन बोडके

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद जीवन बोडके.
      पेपरमध्ये पब्लिश करणार असतील तर मला द्यायला काही हरकत नाहीये! 😃 अजून अशी काही संधी आली नाही खरं.

      Thank you so much once again!! This comment has definitely boosted my mood! 😊

      हटवा
  11. सु-प्रभात !🌹
    जयश्री,तुझा हा दिवाळी पूर्व लेख वाचला नेहमी प्रमाणे खास अशा शैलीत खमंग,खुसखुशीत वर्णन आणि लोभनीय अस लेखन
    त्या बद्दल तुला शुभेछ्या!💐
    लहानपणी सुबत्ता नव्हती पण तो काळ आणि ती दिवाळी एक वेगळ पण होत
    त्या गोष्टी आता अनुभावन शक्य नाही.ती मज्या नाही.
    एक गोष्ट मनाला खिन्न करणारी वाचनात आली ती म्हणजे "मलकापुर एक खेड़"
    नाही जयश्री मलकापुर खेड़ कधीच नव्हतं आणि नाही मलकापुरकर म्हणून ते मान्य ही नाही
    ते एक आइत्यसिक शहर वजा गांव म्हणून प्राख्यात आहेच तसच् मोठी बाजार पेठ,सुसंस्कृत,राजे-राजवाड़े,श्रीमंत-मध्येम अशी प्रतिष्ठित व्यापारी वर्ग,दोन नदया (संगम)लभलेले असे आपल मलकापुर आहे
    त्यामुळे ते एक खेड़ होउच् शकत नाही
    *"माझ् मलकापुर,माझा अभिमान"*
    असो एकंदरित तुझ लेखन फार सुन्दर् आणि सुखद आठविणि नी लोभनीय असच असत.
    असच लिहित जा
    धन्यवाद!
    उत्तम कुलकर्णी (किरकिरे)

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अनेक आभार उत्तम कुलकर्णी. 🙏

      मलकापूर खरंतर मलाही आता खेडेगाव नाही वाटत. पण जेंव्हाचे वर्णन मी लिहिते, तेंव्हा ते दोन नद्यांच्या मधे आणि डोंगरांच्या पायथ्याशी असलेलं एक टुमदार छोटंसं गाव होतं. टेकडीवर, वाड्याखाली, नदीच्या पलीकडे आत्ता आहे तेवढी वस्तीही नव्हती. त्यामुळे ज्यांनी तेंव्हाचे मलकापूर पाहिले नाही किंवा थोडं स्मृतीपटलात मागे पडलं आहे, त्यांच्या कल्पनेत ते जसेच्या तसे उतरवण्यासाठी मी खेडेगाव असा उल्लेख केला आहे. ते किती संपन्न, समृद्ध आणि माणुसकीला जागणारे आहे हे मी नक्की लिहीत असते. पण आपला मुद्दाही विचार करण्यासारखा आहे आणि मला माहेरच्या माणसांना अजिबात दुखवायचं नाही. 😊 त्यामुळे इथून पुढे मी नक्की यात सुधारणा करेन. 😃

      हटवा
  12. Madam phar surekh
    varnan diwaliche kele ahe. Pinglyache varnan tar tantotant kele ahe karan mi ajun baghto ahe.Kirana dukandarachi ghaitar apratimach karan khara phayda diwalitach asto. Pohechya bhattiche varnan tar hubehub kele ahe.pariksha hoiparyant kasvasarkhe tond baher kadhne ha wakkyaprakar tar tantotant vaparla ahe.Chorun poli ani ordun gulavni hya mhanicha shabdaprayog hubehub zala ahe,Mi swatta khedetla aslemule yat kahihi khote nahi.Abhinandan madam.Pudhil blogchi pratiksha karto.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you so much J.P. Sangrulkar! 😃
      You are quite lucky if you are getting to meet 'Pingala' till now. I am very glad that you are noticing so many details and appreciating them. 😊

      हटवा
  13. अती उत्तम....दसरा भाग वाचायला उत्सुक आहे...
    मस्स्स्त
    मिलिंद

    उत्तर द्याहटवा
  14. दिवाळी अंकाची भूक भागवली स. काटकसरीने केलेली दिवाळी खरंच लाख मोलाची होती. पिंगळा मस्त. आम्ही नाही अनुभवला म्हणून जास्त भावला.आकाशकंदील बनवण्याची खरंच धमाल. बुरुड गल्लीची मजा मी पण अनुभवली आहे. एकत्र फराळ करण्यातील गंमत आता सांगून कुणाला पटणार नाही. ती अनुभवावी लागेल. रांगोळी काढण्याचा खटाटोप छान रंगवला आहेस. मलकापूर येथील रम्य आठवणीत तुला रमताना तुझी प्रतिभा अधिक फुलते.बारीक सारीक वर्णना मुळे ब्लॉग वाचायची गोडी वाढते 👌👌
    शैला उर्फ मृदुला चिटणीस..सानपाडा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद शैला मावशी!!
      तुमच्यासारखे चोखंदळ आणि सगळे बारीक सारीक तपशील वाचून त्यांना दाद देणारे वाचक लाभल्यामुळेच मला आणखी लिहायला प्रोत्साहन मिळते. 🙏 बाकी मलकापूरच्या आठवणीत रमणं हा तर छंदच आहे माझा. 😊

      हटवा
  15. श्री, आग दिवाळीच्या आणि पाहुण्यांच्या गडबडीत, आणि जरा निवांत वाचू, म्हणून तुझा हा लेख मी जरा उशिरानेच वाचला. कसलं अफलातून वर्णन करतेस तू? दिवाळीच्या आकाशकंदीलाची मजा मी अनुभवली नसली तरी तुझ्या लिखाणातून, तुझे अनुभव, जणू आमचेच अनुभव आहेत असं वाटायला लागत. आमचं वेगळं अस काही राहतच नाही. सगळं तुझं ते आमचंच होऊन जातं😊 रांगोळी च ही तसच! खरंच रंगांच्या रांगोळ्यांसाठी काय काय करावे लागत होते? कधी विटेचा चुरा कर, कधी गुलाल टाक, कधी कुंकू, कधी हळद!!! आयुष्यात पैसा नव्हता, सुबत्ता नव्हती, पण समुद्धी जरूर होती. आज हवे ते रंग आणूनही, रंग उडून गेले आहेत असं वाटत! विविध चवीचे पदार्थ खाऊनही त्या वेळी खाल्लेल्या पदार्थांची चव मिळत नाही !! पण तू त्या गमावलेल्या क्षणांना उजाळा देतेस! त्या सुखद आठवणी जाग्या करतेस! तुझे शतशः आभार☺️तुझ्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहते.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अगदी खरं आहे मंदा.
      रांगोळी, फराळ सगळं असं मोठा कार्यक्रम चालल्यासारखं चालायचं. वर्षातून 2-4 च मोठे कार्यक्रम व्हायचे ना त्यामुळे किंमत होती प्रत्येक गोष्टीची. अगदी चकली, करंजी पण नंतर वर्षभर मिळायची नाही.

      अनेक अनेक आभार ! तुझ्यासारखे वाचक लाभल्यामुळेच मला आणखी लिहायला प्रोत्साहन मिळते.😊💓

      हटवा
  16. मोत्यासारखे चांगले शब्द वेचून कथेला चांगला रंग आणला.

    उत्तर द्याहटवा
  17. ताई, बालपणीची दिवाळी नजरेसमोर उभी राहिली. आम्ही बाजारपेठेत राहायचो, अजूनही दिवाळीत आंब्याचे डहाळे आणि ऊस लावलेली दुकाने आठवतात. फारमंतरलेले दिवस होते

    उत्तर द्याहटवा
  18. खूप सुंदर लेख..malkapur व आपल्या गोड आठवणी सगळेच डोळ्यासमोर आले. ताई वाक्य रचना एकदम मस्त...

    उत्तर द्याहटवा
  19. ।।ॐ॥ सोनेरी आश्विन व शरदागमाचा काळ कसा मन मोहरणारा !मलकापूरच्या या nostalgic मधुर आठवणी तू मोरपंखासारख्या मनाच्या कुपीत अत्तरासारख्या जपल्या आहेस.अजून माहेरच्या मेंदीच्या पानावर तुझं मन झुलत आहे.रमणीय बाल व कुमार अवस्थेतल्या आठवणीना रांगोळीसारखं लेखातून रंग भरवून सजवीत आहेस.पिकं मोहरली व सुगी सुरु झाली की वासुदेव, पिंगळा,माकडवाले ,सोंगी इत्यादि मंडळी गावाकडे सुगीतल्या उखाळ्यासाठी येत.पहाटे पहाटे जागवीत येणारा वासुदेव व पिंगळा आता गावगाड्यातून वजा झालेत.या लोकसंस्कृतीच्या कलाकारांची आठवण तू या लेखातून जागवीत आहेस.भविष्यासाठी पिंगळ्याकडे धावणारी मित्रमंडळी आता आजच्या जमान्यात दिसेनासी झाली,तरी तूझ्या लेखाने त्याना जिवंत केलय.परीक्षेची टांगती तलवार विद्यार्थी चमूच्या मानेवर की खांद्यावर विक्रमादित्याच्या वेताळासारखी लटकत असे.सुट्टीसाठी विरहणीसारखं आतुरलेल मन तुझ्या लेखात डोकावत आहे.दिव्याच्या डब्याची तयारी करणारी अफलातून वानरसेना लेखातभेटते .पोहे फुलवण्याचा अनुभव बोलका आहे.त्याकाळी आम्हां सागांवकरांना शिराळ्याला जावे लागे.तसा हा कंटाळवाणा उद्योग अनुभवाचा आहे, रांगोळीच्या क्षेत्रातली कारेकर व मानकर ही मडळी शेजारीच असल्याने तशी परिचयाची! फराळाच्या तयारीचे वेळी बालपणीची आस्वादतृष्णा किती उतावीळ!सारा स्वप्नवत भूतकाल रेखाटताना तू जणु वर्तमान
    विसरतेस. वर्तमानात वावरताना पण ते सारे जुने कुठे तरी हरवल्याची खंत लेखात डोकावत असते. तो"रम्य बालपणाचा घडी घडी आठवणारा" काळ तुझ्या मनात अजून पिंगा घालत असतो.तुझा हा आठवणीतील दिवाळीचा फराळ दिपावलीपूर्व मिळाला.मिठास व चवदार आहे. आता पावसाने फराळ तयारीसाठी उसंत घेतली की नाही?नाहीतर खरा फराळ चुकवशील!💐👌👌👍👍( श्री.एस.डी.शेटे,सागांव)

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. लहानपण आपल्या पेक्षा सगळे आनंदाने साजरे करत असते कधीच नाराज होत नाही. म्हणून मन परत परत तिथे जाते...म्हणूनच कदाचित आज्जी आजोबांचे नातवंडाबरोबर जास्त मेतकूट जमते. आजची दिवाळी ही उद्याची रम्य आठवण होणार आहे...म्हणून मी सर्वांना जास्तीत जास्त आनंद मिळवायचा आणि द्यायचा प्रयत्न करत आहे. पती देव नको नको म्हणून भांडत होते तरी मी कविता केली आणि छान फराळ घरी तयार केला. घरात ते खमंग गंध आले आणि जीवाला मस्त मस्त वाटले. आता या पावसाळी दिवाळीची ..कवितेची आठवण जोडली गेली. कधी बकुळीची फुले तर कधी पारिजात. ... आपण या आठवणी वेचत रहायचे...हेच तर जीवन😁🙏🏻🙏🏻🙏🏻

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -